महालगड भाग 16
"बाई...!" वृंदाच्या शेजारी हताश होऊन बसलेल्या तिच्या आईपाशी काकू येऊन बसल्या.
"चुकलं आमचं..!आम्हाला नव्हतं माहीत की हे असं..."
"माहिती होतं तुम्हाला !" वृंदाची आई जरा स्पष्ट बोलली." तुमच्या घरात चाललंय, आणि तुम्हालाच माहीत नसावं ?" काकूंची मान खाली गेली. "बघा जरा माझ्या मुलीकडे. हे तर नव्हतं पाहिलं आम्ही कधी तिच्यासाठी." तिच्या आतली तळमळ सहाजिक होती. मुलगी समोर असाध्य आजाराने निपचित पडून होती. काहीही हालचाल नव्हती. हात-पाय सुन्न झाले होते. काहीही जाणिवा नव्हत्या. श्वास सुरू होते. डोळे उघडे होते. त्यात थोडी चेतना होती. समोर कोण बसलंय ते तिला कळत होतं. काय बोलणं सुरू आहे, हे ही कळत असावं. प्रतिक्रियाशून्य नजरेने ती छताकडे रात्रभर बघत होती. संवेदना आतल्या-आत कोंडल्या गेल्या होत्या. असं आपल्याला किती दिवस रहावं लागेल, याची धास्ती तिला सतावीत होती. मेंदूपासून इतर सगळ्याच अवयवांच्या तारा तुटल्या होत्या.
धुळीने माखलेल्या रस्त्यावर रात्री पाऊलं झपझप उमटत होती. वृंदाची आई शाल अंगावर टाकून एकटीच कुठेतरी जायला निघाली. रातकिडे देखील भयाने काट्याकुट्यात दबा धरून बसले होते. एखादं भुकेलं कुत्रं ,कुठे काही खायला मिळतंय का बघत ,जरा धास्तीनेच इकडे तिकडे हिंडत होतं. हवेत गारवा होता. पण लोभस नव्हता वाटत. जुनी वडाची झाडं खालून चालणाऱ्याकडे दयाभावनेने बघत होती. त्यांच्या पारंब्या आता त्याच्या उरल्या नव्हत्या. त्या शापित झाल्या होत्या. प्रत्येकाला आपल्या विळख्यात ओढू पहात होत्या. रस्त्याच्या धुळीतून रक्ताचा वास अजून येत होता. मेलेल्या जंगली श्वापदांचे भुकेले आत्मे जिभल्या चाटत सूक्ष्मरूपाने हिंडत होते. एका वाड्यामोर तिची आई उभी राहिली. दार उघडं होतं. हवेलीपासून ते या वाड्यापर्यँत चा सुमारे अर्ध्या मैलाचा छोटा प्रवास तिला अनेको योजने चालवित, असा झाला होता. दार आत ढकलून तीही आत शिरली.
"तुम्हाला हवा तितका पैसा देते. पण माझ्या मुलीला वाचवा." हात जोडून ती विश्वनाथासमोर उभी राहिली. रडणं काही थांबत नव्हतं. "एकुलती-एक मुलगी आहे ती माझी...! काहीतरी करा !"
"माझं नाव जरी विश्वनाथ असलं, तरी या मागचा सूत्रधार काशीचा विश्वनाथ आहे हो ! तुमचा त्रास, तळमळ मला कळते आहे. पण तूर्तास माझ्याकडेही याचा एकच इलाज आहे. बाकीचे सगळे उपाय याच्या नंतर आहेत."
"कसं शक्य आहे गुरुजी ? मी स्वतःहून माझ्या मुलीला त्या आगीत...!"
"कुणी ढकलण्याआधीच ती या आगीत ओढली गेली आहे. आपण खूप अनभिज्ञ असतो आणि आपल्या डोळ्यासमोर बरंच काही घडत असतं. विश्वास ठेवण्यासारखं, न ठेवण्यासारखं ! " तो अर्ध्यारात्री देखील लख्ख जागा होता. वाड्याच्या एका खोलीत त्याने त्याचा स्वतंत्र देव्हारा थाटला होता. एक तेलाचा दिवा तिथे सारखा जळत असायचा.
