महालगड भाग 19
घाटावरून त्यांचं कार्य करून मोहन वर आला. कित्येक वर्षांनी वडील-मुलगा समोर आले. कुवरांच्या जाण्याने मोहन देखील तुटल्यासारखा झाला होता. समोर वडिलांना पाहून तो क्षणभर थांबला. पण आपले वडील एक पळपुटा माणूस आहे, हे लक्षात आल्यावर तो तडक काकूंकडे चालत आला.
"आम्ही थोड्या वेळात येतो. हे गेले की आम्हाला निरोप पाठवा." आणि तो खोलीबाहेर निघून गेला.
"शंका येते मनात म्हणून बोलते...! मोहन तुमचे सोपस्कार करीन की नाही, ठाऊक नाही..."
जड पाऊलानी मोठे शिर्के खोलीच्या बाहेर आले.
" सरकार...!" मागून यमाबाई आली. ते थांबले.
" स्वतःचा जीव प्रत्येकाला प्रिय असतो. त्यांचं काय करायचं आता...?" " जाऊ द्या त्यांना ! आता अजून कुणाचे तळतळाट नकोत." ते पुढे निघून गेले. खाली अंगणात लागलेल्या गाडीत बसताना त्यांना मोहनने पाहिलं. त्याला उगाच भरून आलं. वातळझ जावं, वडिलांना मिठी मारावी. आपलं हरवलेलं बालपण त्यांच्याकडून परत घ्यावं आणि ते जगावं. पण मोठ्या शिरक्यांचा निर्विकार चेहरा पाहून त्याचा विचार बदलला.
'काहीही बदल घडणार नाहीये. कोणताही चमत्कार होणार नाहीये. हे मृत्यूचं घोर असंच मरेपर्यँत सगळ्यांना तीळ-तीळ मारत राहील'. एका चांदीच्या तारेने त्या दिव्याशी खेळत विश्वनाथ आपल्या मुक्कामी विचार करत होता. 'आपण त्याला पाहिलं ! पहिल्यांदा आपण मृत्यू आणि जन्माच्या मध्ये अडकलो. तो अर्ध्य स्वरूपात होता, आणि दिवस होता, म्हणून आपला जीव वाचला. पण यापुढेही दैव इतकं साथ देईल, याची शाश्वती नाहीये.' अंगावर झालेल्या अगणित जखमांमुळे विश्वनाथ थकला होता. वेदना त्याला असाह्य करत होत्या. पण त्याच्याकडे वेळ कमी होता. शोध घेऊन त्याला हे सगळं संपवायचं होतं. पण यावेळी त्याला एक चांगली झोप हवी होती. विचार करत तो तिथेच पालथा पडला.
पौर्णिमेला चाल करून आलेलं अरिष्ट मोठ्या कोशिशीने टळलं होतं. पण त्याने सगळ्यांना भीती घालून ठेवली होती. हेवली आता दिवसादेखील मृत्यूच्या थाट सावलीत उरले-सुरले श्वास मोजू लागली होती. यमाबाई खोलीत चालत आल्या. क्षणभरही डोळा न लागलेल्या आईला त्यांच्या आल्याने धीर आला.
"जाता आलं तर जा इथून...!" बसलेली यमाबाई म्हणाली. "कसं?" आई झोपलेल्या वृंदाला पाहून म्हणाली. याचे काहीही उत्तर यमाबाईकडे नव्हतं. "कसंही. हिच्या वडिलांना तार करा. येतील ते..!"
पण ते शक्य नव्हतं. वृंदाची इतक्या सहजासहजी सुटका नव्हती.
.........
पौर्णिमा उलटून चार दिवस उलटले. एक-एक दिवस अमवास्येकडे झुकत होता. दुःखात असूनही काकुला आता वेगळ्याच भीतीने ग्रासले होते. दर तासाला खिडकीतून बाहेर येणाऱ्या-जाणाऱ्याकडे तिचे लक्ष राहू लागले. मोहन अलिप्त राहू लागला होता. वर येणं-जाणं कमी होतं. हेवलीत चोर पावलांनी भयासोबत एकटेपण आणि नैराश्य चालुन आलं होतं. भिंती आधीपेक्षा जास्त विभत्स आणि कळा गेलेल्या भासू लागल्या होत्या. कुवरांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर नोकर-चाकर फिरकेनसे झाले होते. संपूर्ण हवेलीत काकु, वृंदा आणि तिची आई, एवढेच जीव. दुर्गा आणि यमाबाई त्यांच्या झोपडीत होते. दुर्गास आत यायला सक्त मनाई होती.
