महालगड भाग 20
"अंधार होताच त्यातून निघणाऱ्या ज्वाला पराक्रमी असतील." एक-एक कापड मशालीला गुंडाळत विश्वनाथ म्हणाला. काकू देखील त्याला मदत करू लागली. सूर्य, आभाळ, जमीन याच्या एकत्रित समिकरणाने तयार झालेलं मीठ हेवलीला घेरून टाकण्यात आलं. "पंचतत्वाच्या सहाय्याने तयार झालेलं हे अलोण आहे. प्रत्यक्ष आणि शुद्ध." एक बादलीत अष्टगंध ओतलं गेलं. विश्वनाथ ने दिवाणखान्याच्या तीन भिंती त्याने अर्धवट रंगवल्या. अष्टगंधाचा घमघमाट सुटला. काकूलाही बऱ्याच दिवसांनी अंगात चैतन्य निर्माण झाल्यासारखं वाटलं.
"मी येई पर्यंत कुणीही देवघर सोडायचं नाही." विश्वनाथाने दोघींना ताकीद दिली. वृंदाच्या पलंगाच्या पायांना त्याने एका दोरीने बांधून ठेवलं. तिच्या खोलीत त्याने खाली केला, तो कोणताच विधी केला नाही.
"तुम्ही...?" आईने घाबरून प्रश्न केलाच.
" मला बाहेर जावं लागेल. परवा सकाळी मी परत येईन.पण एक गोष्ट खात्रीने सांगू शकतो. अजून त्याची अंतिम वेळ आली नाहीये.आणि तो वृंदाला इथे काहीही करू शकणार नाहीये...!"
संध्याकाळी मशाली लागल्या, तसा विश्वनाथ स्वतःसोबत बाहेर सोडलेला एक बैल घेऊन चालता झाला. देवघरात बऱ्याच दिवसांनी दिवा लागला.
सूर्यास्त झाला होता. अंधार हळू-हळू आपलं आवरण विस्तारत दिशा ग्रासत होता. नंदी सोबत असल्याने विश्वनाथ निर्धास्त होता. आपण एकटं नाही, हे त्याला माहित होतं. पण नंदीसोबतही कुणीतरी आपल्यावर पाळत ठेवतय, हे ही तो जाणून होता. गाव मागे राहिला होता. एका आड रस्त्याने तो चालू लागला. जेमतेम एखादी बैलगाडी जाईल, इतकाच रस्ता होता. विश्वनाथाच्या हातात त्याचा बाबांनी दिलेली माळ होती. पिण्यास पाणी होते. हा प्रवास त्याने कधीच केला नव्हता. पण बाबांनी केला होता. रस्त्याचं ज्ञान त्याला होतं , ओण आजवर इथे जाण्याचा प्रसंग कधी आला नाही. रस्त्याच्या दतर्फा असलेल्या घनदाट झाडी होती. माणसाचाच काय, चुकलेल्या जनावरांचा देखील इथे वावर नसायचा. जंगली श्वापदं देखील इकडे फिरकत नसत. नंदीच्या गळ्यात घुंगरू होते. त्याचं लक्ष तिकडे होतं. मन रमत होतं. ते काटेरी रान तुडवत दोन जीव अत्यंत सावध रित्या पूढे सरकत होते. हवा देखील शांत, थंड आणि आनंदी होती. सुमारे पाच-सहा कोस चालून विश्वनाथ थांबला.
"नंदिका, आता इथून पुढे तुझ्यावर सगळी भिस्त !" दगडही घाबरले असते, इतक्या भयानक जागेवर ते उभे राहिले. काटेरी झुडूपं असलेलं रान संपून, आता मोठ-मोठाली वडाची वृक्ष असलेली घनदाट झाडी समोर होती. वडाच्या पारंब्या असुरांच्या पसरलेल्या जटा पसराव्यात तश्या पसरल्या होत्या. वाट दाखवायला चंद्राचा उजेड ही नव्हता. समोर फक्त काळा अंधार पसरला होता. विश्वनाथने बैलाच्या गळ्यातील घुंगरू काढून आपल्या पिशवीत नीट बांधून ठेवले. त्याचा आवाज न व्हावा म्हणून.
" त्या जंगलात फक्त झाडं असल्याचा समज आहे काही लोकांचा ! त्यातील काही झाडं म्हणजे भूतं आहेत ! तिथे माणसाच्या पावलांची चाहूल जरी लागली, तरी मृत्यू अटळ आहे."
'गायीवर स्वार होऊ शकत नाही. नंदी महादेवाचे वाहन.' हे गणितदेखील बाबांनीच विश्वनाथास सांगून ठेवले होते. तिथे असलेली शांतता बोलकी होती. इथे एक नाही, अनेकजण आपल्या पाठीशी असल्याचा भास होतो. ही जागा जितकी पवित्र आहे, तितकीच भयानक आहे. पात्रता नसल्याशिवाय आत गेलं, की मृत्यूला देखील लाज वाटेल, असा मृत्यू येईल !" हे वाक्य आठवलं आणि क्षणभर विश्वनाथ थबकला.
