महालगड भाग 22
असंख्य निष्पाप जीवांची कत्तल करून तो आता प्रचंड मायावी झाला आहे. दया, माणुसकी या सगळ्यातून तो उठला आहे. एक काळ येतो, जिथे या असुरी शक्ती स्वतःला तिन्ही लोकांत सर्वश्रेष्ठ समजू लागतात. ईश्वराशी अनेक वर्ष तुटलेला त्यांचा संपर्क ,त्यांना ईश्वरापासून लांब घेऊन गेलेला आहे. त्याच्या अचाट शक्तीची प्रचिती आणि परिणाम, याचा त्याला गंध नाहीये. स्वतःला अंधारात, किंवा एखाद्या कमकुवत शरीरात त्याने बंद करून ठेवले आहे. इतरांना त्याची वाटणारी भीती आणि घृणा त्याची शक्ती अबाधित ठेवतात ! ' त्या अंधारात देखील विश्वनाथचं विचारचक्र सुरू होतं. गेले दीड तास तो सतत चालण्याने दमला होता. त्यांची पिशवी, हत्यारं आणि पाणी मागेच राहिले होते.
यमाबाई काही केल्या आपली झोपडी सोडत नव्हती. दुर्गास तिने आपल्या कुशीशी कवटाळून ठेवलं होतं. अधून-मधून ती खिडकीतून वर वृंदाच्या खोलीकडे बघायची. वय झाल्याने तिची शक्ती क्षीण झाली होती. काकूने आदल्या रात्री तिला आज घडणाऱ्या सगळ्याच गोष्टींची कल्पना देऊन ठेवली होती. दुर्गास बाहेर न आणण्याची ताकीद ही होतीच. वृंदाची आई थोड्या-थोड्या वेळाने खिडकीत येऊन त्यांच्याकडे बघून जात असे. दोघींना हाच काय तो आधार होता. मोहनला त्या रात्री जेरबंद करण्यात यमाबाईने देखील हातभार लावला होता. आपल्या रानातल्या खोलीत तो बंद असताना तिनेच आपल्या कुपीतील तांबड्या पानांचा रस त्याच्या पाण्यात घातला, ज्याने तो बेशुद्ध झाला होता. मोठ्या शिताफीने काकू एका चोर वाटेने त्याच्या खोलीत शिरल्या , त्यास दोरीने बांधलं आणि अर्ध्यारात्री त्याला तळघरात जेरबंद केलं. कदाचित अश्यात तो गावकऱ्यांच्या हाती लागला असता, तर त्यांनी त्याचा जीव घेतला असता. तो मोकळा असता, तर त्या मुलीची काही धडगत नव्हती. यमाबाईस भीती वाटणं सहाजिक होतं. आपलं जर काही बरं वाईट झालं , तर दुर्गाचं काय होईल, ही चिंता त्यांना खाऊ लागली होती.
त्याचा प्रभाव कमी होऊ लागल्याने वृंदातही फरक पडू लागला होता. तिला ताप नव्हता. शरीर सचेत होत होतं. आईने तिच्या हाताला सुई टोचून पहिली. रक्तातला काळपटपणा जरा कमी झाला होता. डोळेही पूर्वरत होत होते. चेहऱ्यावर असलेला पांढरेपणा देखील आता थोडा बदलत होता. आईस माहीत नव्हतं, या सगळ्याचं कारण तळघरात दडून बसलंय.
चालून आता दोन तासाच्या वर झाले होते. हवेतला गारवा थोडा बदलू लागला होता. एकदम विश्वनाथच्या डोक्याला धाडकन काहीतरी लागलं. धडक जोरात असल्याने जखम खोलवर झाली. क्षणभर त्याचं डोकं बधिर झालं. आपल्या हाताने तो पुढे काय आहे ते तपासू लागला. लाकडाच्या दारासारखं त्याच्या हाताला काहीतरी लागलं. अंधारात त्याने पूर्ण अंदाज घेतला.
'हेच ते दार असावं.' पण दुसऱ्याच क्षणी त्याचा हा आनंद पुर्ण मावळला. ते दार खालच्या बाजूने पूर्ण मातीत रुतलं होतं. एकही फट, झरोखा, किंवा बघण्यासाठी बिंब नसलेलं ते दार खूप जड होतं. त्याचं वरचं टोक तर विश्वनाथच्या हाती देखील लागत नव्हतं. हाताला लागलेली कडी अतिशय जड होती. ती हाताने उचलून ओढणे एका माणसास शक्य नव्हतेच. तो खाली बसला आणि माती बाहेर उकरू लागला.
