महालगड भाग 9
काळाच्या उदरात सगळं काही दडून जातं. कर्म नाही दडत. ते पिढ्यानपिढ्या भोगावं लागतं. यांच्या कुळात जन्माला आलेल्या एका नराधमाने यांच्या पुढच्या बारा पिढ्यांचं भविष्य लिहून ठेवलं आहे. त्याने केलेल्या पापाची शिक्षा जन्माला येणारं प्रत्येक मुलं आणि त्याची आई भोगेल. हा शाप तसाच आहे."
वृंदाच्या तोंडून शब्द बाहेर फुटेना.
" आई आणि मूल हे नातं जगातल्या प्रत्येक नात्यात श्रेष्ठ असतं. जीवावर उदार होऊन मूल जन्माला घालताना आईला होणाऱ्या वेदनांइतक्या जीवघेण्या वेदना दुसऱ्या नाहीत. बाईचा दुसरा जन्म असतो तो. पण इथे...!" तिने पाण्याने भरलेला तांब्या वृंदाच्या हाती दिला.
"इथे मूल जन्माला घालताना इतक्या वेदना होत नाहीत, जितक्या ते सांभाळताना होतात. मरणाच्या दारातून परत आलेली माय, मूल जन्माला येताच त्याच दारात उभी रहाते. जगभर होणारे मातेचे कौतुक सोहळे इथे होत नाहीत. जगभर असला, तरी मातेला इथे मान नाही. देव आणि दैव मिळून इथे त्या माऊलीची परीक्षा पहातात. आणि शेवटी याच भिंतींमध्ये त्या बाईचा केविलवाणा अंत होतो."
" म्हणजे...!" वृंदाला आता थोडंफार कळत होतं.
" या कुळात आई नराधमांना जन्म देते. तो सैतान असतो."
हे ऐकून वृंदाच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या कानावर तिचा विश्वास बसेना.
" काय सांगाता आहात तुम्ही ?"
" होय, कितीही कटू आणि भयानक असलं, तरी सत्य आहे ते. प्रत्येक पिढीत जन्माला आलेलं मूल, आईच्या पोटात वाढतं खरं, पण त्याच्यावर अधिकार मात्र त्या सैतानाचा असतो. त्याची वृत्ती, प्रवुत्ती म्हणजे सैतानाचीच आवृत्ती असते. त्याच्या वागण्या-बोलण्याचा, त्याच्या कर्माचा पूर्ण ताबा त्या सैतानाकडे असतो. आणि त्याला जन्माला घालण्याची शिक्षा मात्र त्या पोराची आई आयुष्यभर भोगते."
" म्हणून काकू...!"
" कुंवर अनौरस आहेत. वैजयंतीचा लेक आहे. त्यांच्या वडिलांनी त्यांच्या आईशी विवाह केला नाही. हा शाप संपावा म्हणून त्यांनी केलेला एक प्रयोग होता. पण तो देखील फसला. कुवरला जन्म देऊन त्याही गेल्या. सगळं जसाच्या तसं भोगून...! कुंवर आता शिक्षा भोगतायत."
वृंदा सगळं ऐकत होती.
" मालिनीच्या जीवाचं काही बरं-वाईट होऊ नये, म्हणून कुंवरानी तिला जन्मभरासाठी वचनात बांधून ठेवलं."
" हे सगळं खूप विचित्र आहे. अविश्वसनिय...!"
"हो, तितकंच भयानक...!" दाराला कडी घालून दोघी बाहेर आल्या. मागच्या दाराने यमाबाई तिला गावात घेऊन आली. चालताना कुणाशीही बोलायचं नाही, पदर चेहऱ्यावरून सरकू द्यायचा नाही , या ताकीदी होत्याच.
" तो शाप आहेच तसा. या घरात जन्माला आलेलं मुलं बाधित असतं."
"कुणी दिला हा शाप...? इतकं भयंकर का कुणी वागलं असेल. जन्माला येणाऱ्या त्या निरागस बालकाची आणि त्याच्या आईची काय चूक ?"
"याच प्रश्नाने हा शाप जन्माला घातलाय."
