यमाची भाषा : हि कथा भूत आणि तत्सम भीतीदायक गोष्टींची नाही. पण यम हा विषय अजूनही मनामध्ये भीती निर्माण करणाराच आहे. आणि कोणाला त्या यमाचीच भाषा बोलता येत असेल तर....?
हि कथा मी २०१८ मध्ये लिहिलेली आहे. ह्या ग्रुपवर प्रथमच पोस्ट करीत आहे. कथेचे एकूण ७ भाग आहेत. प्रत्येक भागाला आधीच्या पोस्टची लिंक देईन.
"यमाची भाषा" : भाग १
आरती अत्रे-कुलकर्णी
शिरीष बसमधून खाली उतरला. सोबत असलेली एकुलती एक बॅग हातात धरून त्याने खांद्यावरची शबनम चाचपडली. चार पाऊले पुढे आल्यावर त्याला लांब जाणारा रस्ता दिसला आणि तो स्वतःशीच हसला. "अजूनही तसेच आहे सगळे, चला काहीच बदलले नाहीये", स्वताशीच बोलत तो चालू लागला. रस्त्यावरची गर्दी, बाजूला बसणारे फळवाले, हॉटेल सगळे झपाझप मागे टाकत शिरीष चालत होता. त्याच्या चालण्यात एक वेग होता, ओढ होती... लवकर पोचण्याची घाई होती.रहदारी कमी झाली आणि तो राह्यता घराच्या वस्तीतून चालू लागला. हि शिंदे आळी, सगळे शिंदे इथे राहतात. आपले पण काही मित्र होते, आता नावेपण आठवत नाहीत. पुढे नाना पेठ,तिथे आपली शाळा होती आणि गुरुजी राहायचे रस्त्यावरील पहिल्या घरात. दुरवरूनच त्याचे पहिल्या घराकडे लक्ष गेले. पूर्णपणे मोडकळीस आलेले गुरुजींचे घर त्याला दिसले. "म्हणजे आता इथे कोणी नाही, सगळे गेले शहराकडे शिकायला", शिरीष स्वतःशीच म्हणाला. नावाला म्हणून शाळेची वस्तू होती, ना भिंती, ना खोल्या.... खिन्नपणे पाहत शिरीष चालू लागला.
पुढे पंचायत, अजूनही शाबूत होती . एक बोर्ड पण झळकत होता "आडते ग्रामपंचायत ऑफिस" तिथेच चावरीवर काही म्हातारी लोकं बसले होते. संध्याकाळची वेळ, निवांत पान-सुपारी, तंबाखू चालू होते...
"राम राम पाव्हणे, कुणीकडे?" एकाने विचारले
"इथलाच आहे मी. आडतेकर, शिरीष आडतेकर" शिरीष म्हणाला.
सुपारी कातरतांना हात थांबले, तंबाखू मळताना हात तसेच... तोंडाचा आ करून सगळे शिरीषकडे पाहू लागले. त्यांच्याकडे दुर्लक्ष करत शिरीष पुढे चालू लागला. "घाबरा ....सगळे घाबरा आम्हाला ...." शिरीष मनातच म्हणाला. दहा पावले पुढे गेलेला शिरीष परत मागे वळून आला. अजून सगळेजण शिरीषकडेच पाहत होती. तो परत येतोय, हे पाहून सगळे खाली पाहून घालून आपापले उद्योग करतोय असे दाखवू लागले.
"इथे किराणा सामानाचे दुकान कुठे आहे जवळपास ?" शिरीषने मोठ्याने विचारले.
जवळच खेळणारा लहान मुलगा म्हणाला "कोपरापल्याड हाय...दावू का?"
"गॅप रे कृष्णा...जा घरला गपचूप.." कोणीतरी लगेच त्याला हटकले.
"वाईच जा पुढं.....सापडेल आपसूक .." कोणीतरी मोघम उत्तर दिले. शिरीष मागे वळून परत चालू लागला.
"आता कशापाई आलाय..देवच जाणे."
"लांबच राहा रे...! काहीबाही बोलायचा आणि आपण जीवाला मुकायचो..."
"काय करतोय आता इथे येऊन..बरं चालू होत कि आपले..कुठून ब्याद आली परत गावात.."
शिरीषच्या कानावर अलगद शब्द येऊन आदळत होते. झपाझप पावले टाकत शिरीष तेथून लांब जाऊ लागला. वाटेत किराणा सामान घेतले आणि आता पार गावाबाहेर आला. आडतेकर वाडा समोरच दिसत होता. वाड्याच्या मागे सूर्य अस्ताचलावर आलेला होता. मागून केशरी रंगाची उधळण करत वाडा अंधारात बुडायला लागला होता. घाई करायला हवी, एकदा अंधार पडला तर काहीच दिसणार नाही. शिरीष वाड्याच्या दाराजवळ येऊन थांबला. वाड्यात जायच्या आधी त्याने परत एकदा मागे वळून सगळीकडे नजर फिरवली. त्याला असे वाटले कि खूप नजरा त्याच्यावर खिळून आहेत पण दिसत कोणीच नव्हते. दूरवर खेळणारी काही मुले, गायी-म्हशी दिसत होत्या. मुले खेळता खेळता थांबून वाड्याकडे कोण आलाय, बघत होती. संध्याकाळची वेळ आणि करकरणारा तो प्रचंड दरवाजा. खूप महिन्यात न उघडलेला तो दरवाजा, शिरीषला प्रचंड ताकद लागली दार ढकलून आत यायला. आत अंगण आणि ओसरी. अजूनही आठवत होते त्याला, एके काळी असणारा त्याचा तिथला वावर. ओसरीवरचा झोपाळा, अंगणातले तुळशी वृंदावन....माणसांची गडबड! आता होती ती निशब्द शांतता. शिरीष आत जाऊन एक चक्कर मारून आला. बाहेरची ओसरी त्याने तात्पुरती स्वच्छ केली, सोबत आणलेला दिवा लावला, जवळची पोळी-भाजी खाऊन घेतली.तिथेच पथारी पसरून तो जुने दिवस आठवू लागला, केव्हातरी झोपी गेला.
सकाळी उठल्यावर तो आधी घरातून नीट फिरला. भिंती शाबूत होत्या, खिडक्या नीट होत्या. त्याने सगळ्या खिडक्या उघडल्या, सोबत आणलेले तेल घातले. झाडू घेऊन एक एक खोली साफ करू लागला. सामान असे काही नव्हतेच घरात, होते ते हि त्याने बाहेर आणून टाकले. दुपारी चूल पेटवून भात केला. मागच्या बाजूला असलेली विहीर बुजली होती, पाणी दिसतही नव्हते. आजूबाजूला गावात, झाडे वाढली होती. तसेच पुढे चालत गेले कि वाड्याच्या मागच्या बाजूला शंकराचे मोठे देऊळ होते. शिरीष तिथपर्यंत गेला. भर दुपारचे देऊळ अंधारात बुडाले होते. त्याने करकरत दार उघडले, प्रकाशाची एक तिरीप थेट शंकराच्या पिंडीवर गेली. आजूबाजूला पाला-पाचोळा साठला होता. बघता बघता शिरीषने देऊळपण साफ केले, आता शंकराची पिंड लक्ख दिसू लागली, परिसर स्वच्छ झाला.
चार-पाच दिवसात शिरीषने सगळाच परिसर आवरला, केर काढून सामान लावून ठेवले. लाकडाचे सरपण आणून ठेवले. स्वयंपाकघरामध्ये नवीन चूल सुरु केली. जमेल तसे विहिरीजवळचे गवत काढले. मंदिर आतून स्वच्छ केले आणि पूजा सुरु केली. गावकरी पाहत होते, आडून आडून बोलत होते. पण कोणीच मदतीला आले नाही, विचारातही नाही. शिरीषला याचीच अपेक्षा होती. लवकरच वाड्याचा कायापालट होऊ लागला, शिरीषच्या वावर दिसू लागला. घरातून धुपाचे-कापराचे, स्वयंपाकाचे मधुर वास येऊ लागले. सकाळ-संध्याकाळ देवाचे श्लोक कानावर पडू लागले. देवळातल्या शंकराच्या पिंडीवर रोज दुधाचा अभिषेक होऊ लागला.
