महालगड भाग 23
स्त्रीच्या मनात लालूच आणि मत्सर एकदा आला, की त्यात ती सगळं काही जाळून राख करते." मोठे सरकार पलंगाच्या खांद्यावर डोकं ठेऊन होते.
" का, स्त्रीला मन नसतं ? तिला इच्छा, अपेक्षा नसतात ?" अत्यंत कुत्सितपणे मालिनी त्यांच्यावर दाफरली.
" या घरात कुणीतरी करती स्त्री असावी म्हणून तुम्ही माझे लग्न तुमच्या अर्ध्याभावाशी लावून दिलं. नंतर लक्षात आलं, की आम्हाला दोघांना फक्त तुमचं ते बाधित पोरगं, तुमची आजारी बायको आणि ही फुटकी हेवली सांभाळायचं काम आहे. आणि या सगळ्यानी काय मिळणार आहे ? गावात मालकीण आणि घरात मात्र....!"
" मालिनी...! हे पाप आहे. कुणाला कळलं तर तुझा आणि मोहनचा जीव घेतील लोक ! जीवे मारतील...! "
" सरकार, माझ्या हातात कोलीत लागलं आहे. आणि याचा मी पूर्ण वापर करेल. "
" या आधी मीच तुझा...! मोठे सरकार तिचा गळा अवळायला धावले.
" मारा, मारा...! आणि चढा फासावर. लोक आधीच हवेलीकडे वक्रदृष्टीने बघातायत. नवीन आलेल्या सुनेची हत्या झालेली पाहून हेवली आणि तुमच्या मुलाला जिवंत जाळतील. मग बसा, हेवलीचे अर्धवट जळलेली अवशेषं उरावर मिरवत. मोठे सरकार एकदम थांबले. ती सांगत होती ते ही खरं होतं.
विश्वनाथ सगळं ऐकत होता.
'मोहनरावांच्या आईवर हळुवार विषप्रयोग करून त्यांनाही तिने आपल्या मार्गातून दूर केले. कुवरांच्या हत्येचे पाप देखील तिच्याच उरावर आहे."
" पण हे सगळं ती का करते आहे." विश्वनाथचे डोळे भरून आले.
"सत्ता ! विलासी आहे ती. स्त्री म्हणून तिला मिळणाऱ्या सुखावर तिने पाणी सोडलं, ते याच मुळे. कुवरांना आयुष्यभर तिने आधु ठेवलं. हे सगळं त्यांना ठाऊक होतं. जिवाच्या भीतीने ते काहीही बोलले नाही."
भिंतीला टेकून ते बसले होते. विश्वनाथ खूप लक्ष देऊन ऐकत होता.
"वृंदाचा जीव धोक्यात आल्यावर मात्र कुंवर सचेत झाले. मालिनीला त्यांनी याबाबत विचारणा केली. पूढे काय झालं, हे तुम्ही पाहिलं...!"
" हे सगळं, इतक्या खोलवर तुला कसं माहीत."
,"माझे वडील यातील अर्ध्या कुकर्माचे साक्षीदार आहेत. त्यांनी केलेल्या पापाची त्यांना भयवाह शिक्षा मिळाली. त्यांचं अर्धंशरीर...!"
"म्हणजे, तू...?"
" हो, मी हिरोजीची मुलगी आहे."
तिचा शब्दनशब्द खरा होता. याची पडताळणी करायची गरज विश्वनाथला भासली नाहीच. ज्याची ती मुलगी होती, तो या सगळ्यात खटकाची भूमिका करीत होता. शेवटचे काही दिवस बापाचे दर्शन झाले नाही, म्हणून हा उद्रेक तिला हेवलीच्या दारापर्यंत घेऊन आला. मालिनीच्या तावडीत सापडली नसती, तर तिला बरंच काही करता आलं असतं.
"तो वृंदाला काहीच करू शकत नाही. कारण त्यांना त्यांच्या घराला वारस हवा आहे. एकदा वृंदाची कूस उजवली, की मोहनचा विषय संपतो."
त्याच्याविरोधातल्या लढ्यात आता विश्वनाथ एकटा उरला होता. मालिनीवर असलेला त्याचा विश्वास कागदाच्या राखेसारखा हवेत उडाला. त्याचे डोळे भरून आले. हे सगळं आपण कशासाठी करतोय ? याने काय साध्य होणार आहे ? आपण कशासाठी जीव धोक्यात घालायचा ? हर सगळेच प्रश्न त्याच्यासमोर फेर धरून नाचु लागले. बाबांच्या आठवणीने त्याला गहिवरून आले.
"मला कळतंय,तुम्हाला धक्का बसला आहे. हे भयनाट्य आहे, आणि तुम्ही आता याचा भाग आहात. का करता आहात ? कुणासाठी ? तर वृंदासाठी ! "
"हो..!"
