फितूर आभाळ - भाग ::-- सातवा
बेंटली मुलसॅन गाडी पहाटेच ललितपूरहून खंडवा मार्गे जळगावच्या रस्त्याला लागली. बाजी व रचना दोघेच निघाले. नारायणराव गर्गेंनी आधीच रचनाला कोपऱ्यात नेत "जळगावची सारी फर्म बाजीच्या नावानं करायची असल्यानं साऱ्या प्रोसेसवर त्याचच नाव येऊ दे!" सांगताच रचना विस्फारल्या डोळ्यांनी पाहू लागली. पप्पा बाजीवर विश्वास ठेवतात हे तिला माहीत होतं . ते तिला खटकत ही होतं.पण या थरापर्यंत ते जातील हे तिला माहीत नव्हतं.
" पप्पा ,एकवेळ विचार करा! बाजी कोण हे ठाऊक नसतांना एवढा विश्वास टाकणं...?"
" रचना डागाला ओळखण्यात चूक वा उशीर झाला असेल माझा,पण बाजीबाबत नाही. पाच वर्षापासून राबतोय तो एक छदाम न घेता, ना कसला स्वार्थ.आणि तो नसता तर राजनं आपली वाट लावलीच होती. त्यानंच सावरला हा डोलारा.आता त्याला आपण सावरलं पाहिजे.म्हणून सांगतो तसं कर.मात्र जळगाव बाबत तो कचरतो का तो तपास कर जाताच".
पहाटेच्या थंड वातावरणात गाडी रस्त्यावर लागली. रचना मागच्या शीटवर शांत विचार करत पहुडली. पप्पानं इतका टोकाचा निर्णय घेणं म्हणजे आपल्या मनाच्या खोल तळ त्यांना लागला की काय? ती अलगद डोळे उघडत बाजीकडं पाहू लागली. बाजी स्थितप्रज्ञागत ड्रायव्हिंग करत होता. पाच वर्षांपूर्वी चा प्रसंग तिच्या चक्षूपटलावर तरळू लागला.
.
.
राज डागानं सारा कारभार हाती घेतला..नारायणरावांचा विश्वास संपादन करत रचनाला ही आपल्या जाळ्यात ओढलं. नारायणरावास तो धंद्यात साथीदार हवा होता पण रचनासाठी बिलकूल नाही. तरी ते त्याची हुशारी पाहून त्याबाबत मौन पाळू लागले. राजनं मात्र धंद्यात हस्तक्षेप करत बऱ्याच बाबी आपल्या ताब्यात घेतल्या. आता नारायणरावास रस्त्यातनं बाजुला केला की रचनासहीत सारी प्राॅपर्टी ताब्यात येईल म्हणून त्यानं नारायणरावावर माणसं पाठवली. पण नेमकं बाजीनं जिवाची बाजी लावत त्यांना वाचवताच त्यांनं रचनाला साथीला घेत बाजीवरच बाजी उलटवू लागला.मात्र नारायणराव वाचले. व त्यांना एका मारेकऱ्यांनं ओझरता 'डागा' हा शब्द उच्चारलेला लक्षात राहिला. तरी त्यांनी इतक्या वर्षाचा संबंध म्हणून अचानक अॅक्शन न घेता सावध होत राजवर पाळत ठेवली. त्यानंतर त्यांनी रचनाला राजपासून पूर्णत: अलग केलं. त्याचवेळी बाजीस सोबत ठेवत त्याला धंद्यात आणू लागले. रचनाला हल्ला कोणी केला हे माहीत नसल्यानं व राजकडं झुकली असल्यानं नारायणरावांनी सांगितलं असतं तरी तिनं विश्वास ठेवलाच नसता म्हणून नारायणरावांनी ही सांगितलं नसल्यानं तिला बाजी खटकू लागला. आॅफीसमध्ये ती व राज बाजीचा छोट्या छोट्या गोष्टींसाठी पाण उतारा करू लागले.पण बाजी शांत राहत सहन करी. कारण नारायणरावांनी तिची जबाबदारी त्याच्यावर सोपवलेली. त्यातच राजनं काही महिन्यातच नारायणराव व बाजीवर दुसरा हल्ला केला. या वेळी मात्र घरातूनच. दुपारी घरून येतांना रचना उशीरा येत नारायणरावांचा डबा आणणार होती. त्यातच बाजीचा पण आणायला नारायणरावांनी घरात आधीच सांगितलेलं. म्हणून ते दोन्ही आॅफिसात सोबत जेवण घेणार होते. राजनं निमीत्त काढत घर गाठलं. व तो रचनासोबतच गाडीतून आॅफीसात आला. रस्त्यात एका ठिकाणी गाडी थांबली म्हणजे राजच्या नियोजनानुसारच. मोबाईल वर बोलता बोलता त्यानं रचनास इशारा केला.रचना उतरली. बराच वेळ ती आली नाही म्हणून राजनं ड्रायव्हरला उतरवत रचना मॅमला शोधायला पाठवलं. तो पावेतो गाडीत डबा उघडला गेला. रचना आली. ड्रायव्हर आला व ते आॅफिसात आले.