दिवसा-ढवळ्या देखील कुठे खट्ट झालं, की मनात धस्स व्हायचं. कापूर, उदबत्ती, धूप लावून उपयोग नव्हता. त्यातून एक वेगळ्या प्रकारचा दर्प पसरत चालला होता. बागेतील तुळस तर पौर्णिमा सुरू होताच कोमेजली होती. इतर झाडांची देखील तीच गत होती. त्यावरची पाखरं कुटुंबाला घेऊन केव्हाच निघून गेली होती. उरली शेवटी काटेरी झाडी तेवढी जगत होती. पौर्णिमा लागली, तशी एक धाडसी नकारात्मकता हेवलीच्या खिडक्यांतुन आत आली. उरलं-सुरलं देवपण देखील पणाला लागलं होतं.
काकू देवघरात आल्या. तिथे देखील धुळीचं साम्राज्य होतं. पडदे, देव्हारा, देव, सगळंच धुळीत माखलेलं होतं. सुतकात असल्याने देवाने पाठ फिरवल्याचा भास काकूंना झाला. आत न जाता त्या दाराशी बसून राहिल्या.
'येणार असेल तर लवकर यावं काळाने ! रोजच्या या तीळ-तीळ मरण्यापेक्षा ते तरी बरं.' काकू मनाशीच पुटपुटल्या.
अचानक वृंदाच्या आईचा ओरडण्याचा आवाज त्यांना आला. त्या खडबडून उठल्या आणि वर पळू लागल्या. आठवणीने एका मेजाच्या आतील कट्यार त्यांनी काढून हाताशी घेतली. खोलीच्या दाराशी येऊन त्या थबकल्या. वृंदाच्या पलंगावर पाहून त्यांची क्षणभर वाचाच गेली. वृंदाच्या तोंडातून काळं झालेलं रक्त पडत होतं. ती अक्षरशः ओकत होती. कदाचित हे सगळं पोटातून येत असावं. आई पळत काकुला येऊन बिलगली. दोघांना प्रचंड भीती वाटत होती. वृंदाने खाडकन डोळे उघडले. ते पूर्ण पांढरे झाले होते. ती हात-पाय जोरात झटकत होती. कदाचित आतून काहीतरी, बहुतेक कुणीतरी, खूप वेगानं बाहेर येण्याचा प्रयत्न करत असावं.
"तिच्या शारीरिक सहनशक्तीच्या पलीकडे जातंय सगळं." काकू बोलली. हे ऐकून आईला रडूच कोसळलं. झोपल्या जागी वृंदा अक्षरशः उडत होती. काकू माघारी आली. वरूनच एक वाटसरूकरवी विश्वनाथला निरोप पाठवला.
" तिचं रक्त काळं पडतंय." विश्वनाथ आला तोपर्यंत वृंदा थोडी शांत झाली होती. "हा तिच्या शरीरावर त्याचा वाढता प्रभाव आहे."
"कोण आहे तो ? आणि माझ्या मुलीने त्याचं काय वाईट केलंय ?"
"याचं उत्तर कदाचित तो किंवा नियतीच देऊ शकेल तुम्हाला. माणसाच्या आकलनापलीकडे हा विषय जातोय."
"तुम्ही गुरुजींचे सुपुत्र आहात, तुम्ही तरी....!" काकुला हे उत्तर आवडलं नसावं.
"पुत्र आहे मी त्यांचा, म्हणून सांगतोय. मी त्यांचा अंत अनुभवला आहे. तुम्ही नाही !"
विश्वनाथनी वृंदाला पलंगावरुन उचललं. तिला स्वच्छ सूर्यप्रकाशात ठेवलं आणि तिच्याकडे निरखून पाहू लागला. ज्या भागावर सूर्यप्रकाश पडत होता, तिथली त्वचा हळू-हळू काळी पडत होती. इतकी नाही, पण जळत होती. विश्वनाथ ध्यान लावून बसला. त्याने त्याच्या वडिलांचे ध्यान लावले. तो ध्यानी गेला.
