फितूर आभाळ
सकाळीच रचनानं आबासाहेबास फोन करत बयाजवार हकीकत कथन केली. बाजीचं गाव, घरच्या लोकांवर झालेला अन्याय व लहान पोरांची वाताहत. नारायणरावांना हे ऐकताच आधी बाजी जळगाव म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या मातीचा हे ऐकून आनंद झाला. पण कुटुंबाची वाताहतीची कहाणी ऐकताच त्यांनी 'मी लगेच जळगावला येतो मग काय करायचं ते पाहू. तो पावेतो त्याला सबुरीनं घ्यायला लाव', सांगितलं
" पोरी बाजीसाठी सारी संपत्तीच काय पण आयुष्य ही पणास लावेन मी. कारण त्यानं पाठीवर झेललेला घाव तू नाही मी पाहिलाय.मरणाशी बाजी लावत त्यानं मला मरणाच्या दाढेतून परत काढलंय. त्याच्यासाठी तर 'काय नाव सांगितलंय तू? रंजन! ' असल्या छप्पन रंजनला मी अस्मान दाखवेन. रचना मी आलोच".
आबांचं हे बोलणं ऐकून एरवी रचनास संताप आला असता पण आता तिला मनातून समाधान वाटलं.
जयदिप कुमावतची नविन गाडी घेत बाजी व रचनानं बाला, सुमी, व किसनाबास घेत जळगाव फिरवलं. बंदिस्त गाडीतून पोरांना खाऊ पिऊ घालत बाजी त्यांच्या चेहऱ्यावर समाधान फुलवू पाहत होता. दुपारी रिसार्ट वर परत येताच बाहेर बाजीस रंजन ,हणमंत सुनाजीरावांसोबत दिसताच. बाजीच्या डोळ्यात आग फुलली. सुमीचं लक्ष रंजनवर जाताच ती बाजीस गच्च धरत घाबरत ' काका, काका' म्हणत चेहरा लपवू लागली. रचनानं गाडीचे काच चढवले.
" बाजी ! हरामींनी बालाच्या छातीवर लाथ घातली नी सुमी ते पाहून अजुनही घाबरते. म्हणुनच माझ्या दुलबानं जळगाव सोडलं होतं.सारं सारं दुलबा मरणाच्या आधी सांगून गेलाय पोरा." किसनबा घाबरणाऱ्या सुमीकडं पाहत कळवळला.
बाला खाली पाहत काकाकडं पाहू लागताच बाजीच्या डोळ्यात अंगार फुलला. बसल्या जागीच गाडीचं शीट कडकड वाजत मुडेल की काय...
तो संतापानं खाली उतरणार तोच रचनानं त्याचा हाथ गच्च पकडत
" बाजी प्लिज ! घाई करू नकोस! ऐक सारा सारा हिशोब चुकता करायचा तू.पण दमानं.अजुन ती वेळ आली नाही."
बाजीनं महत्प्रयासानं सुमीस घेत राग आवरला. रचना खाली उतरत तशीच गाडी तिनं रिसाॅर्टच्या मागच्या पार्किंगला पाठवली. रचना उतरत वर चढू लागताच सुनाजी पाठोपाठ रंजन,हणुमंतराव येऊ लागले.
" मॅम! हे रंजन शिंदे व हणमंतराव.काल सोनेवाडीस यांचीच जमीन पाहिली आपण." सुनाजीरावांनी पुढे चालणाऱ्या रचनास परिचय करून दिला. दालनात बसत रचना रंजन व हणमंतरावाकडं पाहू लागली.
" सुनाजीराव, जाहिरातीचे सेकंदाचे स्लाॅट करोडो रूपयास विकले जातात. आमचा वेळ नाही सेकंदात पण तासात तर नक्कीच लाखोचा असतो. काल यांची वाट पाहत अख्खा दिवस वाया घालवला आम्ही. यांना कळत नाही का?" रचनानं कडक अंदाजात सांगताच तिच्या सोनसरी रूपाकडं पाहत लाळ घोटू पाहणाऱ्या रंजनला सुरवातीलाच झटका बसला.
" मॅडम आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकल्यानं नाईलाज झाला आमचा! यापुढे कसूर नाही होणार." हणमंतराव बाजू सावरत म्हणाले.
