महालगड भाग 10
भाग नऊ लिंक
एका रात्री मोहनच्या आईने समाधानाचा श्वास सोडला. नंतरच्या अनेक रात्री मोहनने काकूची मांडी सोडली नाही. त्याच्या डोक्यावर हात ठेवून ती माउली असंख्य रात्री भिंतीला टेकून अर्धवट झोपायची. त्याच्याच खोलीत.
त्या रात्री तो जागाच होता. चांदणं आकाशात आकसून बसलं होतं. हवेनेही शिस्त धरून ठेवली होती. खोलीची दारं-खिडक्या बंद होत्या. तरीही नजर चुकवून वारा आत येताना शिट्या फुंकत होता. अंगाई ऐकत मोहनचा डोळा लागला. काकूनेही डोळे मिटले. पण त्याच्या डोक्यावरचा हात काही काढला नाही. हात काढताच मोहन तडफडून जागा होईल. वाढत्या वयानुसार त्याची ही सवय जाणार होतीच. सर्वत्र मिणमिणत्या तेलाच्या पणत्या फडफडत होत्या. एक-एक करत त्या वाऱ्याला शरण जाऊन विजू लागल्या. एक-एक भिंत काळी पडू लागली. शेजारची पणती विजली , तेव्हा उष्णता कमी झाल्याने काकुस जाग आली. डोळे उघडून बघताच काकू थरारली. समोरच्या भिंतीवर एका स्त्रीची काळी सावली नाच करत आपला आकार वाढवत होती. इवल्याश्या उजेडात ती अतिशय विभत्स आणि भयावह भासत होती. पिंजारलेले केस हवा नसतानाही उडत होते. ओरडावे, तर काकूची वाचा आताच गोठली. कोणास बोलवावे तर आवाज खोलीच्या बाहेर जात नव्हता. मोहनला उठवावे, तर समोरचं दृश्य बघून त्या कोवळ्या जिवाने जीव सोडला असता..! त्या अक्राळ-विक्राळ सावलीने हा-हा म्हणता अंधारल्या खोलीचा पूर्ण ताबा घेतला. काकू त्यास घट्ट धरून होती. जीव तर दोघांचा मेटाकुटीला आला होता.
"कुठपर्यँत वाचवशील याला ?" अत्यंत किळसवाण्या आवाजात ती सावली काकुवर ओरडली. " इतक्या सहज तुमची सुटका व्हायची नाही." काकू यावर काहीही बोलली नाही.पोलादाच्या भांड्यावर गंजलेली खुरपी कोरडी ओढवी, तसा कानाचे तुकडे पडणारा आवाज होता तिचा. काळी असल्याने तिचं रूप दिसेनासं होतं. मूळ स्वरूपात ती नव्हतीच. ती होती, ते स्वरूपही भयानक होतं.
बराच वेळ ती खोलीच्या चकरा मारत राहिली. कोपरा-न-कोपरा तिने व्यापला. इथेच रहाणार यापुढे, कदाचित हाच विचार असावा. काकू भेदरलेल्या नजरेने तिच्याकडे बघत होती. तिचा उद्देश्य आपल्याला इजा करण्याचा किंवा जीवे मारण्याचा नाहीये, हे आता काकुला कळून चुकलं होतं. पण विषाची परीक्षा ही मृत्यूच, म्हणून काकूने काहीही हालचाल केली नाही. तिला जिवंत ठेवणाऱ्या पणतीचा जीव थोडाच उरलं होता. काकू सताड उघड्या डोळ्यांनी तिचा वावर बघत होती. शेवटी थकून एकुलती-एक पणती विजली. सर्वत्र अंधार झाल्याने कशाचीच सावली पडत नव्हती. चाचपडत काकूने मोहन ला गोळा करून स्वतःच्या पदराखाली घेतलं. ब्रम्हसमयी सगळं शांत-शांत झालं. काकूने सुटकेचा श्वास सोडला. थोडे डोळे झाकले. काही तासांत पाखरं किलकीलत घरट्याबाहेर पडू लागली. खोलीतील एकही वस्तू हललेली नव्हती. इथे काही तासापूर्वी काहीतरी भयानक घडून गेल्याची एकही खूण राहिलेली नव्हती. समोरच्या खिडकीच्या काचा थोड्या हलल्या होत्या.
