महालगड- भाग 3
भाग दुसरा लिंक
तिच्या त्या किंचाळण्याने निपचित पडलेला शांता खडबडून जागा झाला. बाजूला तारा वादळात सापडलेल्या पाचोळ्यासारखी थरथरत होती. खिडकीवरून तिची नजर हटत नव्हती.
"तारे...तारे !" शांताने तिला खडबडून जागे केले. तिचे किंचाळणे काही थांबत नव्हते. बाजूला पडलेल्या तांब्यातून त्याने हाताने तिच्यावर पाणी मारले.
"काय झालं, का वरडतियास ?" ती अजूनही भानावर आली नव्हती.
" त्यो आलाय, आलाय त्यो मला न्यायला...! शांता, भाईर उभा आहे त्यो...!"
"कोण आलाय, काय बोलाय लागली." शांताला क्षणभर काही सुचले-कळले नाहीच.
" लाल डोळे हायेत त्याचे.अंगभर काटे हाईत त्याला. आ वासून बघातुया आपल्याकडे ! त्याला आवरा, नेईन तो आपल्याला."
" तारे, अगं, झोपडीत हाईस तू...! कुणी न्हाई बाहेर, ते बघ!"
ताराचं भान काही ताळ्यावर येत नव्हतं. ती अजूनही स्वप्नातच होती. तिला अजूनही खिडकीत तो दिसत होता. शांता उठला. बाजूला दडवून ठेवलेला सुरा काढला आणि जाऊन दार उघडले. बाहेर पावसाने हाहाकार सुरु केला होता. मुसळधारेचा मोठा कोलाहल सुरु होता. जोडीला अंधार होताच. ताराची खात्री पटावी, म्हणून शांताने ओट्यावरूनच आजूबाजूला पाहिले. तीही भीतीने त्याच्या मागोमाग आली.
" सांग, कोन हाय ? अगं, सपान पडलं ! " त्याने हसत तिला धीर द्यायचा प्रयत्न केला. बाहेरच्या अंधारात कुणी नाही पाहून ताराला जरा बरं वाटलं. ती आत आली. शांताही मागेमाग आला. दारापाशी कोनाड्यात ठेवलेली चिमणी त्याने पून्हा पेटवली.
"ही असू दे रातभर. म्हणजे तुला कशाचं भ्या नाही वाटणार !"
....
रात्रभर आपटून- आदळून पावसाने वाडीचा राग-रंग पार बदलून टाकला. जागोजागी उकरून ठेवल्याने खड्ड्यात पाणी साचले. दगड आणि चुनखडीत बांधलेली थोरा-मोठ्यांची घर शाबीत होती. पण वर पाचट आणि माती असलेल्या भिंतींचं काही खरं नव्हतं. रात्रभर चालल्याने भिंतींना ओल आली होती. महालटेकडीच्या मुळाचा भाग थोडा थोडा भुसभुशीत होऊन खाचयाच्या मार्गावर होता. सुरवातीपासून त्याची पडझड सुरूच होती. उत्तरेकडून मोठ्या दिमाखात आलेल्या सैन्याचा सह्याद्रीच्या पावसाने चांगलाच समाचार घेतला होता. दोन-तीन फूट आत गाडलेले तंबूचे खिळे खिळखिळे होऊ लागले होते. काल रात्री तर दहा-बारा कनाती सुद्धा उखडून आल्या होत्या. सारखं भिजून घोडे, हत्ती , उंट, बकरे आणि बैलं वैतागले होते. तगारठ्याने त्यांची नाकं वाहू लागली होती. चारा भिजला होता. धान्याची कोठारं भिजू लागली होती. गडाकडे थोबाड वासून उभ्या उखळी तोफा ओल्या झाल्या. गोळे भिजून निकामी झालेच होते. अश्यात खायला हजारो तोंडं !