एका निर्जन ठिकाणी त्याचे ध्यान त्याला घेऊन आलं. आभाळ स्वच्छ होतं. हिरव्यागार रानात पाखरं, लहान ससे, हरणं आणि त्यांची पाडसं बागडत होती. खूप थंड होतं तिथे. हिमालयाची सावली पडत होती. झरे शांततेत वहात होते. होनाजीच्या गुरूंचा हा आश्रम होता. पण हे त्या आश्रमाचं प्रतिकात्मक स्वरूप होतं. इथे फक्त परमेश्वर होता. त्याने घडवलेल्या सृष्टीची सगळी सकारात्मक ऊर्जेची स्रोतस्थळं इथे होती. मनाला प्रसन्न वाटेल असं ते ठिकाण होतं.
"नाथा...!" गुरुजींचा धीरगंभीर सूर ऐकून त्याला जाग आली.
" एका अनोळखी व्यक्तीसाठी तुझी तळमळ मला कळते आहे. याचा इलाज शोधण्यासाठी तुला भूतकाळात जावं लागेल."
" किती मागे गुरुवर्य ?"
" सांगतो, पण त्याआधी तुला अजूनही काही कळणं गरजेचं आहे."
गुरुजींनी त्याच्या कपाळाला चंदन लावलं. अत्यंत थंड होतं ते. मोगरा आणि धुपाचा वास सात्विकता वाढवत होता.
" तो जो कुणी आहे, हे तुला नंतर कळलं तरी चालेल. आत्ता त्याची इच्छा काय आहे, आणि ती का आहे, आणि ती आत्ताच का आहे, हे आधी तुला जाणून घ्यावं लागेल. तुझ्याकडे, त्याच्याकडे आणि त्या मुलीकडे वेळ कमी आहे. या वेळेतच सगळ्यांना त्याचा कार्यभाग उरकायचा आहे." आत्ता पर्यँत अदृश्य असलेले गुरुजी आता समोर आले.
" त्या घराला आणि त्याच्या वारसांना असलेला शाप , त्या हेवलीत मृत पावलेले अतृप्त आत्मे चालवित आहेत. हा शाप म्हणजे , त्या घरातील शुद्ध बीजाचा एक मुलगा , पिशाच्च योनीत जन्माला येईल. तो त्याच्या पूर्वजांच्या असलेल्या वासना, इच्छा पूर्ण करेल. याचे बीज त्या किल्ल्यात आहे. तो किल्ला यांच्या पूर्वजांच्या पापकर्माचे आगार आहे. असंख्य निष्पाप लोकांचे जीव आत अडकले आहेत. त्यांना मुक्तीचा मार्ग नाहीये. हवेलीचा बाधित वारस या सगळ्यांना पोसतो."
तो शांतपणे सगळं ऐकत होता.
" ही मुलगी आजणतेने त्या वारसाच्या प्रेमात पडली. त्याच्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालू लागली. हे त्यास भावले. पण ती मुलगी मनुष्ययोनीत आहे. तिला मर्यादा आहेत, तश्या यालाही आहेत. आणि म्हणून तो तिला त्याच्या योनीत घेऊन जाईल.त्याच्यासाठी ते अवघड नाही, पण इतकं सोपं देखील नाही. तिला हे शरीर सोडावं लागेल, त्याचसोबत हा आत्मा देखील ! थोडक्यात, हा जन्म तिला सोडावा लागेल. आज घडलेला प्रकार ही त्याची सुरवात आहे.तिच्या आत असलेला तिचा आत्मा तिच्या शरीरात भक्कम वसलेला आहे. तो निरोगी, धीट आणि ऊर्जेने भरलेला आहे. त्यास बाहेर काढणं आणि तिचे प्राण अचेत करणं खूप अवघड आहे. या प्रक्रियेत तिच्या शरीराला अतोनात यातना तो देईलच."
"तो कोण आहे गुरुवर्य? आणि त्याला थांबवणं...?"
"किल्ला....! तो किल्ला तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे."