शिरीष किराणा माल आणायला गेला असता, चावडीवर आला.तिथे बसलेल्या माणसांना तो विचारू लागला "इथे कोणी विहीर साफ करणारे मिळेल का? मी पैसे देईन त्यांना.."
"काय माहिती नाही ...." मोघम उत्तर आले.
"कशाला साफ करताय पाव्हणं ...पाणी नाय लागायचे कुठे..." नजरेला नजर न भिडवत लोक उत्तर देत होते.
"आटलं पार पाणी गावातलं सगळं...."
"तुम्ही गेल्यावर कोण बघणारं विहिरीकडं..."
निराशाजनक उत्तरे ऐकून शिरीष नाराज झाला. मुकाट्याने गावात जाऊन त्याने कुदळ, फावडे खरेदी केले. पुढचे आठ-दहा दिवस आता विहीरसफाई.... बघता बघता महिना झाला. शिरीष आता इथेच राहत होता.अजूनही कोणी त्याच्याशी बोलत नव्हते. तो देखील स्वतःहून कोणाशी बोलायला जात नव्हता. एक दिवस मात्र चावडीवर एकाने त्याला थांबवले.
"पाव्हणे...किती दिवस राहणार ?"
"काही ठरवले नाही..माझा वाडा आहे, राहीन..." शिरीष तोऱ्यात म्हणाला.
"तसं नव्ह...लै वर्षांनी गावात आलात....गाव बदलतंय! तुमची आता गरज नाहीये गावाला, म्हणून इच्चारले.." माणूस त्याला समजावत म्हणाला.
"गरज नाही म्हणजे......आधी गरज होती का?" शिरीषने त्याच्याकडे पहात त्याला विचारले.
"तसं नव्ह...तुम्हाला ओळखणार गेले वर! आता कोण बोलावणार आणि कोण ऐकणार तुमचं?" दुसरा माणूस म्हणाला.
"हम्म...खरंय!" शिरीष विचार करत म्हणाला.
"मंग! समजून ग्या, आनी जावा आता परत.." पहिला माणूस हातवारे करत म्हणाला.
"मी ठरवीन..." शिरीष सरळ पाहत म्हणाला.
"तुम्ही येगळी लोकं, तुमचे काम वेगळं.....तुमची गरज येगळी. आता कोण ऐकणार हाय तुमचं आणि तुमची ती .....ती....येगळी भाषा....." दुसरा माणूस नाईलाजाने ते शब्द उच्चरत म्हणाला.
"यमाची भाषा" मोठ्याने हसत शिरीषने विचारले.
"नाव नको घेऊसा.....नाव नको घेऊसा" दोघेही तिथून पळत लांब जात जात म्हणाले.
"यमाची भाषा" : भाग २
आरती अत्रे-कुलकर्णी
यमाची भाषा..... शिरीष मनातच चरफडला. घरी परत येताना त्याला पुन्हा सगळे आठवायला लागले.
तेव्हा त्यालाही कळेना कि हे अचानक त्याला काय होत असे. त्याचा स्वतःवरील ताबा सुटत असे, तो काय वागतोय-बोलतोय ते त्याला आठवत नसे आणि ऐकणारे लोक सांगत कि तो जे बोलत असे, ते खरे होत असे..काही दिवसातच!
सगळेच त्याला टाळायला लागले होते, त्याच्याशी बोलणे बंद झाले, त्याच्याकडे येणे बंद झाले होते. आता ना कोणी मित्र ना धड संसार.....
ह्या सगळ्याची सुरुवात नक्की केव्हा झाली हे त्यालाही आठवत नव्हते. ऑफिसमध्ये काम करताना, तो अचानक शून्यात पहात कर्णिकांना म्हणाला "जपा स्वतःला दोन-चार दिवस, कठीण आहे वाचणे."
कर्णिक अचानक वारले, ऑफिसमध्ये निरोप आला थेट ते गेल्याचाच.
शिरीष भेटायला गेला तेव्हा ऑफिसामधला नाईक म्हणत होता "धडधाकट असलेले कर्णिक अचानक कसे गेले, काही समजत नाही. त्या दिवशी शिरीष असे काहीतरी त्यांना म्हणाल्याचे मी ऐकले होते." शिरीषने त्याला वेड्यात काढले होते, बाकी कोणी पण लक्ष दिले नाही तेव्हा.
पण लवकरच हा अनुभव अजून दोघांना आला आणि तेव्हा शिरीष काय बोलला हे ऐकायला भरपूर साक्षीदार होते. ऑफिसमध्ये शिरीषला वॉर्निंग देण्यात आली. शिरीषला अजूनही समजत नव्हते कि तो हे कधी बोलला आणि नक्की काय बोलला. बोललेले शिरीषला काहीच आठवत नव्हते.
सध्या तो ऑफीसमधुन बऱ्याचदा लौकर घरी जात होता. अचानक त्याला बरे वाटेनासे व्हायचे आणि तो घरी जायचा, घरी जाऊन तासनतास गादीवर पडून राहायचा.
मूळ-बाळ नसलेला बत्तीस वर्षाचा शिरीष तसा सुखी माणूस होता. लहानपणीच त्याला शाळेसाठी (गावात शाळा असूनही) म्हणून गावातून शहराकडे पाठवले होते. सोबत एक इमानी, घरचाच नोकर होता, महादू, तोच त्याची काळजी घ्यायचा. शिरीषला गावाकडे यायला बंदी होती. आजी-आजोबा, आई-बाबा, काका-काकू त्याला येऊन भेटत असे अधून-मधून. त्यालाही तीच सवय लागली होती, तोपण कधी गावाकडे जायचे नाव घेत नसे. महादू जात असे गावाकडे अधूनमधून, कळवत असे खुशाली. महादू अगदी बारकाईने शिरीषची सगळी कामे करत, त्याच्या सोबत राही....पूर्णवेळ.
काका-काकूंना मुलबाळ नाही. शिरीषचे लग्न तसे उशिराच झाले. आजी-आजोबा गेले, काकांना वेड लागले, काकू सतत रडत असे, आजारी असे, त्यात बाबा आजारी पडले, आईच्या तब्येतीची कारणे.....एक एक कारण वाढतंच होत. शिरीषकडे कोणी लक्ष दिले नाही (किंवा जाणून बुजून त्याच्या लग्नाचा विलंब केला.)
आशा, तशी साधीच मुलगी. बेताचे शिक्षण, नाकी-डोळी नीटस. आयुष्यभर तुला काही कमी पडणार नाही... ह्या एका सासर्याच्या शब्दावर तिने लग्नाला होकार दिला. माहेरी घरची आबाळ, धाकट्या भावंडांची आई-वडिलावरील जबाबदारी ....तिची बाकी काही अपेक्षा नव्हतीच. शिरीषबरोबर ती सुखी संसार करत होती.
शिरीष ऑफिसाला जाईनासा झाला, घरामधून बाहेर येईनासा झाला, कोणाला रुममध्येपण घेईनासा झाला... आणि महादू घाबरला.
"मालक, मालक...ऐकतासा का माझं. दार उघडा वाईच......" महादू गयावया करत तासनतास दाराबाहेर उभा रहायचा. कधीकधी दाराला टेकूनच झोपायचा रात्रभर.
आशा पण खूप घाबरली. गावाकडे निरोप पाठवले, फोन केले. सासू-सासरे यांना विनंती केली कि इकडे या काही दिवस. शिरीषला काय झालंय पहा. पण गावाकडून कोणी यायला तयार झाले नाही. महादूबरोबर फक्त फोनवर बोलणे, आशाशी देखील कोणी बोलेनासे झाले.आता काय देवाचाच आधार...... असे म्हणून ती नवस, उपासतापास करू लागली.
महादू कधी कधी म्हणायचा "वाहिनीसाहेब, काही उपाय न्हाय, मालकास्नी गावाला नेले पाहिजे.. गावालाच नेले पाहिजे.."
