महालगड भाग 11
त्या रात्री ठरवून वृंदा झोपली. मध्यरात्र उलटली. बाहेर सगळी शांतता झाली होती. सैर-भैर करून सोडणारा वारा , एकदम शहाण्यासारखा शांत होऊन बसला होता. चांदणं जमिनीवरच्या हालचाली टक लावून पहात होतं. साधं एखादं जनावर सुद्धा कुठे दिसत नव्हतं. त्यांचा आवाज सुद्धा नव्हता. समया स्थिर होत होत्या. त्यांच्या भवती लाळघोट करणारे पतंग बाजूच्या अंधरात एक-एक करून स्वतःला जाळून घेत होते. तेवढीच काय ती हालचाल होती.
वृंदाने डोळे लख्ख उघडले. बाजूला आई तिकडे कूस करून झोपली होती. वृंदा अतिषय सावधपणे उठली. पलंगावरून पाय खाली ठेवताना , पावलांचा देखील आवाज होणार नाही, याची पूर्ण काळजी घेत ती दाराशी आली. दोन्ही बाजूंना भयाण शांतता होती. अगदीच अंधार नसावा म्हणून दोन्ही कोपऱ्यांना मशाली लावून ठेवल्या होत्या. पण सहसा त्यांचा उपयोग व्हायचा नाही. अंधार झाल्यावर फेरफटका मारावा, अशी ती जागाच नव्हती. पाच फूट बोळ , दोन्ही बाजूंनी ठराविक अंतरावर काही खोल्या, ज्यांना जुनी ,गंजलेली कुलूप अडकवली होती, आणि शेवटी खाली जाण्यासाठी एक आणि मागच्या अंगणात उरतायला एक, अश्या दोन जिन्यांचा बंदोबस्त तिथे होता. उंची तशी बरी होती. वर जुनी झुंबरं बारीक किणकिण करत डोलत होती. त्यावर साचलेली धूळ खूप जुनी होती. दिवसरात्र वाऱ्यावर अलगद झुलणारी ती झुंबरं त्या हवेलीच्या जुनाटपणाची एक खूण होती. वारा नसला तर किणकिण कोणाच्यातरी अगंतुक अस्तित्वाची नांदी देत असे.
डाव्या बाजूच्या कोपऱ्यात वृंदा पोहोचली. आज तिने आयुष्यात पाहिल्यांदा एखादं धाडस करण्याचं ठरवलं होतं. दोन्ही बाजूला असलेले खोल अंधारले जिने पाहून क्षणभर तिलाही धडकी भरली. पाहिले पाऊल खाली पडताच तिची भीती काळजात घर करू लागली. एकूण दहा पायऱ्या होत्या. दबकत ती पायऱ्या उतरू लागली. मशालीची सीमा आता संपत आली होती. आठव्या पायरीवर एक छोटं दार तिला दिसलं. त्याला असलेली लोखंडी कडी भक्कम होती. दार इतकं लहान होतं, की वाकून जाण्यावाचून पर्याय नव्हता. दार जुनं होतं. बिजागऱ्या गंजलेल्या होत्या. दारात जोर होता. वृंदाने मोठ्या कष्टाने , आवाज न करता दार उघडले. आतून गार वाऱ्याची झुळूक सुरू झाली. आपल्याला आत जाता येईल,इतकं दार उघडलं गेलं.
हा हवेलीच्या तळघरात जाणार एक गुप्त जिना होता. सहसा इकडे कुणी फिरून पहात नसे. दारातच सुरू झालेली कोलाष्टकं हे सगळं हेरून होती. इथल्या पायऱ्या वरच्या पायऱ्यांपेक्षा थोड्या रुंद होत्या. दोन माणसं ये-जा करू शकतील, इतकी जागा तिथे होती. प्रत्येक पायरीला लोखंडाची एक गंजलेली साखळी होती. पदरात लपवून आणलेली मेणबत्ती वृंदाने बाहेर काढली. जवळच्या काडीपटीने ती पेटवली. थोडं खाली उतरून आल्यावर तिला एक आवाज येऊ लागला. कुणाच्यातरी दीर्घकाळी यातना होत्या त्या ! आपल्याला यापासून धोका नसल्याचा अंदाज तिने बांधला. आवाजाच्या दिशेचा अंदाज घेऊन ती खाली सरकू लागली. मेणबत्तीच्या किंचित उबेने छतावर लटकलेल्या वाघुळात हालचाली होऊ लागल्या. कदाचित तिऱ्हाईताचे येणे त्यांनी हेरलं होतं. त्यांच्या पंखांची फडफड वाढू लागली. दबक्या पावलांनी उतरत ती तळाशी आली. पुढे काहीही दिसत नव्हते. मेणबत्तीच्या उजेडाभवती होता, तेवढाच उजेड दिसत होता. प्रचंड धूळ होती. आजूबाजूच्या भिंती गार पडल्या होत्या. काही जुनी मोडलेली कपाटं , जुनी तांब्याची मोठी भांडी, मोठे साखळ-दंड असं बरंच समान अस्ताव्यस्त पडलं होतं. तो कण्हण्याचा आवाज थोडा जवळ येऊ लागला होता. न भीता वृंदा त्या आवाजाकडे सरकत होती. वेध घेत तिला कळलं की आवाज आता समोर आहे.