"कुणी विश्वास नाही ठेवायचं !"
झालेला प्रकार काकूने यमाबाईला सांगितला.
"या मोठ्या घरांचं आणि मोठ्या लोकांचं मोठेपण हे असंच !" यमाबाई अनुभवाने सांगू लागली.
"तळतळाटावर उभं राहिलेलं ! हिरावुन आणलेलं ! या भिंतींवर सुद्धा एखादा असाच एखादा वरखडा असेल. यांच्याच एखाद्या पूर्वजाच्या काळ्या कृत्याची सावली...! काकू शांतपणे एका लाकडी पलंगडीवर बसली होती. "कुणाचातरी अकाल मृत्यू, ऐन स्वप्न मातीत मिळाले असतील. सुडाची इच्छा मेलेल्यांना मुक्तही नाही करत."
" आता...?" काकूने सहज विचारले.
दोघी घराला कुलूप लावून गावात निघाल्या. गाव साधारण तीन गल्यांत संपेल इतकंच होतं. दोघींची डोक्यावर पदर घेतला होता. पाय झप-झप चालत होते. यमाबाईच्या खटपटीने एक माणूस होता, जो याचं निदान करू शकत होता.
"तो बघ...!"
त्याला पहातच काकुला दुसरा धक्का बसला. गावातला वेडा होता तो. एका उकिरड्यावर घाणीत दोन्ही हात खुपसून काहीतरी शोधत होता.
" हा ...? हा काय करणार ए ?" काकूने यमाबाईला विचारलं. "याचं यालाच भान नाहीये, आणि हा आपल्याला...!"
" तू तेवढी शहाणी...!"
काकूचं वाक्य त्याला आवडलं नव्हतं कदाचित.
"एवढं कळतं का ग तुला ? कालची पोर तू..!" तो पुन्हा कचरा उचकटू लागला.
" एवढं तुला कळतं, तर काल का नाही केलं काही ? जिव मुठीत धरून बसली होती की रात्रभर !"
ही गोष्ट त्या खोली व्यतिरिक्त फक्त यमाबाईला माहिती होती. काकूने संशयाने यमाबाईकडे पाहिलं. तिने नकारार्थी मान डोलावली.
" तिने कशाला सांगितलं पाहिजे ? गावात मुंगी जरी बाळंत झाली , तरी मला कळतं..! बघायचं का तुला?" तो काकूच्या अगदी जवळ आला. दुर्गंधी ऐवजी एक वेगळा वास येत होता.
" आता नाहीये सुटका यातून तुझी ? तुझ्याकडून सगळं-सगळं हिसकून नेतील." काकू त्यापासून एक-एक पाऊल मागे फिरत होती. तो पुढे सरकत होता.
" ते घाण ए...पिसं ए ते ! जीव घ्यायचं नाही, पण जगूही द्यायचं नाही. तू घावली आता तिला...!"
"ये येड्या, काय ते स्पष्ट सांग!" काकुला घाबरलेली पाहून यमाबाई त्याच्यावर धावून गेली.
मिश्किल, तितकंच खोचक हसत तो उकिरड्यात जावून बसला.
" अगं येडे, तू काल पहिल्यांदा पाहिलं न ! मी गेली नव्वद वर्ष पहातो आहे."
"म्हणजे...?!" काकुला त्याचा संशय आला. तिने आजूबाजूला पाहिलं. त्याची कुठेही सावली पडत नव्हती. तिला दरदरून घाम फुटला.
"म्हणजे तू..तुम्ही !"
" सावल्या फक्त तुमच्या पडतात. चांगल्या-वाईट कर्माच्या पडतात. शरीरातून प्राण गेले, की कसली सावली आणि कुठंच प्रतिबिंब..?"
"त्या पोराला तुला जपाय लागणार ए. बघ जमलं तर ! जन्माच्या आधीच नशीब ठरलेलं असतं. जन्म आणि मृत्यच्या आतला प्रवास वंगाळ असतो. याचा बाकी लोकांपेक्षा जरा जास्त वंगाळ ए !"
काकू लक्ष देऊन ऐकत होती.
" याच्या पूर्वजांनी करून ठेवलेली पापं याच्या भोगात आलेली आहेत. कधी-काळी घडलेल्या घटनांच्या सावल्या आजही याच्या मागावर आहेत."