'जावे का आत ?' त्याचे मन त्याला विचारू लागले. 'आहे का आपली तेवढी पात्रता ? बाबा आत जाऊन आले आहेत.पण आपण...?'
काही वेळ तिथेच थांबून त्याने नंदीस पुढे जाण्यासाठी थाप मारली. इथे अतिशय उग्र दर्प होता. त्याने आपल्या आणि नंदीच्या नाकाभवती एक सुती आवरण गुंडाळले. हा वास खचित प्रेतांचाच असावा ! चुकून इथे येणं शक्य नाहीच, पण जे कुणी आले आहेत, त्यांचीच ही...! श्वास देखील खूप मोजून घेणे भाग होते. झाडांवर बसून असलेल्या त्या आत्म्यांना आपला सुगावा लागला तर ? नंदीचे श्वास मात्र निर्धास्त चालत होते. त्या निष्पाप जीवाला कसली आली भीती, मृत्यूनंतरचे भयावह जग हे फक्त मानवाला भयभीत करू शकतं. प्राण्यांच्या विश्वात एक भोळं-भाबडं जगणं आणि पंचतत्वात विलीन होणं असतं. मनात, कर्मात पाप असलेल्या मानवाची इतक्या सहज इहलोकातून सुटका नसते.
झाडांच्या फांद्या सळसळत होत्या. विश्वनाथाच्या कानात एक तार स्वर येऊ लागला. एखादी धातूची बारीक नळी फुंकल्याचा तो सूर होता. त्याने त्याचे भान हरवू लागलं. त्याचा मेंदू आजाणतेने त्या स्वराकडे ओढला जाऊ लागला. तो स्वर हळू-हळू बदलू लागला. कानाच्या अचानक जवळ येऊ लागला. विश्वनाथास अस्वस्थ वाटू लागले. त्याला घामही येऊ लागला. तो आवाज कर्कश्य नव्हता, पण त्याने कानाचे पडदे मात्र कंपित होत होते. नंदीच्या वेगावरून त्याला तो आवाज ऐकू येत नसावा, असा कयास त्याने बांधला. त्याच्या कानातून आता रक्त येण्यास सुरुवात झाली होती. हृदयाचे ठोके वाढत होते. मनावरचा ताबा सुटत चालला होता. बुद्धी ताल सोडत होती. अश्यात त्याने पिशवीत हात घातला आणि घुंगरू बाहेर काढले. त्याच्या नादाने त्याला थोडं बरं वाटलं.
'तिथे माणसाला विचलित करणाऱ्या अनेक घटना घडतात. इंद्रियातून थेट मनात आणि शरीरात खोलवर आघात करणारे काही तत्व तिथे आहेत. असे तत्व कार्यरत झाले, की माणूस आपल्या भयाच्या अधीन होऊन काही कृत्य करतो, ज्याने त्याच्या हालचाली होतात. एकदा त्यांनी त्या हालचाली ओळखल्या, की तो आयताच त्यांच्या तावडीत सापडतो. बऱ्याचदा काहीही शारीरिक इजा न होता देखील माणसं तिथे दगावतात, ते भीतीनेच. इंद्रियांची सहन-शक्ती सप्लिझ की माणूस हतबल होतो. त्याचा विवेक आणि विचार करण्याची शक्ती संपते. त्याच्या अंगी असलेले धैर्य संपत जाते आणि तो त्या भीतीस शरण जातो !'
बाबांनी दिलेलं हे ज्ञान आज विश्वनाथचा जीव वाचवू शकलं. घुंगराच्या आवाजाने त्याला थोडा धीर आला. आपण कुठे आणि कशासाठी जात आहोत, हे त्याच्या लक्षात आलं. त्याच्यातील धैर्य अजून जागृत होतं.
......
रात्रीतून काहीही अघटित घडलं नाही. स्वच्छ सूर्यप्रकाश हवेलीच्या अंगणात बागडू लागला. आईने पडदा बाजूला केला. वृंदा शांत पडलेली होती. रात्रीतून काही मशाली विझल्या, तिथे भिंतीवर काळे डाग पडलेले काकुला दिसले. त्यावर उमटलेले माणसाचे पंजे पाहून त्यांनी रात्रीचा अंदाज बांधला. त्यांनी रात्री बाहेर येऊन त्रास देण्याचा प्रयत्न केला असावा. पण सर्वत्र पसरलेल्या त्या ज्वालेने त्यांच्या असुरी मनसुब्यांना बांधून ठेवले होते. मनोमन काकूने विश्वनाथाचे आभार मानले. तो सुखरूप परत यावा म्हणून त्यांनी देवाजवळ दिवा लावला.