" जळगाव जिल्ह्याची ट्रॅफिक दिवस दिवस भर सुरळीत होत नसेल तर आम्ही आमचा फर्म मुळीच काढणार नाही मग या जिल्ह्यात!"
" मॅम कालच्या प्रकाराबाबत दिलगीरी व्यक्त करतो आम्ही. यापुढे मिनीटाची ही काचकसूर होणार नाही" हात जोडत रंजन म्हणाला.
" तेच योग्य. दिलेल्या वेळा पाळा. बोला काय म्हणनं आहे तुमचं" रचनानं नमतं घेतलं.
" मॅम नऊ एकर शेत आहे आमचं. आपल्या कारखान्यासाठी आम्ही विकायला तयार आहोत."
" ठिक आहे; पण आम्हास एवढ्या क्षेत्रानं नाही होणार. कमीत कमी तीस-पस्तीस एकर तरी हवं. "
" मॅडम चिंता नसावी.आजुबाजूस आणखी आहेत शेतकरी. ते ही विकतील जमीन." हणमंतरावांनी गाजर दाखवायला सुरूवात केली.
" ठिक आहे. सुनाजीराव उद्या गर्गे फर्मचे मालक आमचे आबासाहेब येत आहेत. आपण ज्या ज्या साईड पाहिल्या त्या साऱ्या पार्टीजला शार्प वेळेवर बोलवा.आबासाहेबच उद्या काय करायचं ते सांगतील.त्या वेळेस यायला सांगा यांना" म्हणत रचना उठली.रंजन व हणमंतराव घाम पुसत बाहेर पडले.
रचना आत रुमवर आली.
" रचना मॅम मला आबासाहेबांशी बोलायचंय?" बाजी म्हणाला
" बाजी! का?"
" मला त्यांची मदत हवीय! ते जर इथं आलेत तर....!"
" मी कळवलंय त्यांना व ते निघाले ही! बाजी खरं सांगू! निघतांना आबांनी माझ्यावर एक जबाबदारी सोपवली होती.कोणती माहितीय?"
"...?" बाजीनं रचनाकडं पाहिलं.
" जळगावात बाजी फर्म ओपन करावयाची. नी आता तर इथलं सारं कळाल्यावर. सकाळी त्यांनी तुझ्यासाठी....जाऊ दे आबा येतच आहेत होईल सारं "
दुपारून बाजी किसनाबा, बाला व सुमीस घेऊन सोनेवाडीस निघताच रचना ही सोबत निघाली.मुद्दाम जयदिप कुमावतची गाडी मागवत ते निघाले.निघतांना बाजीनं पोरांना गावात मी सांगितल्या शिवाय गाडीतून उतरायचं नाही हे समजावंलं. त्यानं व रचनानं रेनकोट चढवला.
बाजीनं जातांना किसनाबास संता व जना वहिणीचा अपघात झाल्याचं ठिकाण दाखवायला विनवलं.
गाडी हाय वे सोडतांनाच्या फाट्याजवळ येताच किसना बानं गाडी उभी करावयास लावली. बाजीनं मुद्दाम गाडी दूर पुढे नेत पोरांना गाडीतच थांबावयास लावलं.तो व किसनाबा खाली उतरला. रचना गाडीत पोरांजवळच थांबली. खाली उतरत किसनाबा फाट्याजवळ आला. किसना बा थरथरत जागा दर्शवू लागताच बाजीच्या अंगाचा थरकाप उडाला. जागेवर काही दिसायचा प्रश्नच नव्हता. रहदारी चालू होती.पण बाजीस " बाजी! जमिनीचं पाहीन मी.पण तू जितकं दूर जाता येईल तितकं दूर जा,दोन- पाच वर्ष इकडं फिरकूच नको, पोलीस तुझ्या मागावर आहेत" हे संता दादाचं शेवटचं बोलणं आठवलं. तो थूडथूड उडत गदगदला.
खाली बसत " दादा, तुझं ऐकुणच मी दूर गेलो होतो.मग का थांबला नाहीस! का ? सोडून जायचं होतं म्हणून मला दूर पाठवलं?" रडतच तो खदखदू लागला. किसना बानं त्याचे खांदे पकडत " बाजी तुला माझ्या दुलबाची आण आहे, या कुत्र्यांना सोडू नकोस. यांनी संता पोराला व जनीला ट्रक खाली तुडवलं रे. संताला कमरेतून तर जनी पोरीची कवटीच...."