दुपारनंतर वेळ झाली तरी नारायणराव जेवणाला बसेत ना. राज डागाची घालमेल वाढली. तो सारखा डब्याकडं पाहत चुळबुळ करू लागला.
" सरजी आधी लंच घ्या, बाकी होईल नंतर!"
राज पोट तिडकीनं बोलला.
" हो हो टाईम झालाच, त्यांनी बेल वाजवत शिपायाला बोलवत बाजीस पाठवायला लावलं.
" राज थाबला आहेस तर तू ही ये बस!" नारायणराव बोलले.
राजला थंडा घाम फुटला. तो डब्याकडं पाहू लागला.
" नाही सरजी, मी दुपारी करत नाही ,आपणास माहित आहे! आपण करा तेवढ्यात मी रचना मॅम सोबत अग्रवाल फर्मवर चक्कर मारून येतो" म्हणत तो सटकू लागला.
बाजी आला. नारायणरावांनी डब्याकडं इशारा करत डबा उघडायला लावला. तोच फोन वाजला . अग्रवाल फर्ममधुनच काॅल होता.
" साहेब ,जेवन बाकीय ना? कृपा करून तो डबा खाऊ नका"
" नाही अजून , आता बसायचंच आहे! पण का?"
" कृपा तो डबा उघडू नका..."
पुढचं ऐकून नारायणरावांची वाचाच बंद झाली. हात थरथरू लागले. त्यांनी बाजीस थांबवलं.अग्रवाल नं मोबाईलवर क्लीप पाठवली. नारायणराव व बाजी सुन्न झाले. रचनाला मध्ये बोलावण्यात आलं.
"घरून येतांना गाडी कुठं थांबवली होती का?" रचनास दरडावून विचारलं.
" होय अग्रवाल फर्मखाली."
" का?"
" राज डिल्सच्या फाईल्स घ्यायला जात होता तोच त्याला काॅल आला व मग मला इशाऱ्यानं सांगताच मी गेले घ्यायला"
नारायण रावास अग्रवालचं म्हणनं पटलं. त्यांनी रचनाला बाहेर पाठवत राजला मध्ये बोलवलं.
" राज चल आज आमच्या सोबतच खा एक दोन घास!" नारायणराव तोंड फिरवत राग आवरत बोलले.
" सर मी दहा वाजताच घरून जेवण करून येतो, आपण करा जेवण"
"बसायला सांगितलं ना!"
नारायणराव गरजले. राजनं ओळखलं . तो डोअर उघडत नकार देत बाहेर निघू लागला.
नारायणराव लाल झाले. त्यांनी बाजीला जोरात फर्मावलं,
" बाजी ,या हरामखोराचा पापाचा घडा भरला, तुडव याला!"
बाजीनं बाहेर पडणाऱ्या राजचं छाताडं धरत राजला लाथा घालायला सुरुवात केली. रचनाला कळेना ती बाजीवर धावून जात हात उचलणार तोच बाजीनं सणदिशी तिच्या गालावर सणकावली.
.
.
