महालगड 8
भाग सातवा लिंक
" तुम्ही जरा थांबा !" मंदिराच्या पायऱ्या उतरताना काकूने वृंदाला आवाज दिला.
" आमच्या सोबत चला."
काकुला ती पैठणी सुंदर दिसत होती. नाकात जड मोत्याची नथ, कपाळभर कुंकू , गळ्यात चप्लाहार आणि इतर दागिने होते.
संथ पावलाने दोघी चालू लागल्या.
" हे देवस्थान आपलंच आहे...म्हणजे आमचं !" काकूने एकदम चूक दुरुस्त केली.
"यमाबाई काही बोलल्या का तुमच्याकडे ?" काकूने मुद्याला हात घातला.
"हो...!"
"त्याकडे नीट लक्ष द्या. शक्यतो जितक्या लवकर होईल तितक्या लवकर....!"
"हे नेमकं आहे तरी काय ? का इथली लोक इतकी घाबरून असतात?"
अत्यंत शांतपणे वृंदाने तिचा प्रश्न विचारला.
लांब दिसणाऱ्या महालगडाकडे काकूंची नजर गेली.
"वृंदा, एखाद्याचं नशीब इतकं फाटकं असतं, की आभाळभर ठिगळं सुद्धा पुरत नाहीत. या उंच-उंच कड्यां-कपारीत अनातकाळापासून दडलेल्या काही कहाण्या इतक्या केविलवाण्या आहेत, की तुमच्याकडून पूर्ण ऐकल्याही जाणार नाहीत. इतकंच सांगते, की यात गुरफाटायच्या आधी यातून बाहेर पडा. नाहीतर माझ्यासारखी गत वाहायची...! "
" ऐकायच्या आहेत मला त्या कहाण्या...!" वृंदाने हिंमत करून आवाज वाढवला.
" एवढं सगळं ऐश्वर्य असून देखील का हे गरीब लोक तुमच्यापासून लांब आहेत. माणसा-माणसात इतकी दरी कशाची आहे..? तुम्ही एवढ्या संपन्न असून तुम्हाला मन मारून जगावं लागतंय ! त्या वाड्यात काहीतरी विक्षिप्त आहे. "
हवेली येईपर्यंत कुणी काहीच बोललं नाही.
रात्रभर झोप तिला लागणार नव्हतीच. पहाटे पहिले पाखरू किलकील करत उडू लागले. ब्रम्हमुहूर्त झाल्याने वृंदाला हायसे वाटले. कमीत-कमी भु-तळावर , एखाद्या झऱ्यात स्नान करायला भगवंत आला आहे, या विचाराने ती थोडी सुखावली. बाहेर अंधार होता. थंडगार वारा वाहू लागला. तिचा डोळा लागला.
" काल तिला झोप नाही आली व्यवस्थित...!" तिच्या उशाशी आई येऊन बसली होती.
"म्हणून मी देखील तिला उठवण्याची घाई नाही केली."
" त्या रात्री...!?" आईने समोर बसलेल्या काकुला प्रश्न विचारू पाहिला.
एक दीर्घ उसासा टाकत काकू बाहेरच्या खिडकीकडे पाहू लागली.
" भास होता तो...! भास म्हणून विसरून जा."
"पोटातून उठणाऱ्या वेदना, भास म्हणून सहजासहजी विसरता नाही येत काकू...!" वृंदा बंद डोळ्यानी सगळं ऐकत होती.
" आता निदान हे तरी म्हणू नका, की तुम्हाला कधीही तो आवाज ऐकू आला नाहीये. अगदी लग्न झाल्यापासून. या वाड्यात रहाणाऱ्या कुणालाच तो आवाज ऐकू आला नाही...!"
"वृंदा...ऐका माझं...!" काकू तिच्या अवेगापुढे हतबल होत होत्या.
" आम्हास नाही, तुम्ही स्वतःला फसवत आहात..!"
" नाही, कुणाचीच फसवणूक करण्याचा आमचा हेतू नाहीये..!"
