महालगड भाग 21
ठाऊक आहे मला. तू इथेच आहेस. आपल्याला एकमेकांपासून भीती नाहीये. उलट तू सुटशील. तुझ्या मुक्तीचा मार्ग फक्त माझ्याकडेच आहे." त्याचं बोलणं संपत नाही, तोच काहीतरी खूप वजनदार असं त्याच्या अंगाला धडकलं. त्याने तोल सांभाळायचा प्रयत्न केला, पण तो शेवटी नंदीच्या खाली आलाच. कुणीतरी अदृश्य होतं. विश्वनाथने आपली पिशवी घट्ट पाठीला बांधली.
"अश्याने काहीही नाही होणार. तुझ्यामुळे सुरू झालेलं हे सगळं, आता एक विकृती बनून राहिलं आहे. निष्पाप लोकांचे हकनाक बळी जातायत. सुडाची गणितं वाढत चाललीये. समोर ये...!" वारा घोंगावू लागला. विश्वनाथच्या समोर वाऱ्याची एक भवरी तयार झाली. अत्यंत संथ गतीने ती फिरत होती.
" किती दिवस हे सगळं चालायचं ?" गोल घुमत्या वाऱ्याकडे पाहून विश्वनाथ म्हणाला.
"माहीत नाही ?" वाऱ्यातून आवाज येऊ लागला. स्त्रीचा आहे की पुरुषाचा, हे नीट कळलं देखील नाही.
" तू दिलेल्या शापाचं काय झालंय, तुला ते तरी माहीत असेल ना ?"
गेली कित्येक वर्ष तारा याच जंगलात भटकत होती. तिच्या सारखे असंख्य आत्मे या जंगलात होते. ते त्या ठिकाणच्या भौगोलिकते मुळे. पाच टेकड्यांच्या मध्ये वसलेलं हे निर्मनुष्य ठिकाण, एखाद्या अनोलखी बेटासारखं होतं. देवाचा वास असतो, तसा इथे असुरांचा वास होता. एखादं गाव किंवा वस्तीसारखं काहीसं होतं.
आपल्या ओंजळीत आणलेली तारेच्या घरची माती विश्वनाथाने उघडली. तसा तो घुमणारा वारा शांत होऊ लागला. आपल्या घरची आठवण तिला सापडली असावी.
" दुःखाच्या अतिउच्च आवेगात तू बोलून गेलीस. त्याने त्यांच्या पूर्ण कुळाचा नाश ओढवला. कित्येक वर्ष झाली याला."
"मी, माझं पोरं, माझा नवरा, माझं घर...? त्याचं काहीच नाही का ? आमच्या चितांना आग द्यायला सुदीक कुनी उरलं न्हाई !"
"कळतंय मला ! पण तू त्यांच्या पुढच्या प्रत्येक पिढीला नष्ट करते आहेस. हे निसर्गाच्या आणि माणुसकीच्याही विरोधात आहे. कित्येक वर्ष तिथे फक्त मृत्यू आणि भय आहे. अनेको जीव गेलेत ! त्यांचं पण घर होतं, स्वप्न होती, संसार त्यांचेही होतेच तारा." न दिसणाऱ्या ताराची समजूत काढणं अवघड होतं.
" माझं पोर होत पोटात...! ते जन्माला यायच्या आधीच...!" ती भवरी पुन्हा वेग धरू लागली. कदाचित आता शांत होत असलेल्या जखमा पुन्हा हिरव्या होऊ लागल्या होत्या.
" त्याला का अडवून धरलं आहेस ? त्याने तर मनुष्यजन्म पहिला देखील नाहीये. जन्म घेतला नाहीये त्याने. तुझा प्रतिशोध त्याच्या मुक्तीवर उठला आहे तारा. भीष्मांचे भाऊ देखील मानव जन्म घेऊन त्यांच्या पापकर्माचे भोग भोगण्यास आले होते. पण काही क्षण भूतलावर राहून गंगेने त्यांना देखील मोकळं केलं. तू आणि मी खूप सामान्य आहोत. "
ती काहीच बोलली नाही.
" तू दिलेल्या शापानी त्यांचं आणि इतरांचं जगणं नरकापेक्षा जास्त केविलवाणं झालं आहे. त्यांचा दोष इतकाच, की त्यांनी त्या कुळात जन्म घेतला आहे ? "
" हो.!"
