महालगड 12
संवेदनहीन शरीर हिरोजीने एका ओट्यावर ठेवलं. प्रत्यक्ष मृत्यूपेक्षा मृत्यूची वाट बघण्याची क्रिया जास्त भयावह असते. शरीराला होणाऱ्या वेदनांहुन अधिक क्लेश कुठेच नसावा. निपचित पडलेल्या बिजलीच्या शरीराचे एकएक अवयव निकामी होत चालले होते. काळजाच्या जागी धोंडा असलेल्या हिरोजीकडे ती हीन भावनेने बघत होती. इथे तिच्यावर नेमका काय प्रयोग होणार होता ,हे त्यालादेखील ठाऊक नव्हते. सगळ्याच वेदना आणि आजपर्यंत केलेलं पुण्य एकवटून तिने मनोमन त्याला शाप दिला. एक आजण बालकाला तिच्या आईपासून वेगळं करण्याचं पातक, एक निशस्त्र, बेसावध स्त्रीला पळवून आणण्याचे पातक, तिचे सतीत्व विच्छिन्न करण्याचे पातक ! किल्ल्याच्या आत:पुरात , दगडी भिंती ढिम्मपणे उभ्या होत्या. वीस फूट उंची असलेला तो, एकेकाळचा दरबार असावा. मोधोमध असलेल्या त्या ओट्यावर बिजली आपल्या नियतीची वाट बघत पडून होती. डाव्याबाजूने काही हालचाल झाली. कमरेत वाकून हिरोजी एक-एक पाऊल मागे सरकू लागला. सुमारे पाच पाऊलं मागे सरकून तो बिजलीस पाठ दाखवून निघून गेला. जाताना ते अजस्त्र दार त्याने बाहेरून ओढून घेतले.
साखळदंडाने अक्षरशः झाकलेली एक सहा फुटी सावली पुढे सरकू लागली. मोजका उजेड असल्याने त्याला बघणं शक्य नव्हतं. साखळ्या वाजत होत्या. आवाजावरून त्या किमान दोनशे वर्ष जुन्या असतील. अर्धवट उघड्या डोळ्यांनी तिने त्या नारभक्षकाचा देह पहिला. त्याचे नग्न शरीर झाकण्यासाठी फाटलेल्या घोंगड्या त्याच्या भवती शिवून गुंडाळल्या होत्या. अंगातून उग्र दर्प सुटला होता. केस वाढून चेहऱ्यावर आले होते. त्याचे हात माणसाचे नव्हते. तळहात लाल-काळे होते. हाताची नखं देखील मांसाहारी होती. शरीरं ओरबाडून काढण्यास त्याला ती हवी होती. किमान उघडे असलेले तळवे, तेजाबात बुडून भाजून निघाले असावेत. त्यावर मोठं-मोठाले फोड होतेच, त्यातून राहून रक्तस्त्राव होत होता. त्याने बिजलीभवती प्रदक्षण घातलं. हिचे काय करावे, याचा विचार तो करत असावा ! कुठल्यातरी दुर्धर आजाराने ग्रासलेल्या सारखा त्याचा चेहरा अमानवी होता. शेकडो वर्ष कुणीतरी त्याच्या चेहऱ्यावरच्या जखमा कुरतडत असावं. त्यावर खपल्या बसत नव्हत्या. त्याला भान होतं त्याच्या कर्माचं ! पण तो निर्दयी होता. भावनाशून्य होता. कारण तो मनुष्य नव्हता.
साधारण तीनदा बिजलीभवती गोल फिरून तो तिच्या डाव्या बाजूला गुडघे टेकून बसला. बिजलीच्या डोळ्यातील बाहुल्या आकार बदलू लागल्या होत्या. त्याने तिच्या छातीवर हात ठेवला. तिच्या अंगातील उसळत्या रक्तप्रवाहाने त्याची , ती अजूनही जिवंत असल्याची खात्री पटली. त्याचा तो दानवी देह बिजलीवर स्वार झाला.
