महालगड- भाग 4
तिसरा भाग लिंक
काळाच्या धाकात असलेल्या माणसाला सगळेच आनंदाचे क्षण धूसर आणि कुचकामी वाटू लागतात. त्याच्या मनातली भीती, त्याच्या एक-एक सुखावर विरजण घालत त्याच्या विवेकावर आणि धैर्यावर राज्य करू लागते. डोळ्याला दिसणाऱ्या भीतीची एकवेळ खबर घेणे शक्य असते. जी भीती दिसत नाहीये, किंवा जिची व्याप्ती माहीत नाहीये, त्या भीतीला तोंड देणे अवघड असते. ती धड कुणाला सांगता येत नाही आणि मनात राहिल्यामुळे ती तासा-तासागणिक वाढत जाते. तारेचं असंच झालं. घराचं दार लावून ती निपचित पडून राहिली. तिच्यापाठी लागलेलं, ते नेमकं काय आणि कसं होतं, हे तिलाही माहित नव्हतं. ती सांगणार तरी कुणाला ? एकतर वय कोवळे, अनुभव फारसा नाही. घरात कुणी मोठं माणूस नाही. आजूबाजूला कुणाला सांगावं, तर नेमका विश्वास कुणावर ठेवावा, हे कळायला मार्ग नव्हता. नवरा रात्रीच्या मोहिमेनंतर , घराच्या आजूबाजूला लागलेल्या पाळतीमुळे घरात थांबू शकत नव्हता.
आज तिने काहीच केलं नव्हतं. चूल सारवली नाही. देवाजवळ दिवा लावला नाही. भाकरी भिजवल्या नाहीत, रानातून भाजी नाही आणली. घराच्या एका कोपऱ्यात असावं गाळत ती बसून राहिली. क्षणात विचार आला, कि दोन लुगडी घेऊन आईकडे राहायला जावं. पण शांता घरी आल्यावर त्याने हिला कुठे शोधायचं. पोटात भुकेने कालवा-कालव व्हायला लागली. मन खंगत चाललं होतं. विजल्या चुलीकडे जाऊन काही करायची इच्छा आणि बळ, दोन्ही तिच्याकडे नव्हतं.
"काकू...!" शेजारच्या राधकाकूचे दार तिने वाजवले. आतून म्हातारी चालत आली.
"चार भाकऱ्या हव्या होत्या...!"
"का गं, काय झालं ?"
काकूच्या त्या करुण प्रश्नाने एकदम तारेचा बांध फुटला.
"अगं, भीतीयास कशाला, येईल तो परत ! हिथच दडून बसला असल." काकूने तिला आत घेतले. घरी भाकरी न्यायच्या ऐवजी तिथेच तिला वाढलं. तिचं रडणं काही थांबेना.
" काय झालंय ? अगं, नाही बोललीस, तर कळणार कसं...! " कोरड्या भाकरीला कालवण टाकत म्हातारी म्हणाली.
" काकू, भ्या वाटतंय...!" तारेने घडलेलं सगळं सांगितलं. ऐकून काकुला घाम फुटला.
" कशाला जायचं आड रानात एकट्यानं ?" काकूने शिंकेत हात घातला. हाती लागलेल्या वाळलेल्या मिरच्या , खडे मिठ आणि मोहरीने ताराची दृष्ट काढली. चुलीत दृष्ट पडताच मोठा जाळ झाला. काळा धूर वाट काढत तिच्या घराच्या बाहेर पडला. एकंच ठसका उडाला. डोळ्यात पाणी आले.
" तारे...!" काकू एकदम भानावर आली.
" हे साधं नाहीये पोरी...!"
आधीच भ्यायलेल्या तारेचा थोडा धीर अजुन खचला. काकूने तिला जवळ घेतलं.
" भ्याउचं नाही. काही नसतं होत. झोपडी बाहेर निघून गेलेला काळा धूर तिथेच दबा धरून बसला होता. आत बसलेल्या दोघींकडे टक लावून बघत होता. त्याला आकार नव्हता. पण त्याची वृत्ती मात्र चांगली नव्हती.
"ऐक माझं, म्या बी एकली हाय. शांता येत नाही, तो पर्यंत हिथंच रहा. घराकडं ध्यान राहील. तुला भ्या पण नाही वाटायचं."
तारेच्या जीवात जीव आला.
"मी तुझी लुगडी आणते आवरून. तुझ्या नवऱ्याला निरोप बी जाईल."