आशा गावाला एकटीच जायला निघाली तर शिरीष केवडयांदा तिच्यावर ओरडला "पुन्हा गावाकडे गेलीस तर परत येऊ नकोस.." असे म्हणून तिला मारलेदेखील. आशाला काहीच कळत नव्हते. इतके दिवस प्रेमाने, आनंदाने राहणार शिरीष असे का वागतोय, नक्की काय झालंय, तिला अंधारात ठेऊन घरचे महादूशी काय बोलतात, महादू असा गंभीर चेहरा करून का वागतोय, तो कसला विचार करत असतो...
एका रात्री महादुने शिरीषच्या रूममध्ये प्रवेश केलाच. शिरीष जागाच असावा, तो त्याच्याशी काहीतरी बोलत होता. आशा आवाजाने जागी झाली आणि दाराला कान देऊन ऐकू लागली.
महादू सांगत होता "मालक...तुम्ही जे बोलता ते खरं होतंय, म्हणून तुम्ही बोलणं बंद न्हाई करू शकत. ते तुमच्यापण हातात नाही. ते जेव्हा बोलायचे तेव्हा बोलतच. त्याला 'यमाची भाषा' म्हणत्यात. ते वरदान हाय तुमच्या घराण्याला. तुमचे आजोबा, काका, बाबा सगळे बोलतात...हि भाषा."
शिरीष डोळे फाडून महादुकडे पहात होता. त्याचा विश्वासच बसत नव्हता...तो जे ऐकत आहे त्याच्यावर.
"म्हूनशा तुम्हाला गावाबाहेर ठेवलंय...कैक वर्षे झाली. पण लागण झालीच म्हणायची तुम्हाला बी. तुमच्या लग्नासाठी पण प्रयत्न न्हाय केलं कुणी, ते यासाठीच. जेव्हा तुम्ही लैच मागे लागल्यात, तेव्हा लगीन करून दिल तुमचं. कोणालाबी आता पुढचा वंशच नकोय. माणसाला येडं लागतंय नाहीतर माणूस जीव देतोय शेवटी.... आणि ते पण त्याच्या हातात नसतं बघा. तुमचं ऐकल्यापासून धाकले मालक आणि धाकल्या वाहिनी लैच सैरभैर झाल्याती. काय करू नि काय नको... काही कळेनासे झालय कोणालाबी. तुम्ही गावाला येऊ नये, याचे हेच कारण आहे. त्यांना असं वाटलं होतं की त्यामुळे तुम्ही या सगळ्या पासून लांब रहाल. तुम्ही आशावहिनीस्नबी मारलं, हे चांगलं नाही केलं.तुमि धीराने घ्या जी आणि मला सांगा नक्की काय काय बोलला तुम्ही, काय पाहिल॔ तुम्ही, काय घडलं तुम्ही बोलल्यावर, लोक काय बोलतात तुमच्याबद्दल....शांतपणे सांगा मालक."
शिरीष अजूनही अविश्वासाने महादुकडे पाहत होता. त्याला महादुच्या शब्दाचे नीटसे आकलन होत नव्हते.
"ह्यावर उपाय हाय, घाबरू नकाजी. मला तुमच्या आजोबांनी सांगितलं हाय, पूर्वीचं सांगून ठेवल्याती. तुम्ही अगदी छोटे असताना तुम्हाला शहरात घेऊन आलो तेव्हा सांगितलं हाय तो उपाय. जीवापल्याड जपलाय मी. सांगणार तुम्हाला ..मालक. पण आधी तुम्ही बोला जी...माझा जीव कसा टांगिनीला लागलाय मालक..." महादू शिरीषच्या जवळ बसत पाठीवरून हात फिरवत त्याला विनवणी करत होता.
शिरीष सावकाशीने महादुला लोकांकडून ऐकलेले सांगत होता. त्याला स्वतःला ते काहीच आठवत नव्हते. त्याच्याजवळ होते ते आलेले दाहक अनुभव, लोकांचे विचित्र वागणे, नजरेतले आश्चर्य , त्याला टाळण्याचा प्रयत्न, त्याच्यापासून लांब जाण्यासाठी केलेली केविलवाणी धडपड....
महादू ऐकत होता. मानेने नाही नाही म्हणत होता, हातवारे चालू होते, असच असच....असे म्हणत होता. मध्येच महादूची नजर दाराकडे गेली तर दार उघडे असून आशा आत येऊन, खाली बसून सगळे ऐकत होती, ते त्याने पहिले. त्याने हाताच्या बोटानेच 'काही बोलू नकोस' अशी खूण केली आणि तिनेही मानेनेच 'हो' असे सांगितले.
"मालक....आधी शांत व्हा. हे सगळे जे बोलल्यात ना ते हेच हाय, मी सांगतोय ते. तुमच्यात म्हणे पूर्वी कोणीतरी लै मोट्ठी तपश्चर्या केली हुती आणि यमदेवाला जिंकलं होतं. त्याने त्याला यमभाषेचं वरदान दिले. त्या माणसाने ते प्रत्येक पिढीला समजत जावे, असेबी मागितले, ते बी यमदेवानं कबूल केले. आणि शेवटी त्याने ते वरदान नष्ट व्हावे म्हणून काय करावे हे पण विचारलं. त्याने सांगितलेला उपाय गावाकडे हाये."
शिरीष आता पुष्कळ शांत झाला होता. महादु सांगतो ते लक्षपूर्वक ऐकत होता. त्याच्यासाठी हे सगळेच नवीन होते. तेव्हड्यात त्याचे लक्ष दाराकडे गेले. भिंतीजवळ आशा बसली होती. शिरीष तिच्याजवळ गेला आणि तिचे हात हातात धरून रडू लागला "आशा...मला माफ कर. मी खूप घाबरलो होतो, हे असे मला काय होतंय ते कळत नव्हते. माझ्या परिचयामधल्या पाच-सहा माणसांच्या मृत्यूचे कारण मीच आहे, असे मला वाटत होते. लोक पण तेच म्हणत होते कि कालपर्यंत चांगला असलेला हा माणूस शिरीष म्हणाला आणि लगेच मेला कसा, मी खरंच खूप घाबरलो होतो. मला काहीच कळत नव्हता.....म्हणून मी स्वतःला कोंडून घेतलं होतं. तुलासुद्धा आत घेत नव्हतो. सारखी भीती वाटायची कि मी तुझ्याबद्दलपण काहीतरी बोलेन आणि तू पण...... " आशाने त्याच्या ओठांवर हात ठेवत म्हणाली "मी ऐकलंय महादुकाका काय म्हणत होते ते. आपण बघुयात काय आहे तो उपाय. मी आहे तुमच्यासोबत, घाबरू नका तुम्ही."
बाहेर फटफटीत उजाडायला लागले होते. आज खूप दिवसांनी शिरीषला कडकडून भूक लागली होती, मनातला मळभ मोकळा झाला होता. महादुकाका म्हणाला तसा 'गावाकडे उपाय आहे' हेच शब्द दिलासा देणारे होते.
शुचिर्भूत होऊन त्याने देवाची मनापासून पूजा केली. आता त्याला गावाकडे जाऊन हे सगळेच समजून घ्यायचे होते, तो उपाय शोधायचा होता, तो करायचा देखील होता. त्याला आशाबरोबर सुखाचा संसार करायचा होता....त्याला खूप काही करायचे होते.....पण!
"यमाची भाषा" : भाग ३
आरती अत्रे-कुलकर्णी
महादू गावाला जाण्याचे ठरवू लागला तसे शिरीषने त्याला अडवले. गेल्या कित्येक वर्षात शिरीष गावालाच गेला नव्हता, आशानेपण गाव, वाडा पाहिले नव्हते. नावाला तो आडते गावचा असे सांगत असे, आडतेकर आडनाव गावावरून दिल्याचे सांगतो पण आता बाकी कोणत्याच खुणा त्याला आठवत नव्हत्या. "मला बाबा आणि काकांशी स्वतः बोलायचे आहे. बाबा तर आजारी, ते प्रवास करू शकणार नाही आणि काकांना लागलेले वेड काही त्यांना वाड्याबाहेर जाऊ देणार नव्हते. अश्यावेळेस मीच तिथे जाऊन भेट देतो..." असे शिरीषने सांगितले. आशाला पण हा निर्णय योग्य वाटला. गेल्या काही महिन्यात शिरीषने जे जीवन भोगले होते त्यापेक्षा सोक्षमोक्ष झालेला बरा, असेच दोघांनाही वाटत होते.
