महालगड- 7
भाग सहावा लिंक
तिथे ओस पडलेल्या गल्ल्या आणि दुर्दैवाने गांजलेले चेहरे होते. पोटाचे खड्डे खायला काळ असल्याचा सूतोवाच करत होती. अंगावर वीतभर कपड्याला महाग असलेली पोरं-टोरं शहराकडून आलेल्या या देखण्या बाईकडे आशाळभूत नजरेने बघत होती. मोठ्या घरच्या शिळ्यावर मेजवानी होत असे. दारिद्र्य पाचवीला पुजेलेलं ! प्रत्येक दहा पैकी सहा घरात अशीच स्थिती. मोलमजुरी मुजोरांच्या दंडेलशाही दबलेली होती. त्यात उपाशी पोटी मान वर करून न्यायासाठी दाद कोण मागणार ? आवाज काढणाऱ्याची दैना-दैना करून त्यास गावाबाहेर काढून देण्यात येई. परमेशवर पाठ करून उभा होता. सरकार लांब होतं. अश्यात यांची कर्म कहाणी कोण ऐकणार ?
सकाळी गाव बघण्यासाठी आईसोबत बाहेर पडलेल्या वृंदाच्या नजरेत हे सगळं सलत होतं. सोबत यमाबाई होतीच. पाहुणी चुकू नये आणि चुकून चुकीच्या माणसाच्या हाती लागू नये, म्हणून मुद्दाम तिला धाडण्यात आलं होतं. गाव फारसं मोठं नव्हतं. शे-पाचशे उंबरे असतील. आजूबाजूला उंच टेकड्या, दाट जंगलं आणि आत वसलेलं हे गाव.
एका म्हाताराशी बोलताना यमाबाई मागे राहिली. एका घरापाशी येऊन वृंदा थांबली. पाणी प्यावं म्हणून घराच्या दारातून तिने आत पाहिले.
" काय बघतीस गं ?" आतून एक रुक्ष आवाज तिच्या कानी आला. आईने वृंदाचा हात धरून तिला थांबवलं.
"पाणी हवं होतं."
"आमचं पाणी तुला चालायचं नाही मालकीणबाई !" त्या आवाजात मोठा टोमणा होता.
"वाड्यात दुष्काळ पडलाय का ? "
"मी वाड्यातली नाहीये, पाहुणी आलीये." दाराची फळी सरकली आणि एक जख्खड म्हातारी तिथे उभी राहिली.
" माहितेय मला...! "ती म्हणाली.
" ही... आई माझी." म्हातारी वृंदाच्या आईकडे बघत होती.
आतून तिने एक तांब्या भरून आणला.
"लगीन करणार हाईस न त्याच्याशी ?"
पाणी पिताना आलेल्या या प्रश्नाने वृंदा चमकली.
" अजून ठरलं नाहीये...!"
" पोरगी जड झाली असली तर हिरीत ढकला...!"
मायलेकीच्या पाचावर धारण बसली. तांब्या उचलून घरात घेऊन जाणाऱ्या म्हातारीकडे दोघी बघतच राहिल्या. वृंदाने घरात जाण्यासाठी पाऊल उचललं, पण मागून यमाबाई आल्याने ते जागीच थंबकलं.
"कुणाकडे काही थांबून मागू नका ? लोक चांगले नाहीयेत इथं." हुकूम सोडून यमाबाई त्यांच्या पुढ्यात चालू लागली. वृंदाने एकदा त्या म्हातारीच्या मोडक्या घराकडे वळून पाहिलं. आईच्या मनात आता शंकांचं वारूळ तयार होऊ लागलं. गावातील प्रत्येक नजर त्यांच्याकडे संशयाने बघत होती. वाड्याचं वर्तमान काही केल्या उकल होत नव्हतं.
"यमाबाई, तुम्हाला पोरं-बाळं ?"
ती काहीच बोलली नाही. झपझप पाऊलं ओढत चालत होती.
दुपारी खोलीत मायलेकी बसून विचार करू लागल्या. यमाबाई दार उघडून आत आली. तिची नजर खाली होती. काहीतरी बोलायचं होतं तिला. पन्नाशी उलटलेली बाई शांत होती. कपाळ कोरं होतं. काकूंसोबत तीही तारापुरला आली होती. तिचा नवरा, एक मुलगा काकूंसोबत रहात होते. वाड्याची, गावाची खडानखडा ठाऊक होती.
"या न, बसा...!" वृंदाने बसायला आसन दिलं. ती आणि आईसुद्धा खाली बसल्या.
"काकू देवीला गेल्यात, तिथली व्यवस्था बघायला."
" तू ?"
" त्या म्हणाल्या थांब म्हणून. तुमच्या जवळ !"
"बरं, बस तू. झोपायचं, तर झोप घे."
" बाईसाहेब...!" तिला एकदम भरून आलं. डोळ्याला पाझर फुटलं.
" काय गं, काय झालं?" आईने तिला विचारलं.
" तुम्ही खरंच येणार का, सून म्हणून या वाड्यात ?"
खरं काय ते हीच सांगू शकेल या विचाराने दोघी सावरून बसल्या. वाड्यात दुसरं कुणी नाही बघून मुद्दाम ती येऊन बसली होती.