दोघी गावाच्या कडेला एका मातीच्या ढिगाऱ्यापाशी उभ्या राहिल्या. तिथे आसपास कुणीच नव्हतं. समोर एक जुनाट घर उभं होतं. त्याच्या भिंती काळ्या होत्या. असंख्य वादळं झेलत ते आता पार खाचलं होतं. वृंदा त्याकडे पहात राहिली. कुणीतरी वेदनेने उसासे भरत असल्याचा भास तिला झाला. अंगावर शहारे आले. ती पुढे सरकली.
कोपऱ्यात अर्धवट जळून पडलेली चूल आणि काही फुटकी भांडी होती. काळ्या भिंतींवर गेरू आणि दाट हिरव्या रंगांनी काढलेली , आता धूसर झालेली चित्र होती. कुणाचा तरी सोन्यासारखा संसार होता तो. कुणीतरी उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न त्या चित्रात होती. एक गोंडस बाळ देखील होतं.
भरास आलेला संसार कुणीतरी उध्वस्त केल्याचे ते चित्र विदारक होतं. कोणाच्या तरी स्वप्ननांना अकाली चितेवर झोपवले होते. कुणाच्या तरी कोवळ्या इच्छा-अपेक्षांवर ज्वाळांचे नांगर फिरवलं होतं. नुकतंच मातीत रोवलेलं रोपटं कुणीतरी मुळासकट काढलं होतं.
"कुणाचं घर होतं हे..!" मागे उभ्या असलेल्या यमाबाईला तिने विचारलं.
"तिचं...!" यमाबाईचा आवाज गहिवरला.
" तिचं आणि शांताचं ! आणि तिच्या उदरात वाढत असलेल्या चार महिन्याच्या पोराचं..." तिच्या डोळ्यात पाणी आलं.
" काळ कधी-कधी माणसाच्या रुपात येऊन राक्षसापेक्षाही हीन कृत्य करून जातो बाई...! काहीही दोष नसताना तिच्या उदरात असलेल्या बाळाला...!"
वृंदाला अनेको मुंग्या डसल्याची जाणीव झाली. पायाखालची जमीन इतकी तप्त झाली, की तिचं उभं राहणं कठीण झालं. हवेने इतका बेमालूम जोर धरला, की तिचा जीव गुदमरून आला. अश्यातही ती तिथे थांबली.
" तो नराधम याच कुळाचा होता. तिच्या आत्म्याला झालेला त्रास तिने यांच्या पुढच्या बारा पिढ्यांच्या मागे लावला. का न लावावा. जिथे आपल्या उदरात तीळ-तीळ वाढत असलेल्या जीवाची अशी गती झाली, कुठलीही आई प्रतिशोध घेईल. मी पण, तू पण...!"
" पण तिने असा काय शाप दिला...? "
" या कुळात जन्मलेला पहिला मुलगा....!"
एकदम थांबलेल्या यमाबाईकडे कां देऊन वृंदा ऐकू लागली.
" सैतान असेल....!"
आकाशात हजारो विजा एकत्र याव्यात आणि धरणीवर कोसळाव्यात, असंच वृंदास वाटलं.
" त्याच्यात ते सगळे दुर्गुण असतील, जे या नराधमात होते. त्याला मुक्ती मिळणं अशक्य करून ठेवलं आहे तिने. प्रत्येक पिढीतला पहिला मुलगा तसाच होतो.त्याच्या अंगात त्याचा वास असतो. त्याचा आत्मा त्या मुलाच्या अंगात रहातो."
वृंदा सगळं ऐकत होती.
" जन्म देणाऱ्या प्रत्येक आईला सुद्धा ते भोगावं लागतं. तुमच्या सासूबाई , मालक जन्माला आले, तेव्हा पासून त्या अंधाऱ्या खोलीत होत्या, शेवटच्या श्वासापर्यँत ! बाहेरचं जग, माणसं त्यांना पारखी होती. त्या आईने दिलेला शाप , इथे प्रत्येक आईला भोगावा लागतो."
एक मोठा दगड पाहून वृंदा त्यावर बसली.