महादू परत परत शिरीषला जायला अडवत होता. त्याला स्पष्टपणे काहीच बोलता येत नव्हते पण तो ”मीच जातो, तुम्ही नका जाऊसा" यावर ठाम होता.
अखेरीस उद्या सकाळी शिरीष एकटाच निघणार तर महादुने जबरदस्तीने त्याला घरी फोन करायला लावला. बाबा फोनवर बोलत होते आणि बोलता बोलता शिरीषने घरी येत असल्याचे सांगितले आणि ....शांतता पसरली, आईची जोरात किंकाळी ऐकू आली. ”नाही..नाही...तू येऊ नकोस" म्हणून बाबा फोनवर रडू लागले. मध्येच फोन काकाने घेतला. "शिरीष...." म्हणून त्याला आर्त साद घातली. तेवढ्यात फोन पुन्हा बाबांनी घेतला.
शिरीषला काहीच ऐकू येईनासे झाले आणि त्याचवेळेस..... "बाबा, काकांना सांभाळा. काळ येऊ घातलाय" असे म्हणत शिरीषने फोन ठेवला.समोर उभे असलेले आशा आणि महादू शिरीषकडे डोळे फाडून पहात होते आणि अचानक शिरीष खाली कोसळला आणि बेशुद्ध झाला.
फोन परत परत वाजत राहिला पण आता आशा आणि महादू याना आधी शिरीषकडे पाहायचे होते.
त्याला सावकाश त्यांनी रूममध्ये नेले आणि झोपवले. त्याची दारात भरलेली बॅग होती, ती आशाने परत आत नेऊन ठेवली. शिरीषला शांत झोप लागल्याचे लक्षात आल्यावर, आशा आणि महादू रूममधून बाहेर आले. आशाने इतक्यावेळ रोखलेले अश्रू बाहेर आले. ती मुसमुसत असताना, महादू तिच्याजवळ आला म्हणाला "वाहिनी, शांत व्हा जी, रडून काय होणार नाही बघा....उपायच केला पाहिजे."
"महादुकाका, आज पहिल्यांदा पाहिलंय मी ह्यांना किती यातना होतात ते. असे आधीपण झालंय कि, पण आता लक्षात येतंय कि हे नक्की काय आहे ते. ते बाहेरून यायचे तेच शक्तिपात झाल्यासारखे. कसेबसे घरात येऊन दिवस दिवस झोपून रहायचे आणि मी.. काही कळत नसल्यामुळे त्यांनाच बोलायची, डॉक्टरकडे जा औषधे घ्या सांगायची, ऑफिसला जा म्हणजे बरे वाटेल असे म्हणायची. आज पहिल्यांदा त्यांना असे काहीतरी बोलताना आणि कोसळताना पाहिले आणि जीव थाऱ्यावर नाही राहिला. मला यांना सोडवायचे आहे ह्या साऱ्यातून. मी काय मदत करू शकते, महादुकाका? काकांवर काळ येऊ घातलाय, म्हणजे नक्की काय? हीच का ती यमाची भाषा..म्हणजे काका आता मरणार का ?" आशा डोके धरून खाली बसली.
"काय आहे तो उपाय...?" आशा महादुला विचारत होती.
महादूला पण काही कळेनासे झाले होते. शिरीष आता बराच पुढे जायला लागला होता. तिकडे काकांना पण आवरणे अवघड होते, त्यांचे वेड जास्तच बळावत चालले होते. त्यात शिरीष म्हणाला ”काकांना सांभाळा. काळ येऊ घातलाय" बापरे...... महादू विचार करत असतानाच उठला आणि म्हणाला ”वाहिनी, वाईच घरी फोन लावा जी".
घड्याळाकडे पाहत आशा म्हणाली ”बारा वाजून गेलेत, इतक्या रात्री लावायचा का फोन महादूकाका ? सकाळी लावूयात का? तूम्ही पण झोपा आता. माहिती नाही शिरीषला उद्या कशी मदत लागेल ते....."
"खरं हाय..खरं हाय. झोपाजी तुम्ही पण आता. मी झोपतो मालकाजवळ" असे म्हणत मान हलवत हातवारे करत मनातल्या मनात काहीतरी बोलत महादू आत गेला.
आशापण दुसऱ्या रूममध्ये झोपण्याचा प्रयत्न करू लागली. पुन्हा पुन्हा ती सहा महिन्यापूर्वीचा आणि आताचा शिरीष यातला फरक शोधू लागली. परिचयातील माणसे आठवू लागली, जी मदतीला येऊ शकतात. पुन्हा पुन्हा deposits , दागिने यांचा मेळ घालू लागली. तिला अजूनही कळत नव्हते कि काय करावे, कशी मदत करावी, काय उपाय करावेत... आता महादूकाका काय सांगतोय त्याच्याशिवाय काहीच पर्याय नव्हता.
सकाळ होता होताच फोन परत वाजू लागला. धडपडत फोन घ्यायला आलेली आशा, महादू फोन घेत आहे हे पाहून तेथेच थांबली आणि केसावरुन हात फिरवत जवळ येऊन उभी राहिली.
"व्हय जी....व्हय जी"
"सांगतो जी"
"जपा जी"
"काळजी घेतो जी"
महादुने फोन ठेवला. "वाहिनी वाईच चहाकडे पाहता जी, मी मालकांना उठवतो तोवर. "
"महादुकाका, आधी सांगा काय होता फोन? काय म्हणाले? काकांचे काही बरं-वाईट ?" आशा धास्तावत म्हणाली
"काकांना मोठ्ठा वेडाचा झटका आल्ता रातच्याला. कोणाला बी आवरेना.....मध्येच जरा शहाण्यासारखे वागले. खूप काही काही बोलले आणि परत निपचित पडलेत आता....श्वास चालू म्हणून माणूस जिवंत हाय म्हणायचं..." महादू शिरीषच्या रूमकडे जात जात म्हणाला.
आशा चहाचे कप घेऊन येईपर्यंत शिरीष पण बाहेर आला होता.
महादुकाका सांगत होते ”काकांचे काही खरं नाही जी आता. शेवट आलाच म्हणायचे. रातच्याला धाकल्या मालकास्नी (शिरीषचे वडील) जवळ बोलावले आणि म्हणाले 'आला रे यम... मला बोलवायला एकदाचा... खूप वाट पहिली त्याची. किती वर्षे त्याला घाबरूनच जगलो, पण आता ह्या क्षणी मात्र त्याची भेट व्हावीशी वाटतीये. सुटका.... सुटका होणार माझी यातून. आता माझ्यामुखाने तो बोलणार नाही. शिरीषला म्हणावे जप स्वतःला. आशाची मोठी खंबीर साथ हो त्याला.... सुनेचे कौतुक काही आपण करू शकत नाही मोकळेपणाने. त्याला सांग उपाय शोध, बाहेर पड यातून. ह्या शापापायी मी मूळ-बाळ पण होऊ दिले नाही. आयुष्यभर बायकोचे बोल ऐकले. पण तू चुकलास, एका क्षणी हा निर्णय झुगारला आणि आता शिरीष .... तो पण याच वाटेने चालतोय. म्हणे वरदान मिळवले, काय तर यमाची भाषा! जगणे मुश्किल झाले सगळ्यांचे. शिरीषला खूप खुप आशीर्वाद सांग. आणि आणि..... नव्ह मालक... सांगवेना मला जी...” महादू रडू लागला.
आशा आणि शिरीष एकमेकांकडे पाहू लागले.
"मालक... धाकले मालक" महादू रडत रडत बोलत होता..... ”त्यांच्यासाठी पण यम येत आहे थोड्याच दिवसात, असे म्हणाले मोठे मालक (शिरीषचे काका)" महादू त्या दोघांकडे पाठ करून अंगावरच्या पंच्याने डोळे पुसू लागला.
शिरीष आणि आशा अचंबित होऊन पाहू लागले. शिरीषने हाताच्या मुठी घट्ट आवळल्या. डोळे लाल झाले त्याचे. तो ताडकन उठून बसला. आशा घाबरून उठली आणि त्याच्या बाजूला येऊन उभी राहिले ”शिरीष, ऐका माझे. रागावू नका, चिडू नका. शांत व्हा आधी..." चरफडत तो येरझाऱ्या मारू लागला आणि तेव्हड्यात फोन वाजला.