तिने मेणबत्ती थोडी पुढे सरकवली. अत्यंत जीर्ण झालेला देह तिला एक मातीच्या ओट्यावर पहुडलेला दिसला. त्याच्या काळजातून एक चरक बाहेर पडली. तो तिथे पडून होता. तिच्या येण्याची वर्दी त्याला हवेत भिनलेल्या तिच्या सुवासाने दिली होतीच. पण त्याने तिच्याकडे विशेष लक्ष दिलं नाहीच. तो जिवंत होता, हेच खूप होतं. वृंदाने त्याच्याजवळ जाऊन मेणबत्ती धरली. तिच्या अंगात असलेलं उरलेलं बळही तेव्हा गळून पडलं.
पन्नाशी उलटून गेली होती त्याची. त्वचा लोंबकळत चालली होती. गाल उरलेच नव्हते. सारखा अंधार बघून डोळ्याच्या पार खाचा झाल्या होत्या. त्यात हिरवी बुबुळं , काही दुसरं दिसेल याची अपेक्षा सोडून मूक वेदनांमध्ये विलीन झाले होते. वृंदाला कडेने डोळे दिसले आणि तिच्या मनातली भीती मावळली. प्रचंड वाढून छातीवर विसावलेली त्याची पांढरी दाढी त्याच्यापेक्षा जास्त वयस्क वाटत होती. त्यात सुरकुत्यांचं जाळं असलेला चेहरा आणि सुकलेले ओठ झाकले गेले होते. छातीवर असलेल्या माळेवर त्याचे हात स्थिरावले होते. प्रत्येक मण्यासोबत एक वेदना बाहेर येत होती. आवाज जवळ-जवळ मावळला होता. बोलायला काही उरले नसावे. अंगात त्राण होते, पण प्रत्येक क्षण प्राणहीन झाला होता. हाताला लागेल असा एक माठ आणि त्यावर एक मातीचं मडकं ठेवलं होतं. त्याच्यावर तेवढी दया दाखवली होती.
"हिरोजी...!" अतिशय हलक्या आवाजात वृंदाने त्याला हाक मारली. डोळ्याच्या काही हालचाली झाल्या. पण त्या उत्कंठाविरहित होत्या. इतर काहीही क्रिया त्याने केली नाही. पाण्यासाठी काळे पडलेले ओठ हल्ले. वृंदाने मेणबत्ती त्या ओट्याच्या कडेला लावली आणि हात लांबवून माठातून पाणी काढलं. त्याच्या ओठाशी धरलं. ते गिळून तो तसाच निपचित पडून राहिला. " तुला इथे कुणी आणलं...?" तो काहीच बोलला नाही. त्याच्यात त्राण नव्हतेच काही. हाताची बोटं चालवित होता. वृंदाने त्याच्या तोंडापाशी मेणबत्ती नेली. तो काहीतरी दाखवत होता. मेणबत्ती तशीच त्याच्या अंगाच्या कडेने खाली सरकली. अंगाची कड संपली आणि वृंदा जोरात ओरडली. तिच्या ओरड्याने अख्खं तळघर हादरलं. वर आरामशीर लटकलेली पाखरं सावध होऊन गोंगाट करू लागली. त्यांची समाधी भंग झाली आणि ते सैर-भैर होऊन उडू लागले. वृंदाला दरदरून घाम फुटला.
हिरोजीच्या मांड्यांखालचं शरीर नव्हतं.
तिला काय करावं सुचेना. भेदरलेल्या अवस्थेतच तिने धक्क्याने खाली पडलेली मेणबत्ती उचलली. ती विझल्याने सगळा अंधार झाला होता. इतका गडद, की डोळ्यापुढे फक्त काळं दिसत होतं. लगबगीने वृंदाने कमरेला असलेली काडीपेटी बाहेर काढली आणि काडी उगाळली. हाताला कापरं सुटल्याने ते नीट जमलं नाही. काडी पेटली. मेणबत्तीही हाती लागली. उजेड पूर्वरत झाला. दुःख आणि भय, या दोन्ही भावना वृंदाच्या मनात झगडू लागल्या.
