महालगड भाग 18
काकू शांत, स्तब्ध उभी राहिली. तिचं जीवापाड जपलेलं कुंकू पुसलं गेलं. आपल्या थैलीतून एक मोठा काळा दोरा विश्वनाथाने काढून काकूच्या हाताला बांधला. त्यांना कसंतरी खेचून खाली देवघरात आणून बसवलं. काकू अस्थिर झाली होती. दिवसाढवळ्या मृत्यूने हेवलीच्या आवारात थैमान घातले. बाहेर कुणास कळले देखील नाही. विश्वनाथासमोर एक वेगळी भीती नाचु लागली. देवघर येताना त्याने मुद्दाम उघडे ठेवले. तो दिवाणखान्यात आला.
एव्हाना दुपार होत आली होती. झाला तेवढा प्रकार सूर्याच्या कमकुवत स्थितीत होता. सूर्य आता माथ्यावर येऊ लागला होता. विश्वनाथाने होईल तितक्या वेगाने खिडक्यांचे पडदे ओढून काढले. एकाबाजूने ऊर्जा आत यायला लागली. भुयाराकडे जाण्याचा मार्ग त्याने मोकळा केला. त्याला आत पाठवायचं होतं. तो कुवरांचा देह घेऊन खाली येत होता. त्याची चाल थोडी कमजोर पडली होती. एकतर कुवरांचा देह अपूर्ण होता. त्यात याची शक्ती अफाट होती. त्याला कुवरांचा देह सोडुन देणं भाग होतं. जड पावलांनी तो जिना उतरू लागला. विश्वनाथ त्याच्या हालचालीवर लक्ष ठेऊन होता. अचानक रक अघटित समोरून चालत येताना दिसलं. दुर्गा हातात बाहुली नाचवत हेवलीच्या मुख्य दारातून आत येताना विश्वनाथास दिसली. त्याचे एक-एक पाऊल खाली येत होते, दुर्गा एक-एक पाऊल पुढे सरकत होती. विश्वनाथाला दरदरून घाम फुटला. त्याची फक्त दृष्टीच दुर्गास घातक होती. तो शेवटच्या पायरीवर उभा होता. दिवाणखान्याच्या फरशीवर पडलेल्या उन्हाच्या झळा पाहून तो थबकला. सूर्याच्या किरणांना स्पर्श म्हणजे ,ज्या शरीरात तो आहे, त्या शरीराचा पूर्ण दाह ! सूर्याचे तेज हे विश्वातील प्रत्येक सकारात्मक उर्जेचे स्त्रोत आहे. नकारात्मकता तिथे प्राण सोडते. दुर्गा अजूनही अंगणात होती. त्याची तिच्यावर नजर जरी पडली असती, तर तिचा अंत निश्चित होता. दोघांची नजरानजर न होणे होते. मुख्य दाराशी न जाऊ देत, विश्वनाथास त्याला त्या भुयाराचा मार्ग दाखवायचा होता.
खूप विचारांती विश्वनाथ बाहेर आला. त्याच्या समोर ! अगदी दिसेल असा. त्याने विश्वनाथ कडे पाहिलं. त्याची दृष्टी म्हणजे साक्षात मृत्यूचे दार होते. ती सरळ मनावर आणि मेंदूवर परिणाम करणारी होती. बाबांनी सांगितलेल्या काही गोष्टी विश्वनाथ ने गाठीशी बांधून ठेवल्या होत्या.
नजरानजर झाली की तो तुझ्या मनावर थेट परिणाम करण्यास सुरुवात करेल. इतर जगाशी तुझा आलेला संपर्क क्षणात तुटेल. तो तुला त्याच्या जगात नेईल, जिथे भय, घृणा, द्वेष, मत्सर , लालच, वासना याचेच राज्य असेल. तिथे अर्धंम असेल. देवाच्या पूर्ण विपरीत असलेलं हे विश्व, साधारण मानवासाठी नाहींये. ते असुरांचे आहे. प्रतिशोध आणि वासना अपूर्ण राहिलेल्यांचे ते विश्व आहे. कित्येक शतकं पूर्ण जन्म आणि पूर्ण मृत्यू यातच अडकून राहिलेल्या त्या अतृप्त आत्म्यांच्या व्यथा करूण आहेत. न कोणाशी बोलता येते, न कुणाला स्पर्श करता येतो. मनात राहिलेल्या इच्छा वेळोवेळी तोंड वर काढतात. आत्मा सूक्ष्म असतो. इच्छा असूनही त्याला माणसासारखी हालचाल करता येत नाही. स्वतःचे अस्तित्व स्पष्ट करण्यासाठी त्याला निर्जीव बाबींचा आधार घ्यावा लागतो. एखादे मनाने कमकुवत शरीर, षडरिपू नी भरलेली मानसिकता, निष्पाप ,कोमल मन, ही त्या आत्म्यासाठी घराचं काम करतात. शरीराच्या प्रत्येक भागावर हळू-हळू त्याचे नियंत्रण होऊ लागते. त्या शरीरास तो स्वतःच्या इच्छेनुसार वागवतो. त्याला इजा करू शकतो, त्याचा आकार बदलून त्यास विकृत बनवू शकतो. त्याचे कार्य सिद्ध होईपर्यँत तो त्या शरीराचा वापर करू शकतो. त्या शरीराने तग धरला तर ठीक अन्यथा, ते शरीर सोडून दुसरीकडे त्यास जावे लागते. जिथे कुणाची वस्ती नाही, एखादं पडलेलं घर , जिथे सूर्यप्रकाश नीटसा येत नाही. अश्या ठिकाणी हे वास्तवास रहातात. त्यांना जिवंतपणी प्रिय असलेल्या वास्तूत देखील त्यांचा शुद्ध-अशुद्ध वास असतो. जिथे धर्म नाही होत, अश्या ठिकाणी त्यांचा वास असतो.