रचना गालाला हात लावत समाधीतून उठली व गाडी चालवणाऱ्या बाजीकडं पाहू लागली. हे सोंग एरवी मॅम, मॅम करत गुलामागत राहतं पण जेव्हा त्यास तो बरोबर असल्याचं समजतं त्यावेळेस मात्र कुणाचीच भीड न ठेवता सर्वांना पंज्यात घेतो. त्या दिवशी ही यानं अशीच लगावली होती.
राजनं डबा उघडून काही टाकलं हे अग्रवाल फर्मच्या खालच्या सी.सी.टी.व्हीच्या कॅमेरात अलगद कैद झालं. सोमण अग्रवाल आॅफिसात त्या दिवशी उशीरा आले. त्यांनी आल्या आल्या सहज मागचे फुटेज चाळून पाहिले. ते. सीन पुढे जातांना अचानक त्यांना संशयास्पद वाटलं. त्यांनी परत परत पाहिलं. लगेच त्यांनी नारायणरावास फोन गेला व राजचं सारं बिंग फुटलं. पोलीस आले डबा व राजला उचललं. राजला पोलीस कस्टडीत घेतल्यावर पोलीसी खाक्या दाखवताच राज सारं सारं पोपटागत बोलला. नारायणरावावर हल्ला करणारे मारेकरी पकडण्यात आले. ड्रायव्हर चा खून व मनुष्यवधाचा प्रयत्न या कलमान्वये राजला कारावास झाला.रचनास सारं आठवलं.
गाडीनं सातपुडा ओलांडतांना जोराचा पाऊस सुरु झाला.रचनानं बाजीस चहासाठी एखाद्या ठिकाणी थांबावयास लावलं. बाजीलाही लवकर जळगाव पोहोचण्याची अजिबात घाई नव्हती.कारण रात्र झाली तर बरच. कोणी ओळखीचं भेटणार नाही. व दुसऱ्या दिवशी काही तरी निमीत्त काढत जालना साईडकडं निघून जाऊ याच प्लॅनमध्ये तो होता. एका साध्या ढाब्यावर त्यानं गाडी थांबवली. गाडीतून ढाब्यात जाईपर्यंत रचना ओली झाली. चेहऱ्यावर पाण्याचे थेंब निथरू लागले. बाजीनं टेबलापासुन दूर उभं राहत केस झटकले. रचनानं हे पाहताच तिच्या मनात एक वेगळीच कल्पना थिरकली. तिनं घाईत चहा संपवला. व लगेच गाडीत जाऊन बसली. बाजीनं बील पेड करत गाडी सुरू केली.
गाडी बऱ्याच लांब आल्यावर रचनानं खिडकी थोडी उघडत बाहेर पाहिलं. पाऊस जोरानं सृष्टीस बदळत होता. ओघळ, ओहोळ उड्या मारत वाहतांना दिसत होते. थंड गारवा अलगद अंगाला झोंबत रोम रोम पुलकीत करत होता.उघड्या खिडकीतून पाणी आत येतांना पाहताच बाजीनं ग्लासमधून मागं पाहिलं. रचनानं काच चढवली.
" मि. बाजी ,कधी पावसात पूर्ण भिजलात का?"
अचानक आलेल्या प्रश्नानं बाजी भांबावला.
" मॅम आता नाही तरी बालपण पावसात शेतात राबण्यात गेलंय! आम्हा शेतकऱ्यांना भिजण्याचं काय कौतूक!"
"मला भिजायचंय ! थोडं रस्त्याच्या कडेला गाडी उभी करा!"
" मॅम पहाडी इलाखा आहे.शिवाय हा सातपुड्याचा पाऊस ,का उगाच...?"
" मि. बाजी, गाडी उभी करा, सांगितलं ना!"
बाजीची इच्छा नसून गाडी थांबवावी लागली.
रचना उतरत रस्त्याच्या कडेला भर पावसात चिंब भिजली. हातानं पावसाच्या धारा उडवत ती तिरप्या नजरेनं बाजीकडं पाहू लागली.
बाजी खाली उतरलाच नाही. त्याला मनात संताप येत होता. पण धनवान बापाची एकुलती एक लेक .शिवाय मालकच. काय करणार. तारूण्य सुलभ पावसाची ओढ व कधीच असं वातावरण लाभत नाही म्हणून ही असेल म्हणून त्यानं तिकडं दुर्लक्ष केलं. दहा पंधरा मिनीटं झाली. येणारी जाणारी वाहनं विचीत्र नजरेनं रचनाकडं पाहत पुढं जाऊ लागले.