"नगं त्यांना सांगू ! कुठं असल, काय करीत असेल? काळजी वाटल. अश्यात घराकडे येणं धोक्याचं हाय."
राधाकाकूने तिला त्या बाईबद्दल काहीच सांगितले नाही. ओढ्याच्या वाटेवर वसलेली माताच होती ती. तिची जीभ काळी होती. तिला सगळं दिसायचं. त्या रानात एकटीच वसती करून रहात होती. त्या वाटेने जाणाऱ्या माणसाला गाठून त्याच्या आयुष्यात पूढे घडणाऱ्या घटना सांगून ,घाबरवून सोडायची. गावकऱ्यांनी म्हणून तिला गावाबाहेर काढलं होतं. ती सांगायची, तसं घडत होतं, हे मात्र खरं होत होतं ! राधाकाकू गावात जुनी होती. तिला हे सगळं माहित होतं. तारेवर येऊ घातलेलं संकट त्या मातेने पाहिलं होतं.
एका फडक्यात काहीतरी बांधून राधाकाकू बाहेर निघाली.
"तुझी लुगडी घेऊन येते." म्हणत तिने दार ओढले. तारेच्या उघड्या झोपडीत शिरली. फडक्यातून गाईच्या शेणाच्या गोवऱ्या बाहेर काढला. तारेच्या चुलीत घातल्या आणि पेटवून दिल्या. दोरीवरची लुगडी काढली आणि कडी लावून बाहेर आली.
.....
हातात तलवारी, भाले, कोयते घेऊन चंद्राजीची माणसं वाडीत घुसली. वाटेत भेटेल त्या माणसाला पोरांचा ठावठिकाणा विचारू लागली. इस्पित उत्तरं मिळाली नाहीत, कि मारू लागलीत. वाडीतली बहुतांश माणसं रानात गेली होती. चंद्राजीची माणसं गुरं-ढोरं ओढू लागली. घरातल्या बाया त्यांच्यासमोर जातंच नव्हत्या.
" ह्येच त्यांच्या म्होरक्याचं घर...!" शांताच्या झोपडीसमोर उभं राहून एक स्वार म्हणाला.
" ह्योच जातुया किल्यावर , दर चार-पाच दिसांनी...! याचाच कावा असल. "
शांताच्या अंगणात स्वार येऊन खाली उतरले.
" हाय का त्यो बग...!" राधाबाई कडी घालून आली होती. एकाने लाथ मारून दार तोडलं. आपल्या दाराचा असा आवाज ऐकून तारेच्या काळजाचं पाणी झालं. आता झोपडी रहात नाही, हे तिला कळलं. राधाबाईच्या खिडकीतून ती सगळं पहात होती. सपासप हात चालत होते. झोपडीच्या बाहेर असलेल्या भट्टीचं पार वाटोळं झालं. कष्टाने उभा केलेला डोलारा क्षणात जमीनदोस्त झाला. सगळी हत्यारं त्यांनी विस्कटून टाकली.
"त्याची बायको कुठं दिसेना...?" त्यातला एक जण म्हणाला. कुणीही आजूबाजूच्या झोपड्यांमध्ये चौकशीला आलं नाही. आत विजलेली चूल, खाली पडलेला भोपळा पाहून त्यांनी तारा पळून गेल्याचा अंदाज लावला.
" जर एखाद्याच्या झपडीत ती घावली , तर तिच्या सकट त्याच्याबी इस्कृट होईल, हे ध्यानात ठिवा...!"
मशाली न आणल्याने त्यांनी झोपडीला आग नाही लावली. जसे आले होते, तसेच ते निघून गेले. राधकाकूच्या घरात दडून बसलेल्या तारेने आपल्या संसारावर पडलेली पाहिली ठिणगी पाहिली.
....
" यड लागलंय का ?" राणा ओरडू लागला.
शांताचा गावात जायचा हट्ट त्याला रुचला नाही.
" खांडोळी करील त्यो !"
" मंग काय हिथंच दडून बसायचं?"
घरी बायको एकटी होती. याचं भान त्यालाही होतं. चंद्राजीचा काही भरवसा नव्हता.
" शांत्या, त्यांना काय बी हुनार न्हाई ! एव्हाना वाडीत कुणाकडे तरी गेल्या असतील. आणि चंद्राजी वाडीला हात लावायचा न्हाई. त्याला ठाव हाय, वाडीला धक्का लावला, तर रात्रीतून त्याचं शीर कापून वेशीवर टांगु आपण...!"
