भाग ::-- आठवा
रंजन व हणमंतरावास सुनाजीनं बोलवलं होतं.परंतू मेळाव्यात जायला उशीर झाल्यानं गर्गे फर्मच्या मालकीन रचना गर्गेची भेट त्या गाडीत बसून निघतांना झाल्यानं काहीच बोलता आलं नाही. पण रात्री डिलर सुनाजीरावाशी फोनवर बोलणं झालं. उद्या रचना मॅडम तुमची साईड पहायला येणार म्हणून निरोप मिळाला. दुलबाचं नऊ एकराचं रान आपल्याच कडं आहे एक एकर त्या बाजी खोंडाच्या नावावर असलं तरी ते बेणं कुठं येतं आता. ते नऊ एकर आहेच,धना कुठं जाणार बोंबलायला. नाही तरी त्या रानात आपण रात्री जाऊच शकत नाही मग रान ठेवण्यापेक्षा गर्गे फर्मच्या गळी उतरवू व ठोक रकमेनं दुसऱ्याकडं घेता येईल शेती.फक्त गर्गे फर्मला सुनाजीमार्फत आपण तुम्हास हवी तेवढी जमीन तिथं मिळवून देऊ अशी हूल द्यावी लागेल.आपला व्यवहार झाला की मग ते जाणोत व त्यांना लागणारी जमीन.असा सोईस्कर विचार रंजन व सासरा हणमंतरावानं करत उद्या सोनेवाडीला निघण्याचं फिक्स केलं.
सकाळी रंजननं फोन करताच सुनाजीनं आधी धरणगावाकडंची साईड पाहून आम्ही परस्पर सोनेवाडीला येतो .तुम्ही पण या तिथंच दुपारून असा संदेश मिळाला.
आभाळात दहा वाजताच मेघांनी दाटी केली व धो धो पाऊस कोसळायला लागला. बाजी व जयदिप भुसावळ कडं रवाना होताच सुनाजीरावांसोबत रचना निघाली.धरणगावाकडच्या साईडवर पोहोचता पोहोचता पावसानं व अंजनीच्या पात्रानं बराच उशीर लागला. पण तिथंही दहाबाराच एकर जमीन .बाकी शेतकरी विकायला तयार नसल्यानं फिर फिर फिरून ते सोनेवाडीच्या रस्त्याला लागले. सोनेवाडी येण्याआधी सुनाजीनं रंजनला फोन करत शेतात बोलावलं.
पण रस्त्यात हायवेवर मोठा अपघात झाल्यानं रंजन व हणमंत राव ट्रॅफीकमध्ये अडकले. त्यांना गाडी पुढे ही काढता येईना व मागे ही. त्यांनी सुनाजीरावास तसा निरोप पाठवत येत असल्याचं कळवलं. सुनाजीनं पडत्या पावसात तापीच्या काठावर गाडी कशीबशी नेत शेतापर्यंत पोहोचवली. थोडं अंतर पायी चालत आधी पाहिलेली रंजनची शेती रचना मॅडमला दाखवली.
जवळच वाहणारी तापी, नदीकाठची जमीन ,बागाईत पाहून रचनास साईड आवडली. फक्त आपणास हवी तेवढी जमीन मिळतेय का तेवढं आधी पहा सांगत रचना परत फिरली. सोनेवाडीत येताच सुनाजीनं रंजन येतच आहे तर त्याच्याशी व इतर कुणाची जमीन त्यांना पण भेटता येईल म्हणून सुनाजीनं थांबावयास लावलं.
" सुनाजीराव एवढ्या पावसात आपण येऊ शकतो नी मग या पार्टीला नाही का जाणीव वेळेवर यायची? आम्ही त्याची वाट पाहत ताटकळत कुठं उभं राहायचं.चला जळगावला तिथं बोलवा त्यांना तिथंच बोलता येईल!" रचना त्रागा करत बोलली.