क्षणभर तिथे कुणीही बोललं नाही.
"आज जमल्यास आराम करा. सुर्यास्ताला खाली या !"
काकू उठून बाहेर निघून गेल्या. त्यांच्या अनुत्तरित चेहऱ्याची वृंदाला कीव आली. काकुस खालून येणारा गडी जिन्याच्या मध्यावर भेटला. त्यास वृंदाच्या खोलीत जायचा इशारा करून काकू खाली चालती झाली.
काका आपल्या आराम खुर्चीत पाय पसरून बसले होते. दोरी ओढून केलेला घंटेचा आवाज काकुला बाहेरूनच ऐकू आला. त्यांच्या तांब्यात पाणी घेऊन ती त्यांना पाजू लागली. त्यांच्या नजरेतले काटे तिला जाणवत होते. दृष्टीला दृष्ट देण्यास ती धजावत नसे. पदरात असलेलं पाप आणि मनातली कलुषित विचार याने नवरा-बायकोतील अंतर दिवसेंदिवस वाढत होतं. अंतर असलं तरी काकू काकांच्या सेवेत कधीही कमी पडली नाही.
पाणी देऊन त्या खिडकीपाशी आल्या. समोर पसरलेला उजाड गाव पाहू लागल्या. लग्न झालं त्यादिवशी पाहिलेली स्वप्न आणि आजचं वास्तव यात काळाने बरीच हेरफेर केली होती. वयाच्या पन्नाशीकडे सरकत चाललेल्या वयाने भावनिक इमळ्यात अनेक भगदाडं पाडून ठेवली होती. इच्छेच्या अनेक मूर्ती त्या भिंतींआडच्या मातीत मिसळल्या होत्या. खिडकीला लागून असलेलं कपाट त्यांनी उघडलं. समोरच्या एका जुन्या लाकडी खोक्यातून त्यांनी एक कापडी बाहुली बाहेर काढली. गोरी-गोमटी, काठा-पदराचं परकर-पोलकं घातलेली ! निर्जीव असून तिच्यात जीव असल्याचा भास तिच्या डोळ्यात दिसे. काकूंच्या आईने ती विणली होती. बहुलीला स्पर्श करताच काकूंच्या डोळ्यात पाणी भरून आलं. अंतरम्याचा सगळा क्लेश डोळ्यातून वाहू लागला.
" माझ्या मुलीसाठी सांभाळून ठेवली होती मी...!" छातीशी बाहुली धरून काकू बोलू लागली.
" झालीच नाही...! होऊ दिलीच नाही. जन्माला येऊ दिलीच नाही. क्षणभर तरी माझ्या गर्भात राहिली असती, तरी तिला जन्माचं सगळं सुख-दुःख सांगून मोकळी झाली असती मी...!" काका हे ऐकून हताश झाला. झटक्यामुळे त्याला आतील काहीही बोलता-लिहिता येत नसे. आतलं सगळं आतच रहात असे.
"आपणच आहात माझे...धनी, भगवंत, देव ! तुमच्या खेरीज दुसरं कुणी आपलं नाहीये मला...!"
पण काकांशी बोलण्यात काहीच अर्थ नव्हता. त्यांना फक्त ऐकून समजत होतं. त्यावर उत्तर देता येत नव्हतं. प्रतिक्रिया दिली, तरी ती कुणाला समजण्यासारखी नव्हती.
काकूंच्या त्यागाची गाथा तिथल्या खड्यालाही माहीत होती. तिची मोकळी कूस यांच्या पूर्वजांच्या प्रतापावर आणि पापांवर पाणी ओतून जात होती.
"काय करायचं होतं, तिने जन्माला येऊन?" काकू बहुलीला घेऊन पलंगावर बसली.
" आयुष्यभर भयाच्या छायेत वावरायचं? कुठवर सहन केलं असतं तिने ? त्या भयाला शरण जाऊन तिलाही आपला जीव गमवावा लागला असता."