"मोहन आपल्या शुद्धचित्तात वृंदाशी विवाहबद्ध झाला पाहिजे. असं न झाल्यास वृंदा कायमची आयुष्यातून उठेल.तिच्या पोटी येणारं अपत्य, हाच शाप पुढे चालू ठेवेल."
हातातील पहार जमिनीवर टेकवत तो विचार करू लागला.
"इथून बाहेर निघावं लागेल."
"ही एक भुलवड आहे. चकवा आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केला, तरीही इथून बाहेर निघणार नाही. मुख्य दाराशिवाय बाहेर जाणं शक्य नाही." तिला थोडीफार माहिती झाली होती.
"कुठे आहे मुख्य दरवाजा."
दोघंही त्या मोकळ्या जागेत आले. तिने वर पाहून सूर्याचा अंदाज घेतला.
"पूर्वेकडे तोंड करून मुख्यदरवाजा उघडतो. समोरून जावं लागेल. प्रत्येक रस्ता, फक्त आणि फक्त पूर्वेकडे जाणारा असावा."
दोघांनीच हातात शस्त्र घेतलं आणि चालू लागले. ती शूर होती, साहसी होती. दिसायला सावळी होती. बोलायला देखील चतुर आणि बुद्धीने तल्लख होती. वडिलांचा शूर बाणा तिच्या अंगी होताच.
"किती दिवस झाले इथे आहेस ?"
"घरातून उचललं मला. डोळे उघडले तेव्हा सर्वत्र अंधार होता. एखाद तास मला वाटलं, की शुद्धीवर नसताना माझे डोळे काढले गेलेत. बाबांच्या जाण्यानंतर मी स्वतः हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तुम्ही त्या रानात जायला निघाला होतात, तेव्हा देखील मी तुमच्याशी बोलायचा प्रयत्न केला. पण तुमच्यावर विश्वास कसा ठेवावा हे कळलं नाही."
हातातून वेळ वाऱ्यासारखी वहात होती. दोघं एकाच संकटाशी लढत होते. जे कालपर्यँत एक वाटत होतं, ते आता दुप्पट झालं होतं. सत्तेची अतोनात लालसा त्याला असुरी शक्तीचा आधार, हे अत्यंत विभत्स गणित एकत्र आलं होतं.
दिशेच्या होशीबानी दोघ काही पाऊलं चालत गेले. एकमेकांचे हात घट्ट धरलेले होते. सुटले असते , तर त्या अंधारात मृत्यूची वाट पहात राहण्याव्यतिरिक्त दुसरं काहीच काम उरलं नसतं. विश्वनाथ पुढे होता. हवेचा चेहरा बदलू लागला. आणि एका मोठ्या चौकात ते येऊन पोहोचले. चौकात स्वच्छ सूर्यप्रकाश होता. दोघांच्या जीवात जीव आला. इकडे तिकडे नजर टाकून पहिली. मध्यावर सुळ होता. आणि त्याच्या एकदम समोर फासावर टांगण्यासाठी असलेला चौकोनी साचा. हा कैदखाना होता. गर्दन मारण्यासाठी, हात-पाय तोडण्यासाठी वेगवेगळे साचे.
" ही अत्यंत भयानक जागा आहे ! आपण इथे नको होतं यायला !" विश्वनाथ म्हणाला.
"का ?"
" कुणाला शिक्षा देणं, तीही इतकी भयानक ! त्यावेळी त्याची असलेली मानसिकता त्या जागेवर परिणाम करून जाते. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाची शक्ती याच्यासमोर अतिशय हीन आणि कमकुवत !" त्याच्या पायाला काहीतरी ओलं लागलं. खाली पाहून दोघांच्या डोक्याला झीणझिण्या आल्या. फरशीत असलेल्या भेगीतून रक्त येत होतं. ते भयभीत होऊन मागे सरकू लागले.
फरशी सरकू लागली. असंख्य वळवळणारे काटेरी जीव त्यातून बाहेर येऊ लागले. गोम सदृश्य असलेले हे जीव दिसायला अत्यंत किळसवाणे होते. पण ते विषारी होते, एवढं मात्र नक्कीच. त्यांची लांबी सापाच्या पिल्ला एवढी होती. दोघांना आता एखाद्या उंच जागेशिवाय पर्याय नव्हता. फाशीच्या साच्याइतकं उंच काहीही नव्हतं. पळत जाऊन त्यांनी तो गाठला. वर जाताच त्यांनी त्याला असलेला लाकडी जिना ढकलून दिला.
सूर्य माथ्यावर आला होता. आधीच दोघ थकले होते.
" पाणी तरी शोधलं असतं." तिचाही घसा कोरडा पडू लागला होता.