" मॅडम तसं नाही ते निघाले पण मध्येच अडकलेत.आणि ते येतील पण इथले शेतकरी पुन्हा जळगावला येतील त्यापेक्षा इथंच समक्ष बोलणं होईल.कृपा करून थोडी वाट पाहू यात"
" अहो हो, पण इथं पडत्या पावसात...?"
तोच रचनाला समोरचं मंदीर खुणावू लागलं.आपण जर या गावाच्या वेशीत आपला कारखाना सुरू करू पाहतोय तर चला गावातल्या दैवताचं दर्शन तरी घेऊ..!" असा विचार करत रचनानं मंदिराच्या अगदी जवळ गाडी लावली. गाडीतून उतरत ती मंदीरात चढली.
मंदिरात ज्योत पेटत होती.सकाळची चढवलेली होती तरी मोगऱ्याची फुलं प्रसन्नता देत होती. मंदिरात दोन लहान मुली होत्या.नवख्या बाईला पाहताच मांजरीगत भेदरल्या डोळ्यांनी पाहत बाहेर निघाल्या. सुनाजी उतरत फोन करण्यासाठी गाव दरवाज्यात सरकला.तिकडनं रंजननं काही तरी सांगितलं म्हणून अंगणातूनच रचनाला "' मॅडम मंदिरातच थांबा मी गावातून दुसऱ्या शेत मालकाला बोलवतो तेवढ्यात" सांगत निघाला. मंदिरातलं प्रसन्न वातावरण रचनाला खूप भावलं. तिनं मनोमन " बा पांडुरंगा! आबांनी पाहिलेलं स्वप्न साकार कर!" विनवलं. तोच थंड हवेचा जोराचा शिडकावा आला नी त्या हवेच्या ज्योतानं मंदिरातील छोट्या घंटा किणकिणल्या. समोरच्या ताटातली साखर उचलत तिनं तोंड गोड केलं व ती मंदीर पाहत पाहत बाहेर निघू लागली. एव्हाना मंदिरातल्या त्या दोन मुली आता तिच्या गाडीजवळ खेळत होत्या. एक मुलगी गाडीच्या पुढच्या बोनटवर खालूनच आडवी होऊ पाहत होती नी सोबतिणीला सांगत होती.
" चिमणे, गाडीला हात नको लावू."
" सुमे, मी लावणार तुझी थोडी आहे?"
" चिमे ही माझी नाही तर काय झालं! माझा काका अशीच गाडी घ्यायला गेलाय!" रचना मंदिरातल्या ओसरीवर उभी राहत या मुलींचा संवाद ऐकत वेळ घालवू लागली.
" सुमे तू खोटं बोलतेय! कोणता काका आणणार तुला गाडी? तुझा धना काकानं तर तुम्हाला हाकलून दिलंय!"
" चिमणे, जास्त बोल्लू नकोस.माझा बाजी काका गेलाय गाडी घ्यायला. माझा बाजी काका अशीच गाडी आणणार मला."
" सुमे, तुझा बाजी काका कशाला येतोय आता? माझी आई सांगत होती सुमीला आता कुणीच नाही.."
आता सुमीनं चिमणाला जोरात पाण्यात ढकलंलं.
" चिमे, माझा बा, सांगून गेलाय! माझा बाजी काका येणारच... मरणाला ही बाजी लावतोय तो आमचा बाजी काका!" सुमीनं जोरात संतापातच चिमणीला सांगितलं.
वर उभी रचना तिचा संताप व तिचं आवेगपूर्ण बोलणं ऐकून चक्रावली.
मात्र ' बाजी 'नाव ऐकून तिला बाजीची आठवण झाली. आपण बाजी सोबत आलो नी कुठं या खेड्यात एकटं अडकलो. हा सुनाजीपण.. गेला तिकडंच गेला.
आता चिमणेनंही सुमीला ढकललं व " खुटा येतो तुझा काका आता!" म्हणत ती गल्लीतून पळून गेली.