दुपार झाली. ऊन मध्यावर आलं. त्याचा भोग उरकला होता. त्या ओट्याच्या चहूबाजूनी रक्ताचे ओघळ वाहून मातीत मिसळू लागले. बिजलीचे सगळे कपडे त्यात बुडून लाल झाले होते. शरीराचा प्रत्येक भाग अतोनात वेदनांना बळी पडला होता. प्रत्येक भागावर त्याने ओरबाडल्याने ओले, साधारण बोट-बोट भर ओरखडे होते. ओट्याखाली लोम्बणाऱ्या तिच्या केसांमधून देखील रुधिरधारा वाहत होत्या. ती कदाचित खूप आधी गतप्राण झाली होती. पण शरीर पूर्ण नष्ट केल्याखेरीज त्याला शांतात मिळाली नाही. त्याची वासना शमली. तो उठला. जिकडे त्याला जायचं होतं, तिकडे पाहून त्याने एक गगनभेदी आरोळी ठोकली. त्याचा आवाज त्या बंद दिवाणखान्यात घुमला. पायाने धरून त्याने बिजलीचं प्रेत दारापर्यंत आणलं. दोन्ही हातानी दार हलवू लागला. त्याच्या हुजऱ्याला हा इशारा कळला. काही वेळाने तो उठला. तिला बाहेर आणलं. धोक्याच्या खुणे पाशी बांधलेल्या घोड्यावर तिला लादलं आणि रस्ता धरला.
किल्ल्याबाहेर पसरलेल्या वाळवंटात एक विशिष्ट प्रकार चा पांढरा विंचू सापडत असे. एखाद्या नागच्या विषाला देखील मात देईल, असे विष त्याच्या नांगीत होतं. त्याने जीव जात नव्हता. मानेवर मारल्यास, सरळ मेंदूच्या रोखाने या विषाचा प्रवास व्हायचा. क्षणात शरीराच्या सगळ्या सचेत हालचाली बंद व्हायच्या. एकएक अवयव , पापणी लवायला देखील इतका वेळ लागत नसेल, तेवढ्या वेळात निकामी होत असे. मन आणि विचार मात्र सुरू असायचे. माणसाला मानसिक धक्के आणि वेदना होत होत्या, पण शारीरिक प्रतिकार मात्र करता येत नसत. दोन दिवस बिजलीच्या प्रेतास हिरोजीने जमेल तसं शिवलं. जखमा स्वच्छ केल्या. बिजलीच्या प्रेतातून देखील त्याला तळतळाटाचा उद्रेक भासत होता.
कर्म मागे सावलीसारखे धावत असते. अंधारात देखील स्पष्ट दिसावी, इतकी ती सावली गडद असते. त्याच्या पाशातून देवादिकांची सुटका झाली नाही, मानव तर पापाचा पूर्णाकृती पुतळा आहे. हिरोजीच्या बाबतीत हेच घडलं. विषाने सुरू झालेला खेळ अखेर विषाने अंताकडे नेण्यास सुरवात केली.
" अरे, देवाला नसशील घाबरत, तर आपल्या स्वतःच्या कर्माला तरी घाबरून रहा." बिजलीच्या प्रेतासमोर आकांत करत असलेली यमाबाई त्याला कोसू लागली. "जन्माला येण्यापरिस तुझ्या आईची कूस जळाली असती तर कित्येक पोरी-बाळी वाचल्या असत्या." तिचं हे बोलणं इतर कुणालाही ऐकू गेलं नाही. पण गच्चीतून कुणीतरी हे सगळं पहात होतं. निष्पाप जीवांची झालेली दैना आणि शरीराची झालेली विटंबना मनाच्या चिंध्या करणारी होती. लहानग्या दुर्गाला पाहून मन हेलावून जात होते. डोळ्याच्या कडा ओलावल्या. काळजाचे ठोके सारखेच चुकत होते. अजून अनभिज्ञ असलेली ती साडेतीन वर्षाची पोर ,यमाबाईच्या कुशीत मुटकुळं करून इतरांचा आक्रोश बघत होती. तिला बाहेर देखील कुणी आणलं नाही. एका नोकराकरवी काकूने सगळी व्यवस्था पाठवली. रात्रीतून बिजलीचा अंतविधी झाला. दुर्गा हेवलीच्या आवारात खेळू लागली.
दुसऱ्या दिवशी रात्री हिरोजी आपल्या झोपडीत मदमस्त पहुडला होता. दारावर पडलेल्या थापेने तो सावध झाला. अर्धी रात्र उलटली होती. या वेळी सहसा कुणी घराबाहेर पडत नसत. त्याने दार उघडलं. सगळी सामसूम होती. त्याने दारामागची कुऱ्हाड काढली आणि ओट्यावर आला. काळोख भरात होता. चहूबाजूनी नजर फिरवली. कुणीही नव्हतं. अचानक दोन बाण हवेत सुटले. काही कळायच्या आत हिरोजीच्या मांडीत ते आतपर्यँत घुसले. बबाजुला असलेल्या झाडाच्या आधाराने तो उभं राहू लागला. एक मशालजी आणि सोबत काकू त्याच्या समोर येऊन उभ्या राहिल्या.