" मॅम चला आता..." त्यानं अर्धवट दरवाजा उघडत विनवलं.
" थांबा जरा, मस्त वाटतंय..."
तोच हा नजारा पाहून एका ट्रकवाल्यानं गाडी थांबवत तो खाली उतरला. व जवळ जवळ सरकत तो रचनाकडं पाहत येऊ लागला. बाजीनं पाहीलं. रचनानं गाडीतून उतरणाऱ्या माणसाकडं पाहिलं.पण त्याकडं दुर्लक्ष करत ती तिरक्या नजरेनं बाजीस हेरू लागली. रचना काहीच बोलत नाही हे पाहून तो माणूस आता रचनेच्या अगदी जवळ जाणार तोच बाजीनं संतापात उतरत त्याची काॅलर पकडत सणाणदिशी वाजवली. त्या सरशी तो माणूस खाली शेपूट घालत कुत्र्यागत धूम पळाला. त्याच तिरमीरीत बाजीनं रचनेच्या दंडास धरत कानाखाली आवाज काढत गाडीत बसवलं. व धाडदिशी दरवाजा लावत गाडी पळवली. रचना लाल झालेले गाल चोळत बॅगेतनं टाॅवेल काढत केस व तोंड पुसत गालातल्या गालात हसू लागली. तिला जे ओळखायचं होतं ते तिनं ओळखलं. हेच... एरवी गुलाम बनून राहणारा अशा वेळी एकदम रूप पालटतो.नी तेच रूप तिला हल्ली भुरळ घालू लागलं होतं. गाडी तापी जवळ करू लागली..मध्यंतरी ती शांत बसुन त्याला मागून न्याहाळत होती. तापी ओलांडतांना बाजीनं गाडीचा वेग मंदावत नदीस हातानं नमन केलं.
" गाडी थांबवा मला पुढं बसायचंय" रचनानं गाडी मंदावताच जोरात सुनावलं.
बाजीला आपण हात उचलायला नको होतं वाटत तो नरमला होता.त्यानं गाडी थांबवली. रचनानंही नदीस प्रणाम करत घाईत पुढं बसली.
" बाजी, बालपण कुठं गेलं रे तुझं!"
बाजीनं आपला एकेरी उल्लेख ऐकताच रचनाकडं भांबावून पाहिलं. तिनं तोंड व केस पुसले होते तरी अंगावरची साडी अजुन तशीच ओली होती.
" माफ करा मॅम.मी हात उचलला.पण ती जागा पाहून मला कसं तरीच होत होतं.कारण त्याच परिसरात आबासाहेबांवर हल्ला झाला होता! म्हणून..."
" म्हणजे तू त्यासाठी मला मारलं की तो माणूस छेडत होता म्हणून?" रचनानं आता बाजीकडं खोल पाहत विचारलं.
" ..,." बाजीनं फक्त तिच्याकडं पाहिलं पण काहीच बोलला नाही. खरं तर त्याक्षणी हल्ल्यापेक्षा माणसानं रचनाजवळ जाणं यानंच बाजी बेफान झाला होता. पण त्यानं सांगणं टाळलं.
" बाजी बालपणाबाबत मी काय विचारलं तू सांगितलंच नाही!"
पुन्हा एकेरी उल्लेख होताच त्यानं समोरची नजर काढून रचनावर फेकली. नेमकं त्यावेळेस रचना नं केस सोडत नव्यानं अंबाडा घातला. पावसाचं थंड वातावरण व त्यात ...बाजी घुटमळला.
मालक रचनानं एकेरी बोलणं यात त्याला काहीच वाटलं नसतं. पण नारायणरावास वाचवत त्यानं रचनाच्या घरात प्रवेश केला होता.नंतर नोकर. म्हणून नारायणरावाच्या मनात त्यानं जे स्थान निर्माण केलं होतं त्यानं म्हणा की बाजीचं व्यक्तीमत्व म्हणा पण रचना नेहमीच त्याला ' मिस्टर बाजी' म्हणतच आदरानं हाक मारी. पण आज ती थेट बाजी म्हणतेय म्हटल्यावर बाजीस भाव न कळाल्यानं त्यास कुठं तरी ठेच लागत होती.