" मालिक, असंच राहीलं तर आपल्याला वेढा शिथिल करावा लागेल." इनायतखानाच्या तंबूत या आपत्तीवर चर्चा करण्यासाठी त्याचे सुभेदार आणि सरदार येऊन बसले.
" वेढा तर कमी होता कामा नये. या मावळ्यांचा काही भरवसा नाहीये. ते पावसाला भीती नाहीत, अंधाराला तर नाहीच नाही !" इनायतखानाचा दक्खनचा अभ्यास गाढा होता. वीस वर्ष त्याने दक्खनात बऱ्याच मोहिमांना अंजाम दिला होता. इथलं वातावरण, माणसं, जंगलं त्याला पक्के ठाऊक होते. बऱ्याच किल्ल्यांचा नकाशा त्याला पाठ होता. वेढा ढिला करताच आपली काय गत होईल, हे त्याला पक्के ठाऊक होते. चार महिन्यापासून , 'परिंदा सुद्धा पर मारू शकणार नाही' अश्या वेढ्यात , गडावर हालचाली तिळमात्र हल्ल्या नव्हत्या.
" काहीतरी वेगळा विचार करावा लागेल...!" इनायतखानाने दाढी कुरवाळू लागला.
"हीच येळ ए !" शांताच्या अंगणात सुद्धा खालबतांना जोर आला होता. लोहारावाडीची तरणी पोरं जमली होती.
" म्या पाहिलंय ! पावसामुळे फौजा पार तैसनैस झाल्यात. खायला पोटभर न्हाई, जनावरांचे हाल ! उरलेल्या राशिदीत पाणी घुसलया !" किल्लेदाराच्या सांगण्यावरून काही पोरं हेरगिरी करण्यासाठी म्हणून तळाच्या आजूबाजूला घुटमळत असायची.
"मंग....!" शांताने महादेवाला विचारलं.
"मंग काय...! वर जाऊन हुकूम येईस्तोवर दोन-चार दिस जातील. एखादी चांगली रात पाहू, आणि हाणून पाडू. काहीनाही तर कमीतकमी चाप तरी बसल.
रात्रीच डाव ठरला. गडावरून नुकतीच आलेली नवीन हत्यारं कमरेला-पाठीला लागली. आधीच कोपलेल्या अंधारात दहा-बारा घरातून चोर-पाऊलं बाहेर निघालीत. कोणालाही न सांगता थेट ओढ्यापाशी जमलीत. वाट रोजची असल्याने दिशा सापडणं अवघड नव्हतं. अर्ध्या कोसावर असलेली छावणी गारठून गप-गार झाली होती. तंबूच्या बाहेरची माणसं सुद्धा पावसामुळे आत दडून होती. नळ्यात पाणी शिरल्याने साप-विंचू रात्रीचे बाहेर येऊन हिंडत होते. त्यांचा सुद्धा धाक होताच.
प्रत्येकाने तोंडाला काळी कफनी बांधली. एकूण बारा माणसं होती. प्रत्येकाने सकाळीच तलवारी पाजून लख्ख केल्या होत्या. मोहिमेचा दांडगा अनुभव नव्हता, पण अंगात बळ मात्र अचाट होतं. एका घावात लिंबा-बाभळीच्या फांद्या खाली पडण्याचं बळ ! दब्या पावलांची चाल छावणीकडे निघाली. पांढरे तंबू दिसताच अंगात थैमान संचारलं. पावलांचा वेग वाढला आणि तंबूंपासून आठ दहा फुटावर येऊन थांबला. प्रत्येक तंबूची पाठ दिसत होती. दोघांचे गट पाडले. समशिरी शांततेत हातात आल्या. आणि एकसारखं सहा तंबूंवर हल्ला झाला. गारठल्याने मिळेल ते पांघरून झोपलेल्या सैनिकांवर अचानक झालेला हा हल्ला मोठा घातकी होता. एकाने मानेवर तलवार धरायची आणि दुसऱ्याने दिसेल ते फक्त फाडत-तोडत सुटायचं. मानेवर तळपती समशीर पाहून जीभ घश्यातच अडकून पडली. फक्त तलवारी आरडा-ओरडा करत होत्या. फक्त हात सळ-सळ करत होते. वाऱ्याने अर्धे काम आधीच करून ठेवले होते. आधीच खिळखिळलेले तंबू तेव्हाच उलटून पडले. क्षणात सहा-सात तंबू खाली आले.