गुरुजींनी त्याला दिव्यदृष्टी दिली. विश्वनाथला आपल्या डोळ्यावर विश्वास बसेना. हा ताराने दिलेला शाप होता. तिचा, शांताचा आणि त्यांच्या अर्भकाचा मृत्यू या सगळ्याला कारणीभूत होता. मरताना तिने चंद्राजीच्या पुढच्या सगळ्याच पिढ्या मृत्यूच्या माळेत ओवल्या. तिच्या अर्भकाचा अकाली झालेला मृत्यू , तिच्या आत्म्यास छिन्न-विच्छिन्न करून गेला. तिचा शाप जिवंत ठेवण्याचं काम, त्या वारसांनी घेतलेले जीव करत होते. आणि प्रत्येक शापित वारसांत चंद्राजीचा कलंकित आत्मा वास करीत होता. हा तोच होता, ज्याने असंख्य निष्पाप जीवांना आपल्या घातक वासनेच्या आहारी जाऊन बळी दिले होते. हा तोच होता, जो हेवलीच्या मुळावर उठून तिचे अस्तिव विस्कळीत करू पहात होता. हा तोच होता, ज्याने पूर्ण गावात आणि पंचक्रोशीत हेवलीचे नाव बदनाम करून ठेवले होते. जिवंत असताना देखील एखाद्या श्वापदासारखं त्याचं वागणं होतं. आज मेल्यानंतरदेखील तो बदलला नव्हता. ताराने उघड-उघड दिलेल्या शापाचं आज हे भयानक रूप झालेलं पाहून, त्या वातावरणात देखील विश्वनाथला घाम फुटला.
"आता...? " याचा शेवट दिसेनासा झाल्याने विश्वनाथ गर्भगळीत झाला.
"बोललो न मी, या सगळ्याची सुरवात किल्ल्यातून ! अंतही तुला तिथेच दिसेल." गुरुजी अंतर्धान पावले.
उन्हाचा ताप वाढल्याने वृंदाच्या शरीराची लाही होत होती. ती शुद्धीवर येईल, असं कोणतंही लक्षण दिसत नव्हतं.
"काय झालं ?" काकूच्याही डोळ्यात आता प्रश्न एकत्रित झाले होते.
"किल्ला...!'' आपल्या जागेवर उठून विश्वनाथ किल्ल्याकडे पाहून म्हणाला. वृंदाला उचलून त्याने पुन्हा पलंगावर आणून ठेवलं.
"नाथा, सांगाल का? नेमकं काय झालंय ?"
"सरकार, आता आपल्याला काहीच नाही करायचं. जे काही करायचं आहे, तोच करेल...!" त्याचा खचलेला धीर पाहून दोघीही घाबरल्या.
"तो जो कुणी आहे, इतक्या सहज त्याला माझ्या मुलीचा बळी मी घेऊ देणार नाही." आईच्या डोळ्यात वेगळाच आवेश होता.
"मी असं म्हणलोच नाही, की वृंदाचा बळी जाईल."
दुपारी एक बैलगाडीत विश्वनाथ बरंच समान घेऊन आला. हेवलीच्या अंगणात त्याने ती सोडली. बैल बाहेर काढले गेले. हवेलीच्या आवारात असलेले सगळे जीव बाहेर सोडून देण्यात आले. असे कितीसे उरले होते. गाडी तशीच ठेवली.
"नाथा...हे सगळं..?" काकूने हे आधी पाहिलं होतं.
"हो, तेच !" "तुम्हाला जमेल..?" ही विधी अत्यंत अवघड आणि प्राणघातक होती. होनाजीने ही विधी आधी करून पहिली होती. ती उलटल्याने त्याचा मृत्यू ओढवला होता. आता हीच विधी विश्वनाथ करणार ,हे बघून काकुला भीती वाटली.
हवेलीच्या प्रत्येक कोपऱ्यात असलेल्या मशालींची कापडं त्या तेलात बुडवली गेली.
क्रमश......
लेखन :अनुराग वैद्य
ता. क. समाप्तीकडे वाटचाल करत असलेली ही दीर्घकथा अजूनही काही अंतिम भागाच्या लिखाणासाठी थांबली आहे. अनेक मान्यवर वाचकांनी आपापल्या प्रतिक्रिया दोन भाग टाकाव्यात म्हणुन दिल्या. इतक्या छान कथेचा समारोप योग्य व्हावा. म्हणुन लेखकाला वेळ देणे आवश्यक आहे. रोज एक भाग याप्रमाणे ही कथा लवकरच समाप्त होईल. आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.