" मॅम कुणाच्या भूतकाळाच्या उदरात काय काय दडलं असतं हे शोधणं म्हणजे घुशीचं बिळं शोधण्यागत असतं. हाताशी चांगलं लागण्याऐवजी मातीच लागते व भ्रमनिराश होतं माणूस!"
" बाजी, मातीतून वर आलेल्या माणसाच्या जिवणात माती असली तरी तिचं सोनंच करतो तो! त्याची मला चिंता नाही.सांग मघाशी तू शेतकरी,...काय सांगत होता."
बाजीला पहिल्यांदाच रचना वेगळी भासली. तो गंभीर झाला.
रचनानं लाख प्रयत्न करूनही बाजीबाबत तिला माहिती मिळालीच नाही. पण त्या रात्री बाजीला बाबा, संता,जना वहिणी, बाला, सुमी यांच्या आठवणीनं झोप आलीच नाही. रचनानं जे सवाल केलेत त्यानं की आपल्या भुमीत आपण आलोत यानं पण त्याला घरच्या आठवणी दाटत तो रात्रभर तळमळला.पाच वर्षात आपण नारायणरावांचा विश्वास कमावला पण घरच्यांना देण्याइतपत काहीच नाही. मग कोणत्या तोंडानं घरी परतावं? जर आपण अजुन थोडं थांबलो तर नारायणरावाकडची आपली पाच वर्षाची थकबाकी व आणखी दोन तीनवर्षाचा पगार उचल घेऊ, काही कर्ज काढून घरी गेलेलं शेत म्हणा वा दुसरं घेण्याइतपत रक्कम जमवूनच जाऊ यात घरी. का निदान भाऊ वहिणी, बाबा मुलं कशी याचा तरी तपास करून भेटण्यासाठी जावून यावं या द्विधा मनस्थितीत तो रात्रभर तळमळत असतांनाच त्याला रंजन, हणमंतराव, मिना, राधा, व धना आठवला नी तो झोपल्या झोपल्या लाल झाला. सूड.... सूड... तर घेऊच. जन्माची अद्दल घडेल असा... पण त्यासाठी अजुन..वेळ यायचीय.
सकाळी सकाळी च अजंता रिसाॅर्टवर सुनाजी महाजन व जयदिप कुमावत हजर झाले. दोघांकडं गर्गे फर्मची जिल्ह्याची डिलरशीप होती. आज पालकमंत्र्यांनी राज्यस्तरीय अॅग्रो फेस्टीवल(कृषी मेळावा) ठेवला होता. कृषीमंत्री, मुख्यमंत्री येणार होते. गर्गे फर्मच्या साऱ्या उत्पादनाचा स्टाॅल आधीच जयदिप कुमावत व सुनाजी महाजनांनी लावला होता. राज्यात कृषी क्षेत्रास चालना देण्यासाठी देशातील अनेक मान्यवर उद्योजकांना निमंत्रीत केलं होतं. शासनाकडनं अनेक सुविधा देत घोषणा ही होणार होत्या. म्हणूनच नारायणरावांनी आपल्या फर्मचं नेत्वृत्व करण्यासाठी बाजी व रचनास पाठवलं होतं. व सुनाजी, जयदिपनं ज्या साईड सुचवल्या होत्या त्या ही पाहणं होणार होतं. हाच मेळावा जर दुसऱ्या जिल्ह्यात राहिला असता तर बाजीनं हिरीरीनं भाग घेत भुमिका मांडली असती.पण जळगाव म्हटल्यावर तो रचनाकडं सोपवत जालनाकडं निसटू पाहत होता. पण सकाळी सकाळीच कुमावत व महाजन येताच त्याला निसटताच आलं नाही.
