महालगड भाग 17
परमेश्वर इतका निष्ठुर कसा असेल ? त्याने जन्माला घालायचं ! त्याने चोच द्यायची ,दाणे द्यायचे, रक्षण करायचं...!"
" आणि नियतीने प्रारब्धात असं लिहायचं !" काकूचे वाक्य होनाजीने पूर्ण केले.
पहाटे आपल्या एकअश्वि टांग्याने होनाजी गावाबाहेर दौडत निघाला. छोटा विश्वनाथ देखील होता. इथून साधारण 40 मैल प्रवास करायचा होता. त्याचे गुरू तिथे आश्रमात रहात होते. ते सिद्ध होते. जगापासून अलिप्त होते. भर दुपारी टळटळीत उन्हात टांगा एक निर्जन वनात येऊन थांबला. मोकळा करून त्यांनी घोडा चरण्यासाठी सोडून दिला. पायवाट संपली. समोर शेणाने लपलेल्या दोन छोट्या झोपड्या होत्या.एकीत त्यांनी विश्वनाथला थांबण्यास सांगितले.
" ३५० वर्ष झालीत होना !" सुमारे नव्वदी कडे झुकलेला एक म्हातारा समाधी लावून बसलेला होता. होनाजी त्याच्यासमोर हात जोडून बसले होते.
"यांचा प्रत्येक पूर्वज महापातकी होता. धर्म, मातृभूमी याची जराही चाड त्यांना नव्हती. सत्ता, पैसा, लोभ , वासना याच्या अतिरेकाचे मूर्तिमंत ,चालते-बोलते पुतळे ! आपल्या राक्षसी वासना भागवण्यासाठी कुणाच्याही सुखवास्तूचा विध्वंस करण्यास मागेपुढे पहात नव्हते. गेले ३०० वर्ष त्या हवेलीवर झालेल्या प्रत्येक मृत्यूचा परिणाम आहेत तुमचे सरकार ! तिथे मृत पावलेल्या जीवांच्या आतील तळतळाट , घृणा आणि प्रतिशोधाची भावना दिवसेंदिवस वाढत गेली. त्याची एक खूप दांडगी शक्ती झाली. हीच शक्ती तुझ्या सरकाराला केंद्रित करते आहे. त्याचे बळ त्याचे स्वतःचे नाहीये !"
" आता...पुढे आम्ही कार करावं ?" अत्यंत खिन्न मुद्रेने होनाजी त्यांना विचारू लागला.
"वाट बघायची..!" आणि त्यांनी डोळे बंद केले. काही काळ तर ध्यानस्थ राहिले. होनाजी तिथून इंचभर सुद्धा हल्ला नाही. दिवस मावळतीला झुकू लागला. गुरुजींच्या चेहऱ्यावरची मुद्रा देखील बदलली नाही. एखाद्या निश्चल पाषाणासारखे ते तसेच स्तब्ध बसले होते.
"होना...!" तिन्हीसांजेला त्यांनी डोळे उघडले.
" नाही याला इलाज...!" त्यांचा देखील चेहरा यावेळी पडला.
" असं नका म्हणू गुरुवर्य ! खूप अपेक्षेने मी आलो आहे."
" कळतंय मला ! मी म्हणालो इलाज नाहीये. आजाराचा पूर्ण नायनाट मात्र होईल !"
"इलाजाने आजार बरा होतो. पण एका शरीरातून आजार पसरवणारे तत्व ,अगदी मुळासकट काढूनच फेकले, तर ?
" कसे ?"
" आज नाही. आत्ता त्यावर बोलणे नाहीच ! वेळ आल्यावर सगळे काही कळून येईल. तूर्तास तुझ्यासाठी सूचना ! जपून रहा."
रात्रभर तिथेच मुक्काम करून दुसऱ्यादिवशी पहाटे बाबांसह विश्वनाथ परतीच्या प्रवासास निघाला. वाटभर बाबा तुरळक बोलत राहिले. त्याला खुपश्या सूचना करत राहिले. ते घाबरले होते. व्यथित होते. संभ्रमित होते.
होनाजीचा झालेला दुर्दैवी अंताने काकूसमोर असलेला एकमेव पैलतीराचा दुवा देखील हरवला. विश्वनाथ अनुभवाने अजून कच्चा होता. त्यात धीर होता. वेळ नेमकी हातातून निसटत चालली होती की जगण्यासाठी काही क्षण वाढवून मिळत होते, हेच कळत नव्हते. जाता मोहन भूतकाळाची बरीच पानं वाऱ्यावर उडवून गेला होता.
तीन रात्री उलटल्या. वृंदाच्या हालचाली बंदच होत्या. सगळेच काळजीत होते. रखवालदाराशी हुज्जत घालून देवीचे पुजारी महंत आत घुसू पहात होते. काकूच्या आज्ञेनुसार त्यांना आत सोडण्यात आले.
