१० वर्षानंतर आजही भग्नावस्थेतल्या त्या वाड्यातून तिच्या किंचाळण्याचे आवाज येतात अन काही क्षण का होईना गाव निपचीत होऊन जातं . तिची "सोडा , सोडा , वाचवा " ची आर्त किंकाळी गावातल्या तरण्याताठ्यांना आजही कापरं भरवते अन मागणं येणाऱ्या बंदुकीच्या "ठो " नं तिचा खेळ संपल्याचं गावकर्यांना आजही दिसतं . जसे बाकीचे २० मुडदे वाड्यामागच्या तळ्यात सापडले होते तसा तिचा मुडदा कधीच कोणाला सापडला नाही . त्या २० जणींची ओळख कधीच पटली नाही अन कोणी पटवण्याचा प्रयत्न ही केला नाही .संध्याकाळी सात नंतर त्या वाड्यात कोणी जात नव्हतं आणि कोणी बाहेरही येत नव्हतं . ती गेल्यानंतर आठच दिवसाच्या आत वाड्याची मागची भिंत कोसळली , थोरल्या मालकांच्या डोक्यात झुंबर पडलं , धाकट्या मालकांनी स्वतःच्या डोक्यात गोळी घालून घेतली होती आणी सगळी नोकर मंडळी एकदम नाहीशी झाली होती . असं काय घडलं होतं तिथं ? कोण होती ती ? काय झालं तिचं ? काय केलं तिनं ?
अप्सरेलाही लाजवेल असं आरस्पानी सौन्दर्य तिचं , बघून दगडसुद्धा थिजून जायचा , माणसाची काय गत . ज्यावेळी ती चालायची तेंव्हा वेळही क्षणभर थांबायचा , बोलायची त्यावेळी वाराही वाराही स्तब्ध व्हायचा , बघायची तर सूर्यही आपली किरणं दुसरीकडं वळवायचा . नुसता कटाक्षही तारण्याताठ्यांची अन म्हाताऱ्याकोताऱ्यांची लाळ तोंडापर्यंत आणायचा , तोंडाचा वीतभर आ वासायचा . पाण्यात पाहिलं तर पाणी सुद्धा लाजायचं तिच्याकडे बघून , आरसाही आपली नजर झुकवायचा . तिलाही तिच्या या सौन्दर्याची जादू माहित होती अन म्हणूनच ती सगळ्यांना बोटावर खेळवायची . पारदर्शक पांढरी साडी घालून जेंव्हा ती घराच्या बाहेर पडायची , तेंव्हा ती बघ्यांची दुनिया क्षणभर थांबायची , तिच्या संमोहनात बुडून सगळी तिच्या मागे फिरायची . कोणी तिला उर्वशी म्हणायचं , तर कोणी तिलोत्तमा तर कोणी मेनका म्हणून हाक मारायचं. पण तिचे ते हरणासारखे डोळे , कापसाहून शुभ्र कांती आणि संगरावरापेक्षा रेखीव देह याच्यामुळे तिनें स्वतःच नाव "मृगनयनी " ठेवलं होतं , पण अतीव सौन्दर्याबरोबर शापही येतोच , तसा तिलाही होता.
कदमाचा भीमा सहज चार सहाला लोळवेल असा , तिच्या सौन्दर्याला भुलला अन एका तिन्हीसांजेला तिच्या घराच्या बाजूला दिसला तो शेवटचाच . त्या दिवसानंतर जे मिळालं ते फक्त भीमाचे कपडे तेही टेकडीच्या पलीकडच्या डोहात . पोलीस चौकशी झाली पण दिवसा अन कोणाच्या हाताला काही लागलं नाही . त्या दिवसानंतर तिच्या बघण्याचा दृष्टिकोन बदलला पण तिच्यावरची नजर काही बदलली नाही . पण लोक आता अप्सरेसोबत तिला नरभक्षकही म्हणू लागले अन तिची नजर अजूनच भेसूर झाली . चंद्र वरती यायला लागला की तिचे निळसर डोळे पांढरे होत जायचे अन तिच्या आवाजातला नाजूकपणा एका भेसूर , भयानक आवाजामध्ये बदलायचा . गण्या धोब्याला त्या दिवशी ओढ्यावरून यायला उशीर झाला होता अन हे त्याला पाहिलं मिळालं , तिथून तो गडाबडा करतच घरी आला पण त्याच्या जिभेवरचा ताबा सुटला होता , मेंदूच्या तारा तुटल्या होत्या . गण्या वेडा झाला होता , गंडेदोरे , डॉक्टर झाले पण काही फरक पडला नाही , ती त्याच्या घरावरून जायची तेंव्हा मुंडकं तोडलेल्या गुरासारखा ओरडायचा , काहीतरी सांगायचा प्रयत्न करायचा अन गावातली पोरं त्याला वेडा वेडा म्हणून चिडवायची .