बाजीनं किसनाबास गच्च मिठी मारत हंबरडा फोडला. थोड्याच दूर अंतरावर रहदारी जोराची चालू होती.पण किसनबा व बाजीस तिचं अस्तीत्वच जाणवत नव्हतं. पोरांजवळ बसलेल्या रचनेचं ध्यानं सारखं इकडंच जात होतं. तिनं पोरांना खाऊ देत गाडीत थांबवत
" मी आलेच, इथंच थांबा"' सांगत ती उतरली.
" रचना, या जागीच माझा संता दादा व जना वहिनी...." बाजी रचनाकडं पाहू लागताच रचनानं त्याचे हात दाबत आवंढा गिळत " बाजी प्लिज पोरं गाडीतून इकडचं बघताहेत. ऐक ना!"
बाजीचा हंबरडा काही केल्या कमी होईना. तोच पावसाचं एक जोरदार शिरवं दडदड आवाज करत बरसलं. रेनकोट घातल्यानं बाजी व रचना नाही पण किसनाबा ओला होऊ लागला.
" काका तुम्ही गाडीत चला , मी आणते बाजीला" रचनानं सांगताच ओल्या धोतराला डोळे पुसत कढ आवरत किसनाबा गाडीकडे पोराजवळ परतला.बाजीला पडणाऱ्या पावसात शेतात राबणाऱ्या संता दादाच्या स्पर्शाची व वासाची जाणीव झाली. त्यानं त्या जागेस रडतच नमन केलं. गाडीत येताच बाला काकास बिलगत काहीच न बोलताही हमसून बरच काही बोलून गेला. सुमी रचनानं दिलेलं चाॅकलेट तसंच हातात धरून ठेवत कावरीबावरी झाली.
गाडीनं गावात प्रवेश केला. सोनैवाडीला आता ही पाऊस झोडपतच होता. पाच ची वेळ असावी. काचाबंद गाडी गाव दरवाज्यात आली आतून सारं दिसत होतं पण बाहेरच्या अधून मधून जाणाऱ्यास काहीच दिसत नव्हतं. बाजी हळू हळू गाडी घराकडं नेऊ लागला. गल्ली येताच त्याचं ह्रदय धडधडू लागलं. त्यानं गाडीचा वेग मंदावत अंगणात गाडी किंचीत उभी केली. घर नव्हतंच मोकळी जागाच नुसती. रंजन व हणमंत्यानं दुलबा जळगावाहून गावात परतला तेव्हाचं जेसीबीनं पाडलेलं.पण तरी त्या मोकळ्या जागेत बाजीस आपलं पूर्वीचं भरलं गोकुळ दिसू लागलं नी त्या घराच्या ओसरीवर त्याला बसलेला आपला बाप दिसू लागला. जणू आपण आलेलं पाहून आनंदानं आरोळी मारत घरात सांगतोय
" यमे !बाहेर ये. बघ माझा बाजी आला"
जना वहिणी संध्याकाळच्या रांधणीत पिठ माखल्या हातांनी पदर सावरत बाहेर येत विचारतेय " बाजी भावजी, तुम्ही एकटे आलात नी तुमचे भाऊ कुठाय?"
" बाजी गाडी सुरू कर .नाम्या, महादू येताहेत" किसनबा समाधी लागलेल्या बाजीस हलवू लागले. अंगणात केव्हाची कुणाची गाडी उभी म्हणून शेजारचा नामा पावसात ओटा उतरून येत होता. डबडबल्या डोळ्यांना काहीच दिसत नव्हतं आठवणीशिवाय.
बाजीनं गाडी धकवली. गाडीनं आता मळ्याची वाट धरली.