सुमी पाण्यात पडल्यानं ओली झाली तरी त्याकडे लक्ष न देता ती जाणाऱ्या चिमेला " माझा बाजी काका येणारच.." म्हणत रडू लागली. रचनानं तिला वर घेत शांत रहायला लावलं.व मंदिरात मध्ये आणलं. ती गोरीमोरी पाहू लागली. काका , काका म्हणत जास्तच रडू लागली.
" का गं रडू नकोस. तुझं घरं कुठंय? नी तुझे आई-वडील?"
ती रचनाकडं नुसती पाहत रडणं कमी करू लागली.
" कुठं आहे तुझं घर?"
" आम्हाला घर नाही.इथंच राहतो !"
रचना चपापली.
" कोण कोण राहतं? बाकी कुठं गेलेत?"
" मी नं माझा बाला दादा"
" आणि मम्मी -पप्पा?"
सुमीनं वर आभाळाकडं बोट दाखवलं.
आता तिचं रडणं थांबलं होतं पण तिच्या डोळ्यातली भेसुरता व तिचं आभाळाकडंचं बोट पाहून रचनाच्या डोळ्यात आसवं टपकायला लागली.
" आजी-आजोबा?"
पुन्हा सुमीनं तसंच आभाळाकडं बोट दाखवलं.पण आता डोळ्यात भेसुरतेसोबत जी आर्तता होती त्याच्यानं संबंध नसतांना रचनाच्या काळजाला चरे पडत डोळ्यातून गालावर आसवे तरळली.
तिची आसवे पाहून सुमीनं " पण तुम्ही का रडताहेत? आमचा बाजी काका आहे ना!"
" बेटा तू कुणासोबत राहते मग? नी तुझा बाजी काका कुठं गेलाय?"
" माझा भाऊ बाला दादा सोबत! तो पहा आला बाला दादा" नी सुमी दरवाज्यातून येणाऱ्या बालाकडं पळाली.
नऊ दहा वर्षाचा एक मुलगा रचनाकडं गोरामोरा पाहू लागला. त्याचे भाव ओळखून रचना त्यास धीर देत रचना विचारू लागली.
" बाळा ,घाबरू नको ,माझं गावात दुसरं काम म्हणून मी आलेय पण पाऊस म्हणून मंदिरात थांबली.बाजी तुझा काका का? नी कुठं आहे मग?"
नविन बाईच्या तोंडून बाजी काकाचं नाव ऐकून बाला विस्फारल्या डोळ्यांनी पाहू लागला.
" अरे या तुझ्या बहिणीनंच सांगितलंय!"
" बाजी काका आमचा. बाहेर निघून गेलेत; पण कुठं गेलेत माहीत नाही. पण जिथं ही असतील तिथून येतीलच आमचे काका! आमच्यासाठी तर ते मरणाच्या दारातून ही परत येतील! मरणाशी ही बाजी लावत येतील आमचे बाजी काका!" बाला ही तसाच धीरोधात्तपणे बोलताच रचनाच्या डोक्यात एक शंका वळवळली.
तिनं पोरांना विश्वास दाखवत बोलतं केलं. बालानं भित भित आपले आई-वडील कसे गेलेत, बाबा कसा गेला, व ते हल्ली माधुकरी मागत कसे राहतात ते सांगितलं. रचनास त्यांच्या अवस्थेनं ह्रदय ढवळूत भरून आलं. तोच मंदिरात संध्याकाळच्या आरती साठी एकेक येऊ लागले. मग बालानं आरतीची वेळ झाल्याचं सांगत सुमीला घेत भक्त निवासाकडं निघाला. रचनाला त्यांना काहीतरी द्यावं असं मनापासून वाटलं.पण खायचं तिच्याकडं काहीच नव्हतं. तिला पर्समध्ये पाचशे ची नोट लागली. ती काढत ती जाणाऱ्या बाला व सुमीला थांबवत देऊ लागली.