लग्नानंतरची ती पाचवी रात्र काकुसमोर आली. असंख्य गुलाबी स्वप्न त्यांच्या शय्यागाराच्या दारातून आत येण्यास उत्सुक होती. पुढची सात जन्म सुखाने एकमेकांच्या सानिध्यात घालवण्याचा आणाभाका घेण्याची रात्र ! संसाराच्या उंबऱ्यावर ठेवलेला तो कळस ओलांडून येण्याची रात्र ! टपोरं चांदणं गालात हसत आभाळभर हिंडत होतं. उघड्या खिडक्यांच्या फटीतुन वाराही आत येऊन बघत होता. तो दिसत नसला, तरी त्याला सगळं दिसत होतं. ती आपल्या पलंगावर नटून बसली होती. आपल्या वरची वाट पहात. एवढं मोठं घराणं, एवढी हेवली ! इतकी सगळी माणसं दिमतीला ! सगळी सुखं लोटांगण घालत , लोळत पायापाशी आलेली. हे नक्कीच पूर्व-जन्मीचं पुण्य असावं ! उशीर खूप झाल्याने तिची विचलता वाढत होती. रात्रंच होती. थोडी दीर्घ होती. पण नव्या नवरीला हे असं सोडून कुणी जात असतं का ? लटकेच राग भरावा, तर कोपिष्ट घराण्याशी सूत जुळलेलं.
आता कहर झाला. अर्धी रात्र लागली होती. दारातून कुणाची चाहूल देखील येत नव्हती. यमाबाई देखील तिला दिलेल्या अमोरच्या खोलीत जाऊन झोपली होती. ती उठून खिडकीत आली. वाऱ्याने आपला स्वभाव बदलला होता. तिला ते जाणवलं नाही. एवढ्या मोठ्या हेवलीत आपण वरच्या मजल्यावर एकटे आहोत, याची जाणीव आता तिला होऊ लागली. एकटक ती समोरच्या पोट महालाकडे बघत होती. तिचा संसार तिथे होता.
मनाचा थरकाप उडवणारी एक किंकाळी तिने ऐकली. कानाच्या नसातून थेट मेंदूपर्यंत सहजगत्या पोहोचलेला तो आवाज तिच्या मनाच्या चिंध्या-चिंध्या करून गेला. गालावर आलेली लाली घामाने पार उतरून गेली. डोळ्यात असलेलं स्वप्न गारठलं. हा भास असावा...नाही, इतका स्पष्ट कसा असेल भास ? आवाज धीट होता. त्यात भीती, वेदना नव्हत्या. त्यात प्रतिशोध होता. खिडकीतून बाहेर बघताना तिच्या लक्षात आलं. खोलीचं उघडं दार वाऱ्याने हलत होतं. छे... वारा एकतर दार बंद करेल, किंवा उघडेल तरी ! उघडझाप कशी करेल ? नजरेच्या कोरीव कोपऱ्यातून तिने एक क्षेप त्यावर टाकला. एक काळी सावली तिला उभी दिसत होती. तितकीशी स्पष्ट नाहीच !
"कुंवर...आपण आहात का ?" तिने नवऱ्याला रीतीने हाक मारली. काहीही उत्तर आले नाही. मागे वळून पहावे का ? त्या आवाजाची भीती अजून मनातून जात नव्हती. बाजूच्या भिंतीमधून स्पंदनं सुटण्याचे आवाज येऊ लागले होते.
" आपण आहात न...? हे बघा, असली चेष्टा नका करू. आधीच आमची भीतीने...!"
तिने मागे वळून पाहिलेच. मागे कुणीही नव्हतं. दार अचानक हलायचं थाबलं. ती एक-एक पाऊल टाकत दारापाशी आली. बाहेर डोकं काढून तिने दोन्ही दिशांना डोकावून पाहिलं. सगळं सुनसान होतं. त्यांना यायला वेळ असेल, तर खाली जाऊन जाऊबाईंची विचारपूस करून यावं. पण अर्धीरात्र सुरु झाली होती.