"हा दिवा माझा रक्षक आहे. मी जिथेही जातो. तिथे पाहिले हा दिवा लावतो. त्यापुढेच सगळी कामं करतो." एक पळी घेऊन त्याने त्या दिव्यातील तेल घेतलं.
"तुम्ही लावता की नाही दिवा...?" ओंजळीत मावेल एवढ्या तांब्याच्या वाटीत त्याने ते तेल ओतलं.
"आमच्या घरी लावते मी ! हे घर माझं नाही...!"
"तुमच्या मुलीचं आहे न ? घ्या, घरातील तेलात थोडं हे टाकून त्याचा दिवा सतत वृंदाच्या खोलीत तेवत ठेवा. याने ती बरी होईल की नाही, हे सांगता नाही येणार. पण आहे त्यापेक्षा अजून खोल नाही जाणार ! याने पडेल, त्या उजेडात त्यांच्या सावल्या तुम्हालादेखील दिसतील. बाकी, भगवंत मालक ए !"
"पण तिची ही स्थिती ...?"
" तिचं शरीरावर त्या असुरी शक्तीचा ताबा आहे. ही शक्ती तिला जसं वाटेल तसं आता वागू शकते. सध्या तरी तिने वृंदाचं शरीर निष्क्रिय केलं आहे. डोळे यासाठी उघडे ठेवले, की तिला दिसावं म्हणून. वृंदाच्या शरीराचा वापर करते आहे ती ! "
हे सगळं ऐकून वृंदाच्या आईचं धाबं दणाणलं.
"वृंदाला ती मारू शकत नाही. कारण तिचं वृंदाशी थेट वैर नाहीये. कारण ती हवेलीच्या परिवाराचा भाग नाहीये. हेच कारण आहे, की वृंदाला तिच्यापासून मुक्त करण्यात अडथळे येतायत."
पूर्णपणे गर्भगळीत झालेली आई वळू लागली.
"याला इलाज स्वतः वृंदा आहे. थोडा धीर धरा ! आणि हो, वृंदाला हवेलीच्या बाहेर जाऊ देऊ नका. तिने एकदा का या गावाची वेस ओलांडली, की तिचा जीव गेलाच म्हणून समजा. बाहेत यापेक्षाही भयानक अतृप्त आत्मे आहेत, ज्यांना तिचं शरीर लीलया मिळेल. तिचा जीव जाईल हे निश्चित !"
आई खाली मान घालून निघून गेली. बराच वेळ विश्वनाथ उघड्या दाराकडे बघत राहिला.
'खरं सांगता येत नाही, खोटं बोलता येत नाही ! एका बाजूला हेवलीच्या आतील मृत्यूचा तो तांडव आणि एका बाजूस निरागस वृंदा. एका बाजूस शेकडो वर्ष जुना शाप, त्याची कारणं , त्याचे परिणाम, आणि दुसऱ्या बाजूस त्याचा एकही इलाज त्वरित दृष्टीक्षेपात नव्हता.
खडकीतून एक अधाशी सावली विश्वनाथ कडे बघत होती.
कोपऱ्यात लावलेल्या दिव्याकडे बघत विश्वनाथ खाली बसला. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या असंख्य आठवणी होत्या. कित्येक तर इतक्या भयानक होत्या, की त्यावर नुसता विश्वास ठेवला तरी धडकी भरत असे. वडिलांसोबत कित्येकदा तो जागोजागी इलाज करण्यास फिरत असे. आजूबाजूला असलेल्या प्रत्येक गावात त्याला लोक ओळखात होते. आपले वडील नेमका कशाचा इलाज करतायत, हे त्याला वयाच्या सोळाव्या वर्षी कळलं.
"नाथा, मी तुला आजपासून माझ्या सगळ्याच विद्यांची तालीम देणार आहे." पन्नाशीकडे वळलेल्या वडिलांनी एक दिवस संध्याकाळी ,देवासमोर दिवा लावताना त्याला बोलावलं.