बालानं हात जोडत नकार दिला.पण सुमी पुढं सरकू लागली.बालानं डोळे वटा्रत " सुमी किसनाबास कळालं तर ओरडतील बघ" बोलला.सुमी माघारली.
" किसना बा कोण रे बाळा?"
" आमच्या बाबा नंतर तेच आमचे बाबा! आमची सारी जबाबदारी तेच सांभाळतात!"
" मला भेटतील का ते?मला भेटायचंय त्यांना!"
" पण आता ते गावाला गेलेत, बहुतेक रात्री परततील!"
" बरं हे माझं कार्ड घे.ते आल्यावर मला भेटायला सांग किंवा फोन तरी करायला लाव"
बालानं कार्ड घेऊन होकार दिला व समोरच्या निवासाकडं निघाला.
रचना खाली उतरत गाडीत येऊन बसली.'देवा नको असलं जिणं कुणाच्या वाटेला', म्हणत ती सुनाजीराव येण्याची वाट पाहू लागली.
तोच समोरून सुमी परत तिच्याकडं येतांना दिसली. आता तिच्या हातात एक फ्रेम होती. मागून बाला तिला
" सुमे कुठं घेऊन चालली? ओला होईल फोटो!" ओरडत मागे बोलवत होता.
सुमीनं गाडीजवळ येत रचनास फोटो दाखवू लागली.
" माझा बाजी काका दाखवू का तुम्हास?" तिनं हातातील फोटो पुढे करत विचारलं. रचनानं तिला दरवाजा उघडत आत घेत फोटो पाहीला. फोटो लग्नाचा होता. कुणाच्या तरी लग्नप्रसंग चितारणारा खेड्यातील फोटो.
" हे आमचे दुलबा बाबा"
'आणि हा नवरदेव...' हे मात्र ती रागात बोलली.
पण
पण तोच रचनाला कोपऱ्यात तिरकस एक छबी दिसली.पूर्ण चेहरा दिसत नसला तरी रचना तो अर्धवट चेहरा पाहताच जागेवर उडालीच.
" नी हे कोपऱ्यात उभे आमचे बाजी काका". पुढचे शब्द रचनाच्या कानावर जोरानं आदळू लागले...
बाजी काका...
बाजी काका...
येणारच...
मरणाची बाजी..
रचना डोळे ताणून ताणून विस्फारून पाहू लागली नी तिनं छोट्या सुमीस गच्च छातीशी लावत डोळ्यांना खुली वाट करून दिली. सुमी आश्चर्यानं पाहू लागली पण मायेच्या स्पर्शाला आसुसलेल्या जीवानं रचनेच्या स्पर्शातील मायेचा ओलावा अलगद टिपला व ती आपसुक रचनास बिलगत जोरानं आई उद्गारली. रचनाचा ऊर नसत्या ओझ्यानं दाटला.रचनानं मोबाईल नं फ्रेमचा फोटो घेतला व लगेच सुनाजीस फोन करत लगेच बोलावलं. सुमीस ' मी लवकरच परत येते बेटा सांगत निरोप घेत गाडी काढली. रस्त्यात सुनाजीराव रंजन, हणमंतराव ,इतर शेतकरी याबाबत काय बोलत होता ,तिला काहीच कळत नव्हतं. ती धुंदीतच जळगावला अजंता रिसाॅटवर पोहोचली व बेडवर पडत रडतच बाजीची वाट पाहू लागलो.
भुसावळ ची साईड बाजीस तापीकाठालगत असल्यानं, लोहामार्गास लागून असल्यानं पटली होती. त्यानं येताच रचनास सांगण्यासाठी गेला.
" बाजी! ......." तिला सुरूवात कोठून करावी हेच कळेना.
बाजी बुचकळून पाहू लागला. कालच्या पावसाच्या प्रसंगानं पुन्हा त्याला तोच प्रसंग आठवला.
" बाजी! बाला, सुमी कोण? त्यांना ओळखतोस?" रचनानं भरल्या गळ्यानं विचारलं.