" चिखल तुडवत गाडीनं तापीकाठावरील मळा जवळ केला. मळ्यात रंजननं लावलेली आंब्याची झाडं मोठी झालेली होती. म्हशींचं व पोल्ट्री फार्मचं शेड दिसत ह़ोतं. मळ्यात कुणी असण्याचा प्रश्नच नव्हता. रंजन हणमंतराव मळ्यात पायच ठेवत नव्हते हे किसनबास माहित होतं. जुन्या आंब्याच्या झाडाजवळ गाडी उभी करत सर्व जण उतरले. रचना कालच येऊन गेली होती. पण काल तिला ही जागा थोडी भयाण वाटत होती. आज मात्र एकदम प्रसन्न वाटत होतं. आंब्याच्या झाडाकडं बाजीची नजर गेली. तोच आंब्यांच्या झाडाला घिरट्या घालणारी जोराची वावटळ उठली. आंब्यांचं झाडं उलट सुलट झालं. वारा सुरु्र्र भरार्रा वाहत गिरक्या घेऊ लागला. किसनाबानं या चार पाच वर्षात जे ऐकलं होतं त्यानं घाबरला. बाजीनं सुमीस कडेवर व बालाचा हात हातात घेत खोडाजवळ आला तोच वारा पडला व झाड शांत झालं. बाजी झपाटल्या सारखा शेताकडं पाहू लागला. त्याला पूर्वीचा पहिल्या पावसातला मळा आठवू लागला. तिफन हाकणारा संता दादा व मागं तोल सावरत धूळ पेरणी करणारी जना वहिणी.... विहीरीच्या धावेवर बाबा डोळ्यावर हाताची झापड ठेवत क्षितीजाकडं काळा टिपूस दिसू लागताच " संत्या औत सोड, पोरीला लवकर जाऊ दे वळीवाच्या पावसाचा जोर दिसतोय" पण संता दादास धूळ पेरणीची घाई.तोच धुराळा, व टपटप आवाज करत मायंदाळ पाऊस सुरू व्हायचा
" भावजी भिजायला घाबरता का!" चिर परिचीत आवाजानं बाजी भानावर आला.
बाजी विश्वतिर्थाकडं निघाला. दुलबास बालानंच पाणी दिलं होतं. किसनाबास दुलबानं मांडीवर जीव सोडतांनाची विनवणी आठवली.
" किसना , मला अग्नीडाग बा.... बालाच देईन" दुलबाची इच्छा बाजीनंच पाणी द्यावंही होती पण बाजी नव्हता म्हणून दुलबा बालाचं नाव घेत गेला.
"काका, बाबा इथंच..." बाला भेसूर रडत बोलला.
किसनानं बाजीस जागा दाखवली. बाजीनं नदीतनं ओंजळीनं पाणी घेत त्या जागेवर सोडलं. पण त्या पाण्यापेक्षा त्याच्या डोळ्यातील आसवांच्या धारानीच काम केलं होतं. रात्र पडू लागताच सारे जसोदा काकीलाही सोबत घेत जळगावी परतले.
आल्या आल्या त्यांना आबासाहेब दिसतात बाजी त्यांना मिठी मारत रडू लागला.
" बाजी मला शांत हो, मला रचनानं सांगितलंय.आलो ना मी आता." बाजीच्या पाठीवर हात फिरवत आबासाहेब बोलताच बाजीला आणखीणच उमाळा दाटला.
रात्री आबांस किसनबानं सारी कर्मकहाणी ऐकवताच आबासाहेब ही गहिवरले. त्यांनी बाजीस " बाजी उद्या सकाळीच तू पोरांना घेऊन किसनबा, जसोदाताई सारेच ललितपूरला परत. मी इथंलं पाहतो नी लगेच परततो.
सकाळी बाजीची इच्छा नसतांनाही ललितपूरला परतला. रचनालाही त्याच्या सोबतच परतावंसं वाटत होतं. पण रंजन हणमंतची भेट घेण्यासाठी आबासाहेबाबरोबर थांबणं गरजेचं होतं.पुढचं बाजीलाच करायचं होतं पण रंजनसमोर अजुन तरी बाजीनं येऊ नये हे रचनासारखंच आबांनीही ओळखलं.
दहा वाजता सुनाजीराव जयदिपराव भुसावळ, जामनेर, धरणगाव व सोनेवाडीच्या जमीनदारांना घेऊन आले.
अजंता रिसाॅर्टमध्येच आबांनी साऱ्याशी वार्तालाप केला.