" गावात म्हणून या कुळाला एक शापित कुळ म्हणून ओळख आहे. कुणीही हवेलीत येत नाही. न सण, न उत्सव ! सगळं काही त्या भिंतीच्या बाहेर. मालकांच्या आईला सुद्धा हे चुकलं नाही. त्यांचाच हट्ट ! बारा वर्ष त्या बाईने एका जागी बसून काढलीत. रात्री असंख्य सावल्या त्यांना छळायच्या. नको-नको ते आवाज ऐकू यायचे. अनेको रात्री डोळे सताड उघडे ठेवून छताकडे टक लावून पडून असायच्या. भीतीने त्या ओरडायच्या."
" आणि त्यांचे पती...!"
" आहेत...कळेल तुम्हाला !"
ते गूढ तसेच ठेवून यमाबाई मागे परतू लागली. वृंदेने स्वप्नांच्या त्या स्मृतीस हात जोडले. बरेच प्रश्न अजून तसेच राहिले होते. आज तरी तिच्याकडे काहीही उत्तरं नव्हती. एवढं मोठं गूढ तात्यांना माहीत नसावं का ? असेल, तर तात्यांनी आपल्या पोटच्या गोळ्याला असं यातनेच्या खाईत लोटण्याचा घाट का घातला असावा ?
'सरळ लग्नाला नाही म्हणावं आणि गावाबाहेरचा रस्ता धरावा. आजच ! हे लग्न नव्हतं. सरळ-सरळ आत्महत्या होती. सगळं ठाऊक असताना देखील आपण अजूनही निर्णय घेण्यात दिरंगाई करतो आहोत.'
इथून काहीही झालं तरी आईला घेऊन निघायचंच, हा विचार करून वृंदा यमाबाईच्या मागे जाऊ लागली.
आईला हे कळताच तिचं घाबरून जाणं सहाजिक होतं. नको त्या पाशात आपल्या पोरीने गुंतावं, हे तिला कदापीही मान्य नव्हतं.
....
तारेचा शाप काही साधा नव्हता. तिसरी पिढी हे भोगत होती. डोळ्यासमोर तिच्या संसाराची झालेली राख आता मळवट होऊन या घराच्या प्रत्येक कर्त्यापुरुषाच्या भाळी बसत होती. तारा आज नव्हती,पण तिच्या वेदना अजून जिवंत होत्या. त्या जाणिवा अजूनही चेतत होत्या. तिच्या मृत्यूने हे सगळं सुरु झालं होतं खरं. पण ते कुठे जाऊन संपणार, हे कुणासही ठाऊक नव्हतं. असंख्य विचारांच्या घोळात वृंदा गुंतत चालली होती. अगदी सहजसोपं गणित होतं. तिला होणारं पाहिलं अपत्य आपोआप त्या शापाच्या अधीन जाणार होतं.
पहाटेच उठली. झोप तशी नीट लागली नव्हती. चेहऱ्यावर तणाव होता. खिडकीतून ती हवेलीच्या बाहेर निघणाऱ्या रस्त्याकडे बघू लागली.
'ही वाट आतही येते आणि बाहेरही जाते, असा काही लोकांचा समज पार दुधखुळा होता. एकदा या वाटेने आत आलेली व्यक्ती बाहेर फक्त बाह्यअंगाने जाते. ती आत अडकते. या पाशात, या भिंतींमध्ये, यातील गूढ सावल्यांमध्ये...!'
"सरकार कुठे आहेत ?" चहा द्यायला आलेल्या गड्याला तिने विचारले.
" रानाकडे आहेत. संध्याकाळी येतील." मान खाली घालत तो म्हणाला.
"मलाही जायचं आहे. काही व्यवस्था होईल का ?"
" विचारून सांगतो."
