महालगड -६
भाग 5 लिंक
युगांसारखी वर्षं उलटली. छत्रपतींचे स्वराज्याचे स्वप्न साकार होऊन मराठी मातीत रामराज्य साकार झाले. अनेको वर्ष ते हिंदुस्थानच्या नकाशावर डौलाने फडकू लागले. भगवा पार अटकेपार जाऊन पोहीचला. दूर दर्यातून आलेले फिरंगी देखील दोनशे वर्ष राज्य करून गेले. शौर्याने, हौताम्याने मिळालेल्या स्वातंत्र्याच्या गाथा त्रिखंडात गाजू लागल्या. देश पारतंत्र्याच्या बेड्या तोडून बाहेर आला. काळ मोठा बिलंदर असतो. नव्या पिढीने घ्यायचे धडे तो सहजासहजी आपल्या पलटावर धूसर होऊ देत नसतो. कोणत्या-न-कोणत्या स्वरूपात तो बलिदान जिवंत ठेवत असतो. कुठे लिखाणातून, साहित्यातून, तर कुठे अवशेषाच्या स्वरूपात तो बऱ्याच गोष्टी जागृत ठेवत असतो. वाडीत घडलेले ते थरारनाट्य आजही तारा आणि शांताच्या सर्वोच्य बलिदानाची गाथा आजही पंचक्रोशीत सांगितली-ऐकली जाते. छत्रपती शिवरायांनी वाडीचे नाव तात्काळ बदलून तारापूर केले आणि स्वराज्यात ते सामील करून घेतले. महालगडही त्यानंतर काही काळातच स्वराज्याच्या नोंदीत आलाच. ऋतू बदलावे, तसा काळ पुढे सरकला.
"काय ग वृंदे १५ ऑगष्टची तयारी करायची आहे की नाही ? खुशाल पहुडली आहेस." सुमती बंगल्यात येताच एकंच कल्लोळ माज्याचा. नोकर-चाकरांसह कार्यालयात बसलेल्या तात्यांना सुद्धा तिच्या येण्याचा सुगावा लागायचा.
"बाईसाहेबांना आज बरं नाहीये. झोपल्यात थोड्या !" माधव सांगू लागला.
" हिला आता काय धाड भरलीये. विरह सोसेनासा होतोय वाटतं !" असे म्हणून तिने चक्क वृंदेच्या अंगावरची शाल बाजूला ओढली.
" काय गं, इतकं सांगतोय न तो. काही दया-माया आहे की नाही ?" ताडकन उठून वृंदा तिच्या अंगावर धावून गेली.
" झालं बाई ! अगं कार्यक्रम चार दिवसांवर आलाय, झोपा काढतेस खुशाल."
वृंदाचं कॉलेजातील हे शेवटचं वर्ष. पुढे वाडीलांसारखं वकील व्हायचं आधीच ठरलं होतं. पण तात्यांनी आपला शब्द मोडून तिचे लग्न ठरवुन दिले. ती शिर्क्यांच्या घरात जाणार होती. घर-दार नावाजलेलं. पैसा खूप, त्यात शहरात तीन बंगले. गावी भरमसाठ शेती. कशाची कमी नाहीच ! यामुळेच वृंदाने बाबांशी बोलणे कमी केले होते. त्यांचा हा निर्णय तिला अजिबात मान्य नव्हता. वकिली करायची ठरले असतानाही तिला न विचारता त्यांनी परस्पर हे घडवून आणलं होतं. तिच्या आईचाही या लग्नास विरोध होताच.
"काय कल्लोळ चाललंय सकाळीच?" तात्या काचेरीतून आत आले.
" काका, आता तुम्हीच बघा. कार्यक्रम तोंडावर आला आहे. आणि हिचं आपलं वेगळंच सुरु आहे."
" वृंदा , अगं शेवटचं वर्ष आहे. ती म्हणते आहे, तर भाग घेऊन टाक. मोहनराव पण यायचं म्हणत होते."
"मग तर अजिबातच नाही. त्यांना म्हणावं, आल्या पाऊली परत जा ! उगाच नको नाचक्कीला आमंत्रण..!"