या वाक्याने शांताला बळ आलं. पुढंच मात्र अवघड होतं.
खानने पोरांच्या शोधासाठी , त्याच्या फौजेतल्या सगळ्यात जालीम ताफ्याला तयार केलं होतं. एका-एका माणसात हत्तीला लोळवण्याचं बळ होतं. डोंगर, दरी-खोऱ्यात, रात्री-पहाटे केव्हाही आणि कुठेही , कसलीही मोहीम पार करण्याचं धाडस त्यांच्यात होतं. स्वभावाने नराधम होते. असे सुमारे शे-सव्वाशे सैनिक वाडीच्या आजूबाजूच्या जंगलात दिवस-रात्र एक करत होते. एकही शेत, रान त्यांनी सोडलं नव्हतं. पोरांना ,सापडले तर जिवंत नाहीतर त्यांची शीरं घेऊन येण्याचा हुकूम सुटला होता. वणव्या सारखे ते तीन रात्रींपासून फिरत होते. याचा सुगावा शांताला आणि त्याच्या साथीदारांना सुद्धा लागला होता. वाडीच्या मागच्या टेकडीवर ते देखील पुढच्या हुकुमाची वाट पहात बसलेच होते. त्यापैकी एकाचं रान होतं ते. सापडेल ते खाऊन दोन दिवस झाले होते.
त्या रात्री पावसाने जरा उसंत घेतली. शांता एका झाडावर बांधलेल्या मचाणावर पहुडला होता. बाजूला उपसून ठेवलेली तलवार, काही मोठी दगडं आणि एक-तिर कामटा होता. बाजूच्या झोडपात हालचाल व्ह्याला लागली. त्याचे कान सावध झाले. तलवारीवर मूठ पक्की झाली. त्याने आजूबाजूला नजर फिरवली. बाकीची मंडळी मागे होती. कुणी झाडावर, कुणी मोठ्या दगडाच्या आधाराने, तर कुणी झुडपाच्या आडोश्याला डोळे लावून होतं. येणाऱ्या माणसाची दिशा कळताच शांता सिद्ध झाला. अंधारात नीटसं काही दिसत नव्हतं. चालण्यामुळे , येणारी व्यक्ती एकंच असावी, हा अंदाज त्याने बांधला. तोच समोरून महादेव चालत आला. हातात मोठा लठ्ठ होता. कमरेला एक छोटी तलवारही होती. शांता बसला होता, त्या झाडाखाली येताच,शांताने खाली झेप घेतली. काही कळायच्या आत महादेवच्या मानेला तलवार लागली.
"काका, तू हाईस व्हय...!"
" दुसऱ्या कुणाला घावणार ए का तुम्ही ?" त्याच्या मागावर कुणी नाही, याची खात्री झाल्यावर शांताने दगड मारून बाकीच्यांना उठवले. अर्धवट झोपेत असलेले सगळेच गोळा झाले.
" किल्लेदाराचं हुकूम आलाय ! तुम्हला सगळ्यांना ताबडतोब गडावर बोलावलं आहे. तुमच्या कुणब्याला कळवा."
एकदम आलेला हा हुकूम ऐकून सगळेच चकित झालेत.
" पण...! "
"शांता, गडासारखी दुसरी जागा नाही. गावात आलात, तर त्यो तुम्हाला सोडायचा नाही. त्याच्या किंवा खानाच्या हातात घावले, तर तुमचं शीर उडवेल तो...! आता एक-एक मावळा कामाचा हाई..! तुमच्या घरा-दाराला काही दिवस वाडी सोडून भाईर जावं लागेल."
" तारा ?" शांताने महादेवला विचारलं.
" आहे...! तिला सांगून आलोय मी तुमच्याकड."
आधीच रानात अडकून बसलेल्या शांताला, हे सगळं ऐकून जास्त काळजी वाटू लागली. तिला गावात वाऱ्यावर सोडून ,आपण गडावर जायचं, हे त्याला रुचलं नाहीच.
"म्या न्हाई यायचो गडावर ! जाईन तर तिला घेऊनच !"
" शांता, ऐक, वाडीवर आधीच त्याची माणसं घात लावून बसलीयेत. त्यांना तुझा वास जरी लागला, तरी ते चवताळून अख्खी वाडी जाळतीळ !" एकाने त्याचं मन वळवायचा प्रयत्न केला.
