आक्रित (भयकथा)
भाग २ - मंजुळा
-© सागर कुलकर्णी
तिकडं वाड्यातनं एक आकृती निसटली अन इकडं रंगरावच्या घरात पाळणा हलला, पोरगीच झाली होती. धनाजी असेपर्यंत रंगरावाला गावात उभं राहण्याचीही मुभा नव्हती, आणि या सगळ्याला रंगरावच कारणीभूत होता. गावातल्या बाया-माणसांवर नजर ठेवायची, चान्स मिळाला तर अंगचटीला जायचं हे असले सगळे प्रकार करण्यात रंगराव तरबेज होता आणि म्हणून धनाजीनं त्याला गावाबाहेर काढला होता. रंगराव धनाजीचा सावत्र भाऊ, धनाजीची आई गेल्यावर मोठ्या पाटलांनी दुसरं घर थाटलं आणि रंगराव सारखा रंगीन पोरगा जन्माला आला. आता साठीत आला असला तरी झुबकेदार मिशी, बेरकी नजर, डोक्यावर फराची टोपी, हातात काठी असाच रुबाब होता आणि आता तर धनाजी गेल्यावर अख्खं गाव गिळायला तो मोकळा झाला होता. आज जो पाळणा हलला तो त्याच्या पोरीला पोरगी झाली म्हणून, कदाचित दोन विघातक प्रवृत्ती आज एकाच घरात एकत्र आल्या होत्या.
बघता बघता सव्वा महिना झाला आणि रंगरावानं नातीचं बारसं मोठ्या थाटामाटात केलं, नाव ठेवलं 'मंजुळा'. गोरगरिबांवर जुलूम, बाया-माणसांवर अत्याचार हे आता नित्याचंच झालं होतं. रंगरावाला धनाजीवर सूड उगवता आला नाही पण ज्या गावानं धनाजीला प्रेम दिलं होतं त्याच्यावर खुन्नस काढायची संधी वेळेनं त्याला दिली होती. बारशाला अख्ख्या गावाला आमंत्रण देऊन मी सुधारलोय हे ढोंग करायची आयतीच संधी आली आणि त्यानिमित्तानं गावातलं कोण कसं आहे हे आपसूकच बघायला मिळालं. काही विरोधक त्याला आत्ताही होते, गावही पहिल्यापेक्षा प्रगत झालं होतं पण क्रांती वगैरे कुणी करेल असं नेतृत्व गावात नव्हतं , एकूणच काय धनाजीचं जाणं रंगरावच्या चांगलंच पथ्यावर पडलं होतं.
दुसऱ्याच महिन्यात मंजुळेला चार दात आले होते आणि तेही सुळे. तिनं पहिला लचका आईचाच तोडला, मंजुळेच्या तोंडाला आता रक्त लागलं होतं आणि सुरु होणार होता जीवघेणा खेळ. मंजुळा येऊन अवघे चारच महिने झाले असतील पण रंगरावच्या घरातल्या जवळपास दहा कोंबड्या, दोन बकरं आणि एक कुत्रं घराच्या आवारातच मेलेलं सापडलं होते, काय झालं होतं ते कळत नव्हतं पण ऊस चाऊन, रस पिऊन चोथा टाकतात, तशी ही जनावरं सापडली होती, शरीरात रक्ताचा एकही थेंब उरलेला नव्हता.
रंगरावला मंजुळे ची कल्पना आली होती आणि म्हणूनच एक त्याला सोडून बाकी सगळ्यांना आतापर्यंत मंजुळेनं एकदा तरी इंगा दाखवला होता. मंजुळेला एक-एक भक्ष आणून देण्याचं काम आता रंगरावच करू लागला. गावातली जनावरं पटापट मरू लागली. गावाबाहेर सडलेल्या जनावरांच्या वासानं कहर केला, महामारीची साथ आली अशी भूमका रंगरावनं स्वतःच उठवून दिली. जनावरं मरत होती तोपर्यंत ठीक होतं पण ज्यावेळी अशोकचं एक वर्षाचं पोरगं धनाजीच्या पडक्या वाड्यात उसाच्या चिपाडासारखं सापडलं, तेव्हा सगळ्यांचीच भीतीनं गाळण उडाली.
पोलीस पाटलानं चौकशी केली पण हाती काहीच आलं नाही, दीड वर्षाच्या मंजुळेवर कोण संशय घेणार होतं. तिची समज, तिची संमोहन करणारी नजर आता लहान पोरा बाळांवर स्थिरावली होती. दोन तीन आठवड्यात अजून एक दोन पोरं गायब झाली आणि वाड्याच्या मागच्या बाजूला निपचित मिळाली, तेंव्हा गावालाही अंदाज झाला कि 'ती' परत आलीये. पोलीस पाटलानं शहरातून रिपोर्ट मागवला, एखाद्या नळीनं पाणी ओढावं तसं शरीराच्या एक-दोन भागातनं रक्त ओढलेलं होतं आणि अंदाजानं वेग इतका होता की अर्ध्या तासात रक्ताचा थेंब न थेंब शोषला होता.
काय घडतंय हे कळायच्या आत आता रामा गड्याचं प्रेत ओढ्यात सापडलं, त्याच्याही शरीरातलं रक्त संपलेलं होतं. छातीला पडलेल्या भगदाडातून, कुणीतरी हृदय काढून घेतलं होतं आणि बिन रक्ताचं शरीर सोडून ती अज्ञात शक्ती तिथून काम साधून मोकळी झाली होती. रामाला यावेळी सावळ्यानं मंजुळेशी खेळताना पाहिलं होतं. सावळ्या आणि रामा रंगरावची जुनी माणसं. सावळ्याला ड्रायव्हिंग मध्ये मागे टाकेल असं पंचक्रोशीत कोणी नव्हतं. सावळ्याला पक्की खात्री झाली होती की मंजुळाच 'मृगनयनी' आहे. त्यानं लगोलग जाऊन रंगरावला हे सांगितलं. आता हा गावात बोंब करणार की काय, या विचारानं रंगरावच्या पायाखालची जमीनच सरकली.