" नाही, तुझा अपराधी शिक्षा भोगतोय. पण तो ते करताना असंख्य शापित जीव तयार करतो आहे, जे हवेलीच्या जिवावर उठले आहेत.हे सगळं सांगण्यासाठी मी इथे जीवावर उदार होऊन आलोय. माझा काहीही संबंध नसताना, फक्त त्या एका निष्पाप मुलीसाठी !"
क्षणभर तिथे शांतात पसरली. तारा विचार करू लागली.
" तारा, तुझं बाळ मनुष्ययोनीत अडकून राहिलं आहे. त्यामुळे तू देखील अडकून राहिली आहेस. त्या बाळाला दुसरा जन्म घेणं कठीण झालं आहे. त्याचा आत्मा काय म्हणत असेल ? या भयानक जंगलात तू त्याला किती वर्ष अशीच कवटाळून बसणार आहेस....!" विश्वनाथचे डोळे पाण्याने डबडबले.
"आई आहेस न तू...? जाऊदे त्याला."
चेहऱ्यावर एक आत्मविश्वास घेऊन विश्वनाथने जंगलाच्या बाहेर पाऊल टाकलं. सोबत आणलेली माती त्याने त्या भवरीत टाकून दिली. पहाटे तो हवेलीच्या दारापाशी येऊन उभा राहिला. ताराच्या परिवाराचे आणि अर्भकाचे विधिवत श्राद्ध झालं. काकू देखील हजर होती. तारेच्या घराच्या अवशेषांत हे सगळं पार पडलं. तिघांनी आपली यात्रा संपवली. शांता , तारा आणि तिच्या बाळाची या भूमीवरून सुटका झाली. एकमेकांत गुंतलेले आत्मे मुक्त होऊन परमेश्वरात विलीन झाले. न विसरता काकूने एक कारागिराकडून तिघांची एक छोटी मूर्ती घडवून घेतली. एकाच पाषाणातून !
विधी झाल्यावर डोळे टिपत काकू हवेलीकडे परत येऊ लागली.
" आता धोका वाढलाय...!" शेजारून चालत असलेला विश्वनाथ एकदम बोलला. " आजपर्यँत त्याला ध्येय होतं. तो शापात अडकलेला होता. आता तो मुक्त आहे. स्वतंत्र आहे. जपायला हवं...!"
ताराचा पूर्ण परिवार मुक्त झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. लोकांनी मनोमन हवेलीचे आभार मानले. गावावर असलेली एक शोककळा ओसरत आली. खरे कारण कळल्याने बराच गैरसमज दूर झाला. जुनी-जाणती माणसं हेवलीच्या बाहेर येऊन उभी राहिली.
आरशासमोर उभ्या असलेल्या काकूच्या चेहऱ्यावर आज एक वेगळा आत्मविश्वास होता. आज डोक्यावरचा पदर त्यांनी कमरेला खोचला होता. कुवरांच्या कपाटातून कट्यार बाहेर आली. चामडी पट्टा त्यांच्या कमरेभवती वेढा मारून बसला. धार लावून ठेवलेली वडिलोपार्जित तलवार देखील म्यानेतून बाहेर येऊन हवा खाऊ लागली.
"तो शस्त्राने मरेल असं वाटतं तुम्हाला सरकार !" विश्वनाथ दाराशी उभा होता.
" त्याचा नायनाट करायला तुम्ही आहात. मला फक्त ती पोर हवी आहे. जिवंत...!" काकूच्या शब्दांना धार होती.
"अजून राहिली असेल का ती ?"
"हो...!" इतक्या आत्मविश्वासाने काकू बोलत होती. विश्वनाथ देखील क्षणभर गोंधळला.
सकाळ आज कधी नव्हे ती फुलली होती. पहाटे उठून काकूने देवपूजा केली आणि सगळी दारं-खिडक्या उघडल्या होत्या. सूर्यप्रकाश जास्तीत जास्त हेवलीच्या आवारात यावा म्हणून.त्यांनी आज मनाशी काहीतरी ठरवलं होतं. त्या शस्त्रबद्ध झाल्या होत्या. विश्वनाथास देखील शास्त्रशुद्ध होण्यास सांगितलं गेलं होतं.