"हिरोजी, हे काय ए सगळं...?" तिने मोठ्या हिमतीने त्याला विचारलं. त्याला उत्तर देण्याची इच्छा झाली पण काही बोलता येईना. तिने पुन्हा थोडं पाणी त्याच्या ओठांना लावलं.
"पाप ए हे...!" हिरोजी थोडा हुशार झाला. "महापाप...! मानवतेचा संहार ! "
"तुला आणलं कुणी इथे...!"
"तू कोण आहेस ? का आली इथे ?"
"माझं नाव वृंदा. हेवलीत नवीन आले आहे."
हिरोजी थोडा शुद्धीत येऊ लागला होता.
"इथे नको थांबु. जीवानिशी जाशील. हे अशुभ आहे सगळं..!"
"काय अशुभ आहे. हे सगळं काय आहे ?"
" नियती मागे लागलीय सगळ्यांच्या ! ती सगळ्यांच्या नरडीचा घोट घेईल. इतक्या सहज नाही सोडायची ती कुणाला!"
वृंदाची भीती आता आटोक्यात आली. ती हिरोजीच्या मानेपाशी जागा करून बसली. ही पोरगी धीट आहे. ऐकल्याशिवाय हलणार नाही हे हिरोजीने समजून घेतलं.
' त्याला माणसाच्या रक्याची चटक लागली आहे. किल्ल्यात आहे तो. नरभक्षक ! राक्षस...!"
"कोण ?"
"अडीच-तीनशे वर्ष झाली. हवेलीच्या पूर्वजांनी केलेले पाप आहे हे. त्या पापात मृत्यू पावलेल्या निष्पाप जीवांचे शाप यांना जगू नाही द्यायचे. आणि ते पाप ज्याने जन्माला घातलं, त्याने फक्त देह सोडला आहे. त्याचा शापित आत्मा अजूनही इथे आहे."
सावध झालेली वृंदा सगळं ऐकत होती. सुमारे तासभर हिरोजी सांगत होता आणि वृंदा भरल्या डोळ्यानी सगळं ऐकत होती. हिरोजीने देखील आपले सगळे बळ पणाला लावलं होतं.
" आणि त्याने तुम्हाला ही शिक्षा दिली !"
"हे होणार होतं. दोष नाहीये कुणाचा...!" डोक्यावर हजारो प्रश्नांचं ओझं घेऊन वृंदा तिथून बाहेर पडली.मृत्यूची तीळतीळ वाट पहात , पडून राहिलेल्या हिरोजीला आपल्या नशिबावर दिवस काढणं भाग होतं. बऱ्याचदा नशीब माणसाला एखादं वळण असं दाखवतं, की इच्छा असून देखील मदतीचा हात पुढे करता येत नाही. मनात असूनसुद्धा एखाद्याच्या केविलवाण्या हाकेला प्रतिसाद न देता निघून यावं लागतं. हिरोजीच्या दैना म्हणजे कर्माने तात्काळ केलेला न्याय होता.
तीन वर्षाची दुर्गा थोडी उजळ व्हावी म्हणून कुणाचाही स्पर्श न झालेली बेलपानं घ्यायला बिजली त्या अमावास्येला गडाच्या पायथ्याला पोहीचली. चांगला लख्ख दिवस होता. आधीच पाण्यावाचून तडफडत असलेली रानं, ऊन पडल्याने अधिकच रुक्ष दिसत होती. प्रत्येक झाड-वेलीने गडाकडे जणू पाठ फिरवली होती. झाडं असली, तरी जीव त्यांच्यातही होताच. बारीक पायवाट तोडत बिजली पुढे सरकत होती. हातातल्या बारीक कुऱ्हाडीने वाटेवर आलेल्या वेलींना ती सारत होती. आणि अचानक तिला ते बेलाचं झाड दिसलं. त्याकडे पाहून तिचा थकवा थोडा निवळला.
गडापासून थोड्या अंतरावर लावलेलं लाल निशाण तिने केव्हाच ओलांडलं होतं. गावकऱ्यांनी , गुरं-ढोरं चरायला येणाऱ्या , प्रवास करणाऱ्या लोकांसाठी खास हे निशाण लावून ठेवलं होतं. लोक त्याकडे देखील बघत नव्हते. आवरात पाय ठेवताच तिच्यावर , बुरुजापाशी दडून बसलेल्या हिरोजीची नजर पडली. त्याची नजर म्हणजे एखादे आंधळे हत्यार होते. समोर कोण आहे याची जराही तमा न बाळगता ते चालते. अत्यंत मेलेली नजर आणि भावनाशून्य , माणूस नाहीच, अशी त्याची गावात ओळख होती. तो रस्त्याने जात असता, जनावरं देखील घाबरून रहात. हवेलीने पोसून ठेवलेला मदमस्त जल्लाद होता तो ! सांगेल त्याला आणि वाटेल त्याला मारण्याची नोकरी होती त्याची. त्याचा मुक्काम गावात नव्हता. साडे सहा फूट उंची असलेला हा हिरोजी , रंगाने काळाकुट्ट होता. त्याचा चेहरा अत्यंत विद्रुप होता. अत्याधिक दारू मुळे त्याचे डोळे एखाद्या कोवळ्या निखाऱ्यासारखे लालबुंद असायचे. अंगावरचा अंगरखा अत्यंत मळकट होताच, पण त्यावर कित्येक निष्पाप जीवांच्या रक्ताचे डाग कोरडे झाले होते.