शरीरावर त्याच्या दृष्टीचा प्रभाव काय होतो , हे विश्वनाथास चांगले ठाऊक होते. डोकं दुखू लागतं आणि मेंदूच्या नसा ताणल्या जातात. नजरेसमोर काही काळ अंधारी येते. ती नाहीशी झाली, की समोरचे दृश्य डोळ्यासमोर गोल फिरू लागते. माणसाच एखाद्या उंच कड्यावरून खाली कडेलोट केल्याचा भास होतो. खाली एक काळी दरी असते. अंधार असतो. ज्याच्या प्रभावाखाली आहे, समोर तोच दिसत असतो. आपले काही प्रियजन दिसतात. ज्यांना आपण मदतीसाठी बोलवत असतो. पण त्यापैकी कुणीही आपल्या सोबत येणार नसतं. कारण त्यांच्या मते , हे आजारपण आहे. आपल्यात आपल्या स्वतःचा आत्मा ,या परावलंबी असुरी शक्तीशी लढत असतो. पण आपला आत्मा शुद्ध नसल्याने ,तो कमकुवत पडतो. आपला आत्मा बऱ्याचदा निष्पाप असल्याने त्याच्याशी कपट, छळ नाही करू शकत. एकाच शरीरात दोन भिन्न प्रवृत्तीचे आत्मे एकमेकांशी संघर्ष करीत असतात आणि त्याची झळ शरीरास सोसावी लागते. अश्यात, एखादी दैवी शक्ती मदतीस धावली, तर पुढील मोठा अनर्थ टळतो. जर नाहीच धावली , तर परिणाम वाईट होतो.
या सगळ्याचा विचार करत विश्वनाथ त्याला सामोरं गेला. कुवरांच्या शरीराची एव्हाना पूर्ण चाळण झाली होती. पार लक्तरं झाली होती. आधीच आजारपणाने जीर्ण झालेलं शरीर, त्यात त्याची असुरी शक्ती दणकट होती. अजूनही तो त्या फरशीवर पडलेल्या सुर्यप्रकाशाकडे द्वेषाने पहात होताच. एक सावली अचानक त्याच्यासमोरून सरकू लागली. त्याच्या डोळ्यात न पहाता विश्वनाथ संथ पण सावध गतीने त्या भुयाराचा दिशेला सरकत होता. त्याची दृष्टी दुर्गावर जाणार नाही, याची पुरेपूर काळजी त्याने घेतली होती. दिवाणखान्यात ठेवलेल्या राजेशाही खुर्च्या, मेज यांच्यामागून जायचे होते.
त्याने विश्वनाथ कडे पाहिले. त्याच्या लक्षात आलं.
"होना चा मुलगा न तू...?" कानाला सहन होणार नाही अश्या किळसवाण्या आवाजात तो म्हणाला.
"हो...? का ?"
" वडिलांचा अंत फार लवकर विसरलास तू. त्याच मार्गावर जातोयस !"
"मूर्ख आहेस तू ! तुला वाटतंय , हे सगळं तुझ्या नियंत्रणात आहे. पण ज्याने हे विश्व घडवलं आहे, तो वाट बघतोय, तुझ्या पापाचा घडा भरण्याची."
विश्वनाथाच्या या बोलण्याचं त्याला हसू आलं.
" त्याच्या तावडीतून मी केव्हाच सुटलोय ! त्याचे नियम, बंधनं, विधी, हे सगळं तुमच्यासारख्या माणसाला आहेत. मी जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून केव्हाच सुटलोय."
"नाही, तुझं अस्तित्व म्हणजे जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका नाहीये. उलट, अडकलायस तू ! मृत्यू आणि नरकाच्या दारात स्वतःचं गलिच्छ जगणं साजरं करतो आहेस. कोण आहात कोण तुम्ही ? घृणा, प्रतिशोध, अमानवीयता, अकाल मृत्यू, कष्ट, दुःख, विवंचना, याचे एकत्र समीकरण ? निष्पाप लोकांचा जीव घ्यायचा, आणि त्यांचे तडफडते आत्मे अडकवून ,त्यांच्या तळतळावर स्वतःचं पोषण करायचं ! गेली ३०० वर्ष हेच करत आला आहेस."