धाकटे मालक जेंव्हा शहरातलं शिक्षण घेऊन गावात आले तेंव्हा गाव बघतच राहिलं . असं रुबाबदार व्यक्तिमत्व आख्ख्या गावानं सात पिढ्यात न्हवतं पाहिलं . तरणाबांड प्रताप एखाद्या हिरोला लाजवेल असा , बुलेट वरून फिरायचा तेंव्हा गावातल्या पोरीबाळी तोंडात बोटं घालायच्या , पोरं झुकून सलाम करायची . भीती ही प्रतापला माहीतच न्हवती , रात्री एकटा शेतात राखण करायचा. एकदा तर चार लांडग्यांना लोळवलं होतं तेंव्हपासून जनावरं कधी त्याच्या शेतात घुसली न्हाईत . शेतीच शिक्षण घेतल्यामुळं कुठली माती चांगली तिथपासून कुठलं पिक भरदार हे झोपेत सुद्धा सांगायचा . प्रताप आल्यानं थोरल्या मालकांना म्हणजे धनाजीरावांना पुन्हा उभारी आली होती अन अचानक एक शक्ती आली होती . धनाजीराव गावासाठी दैवत होते , आडल्यापडल्याला मदत , पिकांसाठी पैसे , बँकेतून कर्ज एका शब्दावर मिळवून द्यायचे . धनाजीरावांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ होता .१०- १५ नोकरांचा राबता , दिमतीला 2 गाडया , उसाच्या खेपा करायला २ ट्रक , १ बुलेट अन जवळपास ५० एकराची बागायत, धनाजीराव नुसता नावानंच धनाजी न्हवता .
प्रताप आल्यापासून गावची प्रतिष्ठा शिगेला पोहचली होती , २ वर्षात त्यानं गावात एक कॉलेज, म्हाताऱ्यांसाठी लायब्ररी अन तरण्यांसाठी व्यायामशाळा उभी केली होती . फार लांब लांबून पोरं पोरी शिकायला यायचे . त्याच काळात मृगनयनीन पण आपलं जाळं पसरवलं होतं अन होस्टेलच्या एक ना दोन २० पोरींना तिनं आपलंसं केलं होतं . त्यांचं कामच तिला शिकार आणून द्यायचं होतं पण तिनं कधी पोरींना आपल्या घरात नाही ठेवून घेतलं . सावज आलं की ती हाकलून द्यायची त्यांना . पुढं कपडे सुद्धा मिळायचे नाहीत . पण गुंगलेल्या पोरींना काहीच कधीच कळलं नाही.
धनाजी आणि प्रताप हि गोष्ट जाणून होते पण आजच्या काळात हे सगळं थोतांड असतं म्हणून फार काही इंटरेस्ट दोघांनीही घेतला न्हवता पण दिवसागणिक हरवणारी माणसं अन वेडी होत चाललेली तरणीबांड पोरं बघून त्यांचा जीव तुटायचा अन मग प्रतापने ठरवलं की तिचा काटा काढायचा , ते ही तिचाच डाव टाकून अन सुरवात एकेका पोरीला तोडून करायची .
एकेका नोकराला घेऊन तो बाहेर पडायचा अन पोरीला फसवून टेकडीवर घेऊन जायचा . टेकडीच्या इकडच्या बाजूला तळे अन तिकडे ओढा अन तळ्याला लागून धनाजीचा वाडा होता. त्या पोरींचा जीव घेण्यावाचून प्रतापकडं काही पर्याय न्हवता ,त्यांना कितीही समजावून सांगितली तरी पालथ्या घड्यावर पाणीच. दर दिवसाआड एक मुडदा तळ्यात सापडायचा . प्रताप त्याच्या प्लॅनमध्ये यशस्वी होत होता पण त्याचवेळी जो जो नोकर त्याच्या बरोबर या कामगिरीवर जायचा तो परत कधीच दिसला नाही , त्या प्रत्येकाचं रक्त मृगनयनीच्या तोंडाला लागलेलं असायचं.