नजर जाईल तिथपर्यँत पसरलेला तो पाचूचा पसारा मनाला मोहून जाणारा होता. आंबा, चिक्कू, पेरूच्या बागा होत्या. एका मोठ्या कोपऱ्यात गहू सोनसळीसारखा फुलला होता. दुसरा कोपरा फुलझाडांनी भरला होता. कित्येक रंग स्वतःला उधळून घेत होते. इंद्रधनू जमिनीवर अवतरल्याचा भास होता. अतिशय लोभस शांतता होती. पाण्याचा वावर असल्याने उन्हं देखील जाणवत नव्हतं. बरीचशी गडी-माणसं राबत होती. गेल्या काही दिवसात एकही जण हवेलीवर आल्याचं दिसलं नाही. आत येण्यास त्यांना मज्जाव होता.वृंदा भरल्या डोळ्यानी ते ऐश्वर्य बघत होती. क्षणभर तिच्याही मनातला विचार पालटला असावा. इथून थोड्याच अंतरावर दोन वेगळी विश्व तिने पाहिली होती. दोघांमध्ये कमालीची तफावत होती. तिकडेही शांतता होती, पण ती जीवाला घोर लावणारी होती.
"आपण...इथे?" मागून अचानक आलेल्या एका भरड्या आवाजाने ती भानावर आली. ती समोरचं सृष्टी-सौंदर्य बघत असताना अचानक मोहन पाठीशी येऊन उभा राहिला. ती वळली.
"मी सहज आले होते...!" वेळ मारून न्यायला ती बोलली.
"चांगलंच झालं. आपल्याला बोलता येईल."
"बोलायला नाही...परवानगी साठी आले होते."
" ती आणि कसली...?" मोहन देखील गोंधळला.
"आम्ही निघायचं म्हणतोय...!"
एक दीर्घ उसासा टाकत मोहन म्हणाला. एक गडी गुळाने भरलेले दोन तांबे घेऊन आला. त्यातील एक त्याने वृंदाला दिला.
" शुद्ध, ताजा आहे."
घाबरत तिने हातात तांब्या घेतला.
"कुठे जायचं होतं...?"
"आम्ही परत जात आहोत. मुंबईला...!"
"हो, तुम्हाला निघावेच लागेल. तुमच्या वडिलांशी बोलणं झालं माझं. पुढची तयारी ...!"
"आपण तसला समज धरु नये...!" त्याला मध्येच तोडत वृंदा म्हणाली. त्याने मान खाली घातली.
" मी माझ्या उघड्या डोळ्यांनी सगळं काही पाहिलं आहे. तुम्हाला सगळं काही माहिती असताना तुम्ही लग्न करून एखाद्या अनोळखी स्त्रीच्या भावनांशी असा खेळ...!" अगदी सहज आणि स्पष्टपणे वृंदा हे बोलून गेली.
तो काहीच बोलला नाही.
"आपण समजदार आहात. आपण जग पहिले आहे. आणि तरीही आपण गाफील रहाण्याचा प्रयत्न करीत आहात...! हे एका शूर आणि प्रतापी घराण्याला शोभण्यासारखे नाहीच. मी काय, कुणीही मुलगी इथे...!"
"खरंय तुमचं. मोठं, शूर, प्रतापी घराणं ! प्रत्येक जन्म हा मृत्यूच्या सावाटाखाली. प्रत्येक मृत्यू...अनेक प्रश्न सोडून जाणारा !" त्याचा चेहरा बोलताना निर्विकार झाला. "नाण्याची एक बाजू तुम्हाला स्पष्ट दिसते आहे. आणि यावर आधारित तुमचा निर्णयही मला मान्य आहे. कुणीही तयार व्हायची नाही." तो उठून उभा राहिला.
"हे सगळं मिळालं आम्हाला, ते आमच्या पूर्वजांकडून. आणि सोबत मिळाली, ती एक शृंखला ! कर्माचा एक असा जीवघेणा वारसा, जो पाठीवर असलेल्या एखाद्या गाठीसारखा आम्हाला वागवावा लागतोय. दैवाचा एक असा अध्याय, जो आम्हाला वाचावा लागतोच ! नियतीने आम्हाला दुर्दैवाच्या खुंटीला असं काही बांधून ठेवलं आहे, की त्यातून आमची सुटका फक्त शेवटचे श्वास करू शकतील. तुम्ही जावं हे आम्हालाही वाटतंय. आमचा वंश चालावा, आमच्या चितेला अग्नी देण्यास कुणीतरी असावा, घराला सून मिळावी म्हणून आम्ही कुणाचाच जीव धोक्यात घालू इच्छित नाही. आम्हाला तो अधिकारही नाही. ते पाप होईल."
"म्हणजे, तुम्हाला हे सगळं कळतंय. आणि तरी तुम्ही ते आमच्यापासून लपवून ठेवलं."
"आपली भेट तरी कुठे झाली."
"धाडस लागतं त्याला." वृंदाच्या बोलण्यात धार होती.
"कदाचित तेच नाहीये आमच्यात...!" तो तिच्या समोरून बाजूला झाला. तिला समोर काही समाध्या दिसल्यात. पांढऱ्याशुभ्र ! त्यावर डागाचा लवलेशही नव्हता.
"हे सगळे गेले आहेत यातून. यांच्या अंताच्या अंती खोलवर दडून बसलेली गुपितं आहेत. प्रत्येक समाधीला वेदनांची झालर आहे. त्यांचे आत्मे अजूनही इथेच आहेत. मुक्तीसाठी वाट शोधत !" वृंदा त्या समाध्यांकडे पाहू लागली. त्या जिवंत भासत होत्या. त्यांच्या पायऱ्यांवर खिन्न आणि अस्वस्थ बसलेल्या त्यांच्या सावल्या होत्या. त्यांना डोळेही होते. ते मोहनकडे बघत असल्याचे भास-चित्र वृंदाला दिसले.
"आम्हाला अजून प्रश्न पडतो. हे का अडकलेले आहेत इथे ? एका पिढीने केलेल्या पापाची शिक्षा , यांनी जन्मभर भोगली. मृत्यूनंतर देखील त्यांच्या भोगात काही-एक फरक पडला नाहीच. उलट, हे घोंगडं एका खांद्यावरून दुसऱ्या खांद्यावर ....!"
मोहनचे डोळे भरून आले. थोडासा वृंदाचा रागही शांत झाला. दोघ शांत होते.
"देव-देवक, व्रत-वैकल्य, नवस, सगळं-सगळं केलं आम्ही ! पण या दुर्दैवाची दृष्ट शक्ती इतकी वादळी आहे, की त्यापुढे आमची, आमच्या पूर्वजांची सगळी पुण्याई पाचोळ्यासारखी उडून गेली...! आमची देखील यातून सहज सुटका नाहीये. पण हे कधीतरी थांबून आमच्या घरात सुखाने आम्ही मरावं, हे आम्हाला नेहमी वाटतं. मरण-शैय्येवर आमच्या अत्म्यावर कोणताच भार आम्हाला नकोय.
तो खूप साधा आणि हळवा होता. समोर असूनदेखील आईच्या मायेला मुकल्याने त्यावर विपरीत परिणाम होणं सहाजिक होतं. प्रारब्धावर असलेलं मृत्यूचं एक-सारखं सावट बाळगून देखील त्याने ते कधीही जाहीर नव्हतं केलं. दर अमावास्येला सुर्यास्तानंतर स्वतःला एखाद्या अंधाऱ्या खोलीत कोंडून घेऊन ,जगापासून अलिप्त राहून त्याला स्वतःला सारखं त्या दुष्ट-चक्राच्या हवाली करावं लागत होतं. त्या गूढ अंधारात अनेक सावल्या त्याला गराडा घालत. त्याच्या शरीरात प्रवेश करून त्याला जन्म-मृत्यूच्या दारात नेऊन सोडत. रात्रभर तो जगण्यासाठी आटापिटा करायचा आणि रात्रभर ते मृत्यूचक्र त्याचा एक-एक श्वास हिरावून न्यायचं. हे अगदी जन्मल्यापासून त्याच्या मागावर होतं. त्या अंधाऱ्या खोलीत फक्त अंधार असायचा. खोलीबाहेर , हवेलीभर दबा धरून बसलेली माणसं जीव मुठून धरून रात्रभर देव पाण्यात ठेऊन बसायचे. हृदयाचा ठोका चुकवणारे आवाज ऐकण्याची सवय झाली होती. पण दरवेळी आवाजात लक्षणीय बदल होत होते. ते धड जीवही घेत नव्हते, जगूही देत नव्हते...!
दुपार भरात आली होती. पाण्यामुळे जमिनीतील गारवा होता तसाच होता. माध्यन्हावर आलेलं ऊन मात्र सगळं काही कोरडं करत चाललं होतं.
"खूप उशीर झालाय. तुम्ही आता हवेलीकडे जायला हवं."
मोहनने गाडी मागवली. गाडीकडे जाताना वृंदाने एकदा मागे वळून पाहिलं. मनातले अर्धे प्रश्न अजून अनुत्तरित राहिले होते. काही नवीन प्रश्नही समोर आले होते. धुळीत माखलेल्या काचेवरून तिने हात फिरवला. काय करायचंय हे तिला अजुन नीट उमगलं नव्हतं. मोहनच्या दुर्दैवाशी आपली गाठ बांधुन घेणं शक्य नव्हतं. पण त्यात प्रत्यक्ष त्याचा दोष नव्हता. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दोष नसताना त्याची शिक्षा मात्र त्याला अगदी बाल्यावस्थेत अस्तानापासून मिळत होती.
तो धाडसी होता. संयमी होता. समजदार होता. त्याला ठाऊक होतं, की त्याचं 'असणं' कसं आहे. तत्याच्या बाह्य वागण्याला आतील वादळाचा जरादेखील स्पर्श नव्हता. लोक त्याला घाबरून रहात. कुणीही अधिक जवळीक साधत नव्हतं. हकीकतीपेक्षा आख्यायिकाच जास्त भयावह होत्या. शाळेत, उच्चवर्गात सहसा तो एकटाच वेगळा बसायचा. त्याचं हे वेगळेपण कुप्रसिद्ध होतं. रस्त्याने जाताना माहिती असलेल्या लोकांच्या तिरकस नजरा त्याच्या नजरेतून सुटत नव्हत्या. त्यात आपुलकी कधीही दिसली नाही. दया, भीती आणि शेवटी घृणा ! अर्धवट आणि ऐकीव माहिती असलेल्या काही भाकडकथांच्या आधारावर लोकांनी त्याचं 'असणं' निश्चित करून टाकलं होतं. वाटेवरून जाताना बंद होणारी दारं आणि खिडक्या त्याच्या मनाला बोचत होत्या. लोकांचं वळून पाहणं त्याच्या जिव्हारी खोलवर खुणा करून जात होतं. लहान असताना वर्गातील मित्रांनी त्याची याबाबतीत खोड काढणं शक्य नव्हतं. पण त्याच्या जवळ कुणी येत नसत. त्यामुळे त्याची मैत्री कुणाशी झाली नाही. एकत्र खेळणं, खाणं, ओढ्या-नदीवरचे सवंगडी, चिखला-धुळीतले खेळ हे सगळं तो दुरून बघत असे. एखादवेळेला खूप प्रयत्नाने साधलेली जवळीक त्याच्याच अंगलट यायची. पोरं हातातला खेळ टाकून घराकडे धाव घ्यायची. तो मात्र तसाच चेहऱ्यावर भोळसट प्रश्नावळ घेऊन उभा राही. खिन्न मनाने परत घराकडे येई.