" मनुष्य वस्ती नाहीये, त्यामुळे ज्ञात असलेले पाण्याचे स्रोत ही माहीत नाही. हा किल्ला पूर्ण माहिती असलेली व्यक्ती मी अजूनही नाही पाहिली. ही वास्तू जिवंत असल्याचे कित्येक असे पुरावे इथे मिळतील." विश्वनाथ तिला सांगू लागला. बाबांनी त्याला या किल्ल्याबद्दल खूप काही सांगितलं होतं.
तिथे भयानक शांतता पसरली होती. कुणाच्यातरी श्वास घेण्याचा आवाज घुमू लागला. कुणीतरी आलं होतं. दिसत मात्र नव्हतं. नेमकं कोणत्या बाजूने येतंय, हे ही कळत नव्हतं. श्वासाचा आवाज एखाद्या श्वापदासारखा होता. ते सावध झालेत. इथून त्यांना खाली उतरून जाणं शक्य नव्हतं. आता जे काही समोर आहे, त्याला तोंड देणं भाग होतं. त्या जीवांची संख्या हळू-हळू वाढत होती. मधल्या जागेवर त्यांची जत्रा भरत होती.
"कोण असेल?" विश्वनाथने तिला प्रश्न केला.
" तो असेल तर घाबरायचं कारण नाही. तो इथे नाही येऊ शकणार...!" तिने वर, सुर्यप्रकाशाकडे बोट केलं.
" तो काय, मी पण नाही येऊ शकत." आणि अंधारातून मालिनी बाहेर आली. तिला पहातच दोघांना घाम फुटला. दोघांच्या कपाळावर आठ्या आल्या. तिचं अंतरंग इतकं भेसूर असेल, असं कुणालाही वाटलं नव्हतं.
" मरायला पाठवलं तुम्हाला. मला वाटलं तू पाण्यावाचून आणि हा त्या भुयारात ...!" ती देखील त्या जीवांच्या जत्रेत उतरत नव्हती. कारण ती अजून मानव होती.
"आता सगळं खरं समोर आलंय, तर एक सत्य मीही सांगते. याला इथे मरायला पाठवलं होतं. कारण हा वृंदाला वाचवायला निघाला होता. ती वृंदा, जी स्वतःहून या सगळ्यात उतरली. मोहनशी तिचं लग्न लावून, तिच्या पहिल्या अपत्याला...!"
" असुर आहेस तू...! हव्यासामुळे आंधळी झाली आहेस.माणसाच्या वेशात एक राक्षस ! एक कपटी आणि पाताळयंत्री स्त्री !" तिला मधेच तोडत विश्वनाथ बोलला.
"आणि कुणासाठी हे सगळं. तुझं नाव सांगायला एकतरी मूल आहे का तुझ्या पदरात ? "
"मूर्ख मुला ! हा शाप जो पर्यंत आहे, तो पर्यंत मलाही मरण नाहीये. कारण मी पोसते आहे. एक पिढी वाढली, की माझीही आयु वाढेल."
"मूर्ख तू आहेस ! ईश्वराने प्रत्येकाला एक वय आणि कर्म ठरवून दिलं आहे. तू त्याच्या विरोधात नाही जाऊ शकत. तसा प्रयत्न करणे देखील व्यर्थ आहे."
तिने कमरेची कट्यार काढली. आपला अंगठा तिने कापून त्या जीवांच्या बाजूला फेकला. त्यांना रक्ताचा वास लागला. जीव सरसावले. काही क्षणात तो अंगठा त्यांचा खुराक बनला.
" बोलणं व्यर्थ आहे. ही सांगते आहे, तर निश्चित काहीतरी योजना हिच्या मनात असेलच !" इतक्या वेळ गप्प बसलेली ती , मालिनीकडे पाहून बोलली.
"कळलंय तिला..! खाली येण्याचा प्रयत्न करू नका. आजची रात्र फक्त. उद्या वृंदादेखील इथेच येणार आहे."
एवढं सांगून ती मागच्या अंधारात गडप झाली.
या दोघांचा जीव सूर्यास्त होईपर्यंत सुरक्षित होता. त्याला अंधार होईपर्यँत आत रहाणं भाग होतं.
" काहीतरी करून इथून निघायला हवं." तीच्या डोक्यात काहीतरी चक्र सुरू होतं.
"नाहीये काही पर्याय ! प्रयत्न करून थकशील. सगळी शक्ती वाया जाईल." विश्वनाथला ठाऊक होतं, की अशी घाई करणं व्यर्थ आहे.
इथून निघण्याचा जवळचा एकही पर्याय दोघांकडे नव्हता.
............
घाईघाईने मालिनी हवेलीवर आली. तिला आत येताना आईने वरून पाहिलं.
"आपल्याकडे वेळ कमी आहे. तुम्हाला लवकरात-लवकर इथून निघायला हवं. खाली गाडी आणि माणूस आहे." तिने आईला आवरायला सांगितलं.