शेवटी झुंज तिघातच होती आणि धनाजी अन प्रताप दोघांनाही माहित होतं की तिच्या घरात तिला मारणं सोपं न्हवतं . तिला वाड्यात आणूनच डाव टाकावा लागणार होता अन प्रताप त्याच्यासाठी खूप प्रयत्न करत होता . शेवटी हिंदी पिक्चरसारखं त्यानं तिला गटवायचं ठरवलं , एकदा तरी प्रतापचं रक्त आपल्याला मिळालं पाहिजे याची वाट ती पण कधीपासून बघत होती . हळूहळू ती प्रतापच्या बुलेटवर दिसायला लागली अन गावाला पुढं घडणाऱ्या आक्रिताची कल्पना यायला सुरुवात झाली .
शेवटी प्रतापने तिला गळ घातली अन वाड्यावर यायची आर्जव केली ती पण महा वस्ताद होती तिनं पण त्याला अट घातली त्या सांच्याला तिच्या घरी यायची , कोणता मासा कोणाच्या जाळ्यात अडकणार याची काहीच कल्पना येत न्हवती . प्रतापने तिचं घर गाठलं, कधी न्हवे ते जाताना पारावरच्या मारुतीच्या शेंदराचा टिळा लावून तो तिच्या घरात शिरला . तिन्हीसांजेला ती अजूनच मादक दिसत होती, तिला संपवायच्या आधी तिचा उपभोग घायची इच्छा प्रतापच्या मनात आलीच कितीही केलं तरी तो पुरुष होता अन ती एक आरस्पानी सौन्दर्य . तिला मिठीत घायला पुढं सरकला अन ती दोन पावलं मागं गेली , दुसऱ्यांदा परत तसंच झालं . प्रतापच्या लक्षात आलं आणि त्यानं कपाळावरचा टिळा पुसला , ती कुत्सीत हसली . प्रताप बेभान झाला होता तिच्यावर झडप घातली, तिचा उपभोग घेऊन शांत झाला अन एका समाधानानं तिच्या डोळ्यात पाहिलं. तो गरगरलाच, चंद्र वर आला होता अन तिची बुबुळं कधीच पांढरी होऊन गेली होती , तोंडावरची कातडी लोंबत होती अन भेसूर, भयानक आवाजात ती हसली . प्रतापने भडाभड उलट्या केल्या पार रक्त ओकायचाच राहिला होता . त्याच्यातल्या पुरुषानं आज एका हाडळीचा उपभोग घेतला होता अन ती त्याच्या शरीराचा लचका तोडण्यासाठी पुढं झाली तेवढ्यात धनाजी गरजला "थांब, माझ्या पोराला फसवलंस पण त्याचा जीव घायच्या आधी धनाजीला संपवावं लागेल" . धनाजीनं पटकन दोन नोकरांना तिच्यावर जाळं टाकायला लावलं अन त्या दोघांना तसंच उचललं .
वाड्यात तिला बांधून आता तीन दिवस झाले होते, तिच्या कडेच्या पेटत्या मशाली तिला तीळ तीळ संपवत होत्या. इकडं प्रताप खाटेवरून हलला न्हवता, वेड्यागत चाळे चालले होते , त्याची अवस्था बघून धनाजी पार खचला होता. त्याचं पोरं संपलं याची कुणकुण त्याला लागली होती . ज्या नोकर मंडळींनी तिला उचललं ती दोघबी ट्रॅक्टर पलटी होऊन मेले. तिनें शेवटची किंकाळी फोडली अन भेसूर स्वरात हसून कायमची शांत झाली अन नजरेआडही . त्या रात्री धनाजीच्या घरात दोन गोळ्या चालल्या होत्या , दुसऱ्यात धनाजीच्या डोक्यावर झुंबर पडलं होतं अन पहिलीनं प्रतापला टिपलं होतं . त्या नंतर सलग सात दिवसाच्या पावसानंतर वाड्याची मागची भिंत कॊसळली अन त्या पेटत्या मशालींच्या मधून एक धूसर आकृती हळूच त्या वाड्यातनं निसटली होती .
टिप: १००% काल्पनिक, कोणतेही साधर्म्य हा निव्वळ योगायोग