" असं कसं, कितीही म्हणलं तरी या घरचे होणारे जावई आहेत ते !"
" तात्या, मला या विषयी बोलायला आवडत नाही."
" का नाही ? चार पुस्तकं जास्तीची शिकली, म्हणून जिभेची लांबी वाढत नसते. तुझ्या आईच्या हट्टामुळे हे वर्ष तरी थांबलो. नाहीतर ठरताच बार उडवून देणार होतो." तावातावाने तात्या पुन्हा कचेरीत निघून गेले.
कार्यक्रम पार पडला. खुर्चीवरून उठून मोहनराव व्यासपीठावर आले. त्यांच्या वडीलांनी सुरु केलेली शिक्षणसंस्था ,त्यात तात्या विश्वस्त ! सोयरीक अशीच जुळून नव्हती आली.
"छान झाला कार्यक्रम आपला." मोहनराव वृंदेच्या कानात कुजबुजले.
"पण हा शेवटचाच बरका ! शिर्क्यांच्या सुनेने असं चारचौघात ...!"
वृंदेने तो हार गळ्यातून काढला आणि तरातरा आत चालत गेली.
"अजून राग गेलेला दिसत नाही, सूनबाईंचा...!" मोहनचे मित्र दामले सतत त्यांच्या कानात पिंक टाकत असत.
" जाईल, एकदा माप ओलांडून वाड्यात आल्या, कि सगळं कसं आपल्या मर्जीने होईल."
घराण्याचा प्रचंड अभिमान असलेला मोहन, विचाराने तितकाच कर्मठ होता. बालपणि घरी शिस्त लावणारं कुणीही नाही. वाडील सारखे दौऱ्यावर असल्याने त्यांच्या आजूबाजूला काय पिकतंय, याकडे कुणीच लक्ष दिलं नाही. शिक्षण पूर्ण करून आपल्या शेतीकडेच त्यांनी लक्ष दिलं. दिमतीला नोकर-चाकर, गाड्या असल्याने गरिबी माहीत नव्हती. पैसा आणि सत्ता याचा माज खांद्यावर घेत लग्नाचं वय झालं. तात्याही तोलामोलाचे होते. घराण्यासमोर मुलाच्या चारित्र्याचा वेध घ्यावा, याची त्यांनाही गरज वाटली नाही.
बंगल्यासमोर गाड्या लागल्या. मोहन तात्यांकडे आजची रात्र थांबणार होता. आमंत्रण तात्यांनीच दिलं होतं. वृंदाच्या अंगाची लाही-लाही होत होती.
"आई, यांना इथे बोलावण्याची गरज काय होती ? आले तसे गेले असते परत."
" वृंदा, पोरीच्या जातीने इतकं त्वेषाने बोलून चालत नसतं. काही गोष्टी कराव्याच लागतात. आणि त्यांना सांगून ठेवलं आहे न, पूढे तुला शिक्षण घ्यायचंच आहे म्हणून." आईने तिची समजून काढण्याचा प्रयत्न केला. एक ट्रे मध्ये जेवायचे घेऊन वृंदा केव्हाच बाहेर गेली होती.
" पुढच्या आठवड्यात देवीचा उत्सव आहे. बाबांची इच्छा आहे, कि तुम्ही सर्वांनी यावं. मोठा उत्सव असतो. आणि आपलेही पाय लागतील वाड्याला." मोहननी फर्मान सोडलं. "वा, वा ! उत्तम. वृदेनेही सासुरवाडी अजून पाहिली कुठे आहे ?" तात्यांनी भरल्या ताटात होकार सोडला. वृंदाच्या तोंडावरून काही माशी उडाली नाही.
रात्री बंगला शांत झाला. आपल्या प्रशस्त खोलीत वृंदा निजायला आली. काहीतरी वाचायला मिळतंय का , म्हणून तिने कपाट उघडलं. चार पुस्तकं चाळली, हाताशी काहीही लागलं नाही. खिडकीचं तलमी रेशील हवेने डोलत होतं. खिडक्या हवेसाठी उघड्याच रहात होत्या. खोली वरच्या मजल्यावर होती. तणावात होती, पण वृंदा थकली होती. कसेही करून उत्सवाला जाणं टाळलं पाहिजे. ते शक्य नव्हतं, हे तिलाही माहीत होतं. हवालदिल होऊन ती पहुडली आणि तिचा डोळा लागला.
