भाग::--एकादश
आषाढी एकादशी जवळ येऊ लागली तशी पावसानं सोनेवाडी झोडपली जाऊ लागली. शेतकऱ्यांनी पेरणी आटपत पंढरपूचे वेध धरले. दोन तीन वर्षापासुन दुलबा जळगावला गेले व नंतर तर हे जगच सोडून गेले तेव्हापासून सोनेवाडीची पालखी पंढरपुरला जाणं ढळतेय की काय अशीच परिस्थीती निर्माण झाली.
" बाजी, एक खंत वाटते रे?"
" काय काका? सांगा ना!"
"माझ्या दुलबानं विठोबाची पालखी कधी टाळली नाही; ती सतत सुरू राहिली पाहीजे. आता बाला सुमीची ही माझी काळजी मिटली म्हणून मी नेतो पालखी.मला जाऊ दे!"
" काका परमार्थासाठी मी अडवणार का आपणास? पण तुमचं वय! तीच काळजी वाटते. पाहू गावातून कोण जात असेल तर ठिक नाहीतर करू काहीतरी!" बाजीनं काकास सांगत विषय ढकलला. आपल्या बाबानं गावात सुरू केलेली परंपरा आपल्या घरातूनच चालवली पाहिजे पण घरातून जाणार कोण? बाजी विचार करू लागला.
कारखाना उभारून तर बंदच पडला होता. रंजन सोबत आता धनाचे ही हाल सुरू झाले. कारण कारखान्याच्या शेअर्ससाठी हणमंतरावांनी धनाकडं जे चार एकर उरलं होतं ते ही देण्यास लावल्यानं कारखाना उभा राहिला त्यात धनाचं शेत ही गेलं. राधा जळगावला नोकरी तर धना सोनेवाडीत .तो एकदम चक्रावल्यागत झाला. कफल्लक स्थितीत तो विठ्ठल मंदिरात बसून राही. बाला सकाळ संध्याकाळी आरतीला आला की तो ही त्या कामात बालास मदत करी. आधी बाला त्यास घाबरी पण नंतर काकाची स्थिती पाहून बालाची भीड चेपली व तो विरघळला. लग्नास सहा सात वर्ष होऊन धनास मुल बाळ न झाल्यानं म्हणा किंवा परिस्थीतीनं म्हणा धना बालाकडं मायेसाठी जवळ येऊ लागला. बाजीला भावाची ही स्थिती पाहून आंतरीक वेदना होत . हा केवळ स्वार्थापोटी व हणम्या राधाच्या बहकाव्यात येऊन बदलला तरी आपला भाऊच आहे. याला दुखी करून आपल्या बाबास कधीच शांती लागणार नाही.
रजत रिकामा फिरत हणमंतरावामागं टिरीटिरी लावू लागला. मिरा तर विमनस्क गतच झाली. तिला रजतबाबत घृणाच निर्माण झाली. व स्वत: बाबतही अपराधीसारखं वाटू लागलं.
" मामा ,त्या गर्गेचा वा बाजीचा हवं तर पाया पडू पण कारखाना सुरू करायला लावा.अन्यथा आपले हाल कुत्रं ही खाणार नाही." रजन हणमंतरावाला विनवू लागताच जवळ बसलेल्या मिनेस ' कुत्रं ' ऐकल्याबरोबर मनात चीड दाटून लागली. बाजी मस्त पायाची अढी मारत बसलाय.त्याच्या बाजूला भलं मोठं कुत्रं जीभ बाहेर टाकत मागच्या पायावर बसलाय. गळ्यात पट्टा अडकवलाय व त्याची साखळ बाजीच्या हातात आहे. त्या कुत्र्यात तिला रजत दिसू लागला.
" जावई बापू धना व राधास घेऊन जाऊन पाहतो. काय सांगता ते तर कळेल. मग पाहू काय मार्ग निघतो" हणमंतराव रंजनला म्हणाला.
दुसऱ्या दिवशी मिरा,राधा व हणमंतराव सोनेवाडीत गेले. त्यांनी धनास गाठलं. आधी धना व राधा भेटावयास गेले. बाजी गाव दरवाज्याकडं गेल्याचं कळालं. घरून गावदरवाज्याकडं येत त्यांनी मंदिरात असलेल्या बाजीची भेट घेतली.