बाहेरील वेळ, हवा, याचा त्याला मागमूसही नव्हता. आनंतकाळापासून आपण याच भुयारात आहोत, असेच त्याला वाटत होतं. क्षणभर तर आपला उर्वरित जन्म इथेच जाईल, अशी भीती देखील त्याला शिवून गेली. मनात जप सुरू होताच. आपण एकटं असल्याची भीती त्याला होती, पण मुळात आपण एकटे नाहीतच, हे देखील त्याला ठाऊक होतं. पुढचा दीड तास साधारण तो माती उकरत राहिला. दारं मोकळी झाली. त्याला प्रचंड थकवा आला होता. गेले कित्येक तास त्याला पाणीसुद्धा मिळालं नव्हतं. मनगट आणि कोपर , खांदे दुखायला लागले होते. शरीरातले त्राण क्षीण झाले होते. काहीवेळ बसून दार उघडावे , या विचाराने तो तिथे भुयारातच एका भिंतीला टेकून बसला. त्याचा थोडासा डोळा लागला. तिकडच्या बाजूने आवाज येऊ लागला. त्याची झोप उघडली. दाराच्या त्या बाजूने काहीतरी हालचाल दिसू लागली. सावध होऊन त्याने दाराची एक फळी थोडीशी आत ओढली.
भुयाराचं दुसरं तोंड एक मोठ्या खोलीत उघडत असे. त्याच्या मधोमध एक ओटा आणि ओट्याच्या बरोबर वर, सुर्यप्रकाश , हवा येण्यासाठी एक मोठा झरोखा होता. तिथून बऱ्यापैकी उजेड येत होता. कुणाचीतरी चाहूल लागत होती, पण दिसत कुणी नव्हतं. हिंमत करून विश्वनाथने दार पूर्ण उघडलं. दराचा जराही आवाज झाला नाही. तो आता भुयारातून बाहेर आला होता. सुमारे तीन तासांनी त्याने मोकळा श्वास घेतला होता. त्याला जर बरं वाटलं. कुणीतरी नक्की तिथे होतं. जमिनीवर काही लोखंडी गज,पहारी पडलेल्या होत्या. त्यातील एक त्याने उचलली. त्या बाजूच्या कोपऱ्यातुन एक सावली त्याच्या नकळत आडवी पळत गेली. हे त्याला कळलं. तो अधिक सावध झाला.
त्या खोलीच्या मध्यावर उजेड असला, तरी आजूबाजूला अंधार होता. कुणी दबा धरून बसला तर काहीच कळणार नव्हतं. ही जागा विश्वनाथ साठी पूर्णतः नवीन असल्याने त्याला खूप सावध रहाणे भाग होतं. तो अंधारात उभं राहून वाट पाहू लागला. ती चाहूल देखील त्याच्यावर पाळत ठेवत होती. एकमेकांशी लढा देण्याच्या तयारीत असलेली दोन अनोळखी तत्वे तिथे होती. एक जिवंत माणूस होता, दुसरं काय होतं, हे देवालाच माहीत. अचानक त्याला जवळ काहीतरी हालचाल झाल्याचं जाणवलं. कसलाही विचार न करता त्याने त्या दिशेने पहार फिरवली. एक आर्ट किंकाळी तिथे उठली. एका मुलीची होती. पहारीचा घाव तिच्या खांद्याला चाटून निसटला होता. झटक्याने ती उजेडात फेकली गेली आणि जमिनीवर कोसळली. तिथे पडल्याने तिच्या डोक्याला आणि गुडघ्याला इजा झाली. विश्वनाथला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसेना. तो अंधारात तसाच शांत उभा राहीला. ती मुलगी उठून उभं रहाण्याचा प्रयत्न करत होती. तिला असह्य वेदना होत होत्या. जागो-जागी तिचे कपडे फाटले होते. ती जखमी अवस्थेत होती. तिला वेदना होत होत्या आणि ती संतप्त ही होती.
"मार न, मारून टाक न मला..!" ती जोरात ओरडली. "कोण आहेस कोण तू ? का छळ मांडलाय ? तुझं काय वाईट केलंय मी ? काय करायचं ते कर आणि जीव तरी घे एकदाचा.." आणि ती जोरजोरात आई आणि बाबांच्या नावाने रडू लागली. विश्वनाथच्या लक्षात सगळं काही आलं. तरीही तो सावध होता. त्याने त्याची माया आणि कपट पाहिलं होतं. घात होण्याची शक्यता जास्त होती. आणि हा शेवटचा घात होता, सरळ मरणाच्या दारात उभं करणारा. हा किल्ला त्याचा होता. तिचं रडणं थांबत नव्हतं. शेवटी धोका पत्करून त्याने तिला सामोरं जायचं ठरवलं.
"घाबरू नकोस.मी तुला वाचवायलाच आलो आहे. माझ्यापासून तुला धोका नाहीये. तू तीच न, जिला काही दिवसांपुर्वी उचलून...?"
"कोण आहेस तू...? वाचवायला आला आहेस, तर समोर ये." तिच्यात धाडस खूप होतं. तिच्याकडुन हे उत्तर आलं आणि विश्वनाथने एक पाऊल पुढे टाकलं.