" मी नारायणराव गर्गे. गर्गे फर्मचा मालक. आपण ऐकूनच असाल. आमची फर्म आपल्या जिल्ह्यात आपला उद्योग तुमच्या सहकार्यानं सुरू करतेय. ज्या ठिकाणी आम्हास हवी तेवढी जमीन उपलब्ध करून देईन त्या साईडला आम्ही रेफरन्स देऊ" आबांनी प्रस्तावना केली.
एवढी जमीन फक्त जामनेर साईलाच उपलब्ध होती. पण ते जिल्ह्यापासुन लांब व पाण्याचं दुर्भिक्ष्य. मग आबांनी प्रत्येकास आपलं किती क्षेत्र, गावात जमिनीचा भाव काय याबाबत जुजबी माहिती घेतली.रंजनकडं पाहत त्यांनी
" तुम्ही? सोनेवाडी साईडचे ना!"
" होय सरजी, आमची जमीन तापीकाठावर.बारमाही पाणी, नऊ एकर ठाव तर आमचाच!"
" ते ठिक .रचना मॅम बोलली मला. दाखवा तुमचा सातबारा?"
सातबारा ऐकताच हणमंतराव चपापला.
" मालक ,सातबारा पेक्षा नऊ एकर क्षेत्र देण्यास आम्ही बांधील आहोत हे निश्चीत" फाईल पुढे ठेवत हणमंतराव बोलला.
आबांनी उतारा पाहताच रंजन शिंदे तुम्ही.चार एकर.नी ' धना दुल्लब.. ' कोण? त्याचा दुसरा उतारा.ते कुठं?"
" मालक हे लहान जावई व धनाजी मोठे जावईच आहेत.ते नाही आलेत पण त्याबाबत आपण बिनघोर असा" हणमंतराव सफाई देऊ लागले.
" हे पहा जमिनीचे नंतर वांधे होतात .कारण हणमंतराव मला माहितीय महाराष्ट्रात वतनाला काय महत्व आहे! एकवेळ जीव देतील माणसं पण वतन विकत नाही. म्हणून काळजी. ठिक आहे उद्या आपण पुन्हा भेटू. पण मला उद्या जमीन विकणारे शेतकरी सातबाऱ्यासहीत हजर पाहिजेत ज्या साईडला क्षेत्र उपलब्ध ती फायनल करू आम्ही" सांगत सर्वांना अनुमती दिली.
जाणाऱ्या रंजनला व हणमंतरावास थांबवण्यात आलं.सारे गेल्यावर नारायणराव त्यांच्याकडे पाहत म्हणाले.
रंजन शिंदे, आम्हास तुमची साईड आवडलीय.पण तुम्ही जर तीस चाळीस एकर उपलब्ध करून देत असाल तर?"
" होईल होईल मालक.करू आम्ही तेवढी जमीन" हणमंतराव मध्येच हमी भरत बोलला.
" काय भाव चालूय तुमच्या गावात?"
" साहेब भावाचं काय,जमीन पाहून ठरतो. तरी बारा लाखाच्या आसपास. तेही काठावरची असल्यानं काठ सोडला की भाव वधारतो" हणमंतरावांना बारा लाख सांगताच रंजन डोळे विस्फारून पाहू लागला.कारण काठालगतच्या जमीनीस कसं ही केलं तरी आठच्या वर भाव नाहीच.
" हणमंतराव बारा ही तुम्ही वाढवून सांगताहेत हे माहितीय मला. आमचे डिलरशीप सांभाळणारे सुनाजीराव पुरवतात माहिती आम्हास!तरी आम्ही बाराच्या ठिकाणी सतरा लाख देऊ एकरामागं.पण शेतकऱ्यांना तयार करा. आणि समजा तुम्हीच आधी खरेदी करून घेतली तरी चालेल.काहीही भावानं करा,आम्ही तुम्हास तरी सतरा लाख देऊ ; पण आम्हास जमीन हवी"
" मालक या पंधरा दिवसात आपणास जमीन देतो हवी तेवढी.मग तर झालं." हणमंतराव दिवास्वप्न दाखवू लागला.