रात्र बोलू लागली. रातकिडे देखील उबदार जागा पाहून झोपी गेले होते. हवाच काय ती जागी होती. या गरठ्यात देखील वृंदाच्या कपाळावर घामाच्या काही धारा येऊ लागल्या. झोपेतच तिच्या हाताच्या हालचाली होऊ लागल्या. खोलीत कुणाचे तरी अस्तित्व तिला जाणवू लागले. कुणीतरी तिच्या निद्रिस्त मुद्रेकडे आधाशासारखे बघत खोलीत फिरत होते. आधीच अंधार, त्यात ती सावलीही काळी. ती खोलीभर फिरून सगळं न्याहळत होती. कोपरा-न-कोपरा फिरून पहात होती. अचानक वृंदा झोपेतून उठली. तिला दरदरून घाम फुटला होता. याआधी असलं स्वप्न तिला पडलं नव्हतं. स्वप्न होतं, कि खरंच तिच्या खोलीत कुणी शिरलं होतं, काहीच कळायला मार्ग नव्हता. ती पलंगावरून उठली आणि दाराकडे गेली. दिव्याची खटकी तिने सुरु केली. दार बंद होतं. निश्वास टाकत ती माघारी आली. थोडी हवा स्थिरावली होती. तो पडदा मात्र हलत होता. ती खिडकीपाशी आली. खाली सर्वत्र शांत-शांत होतं. बंगल्याच्या आवाराबाहेर कुत्री मात्र गर्दी करून भुंकत होती.
पहाटे बंगल्यातुन गाड्या बाहेर जाण्याचा आवाज झाल्याने तिला जाग आली. मोहन आपल्या गावी परत जायला निघाला होता. दामले तात्यांचा आणि आईचा निरोप घेत होते. मोहन गाडीत जाऊन बसले होते.
"हे असं अचानक जाणं ...?" चहाचा कप भरत आईने तात्यांना विचारलं.
"अहो, मोठी माणसं ती ! त्यांचा व्याप मोठा, रात्रीतून एखादं काम आठवलं असेल." तात्या काही होणाऱ्या जावयाची बाजू सोडण्यास तयार नव्हते. बाकी वृंदाची तयारी करून ठेवा. काय गं ? "
"अं..!" रात्री पडलेल्या स्वप्नाचे विचार काही केल्या तिच्या मनातून जात नव्हते.
" जायचं न उत्सवात ?"
" आम्ही एकट्या बाया जाणं बरं दिसत नाही. आपण आला असतात...?" आईची सुद्धा तिथे जाण्याची इच्छा नव्हती.
" आम्ही ऐन उत्सावाला येऊच. तुम्ही पूढे जाऊन जरा घरं-दारं बघून या." आठवडा कसा गेला वृंदाला कळलं नाही. एक दिवस रात्री गाड्या येऊन हजर झाल्यात. सगळ्या पेट्या गाडीत रात्रीच ठेवल्या गेल्या. प्रवास लांबचा होता. पहाटे अंधारात तात्यांचा निरोप घेऊन गाड्या रवाना झाल्या.
"आश्चर्य आहे. तुमच्याकडून घरची कुणी बाई नाही आली ?" शिर्क्यांकडून कुणीच बाईमाणूस न आल्याने आईला आश्चर्य वाटले. चालक यावर काहीच बोलला नाही.
"काय नाव तुमचं ?"
"बाळू..!" त्याने नाव सांगितलं.
" बारा वर्ष झाले मला यांच्याकडे. माझे आजोबा, वडील, इथेच होते." इतकं बोलताना सुद्धा त्याने मान वळवून मागे पाहिलं नाही.