गाडीनं चौघं मेळाव्याकडं निघाले. त्यांनी आपल्या स्टाॅलच्या मांडणीचं निरीक्षण करत खतं, पेस्टीसाईड्स, अवजारं यांच्या मांडणीबाबत व डेमोन्स्ट्रेशन बाबत काही सुचना केल्या.राज्यातील नामांकित शेतकरी उद्योजक आलेले. दुपारी अकराच्या सुमारास कृषीमंत्री, मुख्यमंत्री आले. त्यांनी मेळाव्यात धावती भेट दिली.त्यात गर्गे फर्मच्या प्राॅडक्टबाबत उत्सुकता दाखवत वाहवा केली. नंतरच्या चर्चासत्रात गर्गे फर्मच्या आगामी योजना बाबत दहा मिनीटे वेळ देण्यात आला. बाजीनं रचनालाच बोलावयास सुचवलं. पण तिनं त्याच्याकडं रात्री जागत तयार केलेलं स्पीच थमवत " मि. बाजी, आबासाहेबांनी आपणालाच सांगितलंय" सांगत कागद दिला. एरवी हजारोच्या मेळाव्यात, वा मोठमोठ्या सेमीनार मध्ये या चार पाच वर्षात प्रभावीपणे बाजू मांडणाऱ्या बाजीचे आपल्या जिल्ह्यात मात्र छाती धडधडू लागली. फर्मची आगामी योजना काय हे त्याला सारं माहित होतं पण तरी त्यानं रचनानं दिलेल्या कागदावर एक ओघवती नजर मारली. नी वाचता वाचताच तो चमकला. त्याच्या डोळ्यावर त्याचा विश्वासच बसेना. 'गर्गे फर्मची जळगाव जिल्ह्यात बाजी फर्म म्हणून सुरूवात होणार' या वाक्यावर तो थबकला. त्यानं रचनाकडं अविश्वासानं पाहिलं. ती समजली. गर्दीत तिनं त्याचा हात हातात घेत " बाजी...बेस्ट आॅफ लक"
तिकडं गर्गे फर्मचं स्टेजवर नाव पुकारलं गेलं.
बाजीला दहा मिनीटं देण्यात आली होती पण बाजी मुख्यमंत्र्यासमोर वीस मिनीटं एकसारखा बोलला. गर्गे फर्मची महाराष्ट्राच्या मातीशी जुळलेली नाळ, त्यांची विश्वासार्हता, भागभांडवल व भविष्यातील योजना, देशाच्या कृषक प्रगतीसाठी बांधिलकी याबाबत मुद्देसुद बोलला. बोलणं संपताच मंत्र्यांनी समारोपाच्या भाषणात बाजी फर्मच्या जळगाव शाखेसाठी शुभेच्छा देत हे शासन सर्वतोपरी मदत देण्याबाबत आश्वासन देत नामोल्लेख करताच साऱ्या उद्योजकाच्या नजरा बाजीकडं वळल्या.
दुपारनंतर बाजी व रचनास साईड पाहण्यासाठी जायचं होतं. पण उशीर झाल्यानं त्यांनी दोघांनी एकच साईड आज पाहून बाकी उद्या पाहण्याचं ठरवलं. व मेळाव्यात भोजनाचा आस्वाद घेत ते जामनेरकडची साईड पहायला निघाले. पण मेळाव्यातून त्यांची गाडी बाहेर पडतांनाच मेळाव्यात प्रवेश करतांना बाजीस रंजन, हणमंतराव मिना व राधा दिसले. बाजीची छाती जोरात धडधडत नसा ताणल्या गेल्या. त्याच्या कानाच्या पाळ्या लाल झाल्या. श्वास फुलला.त्यानं आपल्याकडंची काच वर चढवत डोळ्यावर गाॅगल्स चढवला. रंजन गाडी चालवणाऱ्या सुनाजीस उशीर झाला साहेब.....काही तरी सांगत होता. तोच बाजीनं 'सुनाजीराव गाडी हलवा उशीर होतोय', जोरात सुनावलं.
सुनाजीनं गाडी धकवतच ' उद्या भेट सांगत रंजनला कटवलं.
बाजीला जी भिती होती तेच घडलं. पण आज आपण थोडक्यात निसटलो.उद्याचं काय. अजुन रंजन समोर येण्याची वेळ आली नाही...