" बाजी, पुरे आता.माझी काय चूक की रजत, मिरा व हणमंतरावाच्या पापाची सजा मला देतोहेस." धना कळवळून बोलला. बाजी मंदिरातच बसला.
त्याच्या अंगाची लाही लाही होत होती.
" बाप्या, तू एकदम स्वार्थी आहेस! तुला भाऊ म्हणतांना देखील लाज वाटते मला!"
" बाजी गुन्हा त्यांनी केलाय नी तू मलाच दोषी धरतोय.हवं तर त्यांना नेस्तनाबूत कर.मी आड येणार नाही.पण..." धना आशेनं बाजीकडं पाहत बोलू लागला.
" बाप्या ,तुझ्या बाईला लावण्यासाठीच तर शेत विकलं होतं नं संता दादानं? ते तर गेलंच तरी नंतर उरलेलं शेतही लाटतांना तुला लाज नाही वाटली. आणि वरून विचारतोस माझी चूक काय?" बाजी तळतळला.
" त्या रंजन मिरा, मामाचं ऐकून झाली माझ्याकडून चूक.पण त्यात त्यांनीस मला भरीला पाडलं.तू त्यांना काहीही कर पण मला माफ करं!"
" बाप्या अजुनही तू स्वार्थीपणा सोडला नाहीस. तेव्हा आमच्यात राहून आम्हास धोखा देत होता तर आता त्यांच्यात राहून त्यांना धोखा देऊ पाहतोय. अरे नादानं अनाथ लेकरं , तझा जन्मदाता बाप तुमच्या आश्रयाला आला तर त्यांना तुम्ही साधं दोन वेळचं जेवण देऊ शकला नाहीत. नादान लेकरानं भुकेपोटी शेंगदाणे खाल्ले तर तोंडावर मारलं जातांना तुमची दानत कुठं होती. आणि म्हणुनच कदाचीत या विठोबानं तुमची कुस....." बाजी बोलता बोलता जीभ चावलीच. तोवर राधीनं आक्रोश मांडत बाजीच्या पायात लोटांगण घातलं. क्षणात बाजी सरकन मागे सरकला.
धना व राधी दोघे रडू लागले.
" बाजी आम्हास विठोबानं दिलीय सजा. पण आता माझी जमीन माॅल सारंच गेल्यावर आम्ही जगावं कसं? " जमीन माॅल तुमचा नव्हताच म्हणून तो गेला. तुझ्या हिश्याचं शेत विकून नोकरी मिळालीय ,त्यावर जगा. नी त्यावर जगणार ही तुम्ही. पण जे पाप केलंय ते फेडण्यासाठी या पांडुरंगाला शरण जा. तोच तुम्हास तारेल अन्यथा हा बाजी संता, जना वहिणीच्या मरणाचा बदला घेतल्या शिवाय राहणार नाही" बाजीच्या डोळ्यात रक्ताळलेली लाली आग ओकत होती. धना व राधा रडतच मंदिरातून घराकडं निघाले तोच धना व राधाची वाट पाहून थकलेले मिरा व हणमंतराव मंदिराच्या पायऱ्या चढले. त्यांना धना व राधा ओझरतेच जातांना दिसले.
" बाजी बापू ,पाया पडतो हवं तर. पण कारखाना सुरू करा!" हणमंतराव आल्या आल्या गहिवरला.
" मामाश्री , आमच्या रचनास तो कारखाना सुरू करावा अशी अजिबात इच्छा नाही हो!"
" मग रंजन राव, धनाजीराव यांनी कसं जगायचं?"हणमंतराव होश उडाल्यागत विचारू लागले.
" तेही तीस टक्के शेअर्स होल्डर आहेत. करावा त्यांनी कारखाना सुरू. त्यास आम्ही काहीच आडकाठी करणार नाही. तेवढं सहकार्य आम्ही निश्चीत करू"
" अहो बाजी बापू शेतकरी माणसं ते कसा कारखाना उभा करतील?"