" पण हणमंतराव ,रंजनराव आम्ही त्या भावाच्या हिशोबानं रोख रक्कम नाही देणार.तेवढ्या रकमेचे शेअर्स कारखाना उभा राहिल्यावर देऊ"
" नाही मालक, आम्हास शेअर्स नको. जमिनीचे रोखीनं पैसे हवेत!"हणमंतरावांना ती जमिनीची ब्याद काढत दुसरीकडं जावयांचं बस्तान बसवायचं होतं.म्हणून शेअर्स म्हणताच ते मनात चरफडले.
" मग ते शक्य नाही. हवंतर हल्ली चार एकरचा सातबारा आहे तुमच्याकडं तेवढ्या रकमेचा आताच चेक देतो. खरेदी नंतर आठ दिवसात करू.पण उरलेलं क्षेत्र तुम्ही आणून द्या व त्यांना रोख रक्कम नाही मिळणार तर तेवढ्या रकमेचे शेअर्स देऊ आम्ही! असं असेल तर सांगा,अन्यथा आम्ही भुसावळ वा धरणगावची साईड उद्या डन करतो बघा"
" सरजी उद्या शेतकऱ्यांशी बोलून कळवतो आम्ही.आम्ही आपल्यापुढं नाही" रंजननं सासऱ्यास डोळा मिचकावत चुप केलं.
नारायणराव निघताच रचनानं
" रंजनराव चार एकरचा चेक घ्या व इतर शेतकऱ्यांशी बोलणं करत उद्या या. आमची फर्म शेतकऱ्यांना लुबाडत नाही तर कारखान्याचं थेट मालक करतो!" समजावलं.
रंजन व हणमंतराव बाहेर पडले.
" मामा ,गाडी सरळ सोनेवाडीत न्या.सुवर्णसंधी चालून येतेय. चार एकरचे अडुसष्ट लाख घेऊ. माझी ही जमीन विकतो, धनासही जमीन व माॅल विकायला लावू आणि त्या पैशातून आठ ऐवजी दहा बाराच्या भावानं जमीन विकत घेऊ नी या मूर्ख गर्गेस सतराच्या भावानं विकू.शेअर्स का असेना घेऊ विकत. कारण त्या जागेत संता जनी यांना कारखाना उभारूच देणार नाही.मग एक तर यांना साईड सोडावी लागेल वा काम पूर्ण केलं तरी आठ ,दहा ,बारा लाखाच्या भावाची जमीन यांना सतरा लाखास गंडवू."
" बापूसाहेब शेअर्स घेऊन काय करणार?"
" शेअर्स नाही मामा यांच्या कडनं जमीनीचे पैसेच घेऊ.सांगायचं फक्त शेअर्स"
" मला तुमचा व्यवहार नाही कळत आहे."
" मामा आधी यांना थोडीच जमीन देत काम सुरू करायला लावू.एकदाचं काम सुरू झालं की मग नंतर थोडी जमीनीचे शेअर घेऊ. नी मग शेअर्सला नकार देत जमीनच घ्यायला यांना भाग पाडू.उखळात डोकं फसलं की बाप लेक खाली शेपूट घालत जमीन विकत घेतील" रंजननं गणित उघडलं.
" बापुसाहेब आणि त्यांनी ही वेळेस नकार दिला तर....?"
" नकार देऊच शकणार नाही ते! नी नकार दिलाच तर कारखान्यात शेअर्सची आॅफर तर राहीलच.आपणास कुठं रात्री यांच्या कारखान्यात काम करायला जायचंय"
रंजन व हणमंतराव रात्री उशीरा पर्यंत सोनेवाडीत फिरत मळ्याच्या आजुबाजुच्या शेतकऱ्यांना भेटत जमीन विकण्याबाबत विचारू लागले काहीनी जमीन विकायला होकार दिला तर किहींनी नकार. त्यांनी नकार देणाऱ्यास भावाचं आमिष दाखवलं. मग रंजननं दुसऱ्या दिवशी भेटत त्यांना चार एकर देत चेक घेतला व पंधरा दिवसात तीस नाही तर चाळीस एकर मिळवूनच देतो अशी ग्वाही दिली. नारायणरावांना गळाला मासा अडकावा म्हणून अडुसष्ट हजाराच्या चेकचा शिदोड अडकवला. व ते ललितपुरला निघून गेले. खरेदीच्या प्रोसेस साठी सुनाजीस सारी तयारी करावयास लावली. बाजी फर्मच्या नावानं दुलबानं धनासाठी विकलेलं चार एकर शेत परत येऊ लागलं. व लगे सारा लवाजमा येत आधी पेस्टीसाईड निर्मीतीच
या प्लान्टचं काम सुरू झालं.