बाजीला पाच वर्षानंतर दुसऱ्याच्या तोंडून ही नाव ऐकताच जोराचा धक्का बसला.
" कोण बाला? कोण सुमी?" चाचरत तो भाव लपवत विचारता झाला.
रचनानं त्याच्या गालावर बोटं उमटवत जोरानं रडतच त्याला बिलगत हंबरडा फोडला.
" बाजी काहीच लपवू नकोस,मला सारं कळालं.पण तुला पुढचं कळालं तर तू ......" रचना सारं अंतर पार करत त्याला बिलगतच ढसाढसा रडू लागली.
बाजी विष्मयानं तिला काय सांगावं या विचारात असतांनाच रचनानं स्फोट केला.
" तुझ्या गावात बरंच काही घडलंय तुझ्या अपरोक्ष!"
आता ओळख लपवण्यात अर्थच नाही हे त्यानं जाणलं.
" कशी आहेत सारी? कोण कोण भेटलं मॅम? " तो उत्सुकतेनं विचारू लागला. त्याच्या डोळ्यात लहान पोरागत घरच्यासाठी भाव तरळले.
रचना ओठ दाबत कसं सांगायचं याची जुळवा जुळव करू लागली.
तितक्यात मोबाईल खणाणला. त्या धीर गंभीर वातावरणात त्याचा मूळचा कमी आवाज जोरात भासू लागला.
रचनानं उचलत "कोण?" विचारलं.
" मी किसन बा. आपण कोण? माझ्या नातरांना आपण भेटलात व नंबर देऊन गेलात? का काय काम होतं व कोण आपण?"
बालानं रचना गेल्यानंतर गावाहून परतल्या परतल्या मंदिरात आलेल्या किसन बास रचनाबाबत सांगत नंबर दिल्याचं, व लगेच फोन करावयाचं सांगताच लेकरांना कोण भेटलं असावं या चिंतेनं किसनबानं लगेच फोन चिटकवत पृच्छा करत होता. कारण मागच्या सतत च्या संकटांनी तोही धास्तावलाच होता.
" सोनेवाडीहून बोलताय का आपण?" रचनानं सोनेवाडी बोलताच बाजी कान टवकारत जवळ सरकला.
" होय. आपण कोण? नी नातरांना का भेटलात आधी ते सांगा?" तिकडनं किसनबा काळजीनं विचारता झाला.
" माफ करा मी आपणास ओळखत नाही व मला ही आपण ओळखत नसाल काका! पण मी आपणास ज्याची ओळख करून देतेय ,त्याचं नाव ऐकताच आपणास निश्चीतच आनंद होईल! बाजी ला ओळखतात का? बोला त्याच्याशी!" रचनानं ओलावल्या नेत्रांनी सांगताच किसनाबाचा आपण काय ऐकतोय यावर विश्वास बसला नसावा हे रचनानं ओळखलं व रडत रडतच तिनं बाजीला खुणावत फोन बाजीकडं दिला नी मग वादळा वर वादळं कोसळू लागली.
" बाजी.,.!" स्वर कातरा होत थरथरत भिजू लागला असावा.
" ......" बाजी निशब्द
" लेका कुठून बोलतोय, नी कुठं होतास रे लेका! हे काय जाणं म्हणावं तुझं!!!!"
" काका! होय मी तुमच्या दुलबाचा बाजीच बोलतोय! कसे आहेत घरचे सगळे? बाबा, संतादादा, जना वहिणी?" बाजी आसवं भरल्या ह्रदयानं विचारू लागला.
" पोरा माझा दुलब्या गेला रं....! तुझी वाट पाहून पाहून......नी....संता, जनी पण...."
" काका!.... क्काय क.क..काय ?"
" पोरा विश्वास बसणार नाही पण तेच...."