महादू केवड्यांदा दचकला. ”मालक..... फोन नका घेऊसा . तो आला, यम आलाय. वाड्यात हाय....मोठे मालक...फोन नका घेऊसा.." महादू मोठ्मोठाने रडू लागला.
शिरीषने पुढे होऊन फोन उचलला. आशाने त्याच्या जवळ येऊन हलकेच त्याचा हातावर हात ठेवला.शिरीषने फोन ठेवला आणि मटकन खाली बसला.”संपलं सगळं..... महादुकाका.... आता मला गावाला गेलेच पाहिजे."
"काय जी मालक..." महादू कमालीच्या काळजीने बोलला.
"काका काल जेव्हा शुद्धीवर आले तेव्हाच त्यांनी काकूच्या कपाळावरील कुंकू पुसले आणि तिची माफी मागितली. काकू मोठी पुण्यवान, ”सवाशीण गेली", आता थोड्या वेळेपूर्वीच." शिरीषने फोनवर जे ऐकले ते सांगितले.
पुढे म्हणाला "काका म्हणाले ”माझ्या हयातीत शिरीषला इथे कधीच यायला परवानगी नाही. अग्नी द्यायला, दर्शन घ्यायला पण त्याला कोणी बोलावू नका. थैमान चालू आहे इथे, मृत्यूचे तांडव....” सगळीकडे स्मशानशांतता पसरली.
महादूचे डोळे आता कोरडे थक्क पडले होते. काय ऐकतोय , काय बोलतोय...काही कसलेच भान नव्हते.
"महादुकाका, हे मला आधी का कळले नाही कि आई आणि काकू ह्याचे जीवन धोक्यात आहे? मला यमाची भाषा कळते ना... मग हे का नाही कळले"
"मालक, धाकल्या वाहिनी पण?" महादुने कमालीच्या नैराशयेने विचारले.
"हो महादुकाका... ज्या आईने मला जन्म दिला तिला मी शेवटचे पाहूदेखील शकलो नाही, बोललो पण नाही तिच्याशी. पहाटे केव्हातरी तिची प्राणज्योत मालवली. घरात चालू असलेल्या गोंधळामुळे कोणाला कळले पण नाही."
"मोठ्या वाहिनीपण आणि धाकल्या वाहिनीपण ...काय हे आक्रीत झालं, काय हे आर्कित झालं... दोन दोन सवाशिणी सती गेल्या, एका रात्रीत...लै आक्रीत झालं...” महादुला काहीच सुचत नव्हतं, ऐकतोय काय बोलतोय काय... काहीकाही कळत नव्हतं.
"सांग महादुकाका, मला यमाची भाषा कळते ना... मग हे का नाही कळले?" शिरीष महादुचे खांदे धरून विचारत होता.
"कारण मालक... कारण तुम्ही मोठ्या वाहिनी आणि धाकल्या वाहिनीशी बोलला नाहीत जी काल. तुम्ही ज्यांच्याशी बोलला, ज्याला प्रत्यक्ष पाहता... त्यांचेच कळते तुम्हाला...."
मान हलवत शिरीषने डोळे मिटून घेतले. "काही काही कळत नाहीये. अंधार अंधार दिसतोय मला, खोल खोल गर्तेत वावटळीसारखा भिरभिरतोय.... ".
दोन्ही हातात डोके घट्ट धरून शिरीष खुर्चीत कोसळला.
"यमाची भाषा" : भाग ४
आरती अत्रे-कुलकर्णी
या घटनेला चार दिवस लोटले नाही तो काकांना परत वेड्याचा फार मोठा झटका आला आणि त्यातच त्यांचा अंत झाला. शिरीषच्या वडिलांनी आपल्या मोठ्या भावाचे सगळे विधी केले. शिरीषला जाता येणार नव्हते कारण काकांनी सक्त ताकीद दिली होती. महादूच चार दिवस गावाकडे जाऊन आला. येताना शिरीषसाठी त्यांच्या वडिलांनी एक पत्र दिले होते.
महादू सांगत होता "या घराचा हा असा लौकिक असल्यामुळे आई आणि काकू अचानक एका रात्रीच कश्या गेल्या, झटपट विधी का उरकले... कोणी काही विचारले नाही. इतकंच काय, कोणी आले सुद्धा नाही नमस्कारासाठी. मोठ्या वाहिनीसाहेब सुखाने गेल्या म्हणायच, धाकले मालक शेवटपर्यंत धाकल्या वाहिनीसाहेबांजवळ बसून होते, असेही म्हणाले. धाकल्या वाहिनीसाहेबांचा जीव शिरीषसाठी अडकला होता. धाकल्या मालकांनी ते जाणले आणि त्यांना वचन दिले, तेव्हाच त्या सुटल्या या जगातून. धाकल्या मालकांना दिसत होते त्यांचे मरण. धाकल्या वाहिनीस्नी मालकांनी वचन दिलय 'शिरीषला उपाय सांगूनच मरेन’. " बोलता बोलता महादू गप्प झाला.
"मालक थांबवा हे सगळं, काय हे अघोरी वरदान... आपल्या माणसांचे मरण आपणच पाहायचे आणि वर सांगायचं, मरणार म्हणून! भयंकर आहे सगळं...लै भयंकर !" मध्येच महादू अतीव दुःखाने म्हणाला आणि थांबला.
पुन्हा सांगू लागला "काकांना परत शुद्ध आलीच नाही. तेव्हडा एकच दिवस काय ते मनातले बोलले.. ते शेवटचेच."
शिरीष शांतपणे ऐकत होता.
"मालक, धाकले मालक लै एकटे हायेत. मला तर काय बी समजेना काय करावं नि कुठे जावं ते. माझी तिकडे बी गरज हाय आन् इकडे बी ...." सुन्नपणे महादू भिंतीला टेकून बसला होता.
तेव्हड्यात आशाने विचारले "शिरीष , पत्र वाचले का तुम्ही? काही उपाय लिहिला आहे का? निदान तुमची तरी सुटका होईल ह्या सगळ्यातून..." शिरीषने टेबलवर ठेवलेले पत्र उचलले आणि मोठ्याने वाचायला सुरुवात केली.
"प्रिय शिरीष ,
इतक्या वर्षात आपला जुजबीच संबंध येत राहिला. आई,वडील म्हणून सगळीच जबाबदारी मी विश्वासाने महादूकडे दिलेली होती आणि तो विश्वास त्याने अगदी सार्थ ठरवला आहे. आशानेही तुला उत्तम साथ दिली आणि तुमचा संसार अगदी सुखाचा चालला होता....पण ?
सुखाला ग्रहण लागले. तुला 'यमाची भाषा' बोलता यायला लागली. ती भाषा कोण कधी बोलणार, हे सगळे त्या विधात्याच्या हातात. आपल्या पूर्वजांकडून आलेले वरदान आहे ते, पण आज शापच म्हणायचे त्याला. रात्रीची झोप आणि संसारातील सुख हिरावून घेतले त्याने कित्येक पिढ्याचे. माहिती नाही किती कर्ते पुरुष बळी पडले, वेडे झाले,कोंडून झिजून मरून गेले. आणि बायका.... काळाच्या आधीच संपल्या.
पूर्वीच्या काळी या भाषेचा उपयोग व्ह्ययचा. ते हि खरे कि या वरदानामुळेच आपल्या कित्येक पिढ्या सुखाने जगत होत्या, राजदरबारी मान होता, मानाने रहात होत्या, घरात पैसा खेळत होता, सुख-शांती नांदत होती.. पण काळ बदलला आणि ते वरदान न राहता शाप होऊ लागले.
नुकतेच तुझे काकाही त्याच मार्गाने गेले. तुझी आई आणि मोठ्या वाहिनीही. जसे काकांचे मरण तू सांगितलेस तसे ते मलाही दिसले होते. तुझी आई, काकू देखील जाणार हे मला समजले होते.