एक सावली तिला कोपऱ्यात दिसली. नवरा दिसला. तिचा जीव भांड्यात पडला. पण फक्त काही क्षण ! त्याच्या जड पावलांमध्ये अनेक शंका-कुशंका दडल्या होत्या. जमिनीकडे त्याची वळलेली नजर तिला मशालीच्या टीमटीमत्या सावलीतही दिसली. तो जसा जवळ येत होता, तशी तिची धडधड वाढू लागली होती. त्यांच्या खिन्न चेहऱ्यात काहीतरी वंगाळ दडलेलं होतं.
'काय झालं असेल ? जाऊबाईंचं काही बरं-वाईट !? छे, आजचा दिवस चांगला. असे विचार करू नाही.'
"तू अजून जागीच?" नव्या नवरीला मधुचंद्राच्या रात्री हा प्रश्न अपेक्षित नव्हताच.
" काय विचारता आहात कुंवर?" तिने त्यांना प्रतिप्रश्न केला.
" आत चल...!" त्याने आतील कड्या लावल्या. ती त्याच्याकडे पाठ करून चालत होती.
" मी आत्ताच एक आवाज ऐकला...! स्त्रीचा! अत्यंत भयभीत करणारा. तुम्हाला काही माहित आहे का ? "बसल्यावर तिने विचारलं. अंगातील जरीचा अंगरखा त्याने काढला आणि खुंटीला टांगला. बाजूच्या समयीची वाट वर केली. थोडा उजेड झाला तिलाही बरं वाटलं.
" तुझ्याशी कहितरी बोलायचं आहे." काहीतरी खरंच घडलं आहे यावर आता तिचा विश्वास बसला.
" खरंतर लग्नाआधीच यावर चर्चा होणं अपेक्षित होतं. पण आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे. हे ऐकून तुम्ही आमची मनःस्थिती समजून घ्याल."
" बोला कुंवर, असं कोडी घालत बसू नका अर्ध्यारात्री."
"तो आवाज खरा होता...!"
हे ऐकुन तिच्या पाचावर धारण बसली.
"पण...?"
"सगळं सांगतो."
ती सावरून बसली.
" या हवेलीच्या आत घडलेल्या असंख्य पापांपैकी एखादे पाप अंधारात जागृत होते...!"
"काय बोलता आहात..!"
वारा सगळं काही ऐकत होता. अत्यंत संथ गतीने वहात त्याने नव्या नवरीच्या हुंदक्याना सावरलं. क्षणापूर्वीच या शय्येवर सजवलेली सगळी स्वप्न , मोगऱ्याच्या माळा कोमेजण्याआधी कोमेजली. जे सुखाच्या भरात होतं, ते आता यापुढे वेदनेच्या अंधारात हरवत होतं. कुठेतरी त्याची सावली रडत गडप होत होती.
तिचे हुंदके थांबत नव्हते. त्यांच्याकडे तिला धीर द्यायला शब्द नव्हते. आपलं पूर्ण आयुष्य एका क्षणात इतकं पालथं पडेल, यावर तिचा अजूनही विश्वास नव्हता.
ती रात्रभर बाहेर खिडकीपाशी बसून होती. पहाटे तिला झोप लागली.
" देवानं बाईचा जन्म दिला. पोटासोबत त्यागही अंगी लावला. " यमाबाईच्या कुशीत डोकं ठेवून ती पडली होती. मायेचं असं कुणीच नव्हतं.
" काहींना थोडा उशिरा, तर काहींना जन्मजात लागलेला असतो हा त्याग ! पण तू घाबरू नकोस. ज्याने प्रश्न घातला आहे, उत्तरं तोच देईल."
"नाही बाई, याला काहीच तोडगा आतातरी नाही." तिचे हुंदके थांबत नव्हतेच.
" एखादा तोडगा जीवावर बेतू शकतो. हकनाक जीव गमवावा लागेल."
"म्हणून का असं रहायचं...!"