"काकुनीच पाठवलं मला. तुम्ही चांगली लोकं आहेत. शिकली-सवरली, मोठ्या घरची ! शहरातली. तुमचा विश्वास बसत नाही , एवढ्या लवकर"
" बाई, किती कोड्यात बोलताय तुम्ही." वृंदाला खरं ऐकायचंच होतं.
" काकूने पाठवलं मला..."
बाजूला भरलेल्या तांब्यातलं पाणी बाई गटागट पिऊन गेली.
" शाप ए वाड्याला या..."
" कुणाला...आणि कसला शाप..?"वृंदाला मालक म्हणजे मोहन हे आता कळून चुकलं होतं.
" फार वर्षांपूर्वी घडलेल्या काही गोष्टी अजून वाड्यात आपली जागा धरून आहेत. त्यांचे तळतळाट, त्यांच्या किंकाळ्या आता सवयीच्या झाल्यात. सूर्य मावळला, की प्रत्येक पाऊल जीव मुठीत धरून...!"
दोघी सावरून बसल्या.
"काकूचं लग्न झालं. समोरच्या वाड्यात आल्या त्या. धाकलं मालक एकटं रहातं इथे. दिमतीला नोकर-चाकर, गडीमाणूस, पैसा ! सगळं चांगलं ! पण..."
"पण ?"
" बाईसाहेब, कुणाला बोलू नका ! हे गाव, इथली माणसं वाड्याच्या सावलीला सुद्धा फिरत नाही. भिऊन असतात. मालकाचा धाक आहे आणि..."
असे वाटत होते की यमाबाई एकटीच बोलत होती पण ऐकणाऱ्यांमध्ये या दोघी आणि अजूनही कुणीतरी होते. मायलेकीचे पूर्ण लक्ष यमाबाईकडे होते.
"मी काकूंसोबत सासरी आली. आमच्याआधी वाड्यात मालकाची आई होती. अंथरुणाला खिळून. अजिबात हालचाल नव्हती. पण बाई डोळ्यांच्या खुणेने सगळं काही सांगायच्या. दिवणखान्याच्या उजव्या बाजूच्या खोलीत त्यांची सोय होती. वाड्याच्या खूप गोष्टी त्यांनी जवळून पहिल्या होत्या. दिवसरात्र देवाचं नाव ! मालक तेव्हा दहा-बारा वर्षाचे असतील...!"
तासभर चाललेल्या गप्पा झाल्यात. वृंदा आणि आई सुन्न झाल्यात. बाहेरून अतिशय साधी वाटणारी माणसं आतून किती तुटलेली असतात, हे यमाबाईकडे पाहून त्यांना कळलं. तिने सांगितलेलं काहीएक शंकास्पद नसावं. सकाळी गावातून फिरताना लोकांच्या नजरेतून त्यांना खूप काही कळलं होतं. वृंदा शांत होती. मनात भीती दाटून आली होती. खिडकीत उभं राहून समोर ठिपक्यांसारखं पसरलेलं गाव पहात होती.
चांदणं छान पडलं होतं.पुढे काय करावे याचा विचार करत वृंदा पहुडली होती. हवेने होणारे काही आवाज आता ओळखीचे झाले होते. मनात हळूहळू भीती घर करू लागली होती. उंचावर असलेल्या छताची, बाजूला कित्येक वर्षांपासून उभ्या असलेल्या भिंतीची, त्या रेशमी पडद्याची ! इतकंच काय, तर त्या मेजाची आणि खुर्चीची सुद्धा तिला भीती वाटायला लागली होती. वारा सैरभैर करत आत शिरत होता. ती उभी असलेली खिडकी उघडी राहिली होती. आई शांत झोपली होती. ती उठली आणि खिडकीजवळ आली. समोर तिला यमाबाईची झोपडी दिसली. आत दिवा सुरु होता. खिडकीचं दार ओढताना तिला बाहेर बागेतल्या एका ओट्यावर कुणीतरी दिसलं.
तो मोहन होता. एकटाच उभा होता. वृंदाने झटकन येऊन खोलीतला दिवा घालवला. पुन्हा खिडकीत येऊन पाहू लागली. तो एकदम स्तब्ध उभा होता. काहीही हालचाल नव्हती.क्षणभर तिने विचार केला की खाली, थोडं जवळ जाऊन बघावं. पण बाहेर असलेला अंधार पाहून तिने तिची हिंमत खचली. तो गूढ होता. वेगळा होता. माणसात होता, पण त्याचा बाज, जगणं, रहाणं, सगळंच वेगळं होतं. वयाच्या सहाव्या वर्षांपासून त्याने आपल्या आईला दुरूनच पहिले होते. आईचा स्पर्श, अंगाई, त्या बालपणीच्या अंघोळी, मित्र-सवंगडी, खेळ, काही-काही त्याच्या नशिबात नव्हतं. होता, तो फक्त माज, अरेरावी आणि त्याला पोषक असा एकटेपणा. त्याची दया यावी, पण त्याची कर्म पाहून त्याला शिक्षाच व्हावी, हा विचार सुद्धा मनात येत होता. आपल्या प्रारब्धात जे काही लिहिलं होतं, त्याला समोर येणारी प्रत्येक व्यक्ती कशी जवाबदार असू शकेल ? विनाकारण इतरांसाठी त्रासदायक ठरण्याचा आपल्याला काय अधिकार ?
विचार करत ती झोपी गेली.
क्रमश...
लेखन : अनुराग वैद्य