आपलं काम चोख करून सगळी पोरं धावत ओढ्याला आली. जाताना त्यांनी पंचवीस-एक घोडे आणि उंट मोकाट सोडले. काटे-कुटे आणि किरकोळ जखमा झाल्या होत्या. छावणीत मात्र हाहाकार उडाला. आधीच शीणलेले खानाचे सैन्य वाट सापडेल तिकडे पळत सुटले. पाळताना वाटेत येणाऱ्या उभ्या तंबूंना धडकून पडत होते. तळाच्या एका कोपऱ्यात उसळ झाल्याची खबर कोणालाही लागली नाही. ओढ्याच्या काठावर सगळे आल्याची खात्री झाली. तिथेच लपवुन ठेवलेल्या एका चामडी पिशीवित तेल होते. बाजूला एक कामटा सुद्धा होता. सप-सप करत पाच-सहा पेटलेले तिर हवेत सुटले. सैर-भैर झालेल्या कापडाला बाण खोचले गेले आणि एकच आगडोंब उसळला. पेटलेल्या तंबूच्या उजेडात सगळी पोरं गावाकडे पळत सुटली. तळावर हल्ला झाल्याची बातमी ,रात्रीच गावभर पसरली. इनायतखान एखाद्या जखमी भुजंगासारखा तलमळू लागला. आपल्या नाकाखाली आपल्या अब्रूचे धिंडवडे काढून मावळे रात्रीतून चक्क आपल्या खेम्यास पेटवून गेले. त्यांना शोधुन शासन करण्याचे तर लांबच राहिले. तलवार हाती घ्यायचे मनोबल देखील आता उरले नव्हते. आज पर्यंत गनिमी काव्याबद्दल ऐकून असलेल्या, आग्र्याहून मोठ्या दिमाखात आलेल्या फौजा, गनिमी काव्यचं हे रूप पाहून पार भांबावून गेल्या.
चंद्रजीच्या वाड्यावर मात्र या घटनेने स्मशानशांतता पसरली. इनायतखान झोपाळ्यावर झुलत होता. एखाद्या अपराध्यासारखा चंद्राजी त्याच्या पुढ्यात हात बांधून उभा होता.
" तुमच्या नाकावर टिच्चून, तुमच्याच गावची पोरं डाव टाकून गेली. आणि तुम्ही बसलात झुलत." खानाची हि आगपाखड सहाजिक होती. गावात वेढ्याविरोधात शिजणाऱ्या कटाचा सुगावा चंद्राजीला लागला नाही, या बद्दल स्वतः खान साशंक होता.
" दोन दिसात सगळी पोरं मुसक्या बांधून तुमच्या पुढ्यात लोळवतो...!"
" चंद्राजी...! फार भारवश्याने खाविंदांनी आम्हाला असल्या मोहिमा दिल्या आहेत. तुमच्यासारखे कुचकामी हिरे आम्ही आमच्या शिरपेचात लावून हिंडतो, आणि दरबारी आमच्या अब्रूची लक्तरे उडवली जातात. एक ध्यायनात असू द्या...! खाविंदांची मर्जी उलटी फिरली, तर तळवारीखाली तुमच्या मानापण येतील. मग तुमची वतनदारी आणि तुमचा मुलुख, यातलं काहीच उरणार नाही मागे." उठून खान चालता झाला. चंद्राजीला मात्र घाम फुटला. खानाही कीर्ती काही चांगली नव्हतीच. लवकरात-लवकर त्या पोरांचा बंदोबस्त करण्याची ताकीद खान वाड्याच्या दाराला लावूनच गेला.