त्याला बोलण्यात गुंतवत विश्वनाथ आता भुयाराच्या दारापाशी येऊन पोहोचला. एक लहानशी जागा होती, जिथुन त्याला येता येणार होतं.
देवाला स्मरून विश्वनाथने भुयाराकडे उलट चालण्यास सुरवात केली. कुवरांच्या जीर्ण शरीराला खेचत तोही येऊ लागला. त्याचा वेग मंदावला होता. आत अंधार होता. त्याने आत प्रवेश केला. विश्वनाथने हे सगळं स्वतःचा जीव धोक्यात घालून केलं होतं. यात आपला अंत होऊ शकतो, हे त्याला माहिती होतं. अपल्यात त्याला मारण्याची शक्ती आणि तंत्र, दोन्ही नाहीत, याची पूर्ण कल्पना त्याला होती. पण त्याला आत डांबुन बंद करणं गरजेचं होतं. बाळू आणि कुवरांचा हकनाक बळी गेला होता. तो आत आला. दोघही साधारण पाच गजाच्या अंतरावर होते. विश्वनाथाने आपल्या खिश्यात हात घातला. रक्षा बाहेर काढली आणि त्याच्या डोळ्यात फुंकली !
काकू खोलीत शांत बसली होती. सोबत यमाबाई आणि दुर्गादेखील होती. कुवरांच्या अश्या भयानक मृत्युनंतर , आयुष्यात पहिल्यांदा काकूच्या मनात भीती भरली. गेली कित्येक वर्ष त्यांची सोबत होती. आपलं म्हणून एकच माणूस होतं. सगळं काही त्यांच्या अवती-भवती होतं. एक शिस्त, एक नियम, त्यांची औषधं, सेवा सगळं-सगळं आजपासून थांबलं होतं. असंख्य संकटं आलीत-गेलीत, काकूने त्याला धैर्याने तोंड दिलं होतं. कुवरांच्या मोठी सोबत होती त्यांना.
"सरकार...!" एक नोकर आता येऊ पहात होता.
"मालक आलेत मोठे...!" काकूच्या चेहऱ्यावरचं भाव मुळीच बदलला नाही.
मोठे शिर्के चालत काकूंच्या खोलीकडे आले. रिवाज म्हणून काकू उभी राहिली. बाहेरच्या खिडकीकडे बघत.
"कुवरांच्या जाण्याचा खेद आहे आम्हाला. सख्खे नसले तरी भाऊ होते ते आमचे." कुवरांच्या तसबिरीसमोर जाऊन त्यांनी देखले हात जोडले.
"स्वतःला सांभाळा मालिनी...!" काकूच्या मागे येऊन ते उभे राहिले.
"आलाच आहात तर थांबा...!" काकू त्यांच्याकडे न पहाता बोलल्या.
मोठ्या शिर्क्यांनी एक उसासा टाकला.
"धर्म-संकटात टाकू नका आम्हाला मालिनी. तुम्हाला ठाऊक आहे, आम्हाला थांबता नाही येणार !"
" आपल्या मुलाला शेवटचं आपण केव्हा पाहिलत ?" हा प्रश्न खोचक होता.
"आमचा कुठे राहिला तो ? त्याचं सगळं तुम्ही केलंत. त्याच्या यशोदा तुम्ही आहात."
"घरात एक माणूस अजून आहे. उगाच त्यांचा जीव धोक्यात आणलंय आपण."
" आम्हालाही ठाऊक नव्हतं, हे इतकं भयानक होईल. विधात्याची मर्जी...!"
" हे सगळं आपलं असून देखील आपण इथून निघून गेलात. वेशीच्या आत देखील आपण येत नाहीत. मरणाची इतकीच भीती होती, तर संसार करून मुलगा जन्माला घालायचा नव्हता."
काकूंचा प्रक्षोभ रास्त होता.
" घरात कर्तापुरुष नसल्यावर काय हाल होतात, हे भोगलंय मी...! नवऱ्याच्या जाण्याने जगण्याची उरली-सुरली इच्छा देखील संपली. आपण या सगळ्याचे मालक असून, जवाबदारी झटकून कायमचे चालते झालात. मागे काय उरलं, काय राहिलं, कसं होणार, याची जराही तमा तूम्हाला नव्हती. रात्रंदिन आम्ही इथे भीतीस कवटाळून झोपलोय, मोहनला जीवापाड जपलं. व्यवहार , चालीरीती, सण सांभाळले. गावातील लोकांचे, इतर नातेवाईकांचे रोष आणि तिरस्कारही जपले. आणि हे सगळं आम्ही एकट्याने केलं. कशासाठी...?" काकुला रडू कोसळलं. " कशासाठी...? कूस रिकामी ती रिकामी राहिली. आपलं असं कुणी-कुणी उरलं नाही आम्हाला...!" काकूच्या त्या विलापाने हेवलीच्या भिंतींना देखील पाझर फुटलं असावं. अपंग कुवरांची त्यांना मोठी सोबत होती. ती आज अचानक नाही म्हणल्यावर त्यांचं मन विच्छिन्न झालं होतं. जगण्याचा उरलेला आधार देखील संपला होता.
क्रमश...
लेखन :अनुराग वैद्य