रंजननं आपली गावाची सारी शेती लगोलग मिळेल त्या भावात विकली. गावातलं ,जळगावचं घर विकलं. हणमंतरावानं धनास ही त्याच्या नावावरचं चार एकर द्यायला लावलं. शेअर्स मिळणार म्हणून ती दुसऱ्यास विकायची गरज नव्हतीच. म्हणून धनानं तात्पुरतं होकार भरला. पण माॅल विकायच्या वेळेस त्यानं स्पष्ट नकार देत रंजनला उडवून लावलं.
" मामा समजवा धनास. दुसरी तीस एकर घ्यायला दहा बाराच्या भावानं किती लागतील सांगा याला.मी माझी गावाची सारी विकतोय, घर विकतोय तर हा का नाही म्हणतोय. समजा जमीन दुसरीकडं राहिली असती तर जमीनीस ही यानं नकारच दिला असता?"
हणमंत , मिरानं राधास समजावलं.राधानं धनास समजावलं.
" राधी जमिनीसाठी आपणच सख्ख्या भावांना धोखा दिलाय तर दुसऱ्यावर कसा विश्वास ठेवावा गं?" धना कळवळून बोलला. पण त्याचं काहीच चाललं नाही. अशा रितीनं रंजनची गावाची जमीन घर, धनाचा माॅल, घर, हणमंतरावाचा जळगावचा प्लाॅट त्यांनी पंधरा दिवसात विकत रक्कम जमा केली.नी मग सोनेवाडीत ते जमिनीसाठी फिरू लागले. नारायणरावांनी चार एकरची खरेदी उरकवून घेतली. नी मग जयदिप व सुनाजीस सोनेवाडीत पाठवलं. सुनाजीरावांनी माणसं पाठवत सोनेवाडीतील शेतकऱ्यांना गुपचूप भेटत ते दहा देत असतील, बारा देत असतील तर आम्ही चौदा लाख एकराचा भाव देतो अशी मागणी करत पिलू सोडून आले. म्हणून रंजनला हो म्हणणारे शेतकरी पालटले. त्यांनी दुसरे लोक काय भाव देतायत नी तुम्ही या भावानं विकत घेतायत.नाही द्यायची जमीन आम्हास' म्हणत रंजनला उडवून लावलं. रंजननं विचार केला. आपण फसवायला गेलो तर आपणच फसतोय की काय. तरी विचार करत त्यानं चौदाचे पंधरा लाख करत जमिनी खरेदी केल्या. निदान आता आपली गेली तर ही तरी.त्यानं लगेच पटापट जमिनी खरेदी केल्या. नी नारायण रावास निरोप दिला.
आता नारायणराव रचना किसनबा व बाजी सोबत आले.
त्यांनी रंजन व हणमंतरावास शेतातील प्लान्टवरच बोलावलं. रंजन व हणमंतराव धना मिरा राधा सारे गेले. नारायणराव सुनाजी व जयदिप आधी गेले. रचना व बाजी किसनाबा कडं थांबले. पण त्या आधी किसनाबा व सुनाजीनं साऱ्या गावास शेतात गोळा करून आणलं होतं. गर्दीला पाहताच रंजन चमकला. तरी तो हिम्मत करत बोलला.
" गर्गे सरजी मी आपण सांगितल्या प्रमाणं पस्तीस एकर जमीन खरेदी केलीय. पण मला जमिनीचे शेअर्स नको .कारखान्याचे मालक तुम्हीच बना.मला रोख रक्कम हवीय जमिनीची" रंजननं डाव टाकला.
" रंजनराव तुमच्या भरोशावर आम्ही चार एकरात काम सुरू केलंय. तुम्ही क्षेत्र उपलब्ध करून देणार होता ना."
" मी क्षेत्र तर उपलब्ध करून देतोय ना.कुठं नाही म्हणतोय.पण जमिन विकतच घ्यावी लागेल.शेअर्स नकोय मला."