मी वाट पाहतोय... तो माझ्यासाठी येणार आहे, असे तुझे काका म्हणत होते. मी पण वाटच पाहतोय रे...पण तुझ्या आईसारखा माझा जीव पण तुझ्यात अडकला आहे. तुला कल्पना नसेल कि तुला जेव्हा यमाची भाषा बोलता येऊ लागली, हे मला समजले तेव्हा मला किती यातना झाल्या ते! त्या दिवशी पहिल्यांदा, तुला जन्म दिल्याचा मला खूप खूप पश्चाताप झाला. आपण चुकलो, आपल्या एकुलत्या एका मुलाला यामधून बाहेर नाही काढू शकलो, ह्याचे वाईट वाटले. तुला आयुष्यभर या सगळ्यापासून दूर ठेवले, जेणेकरून तुला या वादळाची झळ लागू नये, पण गेल्या काही पिढ्या या वरदानाचे वाईट फळच भोगत आहे.
तुला माहिती असेलच, म्हणजे ,म्हणजे महादू सांगेलच, मी तुझ्या आईला वचन दिले आहे. गेले चार दिवस महादूबरोबर तेच शोधत आहे. खरंच सांगतो, मी पार विसरून गेलो होतो. तुझ्या आईमुळे त्याची आठवण झाली. हा उपाय आधीच शोधला असता, तर तुला माझ्यापासून क्षणभरही दूर ठेवले नसते.
असो, तुझ्या आजोबानी आमच्याइतकेच महादूला पण मुलगा मानले होते. आणि ते रहस्य ह्या घरातून बाहेर जाणार नाही, ह्याची काळजी घेतली होती. डोळ्यात तेल घालून दिवस-रात्र मी उपाय शोधत आहे. पण मी अयशस्वी झालो आहे. अत्यंत नाईलाजाने मी महादूला रिकाम्या हाताने परत पाठवत आहे. मला माहिती नाही कि तो उपाय काय आहे, कुठे आहे, कश्या स्वरूपात आहे...पण हे नक्की कि जे काही आहे ते वाड्यातच आहे.
अजून तरी महदूच्या जवळ मला काळ दिसत नाहीये.सुनबाईना इतक्यात वाड्यात आणू नकोस. तिला ह्या सगळ्याची जेव्हा कल्पना आली तेव्हा काय आभाळ कोसळले असेल, ते मला माहिती आहे. या साऱ्याचे काय परिणाम आहेत ते, मलाही माहिती नाही, पण तिच्या कोमल मनावर आता अजून काहीच आघात नकोत. लागोपाठ तीन मृत्यू पाहिलेत वाड्याने नुकतेच.
महादूला तिच्याजवळच ठेव.
काही दिवस जाऊदेत. तुलाही तझे बस्तान परत एकदा स्थिर करावे लागणार आहे. तू सहा-आठ महिन्याने वाड्यात ये आणि सगळीकडे शोध. देव तुला यश देवो. महादूला सांगत जा तू काय करतोस ते. उपाय सापडल्यावर तुझा वंश वृद्धिगत कर.
खूप खूप आशीर्वाद!
तुझा अभागी पिता"
नंतर काही दिवसातच धाकले मालक स्वर्गवासी झाल्याचा निरोप मिळाला. रोजच फोन होत असल्यामुळे शिरीषला त्याची कल्पना होतीच. महादुने वाड्याला कुलूप लावले आणि तो कायमचा इकडेच आला. बघता बघता वर्षं उलटले. शिरीषने छोटासा स्वतःचा व्यवसाय सुरु केला. अजूनही अधूनमधून तो बोलायचाच काहीबाही. संपर्कात येणारी माणसे.. जायचीच आपापल्या मार्गाने. पण आता शिरीषने स्वतःवर ताबा मिळवला होता. पाहिल्यासारखे तो शक्तिपात होऊन दिवसाच्या दिवस झोपून राहत नसे. थकत असे पण घरी येऊन महादुकाका, आशा यांच्याशी सगळे बोलायचा. महादू काही मौलिक सूचना करत असे. कधी त्याला जुने काही आठवत असे, ते सगळे शिरीष नीट लिहून ठेवत असे.
एक दिवस शिरीषने महादूला विचारून वाड्याचा नकाशा बनवला. शिरीषला तर वाडा अंधुकसा आठवत होता. तपशीलवार माहिती महादुने दिली. महादुने वाड्याच्या आजूबाजूची पण माहिती नकाशामध्ये भरायला लावली. शंकराचे देऊळ, विहीर... शिरीष तर साफ विसरून गेला होता. "मालक लै जुने हाय सगळे, पण हाय वाड्याचाच एक भाग."
परत परत नकाशाकडे पहात, शिरीष आठवत होता महादूचे शब्द. आजोबा एका पोथीची पूजा करायचे. ती पोथी ते जीवापाड जपायचे. पूर्वजांची एकमेव आठवण आहे, असे म्हणायचे. पण कापडात बांधलेली ती पोथी, घरात नंतर कोणीच पाहिली नाही. खुद्द आजोबानी ती कधी उघडून पाहिली नव्हती. "वेळ आली कि ज्याची त्याने पाहायची", असे आजोबा म्हणायचे. आजोबानी केव्हातरी त्यांना वेड लागायच्या आधीच ती पोथी नाहीशी गेली होती. वीस वर्षं आजोबा वेड्यागत वागले. घरातील सगळेच हि गोष्ट विसरले. आजोबाच्या तर स्मृतीपण नाहीश्या झाल्या. त्यातच ते केव्हातरी एकदा आजीला म्हणाले "उपाय आहे. ज्याने वरदान दिले त्यानेच केव्हा आणि कसे परत घ्यायचे, ते पण ठरवलंय. काळ येईल आणि वरदान सोबत घेऊन जाईल. कधीतरी पुढची पिढी, अजून पुढची पिढी.... बोलतील यमाची भाषा तेव्हाच त्यांना सापडेल हा उपाय. सगळा वाडा शोध, वाड्याच्या बाहेरही शोधा. कुठेतरी तो उपाय आहे...मला माहितीये कुठेतरी तो उपाय आहे."
महादूला आठवते त्याप्रमाणे आजोबा असेच एखादा दिवस शहाण्यासारखे वागले आणि नंतर वेडाचे तीव्र झटके येतच राहिले. त्या दिवशी ते जे काही बोलले ते खरं कि खोटं हे अजूनही कळत नाहीये. आजीने त्यानंतर खूप शोधाशोध केली, पण ती पोथी काही सापडली नाही. त्यावेळी बाबा आणि काकांनी फारसे लक्ष दिले नाही. त्यांना नुकतीच ती भाषा बोलायला यायला लागली होती. गाववाले, आजुबाजेचे प्रतिष्ठित लोक काका आणि बाबांना मानाने वागवत. बैठकीला बोलावत. वर्षाचे धान्य, घरातील कपडेलत्ता,जुजबी कामे सगळे काही आपोआप होत असे. यमाच्या भाषेला थोडेफार महत्व देत तसेच घाबरूनही असत. त्यावेळी त्या दोघांनाही ती भाषा हवीहवीशी वाटत होती, म्हणून त्यांनी उपाय शोधायला नकारच दिला. आणि नंतर सगळेच विसरले. आता जवळ जवळ ४०-५० वर्षं झाली या गोष्टीला.
इतक्या जुन्या काळात आजोबानी वाड्यात कुठे लपवले असेल ते शोधायचे...आणि मुख्य म्हणजे काय शोधायचे ते पण नीटसे माहिती नाही.
शिरीषने आता वाड्याकडे जायचे ठरवले. आशानेपण मनाची तयारी केली. महादुने रोज घरी फोन करणार,स्वतःची काळजी घेणार.. हे सांगूनच त्याला पाठवले. इतक्या वर्षाने त्या वाड्याकडे, गावाकडे जाताना आपले कोणी स्वागत करणार नाहीच, हे त्यालाही माहिती होते. तसेपण ते घर, वाडा, भाषा लोकांनी कधीच वाळीत टाकले होते. बघता बघता जुने लोक काळाआड गेले आणि यमाची भाषा बोलणारे कुटुंब आहे, हे पुढच्या पिढीला माहितीही नव्हते. होत्या त्या अफवा, कुजबुज...