"आपल्याला डोळ्याने जे काही दिसतं, आपण त्याला खरं म्हणतो. त्यावर विश्वास ठेवून वागतो, निर्णय घेतो, क्रिया-प्रतिक्रिया देखील त्याला अनुसरून असतात. पण अश्या असंख्य बाबी आहेत, ज्या डोळ्याला न दिसून देखील त्या आहेत ! त्यांचं अस्तित्व नाकारून चालणार नाही. तुझा-माझा, प्रत्यक्षात याच्याशी काहीही संबंध नाही, पण तरीही , आपल्या आजूबाजूला असलेला त्यांचा वावर आपल्याला त्यांच्या विश्वाचा एक भाग बनवतो."
विश्वनाथ शांत बसून ऐकत होता. बाबांनी त्यांच्या हाताला एक लाल रंगाचा लोकरीचा गंडा बांधला. उरलेली लोकर त्याच्या हातात दिली.
" ही लोकर खूप जुनी आहे. नेमकी किती, ते सांगता नाही येणार. पण ही तुला पूढील बरीच वर्ष पुरेल. सांभाळून वापर कर हिचा." एक पेटी त्यांनी त्याला दिली. त्यात बरीच पुस्तकं होती. काही खलबत्ते होते. एक छोटं जातं होतं.
" मृत्यूपश्चात् आपला या इहलोकाशी संबध संपतो. आपला आत्मा, ही परमेश्वराची उत्पत्ती आहे. तो कधीही नष्ट होत नाही. म्हणून, प्रत्येक सजीव नश्वर आणि आत्मा हा अनश्वर अश्या इश्वराचे प्रतीक असतो. एक जन्म संपला, म्हणजे, एक शरीर नष्ट झालं, की त्याच्या कर्मानुसार त्याला पुढचा जन्म मिळतो."
"गीतेत आहे ..!"
"हो...! गीतेमध्ये मानवधर्म लिहिला आहे. आत्म्याच्या शुद्धीकरणाचे स्रोत त्याच्या जन्म घेण्यापासूनच सुरू होतात. आपल्या कर्मावर निर्बंध असले, की आत्म्याचा मृत्यूनंतरचा प्रवास सुखकर होतो."
"बाबा, मृत्यूनंतर आत्म्याचं काय होतं ?" विश्वनाथ आता मन लावून सगळं ऐकत होता.
"मृत्यूनंतर शरीर नष्ट होतं. वर्षश्राद्ध झालं की मृत व्यक्तीचा इहलोकाच्या कुठल्याच कार्यात उल्लेख तसा होत नाही.फक्त स्मरण होतं. त्याचा या जगाच्या सगळ्याच व्यवहारांशी संबंध संपतो. तो विरक्त होतो, विलग होतो ! पण त्याने शरीर धारण केले असताना केलेली कर्म मात्र त्याची पाठ सोडत नसतात."
"गरुड पुराण ! त्यात कर्मानुसार आत्म्याला दिल्या जाणाऱ्या शिक्षा...!"
" नुसत्या शिक्षाच नाहीयेत, त्याला फळ म्हणतात. आत्म्याला कर्मानुसार गती मिळण्याचं कार्य, त्याच्या मृत्यूनंतर १४व्या दिवसानंतर सुरू होतं. साधारण वर्षभर ही प्रकिया सुरू असते. पण...!"
"पण काय बाबा...?" बाबांचा एकदम गंभीर झालेला चेहरा पाहून विश्वनाथ गोंधळून गेला.