"अहो पण विश्वनाथ ? तो कुठे आहे ?"
" सांगता येत नाही. आता आपण फक्त एवढ्यात समाधान मानायचं, की जीव वाचवण्याची संधी आपल्याला मिळते आहे."
आईने वृंदाकडे एकदा पाहिलं. ती उठून चालू शकेल, याची काहीच शक्यता नव्हती. मालिनीची चाललेली घाई पाहून तिला जराही संशय नाही आला.
"अहो, चला लवकर ! वेळ कमी आहे." नकळत ती एका समईच्या जवळ जाऊन उभी राहिली. उजेड असून देखील तिची अस्पष्ट सावली मागच्या भिंतीवर पडली. आईची दातखिळीच बसली एकदम.
तिने मालिनीकडे नीट पाहिलं. अंगठ्याच्या जागी पदराचा तुकडा बांधला होता.
"बाई, हाताला काय झालं? "
"ते असंच थोडं कापलं गेलं !" तिने तोंड लपवलं.
आई मोठ्या धाडसाने तिच्या जवळ गेली. जवळ असलेली समई उचलून तिने तिच्या समोर धरली. समईच्या वातीच्या उष्णतेने मालिनीचा जीव गुदमरु लागला.
"हे काय करताय ?" मालिनी थोडी चाचरली.
"बघू द्या, जखम किती खोल गेलीय." आईने तिचा अंगठा हातात धरला आणि दुसऱ्या हाताने समई च्या वातीवर धरला. जखमेवर मीठ लागल्यासारखं मालिनी ओरडू लागली. आई एवढ्यावर थांबली नाही. कमरेला असलेल्या रक्षेच्या पुरचुंडीतुन रक्षा काढून तिने बळजबरीने त्या अगठ्याला लावली. रक्षा देवीची असल्याने ती जखमेवर पडताच जखम जळू लागली. मालिनीस असह्य वेदना होऊ लागल्या. अश्यातच तिच्या पदराचा भाग समईस लागला. त्याने थोडा पेट घेतला. आईने पटकन अजून थोडी रक्षा तिच्या तोंडावर टाकली.
तिचा चेहरा काळा पडू लागला. अगदी जळून गेल्यासारखा. ती जोरजोरात किंचाळू लागली. वर येताना पासून तिच्या मागावर असलेली यमाबाई दाराआड लपून हे सगळं ऐकत होती.
"नाशीबात असलेलं खाता येत नाही, हे असंच ! " यमाबाई एकदम समोर आली. आईला तिच्या येण्याने धीर आला.
"बाई, तुम्ही काळजी करू नका. आपण दोघी नेऊ तुमच्या मुलीला इथून.आता इथून बाहेर पडावं लागेल." आधीच क्षीण झालेल्या मालिनीला दोघींनी मिळून एका खांबाला बांधून ठेवलं. एका बाजूने आई आणि दुसऱ्या बाजूला यमाबाई, वृंदाला उचलून नेऊ लागल्या.
" इतकं सोपं नाहीये, हिला इथून नेणं ! "मालिनीचा आवेग अजून कमी झाला नव्हताच. "तो येईल आणि हिला नेईल. तुम्ही बघत रहाल."
" तुझ्या त्या राक्षसापेक्षा एक शक्ती आहे जगात, आणि ती सगळं बघते आहे."जाता-जाता यमाबाई बोलली. खोलीच्या बाहेर जाऊन त्यांनी ते बाहेरून लावून घेतलं. त्या बोळातून जाताना त्यांना भिंतीमधून ओरडण्याचे तेच भेसूर आवाज येऊ लागले. पण आता दोघींमध्ये एक वेगळा धीर आला होता.
"आपल्याला फक्त हवेलीच्या बाहेर पडावं लागेल. एकदा हिला बाहेरच्या हवेत नेलं, की घाबरायचं कारण नाहीच."
दिवाणखान्यात खाली उतरायचा जिना लागला. दोघी अतिशय सांभाळून जिना उतरू लागल्या. सर्वत्र शांतता पसरली होती. दोघींना सारखी पाऊलं टाकावी लागणार होती. हळू-हळू त्यांच्या चालण्यात सुसूत्रता आली. अचानक यमाबाईच्या पायात लचक आली. तोल गेल्याने त्यांनी बाजूच्या भिंतीचा आधार घेण्यासाठी हात मोकळा केला आणि जे नव्हतं व्हायचं तेच झालं. वृंदाचा भार एकट्या आईवर पडला. त्यांच्याही तोल गेला आणि वृंदा हातातून निसटली. पायऱ्या गडगडत ती खाली आली. ती थांबली, ते सरळ शेवटच्या पायरीवर !
दोघी एकदम ओरडल्या. वृंदा पडली, तिथे तो उभा होता.
क्रमश...
लेखन : अनुराग वैद्य