" का? आम्ही ही शेतकऱ्याचीच औलाद ना! आम्ही करू शकतो तर ते का नाही? आणि तेवढी समज नसेल तर एवढी शेअर्स घेत कारखानदार होण्याची खाज, कंड कशाला असावी!"
हणमंतरावाच्या डोळ्यात आसवे तरळली.
" हणमंतराव माझ्या बापास ,भावास माॅलचे स्वप्न दाखवत वतन विकावयास मजबूर करणारे तुम्हीच ना?" बाजी बेदरकारपणे संतापला.
" राव! प्लिज झाल्यात चुका! पदरात घेऊन पुढची दिशा आपणच द्यावी पदर पसरते!" मिरा डबडबल्या नेत्रानं विनवू लागली.
" मिराबाई! तुमचा पदर खूप मोठा हो! त्यात तुम्ही केव्हाही कुणाला झाकू शकता! पण तो वकुब आमचा नाही. पहिल्यांदा तुम्ही माझ्या बापाच्या उंबऱ्यात आला होता. म्हणून मी विन्मुख केलं नव्हतं तुम्हास. पण आता तुम्ही त्या उंबऱ्यावर नाहीत . प्रत्यक्ष पांडुरंगाच्या दारात आहात .त्या दारात मीच याचक आहे तर तुम्हास काय देणार. पण तरी तुम्हास वाटलं तर दोन गोष्टी तुम्ही करू शकता. एकतर स्वत: कारखाना चालवा व सत्तर टक्के नफा आम्हास द्या किंवा शेअर्स विक्रीला काढा!" बाजी एवढं बोलून पांडुरंगाची क्षमायाचना करत निघून गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळीच राधी रचनास भेटली व आम्ही पालखी घेऊन पंढरपूरला जात असल्याचं कळवलं. बाजीस आनंद झाला. आपण जे काही बोललो त्याचा इष्ट व हवा तसा परिणाम झाला याचा त्याला मनस्वी आनंद झाला. त्यानं महाराजांना बोलवत सारी तयारी केली पालखी सोबत गावातून जाणाऱ्या साऱ्या लोकांची सर्व सोय त्यानं लावली. किसनबाला वयोमानामुळं पाठवलं नाही. पालखी निघाली तेव्हा धनास तो भेटला " बाप्या एकादशीनंतर गावात येणारा धना मला हणमंतरावाचा जावई नको तर दुलबाचा मुलगा हवा. त्येच प्रायचित्त तुम्हास वाचवेल"
धना व राधा पंढरपूरास रवाना झाले.
रंजननं पाहिलं बाजी फर्म सुरू करणार नाही. त्यानं शेअर विक्रीला काढले. तशी जाहिरात त्यानं दैनिकात, नेटवर टाकली. पण गर्गे फर्मच्या शेअर्स ला जो उठाव असायचा तो बाजी फर्मला मार्केटला मिळालाच नाही. खरीददार आधी गर्गेशी वा बाजीशी संपर्क करत व विचारणा करत. ग्रामीण साईड व त्यात बाजी व गर्गेची इच्छा नाही म्हटल्यावर कुणीच खरेदीदार तयार होईना. काही एखादा अनोळखी आलाच तर पडेल किंमतीत मागू लागला. रंजन हणमंतरावांनी हाय खाल्ली.
रंजनला दुपारी फोन आला. औरंगाबादचा कुणी माथूर म्हणून होता . आम्ही आज संध्याकाळ पर्यंत जळगावला येतो. साईड पाहिल्यावर निर्णय घेऊ. रंजनला आनंद झाला. त्या दिवशी एकादशीच होती. राधा व धना पंढरपुरात चंद्रभागेत पाप धुत विठोबाचं दर्शन घेत होते.