"मी विश्वनाथ. तुला वाचवण्यासाठी सरकारांनी मला इथे पाठवलं आहे." तिला भरून आलं. कदाचित इथून आपली सुटका फक्त मृत्यू करू शकेल, हा समज पक्का झाला असल्याने तिने कुणी आपल्याला वाचवायला येईल, अशी अपेक्षा सोडली होती. विश्वनाथ तिच्या समोर आला. पूर्ण मातीत माखलेले कपडे. घामाघूम चेहरा. हाता-पायावर जखमा, थकलेलं शरीर ! हा नक्कीच आपल्याला वाचवायला आला आहे, ही तिची खात्री झाली.
"तुला कसं माहीत, मी इथे आहे ? "
" ते महत्वाचं नाहीये. आधी इथून निघू, पुढचं पुढे बघू. " त्याने तिचा हात धरला आणि भुयाराकडे जाऊ लागला.
त्याला भुयाराचं दार सापडेना.
त्याला घाम फुटला. "इथेच होतं. या कोनाड्याशेजारी." तो भिंतीचा अंदाज घेऊन चाचपडून पाहू लागला.
" नाहीये आता...!" तिला रडू कोसळलं.
"म्हणजे ? "
" मी रोज शोधते. नाही सापडत. तो खूप निर्घृण आहे, मायावी आहे. हे सगळं तो करतोय ! त्याला हवं तसं...! माणसांना छळतोय, मारतोय. "
" आता फार काळ तो हे सगळं नाही करू शकणार ? या भुयाराच्या दुसऱ्या तोंडाला आम्ही त्यास जायबंदी अवस्थेत ठेवलं आहे. सरकार आहेत त्याच्यासोबत !"
"कोण ? कोण आहेत ? "
" सरकार, मालिनीबाई."
झटका लागल्यासारखं ती एकदम लांब झाली.
" काय झालं ?"
" तुला त्यांनी पाठवलं ?" तिने घाईने खाली पडलेला एक गज उचलला आणि विश्वनाथवर रोखला.
"हो, पण तू असं...!" तो तिच्या दिशेने सरकू लागला.
" लांब हो. हे तुझ्या छातीत घालायला मी मागे-पुढे पहाणार नाही."
" पण, काय झालं..?" तिचा बदललेला अवतार पाहून विश्वनाथसुद्धा घाबरला.
"नीच, पापी...! किती निष्पाप जणांचा बळी घ्याल. देव तुम्हाला शिक्षा देईल तेव्हा देईल. पण आज मी तुला, इथेच मारेन." बेसावध असलेल्या विश्वनाथवर तिने त्या गजाने वार केला. वाराचा वेग बघून ती युद्धकलेत निपुण असल्याचं विश्वनाथाच्या लक्षात आलं.
" हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. तो गज फेक आधी, लागू शकतो. "
" काही गैरसमज नाहीये. समोर राहून अख्ख्या गावाच्या नजरेत धूळ फेकता तुम्ही. कल्लोळ माजवून ठेवलाय सगळा ! "
"मला काहीच कळत नाहीये. तू शांत हो आधी. मी होनाजी वैद्याचा मुलगा, विश्वनाथ ! " होनाजी वैद्य हे नाव ऐकलं आणि ती थोडी शांत झाली.
" वेळ नाहीये आपल्याकडे !" ती पूर्ण शांत झालेली पाहून तो तिच्याजवळ आला.
" कोण आहे मालिनी ? काही माहितेय तुला ? तिचं माहेर, भाऊ-बहीण ? तिचा इतिहास ?"
" नाही !" विश्वनाथला खात्री पटली, पुढे तो जे काही ऐकणार आहे, त्याने त्याला त्रास होणार आहे.
" मोहनच्या आईची हत्या तिने केलीय!." क्षणभर विश्वनाथचा मेंदू स्तब्ध झाला. हजारो मुंग्या चालून गेल्याचा भास त्याला झाला. एकदम सगळं अवसान गळाल्याने त्याने भिंतीचा आधार घेतला.
"कसं शक्य आहे ? हे शक्य नाही ?"
" खरंय हे, भयानक असलं, तरी खरं आहे ! "
' कुवरांशी तिचं झालेलं लग्न , तिथंपर्यँत सगळं काही चांगलं होतं. मोहनची बाधा लक्षात आली, तेव्हापासून हिच्या डोक्यात चक्र सुरू झालीत. हवेली, सगळी मालमत्ता , सगळी वतनदारी एकहाती घश्यात घालण्याचा डाव आहे तिचा ! मोहनच्या बाधेचा तिने पूर्ण वापर केला. इतर लोकांना हवेलीपासून सोयीस्कर अंतरावर ठेवलं. वेळोवेळी हेवलीचे नोकरवर्ग बदलले जायचे. ज्याला संशय आला त्याचा अत्यंत निर्घृणतेने , कुणालाही कळणार नाही, असा जीव घेतला. मोठे सरकार म्हणून अंतर ठेवून होते. त्या दिवशी मी हवेलीत काही कामानिमित्त गेले होते. मोठे सरकार आणि मालिनी त्यांच्या खोलीत होते. सरकार हतबलतेने तिच्या समोर उभे होते. त्यांना काहीही करता येत नव्हतं.
क्रमश....
लेखन : अनुराग वैद्य