" याला वाचवून ठेवायचं म्हणजे...?"
" अकाल आणि पाशवी शक्तीपासून... त्यातून होणाऱ्या त्रासापासून...! याची आणि याच्या पूर्वजांची यातून सुटका होऊ शकते. पण कुणीतरी स्वतःहून या आगीत उडी मारली तर ! त्यासाठी वाट बघावी लागेल....!"
त्याने पुन्हा मान खाली घातली.
काकू हवेलीवर आली. त्या लोखंडी जाड-जुड दरवाजाबाहेरून तिने त्या अजस्त्र वास्तुकडे पाहिले. कित्येक वर्ष यावर नवा रंग चढलेला नव्हता. दिवसागणिक तिचे तेज काळवंडत चालले होते. भीतीच्या कमजोर भिंतीवर ती उभी होती. वर मृत्यूची छाया होती. आतल्या बागेत एकही झाड जंगल नव्हतं. वृक्षांच्या नावाखाली दोन आंबे आणि एक जुनं वडाचं झाड उभं होतं. उगाच उभं होतं. हवेलीकडे पाठ करून उभं होतं. तुळशीवृंदावन होतं, पण त्याचीही फक्त माती उरली होती. चैतन्य देणारी एकही सजीव वस्तू तिथे दम धरत नव्हती. सगळं-सगळं त्या अज्ञात, असुरी आणि अगंतुक शक्तीमुळे कोमेजलेलं, क्षीण झालेलं आणि क्षतिग्रस्त होतं.
....
"मूर्ख आहेस तू. वेड लागलंय तुला."
आईचं वृंदावर चिडणं सहाजिक होतं.
" समोर साक्षात मृत्यू असताना तुझी पाऊलं त्याकडे वळत चालली आहेत."
"आई, या सगळ्यात मोहनचा काय दोष ?"
"हाच, की त्याचा जन्म या कुळातला आहे." आईने स्पष्ट उत्तर दिलं."या सगळ्याशी तुझा काहीही संबंध नाहीये.
"नाही कसा ?" वृंदाने उलट उत्तर दिलं.
आई अवाक होऊन तिच्याकडे बघत राहिली.
" आणि नसेल तर...!"
"वृंदे..!" आईच्या आवाजात स्पष्ट राग आणि भीती होती.
"उगाच काहीही बडबडु नकोस. आलेले अनुभव थोडक्यात जीवावर बेतले आहेत. एकुलती एक पोरगी अश्या विहिरीत ढकलायला मी काही वेडी नाहीये. आपण उद्या सकाळी घरी परत जाणार आहोत."
वृंदाचा निश्चय पक्का होता. तिच्या इतर निर्णयांसारखा हा ही निर्णय धाडसी होता. यात धाडस थोडं जास्त होतं. इथे गाठ मृत्यशी होती. पण तिने मनाशी काहीतरी ठरवलं होतं. मोहन वर दया म्हणून नाही, त्याच्यावर उपकार म्हणून नाही, त्याच्या त्या वैभवावर डोळा ठेऊन तर नाहीच नाही. माणुसकीची पहिली पायरी म्हणून. आप-आपले निर्णय सांगून सगळेच मोकळे झाले होते. वृंदानेही तेच केलं. पुढे काय करायचं आणि कसं सामोरं जायचं हे मात्र अजूनही तिला माहीत नव्हतं.
एका दालनाच्या दारापाशी ती उभी राहिली. आतून चंदनाच्या धुपचा मंद वास येत होता. देव्हाऱ्यावर उन्हाचा एक छानसा कवडसा आला होता. त्यात नुकतेच न्हाऊन ठेवलेले देव लख-लख करत होते. देव्हारा इतर खोल्यांपेक्षा खूप वेगळा होता. हा काकूंच्याच ताब्यात रहात असे. त्यामुळे त्याची निगा होती. वृंदा देवासमोर बसली.
" काय मागणार आहात ?"
मागे काकू उभी राहिल्या.
"अजून ठरवलं नाही." तिने समईची वात वर केली. "स्वतःसाठी मागावं तर सगळी सुखं आहेत. दुसऱ्यासाठी मागावं, तर कोणत्या नात्याने मागवं हे कळत नाही." तिने मागे काकूंकडे वळून पाहिलं.