आई त्याला एकमेव आधार होती. तो रंगायला लागल्यापासून अंथरुणाला खिळून असलेल्या त्या मातेला आपल्या लेकराच्या मनातील उद्विग्नता ठाऊक होती. त्याच फक्त डोळ्याच्या ओल्या कडांनी ती आधार देऊ शकत होती. मानेखालचं उर्वरित शरीर संवेदनहीन झालं होतं. डोळे, कान-नाक शाबूत होतं. दिवाणखाण्यापासून थोड्या अंतरावर एका मंद उजेडाच्या खोलीत त्या माउलीने बरीच वर्ष विना-तक्रार काढलीत. बाहेरून असवस्थ होऊन आलेला मोहन आईच्या पलंगापाशी येऊन हुंदके देत बाहेर घडलेलं सारं काही सांगत असे. ऐकण्यापलीकडे त्या माउलीला काहीही करता येत नसत. पण तिच्या डोळ्यात असलेल्या मायेनं मोहनला वेळो-वेळी बळ दिलं होतं. आईपलीकडे इतर कोणतंही नातं त्याला ठाऊक नव्हतं.त्याच्या वाट्याला हे एकच अपूर्ण नातं आलं होतं. कुठलाही भरीव संवाद नाही. कुठलाही उबेचा स्पर्श नाही. मनाला शांतता लाभेल अशी कुठलीही चर्चा नाही. परी-राक्षसाच्या गोष्टी नाहीत. पुराण, महाभारत-रामायणाचा कुठलाही बाळबोध नाही. संध्याकाळची शुभंकरोती नाही, की चुलीवरची गरम भाकरी नाही. तिथे होती, ती फक्त एक निर्घृण परिस्थिती. जिच्याकडे बघून दैव हसत असे. एकही जनावर , अगदी टांग्याचे घोडे सुद्धा हवेलीच्या आवारात ठेवण्यास परवानगी नव्हती. याचे कारण खूप मोजक्या लोकांना ठाऊक होतं. इतरांना ते जाणून घेण्याची गरज भासली नाही. आणि हवेलीच्या काही खास जुन्या-जाणत्या लोकांना याबद्दल विचारल्यावर कधीही सरळ उत्तरं मिळत नव्हती. गावातील इतर लोकांनी मात्र असंख्य आख्यायिका पेरून हवेलीच्या आतील शांततेस आणि सोज्वळपणास मूठमाती दिली होती. त्याच्या खोलीस असंख्य बंधने होती. सूर्योदय आणि सूर्यास्तही दिसेल अशी स्थापत्यठेवण होती. पूर्व आणि पश्चिमेकडील खिडक्या समोरासमोर होत्या. भिंतीला टेकून ठेवलेल्या अजस्त्र पलंगाचा एक छोटा कोपरा देखील त्यास पुरत असे. तत्याची पाऊलं भिंतीचा आधार सोडून डोलू लागली, तशी आतील सगळ्या काचा बाहेर गेल्या. एक आरसा तेवढा आत लाकडात माखून ठेवलेला होता. कोणत्याही मेजास, कापाटास कोपरे राहिले नव्हते. इजा होईल असं काहीही आत नव्हतं. वयाचं एक-एक वर्ष वाढत असताना मुख्य दारावर वाढणाऱ्या उंचीच्या हिशेबाने एक-एक कडी तेवढी वाढत राहिली. बाहेरून तर कड्यांना अतिशय भक्कम अश्या साखळ-दंडांची भक्कम बंदी होती. दार सताड उघडं असताना देखील येता-जाता त्यास बंदिस्त असल्याची बोचरी जाणीव होत असे.
एक दिवस काकू नटून हवेलीत आल्या. येताच जाऊबाईंच्या त्या उजाड खोलीत शिरल्या. त्यांच्या पायाला शिवून त्याने मूकाशिर्वाद घेतले. आईचे भरून आलेले डोळे त्याने पहिले.
"आपण काळजी करू नये." काकू आईचा हात हातात घेऊन म्हणाली.
"आम्ही सून म्हणून या घरात आलो, हेच मागच्या जन्मीच्या एखाद्या पुण्याचं सार्थ आहे. यापुढे तुमच्या बाळाची जवाबदारी आणि काळजी आमच्या खांद्यावर आहे. आईच्या मायेने जमेल तसे, पण त्यांचा सांभाळ आम्ही करू...!"
काकूने हे सगळं सार्थकी लावलं. वयाच्या बाराव्या वर्षी साधारण मोहनने पुन्हा काकूच्या उदरी जन्म घेतला. बालपण पुन्हा हेवलीच्या भिंतींमध्ये धावू लागलं, खेळू लागलं. काकूच्या त्यागाला मायेची नवीन कूस मिळाली. चर्चा ही बदल घेऊ लागली. काकूने मोहन च्या कोमेजलेल्या बालमनात नवीन पालवी भरायला सुरवात केली. तव्यावरची पोळी फुगून ताटात पडू लागली. त्याला खाताना, कुशीत गोष्टी ऐकून झोपताना काकुला आपल्या जन्माचं दुःख विसरून आहे त्यास न्याय देण्यास भाग पाडलं.
क्रमश...