" माणूस आपल्या स्वभावाने बांधील असतो. त्यानुसार तो कर्म करत असतो. त्याच्या हातून तसेच कार्य घडत असते, जसा त्याचा स्वभाव आहे. त्याचा इच्छा, वासना देखील तश्याच असतात. जन्मभर त्याने जोडलेले पाप-पुण्य अंकित होऊन ,त्यानुसार त्याच्या प्रारब्धात लिहिलेला मृत्यू त्याला येतो. त्याची जगण्याची इच्छा संपली असेल, तर तो गतीला जातो. त्याचा मृत्यू अकाली असेल, तरी गतीत फरक पडत नाही. पण, मृत्यूसमयी जर त्याच्या मनात प्रतिशोधाची, वासनेची तीव्र इच्छा असेल, तर त्याचा आत्मा त्यात गुंततो. त्याला गती मिळत नाही. तो इहलोकात भटकत रहातो. त्यानुसार वागतो. आपले अपूर्ण राहिलेले कर्म पूर्ण करतो."
" म्हणजे, आपण जे ऐकतो ते खरं असतं ?"
"बऱ्याच अंशी...! मारताना माणसाच्या मनात राहिलेल्या भावनांचा पाठपुरावा, त्याचा आत्मा , शरीर सोडून गेल्यानंतरही करत रहातो. त्यासाठी त्याला सोयीस्कर असलेलं शरीर तो शोधतो. त्याचा हट्ट पुरवण्याची क्षमता त्या शरीरात असणं गरजेचं असतं. त्या शरीराची क्षमता आणि आत्म्याचा उद्रेक , याचा समतोल , याने एक भयानक गाठ जन्माला येते. बऱ्याचदा काही हट्टी शक्ती इतरांना देखील त्रासदायक ठरतात. त्यांची वासना, प्रतिशोध काळानुसारदेखील बदलत नाहीत."
"हे कसे होते...!"
"मृत्यूसमयी अपूर्ण राहिलेल्या वासना आणि प्रतिशोधाचा ध्यास टिकवणूक ठेवण्याचं काम , जागोजागी असलेल्या नकरात्मक शक्ती करत असतात. कुठलाही लोभ त्यांना नसतो. स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याच्या नादात ते हे सगळं करीत असतात."
"तुमचा रोख कदाचित...!"
"हो, तिथेही असंच आहे. शाप टिकवून ठेवण्याचं काम, तिथे वेगवेगळया वेळी मृत्यूमुखी पडलेले प्रेतआत्मे करतात. त्यांना त्यातून असुरी ऊर्जा मिळते.
बाबा हाडाचे वैद्य होते. माणसाच्या शारीरिक व्याधींव्यतिरिक्त मानसिक चिकित्सादेखील ते करीत. मृत्यू आणि देव , याशिवाय तिसऱ्या जगात देखील त्यांचा वावर होता. पण त्यांच्या सिद्धीच त्यांच्या सुखाच्या आड येत होत्या. इतरांच्या व्याधी दूर करताना , त्यांच्याकडून अनावधानाने बरेच आत्मे दुखावले गेले होते. ज्यांना गती मिळाली, ते निघून गेले. पण ज्यांना गती मिळालीच नाही, त्यांचा अपूर्ण राहिलेला प्रतिशोध बाबांवर उलटला. त्यांची रात्रीची झोप अवघड होत गेली. अपरात्रीचे प्रवास थांबले. त्यांना भास होऊ लागले. आपल्या आजूबाजूला ,जीवांचा तितकाच मृतांचा वास त्यांना जाणवू लागला. गेल्या काही दिवसांपासून त्यांना त्यांचा अंत दिसत होता. आपली सगळी विद्या सत्कारणी लागावी, म्हणून त्यांनी विश्वनाथास शिक्षण द्यायला सुरवात केली.
अंतसमयी त्यांनी स्वतःला त्यांच्या खोलीत बंद करून ठेवले होते. खोलीत एकच खिडकी होती. या अवस्थेत त्यांनी मृत्यू यावा यासाठी परमेश्वराकडे अतोनात याचना केल्या होत्या. शरीराला अनेक ठिकाणी खोलवर जखमा होत्या. त्यातून येणारे रक्त सुकून खपल्या वाढू लागल्या होत्या. ते अपराती वेदनेने विव्हळत ! विश्वनाथाला माहीत नसलेली कित्येक नावं घेऊन त्यांच्याकडे दयेची भीक मागत. त्यांचे ताट भरून आत सोडले जाई. मध्यरात्री ते त्याच मार्गे बाहेर येई. एक दिवस सकाळी विश्वनाथ सकाळी त्या खोलीच्या दारापाशी आला. पायाला ओल लागली. खालच्या फटीतून काळं पडलेलं रक्त वाहत येत होतं.