"खरंतर याहून भयानक शिक्षा तुला झाली पाहिजे. पण जीव घेणारे आम्ही कुणी नाही. तुझा न्याय परमेश्वर करेल. पण दंड मात्र आम्ही दिला तर चालेल !"
मशालजीच्या मागून आलेल्या चार भालकऱ्यानी हिरोजीला फरफटत बैलगाडीत टाकलं. अर्धा शक्तीहीन झालेला हिरोजी आपली कर्म आठवून रडू लागला. घोड्यावर स्वार होऊन काकू पुढे जाऊ लागल्या.
" मरण येईल तेव्हा येईल. तुझ्या मरणयातना मात्र सुरू झाल्या तुझ्या !" हिरोजी तळघरात बंद झाला.
....
पिढ्यांपिढ्या असंख्य हिरोजी आपल्या भाकरीला जागत होते. नजरेच्या टप्प्यात आलेल्या सावजाला त्या पिशाच्चा पुढे नेऊन सोडत होते. दर अमावास्येला एक निष्पाप जिव आपला करुण अंत स्वतःच्या डोळ्याने पहात होता. किल्ल्यातील ही मृत्यू-शुंखला तुटता तुटत नव्हती. आजूबाजूच्या गावात देखील भय वणव्यासारखे पसरले होते. किल्ल्यापासून एक अंतर ठेवून होते. हेवलीपासून देखील चारहात लांब होते. आजूबाजूची एक-एक गावं ओस पडत चालली होती. किल्ल्याची सावली जिथंपर्यँत जात होती, त्या भु-भागावर एकही जीव जगत नसे. भयाचे विष हवेत, पाण्यात, जमिनीत पसरले होते. कित्येक लोकांनी त्या पिशाच्चाची किळसवाणी किंकाळी ऐकली होती. काही वीरांनी किल्ल्याच्या आवारात जाऊन याचा छडा लावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची छिन्न झालेली प्रेतं गावकऱ्यांच्या हाती लागली. साधारण दहा कोसांपर्यंत महालगड कुप्रसिद्ध होता.
त्या संध्याकाळी वृंदा किल्ल्याकडे बघत बसली होती. दुरून शांत , शुद्ध आणि अथांग दिसणारा तो अजस्त्र दगडाचा पसारा आतून अत्यंत क्रूर आणि पाशवी होता. त्याच्या या दयाहीनतेची पाळ-मूळं सुमारे साडेतीनशे-चारशे वर्षापूर्वी ,मानवाच्याच दुष्कृत्यात दडलेली होती. एकामागून एक शाप आणि वणवा लागावा तसा त्या हवेलीच्या भिंतींना पोखरत होते. कित्येक जणांना हे माहीत असुनही ,केवळ त्यावर आज इलाज नाही, म्हणून सगळंकाही सहन करत आले होते. गावातल्या लोकांच्या भेदरलेल्या नजरा, वाचा फुटली नाही असा विरोध, घृणा, हे सगळं ती हवेली सहन करत आली होती. आतल्या माणसांना आतून पिळवटून काढणारी भीती, त्यांची भयाच्या सावलीत होणारी एकाकी जागरणं, पावला-पावलावर सुटत चाललेला मानसिक तोल ही सोबतीला होताच. भयाचे हे नाट्य संध्याकाळच्या आभाळासारखे होते. एकीकडे बुडणारा सूर्य आपले सौंदर्य कोपऱ्यात घेऊन बसला होता. दुसरीकडे तेच आभाळ काळोखाच्या छायेपासून लांब पळू पहात होते.
अंधार व्हायच्या आत जवळ-जवळ सगळेच गावकरी आपल्या घरी परतत. अंधार झाल्यावर शक्यतो कुणी बाहेर पडत नव्हता. लहान मुलं, गरोदर स्त्रिया यांना वेशीबाहेर जाण्याची परवानगी नव्हती. मावळल्यावर तर अजिबात नाही. वृंदा गच्चीतून सगळं बघत होती. गायी आपल्या पाडसासोबत छान डुलत घरी परतत होत्या. पाखरंही आपल्या झाडांवर जाऊन आपल्या पिल्लांना कुशीत घेऊन संध्याकाळचा सोहळा साजरा करत होते. घरी येताना देवाला जाऊन येणारे घंटानाद करीत होते. महादेवाचे मोठे मंदिर होते तिथे. त्याचा कळस गच्चीवरून दिसत होता. "त्या मंदीरात जाऊ का मी..?" वृंदा खाली आली आणि काकूंना विचारलं. काकूंना तिची ही कल्पना रुचली नसावी. "हो, पण तुमच्या आईंना सोबत न्या...!" मोठ्या कष्टाने काकूंनी परवानगी दिली. पण सोबत दोन गडी देखील पाठवले.