पण हे ऐकण्या आधीच बाजीच्या हातातून मोबाईल सुटला व तो रचनाला बिलगत ढसाढसा आकांत करत" दादा...! वहिनी...!....बाबा...!" नुसता टाहो....! नुसता ह्रदय पिळवटणारा आकांत. रचना त्यास छातीशी लावत रडतच धीर देऊ लागली. पण तो ......
कोसळला तो कोसळलाच.
रचने मला आताच्या आता सोनेवाडीला जायचंय.रचना त्यास छातीशी घट्ट धरत शांत करू लागली. पण आज बाजीस कोणतीच ताकद शांत करू शकत नव्हती....
थोड्या वेळानं पुन्हा किसन काकाचा फोन खणाणला.
" पोरा! तू कुठंय?"
" काका आम्ही जळगावला आहोत. मी बाजीला घेऊन आलेच सोनेवाडीत!"
""पोरांनो! ऐका माझं तिथंच थांबा मीच सकाळी बालाला व सुमीला आणतो" किसनबा काळजीनं बोलला. पण बाजीनं रचनास बसवत गाडी सोनेवाडीच्या रस्त्यास लावली. रचनानं त्याच्याकडून गाडी घेतली. रात्री दहाच्या सुमारास गाडी सोनेवाडीत आली. किसन बानं बाला व सुमीस न सांगता घरी नेलं व तो येऊन गाव दरवाज्यात उभं राहत वाट पाहू लागला. गाडी येताच त्यानं आधी सरळ गाडी घरी नेली नी मग एकच आक्रोश सुरू झाला. झोपणाऱ्या बालास व सुमीस उठवत बाजी छाती पिटत रडू लागला. किसन बानं आधीच सर्व दरवाजे बंद केले होते. बाला व सुमी डोळे चोळत भांबावून उठताच रडणाऱ्या बाजीस पाहताच आधी तर त्यांना आपण काय पाहतोय हे खरंच वाटेना. स्वप्नात असल्यागतच भास. नी मग
" काकाssssss.....! " सयुंक्तीक काळीज फोड टाहो घुमला. त्या प्रसंगानं किसन बाचं आख्ख घरच हादरुन गहिवरलं. किसन बा आपल्या दुलब्या मित्रास आठवून हंबरू लागला.
बाजी ! मरणाशी ही लावतो बाजी ,तो बाजी! परत येईलच! दुलबा ss
बाला व सुमी रडत रडतच काकाला बिलगून मायेच्या ऊबदार भिज ओलीत बिनघोर झोपली. किसन बानं बाजी व रचनास रंजन, हणमंतराव धना व राधाचा सारा पट उलगडून सांगत, दुकानात राबणं, बुटासहीत लाथ, उपाशी ठेवणं,दुलबाचं माघारी गावात येणं,पोरं मंदिरात माधुकरी मागत का व कशी राहिली सारं सारं सांगितलं. रचनेसही धना राधाबाबत आश्चर्य वाटलं. तिला रंजन नाव खटकू लागलं. तिनं बाजीकडं विचारताच, काल जामनेरला जातांना गाडीला क्राॅस गेला तो ,सांगताच तिनं आज आपण त्याचीच जमीन पहायला आलो हे ही स्पष्ट केलं.
" काका! आता सारा हिशोब चुकता होईल! माझा संता दादा, वहिणी यांचा हिशोब..., जमीन गेल्याचा हिशोब..., माझ्या बाबास बेघर केल्याचा हिशोब... आणि माझ्या निष्पाप लेकरावर बुटाची लाथ घातल्याचा हिशोब ही.....रंजन...मिरे....राधे....हणमंत्या ...तयार रहा... हा बाजी आलाय.... मरणाशी ही बाजी लावणारा बाजी...जीवाशी बाजी लावणारा बाजी.....पहाटे रामा पवाराच्या खोपटातल्या कोंबडयानं बांग देण्या आधीच बाला, सुमी व किसन बास घेऊन रचना व बाजी गाडीनं जळगावला रवाना झाले...
.
. क्रमशः.....
वासुदेव पाटील.