एका जुन्या लाकडी हातगाडीवर बाबांचं प्रेत त्याने नदीकाठी नेलं. दिवसभर लाकडं गोळा केली आणि सर्यास्ताच्या वेळी एकट्याने बाबांचा विधिवत दाह-संस्कार केला. त्यांचा लोकसेवेचा पायंडा विश्वनाथाने सुरूच ठेवला.
बाबांचे हवेलीवर येणे-जाणे होते. बऱ्याच खोल्या त्याने यंत्राने बंद करून ठेवल्या होत्या.
.....
हेवलीच्या मागल्या दारी घोडा तयार होता. रोजच्या सकाळच्या रपेटीसाठी मोहन खाली उतरू लागला. दारापाशी कधी नव्हे ती काकू उभी राहिली. पोटच्या गोळ्याप्रमाणे त्याचा सांभाळ तिने केला होता. पण गेली काही वर्ष ती देखील त्याच्यापासून अंतर ठेवून होती. त्याला त्याचं स्वातंत्र्य जगू देत होती. त्याच्याकडे दुरून तिचे लक्ष असायचे. व्यवहारात लक्ष घालणे हेवलीच्या बायकांच्या अखत्यारीत नव्हते. त्यांना त्यांचा मान होता. न्यायदानाच्या कामात त्यांना विचारलं जाई. नाती-गोती हा सर्वस्वी बायकांचाच विषय असे. पण आता इथे एकच स्त्री होती. नाती-गोती असुन देखील पारखी झाली होती. फारसं कुणाचं येणं-जाणं नसायचं. दिवसभर कोणत्या-न-कोणत्या कामात स्वतःला व्यस्त ठेवून काकु आपले दिवस ढकलून न्यायची. माहेरून महिन्याला ख्याली-खुशाली चं पत्र यायचं. त्याला उत्तरंही द्यायची. पण कित्येक वर्ष झालीत, जिवाच्या भितीने कुणीही इकडे फिरकत नव्हतं.
काकुला पाहून मोहन थांबला. कित्येक दिवसांनी समोरा-समोर आले. मायलेक नव्हते, ओण त्यापेक्षा कमी देखील नव्हते. आपल्यासाठी या बाईने आपली कूस मोकळी ठेवल्याची जाणीव मोहनला होती. तिच्या त्यागाकडे पाहून त्याला देखील कापरं भरायचं. तो तिच्या शब्दाबाहेर कधीही गेला नाही.
"काकू...!" त्याने अत्यंत नम्र आवाजात तिला हाक मारली. पाठ वळली.
"कुंवर, आत काय चाललंय हे ठाऊक आहे तुम्हाला !"
"हो...!"
" कुठवर चालायचं हे ?"
तो खिन्न झाला. काकूने असा प्रश्न केला, ज्याचे उत्तर फक्त नियतीला ठाऊक होते. तो खाली मान घालून उभा राहिला.
" या वास्तूकडे नीट बघा जरा ! आत रहाणारी माणसं आहेत, यावरून लोकांचा विश्वास केव्हाच उडाला आहे. एक जिवंत समाधी झाली आहे. भावनाशून्य मासाचे गोळे ! समोर चाललेला अमानुष खेळ शांततेत बघावा लागतोय. "
आज काकुला बोलू देणं गरजेचं होतं. हे समजून मोहन शांत चित्ताने ऐकत होता. एक दास घोडा घेऊन गेला.
" त्या मुलीचा काहीच दोष नाहीये कुंवर ! सद्हेतूने ती आपल्याला यातून बाहेर काढायचा प्रयत्न करत होती."