" नाही कळू द्याचे त्यांना. रातीतुन जाईल म्या...!"
" खुळा हाइस, आमची बी बायका पोरं हाइत. आम्हाला बी कळतंय...!" शिवा त्याची समजूत काढू लागला.
" न्हाई कळतय तुला...!" एकदम शांताचा आवाज बद्दलला.
ताराला एकटं सोडून शांता येऊ शकत नव्हता. पिराने बजावल्या प्रमाणे तिला एकटीला सोडणं अवघड होतं. एक अनोळखी भय तिच्या मागावर सतत होतं. शांताच्या साथीदारांना त्याचा गंध सुद्धा नव्हता.
" काका, म्या तुमच्या सोबत वाडीला येतो."
बाकीचे साथीदार आपला पसारा उचलून गडाकडे जायला निघाले.
वाडीत देखील एक-एक माणूस कमी होऊ लागले होते. रात्रीच्या अंधारात बोचकी बांधून त्यांनी गडाची वाट धरली होती. खानाच्या फौजेला गुंगारा देण्याता मोठी कसब पणाला लागणार होती. गुरं-ढोरं उजाड रानात चरायला सोडली. वाडीवर उरलेल्या माणसांवर त्यांची जवाबदारी होती. त्या बारा मावळ्यांचे कुणबे रात्रीतून गडाकडे निघाले होते. तारा मात्र राधाकाकूच्या झोपडीत शांताची वाट पहात बसली होती. तिला एकटीला गडाकडे जायला धज नव्हती. तिच्यावर टपून बसलेलं संकट तिला एकटीला झेपणारं नव्हतं. अश्यात ती चंद्राजीच्या हाती लागण्याची भीतीही होतीच. जिथे जायचं तिथे, जे होईल ते, जसं होईल तसं, शांता काही केल्या गडावर एकटा जायला नव्हता, ताराही त्याला एकटं टाकून गड चढेना !!!
........
अंधारात रान तुडवत शांता घराकडे निघाला. बाकीची मंडळी गडाकडे निघाली. कोणताही उजेड नव्हता. उजेडाचा प्रश्नच नव्हता. त्या किर्रर्र रानात सावल्या पडतील, एवढीसुद्धा उजेडाला वाट नव्हती. देवाच्या भरवश्यावर पडणारे एक-एक पाऊल कुठे पडतंय, याचा नेम नव्हता. वाट नेहमीची असली, तरी जपून चालणं भाग होतं. पायवाट असली, तरी ती चिखलाने निसरडी करून ठेवली होती. डोळ्याला दिसेल, तेच सत्य होतं. बाकी सगळं एक सोंग ! म्हाताऱ्याच्या अंगावरची घोंगडी त्याने बाजूला सारली होती. तो पूढे चालत असल्याने , मागे शांताला वाट दिसावी या हेतूनेच. गडाकडे जाणाऱ्या माणसाची टोळी केव्हाच अंधारात पूढे सरकली होती. त्यांच्यासाठीदेखील वाट सोपी नव्हती. गड चढायला पहाट होणार होती.
सपसप करत झाडांच्या फांद्या हल्ल्या. दोघे सावध व्हायच्या आत पाच-सहा माणसं त्यांच्या पुढ्यात येऊन उभी राहिली. कित्येक तासांपासून दबा धरून बसलेली होती. त्यांच्या भेदक नजरा मारेकऱ्यांच्या होत्या. हातात तळपत्या तलवारी होत्या. शांताने आपल्या तलवारीस हात घातला, तोच मागून एकाने त्याला धरले. हल्ला चहुबाजूने होता. परतवून लावण्यासारखा नव्हताच.
"काका, घात झाला रे !"
" व्हय, म्हणून म्या तुला न्हाई म्हनलं...! पोरा, एकट्या माणसाला गाठलं यांनी."
शांताने हाताची तलवार सोडली नाहीच. समोरच्या एका माणसाने काकाला हाताशी धरून ठेवलं. त्यांचा म्होरक्या शांताकडे चालत आला.
" म्हाताऱ्याला काय धरतोय ? माझं हात सोड, तीन-चार जणांना तरी नेईन ! " शांता सुटण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच्या हालचाली पाहून त्याला दोर-खंडाने बांधण्यात आलं.