शिरीषलाही आता बाहेर पडायचे होते. जरी दाखवत नसला तरी तो मनातून खूप घाबरलेला होता. आशा आणि महादू सोडले तर या जगात त्याला कोणीच नव्हते. आपल्यालाही मूळ-बाळ व्हावे, सुखाचा संसार व्हावा या माफक अपेक्षा होत्या त्याच्या. आणि म्हणूनच तो उपाय शोधायला त्याने गावाकडे यायचे ठरवले.
"यमाची भाषा" : भाग ५
आरती अत्रे-कुलकर्णी
शिरीषला इथे येऊन चार महिने होऊन गेले होते. अजून हाती काहीच लागले नव्हते. वाड्याचा कोपरा न कोपरा पाहून झाला होता. काढलेल्या नोट्स, टिपणे परत परत वाचून काही नवीन माहिती मिळतिये ते पण पाहून झाले होते. गावातील इतर जाणकार जुने लोक फारसे हयात नव्हते, त्यामुळे फारशी माहिती मिळू शकत नव्हती. बाकी लोक तर बोलायलापण उभे रहात नसत शिरीषशी. रात्री शिरीष डोळे मिटून झाल्या गोष्टीचा परत विचार करू लागला. महादुकाका आणि आशाशी नुकतीच सविस्तर चर्चा फोनवर झाली होती. महादुकाकानी त्याला 'जर आता सगळे घर, वाडा आवरून, पाहून झाले असेल तर एक एक गोष्ट, जी उघडून पाहिली नाही, तिथे काही नसेल असे वाटून सोडून दिले असेल ते बघ' असे ठामपणे सांगितले होते.
म्हणूनच त्याने आज देवघर नीट आवरायचे ठरवले होते. आजोबा पूर्वी ती पोथी देवघरातच ठेवत, असेही महादू म्हणाला होता आणि रोज तिची पूजा करत होते. देवघरातील सगळे सामान बाहेर काढले तेव्हा त्याच्या असे लक्षात आले कि देवघर खूप जुने झाले असून जरा डुगडुगतही होते. कदाचित थोडेसे ठोकून, दोन-चार खिळे मारून ते नीट उभे राहिल, असे वाटून त्याने देवघर मोठ्या मुष्टिलीने बाहेर आणले. जुने शिसवी लाकडाचे मजबूत आणि भरीव देवघर एकट्याने हलवणे, बाहेर आणणे खूपच अवघड होते. कसेबसे दुपारपर्यंत त्याने ते बाहेरच्या ओसरीपर्यंत आणले. उंबरठ्याजवळ तो थांबला आणि तिथेच त्याने ते जमिनीवर आडवे पडले. उंबरठा ओलांडून त्याला एकट्याला देवघर बाहेर आणता येणार नव्हते आणि खूप वेळही गेला असता. तसे आता आपल्या मदतीला कोणी येणार नाही, हे त्याला कळले होते. शिवाय दारात उजेडही होता. खूप वेळ गेला तर घराचे दार लावून रात्री तसेच झोपताही येणार होते. खालच्या बाजूने ते स्वच्छ करून त्याने ते जिथे डुगडुगत होते तिथे ठोकाठोकी करून आधी नक्की काय झाले आहे ते पहिले. दोन ड्रॉवर होते, ते पण बाहेर काढले. दुसरा ड्रॉवर बाहेर काढताना त्याला काहीतरी अडकल्यासारखे वाटले.त्याने जरा जोर लावून तो ड्रॉवर बाहेर ओढला तसे लपलेला अजून एक ड्रॉवर बाहेर आला आणि त्यात काहीतरी होते.भरपूर धूळ बसलेले चौकोनी घडी केलेले काहीतरी. शिरीषने अविश्वासाने परत एकदा वाकून चाचपून सगळे देवघर पहिले. अजून तिथे काहीच नव्हते. त्याने दोन्ही ड्रॉवर साफ करून लावले. देवघर परत उभे केले. आता ते डुगडुगत नव्हते. शिरीषने परत एकदा खूप मेहनत करून देवघर आत नेऊन ठेवले. कालपासून त्याला तगमगत होते, काहीतरी घडणार असे वाटत होते, हात सारखा थरथरत होता. कदाचित हे जे काही सापडले आहे, म्हणूनच त्याला असे काहीतरी आतून वाटत होते.
देवघर परत जागेवर लावेपर्यंत शिरीषचा चांगलाच वेळ गेला. अंधार पडू लागल्यामुळे शिरीषने तो दिवस तिथेच थांबवला. सकाळी शिरीषने पहिली ती चौकोनी घडी बाहेर काढली. बसलेली धूळ बाजूला केली. हलक्या हाताने तो ती चौकोनी घडी उलगडू लागला. त्याची उत्कंठा शिगेला पोचली होती. बसलेले धुळीचे थर पुन्हा पुन्हा काढत तो हळुवारपणे उलगडताना त्याच्या लक्षात आले कि ते एक मृगाजिन होते. खूप खूप जुने पण तरीहि एकसंध. त्याचे तुकडे पडले नव्हते, ते खराब झाले नव्हते, त्याचा रंग जुना झाला होता, पण हरीणाचे कातडे लगेच ओळखू येत होते आणि पांढरे ठिपके अजूनही चमकदार होते. शिरीषने डोळे मिटले तसे त्याला आजोबांचा हात आपल्या डोक्यावरून फिरत आहे, असे वाटले. तो हात तसाच रहावा म्हणून शिरीषने डोळे तसेच मिटून ठेवले काही वेळ.
ओल्या फडक्याने त्याने ते मृगाजिन परत एकदा पुसून घेतले. त्याला एक वेगळेच चिन्ह मृगाजिनच्या मागे दिसले. नक्की काय आहे, ते कळत नव्हते. कोणत्यातरी प्राण्याचे चित्र असावे असे वाटत होते. चार पाय असावेत, असेही त्याला वाटले पण चित्र म्हणावे तेवढे सुस्पष्ट नव्हते किंवा काळाच्या ओघात ते धूसर झाले असावे. अर्थ लागत नव्हता पण काहीतरी संबंध आहे, हे नक्कीच. दिवसभर शिरीषने ते मृगाजिन हातात धरून अनेक वेगवेगळे तर्क लढविले. रात्री शिरीष हाच विचार करत होता. काय अर्थ असेल त्या चिन्हाचा, मृगाजिन असे देवघरात चोरकप्प्यात का ठेवले असावे, त्याचा उपायाशी काही संबंध असावा का? महादुकाका पण काही मदत करू शकले नाही , पण त्यांना खूप आनंद झाला. "हि चांगली सुरुवात आहे, तू अजून प्रयन्त कर", असेही ते म्हणाले.
त्यानंतर दोन आठवडे गेले. काहीच हाती लागले नाही. शिरीष खूप निराश झाला. खूपदा तो मृगाजिन हातात धरून ठेवत असे, पण काहीच घडत नसे.
राहिलेली विहीर साफ करूयात म्हणून तो आज परत विहिरीत उतरला. खूप खोलवर गेला, पायऱ्या होत्या आणि आता पुढे मातीचा ढिगारा. पूर्वी अगदी खाली पंप बसवला होता, तिथे आज शिरीष साफ करत होता. आता पाणीतर लागणार नव्हतेच, पण निदान साफ करूयात ह्या विचाराने तो माती बाजूला करत होता. पंपाच्या बाजूला त्याला भीतीवर काहीतरी रंगवलेले दिसले. कुतूहलाने त्याने ते साफ करताच त्याला एक मोठा चौकोन भिंतीवर लालसर रंगात रंगवलेला दिसला. पाण्याने, इतक्या वर्षात तो पुसट झाला होता. अजूनही जर इथे पाणी असते तर हा रंगवलेला चौकोन तर कधीच पुसला गेला असता. बारकाईने पहिले असता कोणत्यातरी देवाचे चित्र आहे, असे त्याला वाटले.