"ठाऊक आहे आम्हाला ! ती स्वतःहून या सगळ्याचा एक भाग झाली आहे आता. आमची इच्छा असूनही आता तिची यातून सुटका आम्हाला करता येणार नाहीये. इथे कुणाच्या मर्जीने सगळे चालते, हे तुम्हाला वेगळं सांगावे ? "
काकू त्याचं उत्तर ऐकून सुन्न झाली.
"मग...! पुढे तिचं काय होणार ? तिचा परिवार...?"
" वेळ...यावर इलाज वेळ आहे. आणि माफ करा काकुसाहेब ! तुम्हाला सगळंकाही ठाऊक असताना देखील तुम्ही हे धाडस केलंत !"
" आम्हाला वाटलं, तुमचा संसार थाटेल. हवेलीत दुडूदुडू पाऊलं धावतील. झालं-गेलं सगळं धुवून निघेल. आमच्या कुशीत बच्चे-कच्चे खेळतील तर आमचाही जन्म...!" काकुला गहिवरून आलं. "एवढेही स्वप्न आम्ही पाहू नये का ? "
"पहावीत , पण तो अधिकार नियतीने आपल्याला दिलेला नाहीये साहेब...!" मोहन तिच्या जवळ गेला. कित्येक दिवस झाले असतील, तो तिच्या कुशीत शांत निजला नव्हता. त्याला देखील स्वतःचं वलय माहीत होतं. घरातील उर्वरित लोकांशी अंतर ठेवून राहू लागल्यापासून त्याच्यातील माणूस देखील संपत चालला होता. काकूच्या डोळ्यासमोर घडून गेलेल्या एक-एक घटना उभ्या राहू लागल्या. पाठमोऱ्या मोहनकडे त्या भरल्या डोळ्यांनी बघु लागल्या.
आलेला दिवस भयाच्या छायेखाली घालवायचा. सकाळी लवकर निघून तो दिवसभर रानात राही. रात्री उशिरा घरी येणं, काही दिवसांपासून नित्याचं झालं होतं. रानातील रोजची माणसं कारण नसताना अंतर ठेवून असायची. शक्यतो सगळी माणसं ! ठरलेल्या जागेवरून रान बऱ्यापैकी दिसायचं. महिन्याचे पाहिले पंधरा दिवस गुण्या-गोविंदाने जात. जशी-जशी अमावस्या जवळ यायची, तसा तो देखील कणा-कणाने क्षीण होत जायचा. अतिशय सूक्ष्मतेने शरीराच्या एक-एक अवयवांचा ताबा सुटत असे. डोळ्यातल्या भावना संथपणे बदलत जायच्या. कानाला वेगळ्याच जगाचे आवाज ऐकू यायचे. त्यांचं धाय मोकलून रडणं, कुणीतरी अमानुष अत्याचार करतंय, त्यावर त्यांचं ओरडणं त्याला स्पष्ट ऐकू यायचं. मुक्त होण्यासाठी आसुसलेल्या एखाद्या आत्म्याच्या आर्त वेदना त्याला कळायच्या. कालांतराने त्याला हे सगळं दिसत होतं. प्रतिशोधाच्या प्रतीक्षेत अनंतकाळापासून स्वतःची असुरी शक्ती पणाला लावून ,वाटेल तसे थैमान घालणारे हट्टी त्याला दिसायचे. गावाच्या वेशीवर जुनी वडाची, चिंचेची झाडं प्रेतांच्या खचाने वाकलेली होती. जुने वाडे ही तसे मोकळे नव्हते. सहज चालताना एखाद्या कोरड्या विहिरीतुन हात बाहेर येत.
एक-एक अवयव असुरी शक्तीच्या अधीन होत असे. अमावस्येच्या आधीचे चार दिवस तो हवेलीत नव्हता येत. आजवर हेवलीच्या भिंतींनी लिहिलेलं सगळं चरित्र त्याला ऐकायला आणि बघायला मिळायचं. तो एकटाच शुद्ध आणि थेट वारस असल्याने , दीर्घकाळ प्रतिशोधाच्या प्रतीक्षेत असलेल्या असुरी शक्ती त्याला मरणासन्न स्थितीत आणून सोडत. त्याचा जीव घेण्याचा अधिकार त्यांना नव्हता. जीव कंठाशी आणून त्याला असाह्य वेदनेत तडफडत ठेवण्याचा त्यांचा कावा प्रत्येक वेळी यशस्वी होत असे. त्याचा जन्म कदाचित याचसाठी झाला होता. वयाच्या बाराव्या वर्षापासून हे सुरू झालं. दहा दिवसांत रोज त्याच्यात रोज थोडा बदल होत असे. आपल्या आजूबाजूला वावरणारी ही श्वापदं नेमकी कोण आहेत ? ती आपल्यालाच का त्रास देतायत ? आपल्याच का दिसतायत ? तो हैराण होत असे. इतर मुलांनी त्याच्यापासून अंतरावर रहाणं ठरवलं होतं. तद्नंतर ते कायमचे दूर गेले. शरीरातून येणारा दुर्गंध, उभ्या-उभ्या नाका-कानातून लागणारी धार, हाता-पायाची कातडी निघणे हे प्रकार किळसवाणे होते. साधारण चार महिन्याने त्याने स्वतः त्या काळात बंदिस्त रहाण्याचे ठरवले. कित्येक वर्ष तो हे सगळं भोगतोय.
त्याला आजवर अमावास्येला कुणीही पाहिलं नव्हतं. हेवलीची दारं दोन्ही बाजूनी घट्ट बंद असायची. नोकर-चाकर देखील आत यायचे नाहीत. संध्याकाळी देवासमोर दिवा लागत नसे. सूर्यास्त झाला की एकही साधारण जीव आत डोकावुन बघत नसे. हेवली एखाद्या पडक्या खंडरासारखी स्वतःवर होणारा अत्याचार सहन करत रात्र काढत असे. अमावस्येच्या रात्री तो पूर्णपणे असुरी शक्तींच्या अधीन व्हायचा. त्याच्यातील मूळ मानव काहीकाळ मृतावस्थेत जाई. त्यावेळी तो हवेलीच्या खालच्या भागात असलेल्या तळघरात स्वतःला डांबून घेई. एक भुयारी वाट तिथून थेट किल्ल्याकडे जायची. त्याला तोच एक मार्ग होता. एकदा काकूने स्वतः त्या भुयारातून प्रवास केला होता. जागो-जागी पडलेला हाडा-मासाचा खच, दुर्गंधी ,फाटलेले कपडे, सुटलेले दागिने, फुटलेल्या बांगड्या तिने पहिल्या. कोणत्याही सामान्य माणसाच्या सहनशीलतेपलीकडे ते सगळं होतं.
काही वर्षांपूर्वी जे आटोक्यात येण्यासारखं होतं ते आता हाताबाहेर गेलं आहे, हे काकूने त्वरित ओळखलं. तो पूर्ण श्वापद झाला होता. त्या असुरी शक्तीने त्याचा पूर्ण ताबा घेतला होता. वाढत्या वयासोबत कणा-कणाने तो त्या शक्तीच्याच मार्गावर चालू लागला होता. त्याची भूक दिवसेंदिवस वाढत होती. ती शक्ती त्याच्या मार्गाने स्वतःच्या क्रूर वासना पूर्ण करून घेत होती. अचानक गावातून नाहीश्या होणाऱ्या लेकीबाळी ,भुयारात अत्यंत हिंस्त्रपणे मोडल्या जात होत्या. हसाय-खेळाच्या वयात या नराधमाच्या तावडीत आपसूक सापडत होत्या. घरच्या-घर उजाड पडत होती. दुःखाच्या आवेगात हवेलीची सगळी सुखं पत्त्याच्या बंगल्यासारखी लीलया वहात जात होती.
"याला अंत नाहीये...!" त्रासून शेवटी काकूने सगळी हकीगत विश्वनाथच्या बाबांना सांगितली. होनाजी हाडाचे वैद्य होतेच, पण गूढविद्येचे गाढे अभ्यासकही होते. खूप कष्टाने काकूने हा प्रकार त्यांच्या कानी घातला. बाहेर गावात आणि पंचक्रोशीत कुणाला काही कळलं तर, त्या सोबत लोक आपला देखील जीव घेतील, ही धास्ती आता काकूच्या मनात घर करू लागली होती. तसं आलेलं मरण अत्यंत दुर्दैवी ! हेवलीच्या आत, रात्री-अपरात्री सुरू असलेली गूढ खलबतं भयास वाट करून देत होती.
"मला तरी जवळ-पास याचा काहीही अंत दिसत नाही." होनाजीनी आपली सगळी विद्या पणाला लावली. "कारण सरकार हे स्वतःहून करत नाहीयेत. यावर त्यांचा अंकुश नाहीये. हे सगळं त्यांच्याकडून करवून घेतलं जातंय."
"कोण...? कोण करतंय हे सगळं ?"
" सरकार, त्या हेवलीचा इतिहास जरा चाळा ! कित्येक निर्दोष जीव आहेत ! जे अनंतकाळापासून इथे अडकून पडले आहेत. त्यांचा हकनाक गेलेला बळी हे सगळं करवतो आहे. त्यांचा तळतळाट हे सगळं करवतो आहे ! त्यांच्या वेदना याला कारणीभूत आहेत ! "
एक अशुभ दिवस पाहून होनाजी हेवलीच्या बाहेर उभा राहिला. सूर्यास्त होऊन गेला होता. आपल्या पिशवीतून त्याने गंगाजल बाहेर काढले. दरबानाने दारं उघडली. होनाजी मध्ये आला. त्या शिशीत असलेलं गंगाजल , त्याचे पाय आत पडताच उसळी मारू लागलं.
"गंगोत्री सारखे पवित्र या पृथ्वीवर दुसरे काहीही नाही. यासारखे जहाल देखील दुसरे काही नाही. ज्याने या विश्वाची आखणी केली, देव-दानव, सूर-असुर, सजीव-अजीव ज्याने घडवले, त्या महादेवाच्या जटेतून निघून ही जिथे पडली, त्याच अविरत धारेची शाखा आहे यात." शिशीकडे बघत तो म्हणाला.
ती शिशी घेऊन होनाजी हेवलीभर फिरला. भिंतीमध्ये दडलेले, छतावर असलेले, जुन्या ,बंद कपाटात असलेले, न्हाणीघरात ,उंबऱ्यावर, सगळीकडे दडून बसलेले कित्येक जीव अस्वस्थ होऊ लागले. होनाजीच्या हातात गंगाजल असल्याने त्यांच्याजवळ येण्याची हिंमत कुणाची झाली नाही. सुमारे तास-दोन तास पायपीट झाली. तळापासून गंगाजल आता आपला रंग बदलू लागलं. असुरांच्या प्रवृत्तीची सावली त्यासही सहन झाली नाही. बोटभर शिशी ! कितीवेळ टिकायची ? त्याच्या उसळ्या वाढू लागल्या. एक प्रयोग म्हणून होनाजीने शिशीचे झाकण थोडे ढिले केले. गंगाजलाची धार उसळून खाली जमीनीवर पडली. चिमणीच्या उजेडात होनाजीने खाली वाकून त्याकडे पाहिले. जमीनीवर पडताच ते तेजाबासारखे जळून मातीत मिसळले.
"जिथे हे कोवळे गंगाजल देखील जळून राख झाले, तिथे तुमच्या-माझ्या माणसाची काय गत ?" बाहेर येऊन होनाजीने रुधिरासारखी लाल झालेली ती शिशी काकूच्या हातात ठेवली. हाताचा स्पर्श होताच काकूने ती सोडली. ती उकळत होती. काकूच्या हाताला भाजलं.
" हे खूप-खूप प्रभावी आहे. खूप शक्तिशाली आहे ! इतके, की निरागसतेची शून्य सुरवातच कदाचित याच्या समोर टिकून राहू शकेल. पाप, अपराध, अमानवीयता, असुर, यांचा इतका प्रभाव मी कधीच ऐकला नाही."
क्रमश....
लेखन :अनुराग वैद्य