....
धान्याने बजावलेल्या कामगिरीच्या अभिमानात तारा पार न्हाऊन निघाली. पण तिने कुणाला काहीच सांगितले नाही. पाणवठ्यावर आज नाकात उगाच लग्नात आईने घातलेली नथ मिरवीत होती. इतरांच्या बायका सुद्धा गालात हसत होत्याच. काखेला कळशी लावून ती आपल्या वाटेने घराकडे यायला निघाली. वाट पांदीतुन वळसा मारत घराच्या मागल्या बाजूला निघायची. जवळची होती खरी...! पण चांगली नव्हती. आज उशीर झाल्याने तिने ही वाट निवडली.
"कुठं निघालीस...!" तिला अचानक एक आवाज आला. आवाज ओळखीचा नसल्याने ती थबकली.
"कोन हाय...?"
" तू कोण आहेस, हे माहिती आहे का तुला ?"
बाईमाणसाच्या या प्रतिप्रश्नाने तारा थोडी सावध झाली.
" अगं, पिराने दिलेला इशारा पार विसरलीस की...?"
आता मात्र तारा घाबरली.
"कोन ए, समोर येऊन बोला." तारा तशी धीट होती.
एका जुन्या वडामागून एक बाई समोर आली.
"घाबरू नकोस, तुझ्याच हिता सांगेन मी...!"
कपाळभर मळवट भरलेल्या त्या नऊवारी साडीतल्या आवाराकडे बघून ताराची पाचावर धारण बसली. भरून आणलेला घडा काखेतून निसटला. ही नेमकी कोण आहे, हे तिला कळायच्या आत ती बाई तिच्या समोर चालत आली.
" तारे, घरी जाऊन एकदा तो कोहळा बघ. संकट दाराशी येऊन उभं रहाण्याचा बेताला आहे."
" काय सांगताय ? कोन हाय कोन तुमी?"
" देवाचीच समज मला...! जे तुमच्या डोळ्याला दिसत नाही, ते आम्हाला दिसतं. जे तुम्हाला कळत नाही , ते आम्हाला कळतं !"
" काय दिसतं, काय कळत ?" धीर बांधून तारा उभी राहिली.
" तारा, तुझ्या येत्या काळात तुझ्यावर फार मोठं संकट येणार आहे. काळ तुझ्या पाठीशी आहे. पण त्याच्या हातात काहीच नाहीये."
"म्हणजे...?"
" आजपासून येत्या अवसेपर्यंत तुला स्वतःला आणि तुझ्या नवऱ्याला खूप जपावं लागेल. एखादी छोटीशी चूक , आणि दोघांचा घात...! तुझा जीव धोक्यात आहे...!"
तिचं पूढे काहीही न ऐकता तारा तिथून पळत निघाली. आपली कळशी तिथे राहिल्याचे भानही तिला उरले नाही. पाळताना पायाला ठेच लागली. भळाभळा रक्त वाहू लागलं. तशीच ती झोपडीत शिरली आणि तिने दार लावून घेतलं. तिला धाप लागली. श्वास कोंडु लागला. घाईघाईत तिने पिराने दिलेला कोहळा हात लांबवून खाली घेण्याचा प्रयत्न केला. पण त्या नादात तो कोहळा जमिनीवर धाडकन पडून फुटला. आतून अक्षरश: काळं पाणी निघालं. तो अर्धा वळला होता. त्याकडे पाहून ताराची पार शुद्ध हरपली.
रानात लागलेली ठेच, आणि जमीनीवर सांडलेल्या रक्ताच्या गंधाचा वेध कुण्या लंडग्याला लागला होता. झाडीतून दोन डोळे तिचा पाठलाग करत घराबाहेर घात लावून बसले होते.
......
क्रमश....
लेखन : अनुराग वैद्य