"तुम्हा सगळ्यांकडे बघून यांच्या अस्तित्वावर शंका येते मला !"
"चुकता आहात...!" काकू एक पाऊल पुढे सरकल्या. " हे भोग असतात. मागच्या जन्माचे, किंवा या जन्मी आपल्या पूर्वजांचे काही...!" खुंटीला टांगलेला टाळ काकूने थोडा फिरवला. कीण-कीण आवाज देवघरात घुमू लागला.
" मला किल्ला बघायचा आहे." वृंदा बोलली. काकूने तिच्याकडे आश्चर्याने पाहिले. " कित्येक वर्ष झाले आहेत. त्या बाजूला कुणी गेलं नाहीये. मी तरी अजून गेले नाहीच."
" एकदा बघेन. तुम्ही कराल का आमची तिथे जाण्याची व्यवस्था."
" जीर्ण झाला आहे तो. भिंती कोसळल्या आहेत. बुरुज अर्धे निखळून पडले आहेत. बाहेरून तेच दिसतं." काकूने देव्हाऱ्याच्या एका भिंतीतील कपाट उघडलं. त्यातून एक मोठी दुर्बीण काढली. कपाटाच्या बाजूला ठेवलेला एक साचा काढला.
" चला माझ्याबरोबर."
देव्हाऱ्याच्या बाहेरील मोठ्या गच्चीवर दोघी आल्या.
"बघा !"
वृंदाने ती भलीमोठी दुर्बीण डोळ्याला लावली. दूरवर असलेलं अगदी स्पष्ट दिसत होतं. उन्हाने तळपत चाललेली धरित्री पाण्याच्या एका थेंबाला असुसली होती. मोठं-मोठाली झाडं , लहान वेली वाळून गोळा झाली होती. त्यांच्यावर कित्येक दिवसापासून साचलेली धूळ दिसत नव्हती. पण हिरवळ मात्र लुप्त होत चालली होती. थोडं वर पाहिल्यावर वृंदाला किल्ल्याचा पायथा दिसला. अत्यंत आड आणि भयानक अश्या जंगलातून त्याच्याकडे जायला वाट होती. त्या बाजूस एकही जनावर अथवा पाखरू नव्हतं. मोठ-मोठाल्या शिळा हत्तींच्या ओढणीने सुमारे पाऊण मैल वर चढवून किल्ल्याची एक-एक भिंत काशोशिने वर गेली होती. जुना चुना आणि माती याचे व्यवस्थित समीकरण दोन शिळ्यांच्या आत भरले होते. त्याच्या जोरावर या किल्ल्याने असंख्य उन्हाळे ,पावसाळे काढून नेले होते.
एका मोठ्या दिंडी-दरवाजावर वृंदाने दुर्बीण स्थिर केली. सुमारे बारा फूट उंच असलेल्या या दाराला लोखंडाच्या तीन कड्या होत्या. दोन माणसांचे बळ लागावे, इतके त्याचे वजन सहज असेल. दाराच्या आतून बाहेर येणारे पोलादाचे सुळे थोडे गंजले होते खरे, पण एकही सुळ निखळला नव्हता. अतिशय बलाढ्य हत्तीच्या मस्तकात सोप्याने खोक पडू शकेल, इतकं बळ आजही त्या सुळ्यात होतं. दोन सुळ्यात साधारण वितभर अंतर होतं.
काळानुरूप त्या भिंतींना पडलेली भगदाडं सहाजिक होती. प्रत्येकाच्या दृष्टीस त्या किल्ल्याची झालेली दुरावस्था दिसत होती. पण त्याच्या जवळ जाण्यास कुणी धजावत नसे. त्याला कारण ही होते. जे कुणी चुकून त्या वाटेला गेले, त्यांचे देह अत्यंत विच्छिन्न अवस्थेत किल्ल्याला लागून असलेल्या जंगलात आढळले. ते काम नरभक्षक श्वापदाचे नाही, हे गावकऱ्यांनी फार पूर्वी हेरले होते. अनोळखी मानवी देहावर जागोजागी जखमांच्या रेखीव खुणा, डोळ्यांच्या ठिकाणी झालेल्या खाचा, निखळून बाजूला पडलेले हात-पाय ! मानव प्राण्यांविषयी मनात असलेली पराकाष्ठेची घृणा हेच या मागचे एकमेव कारण असू शकते. त्याच्या किल्ल्यावर येण्याची शिक्षा किंवा इतरांना धोक्याची सूचना ,इतकी भयावह होती की जीव असलेली सृष्टी देखील किल्ल्याच्या आजूबाजूला फिरकत नसे.