अर्ध्या रात्री बरीचशी वाडी रीती झाली होती. मोकाट कुत्री कुलूपं ठोकलेल्या घरांची राखण करत दाराशी बसली होती. जाणारी त्यांच्या रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करून गेली होतीच. सापडतील ते अन्न-धान्य पाठीला लावून लोकांनी सापडेल त्या वाटेने गड धरला होता. एक-एक घरातील विजत्या मशाली अंधराचे वलय वाढवत जात होत्या.
"दोन घास खाऊन घे..! त्याला बी बांधून देईन मी." आपली बोचकी भरून तयार असलेल्या तारेला आज जेवायची बी शुद्ध नव्हती. सूर्यास्त झाल्यापासून एकाच जागी बसून होती. राधाकाकू वाडीवर थांबणार होती. इतरही म्हातारी माणसं होतीच. गड चढणं धोक्याचं होतं. वाडीत सुनी सोडून जाणंही तितकंच धोक्याचं होतं.
बाहेरून घोड्याच्या टापांची चाहूल लागली. राधकाकुने घाईघाईने खिडकी उघडली. पांढऱ्या कापड्यातला महादेव तिला दिसला. तो तिच्याच दारापाशी येऊन थांबला.
"काका, आलास व्हयं !" पाण्याचा तांब्या तिने काकासमोर ठेवला.
"राधे...! तारा ?"
" कवापासून तयार बसलीय ! शांत्या...?" घोडा मोकळा होता. ताराही बाहेरचा आवाज ऐकून बाहेर आली.
"कुठंय त्यो...?" तारा घोड्याच्या आजूबाजूने पाहू लागली.
"काका, भेटला का त्यो तुम्हास्नी ?"
काका काहीही बोलला नाही.
" काका, काय झालं ?" तुम्ही बोलत का नाही..!" तारेचा संयम सुटू लागला.
"अरे सांग कि...! त्या पोरीचा जीव कासावीस व्हाय लागला!" राधाकाकूने महादेवाला ठणकवलं.
" काय सांगू ? वाटेत घात केला नशिबाने...!"
हे ऐकताच तारेचे भान हरपले. अख्खी वाडी तिच्या डोळ्यासमोर गोल-गोल फिरायला लागली. डोक्यात झिणझिण्या आल्या. चक्कर आल्याने ती घोड्याच्या आधाराने उभी राहिली. राधाकाकू तिला सावरायला सरसावली. दोघांनी तिला ओट्यावर बसवलं. काकाने घडलेलं सगळं सांगितलं. डोळे झाकून तारा सगळं ऐकत होती. तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. हुंदके छातीत अडकून राहिले होते. हातापायातले सगळे बळ क्षणात वाऱ्यावर पाचोळ्याने उडावे, तसे उडून गेले.हे सगळं ऐकून राधाकाकू मात्र हमसून-हमसून रडाया लागली.
"जित्ता हाय न त्यो...?" सगळं ऐकून शांत झाल्यावर तिने प्रश्न केला. महादेव तिच्याकडे पाहू लागला.
"पोरी...!" या पुढचा धीर त्यालाही देता आला नाही.
"जित्ता असल. मला घेतल्याबिगर जायचा नाही. सोबत जायचंय आम्हाला...!"
" त्याला धरून नेलंया...! किती वेळ ठिवतील, सांगता न्हाई येणार." म्हाताऱ्याच्या बांध फुटला. जमीनीवर हात टेकून तो ही रडायला लागला.
" ठिवतील...! वाग हाय माझा धनी...! कोल्ह्या-कुत्र्यांच्याकडून नाही त्याला भीती...!"
तारा आत गेली. दार लावून घेतलं. बाहेर बसलेली दोन्ही म्हातारी रडायची थांबत नव्हती. काही वेळाने दार उघडलं.
तारा केस बांधून बाहेर आली. तिच्या कमरेला म्हातारीची कुऱ्हाड होती.
" तारे, यड्यागत करू नगं ! "
"त्यो जित्ता हाय, मला जाया पाहिजे." अर्धवट जखमी झालेल्या म्हाताऱ्याने तिला धरण्याचा प्रयत्न केला. तिने त्याच्या समोर कुऱ्हाड धरली.
" माझ्या मार्गात येऊ नगं...! जे त्याचं होईल, तेच माझं बी होईल." म्हणत तारा त्याच्या हातातून निसटली. पळत येऊन घोड्यावर बसली आणि शांताला आणायला निघाली...!
.....
क्रमश....
लेखन : अनुराग वैद्य