घाई-घाईत यमाबाई वर आली. काकू वृंदाच्या खोलीकडे वळल्या होत्या. एकदम यमाबाईच्या चाहुलीने थांबल्या.
"रानातली माणसं आलीये काही."
रानातून काही माणसं आली होती. प्रत्येकाच्या हातात काठ्या, भाले, कोयते होते. चेहरे त्रासलेले आणि संतापाने रंगलेले होते. "काय झालंय ?" काकूने चाचरत विचारलं. एक माणूस पुढे आला.
"सरकार, हे कुठवर चालायचं असं ?" काकूने मान खाली घातली.
" अण्णाची सोळा वर्षाची लेक काल वढ्यावर पाणी भराय गेली. आली नाही !" काकुला काय करावं हे काहीच कळलं नाही. तिच्या डोळ्यात पाणी आलं.
" गडी माणसं पाठवली की नाही ?''
" पाठवली ! रात्रभर रानात, माळावर, वढ्यावर माणसं होती."
"किल्ल्यावर..?" काकूची जीभ थरथरली.
काकूच्या तोंडातून हे शब्द ऐकताच गर्दीतून एक म्हातारा पुढे आला. क्षणभर काकुकडे पाहून त्याने एकंच मोठा हंबरडा फोडला. त्याच्या ओरडण्याचा आवाज सगळीकडे घुमू लागला. त्याला धीर देण्याव्यतिरिक्त काकू काहीही करू शकत नव्हती. बाजूला असलेल्या एका ओट्यावर त्या बसल्या.
"सरकार, याचा काहीतरी करा...!" कुणीतरी काकूच्या अगदी जवळ येऊन म्हणलं. " लग्नाला आलेल्या पोरी-बाळी अश्या पळवल्या जाऊ लागल्या, तर लोकांना सहन नाही व्हायचं. आज लोक आपल्या चांगुलपणामुळे शांत आहेत. कदाचित या घराचे खूप उपकार आहेत या सगळ्या गरिबांवर ! पण फार काळ लोकांना तग नाही धरता यायचा.
प्रजेच्या रूपानं खुद्द भगवंत बोलत असतो. या सगळ्याचा अंत होईपर्यँत किती जणांना अजून बळी जावं लागणार आहे, हे देवालाच ठाऊक. हवेलीत तो येऊ शकणार नव्हता. तूर्तास त्याने गावात आपली दहशत पसरवण्यास सुरवात केली. ठाऊक असूनदेखील काहीही न करू शकण्याइतपत काकूंची हतबलता वाढली होती. गारद झालेल्या त्या मुलीच्या खुशालीसाठी तिने सुतकात देखील देव पाण्यात ठेवले.
दीड तासाहून अधिक काळ लोटला होता. विश्वनाथचं श्वास कोंडू लागला होता. घसा कोरडा पडला होता. वडाच्या परंब्यानी त्याला पुरता जखडून ठेवला होता. मान सोडली, तर इतर सगळेच अवयव बांधले गेके होते. नंदी खाली उभा होता. पहाटे झालेली चूक त्याला नडली होती. डोळा लागू नये, म्हणून त्याने डोळे धुतले. चुकून एक वडाच्या मुळावर त्याच्या त्वचेला शिवून पाणी सांडलं. मनुष्याचा सुगावा लागताच झाड हरकतीत आलं. सरसर करत पारंब्या खाली आल्या. अलगद त्यास उचलून त्याच्या भवती पाश आवळत त्याला वर घेऊन हवेत टांगून ठेवलं. अचानक झालेल्या या हालचालीने विश्वनाथला देखील काही करता आलं नाही. पण तो शांत होता. त्या घनदाट जंगलात सूर्याचा प्रकाश खाली मुळापर्यंत पोहोचत नव्हता. सुटकेसाठी होणारी प्रत्येक हालचाल प्राणघातक ठरणारी होती. कोवळ्या उन्हाच्या तारा वर येऊन झाडाच्या शेंड्याला शिवायला हव्या होत्या.