दुर्बिणीतून सुमारे चार मैल आणि टेकडीवर असलेला तो किल्ला पाहून वृंदाला घाम फुटला. त्याच्या भिंतीत अजूनही जीव असल्याची जाणीव तिला झाली. रात्री तळ्याकाठी घात लावून बसलेल्या एखाद्या लांडग्यासारखी त्याच्या डोळ्यातली भूक ताजे पहिली. रक्ताला सोकावलेला त्याचा कोरडा घसा असावा, तसाच त्या किल्ल्याचा तट मानवाची नेहमी वाट पहात असे.
"सृष्टीशी इतकं वैर कुणाचं असू शकतं?" डोळ्यावरची दुर्बीण काढून तिने काकुला विचारलं.
"सृष्टीशी वैर नाही, ती फक्त शिक्षा भोगते आहे."
वृंदाने दुर्बीण काढली. त्या उदास भंगलेल्या वास्तुकडे एकटक ती पाहू लागली. अनंतकाळापासून कैदेत असलेल्या एखाद्या निरागस जिवासारखी तिची दैना अत्यंत बिकट होती. शारीरिकरित्या ती खंगली होतीच, मानसिकताही उन्मळून पडलेली होती.
" नेमकी कसली साक्ष त्या चार भिंतींच्या आत श्वास घेते आहे, कुणास ठाऊक...?"
"जाऊन बघायला...?"
" उगाचचा हट्ट नका करू !" काकू तिच्या मागे येऊन उभ्या राहिल्या. "कित्येक ज्ञात-अज्ञात जीवांचा सहज बळी गेला आहे."
"ज्ञात...?" वृंदाने शब्द पकडला. " कोण ज्ञात...?"
काकूने यमाबाईच्या झोपडीकडे नजर वळवली. बाहेर दुर्गा मजेत खेळत होती.
" हिची आई...!" संध्याकाळी वृंदा यमाबाईच्या झोपडीत शिरली. " ही तीन-साडेतीन वर्षाची असेल. माझ्याकडे ठेवून हिची आई कामावर गेली, आलीच नाही. दोन, तीन, चार दिवस झाले. कुठेच काही पत्ता लागला नाही. मालकांना कळलं, तसं त्यांनी घोडे आणि मशाली घेऊन माणसं पाठवली. तीन दिवसांनी माणसं....!" यमाबाईला पुढचं काही सांगता येईना. वृंदाने तिला धीर दिला.
" पूर्ण शरीर काळं-निळं...मानेवर , बाकीच्या ठिकाणी बोटभर खोल जखमा...हात-पाय पाठीला बांधून....! काय सहन केलं असेल पोरीने, त्या किल्ल्याला आणि आभाळाला ठाऊक...!
'हे असं संध्याकाळी बिजलीचं प्रेत हिरोजी घोड्यावर घेऊन आला. सगळा गाव म्हणता-म्हणता गोळा झाला. दुर्गा माझ्यापाशी आत होती. मला खिडकीतून सगळं काही दिसत होतं. बाहेर जाण्याची धाड नव्हती माझ्यात. हिरोजीने निर्जीव झालेला कोथळा वाड्याबाहेर आणून ठेवला. बाहेर आवाज ऐकून मालिनीबाई खाली आल्या. अंगभर ओरबाडल्याच्या खुणा होत्या. कपडे नव्हतेच. डोळे बाहेरच कुठेतरी पडले...!' वृंदाच्या अंगाला कापरं भरलं. 'तो वरून सगळं बघत होता. त्याच्या नजरेत मी भीड पहिली. शून्यात हरवलेली नजर खूप काही सांगून गेली. गेली...रातोरात बीजलीला जाळून मोकळं झाले सगळे.'
"आणि हिरोजी...? कोण ए तो ?"
" सैतान होता...! सैतानाला लाज वाटल , असा होता."
" मेला ?"
" न्हाई...त्याची पापं इतकी भयाण आहेत, त्याला नियती इतकं साधं मरण द्यायची नाही."
" मग...कुठे आहे ?"
क्रमश..