पण आजचं त्याचं भाषण व बाजी फर्म या सुखद घटनानी तो लगेच रंजनचे विचार झटकत भानावर आला.
सुनाजी गाडी चालवत होता. जयदिप पुढे,नी रचना व बाजी मागच्या सीटवर.पण त्या दोघांसमोर बाजी फर्मबाबत विषय काढणं बाजीनं टाळलं.
जळगाव जिल्ह्यात खताचा, किटकनाशकांचा व शेतकी अवजारांचा कारखाना काढण्याची योजना असल्यानं जवळपास एकाच ठिकाणी पंचवीस तीस एकर जमीन हवी होती. त्या दृष्टीनं सुनाजीराव जयदिपरावांनी आधीच चार पाच ठिकाणी अशी जमीन उपलब्ध होऊ शकण्याबाबत चाचपणी केली होती. जळगाव शहरात एवढी जमीन मिळणं शक्य नव्हतं. व मिळाली तरी किंमत खूपच. त्यामानानं जळगावपासून काही अंतरावर ग्रामीण भागात व त्यातल्या त्यात तापीकाठावर मिळाली तर कायमस्वरुपी कारखान्यास लागणारं पाणी हा प्रश्नही सुटणार होता.
जामनेर टाकताच अजिंठ्याकडंची साईड त्यांनी पाहिली. पण बाजीस जळगाव पासून अंतर व पाण्याचं दुर्भिक्ष्य,शिवाय रस्ते याबाबत ती साईड मनात बसेना. ते तसेच परतले. उद्या भुसावळ, बोदवडकडची व सोनेवाडी धरणगावकडची साईड दोन गृप करत दाखवण्याचं सुनाजीनं मनात ठरवलं. त्यानं त्याबाबत बाजी व रचनास उद्याच थेट साईडवर घेऊन सांगायचं ठरवलं.
रात्री अजंता रिसाॅर्टवर बाजी व रचना थांबले. जेवण घेतल्यावर त्यानं विषय काढलाच.
" मॅम, बाजी फर्म नाव का?"
" मि. बाजी त्याबाबत आबासाहेबांनाच विचारा, त्यांनीच तशी सुचना केलीय व पुढची सारी प्रोसेस तुमच्याच नावानं करण्याबाबत ही सांगितलंय."
बाजी विष्मयानं रचना कडं पाहू लागला.
" पण का? आवडलं नाही का?" रचनानं खडा टाकला.
बाजीचा ऊर भरून आला. त्याच्या पापणकडा ओलावल्या. त्याच्या भाव बदलत्या चेहऱ्याकडं पाहताच रचना ही सुखावली.
" मि. बाजी आबासाहेबांना माणसांची कदर आहे. ते कुणाला कधीच वापरून घेत नसतात.तुम्ही तर पाच वर्षांपासून त्यांच्यासाठी भरपूर करत ,राबत आलात. फक्त दु:ख एकच राहिल की तुमच्या वतनात जर हे करता आलं असतं तर तुमच्या पेक्षा आम्ही जास्त आनंदी झालो असतो.
बाजीला आता आपल्या वरचा भरोसा उठला.आपण जर काही क्षण इथे थांबलो तर रडणं थांबवलं जाणार नाही. म्हणून तो उठत फक्त इतकंच म्हणाला," आबासाहेबाकडून मला कशाचीच अपेक्षा नाही पण मला माझ्या घरच्याची न पेलवणाऱ्या जबाबदारीचं ओझं उतरवण्यासाठी याची खूप गरज होती. ...तो चालू लागताच रचनानं ओळखलं की आबासाहेबांनी गर्गेफर्मची जळगाव शाखा बाजीच्या नावावर केलीय हे योग्यच....
दुसऱ्या दिवशी सकाळीच भुसावळकडं जयदिप कुमावतसोबत बाजी गेला तर सुनाजी महाजनासोबत रचना धरणगाव व सोनेवाडीची साईड साठी निघाली. पण सुनाजी रचनास सोनेवाडीला नेणार हे बाजीला कुठं माहित होतं.
.
रचना भेटणार का बाला व सुमीस...?
बा विठ्ठला अगाध तुझी लिला!
क्रमश:
वासुदेव पाटील.