' ही झाडं निसर्गाच्या चक्रातून बाहेर आहेत. जमिनीतल्या पाण्यावर यांचं भागतं. यांच्या असुरी पारंब्या आणि मूळ सर्वात शक्तिशाली आहेत. हातपायाचे कार्य ते करतात. पण जसा-जसा सूर्यप्रकाश यांच्या शेंड्यावर येतो, तसं काही काळ यांची शक्ती क्षीण होते. अश्यात एखाद्याची सुटका होणे आहे.' परंब्यांना लटकलेले मानवी सांगाडे आणि फाटलेले कपडे , आज पर्यंत या झाडाने गिळलेल्या माणसांचा आकडा सांगत होते. काही झाडांवर असलेल्या सांगाड्यावरचे मांस तसंच लटकत होतं. त्या प्रेतांच्या चेहऱ्यावरच्या अतोनात मरणयातना होत्या. मृत्यूच्या भयाने त्यांनी केलेली आरडाओरड ,त्यांचे उघडे पडलेले जबडे पाहून क्षणभर विश्वनाथ विचलित झाला. काही प्रेतांच्या दोन्ही हाता-पायाला वेगळ्या दिशेने खेचून त्यांच्या शरीराचे दोन सारखे समभाग अर्धवट विलग झाले होते. काहींच्या मानेभवती पाश आवळून मारण्याचा प्रयत्न झाला असावा. डोळे बाहेर येऊन त्या जागी आता वाळलेल्या खाचा होत्या. फक्त पोटावर अथवा छातीवर अवळण्याने काहींचे उर्वरित अंग फुटून गेले होते. पृथ्वीतलावर असलेल्या या भयावह जागेची कल्पना सामान्य माणसास नव्हती. इथे येणारी माणसं देखील सामान्य नव्हती. चुकून झालेली एखादी चूक त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरली होती. त्यांचा अश्या प्रकारे ओढवलेला मृत्यू म्हणजे त्यांच्या पापकर्माची फळे देखील होती. एखाद्याच्या सुखी आयुष्यात विष पेरण्यास असुरी शक्तींचा वापर करीत असताना, विधात्याने केलेला न्याय बरोबर होताच. मार्ग असुरी होता.
तहानेने त्याचा जीव व्याकुळ झाला होता. जंगल असलं, तरी वहाता वारा नव्हता. त्यात सगळीकडेच उग्र दर्प होता. पाश घट्ट अंगाशी बांधलेला होता. हालचालीस वाव नव्हता. श्वास सुरू होते, इतकंच खूप होता. शरीरातील त्राण शिल्लकीत अवस्थेत होता. ऊन वर चढत होतं. शेंड्यावर किरणं येताच पाश थोडा सैल झाला. विश्वनाथला हायसं वाटलं. त्याला कुठलीच घाई नव्हती. त्याचा काहिही उपयोग नव्हता. ऊन पूर्ण वर आलं आणि त्याचे हात-पाय मोकळे होऊ लागले. काही क्षणात तो धपकन नंदीच्या शेजारी जमीनीवर पडला. हाता-पायाला गंभीर दुखापत झाली. गुडघे आणि कोपर सोललं गेलं. हाताचे पंजे देखील मुरगळले. पण अश्यातही तो उठला आणि नंदिवर बसला . अत्यंत सावधगिरीने त्याने कातडी पिशवीतून पाणी आपल्या घश्यात ओतलं. ओंजळीने नंदीला पाणी पाजण्यास तो विसरला नाही.
आता थांबून उपयोग नव्हता. सूर्य माथ्यावर आल्याने असुरी शक्ती बऱ्यापैकी क्षीण झालेल्या होत्या. हीच वेळ होती. सूर्य साधारण तासभर तरी प्रखर रहाणार होता. त्याने नंदीला इशारा केला. कास हातात घट्ट धरली. नंदी पळत सुटला. गंभीर दुखापती झाल्या होत्या, पण थांबणं शक्य नव्हतं. मोठ-मोठाले श्वास घेऊन नंदी हवेशी बोलू लागला. सुमारे तीन कोस जाऊन नंदी अचानक थांबला.
विश्वनाथ सावध झाला. आपण ज्याच्या साठी आलो आहोत, ते इथेच कुठेतरी दडून बसल्याचा अंदाज त्याला आला. त्यामुळे नंदीची धाव थांबली. त्याने त्याच्या पिशवीत हात घातला. त्यात आणलेली माती त्याने हातात घेतली. वाऱ्याची एक मोठी झुळुक त्याच्या अंगाच्या आर-पार झाली. तो सावध झाला. ती झुळूक पुन्हा पार झाली. आजूबाजूच्या झाडांची हालचाल होत होती. पण तीच्यात इतका जीव नव्हता. खाली पसरलेल्या पाचोळ्यावरून कुणीतरी चालण्याचा आवाज आला. संथ चालीने कुणीतरी त्याच्या भवती फिरत होतं. विश्वनाथ देखील सावध होताच. त्याने मूठ आवळून धरली. त्याच्या हाताला झटका बसला. कुणीतरी त्याला ओढायचा प्रयत्न करत होतं. पण त्यांची बैठक पक्की होती.
"तुझंच आहे हे. पण समोर येणार असशील तर देईन तुला..?" विश्वनाथ शांत भाषेत बोलला. काहीही हालचाल झाली नाही.
क्रमश...
लेखन :अनुराग वैद्य