संध्याकाळ म्हटल्यावर रंजननं माथुरला सकाळी येण्याचं विनवलं. माथुरनं मला लगेच गुडगाव ला परतायचं असल्यानं आजच शक्य असेल तर सांगा विचारलं. रंजन रात्री कारखान्यावर माथुरला न्यायचं कसं म्हणून घाबरला. पण हातचं गिऱ्हाईक जायला नको म्हणून रंजननं होकार दिला. रंजन, मिरा, हणमंतराव रांजनेवाडीहून जळगावला आले. संध्याकाळी येणारे माथुर नवरा बायको रात्री नऊला औरंगाबाद हून जळगावला आले. हणमंतरावानं त्यांना उद्या सकाळी साईडवर जाऊ अशी विनवणी केली पण त्यांना लगेच गुडगावला परतायचं असल्याने दोन्ही गाड्या सोनेवाडी रस्त्याला लागल्या. पुढे रंजन व मिराची गाडी तर हणमंतरावास माथुरनं आपल्या गाडीत घेत रंजनच्या गाडीमागं गाडी काढली. कारखान्यावर रात्री फक्त वाचमॅन थांबत. बाकी एकही युनीट सुरूच झालं नव्हतं. साडे दहाच्या सुमारास गाड्या गेटसमोर आल्या .वाचमॅननं गेट उघडलं. बाजीनं आपल्या आईनं लावलेलं आब्यांचं झाडं कारखाना उभारतांना प्लॅनमध्ये विचारात घेत तसंच ठेवलं होतं व त्यावर आधारित गोलाकार रस्ता घेत प्रवेश ठेवला होता. हणमंतराव व रंजन गेटजवळ गाड्या पार्क करत वाचमनला कारखाना दाखवण्याचं सांगू लागले. पण माथुरनं रागानं पाहत त्यांनाच मध्ये बोलावलं. रंजन व हणमंतराव रात्री तर पायच ठेवत नसत. नाईलाजानं सारे मध्ये निघाले. मि. माथुर मिरास कारखाना पाहत सांगू लागल्या.
" आमची मोठी फर्म गुडगावलाआहे .पण औरंगाबादला राहणारे सासु सासरे थकलेत.त्यांना सांभाळण्यासाठी व त्यांची इच्छा म्हणून आम्हास इकडं उद्योग उभारत सेटल व्हायचंय"
रंजन माथुरला सारा कारखाना दाखवू लागले. सगळं युनीट नवंच होतं फक्त आठ नऊ महिनं पडलेलं. माथुर साईड आवडली. इतर शेअर होल्डर बाबत त्यानं विचारत चार पाच दिवसात मी फायनल सांगतो व शेअर्स घेतोच.
ते पाहत पाहत बाहेर निघू लागले. पण हणमंतराव मध्ये गेलेच नव्हते ते हातात छत्री घेत आंब्याच्या जुन्या झाडाखालीच उभे होते. मध्यंतरी अचानक ढगात गडगडाट झाला. तापीपल्याड विज चकाकली. थंड सर्दाळलेल्या पावसानं ओथंबलेली हवेची भोवरी घुरघुरत फिरली. आंबा झंझाळला. हणमंत रावास गारव्याचा झटका बसल्यागत वाटलं त्यांना हुडहुडी भरली. ते तेथून निघाले व गाडीत येऊन बसले. थंड वातावरणात ही त्यांना अंग गरम वाटू लागलं.
माथुर, रंजन सारे आले. रंजन व मिरा गाडीत बसले तोच माथुरनं "बाबास या गाडीतच पाठवा ,रस्ता अनोळखी असल्यानं" सांगताच हणमंतराव रंजनच्या गाडीतून उतरत माथुरच्या गाडीत मागच्या शीटवर बसले. मि.माथुर पुढे बसल्या. माथूरनं गाडी रंजनच्या गाडीमागं लावली. एकादशीचा पाऊस सुरूच होता. व द्वादशी लागली.
बारा वाजले. रंजनची गाडी बरीच पुढे निघून गेली. त्याला वाटलं मामा आहेतच ते आणतीलच माथूरला.
मि. माथुर गप्पा मारत होत्या पण हणमंत रावाच्या अंगातून घाम वाहत गरम वाफा निघू लागल्या. अचानक काय झालं कळेना. त्यांना गरगरल्या सारखं वाटू लागलं. माथूर गाडी रिव्हर्स गिअर मध्ये सोनेवाडीकडं पळवतोय असं त्यांना भासू लागलं.
" माथुर साहेब, गाडी रिव्हर्स मध्ये चालवत सोनेवाडीकडं का नेतायत?" तो खिडकी उघडत मागं जवळ येत होता तो हाय वे पाहू लागले.