पूर्ण दगडी बांधकाम असलेले हे मंदिर ! कुठेही वेगळा रंग नाही. दृष्टीकक्षेत आल्यावर, पहिल्यांदा पाहिल्यावर कुणालाही वाटावं, की हे सगळं एका रात्रीत कोरलेलं आहे. इतकं एकाग्रचित्ताने , सगळं नक्षीकाम तंतोतंत सलग झालेलं होतं. मुख्य मंदीराच्या समोर असलेल्या नदीच्या मस्तकातून वृंदाने शिवलींग पाहिले. तिच्या मनातली बरीच भीती इथे कमी झाली. मंदिरात आलेले लोक तिच्याकडे आश्चर्याने बघत होते. 'त्या' हवेलीतून सहसा कुणी मंदिरात येत नसत. तिने दर्शन घेतलं. उलट्या पावलाने ती मागे आली. हात जोडून उभं असताना तिला मागे कुणीतरी उभं असल्याचा भास झाला. तिने मागे वळून पाहिलं. सोनेरी जरी असलेलं पांढरं धोतर घातलेली एक व्यक्ती तिला जवळ-जवळ खेटून उभी होती.
"कुठेही बघू नकोस. अगदी तुझ्या आईला आणि त्या दोन गड्यांना देखील नाही."
"कोण आहात तुम्ही, आणि असं इतक्या जवळ येण्याचं कारण काय ?" वृंदाला त्याचं जवळ येणं अजिबात आवडलं नव्हतं.
" मी कुणीच नाहीये. न नाव, न गाव ! पाहिलं तर मी दिसेल सगळीकडे, नाही पाहिलं, तर मी नाही दिसणार..!"
त्याच्या या चमत्कारिक बोलण्याने वृंदा जास्त चिडली. त्याला टाळून ती सरळ तिच्या आईकडे गेली.
"तिला स्पर्श नको करुस..! तिला काहीही जाणवणार नाहीये." आधारण पाच ते सहा फूट अंतरावर तो उभा होता. पण त्याचा आवाज वृंदाच्या अगदी कानाजवळ आला. आता ती पूर्ण घाबरली होती.
"बघायचंय अजून काही...? बघ वळून."
वृंदाचा तिच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. तिची एक प्रतिकृती आईच्या बाजूला बसुन तिच्याशी गप्पा मारत होती. तिने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं.
"या जगात चमत्कार नसेल, तर कुणी नमस्कार नाही करत वृंदा." वृंदा भोवताली बघू लागली. सगळीकडे तो दिसत होता. गाभाऱ्यात शिवलिंगावर दूध वहाताना, घंटा वाजवताना, शंखनाद करताना !
"धोका नाहीये तुला माझ्यापासून!" तो शांत चित्ताने बोलला.
"काय आहे हे सगळं...?"
"माया..…! हे सगळं विश्व एक माया आहे वृंदा. डोळ्याला दिसणारं सारं काही सत्य नसतं. काही भासही असतात. आणि जे उघड्या डोळ्यांना दिसत नाही, ते सत्यात एक विदारक सत्य म्हणून समोर येतं." वृंदाने समोरच्या आरश्यात पाहिलं. तो तिला दिसला नाही. तिने भुवया उंचावल्या. त्याने तिथल्याच एका दीपस्तंभाची पणती हातात घेतली. ती हवेत नेऊन तिच्याखालचा हात त्याने काढून घेतला. ती पणती हवेत तशीच वाऱ्याशी खेळत राहिली.
"आपण कुठे आहोत, आणि हे सगळं काय आहे?"
" बोललो न मी, माया आहे ही...! सध्या तू माझ्या मयपाशात आहेस. तूझं खरं स्वरूप कुणालाच दिसणार नाहीये. आणि इतरत्र सुद्धा तुझा सहज वावर ,हा तुझ्या सूक्ष्म स्वरूपाचा आहे. ते स्वरूप मायावी आहे, जे आपली भेट संपताच विरून जाईल. पण तोवर तुला माझ्यासोबत रहावं लागेल."