"सरकार, उद्या पौर्णिमा ! आपला काही निरोप नाही आला. शेवटी आम्हीच आलो. काय आज्ञा...!" ही विशीष्ट पौर्णिमा होती. काकूच्या लक्षात न राहिल्याने तयारी राहिली.
"निदान अभिषेक तरी...!"
" तुम्हाला योग्य वाटेल ते करावे. कुलाचार मात्र यथासांग झाला पाहिजे." दोन थैल्या घेऊन महंत बाहेर जाऊ लागले. त्यांच्या कमरेला असलेली झोळी काकूंना दिसली.
" ही होमाची रक्षा न ?"
" होय, विसरलो द्यायला." त्यांनी ती रक्षा काकुसमोर ठेवली. त्यांना सोबत यायला सांगून काकू पुढे चालू लागली. वृंदाच्या खोलीत आल्यावर ती रक्षा महंतांनी तिच्या कपाळावर ठेवली. कपाळावरचा तो भाग उजळ होऊ लागला.
"आश्चर्य आहे...!" होणारा बदल बघत अचानक काकू म्हणाल्या.
"नाही, ही भगवंताच्या पुढची रक्षा आहे. म्हणून हिला रक्षा म्हणायचं !!" बाजूला पाण्याने भरलेला गडू होता. त्यात रक्षा मिसळून महंतांनी तिला पाजली. गळ्यातून ते पाणी आत गेलं. उभ्या असलेल्या सगळ्यांनी पाहिलं. वृंदाच्या त्वचेतुन देखील ते दिसत होतं. तिच्या अंगाचा होत असलेला दाह थांबला. प्रत्येकाच्या जीवात जीव आला.
"हे असू द्या." महंतांनी आणलेली सगळी रक्षा वृंदाच्या आईकडे दिली.
"देवी रक्षण करेल. जप सुरू ठेवा..!"
.....
पौर्णिमेचे वेध लागले. वृंदाच्या डोळ्यातील हालचाली जिवंत होऊ लागल्या. आईचे तिच्याकडे सतत लक्ष होते. डोळे जरी हलले, तरी उर्वरित शरीर अजूनही निश्चल होतं. काहीतरी सांगायचा खूप प्रयत्न करत होती ती !
"नको बोलूस काही !"
वृंदाने डोळ्याने तिला नकार कळवळा. आईस तो कळला नाही.
थोडं उजाडलं. बाळू खोलीत आला. त्याच्या हातात नेहमीप्रमाणे झाड-पाला होताच. काहीही न बोलता त्याने पलंगाखालची सहाण ओढून काढली. थोडासा पाला ओढून त्याने त्यात पाणी घातले आणि उगाळू लागला. आईने त्याकडे थोडे दुर्लक्ष केले.
" तुला थोडं बरं वाटलं, धीर आला, की आपण इथून निघायचं ! आपल्या घरी !"
"जाऊन तर दाखव...!" खाली मान घालून सहाणिवर पाला उगाळत असलेला बाळू एकदम सचेत झाला. आईला क्षणभर कळलेच नाही. "या हेवलीच्या बाहेर जाऊन तर दाखव." सहाणीवरचा त्याचा वेग वाढू लागला. त्याच्या उजव्या हातात दगडी बत्ता होता. डाव्या हाताच्या उलट्या तळव्यावर त्याने तो मारायला सुरवात केली. खाड-खाड आवाज येऊ लागला. बोटांमधून रक्त वाहून सहाण लाल होऊ लागली.
"मी बरा नेऊ देईल...! तुकडे तुकडे होतील तिचंही आणि तुझंही ! "
"बाळू...?" आता आईला भीती वाटू लागली होती.
"काय ए...?"
बाळूने वर मान करून आईकडे पाहिले. त्याचे डोळे पूर्ण पांढरे पडले होते. त्यांचा आकार सुद्धा वाढला होता.
"तू जाशील का घेऊन हिला बाहेर ? आहे तुझ्यात इतकी हिंमत...बघू जरा !" हातातील बत्ता त्याने स्वतःच्याच डोक्यात घातला. आईच्या पूर्ण लक्षात आलं. तिने झटकन वृंदावर एक चादर टाकली. बाळुनी मान फिरवली.
"तुला काय वाटतं ? कुणालाही आत आणशील, कुणालाही बाहेर नेशील ? इथे सगळं मी ठरवतो...!" भयानक अंगविक्षेप करत बाळू आईकडे सरकू लागला. त्याच्या डोक्यातून आणि हातातून रक्ताच्या धारा लागल्या होत्या. आईच्या हाताला एकदम देवीची रक्षा लागली. हातभर रक्षा उचलून तिने बाळूच्या डोळ्यात फेकली. तडफडत बाळू मागे सरकला.