तोच मि. माथुर " अहो घरी पोरं एकटी आहेत याचं नका ऐकू.गाडी वेगानं पळवा!" सांगू लागली.
" अहो ताई अशानं अपघात होईल! ऐका माझं" हणमंतराव बाईकडं झुकत सांगणार तोच माथुर बाईची मान गर्रकन मागे फिरली.
हणमंतराव एकदम गार.
" चूप बैस!मेल्या मुडद्या! आमच्या बाजीच्या नावाची पाटी आहे फर्मवर म्हणुन तुम्ही सुखरूप परतले.नाही तर तिघांचं तिथंच भरीत केलं असतं!" ती म्हणाली नी तिचा सारा चेहरा अचानक चेचला जात कवटीच गायब झाली. हणमंत रावाच्या अंगातून तप्त वाफा निघू लागल्या. त्याही स्थितीत हात पुढे करत ते माथुरला इशारा करू लागले तर माथुरनं गाडीचा गिअर बदलवला की काय गाडी हायवे कडं दौडू लागली पण माथुरचा कमरेखालचा भाग हणमंतरावास दिसेचना ना. हणमंतराव गाडीतच चिरकला,.... तोच फाटा आला .गाडी उभी राहिली.ही संधी साधत हणमंतरावानं सारी शक्ती पणाला लावत धाडकन दार लाथेनं लोटलं व तो अंधारात बेछूट हाय वे कडं पळू लागला.
" अहो ,अहो चाललं चाललं बांदर, पकडा पकडा" मिसेस माथुर म्हणाल्या. माथुरनं गाडी जोरानं पळवत हणमंतरावामागं लावली. हणमंतराव पळता पळता मागं येणाऱ्या गाडीकडं पाहत पुढं झेपावला. तोच हाय वे वर भरधाव ट्रक आला. नी मागून येणाऱ्या गाडीपासून वाचण्यासाठी सुसाट पळू पाहणारा हणमंत रावास ट्रकनं हवेत उडवला. त्याची ट्रकला आदळलेली कवठी टरबूजागत फुटली व छाती पोटाचा भाग चक्काचूर होत चितर बितर झाला. ट्रकवाला अंधारात थांबलाच नाही.
जळगावला पोहोचलेला रंजन व मिरा माथुरची गाडी अजुन कशी येत नाही म्हणून वाट पाहत थांबले. यायला हवी होती तरी आली नाही म्हणून त्यानं हणमंतरावास फोन केला.पण फोन लागेना. मग माथुरला लावला तर ' यह सेवा अस्तीत्वमे नही है' अशी धून रात्रीच्या शांततेत जोरात घुमू लागली. वाट पाहून व फोन लावून थकलेला रंजन मामाकरीता परत माघारी फिरला. पण गाडी दिसेचना. कारखान्यापर्यंत गेला. तिथून माघारी हळूहळू पाहत येऊ लागला. पण अंधारात काहीच दिसेना पहाटेचे चार वाजले. त्यानं थकत गाडी नाक्यावर उभी केली. मिरा व त्याचा गाडीतच होश उडाला. थोडा वेळ जाताच फटफटलं.सकाळमध्ये त्यांनं पुन्हा गाडी काढली तर फाट्याजवळच्या हाय वे वर वाहनाची गर्दी दिसली. खाली दूर ब्रासमध्ये पाय शिल्लक असलेला मासांचा चिखल दिसला. दूर फेकल्या गेलेल्या चप्पल व अंग उरलं नसलं तरी धोतरवरून हणमंतरावास ओळखत रंजन मिरानं टाहो फोडला. राधा व धनाची वारी झालीच होती ते लगोलग परतले. रंजनला मात्र ना माथूर दिसला ना मिसेस माथूर ना की त्यांची गाडी. त्यानंतर त्यांनी आधी सांगितलेल्या पत्यावर ही तपास केला.पण हाती काहीच लागेना. मग हा माथूर कोण? व तो कुठं गायब झाला? यानं रंजन बावचळला.
.
.सकाळी बाजीला कळताच दुश्मन जरी असला तरी त्याच्या मृत्यूनंतर दुश्मनी काय कामाची असा विचार करत बाजी सिव्हील हास्पीटलकडं धावला.
.
क्रमश: