फितूर आभाळ
भाग::- बारा (द्वादश)
हणमंतरावांचे तापीकाठावर कारखान्यात विश्वतिर्थावर अंत्यसंस्कार करण्यात आले. व नंतरचे तर्पणापर्यंतचे सारे विधी सोनेवाडीतच करण्यात आले.
महिन्यानंतर राधा जळगावला निघाली. तिनं धनास जळगावलाच सोबत येण्यासाठी विनवलं. पण धनानं नकार देत सोनेवाडीतच राहणं पसंत केलं. व त्यानं विठ्ठल मंदिरातच थांबत बालास मंदिरातल्या साऱ्या जबाबदारी तून मुक्त करत विठ्ठलाची भक्ती करू लागला. सोनेवाडीला दुलबा नंतर धनानं मंदिर सांभाळलं याचा आनंद झाला. रचना त्याला दोन्ही वेळ जेवण देऊ लागली. आता राधाही शनिवारी वा सुटीच्या दिवशी सोनेवाडीतच येऊन राहू लागली. कारण वडिल गेले. मिरा व रंजन रांझणेवाडीला गेले ,तेथेही त्यांचे अतोनात हाल. म्हणून तिला आधाराची गरज भासू लागली. म्हणून ती सुटीला सोनेवाडीतच थांबू लागली.
धना बदलला याचं बाजीस समाधान वाटू लागलं.
" अहो, एक विनंती करू का?" रचनानं रात्री बाजीला हळूच विचारलं.
" काय?"
" नकार देणार नसाल तर?"
" आधी सांगून तर पहा ,तू एवढं आबादीआबाद केलं तर मी तुला का नकार देणार!"
" राधाताई व धना भावोजी पश्चात्तापानं दगदगत आहेत. निदान त्यांना तरी ...."
"......." बाजीची मिठी सैल होतेय रचना ला जाणवताच ती घाबरली.
" तसं नाही म्हणायचं मला.आपल्या मनास वाटेल ते करा! पण बाबा जर राहिले असते तरी त्यांनी यांना एव्हाना माफच केलं असतं! म्हणून विनंती होती" रचना घाबरत,चाचरू लागली.
ही रचना एक जी आपल्या कृतघ्न भावास मदत करत आश्रय देतेय तर ती राधा; जिला शेत विकत नोकरीला लावलं तरी छदामाची मदत करणं तर दूरच.उलट शेत गहाळ केलं.हे कमी की काय आपल्या बापास व लेकरांना दिवस पडले असतांना घराबाहेर काढलं. नारीची वेगवेगळी रूपं पाहून त्याचा गळा दाटून येऊ लागला.
" जाऊ द्या , आपली इच्छा नसेल तर यापुढे मी हा विषय काढणार नाही".
" तसं नाही पण काकांना व आबासाहेबांना विचार आधी ते काय सांगतात मग पाहू!" असं बाजीनं म्हणताच रचनानं विचारात गढलेल्या बाजीस आपल्या बाहुपाशात आनंदानं पुन्हा ओढून घेतलं.
किसनाबाही बाला व सुमीस आधार मिळाला व दुलबाचं वतन परत मिळालं यातच सारं मिळालं.शिवाय धनाही दुलबाचंच रक्त म्हणून मनात उद्वेग असूनही बाजीनं त्याचा गुन्हा पदरात घ्यावा असंच मनोमन वाटत असल्यानं त्यांनी रचनास दुजोरा दिला. धनाला व राधाला घेत नारायणराव दुलबाच्या नविन बांधलेल्या घरात सोबत आणलं. राधा ला तर बाजी व रचना आपणास हाकलून लावतील हीच भिती. ती आल्या आल्या खाली मान घालत किसनकाकाच्या पायास लागली. धना खाली मान घालत चोरासारखा उभा. बाजीनं आणखी काहीच न बोलता भक्तीमार्गास भाऊ लागला व त्यास त्याच्या पापाचा पश्चाताप होतोय हेच पुरे म्हणत माफ करत स्विकारलं.
बाजीनं धनाला स्विकारल्यानं सोनेवाडीस आनंदच झाला. पण रंजन व मिराचं काय? मिरा आपल्या पतीच्या हालानं व वडिलांचा आधार गेल्यानं विमनस्कच झाली. त्यात बहिण राधा व बाजी एक झाले याचा तिला आनंद झाला तरी मनात असुरक्षितताच अधिक वाटू लागली. कारखाना सुरू झालाच नाही. शेअर्स विकायचं म्हटल्यावर कुणी घ्यायला तयार नाही. रंजन तर मिळेल त्या किंमतीत द्यायला तयार पण कुणीच फिरकेना. सरते शेवटी त्यानं आपली कार विकत जुनी जीप घेत तो प्रवाशी वाहतूक करू लागला. घराची भरपूर जमीन, घर सारं सारं विकून जमीन खरेदी केली. ती जमीन देऊन शेअर्स घेतले व आता त्या शेअर्सला बाजी विना रद्दीच्या कागदाइतका ही भाव मिळेना.तो कफल्लकच झाला.
दोन चार महिने गेल्यानंतर रजत, मिना राधाला मध्यस्थी घालत शेवटचा प्रयत्न म्हणून बाजीस भेटावयास आले. दोन्ही घरात सकाळी सकाळीच येत चोरासारखं घुसून राधा व रचनाजवळ रडू लागले.किसनबाच्या पाया पडू लागले. सुमीनं रजतला पाहताच बालाला लाथ मारणारा व छातीवर बुटासहीत लाथेनं लाथाळणार हा हा तोच ,हे आठवताच ती रचना आड घाबरत तोंड लपवू लागली. पण रचना तिथंच उभी म्हटल्यावर मंदिराकडं गेलेल्या बाजी काकाकडं ती घाबरून पळाली. पण ती दुसऱ्याच बोळातून गेली तर बाजी वेगळ्याच गल्लीतून घराकडं परतला. तो येऊन हाॅलमध्ये बसला. त्याला रजत व मिना घरात आल्याचं कळलं नाही.
" बाजी, आता पुढचं काय? " किसनबा जवळ बसत विचारू लागले.
" पुढचं म्हणजे काय काका?"
" बाजी! धना घरी रिकामा बसलाय व कारखान्यात एवढं भांडवलं गुंतवणूक तो तसाच किती दिवस पडू देणार बाबा?"
किसनबा आज अचानक हा विषय का काढताहेत बाजीला कळेना.
" काका, कारखान्याचं काय! होईल तर होईल नाही तर पडेल तसाच. दुसऱ्या दोन साईड सुरू आहेत. राहिला प्रश्न बाप्याचा (धनाचा)तर त्याची सोय करतो कुठं तरी! तूर्तास त्याला पाडुरंगाच्या सेवेत राहू द्या."
" बाजी पोरा, तसं नाही पण....रजत चे ही पैसे अडकलेत ना...?"
किसनबा रजतचा विषय काढायला घाबरू लागले.
" काका, त्याचा विचार आपण का करायचा? अडकू देत.नाहीतर त्यानं करावा सुरू?"
बाजी संतापात बोलला.
तोच मंदिराकडं काका न दिसताच सुमी परत शोधत शोधत घराकडं परतू लागली. ती अंगणात येणार तोच गल्लीतलं कुत्रं तिच्यावर जोरात भुंकत चाल करू लागलं. त्यानं ती आवाज चढवत जोरात घराकडं पळणार तोच तिचा आवाज ऐकून रजत राधा,मिरा रचना बाहेर डोकावले त्यांना पाहताच बाजीची नस तडकली.
सुमी जेवढ्या जोरात पळाली तेवढ्याच जोरात कुत्रं रिसडून धावलं. त्यास किसनाबानं यु यु चु चु करत शांत केलं. कुत्रं हूंहूं यूचूsssशुयूss s करत शेपटी खाली घालून पाय चाटू लागलं.
" बिलगलेल्या सुमीचे रचनानं जोरात कान फुंकत तिला कुरवाळलं.
" सुमी बेटा इकडं ये" म्हणत बाजीनं तिला जवळ बसवलं.
" सुमे अशी वावदूक जनावरं चाल करून आली तर कधीच पाठ दाखवत पळायचं नसतं. तसं पळालं की त्यांना चेव चढतो व ते लचका तोडू पाहतात. बाजी रंजनकडं तिरक्या लाल नजरेनं पाहत म्हणाला.
" मग काका क्काय करायचं?" सुमीची छाती अजुनही धडधडत होती.
" तितक्याच नेटानं उभं त्याच्या डोळ्याला डोळा लावत त्याला चुचकारायचं! मग ते हळू हळू नरम पडतं. तो पावेतो त्याला जोजारायचं. मग ते शेपूट खाली घालत आपले तळवे चाटू लागतं. मग त्यास पट्टा लावत आपला गुलाम बनवायचं. अन नंतर तर पट्टा काढून घेतला तरी ते इतकं स्वामीभक्त बनतं की मालकाचे पाय सोडून जातच नाही"
" अन काका त्यानं पुन्हा कधी आणखी आपल्यावर हल्ला केला तर मग?" सुमी बाळबोधपणे विचारू लागली.
" सुमे, जे स्वामी भक्त असतात ,गुलामी त्यांच्या रक्तात भिणते.त्यामुळं ते पुन्हा डोकी वर काढतच नाही.आणि जे डोकी वर काढतात त्या कुत्र्यांना कावररेली म्हणतात.अशांना आपण काय करतोय हे त्यांना देखील कळत नाही.मग अशांना ज्याला दिसेल तो त्याच्या शिराचा वेध घेतात वा शिरावर पाणी टाकून त्यास शांत करतात"
" बाप रे बाप!" सुमी उद्गारली पण त्या आधीच मिराच्या अंगावर काटे आले. ती काय समजायची ती समजली. तिला खाली मान घालून निमूटपणे ऐकणाऱ्या रंजनमध्ये पुन्हा तोच भास झाला.पट्टा...साखळी... बाजीच्या हातत...जीभ बाहेर काढलेलं कुत्रं.
ती काहीच विषय न काढताच राधाची रजा घेत उठू लागली.
" रंजनराव ,चला होऊ द्या तुमच्या मनासारखं. उद्यापासून लागा कामाला.करतो कारखाना सुरू!" जाणाऱ्या मिनाकडं पाहत बाजी बोलला. राधा धना, रंजनला आनंद झाला हे ऐकून पण मिरा मनात असंख्य प्रश्न घेत बाहेर पडली.
पंधरा दिवसात साफसफाई करत,ट्रकोगणती कच्चा माल आणत,लेबर आणत खताची साईड सुरू झाली. लगेच पेस्टीसाईडची व नंतर शेतकी अवजारांचीही. कारखान्यात एक दिड महिन्यातच सर्व साईडची उत्पादने बाहेर पडू लागली. तयार माल वेगवेगळ्या राज्यात जाऊ लागला.कामगाराची भरती होत तीन शीफ्ट मध्ये कारखाना चालू लागला. कुत्र्याकडं मालकानं शेताची राखण द्यावी तसं रंजनकडं कारखान्याची राखणदारी दिली. धनास मात्र त्यानं कारखान्यात जाऊच दिलं नाही.रंजन गाडीत मिरा लाही नेऊ लागला. आधी तिनं त्याला नकारच दिला. पण नंतर राधानं तिच्या मनातून काढलं. तरी तिला कारखान्यात जातांना आपल्या गळ्यात पट्टा बांधलाय व आपण मालकाची इमाने इतबारे सेवा करतोय असंच वाटायचं व मग काळजात मेंदूत सणक जाई. जोरानं खुर्चीला लाथ घालत येथून निघावं असंच सारखं वाटत राही. त्यातच ती आजारी राहू लागली. मग रंजन नं आपलं बिऱ्हाड हलवत सोनेवाडीतच आणलं.
उत्पादन वाढलं, खप वाढला.मार्केटला बाजी फर्मचे शेअर्स उच्चांकीला गेले. रंजनला उकळ्या फुटू लागल्या. आता तो दिवसाच नाही तर रात्री उशीरा पर्यंत कारखान्यात थांबू लागला. त्यांनं शेतात बाजीच्या नावानं फर्म आहे म्हणूनच कदाचित संता व जना शांत झाली असावी.अन्यथा आपल्याला त्यांनी शेतात पाय ठेवूच दिला नसता. म्हणून तो हळू हळू काम असलं की रात्री उशीरपर्यत ही थांबू लागला. त्याला कारखान्यातील प्रत्येक युनीटची बारीक सारीक माहिती करवून घ्यायची होती. कच्चा माल कोणकोणता, ? कोठून आणावा, प्रोसेसिंग कशी करावी?,विक्री कशी करावी यांची इत्यंभूत माहिती तो घेऊ लागला. एकदाचे सर्व बारकावे शिकले की मग नारायणराव,बाजी व रचनाला राज डागाच्या माणसामार्फत कसं उडवायचं याची प्लॅनिंग करू असं ठरवत तो मध्यंतरी कुणालाच न कळू देता राज डागाची ललितपुरला तु्रुंगात भेट घेऊन ही आला होता. नी आता सतत त्याच्याशी संपर्कात होता. हवंतर यांच्यासोबतच धनाचा ही चाखण्यालाच बार उडवायचा सारा बेत तो मनात पक्का करू लागला. बाजीला वाटत होतं की कुत्रं माणसाळलं पण कुत्रं तर कावरू पाहत होतं.
हिवाळा संपला. होळी गेली. फाल्गुन अमावास्या तीन चार दिवसावर आली. सोनेवाडीतल्या साऱ्या बाजा अंगणात गल्लीत पडू लागल्या. लोकं उन्हाळ्याच्या पारावर , गाव दरवाज्यात, गल्लीत गप्पांचा फड रंगवू लागले.
मिरा राधा जवळ तर कधी घरीच थांबू लागली.कारखान्यात जायला तिला स्वारस्यच राहिलं नाही.
आज पेस्टीसाईड डिपार्टमेंटचे राॅ मटेरिअलचे कंटेनर खाली करत होते. त्यातच इतर कामात रजतला बराच उशीर झाला. रात्रीचे अकरा वाजले. तोच त्याला हवा असलेला फोन आला. त्यानं नंबर पाहिला कट करत तो बाहेर आला. तिसऱ्या शिफ्टचे खेड्यावरील कामगार यायला सुरुवात झाली. .कारखान्यात वर्दळ असल्यानं तो बोलण्यासाठी आंब्याच्या झाडाकडं आला. कारखान्याच्या लाईटमध्ये आंब्याचं झाड त्याला वेगळंच भासू लागलं. त्यानं मोबाईल काढत नंबर घुमवला व तो हळू आवाजात बोलू लागला. बराच वेळ फोन वर बोलणं झालं. त्याला लगेच ललितपुरला निघायचं होतं . त्यानं खंडव्यापर्यंत आपली जुनी खटारा गाडीच नेण्याचं ठरवलं. कुणास काहीच न कळवता, त्यानं फक्त मिराला "मी औरंगाबादला चाललोय, माथूरचा ट्रेस लागतोय.मामाबाबत काय माहिती मिळतेय म्हणून.पण कुणालाच काही सांगू नको आणि औषधाच्या सॅपलच्या बाटल्या घरी राहिल्यात तेवढ्या शिपाई येईल त्याच्याकडं पाठव.घरात नको त्या." एवढं सांगत त्यांनं कट केला. आंब्याच्या झाडाखाली त्याची गाडी पार्क होतीच. त्यानं कॅबीन मध्ये परतत आपल्या फायली उचलायला लावत निघू लागला. गाडीकडं येतांना होळी गेली तरी उलट सुलट वारे वाहतच होते. जोराची एक झकार येत झाडाला लपेटू लागली. झाडं गोल गोल घिरट्या घालत आवाज करू लागलं. त्या वावटळीतच त्याचा ही तोल गेला. तो उठला व त्यानं गाडी चं फ्यूएल पाहीलं. भरपूर असल्यानं त्यानं आडमार्गे तापी क्रास करत पहाडातून सेंधव्याकडं जायचा अचानक बेत बदलला. जळगाव टाळूयाच. गाडी सुरू करत तो तापीकाठावरून वळणावळणाच्या, वर खाली चढणीच्या रस्त्यानं गाडी पळवू लागला. अमावास्या जवळच असल्यानं सर्वत्र अंधाराचं साम्राज्य. धूळ, व गरम हवेच्या झळा झेलत तो गाडी पळवू लागला. तोच त्याला गाडीच्या मागच्या शीटवर कसला तरी भास झाला. त्यानं वळणाचा अंदाज घेत गाडीच्या मागच्या भागात पाहिलं. पण काहीच दिसलं नाही. पुन्हा त्यानं पुढे पाहत गाडी पळवली. शेजारच्या ऊसाच्या शेतातून त्याला कोल्ह्यांचे तरस भेकडाचे चित्र- विचीत्र आवाज येऊ लागले. तापी क्रास करत तो आडवळणाच्या वाटेनं सातपुडा जवळ करू लागला. खड्डे, धूळ यानं त्याचा वेग कमी झाला. एक दोनचा सुमार झाला असावा. पहाडी इलाखा सुरू झाला असावा. तोच त्याला गाडीच्या मागच्या शीटवर पुन्हा काही तरी जाणवलं. त्यानं रस्त्याच्या कडेला गाडी उभी करत गाडीच्या मागच्या बाजूस निरखून पाहिलं. पण त्यास काहीच दिसेना. त्यानं मोबाईलचा स्टाॅर्च लावत आवाज कसला येतोय याची चाचपणी केली पण त्यास काहीच आढळेना. मग तो लंघुशंकेसाठी पुढे सरकणार तोच त्याला समोरून माणूस अंधारातून येतांना दिसताच तो तसाच माघारी फिरला व गाडीत बसून गाडी स्टार्ट केली.
" सेंधवा जाना है,रस्ता?"
तो माणूस काहीतरी पुटपुटत हातवारे करू लागला पण तोच त्याचं गाडीत लक्ष गेलं नी त्यांनं जिवाच्या आकांतानं झुंगी धरत पळ काढला. रंजन त्याकडं व गाडीच्या मागच्या सीटकडं आळीपाळीनं पाहू लागला. मागं काहीच दिसेना म्हणून त्यानं इथं पहाडात असल्या वेळी थांबनं ही सुरक्षीत नाही म्हणून गाडी धकवली. पण तोच त्याला पुन्हा जोराचा आवाज आला नी आता त्याचं लक्ष जाताच तो टरकला. मागच्या सीटवर त्याची नजर जाताच त्याला दोन टग्गर मोठाले कुत्रे बसलेले दिसले. त्यांनं गाडी हळू करत तिरपा कटाक्ष फिरवला. गाडीतल्या लाईटच्या उजेडात सीटवर जीभा बाहेर काढत मोठाले दाताचे कुत्रे त्याला दिसले.शेपटीचे गोंडे खाली पडलेले. नजर फुललेली लाल.तोंड वाकडं .तोच पुढं वळणावर तिठा आला. कोणत्या रस्त्यानं घ्यावी असा विचार करायला त्याला सवडच मिळाली नाही. त्यानं सरळ एका रस्त्याला गाडी टाकली. आपण गाडी काढली तेव्हाच कारखान्यात कुत्र्याच्या पिलूगत आवाज येत होता. पण पाहिल्यावर तर काहीच नव्हतं.मग ही अचानक आली कशी. म्हणूनच तो माणूस जोरात पळाला असावा. पण कुत्र्यांना पाहुन कसा पळेल? गाडीचा रस्ता पुढे पुढे एकदम खराब होऊ लाघला. चढ उतार कच्चा, खड्डे यानं गाडी चालवणं मुश्कील होऊ लागलं तोच मागच्या सीटवरची दोन्ही कुत्री हळूच पुढच्या सीटवर आली.पण आली तीच त्याच्या आजुबाजूला. उजव्या बाजुला जागाच नसल्याने तो सरकला. ती चुईचुईमुईमुई करत त्याचं तोंड व नाक हुंगू लागली. तोच त्यानं एका हातानं त्यांना बाजूला करू लागला नी ती बेलकाडताच त्याच्यावर पंज्यानं ओरबाडत भूंकू लागली. त्यानं कशीबशी गाडी थांबवली तर ती त्याच्यावर भुंकत फटाफट पंज्यानं वार करू लागली. त्यानं जोरानं झिडकारत दरवाजा उघडला नी कुत्र्यांनी चवताळत त्यावर हल्ला चढवला. तोंड, अंग पोटऱ्या याचे लचके तुटू लागले. तो रक्ताळू लागला. त्यानं गाडीचा नाद सोडत अंधारात पळू लागला. नी मग पाठलाग सुरू झाला. पहाटे फटफटे पर्यंत पाठलाग , ओरबाडणं , लचके तोडणं चालूच होतं. तो नदी नाल्यात दगड गोट्यात झाडी झुडूपात एकसारखा धावत पळत उठत बसत होता. पण कुत्र्यांनी पाठलाग सोडलाच नाही. सकाळ होताच कुत्री कारखान्याकडं निघाली असावित बहुतेक. रंजनला कुत्री जाताच हायसं वाटलं. तो पडला तर पडल्या जागीच त्यास ग्लानी आली व तो झोपला. त्याच जागी तो दुपार टळे पर्यंत झाडाखाली झोपून पडलेला. जाग आल्यावर आपण कुठं हे त्याला कळेना. अंगावरच्या कापडाच्या चिंध्या झालेल्या. तो धडपडत उठला. नदीत खोल उतरला. त्याला बारीक वाहणारा झरा दिसला त्यानं घटाघटा पाणी घोटलं. त्याला थोडी हुशारी वाटू लागली. मग त्यानं रात्री आपण कोणत्या दिशेनं आलो याचा अंदाज घेतला व तो धुरते धरते गाडीकडं चालू लागला. पण टेकडी चढ उतर याशिवाय त्याला काहीच दिसेना. तो फिरतच राहीला. पण गाडी दिसेना. अंधार पडला. तो बसत होता चालत होता. त्याला सपाटून भूक लागलेली. तो तसाच फिरत राहीला. किती वेळ काहीच सुध नाही. गुंगी आली.झोपला. सुध आली तर सकाळ झालेली. चालता चालता तो सपाटीवर आला.पाडा दिसला. त्याला चक्कर येऊ लागले. एका झोपडीसमोर पडला. माणसानं उठवत मक्याची भाकर तुरदाळीचं वरण दिलं .यानं बकाबका खालं. चक्कर येऊन थंडी जाणवू लागली. तो तसाच उठला व चालू लागला.
इकडं दोन दिवसानंतर मिरानं फोन लागत नाही म्हणून राधाला रंजन बाबत सांगितलं. शोधाशोध सुरू झाली पण औरंगाबादलकडं.
चारेक दिवस असाच तो भटकला. आता त्याला आपले हात पाय थरथरतायेत व तोंड फिरतंय असं वाटू लागलं. डोळे लाल व कावरेबावरे झाले. त्याला दिसेल त्या वस्तूला चावावसं वाटू लागलं. तो वेडावाकडा धावत सुटला. मध्ये गावं , नदी लागली.ऊस केळीची शेती लागली. मध्येच त्यानं गावं ओळखळी व तो त्या हिशोबानं सोनेवाडी जवळ करत होता .पण मध्येच भान सुटलं की तो दिसेल त्यावर खेकसून धावून जाई. झापड पडण्याच्या वेळी तो सोनेवाडीत आला. तोच समोर त्याला बैल दिसला नी त्यानं बैलालाच कडकडून चावा घेतला.तसं माणसानं याचं चलिंतर ओळखलं व आरोळ्या मारत लोकांना गोळा केलं लाठ्या काठ्या घेत लोक आले लांब अंतरावरनं अंदाज घेत काठ्या पडू लागल्या. तोच अंधारातून हा मार टाळण्यासाठी इच्छा नसतांना उजेडाकडं पळाला. लोकांनी ओळखलं. त्यास काठ्यांनी अंतर ठेवत घेरलं. निरोप गेला. बाजी ,धना येणार तो पावेतो एकावर जोरानं हा तुटून पडत हल्ला करू लागला. तो माणूस चावेल म्हणून मागे हटला. कडं तुटलं नी हा निसटला. घर जवळ करत तो घरात घुसला. मिरा त्याची अवस्था पाहताच घाबरली. "तुम्ही,नी काय झालं ?" ही अवस्था कशी? कुणी मारलं?" विचारतच होती की यानं पटापट दरवाजा आतून लावत कोंडलं. तो लाईट बंद करुन पाणी शोधू लागला. परत त्याची शुद्ध हरपू लागली. बाहेर लोक जमली आरडा ओरडा वाढला. काढा, हाणा ठोका मारा, कावरलाय तो.कुणाला चावला तर? मिरानं हे ऐकताच तिला धक्काच बसला.पण तोच बाजी ,धना बाहेर आल्याचं मिरानं पाहिलं. ती समजून गेली. आता कुत्र्याचा पट्टा तर काढला होताच पण कावरलं म्हटल्यावर हा काय करणार! लोक तर आयते जमलेतच. तिला सुमीला बाजी सांगत होता ते आठवलं. डोक्याचा वेध घेत .....