बुरुजावर बसून तो बिजलीला न्याहळू लागला. एखाद्या पाडसावर झाडीत दबा धरून बसलेल्या अजगराला शोभेल अश्या सुप्त हालचाली होत होत्या. त्याने उजव्या हातात त्याचा बारीक धनुष्य धरला आणि डाव्याहातात बाण. सण-सण करत बाण हवेत सुटला. सरळ विसावला तो बीजलीच्या मानेत. डोळे मोठ्ठे झाले. बाण चांगला अर्धा आत गेला होता. तिच्या कंठातून आवाज देखील फुटत नव्हता. पांढरे पडत चाललेल्या डोळ्यांनी धोक्याचे निशाण पाहिले. मनात आपल्या तीन वर्षांच्या पोरीचा विचार आला. पुढे काय घडणार आहे, हे कदाचित तिला ठाऊक होतं. स्वतःला काळाच्या स्वाधीन करत ती त्या काटेरी झुडपात कोसळली.
लोखंडी नाळ बसवलेले, गुडघ्यापर्यँत असलेले चामडी जोडे वाजवत हिरोजी तिच्यापाशी आला. तिचे हात-पाय बधिर झाले होते. अंगात काहीच त्राण उरले नव्हते. जीभ लुळी पडली होती. डोळ्याच्या पापण्या देखील जीव सोडत होत्या. आपला शेवट इतका दुर्दैवी होईल, असं तिला स्वप्नात देखील तिला वाटलं नव्हतं. सकाळी आपल्या मुलीला कोवळ्या उन्हात ती न्हाऊ घालुन आली होती. तिला दृष्ट लागू नये, म्हणून तिच्या कानामागे मोठं काजळाचं बोट ठेऊन आली होती. तिच्या मुलीने देखील एक काळं बोट आपल्या आईच्या कानाखाली लावलं होतं. काल उरलेली भाकरी कुस्करून ,त्यात बकरीचं दूध घालून तिला खाऊ घातलं होतं. येताना झोपलेल्या दुर्गाच्या चेहऱ्यावरून हात फिरवून बोटं मोडून आली होती. हे सगळं तिला आठवलं. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. तिची उरलेली माया तिच्या डोळ्यात राहिली. आपल्या मुलीच्या आठवणीने ती बेचैन झाली, आणि या क्षणापासून पुढे तिची मुलगी कशी जगणार, याने ती व्याकुळ झाली. पण इलाज नव्हता. हिरोजीने तिला पाठीवर टाकले. एखादं घायाळ झालेलं शिकार पाठीवर टाकावं, अगदी तसंच. तिचे डोळे उघडले. तिला टेकडीखाली गाव दिसलं. त्या घरांच्या गर्दीत ती स्वतःच घर, अंगण, दुर्गा, सगळं-सगळं शोधू लागली. हिरोजीची पाऊलं झप-झप किल्ल्याकडे पडू लागली. बिजलीच्या आयुष्याचे शेवटचे क्षण अत्यंत विदारक जाणार होते. एकदा तिला तिच्या मुलीला डोळे भरून बघायचं होतं. आपण नियतीचं काय वाईट केलं, कशाची शिक्षा मिळाली ? याचा विचार करायला तिला वेळ नव्हता. तिच्या मनात फक्त दुर्गा होती.
पापणी न हलवता ती एकटक ओझरता गाव बघत होती. हिरोजी तिला घेऊन आत आला. दार बंद झालं. आभाळातून पडावी आणि क्षणात जमीनीत लुप्त व्हावी, तशी त्या रानातल्या झाड-वेलींपुढून बिजली लुप्त झाली. मुकी झाडं असले प्रसंग दर अमावास्येला बघत होते. आभाळाचा धावा करण्यावाचून त्यांच्याकडे काहीही पर्याय नव्हता. त्यांना वाचा असती, तर कदाचित असंख्य जिव वाचले असते.
क्रमश...
लेखन :अनुराग वैद्य