डोळे पुसत ती कुशीतून उठून बसली. यमाबाईच्या त्या झोपडीतून हेवलीची एक भिंत तिला दिसत होती. एकटक ती पाहू लागली.
"बाई...!" थोडी तीही धीट झाली.
"आलेच मी...!" ताडताड करत ती तिच्या जाऊबाईंच्या खोलीत आली. तिथे मंद अंधार होता. थोडं वरून त्या खिडकीतून उजेड यायचा तितकाच ! तसंही, ज्याला उभ्या जन्मापासून अंधारात रहाण्याची सवय झाली आहे, त्यासाठी उजेडाची काहीच किंमत उरत नाही. त्या पहुडल्या होत्या. आपल्या धाकट्या जावेला येताना पाहिलं, आणि कण्हत उठून बसल्या. ती त्यांच्या पाया पडली.
" गेली विस वर्ष तुम्ही कशी काढलीत, याचा विचार करायला गेलं, तर माझं दुर्दैव अत्यंत ठेंगणं आहे."
त्या निर्विकार चेहऱ्याने काहीच उत्तर दिलं नाही.
"आपण खात्री बाळगा. यातून कधीतरी मुक्ती मिळेल. दैव कठोर असलं, तरी देव कठोर नाहीये इतका. तुमच्या रूपानं कदाचित त्याने बरीचशी आरिष्टे मार्गी लावली असतील. हे भोग तुमचे नसले, तरी तुम्ही निःस्वार्थपणे तुम्ही भोगलेत, याचे पुण्य तुम्हाला स्वर्गात निश्चिंती देईल." तिने जावेच्या हातावर हात ठेवला.
"आम्हाला काल कळून चुकलं, की आमचा उर्वरित जन्म , हा तुमच्या या जन्मीच्या भूतकाळाचा पुढील जन्म आहे."
दोघींच्या डोळ्यात पाणी तरळलं.
एका अंधाऱ्या कोपऱ्यात भयोदत्त मोहन बसला होता. त्याच्या डोळ्यात अनेको वेदना घर करून बसल्या होत्या. ती त्याच्या जवळ आली.
" गडबडीत तुम्हाला भेटायचं राहिलं. क्षमा कराल न आम्हाला." तिने त्याला जवळ केलं.
"आम्ही तुमची आई तर नाहीत. पण यशोदा होऊन तुमच्या पाठीशी राहू...नेहमी !"
छोटा मोहन पहिल्यांदा मायेच्या माणसाला बिलगला होता. त्याच्या आईने सुटकेचा श्वास सोडला. अनंत विचाराच्या गर्तेत तिचा हा गूढ जन्म जन्म-मृत्यूच्या त्या जीवघेण्या छायेत भयाची मापं ओलांडून आत आला.
चाकं असलेल्या खुर्चीतून सरकत कुंवर पुढे सरकले. थरथरता हात उचलून त्यांनी काकूच्या हाताला स्पर्श केला. विचारात मग्न असलेल्या काकू भानावर आल्या. त्यांच्यातल्या संवादाला भाषेची गरज नव्हती. चार वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला आणि कुंवर बंदिस्त झाले. आपल्या कुशीत पोर खेळू शकलं नाही, हे शल्य घेऊन दोघे कित्येक वर्षांपासून जगतच होते. दोन आसवं काकूंच्या हातावर सांडली.
"नका इतका त्रागा करून घेऊ.नाशीबात लिहिलं आहे, त्याखेरीज काहीही दुसरे होणार नाही. कुंवर त्या शूर बाईकडे केविलवाण्या नजरेने पाहत होते.
" कुंवर, खूप काही दिलं आहे मला तुम्ही. हे ऐश्वर्य, हा लवाजमा, ही माणसं, मान ! कूस मोकळी आहे फक्त. यात तुमचा माझा काय दोष ? कधीतरी ही जाणीव होते, पण आपलं ठरलंय न...! एकमेकांकडे पाहून दिवस पुढे न्यायचे."
कुंवर काहीतरी वेगळं सांगत होते.