" पहा जमीन तुम्ही खरेदी केलीय नी आता अशी अडवणूक करताहेत! ठिक नका शेअर्स घेऊ .घेतो आम्ही विकत जमीन.पण भाव काय?"
" भावाचं काय,ते तर आधीच ठरलंय ना! सतरा प्रमाणं"
" नाही आम्हास या भावानं नकोय जमीन"
" नारायण राव तुम्ही कबुल केलंय सतरा लाख एकराचा भाव म्हणून तर आम्ही जमीन खरेदी केली.नी आता तुम्ही जबान पालटत आहात!" रंजन संतापात बोलला.
" रंजनराव !कबुल तर तुम्ही ही शेअर्स घेण्याचं केलं होतं? मग त्याचं काय" नारायणराव डोळ्याला डोळा लावून बोलले.
रंजनचा ,हणमंतरावाचा घसा कोरडा पडू लागला.बूमरॅग पलटू पाहत होतं.
" नारायणराव समजा मी जमीन दिलीच नाही तर कारखाना कसा उभा करणार? लक्षात ठेवा इलाखा आमचा आहे?" रंजननं लाल होत धमकी दिली.
तेवढ्यात गाडी आली व तिच्यातून फक्त किसनबा बाहेर येत नारायणरावाजवळ बसले.
" रंजन, आधी व्यवस्थीत बोल. सुनाजीराव याच्या तोंडावर या गावातील कोण कोण जमीन विकायला तयार आहे ती यादी मारा. दुसरं मी दुकान बंद करून दुसऱ्याकडं हलवेन नाहीच मिळाली जमीन तर. चार एकर घेतलेली पडेल जमीन. नी रंजन तू जी धमकी देत आहेस ना इलाख्याची; तर लक्षात ठेव माझाही हाच इलाखा असून मी परमुलूखात साम्राज्य उभा करून आलेलो आहे. तर माझ्याच इलाख्यात मी तुला घाबरणार होय.
" मालक, रंजन राव नादान बुद्धी.आपला वकुब ओळखू शकले नाहीत.मी माफी मागतो भले शेअर्स द्या पण जमीन घ्या" हणमंतरावांनं वक्त का तकाजा ओळखून नरमाई धारण केली.
" माफी तुम्ही कशाला यानं मागावी.ती ही माझी नाही तर या फर्मचे मालक बाजी हे समोरच्या गाडीत बसलेत त्यांची सर्वासमक्ष आताच.नाहीतर नकोय याची जमीन आम्हास"
हणमंतराव व रंजननं ओळखलं.आपली सर्व जायदाद विकून ही तीस एकर जमीन धरुन बसलोय.ती ही संता जनी आपल्याला इथं करूच देणार नाही. त्यापेक्षा माफी मागत शेअर्स का असेनात पण घेतलेलेच बरे.विकायची म्हटली तरी पंधराचा भाव कोण देणार आपणास!
रंजन व हणमंत गाडीत बसलेला बाजी फर्मचा मूळ मालक कोण त्याकडं जाऊ लागले. गाडीतून काच खाली करत रचनानं त्यानं पलीकडून यायला लावलं.रंजननं दरवाजा उघडून खाली झुकत साहेब माफ करा बोलणार तोच त्याची मान बुटासहीत लाथेनं दूर करत बाजी बाहेर आला. बाजीला पाहताच साऱ्याच्या मुखातून एकदम एकच हुंकार बाहेर पडला ,
" बाजी!".....
रंजन, मिरा ,राधा ,हणमंतरावाचा चेहरा पांढरा पडत घामानं डबडबला.
मिरा व राधेकडं तुच्छतेनं पाहत
" किसनबा लहान पोराच्या छाताडावर लाथेनं प्रहार करणाऱ्या नामर्दाची जमीन नकोय मला"...
.
.
यांना माझ्या शेतातून हाकला नाही तर बुटासहीत लाथेनं हाकलीन यांना..
.
.
रंजन, हणमंतराव, मिरा व राधा खालमानेनं निघालेत. पण
पण त्यांना जमीन कसण्यासाठी सोनेवाडीत पुन्हा यावंच लागणार होतं व संता, जनी त्यांना सोडेलच कशी..
त्यांना केव्हाच यमाचा यमदंड लागला होता पण दिसत नव्हता.
.
. क्रमशः
वासुदेव पाटील.