"मूर्ख आहात तुम्ही सगळे. हे जंजाळ मृत्यूचं आहे. यातून कुणीही नाही सुटत. सगळेच जातील, एक-एक करत..!" रक्षा पडली तिथे त्याला दाह होऊ लागला. डोळे चोळत तो खोलीत सगळीकडे धावू लागला. काहीही न दिसण्याने भिंतीला , मेजाला, कपाटाला तो धडकला. अचानक थांबला. " तुला बघायचं आहे न, काय करू शकतो मी ?" असे म्हणत तो खिडकीकडे पळत सुटला. दुसऱ्या क्षणी बाळूने पहिल्या मजल्यावरून खाली घेतली. खाली बागेत असलेल्या एका उंच बाभळीच्या झाडावर तो पडला. शेकडो काटे अंगात शिरले. शरीराची चाळण झाली. अर्ध्याहून अधिक झाड रक्ताने लाल झाले. नुकताच फाटक उघडून आत आलेल्या विश्वनाथने हे सगळं पाहिलं. तो ताबडतोब आत पळत गेला. तुपाने भरलेला एक पितळी हंडा त्याने त्या बाभळीवर ओतला. बाभळीने क्षणात पेट घेतला. बाळूचे प्रेत गळत खाली जमिनीवर पडले.
" अवघड झालंय..!"
बागेतील गोंधळ पाहून नोकर मंडळी, वृंदाची आई, काकू सगळेच एकदम बाहेर आले.
"काहीतरी चुकलंय...! आज, इतक्या प्रखर सूर्यप्रकाशात, ते ही पौर्णिमा कोवळी असताना तो मध्ये नाही येऊ शकत...!"
"त्याला यायला जागा...?" एकदम विश्वनाथ हेवलीच्या आत पळत सुटला. दिवाणखान्याच्या समोरच्या भिंतीवरची एक तसबीर त्याने ओढून खाली घेतली. एक छोटी खिडकी त्याने मोठ्या कष्टाने उघडली. समोर पाहून त्याला धक्काच बसला. वृंदा त्या रात्री आत गेली होती. ते दार पूर्ण बंद झालं नव्हतं. मागून पळत आलेली काकू देखील तर उघडं दार बघून थक्क झाली.
"हे कसं झालं?" विश्वनाथाला काकूने विचारलं.
"कसं झालं, काय झालं, कुणी केलं ...? आता हे विचारायला वेळ नाहीये. तो त्या असुरी शक्तीला घेऊन बाहेर आला आहे. तो वाट चुकला आहे. त्याला पुन्हा आत नेले पाहिजे."
"तो आज तरी त्याच्या खऱ्या स्वरूपात येणं शक्य नाहीये. पण त्रास देण्याचा त्याचा हेतू तो पूर्ण करेल. त्यासाठी त्याला कमकुवत शरीर आणि कमकुवत मन असलेल्या माणसाची गरज भासेल."
"कमकुवत शरीर...? कमकुवत मन...?" काकुला हे ऐकून एकदम घाम फुटला. कुंवर आपल्या खोलीत एकटे होते. त्या पळत पायऱ्या चढत वर गेल्या. विश्वनाथ देखील त्यांच्या मागे वर जाऊ लागला.जाताना त्यानी वृंदाच्या आईला वृंदास एकटं न सोडण्याची ताकीद दिली.
कुवरांच्या खोलीचे दार लोटले होते. आता विश्वनाथला देखील भीती वाटू लागली होती. दब्या पाऊलानी दोघे पुढे सरकू लागले. दाराच्या फटीतून काकूने आत पाहिले. कुंवर त्यांच्या खुर्चीवर बसले होते. काकूला हायसे वाटले. पण विश्वनाथाची चौकस नजर मात्र सगळं ओळखून होती. घाई-घाईने आत जाणाऱ्या काकूंचा हात त्याने घट्ट धरला.
"गेलेत ते...!"
विश्वनाथनी बरोबर ओळखलं होतं. दाराच्या वरच्या फटीतून त्याला कुवारांचे लोखंडी झुल्याच्या खिळ्याला लटकलेले प्रेत दिसले होते. त्याने अत्यंत निर्घृणतेने कुवारांचे प्राण घेतले होते. खुर्चीत निर्धास्त डोलत होता तो. कानठळ्या बसतील इतक्या जीरात तो हसू लागला. काकांच्या आवाजात बोलू लागला.
"तिला एकटीला वाचवताना किती जणांचे बळी देशील...तुझ्या बापाचा दिलास, त्या माणसाचा दिलास...!"
क्रमश...
लेखन :अनुराग वैद्य