" त्याची काळजी भगवंत करीन. आपण त्याची कास सोडायची नाही. कधीतरी यातून सुटू ! फक्त आता एक मागते. या दुष्टचक्रात आता काही निरपराध लोकांना नका ओढू. हे पाप माझ्याकडून नका करून घेऊ.
दाराची फळी वाऱ्याने सरकली. काकूंची नजर वळली. दाराशी वृंदा उभी होती. दोघांनी तिच्याकडे पहिले. होत्याचं नव्हतं झालं. काकू जरा घाबरल्या. हिने काय ऐकलं, काय नाही ऐकलं ?
" क्षमा मागते. मोठ्याच्या गोष्टी कान चोरून ऐकू नाही." काकूने मान खाली घातली.
पुढे काहीही न बोलता वृंदा निघून गेली.
उत्सवाचे उरलेले साहित्य देण्यास मंदिराचा रखवालदार वसंत हवेलीच्या बाहेर येऊन बसला होता. हवेलीत प्रवेशाची मुभा त्यालाही नव्हती. काकू काही कामानिमित्त बाळूला घेऊन बाहेर गेल्या होत्या. बाहेर कुणीतरी तिष्ठत बसलेला पाहून वृंदा खाली आली.
" ही यादी...!" तिने यादी हातात घेतली. "हे उरलेलं सामान"
" पंत, हे समान खरंतर दान करायला हवं. धर्मानुसार !"
"खरं आहे तुमचं. पण या घरचं दान देखील कुणी घेत नाही." त्याच्या बोलण्यात खिन्नता होती.
गड्याला बोलावून सगळं सामान वृंदा आत पोहोचवू लागली. त्यात तिला एक खलिता सापडला. त्यावर असलेलं चित्र थोडे विचित्र होते. तिने ते उचलून बाजूला केले.
" भाट देऊन गेला. शिर्के घराण्याची वंशावळ आहे ही. आपण वाचावी आणि नंतर काकूंकडे द्यावी." पंतांनी सांगितले.
"पण पूजेला वंशावळीचं काय काम."
" आहे, ज्या साठी दरवर्षी पूजा घातली जाते, ती हीच...!"
घाई-घाईने आत जाऊन वृंदाने तो वेटोळा मोकळा केला. सुरवातीला तिला काहीही कळलं नाही. पण नंतर तिने नीट निरखून पाहिलं. गेल्या कित्येक वर्षात फक्त एकच मूल जन्माला आलं होतं.
"एक मुल...!" वृंदाला आश्चर्य वाटलं.
"काय झालं गं?" आईच्या बोलण्याकडे तिचं लक्ष नव्हतं.
वंशावळ होतीच तशी. तीनशे वर्षात प्रत्येक पिढीत फक्त एक मूल जन्माला आलं होतं.
"कसं शक्य आहे ?" घाई-घाईत ती खिडकीपाशी आली. पंत केव्हाच गेले होते. ती वंशावळ घेऊन दारातून बाहेर पडली. तडक यमाबाईच्या खोली बाहेर उभी राहिली. तिच्या हातात जुना कागद बघून यमाबाई थोडी चाचरली.
"हे काय आहे ?"
" बाई, मोठ्याच्या गोष्टी गडीमाणसाला विचारू नये." तिने तोंड फिरवलं.
"बाई, अजूनही तुम्हाला वाटतं, की तुम्ही फक्त नोकर आहात...?"
तिने पाट पुढे सरकवला. वृंदा खाली बसली.
" तिला कुंवरानी पहिल्याच रात्री सांगितलं. तुझ्या पदरात सगळी सुखं टाकतो, पण पोर मागू नकोस. या वंशाला लागलेला शाप गेले कित्येक पिढ्या माणसाला आणि या वाड्याला पोखरून खातोय."
" ऐकायचं आहे मला…!" वृंदा आता धीट होत चालली होती.
यमाबाई खिडकीपाशी आली. गडाकडे नजर लावून उभी राहिली.
...
क्रमश.....
लेखन : अनुराग वैद्य