पण त्याच संध्याकाळी वरच्या घाटात गाडी चालवताना सावळ्याला दोन वेळा काहीतरी आडवं गेल्यासारखं वाटलं. गाडी थांबवून कानोसा घेतला तर कुणीच नव्हतं. थोड्याच वेळात रंगरावला बातमी कळाली की सावळ्याला कोणीतरी संपवलंय. सावळ्याचं प्रेत मिळालं तेव्हा त्याची जीभ कुणीतरी मुळासकट उपटून नेली होती, आणि त्याच जागेतून रक्ताचा थेंब न थेंब ओढून घेतला होता.
मंजुळा दोन वर्षाची होईपर्यंत, गाव जवळजवळ अर्ध संपलं होतं. दोन वर्षाच्या मंजुळेचं शरीर दहा वर्षाच्या मुलीसारखं भरलं होतं. आता गावाला पूर्ण खात्री झाली होती की हे सगळं मंजुळाच करत आहे आणि रंगराव त्यात सामील आहे. गावातल्या उरल्यासुरल्या लोकांनी एकत्र येऊन दोघांना संपवायच्या गोष्टी सुरू केल्या, पोलीस पाटीलही काही न बोलता त्यात सामील होता.
बेत ठरला, येत्या पौर्णिमेला विठोबाच्या देवळात कीर्तन ठेवायचं आणि तिकडं त्या दोघांना संपवायचं. किर्तन मंदिरातच असल्याने मंजुळा तिथं येण्याची शक्यताच नव्हती, त्यामुळे ती आणि रंगराव घरीच थांबले. गावकऱ्यांनी मंजुळेच्या आईला याच्यात आधीच सामील करून घेतलं होतं म्हणूनच कधीच बाहेर न पडणारी ती, आज किर्तनाला आली होती. पुजाऱ्यानं नारळ फोडला, हरिनामाचा गजर झाला आणि लाऊड स्पीकरच्या आवाजात कीर्तन सुरू झालं. अख्खं गाव तिथं लोटलं होतं- एक रंगराव आणि मंजुळा सोडून. चार-पाच तगड्या गावकरी किर्तनातून वेगळी वाट करून रंगरावच्या वाड्याकडं सुटले.
एकीकडे मनशुद्धीसाठी कीर्तन चालू होतं तर दुसरीकडे गावशुद्धीसाठी रंगरावच्या वाड्याचा होम पेटला होता. पहाटे दोन-तीन च्या सुमारास कीर्तन संपलं आणि तोपर्यंत वाड्याचीही राखरांगोळी झाली होती. गावकऱ्यांनी काही माहीतच नाही अशा लगबगीनं पोलीस पाटील आणि ॲम्बुलन्सला बोलावलं पण फार उशीर झाला होता. जळून कोळसा झालेली २ प्रेतं सापडली होती, एक दहा वर्षाच्या मुलीचं आणि दुसरं साठीतल्या एका म्हाताऱ्याचं. म्हाताऱ्या मढ्याच्या गळ्यातली सोन्याची चैन लख्ख चमकत होती आणि त्यावरून गावकर्यांनी निश्वास टाकला आणि त्यांची खात्री झाली की पिडा टळली.
गावासाठी ही आनंदवार्ता होती पण रंगाची पोरगी मात्र धाय मोकलून रडत होती कितीही केलं तरी तो तिचा बाप होता आणि दुसरा तिच्या पोटचा गोळा. आता उजाडत आलं होतं, पोलीस पाटील पंचनामा करण्यात गुंतला होता, लहान मढ्याच्या पायात सापडलेलं पैंजण हातात नाचवत तो उभा होता. तेवढ्यात देवळाचा पुजारी बाबा धापा टाकत त्याला शोधत तिथं पोहोचला, त्याची दहा वर्षाची पोरगी कीर्तनातून गायब झाली होती आणि गावभर शोधूनही तिचा कुठेच पत्ता लागला नव्हता. जीवाच्या आकांताने पुजारी पोलीस पाटलाला सगळं सांगत होता आणि त्याची नजर पाटलाच्या हातातल्या पैंजणावर गेली आणि त्यानं हंबरडाच फोडला. जी २ प्रेतं सापडली होती...त्यातलं एक रंगरावचं होतं आणि दुसरं पुजाऱ्याच्या पोरीचं.
तेवढ्यात आभाळ गच्च भरून आलं, सोसाट्याचा वारा सुटला, अर्धवट उघड्या खिडक्यांची उरलीसुरली फळकुटं वाजायला सुरुवात झाली, वाड्यातल्या भिंतीवरची मंजुळेची तस्वीर धाडकन जमिनीवर पडली आणि त्याच्यावरची काच खळकन फुटली. काही समजायच्या आत काचेचा एक तुकडा चार फुटावर उभ्या असलेल्या पोलिस पाटलाच्या हातात घुसला आणि तो जोरात कळवळला. बाकीचेही तुकडे हवेत उडाले....जमलेल्या गावक-यांचा वेध घेण्यासाठी...
मंजुळेचा खेळ आता नव्याने सुरु झाला होता.