सुमारे सहा मैलाचा घाट गाडी उतरत होती. पुढच्या गाडीच्या धुळीने यांनी गाडीच्या काचा वर घेतल्या होत्या. उजव्या बाजूला खोल दरी होती. दरीतून एक चिमुरडी नदी वाट काढत दोन डोंगरांमधून पलीकडे निघत होती. हवेत उष्णता होती. पहाटे निघाल्यापासून सुर्योदयापर्यंतचा हवाहवासा गारठा केव्हाच विरून गेला होता. रस्त्याच्या दुतर्फा असणारी घनदाट झाडीच्या जागी आता मोठी, पण वाळलेली वृक्ष पळत होती. जिथे आंबे- चिंच होती, तिथे आता जुनी, पाण्यावाचून वाळलेली वडाची, पिंपळाची झाडं दिसू लागली होती. रस्त्याला खेटून जाणाऱ्या मातीच्या पट्ट्यातला ओलसरपणा इथे दिसत नव्हता. त्या घाटाच्या वरच्या बाजूस काही विशाल वृक्ष रस्त्यावर उन्मळून पडतील, इतके झुकले होते. दिशा नीट समजत नव्हती. रस्ता कच्चा होता पण बाळू ही तरबेज होता.
"रस्ता सरावाचा दिसतोय...!"
"होय, मालक गाडी घेऊन जातात, आम्हालाही जावं लागतं. आठवड्यातून एकदा तरी आमची रपेट असते."
गाडी आता थोडी झाडीतून मोकळ्या पठारावर आली होती. दरीतून नजर काढत वृंदा आभाळाकडे बघू लागली. एकदम तिने डोळे मोठे केले.
"हे काय आहे ?"
समोर एक अजस्त्र कपार होती. निसर्गाने स्वतःहून कोरल्यासारखी. अगदी रखरखीत ! एकही झाड नाही, साधं निवडूंग देखील नाही. पावसाळ्यात वाहणाऱ्या झऱ्यांनी आपल्या खुणा मात्र पेरून ठेवल्या होत्या. एकाच काळ्याक्षार दगडातून निघालेली ती कपार दिसायला भयानक वाटत होती. जमीनीत तिची खोली कुठे आहे, हे कळायला मार्ग नव्हताच. उंचीही अस्पष्ट दिसत होती. भूमीत आणि नभात, एखाद्या अजस्त्र राक्षसासारखा तो कडा उभा होता. पायथ्याला लोटांगण घालणारं ते कोरडं, पण एखाद्या सापासारखं दिसणारं जंगल ! अनंतकाळ पावसासाठी तरसलेलं. पाण्याच्या नावाला ती नदीच काय ती किनाऱ्याला असणाऱ्याची तहान भागवत जात होती. सूर्यप्रकाश कित्येक वर्षांपासून तळापर्यंत पोहोचलाच नव्हता. कपारीच्या वर एखाद्याने मुकुट घालावा, तशी नक्षी होती. दूरवरून तो फक्त डोंगर नसावा.
बाळाला बहुतेक तो प्रश्न ऐकू गेला नसावा. वृंदा मात्र त्या कड्याकडे बारकाईने बघत होती. त्यातून तिला एक गूढ धून ऐकू येत असावी. धुळीने मध्येच एक परत उभी केल्याने तिने काच खाली घेतली. थोडं स्पष्ट दिसत होतं. पायथ्याशी असणारे घनदाट जंगल, कपारीवर उमटलेल्या धबधब्याच्या खुणा, आणि एकदम पावसाने तोंड फिरवल्याने वाळलेली सृष्टी ! निसर्गाने काय उद्देश्य डोळ्यासमोर ठेऊन हे सगळं केलं असावं ? आपण जन्माला घातलेल्या जिवाकडे कुणी इतक्या क्रूरतेने पाठ फिरवतं का ?
"पाऊस कमी पडतो का इथे ? " तिने दुसरा प्रश्न केला.
" हो, काय माहित ? काय चुकलं आमचं..! उन्हाळ्यात सहा-सात कोसावरून पाणी आणावं लागतं. विहिरी, तळी, सगळीच कोरडी...!" बाळूने उसासा टाकला. किल्ला ए तो ! मोठा इतिहास आहे त्याला. कुणी वर पर्यंत गेलं नाहीये आजून. माझ्यासमोर तर नाहीच नाही. शहरातले हौशी जातात, पण परत येताना कुणी दिसलं नाहीये. मागून जाणाऱ्यांना ,आधी गेलेल्यांच्या चीजवस्तू सापडतात."
कडा नजरेआड होईपर्यंत वृंदा त्याच्याकडे एकटक बघत राहिली. कुणीतरी आतून आवाज देतंय ! कित्येक युगांपासून कुणीतरी तिथे अडकल्याचा भास तिला होत होता. एखादी माउली अन्नाच्या शोधात चुकली असावी अन पाडसासाठी तळमळत तिने या भोवर्यात प्राण सोडले असावेत. बापाच्या खांद्यावरून उतरून , एखादं पोरगं बापाच्या हरवलेल्या पाळखुणांचा माग काढत , त्याच ठिकाणी बसलं आहे, जिथे त्याच्या बापाच्या शेवटच्या पाऊलखुणा होत्या. पाण्यावाचून जीव गेलेल्या श्वापदाभवती घिरट्या घालणाऱ्या गिधाडांना घाबरून त्याचं पिल्लू ते दृश्य पहात झाडीत दडून बसलंय ! अश्या असंख्य कल्पना त्यावेळी वृंदेला शिवून गेल्यात.
दूरवर गाव दिसू लागलं.
"आलो आपण, अर्ध्या तासात पोहोचू..!"
मायलेकींनी तयारी सुरु केली.
"आईसाहेब, एक विनंती आहे." बाळू पहिल्यांदा मागे वळला.
" मो तुमच्याशी बोललो, हे मालकांना कळू देऊ नका !" या त्याच्या विनंतीचे दोघीना आश्चर्य वाटलं.
" नाही आम्हाला परवानगी. पण तुम्ही नवीन आहात, म्हणून बोललो. माफी करा...!"
गावाच्या वेशीत गाडी शिरली. कित्येक वर्षांपासून मनासारखा पाऊस न झाल्याने गाव ओसाड पडलं होतं. पक्की बांधकामं खूपच कमी होती. अधिकांश घरं ही संध्याकाळी उठून जाण्याच्या तयारीत असल्यासारखी होती. धुळीने माखलेल्या रस्त्यांवर अर्धी उघडी पोरं गाडीचा फोफाटा दिसताच दडून बसू लागली. त्या गाड्यांच्या ताफ्याकडे बघताना त्यांच्या डोळ्यात भय स्पशर दिसत होतं. गाड्यांकडे एखाद्या अपराध्यासारखं ते बघत होते. वृंदाच्या नजरेतून ही बाब लपली नाहीच. गावातील पाणवठे उठले होते. त्यावर गंजून गेलेली भांडी तहानलेली होती. मोकाट फिरणाऱ्या जनावरांची हाडं त्याच्या अपेष्टा ओरडून सांगत होती. माणसांची देखील तीच गत होती. वाटेवर लागलेल्या मंदिराच्या ओट्यावर साचलेली धूळ , लोकांनी देवाकडे साकडं घालणं सोडून दिल्याची नांदी देत होते. आतला बंद गाभारा देखील वेगळं काही सांगत नव्हताच. एखाद मैल चालून आल्यावर शिर्क्यांच्या टोलेजंग हेवली समोर गाड्या थांबल्या. आतून गडीमाणसं धावत आली. वृंदाचा चेहरा आणि गाडीची काच, यात जास्त मलूल काय झालं होतं, हे सांगणं कठीण होतं. पण दोघांमधून आरपार पहाणं तितकंसं सोपं नव्हतं.
दहा पायऱ्या वर एक बाई नऊवारी साडीत उभी होती. तिने वृंदाची दृष्ट काढली.
" त्रास नाही न झाला प्रवासात ?"
"नाही !" तिच्या बोलण्यात शालीनता होती. शांतता होती. एकटीच बाई असावी घरात. "आम्ही मोहनच्या काकू. चला, आत या." चार- सहा माणसं सामान घ्यायला आलीत. प्रत्येकाच्या माना खाली होत्या.
एका लांबच-लांब दिवाणखाना पूढे लागला. छतावर लटकलेली झुबरं, सातासमुद्रापारहुन आलेल्या आणि ठिकठिकाणी जागा पाहून वसलेल्या निरनिराळ्या वस्तू त्याची शोभा वाढवत होत्या. पण तिथे उजेड मात्र खूपच कमी होता. वर असलेल्या तावडणातून आला, तेवढाच.
"तुम्ही वर जायचं." एका बाईच्या मागोमाग वृंदा आणि तिची आई वर जाऊ लागली. खालून मोहन त्यांच्याकडे बघत होता. त्याची नजर तीक्ष्ण होती. मृदुतेचा लवलेशही नव्हता.
"बाईसाहेब, काकुसाहेबांनी मुद्दाम पाठवलं आहे. तुम्हाला काय हवं-नको ते बघायला." पंधरा-सोळाची चुणचुणीत पोरं परकर-पोलक्यात उभी राहिली. सावळी आणि देखणी. कपाळावर चंद्रकोर.
" अरे वा, काय गं नाव तुझं..?"
" दुर्गा...!"
"ये...!"
तिच्या बघण्यात एक कौतुहल होतं. कदाचित हवेलीत फारसं कुणी शहरातून येत नसावं. प्रत्येक वस्तू ती नीट पारखून बघत होती. यातलं गावात काहीच मिळत नव्हतं.
पडदा उघडताच समोर गाव दिसलं. थोडं मळलेलं.
" काकुसाहेबांचा निरोप आहे." ती मागून बोलली.
" संध्याकाळी दिवे लागले, की बाहेर पडायचं नाही. नोकर-चकरांशी मोजकं बोलायचं. एकटं बाहेर जायचं नाही...!"
" काय चाललंय दुर्गा..?" एकदम मागून काकू आल्याने ती बावरली.
"उगाच सूनबाईंना काहीही सांगू नकोस. जा , महाराजांना सांग जेवायची तयारी करायला." दुर्गा खाली पळाली.
" आहेत , थोडे कडक नियम इथे. तुम्हाला होईल सवय हळू-हळू." दुर्गा गेल्याची खात्री करून काकू बोलल्या.
" सूंदर आहात...!" त्यांची वृंदाच्या चेहऱ्यावरून बोटं मोडली. एक ताईत काढला आणि तिच्या उजव्या दंडाला बांधला.
"हे काय आहे...?" वृंदाला हे नवीन होतं.
" असू द्या, रीत आहे आमची. देवीचा अंगारा आहे." काकू थोडी खिन्न झाल्याचं वृंदाच्या लक्षात आलं.
"रात्री पडदे ओढून झोपा. बोलावणं पाठवते, आवरून खाली जेवायला या...!"
चार दिवस आधी यायचा निर्णय जरा चांगला होता. हेवलीत हवा कमी आणि नियम जास्त होते. माणसाचे आवाज ही दबलेले होते. जेवताना सगळे एकत्र जमले. मोहनचे वडील परगावी होते. अर्धांगवायूने ग्रासलेल्या काकांना दोन नोकर उचलून घेऊन आले. मोहन मुख्य खुर्चीवर बसला. भांड्याची खणखण सुरु झाली. गावात दिवे फक्त याच बंगल्यात होते. ते ही मर्यादित ! बाकी , ज्या वाटा आणि खोल्या वापरात नव्हत्या, त्या अंधारात होत्या. आल्यापासून वृंदाची नजर अश्या बऱ्याच बंद कुलुपांकडे गेली होती. कुलूपं जुनाट होती. जाळी लागलेली !
"आई, तात्यांनी नीट विचार केला आहे न ?"
झोपण्याआधी वृंदाने आईला विचारलं.
" हो..! का गं ?"
" नाही, सहज विचारलं...!"
घरापेक्षा इथे हवा जास्त खेळती होती. खोल्याही मोठ्या होत्या. खिडकीतून एखादा माणूस आत येऊ शकेल, इतक्या मोठ्या होत्या. दीडशे-दोनशे वर्ष झाली असतील. पण नियमित डागडुजीने सगळं काही व्यवस्थित आणि नवं वाटत होतं. एवढ्या मोठ्या वास्तूत फक्त तीन जण, आणि बाकी सगळे नोकर-चाकर ! एकमेकांची तोंड न बघता अर्ध आयुष्य कसंही निघणार होतं. घरातील लोकांचा एकमेकांशी संवाद कमी होता हे जेवताना वृंदाला कळलं होतं. साधी नजरा-नजर सुद्धा मर्यादित होती. आपली मुलगी इथे रहाणार ,या विचाराने आईला सुद्धा नीटशी झोप लागत नव्हतीच.
मध्यरात्र उलटली. वृंदाला एकाएकी कशानेतरी जाग आली. दूरवर कुणीतरी माणूस वेदनेने किंचाळत होतं. आवाज जवळपास होता. आई शांत झोपली होती. तिला न उठवता वृंदा जागेवरून उठली. खोलीचं दार उघडून तिने बाहेर पाहिलं. सर्वत्र अंधार होता. दूरवर एक दिवा चालू होता. ती त्या दिव्याच्या दिशेने चालू लागली. आवाज होता तेवढाच होता. अंतराचा वेध घेणं कठीण होतं. तिची पाऊलं अत्यंत सावध पडत होती. खाली जाण्याचा जिना त्या दिव्यात तिला दिसत होता. खाली जाऊन बघावं, तर कुणीच नव्हतं.एक साधा रखवालदार देखील नाही. मुख्य दरवाजा बंद होता. खाली सगळंच शांत होतं.
अचानक तिच्या खांद्यावर मागून कुणीतरी हात टाकला. त्या स्पर्शाने ती प्रचंड घाबरली. किंचाळली ! तिने मागे पाहिले. मागे काकू येऊन उभी होती. क्षणभर काय करावे हे तिला कळलेच नाही. भीतीने सगळ्याच मती थरथरत होत्या. तिला नीट श्वास सुद्धा घेता येत नव्हता. काकूने दोन्ही खांदे धरत तिला सावध केलं.
"वृंदा...वृंदा...जाग्या व्हा..!" ती शांत झाली.
"कुठे निघालात अर्ध्यारात्री ?" तिची भीती काही कमी झाली नाही.
" तुम्हाला बोलले होते न मी...! या...!" बाहेरचा आवाज ऐकून आई बाहेर आली. ती ही घाबरली होती.
"कुणाच्या तरी ओरडण्याचा आवाज ऐकला मी...! वेदनेने कुणीतरी खूप त्रस्त होतं." थरथरत वृंदा पलंगावर आली.
" रात्रीच्या गाभाऱ्यात भास देखील आपली जागा धरून असतात सुनबाई. जागा नवीन आहे आपल्याला !"
" पण तो आवाज ?" वृंदाच्या कानात अजून तो आवाज घुमत होता.
" काही नाही, झोपा तुम्ही. थकल्या आहात प्रवासाने. प्रवासाची घरघर कानाशी असते थोडा वेळ." काकूने तिला निजवले.
" या जुन्या घरातल्या निर्जीव वस्तू , बंद दरवाजे, कुलूपं रात्री बोलतात, हे मोठं मिथ्य असतं सुनबाई. आम्हाला येऊन आता चाळीस वर्ष होत आलीत. खूप शांतता आहे इथे. जीव असलेली माणसंही सहसा इथे कामाशिवाय बोलत नाहीत, की इतरत्र कुठे चालत जात नाहीत. संशयाचं खापर मात्र जुन्या, निर्जीव वस्तूवर फोडलं जातं. नियम पाळा, म्हणजे सगळं सुखकर होईल.
काकू दिवा बंद करून निघून गेली. आई मात्र वृंदाकडे बघत राहिली. तिने तिला कुशीत घेतलं. मायलेकी कुठेतरी येऊन फसल्याचा संशय नियतीला आलाच. अंधार मात्र हसत सर्वत्र पसरत चालला होता.
क्रमश:
लेखन :अनुराग वैद्य