शुध येताच रंजन हात पाय वाकडे करत विव्हळू लागला. "मिरा थंडी वाजतेय गं, अंग पण दुखतंय!"
मिरा काही एक न बोलता खोलीतला रंजननं मागेच आणून ठेवलेला डब्बा काढला झाकण उघडत मोठ्या ताब्यांत टाकलं. त्यात थोंडं पाणी टाकलं. स्वत: घटाघटा प्याली तांब्यांत आणखी ओतून घेतलं.
" अहो थंडी वाजतेय ना ! या इकडं मांडीवर झोपा." तो भान हरपलेला.
बाजीला बाहेर लोकांकडून समजलं. रंजन चार पाच दिवसांपासून गायब होता,त्याचा शोध चालूच होता. पण हा अचानक या अवस्थेत आलाय
म्हणजे यास कावरलेलं कुत्र्यानं चावलं असावं. हा लगेच परत का आला नाही? लगेच उपचार का घेतले नाहीत? पण ही वेळ विचार करण्यापेक्षा निर्णय घेण्याची होती. कारण लोक दरवाजा तोडून त्याला घरातून बाहेर काढायचा विचार करत होते. बाजीनं त्यांना शांत करत प्राथ. आ. सेंटर कडं फोन लावत अॅंब्युलंस मागवली. लवकरात लवकर दवाखान्यात याला नेणं गरजेचं आहे हे बाजीनं ओळखलं. तो खिडकीजवळ येत "मिरे! ऐक तू लगेच बाहेर निघ!" तो जिव तोडून विनवू लागला. पण घरातून आवाज येईना.
मिरानं रंजनचं दुखणारं डोकं मांडीवर घेत त्यास पाणी पाजलं. तो वाकडं तोंड करत झिडकारू लागला ती त्याला धरत तोंडात ओतू लागली. तो तिला चावे घेऊ लागला. अहो चावा नाही घेतला तरी मी येणारच आहे तुमच्या सोबत! पापाचे भागीदार तुम्ही एकटे थोडेच आहात! मी... मी.. पण आहेच ना!
रंजन उठू लागताच तिला प्यालेल्या विषाच्या आकड्या सुरू झाल्या. तिनं उठू पाहणाऱ्या व विव्हळणाऱ्या रंजनला मानेत आवळलं. तो चावत होताच पण आकडी आली की झटका देत ती त्याला आवळू लागली. रंजनची मान निखळली व खाली कलली.
आवाज येत नाही म्हणून व मिरेला हा चावेल म्हणून बाजीनं दरवाजाच खोदला. सायरन वाजवत गाडी ही आली. भीत भीत बाजी पुढे घुसला. पण तो पावेतो मिरानं रंजनला तमाम केलं होतं व ती पण पायाच्या टाचा घासत होती. राधेन भिंतीला ड़ोकं आपटत टाहो फोडला. बाजीनं रंजनकडं दुर्लक्ष करत मिरेला उचलू लागला. तो पावेतो रचना ही आलीच. मिरेच्या तोंडातून फेस येऊ लागला. तिनं बाजीचा हात हातात घट्ट धरत दुसऱ्या हातानं त्याचं छाताडं धरत तुटक्या घोगऱ्या स्वरात जीव तोडून बोलू लागली.
" बाजी! मरणाशी ज्याशी बाजी तो बाजी! पण पण या हणमंतरावाच्या मिरेशी का नाही लावली बाजी? या मिरेनं तुझ्या नावानं लावलेली हळद पुसली ना? पण तुझं आभाळच फितूर! काय बाजी लावणार तू!बघ आता मी लावते बाजी! पुढच्या जन्मी या रचनेनं साता जन्माची गाठ बांधली असेल तरी तिच्याकडनं या बाजीला मी पळवणार....च......
नी मिराची पकड ढिली होत....हात जोरात खाली पडले.
.
.
.
महाराष्ट्रातल्या मातीत उगवणाऱ्या शेतकऱ्यास आपलं वतन भले ते कोर चतकोर असो वा जास्त असो; ते विकणं त्याला जितेपणीच मरण वाटतं नी त्यावर कुणी वाकडी नजर केली तर त्यास तो त्या मातीतच गाडतो किंवा ते वतन तरी त्याची माती करत!
.
वासुदेव पाटील.