"आम्ही एक महत्वाची कामगिरी करण्यास जातो आहोत. परत आलो, तर सगळं काही सुरळीत झालेलं असेल. तुमच्या घरी आम्ही निरोप पाठवला आहे. वृंदाचे बाबा तुम्हाला न्यायला येतील. काहीही धोका होणार नाही, याची शाश्वती आम्ही देत नाही. न होवो, हेच देवाकडे साकडं." काकू ने एक दुसरी कट्यार वृंदाच्या आईकडे दिली. त्यांनाही काही सुचले नाहीच.
"तिला काहीही होणार नाही." आपला हात त्यांनी तिच्या कोमेजलेल्या चेहऱ्यावर फिरवला. डोळे भरून आले.
"सरकार, मनात काय आहे ते तरी सांगा. अविचाराने जीव धोक्यात येऊ शकतो."
काकू आणि विश्वनाथ बाहेर आले.
"अजूनही वाटतं तुम्हाला, आपला जीव धोक्यात नाहीये ?" काकू संथ पाऊलानी खाली उतरत होत्या.
"आम्ही तेव्हाच ठरवलं. आता एकही जीव जाऊ द्यायचा नाही. आमचा गेला तरी चालेल."
दिवाणखान्यात येऊन दोघं भुयाराच्या दारापाशी येऊन उभे राहिले. विश्वनाथने कुलुपाला बांधलेलं कवच काढलं. मोठ्या कष्टाने दार ताड-ताड आवाज करत उघडलं. आत अंधार होता. दर्प पसरू लागला. काकू आणि विश्वनाथ आत जाऊ लागले. अजूनही त्याला नीट काहीच कळत नव्हतं. पण आज काहीतरी अघटित घडू नये, म्हणून त्यांचे मनोमन जप सुरू होतेच. आत प्रचंड गारठा होता. भिंतीला लावलेली मशाल पेटली. काकू ने तलवार उपसली नव्हतीच. त्यांची पाऊले देखील वाजत नव्हती. मशालीत फक्त खालची एक पायरी दिसत होती.
किल्ल्यातून हवेलीत आणि हेवलीतुन किल्ल्याकडे जाण्यासाठी असलेलं हे भुयार खचू लागलं होतं. एक वेळी दोन माणसं शेजारी-शेजारी चालू शकतील, एवढाच रस्ता होता. मशालीशिवाय आत प्रवेश नव्हताच. ज्याला माहिती नाही, अश्यासाठी हे साक्षात मृत्यूदार होतं. साधारण सात फूट उंची असावी. बाहेरून हवा येणास फक्त दार होतं. दुसरं दार किल्यात उघडत होतं. साधारण तीन तास लागायचे तिकडचा दरवाजा उघडण्यास. पायऱ्या संपल्या, जमीन लागली. काकूने श्वास रोखून धरले. आता मात्र विश्वनाथला घाम फुटू लागला. त्याचा श्वासही कोंडला गेला. मैदान लागलं. काकूने तलवारीची पकड धरली. आपल्या पिशवीत आणलेला सुरा विश्वानाथने बाहेर काढला. त्या ओट्यावर काकूची नजर खिळली.
साखळदंडात मोहन त्या ओट्यावर पडून होता. विश्वनाथचं उरलं-सुरलं अवसान देखील गळून पडलं. त्याला अत्यंत गार घाम फुटला. मोहन या अवस्थेत इथे असणं म्हणजे हजारो प्रश्नांना वाट फुटल्या. दोन बैलांना पुरतील एवढी जाड साखळी त्याच्या हाता-पायाला आणि कमरेभवती गुंडाळली होती. थोडी देखील हालचाल त्याला करता येत नव्हती.
"सरकार...?" विश्वनाथने काकुकडे पाहिलं.
" होय...! मीच केलं हे !"
" पण....?"
"गरज होती त्याची. त्या पोरीला वाचवण्यासाठी."
दोघही पुढे सरकू लागले. मोठ्या हिमतीने विश्वनाथाने काकूच्या हातातील मशाल घेतली. ती त्याच्या जवळ धरली. अमावास्येला अजून चार दिवस शिल्लक होते. मोहनचे हात कोपरापर्यँत सोलले गेले होते. ओठाच्या कोऱ्यातून सुळे बाहेर येऊ लागले होते. डोळे नीटसे दिसत नव्हते. पण त्यांचा आकार मात्र वाढला होता. शरीराचा देखील भार वाढला होता. हाता-पायची नखं बाहेर येऊन आकार घेऊ लागली होती.
"मुलगा न मी तुमचा...?" त्याला बघत असताना मोहन एकदम ओरडला. हा त्याचा आवाज नव्हताच. कुणीतरी आतून बोलत होतं. आवाज त्या तळघराच्या भिंतीला धडकून सर्वत्र घुमला.
काकू पुढे आली.
"तू नाहीस...! तू नाहीयेस माझा मुलगा. तू राक्षस आहेस. कित्येक वर्षांपासून आमच्या जीवावर उठलेला राक्षस आहेस तू !"
त्याच्यात बदल होत होता. म्हणून तो क्षीण झाला होता. त्याला या स्थितीत कुणीही आजवर पाहिलं नव्हतं. एकाच शरीराच्या कातडीत दोन शरीराचा भार बसत होता. एकाच हृदयातुन रक्त शुद्ध होत होतं, दुसऱ्या क्षणी त्याचा रंग काळा पडत होता. शरीर शांत, विचारी, अबोल माणसाचं होतं. त्याचा ताबा मात्र कित्येक वर्षांपासून एका शापाचे पालन करणाऱ्या असुराचा होता. मन बालपणीपासून मायेला मुकलेल्या एक निरागस बालकाचे होते. काळीज मात्र एक अश्या नराधमाचे होते, ज्याला माणसाच्या जगण्या-मरण्याशी काहीही संबंध नव्हता. दृष्टी होती स्त्रीला मान देऊन तिच्या पाऊलावर नजर रोखणाऱ्याची. नजर मात्र होती एका अश्या नरराक्षसाची, ज्याने आजवर कित्येक स्त्रियांच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडले होते. त्या भुयारात आजही त्यांच्या शेवटच्या किंकाळ्या घुमत होत्या. खाली पडलेले सांगाडे अजूनही भीतीने थंड पडून होते. काहींचे हात, काहींचे पाय, तर काहींच्या माना मोडल्या होत्या. काही सांगाड्यांच्या कमरेखालची हाडं तुटून त्यांचा भुगा बाजूलाच पडला होता.
"तुला इथे नसतं आणलं, तर या गावाचं नाव सांगायला देखील कुणी उरलं नसतं."
"तुम्हाला नसतं काही केलं. तुम्हीच पोसला हा देह. मला झेपण्याचे सामर्थ्य याला तुम्ही दिलं." तो आता बोलू लागला होता.
"चूक झाली आमची. आमच्या पोटी जन्मला असता, तर आम्ही केव्हाच...!"
काकूने मशाल हाती घेऊन त्याच्या चेहऱ्याकडे अलगद नेली. तो बदलत होता. आगीने त्याला थोडा दाह झाला.
"आम्ही त्या मुलीला घ्यायला किल्ल्याकडे जातो आहोत. आणि राहिला प्रश्न तुझा ! तू या मातीसाठी एक अभिशाप आहेस. तुला नष्ट करताना माझी कूस जरी जळाली, तरी चालेल." काकू विश्वनाथकडे वळल्या.
" या मार्गाने सरळ आत जायचं. हवेचा दाब तुम्हाला रस्ता सुचवेल. इथून कितीही , कशाचेही आवाज आले, तरी परत फिरू नका. हा कैद आहे, आणि याला काहीही करता येणार नाही. " विश्वनाथचा संकोच झाला. त्याने क्षणभर बांधलेल्या मोहनकडे पाहिले. तो अत्यंत भयानक दिसत होता. विश्वनाथच्या छातीत त्याला पाहून एकदम चर्रर्र झालं. तरीही तो निघाला. जाताना बाजूच्या भिंतीला लावलेली मशाल पेटवून गेला.
इथून पुढचा रस्ता अत्यंत कठीण होता. उर्वरित जगाशी तसाही संपर्क तुटल्यात जमा होता. त्या ओट्याच्या डाव्या बाजूने एक मोठं लोखंडी दार होतं. त्याच्या कड्या काढणं मोठं दिव्य होतं. सहसा ते हवेलीच्या बाजूने लागत नसत. भुयाराकडून किल्ल्याकडे निघालं, की हे दार तिकडून लावण्यात यायचं जे सोपं होतं. विश्वनाथ आत जाऊ लागला. थंड हवेच्या दिशेने त्याला जायचं होतं. मांडणी तशी होती. खालची फरशी संपून आता माती लागली होती. जागेजागी हाडांचे सांगाडे होतेच सोबतीला. काहींच्या अंगावर दागिनेही तसेच होते. दुर्गंधीने जीव कासावीस होत होता. समोर फक्त अंधार होता.
काही अंतर चालल्यानंतर विश्वनाथास कसलासा आवाज येऊ लागला. तो आवाज मागून येत होता. त्याने नीट कानोसा घ्यायला सुरुवात केली.
तो काकूच्या ओरडण्याचा आवाज होता.
आवाज वाढू लागला. तो विश्वनाथाच्या मागे येत असल्याचा भास झाला.
"विश्वनाथ...!"
क्षणभर तो थांबला.
"हा सुटलाय...!" आणि नंतर काकूच्या आर्त किंकाळ्या...!
त्याची पाऊलं थबकली. विचार केला त्याने. जावं परत !
' काकुवर खरंच काही संकट तर नसेल न ओढवलं ? तो खरंच सुटला तर नसेल न..? जर असं असेल, ते काकूंचं...'
"सरकार....!" तो आतून जोरात ओरडला. आणि त्याने मागे पाहिलं. अगदी श्वासाच्या अंतरावर तो येऊन उभा राहिला होता. अजूनही, अर्धा मानव, अर्धा पिशाच्च ! डोळे पूर्ण लाल झालेले. अंगावरचा अंगरखा फाटत आलेला. पूर्ण विकसित झालेल्या सुळ्याना त्याच्याच ओठांचे रक्त लागलेले होते. मशालीच्या उजेडात हे सगळं स्पष्ट दिसत होतं. त्याचे हात सुजलेले होते. एक शाबूत आणि धडधाकट शरीर, दुसरा, एक नरराक्षस ! दोघांच्या अभद्र संगाने त्याच्या अंगातला रक्त प्रवाह दुप्पटीने वाढला. शरीराची अवयवं सुजत होती. हे सगळं विश्वनाथ आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पहात होता. त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला.
खाली पडल्यावर सावरण्यासाठी त्याने मान वळवली. त्याला दुसरा धक्का बसला. तो कुठेही नव्हता. हातातील मशाल केव्हाच पडली होती. तिची शेवटची फडफड सुरू होती. विश्वनाथने ती उचलली, पण सगळं व्यर्थ गेलं. नजरेचा खेळ होता सगळा. मनात भीती घालण्याचा प्रयत्न होता तो. मनातील साहस निष्क्रिय झालं, की शारीरिक क्षमता संपण्यास वेळ लागत नाही. उरली-सुरली सहनशक्ती घेऊन विश्वनाथ पळत सुटला.
एका मोठ्या दगडावर काकू शांत बसून होत्या. त्याच्याकडे पाहून आता दया यायला लागली होती. यात मोहनचा काहीही दोष नव्हता. तो खूप लहान असल्यापासून त्याच्या अधिकाराखाली होता. काकूंचाही नाईलाज होता. त्याचं आईत्व तिने पत्करलं होतं.
" दगा दिलास तू मला..!" तो साखळदंडातुन बोलू लागला.
" तसं म्हण हवं तर ! दगा म्हणजे हेच न, तू गाफील असताना तुला जेरबंद केलं आणि इथे आणलं ? ती मुलगी कुठे आहे ?"
" सोडून दे मला. नाहीतर तुला खूप-खूप पश्चताप होईल. कदाचित जीव वाचेल तुझा...!
काकू काहीच बोलली नाही.
एकदम डावीकडच्या बाजूने दारं वाजण्याच्या आवाज येऊ लागला. कुणीतरी खूप घाबरलेलं होतं.
'सरकार, दार उघडा सरकार...!"
"विश्वनाथ...!" काकुला धक्काच बसला.
"सरकार, त्याने घात केलाय आपला. तो मिथ्य आहे. खोटा आहे तो...! दार उघडा सरकार, वाचवा मला....! सरकार..!" एकदम त्याचा आवाज बंद झाला.
आतामात्र काकुला दरदरून घाम फुटला. त्यांनी उजव्या कटाक्षाने बाधित झालेल्या मोहनकडे पाहिले. तलवार उपसून त्या मोठ्या हिमतीने दाराकडे चालत निघाल्या.
" जा...बघा, तो आहे का ? शेवटचे काही श्वास सुरू असतील, ते क्षमा मागा त्याची. त्याचा जीव धोक्यात घातला तुम्ही...?" काकूने लोखंडी कडी आत लोटली. हळू-हळू दोन्ही दारं आत जाऊ लागली. अर्धं दार उघडलं आणि एकदम विश्वनाथचं प्रेत त्यांच्या अंगावर पडलं. त्या जोरात किंचाळल्या आणि मागे सरकल्या.
कमरेपासून विलग होऊन विश्वनाथच्या शरीराचा वरचा भाग तिथे जमिनीवर कोसळला. काकू जोर-जोरात किंचाळू लागल्या. या गडबडीत त्यांच्या हातून मशाल फेकली गेली आणि तलवार खाली पडली.
" गेला...हा ही गेला ! याच्या बापासारखा सडून नाही, तर शौर्याचे मरण मेला." काकू अजूनही त्याच्याकडे पहात होती.
" आता ? " तो स्मितपणे हसू लागला. त्याच्यातील राक्षसी प्रवृत्तीचा काकुला हा पहिला प्रत्यय होता. पहिलाच अत्यंत भयानक होता.
"विश्वनाथ...!" काकू भेदरलेल्या अवस्थेत त्याला बोलावू लागल्या. त्याच्यात थोडा जीव असल्याची आस त्यांना अजूनही होती.
"सरकार...!" अंधारात त्यांना तो दिसला नाही. एक धडाला त्यांचा पाय लागला आणि त्या जमिनीवर पडल्या. विश्वनाथचं शरीर होतं ते ! मानेचा अंदाज घेऊन त्या त्याचं डोकं चाचपडू लागल्या. मानेला हात लागताच, मान हातात आली...!"
बाधित झालेला मोहन जोर-जोरात हसू लागला.
"सरकार...! तुम्हाला काय वाटलं, हे साखळदंड मला रोखतील ? ज्यांना शरीर आहे, हे त्यांच्यासाठी ! मी सैतान आहे." अधिच या प्रकाराने सगळी शुद्ध हरवलेल्या काकू अजून जास्त घाबरल्या. त्या चावताळल्या. उठून सैरा-वैरा धावून आपले शस्त्र शोधू लागल्या. खाली पडलेली मशाल त्यांच्या पायाच्या धक्क्याने विश्वनाथच्या प्रेतापाशी येऊन थेंबल्याने त्याच्या प्रेताने पेट घेतला. अर्धवट कापले गेलेले प्रेत जळू लागले.
" हा विश्वनाथ नाहीये...!" काकूने एकदम घाम फुटला. " तो मरू नाही शकत. असा तर नाहीच नाही." काकू एकदम शुद्धीवर आल्या. पायाला लागलेली तलवार त्यांनी उचलली. पेटलेल्या विश्वनाथच्या प्रेतावर त्यांनी वार केला. नंतर मशाल जवळ नेली. प्रेतातुन रक्ताचा एकही थेंब बाहेर आला नाही.
" हा नाहीये विश्वनाथ...!"
बाधित मोहन पुन्हा जोरात हसला.
" अजून खूप काही आहे बघण्यासारखं !" काकू जमिनीवर शांत बसल्या.
" मनाचे खेळ खेळतोयस ना ? खेळ ! मी भीक नाही घालत आता तुला ." काकूने तलवार उचलली आणि फिरवली. मानेपासून तीन बोटं तलवार थांबली.
" मारा...! करा मला मुक्त. सोबत यालाही करा..! " आणि तो पुन्हा जोरात हसू लागला. हतबल काकू तिथेच तलवार धरून बसल्या.
क्रमश...
लेखन :अनुराग वैद्य