वृंदाकडे काहीही दुसरा पर्याय नव्हता.
" काय काम आहे...!"
" मोहन....!"
वृंदाला खात्री होतीच. " मोहन साठी तुझी तळमळ मी पहिली आहे. अगदी निस्वार्थपणे तू या सगळ्या भयनाट्याचा भाग होत चालली आहेस." वृंदा काहीही बोलली नाही. "तुला मी माझ्या मयपाशात आणलं आहे. इथे तुला तुला हवी असलेली उत्तरं सापडतील, विश्वास आहे मला !"
पुढे आई, वृंदाचं मायावी रूप आणि ती माणसं चालली होती. मागे वृंदा आणि तो ! गावात फिरताना वृंदा चहूकडे बघत होती. पाहिल्यांद तिला अडवी गेली, ती म्हातारी दिसून आली. तिचं रूप सुंदर होतं. चेहऱ्यावर तेज होतं. ती प्रसन्न वाटत होती.
" एक अंतरात्मा असतो. तो मूळ स्वरूप असतो. बाहेरील त्वचा, शरीर हे रहाणीमानानुसार बदलत जातं. तुला काहीकाळ तुझ्या आजूबाजूला वावरणाऱ्या माणसांची खरी रूपं दिसतील. घाबरू नकोस. ते काहिही करणार नाहीत तुला. तुझ्याशी त्यांचं काहीच कर्तव्य नाही. तुझ्या भूत-वर्तमान आणि भविष्याशी त्यांचं तो पर्यंत काही घेणं देणं नाही, जो पर्यंत तू आत्मरूप आहेस. पण तू यातून बाहेर पडलीस, की मात्र हे तुला आपल्या पाशात ओढत जातील."
वृंदाला अनेक लोक दिसले. काही अत्यंत विद्रुप झाले होते. काहींची किळस यावी, इतके ते गलिच्छ होते. काहींची अत्यंत बिकट दैना होती. शरीराचा पिंजरा झाला होता. हात-पाय अर्धवट जळाले होते. डोकी अर्धी फुटली होती. काहींचे डोळे नव्हते, त्याजागी खाचा होत्या. पुढे गेल्यावर उकिरडा लागला. तिथे खूप गर्दी होती. खाली पडलेली काही प्रेतं होती. काही जण त्यांच्या आजूबाजूला बसून त्यावर ताव मारत होती. वृंदाला त्यांच्याकडे पाहून दया आली.
" हे असं, प्रेत खाण्याची वेळ यांच्यावर ?"
"चूक करते आहेस. वेळ त्या प्रेतांची नाही, त्यावर पोट भरणाऱ्या या नराधमांची वाईट आहे. यांच्यातील हव्यास, स्वार्थ, लालच यांना इथे घेऊन आला आहे. ययांच्यात असलेली लालची प्रवृत्ती , वास्तवात यांच्याकडून अशीच पापं करून घेत असते. यांची शिक्षा यांना मिळेल." माणसाचे खरे स्वरूप पाहून वृंदा त्रासली. हे माणसाचं सत्य आहे ! हे माणसाचं अंतर्मन आहे, किती दूषित, कलुषित आणि शापित...! वरून सुंदर आणि सात्विक भासणाऱ्या या माणसांचा अंतरंग इतका वेगळा आणि भयानक असू शकतो, हे देखील तिला कळलं.
पुढे गावाच्या पारावर तिला काही लोक बसलेले दिसले. तिथे 'त्या'ची अनेक रुपं त्या लोकांशी संवाद साधत होती. वृंदा त्यांच्याकडे बघत क्षणभर थांबली.
" ही ती माणसं आहेत, जी अंतर्बाह्य सारखी स्वरूपाची आहेत. स्वभावाने स्पष्ट, पण कोणासही त्रास न देणारी. यांच्यात बळ आहे, पण अहंकार नाही. प्राप्ती आहे, पण दानदेखील आहे. शरीराने कणखर असली, तरी यांची मनं खऱ्या अर्थाने कोमल आणि सात्विक आहेत. मी यांच्यामागे असतो नेहमी. कदाचित यामुळेच मी तुझ्या सोबत आहे.
"पण तुम्ही आहात तरी कोण...?"
यावर तो स्मित हसला.
" आत्तापुरतं एवढेच, की मी देव नाहीये."
पुढे चालून गेल्यावर त्याने वृंदाला एक जागा दाखवली. ही तीच जागा होती. वृंदा त्या जागेकडे बघू लागली.
क्रमश...
लेखन :अनुराग वैद्य