दमलेला शिरीष उत्साहाने त्या भिंतीचे निरीक्षण करू लागला. काहीतरी नक्की होते तिथे. कारण शिरीषला कालपासून तगमगत होते, काहीतरी घडणार असे वाटत होते, हात सारखा थरथरत होता. कदाचित हे जे काही सापडले म्हणूनच त्याला असे काहीतरी आतून वाटत होते. पुन्हा एकदा त्याच भावना, तीच तगमग... अगदी अस्सेच त्याला मृगाजिन सापडले तेव्हाही आतून वाटत होते.
त्याच्या असे लक्षात आले कि हा मोठा चौकोन परत वेगळ्या सिमेंटने लिंपलेला आहे, म्हणूनच त्यावर रंग लावला आहे. आता पंप बांधताना हे बांधकाम केले का खरंच इथे काही आहे, ते काही कळेना. मनाचा कौल घेत शिरीषने ते बांधकाम फोडायला सुरुवात केली. असे परिश्रम करायची शिरीषला कधी सवय नव्हती. तो थकत, उठत बसत कुदळीचे घाव घालत होता. थोड्याच वेळात तिथे एक भगदाड पडले, आत एक पोकळी होती. आणि तिथे काहीतरी बांधून ठेवले होते. शिरीषने थरथरत्या हाताने ते बाहेर काढले. एका फडक्यात काहीतरी गुंडाळून ठेवले होते. एखाद्या माठ किंवा घटासारखे वाटत होते. ती वस्तू घेऊन शिरीष विहिरीतून बाहेर आला. वस्तुवरची धूळ झटकताना त्याने बांधलेल्या गाठी सोडवल्या आणि ती वस्तू बाहेत काढली.
तो एक वेगळ्याच आकाराचा घट होता, कोपरभर उंचीचा, वजनाला जड, भरीव धातूचा. त्यावर खूप काहीतरी चित्रे होती. आता हलक्या हाताने त्याने तो घट अजून स्वच्छ करायला सुरुवात केली. घटाच्या खाली, एक चिन्ह होते. कोणत्यातरी देवाचे ते चित्र होते, पण कोण देव आहे ते नीटसे कळत नव्हते. ते चिन्ह त्या मृगासनावरील चित्रासारखेच असावे. ओल्या फडक्याने शिरीष घट साफ करताना तो ती वेगवेगळी चित्रे पाहत होता आणि त्याचा अर्थ लावत होता. मंदिरातील अनेक देवाची चित्रे पाहतोय, असे काहीतरी शिरीषला वाटत होते. पुन्हा शिरीषने डोळे मिटले आणि पुन्हा तोच अनुभव..... आजोबांचा हात आपल्या डोक्यावरून फिरत आहे असे वाटले. आपण योग्य दिशेने जात आहोत असे शिरीषला वाटले. आजचा दिवस सार्थकी लागला, असे वाटून शिरीषने काम थांबवले.
रात्री परत तोच विचार... अजून काय शोधले पाहिजे, कुठे शोधले पाहिजे, अजून महादुकाका म्हणतात तशी ती पोथी सापडलेली नाही. अजून किती दिवस..... सध्या कोणी भेटत नसल्यामुळे यमाची भाषा बोलली जात नसे, हेच काय ते समाधान !
पाहता पाहता परत एक महिना उलटला. तसे काहीच हाती लागले नाही. मृगाजिन आणि घट! शिरीष दिवस रात्र घरात शोधात असे, भिंती परत परत चाचपडून चोरकप्पा आहे का, वस्तू लपवायला जागा आहे का... ते पाहत असे. कधी कधी पोकळ वाटणाऱ्या भिंती फोडून बघत असे. काही संकेत मिळत आहेत का, कशाचा अर्थ लागत आहे का...पण काहीच हाती लागत नव्हते.
प्रत्येक फोनवर महादुकाका आणि आशा त्याचे मनोधैर्य वाढवीत होते. सुरुवात तर झाली, पोथी नक्की सापडेल, उपाय नक्की होईल, अशी आशाच त्याला अजूनही इथे रहायला मजबूर होती. आशा त्याला नेहमी म्हणजे "एकदा का उपाय झाला कि आपला संसार अजून सुखाचा होईल" अजून सुखाचा म्हणजे मुले-बाळ होईल, हेच तिला सांगायचे असे. त्याला पुन्हा पुन्हा घर शोधताना आशाचा चेहराच डोळ्यासमोर येत असे.
एक दिवस कोठीघर आवरताना तिथे असलेल्या जुन्या धान्याच्या कणग्या तो हलवत होता. आता मोजून सहा कणग्या शिल्लक होत्या कोठीघरात, त्याही खिळखिळ्या झालेल्या. तसे बारा-पंधरा कणग्या सहज बसतील आणि वर दोन माणसे झोपू शकतील एव्हडे मोठे ते कोठीघर होते. पूर्वी सगळ्या कणग्या मातीने, शेणाने लिंपून कोठीघरात कायमच्या ठेवल्या जात असे. आता शिल्लक लिंपलेल्या कणग्या अजूनही भक्कम होत्या , तर काही ठिकाणी नुसतेच खड्डे. हळूहळू शेती गेली, घरचे धान्य कमी झाले, माणसेहि नाहीशी झाली आणि धान्य विकत घेऊन साठवणेही. म्हणूनच कोठीघराचा वापर कमी झाला होता. अगदी वरच्या बाजूला एक खिडकी तथा झरोका होता. त्यातून येणारा उजेड खूपच कमी होता. वरची भिंत साफ करताना त्याला असे लक्षात आले कि इथे एक मोठी सूर्याखिडकीपण आहे. ती खिडकी आजोबांच्या खोलीत आहे.
कोठीघरातून शिरीष तसाच वर आला आणि आजोबांच्या खोलीत येऊन ती खिडकी पाहू लागला. खोलीच्या मध्यभागी जमिनीवर त्याला खिडकी तथा मोठी गोलाकार काच दिसली. त्याच्या आजूबाजूला नक्षी होती. आत्ता त्याला आठवले कि सकाळी जोवर सूर्य ह्या बाजूला असतो आणि सूर्यप्रकाश आत येत असतो तेव्हा सूर्यप्रकाश त्या काचेवर पडतो. शिरीष परत कोठीघरात आला. जुजबी आवरून तो मनातच म्हणाला "म्हणजे आज हे काम थांबवून उद्या सकाळपासून परत कामाला लागले पाहिजे."
सकाळ होताच शिरीषने कोठीघराचे काम सुरु केले. सगळ्या कणग्या बाजूला केल्या. मधल्याच एका कणगीच्या मागच्या बाजूला भिंतीवर चौकोनात एक चित्र होते. शिरीषला आता हुरूप आला. लगेच कुदळ घेऊन शिरीष भिंतीवर मारू लागला. थोडेसे भोक पडल्यावर त्याला काहीतरी बांधलेले दृष्टीस पडले. अजून थोडे घाव घालत शिरीषने ती वस्तू सावकाश बाहेर काढली. भराभर ते कापड सोडवत तो आत काय आहे ते पाहू लागला. ती वस्तू म्हणजे एक पोथीसारखेच काहीतरी होते. शिरीषला अपार आनंद झाला, शिरीषने डोळे मिटले आणि पुन्हा तोच अनुभव..... आजोबांचा हात आपल्या डोक्यावरून फिरत आहे असे वाटले.
"यमाची भाषा" : भाग ६
आरती अत्रे-कुलकर्णी
शिरीषला अतिशय आनंद झाला. त्याने तातडीने महादुकाका आणि आशाला फोन केला. आतापर्यंत सापडलेल्या सगळ्याच गोष्टींचा या सगळ्याशी काही ना काही संबंध आहे, हे नक्कीच होते. आजपर्यंत कधीही न पाहिलेले आजोबा त्याने वाड्यात आल्यावर पहिल्यांदाच फोटोमध्ये पाहिले होते. पण त्यांचा स्पर्श, तो मात्र त्याने अनुभवला होता. त्या स्पर्शात माया होती, प्रेम होते. काका आणि काकूने त्याच्यावर मुलासारखेच प्रेम केले होते. त्यांना स्वतःला मूळ-बाळ नव्हते, त्याचेही कारण म्हणजे 'यमाची भाषा' आहे, हे जेव्हा शिरीषला कळले तेव्हा त्याला फार वाईट वाटले होते. किती मोठा त्याग! किंवा... किती हा तिरस्कार! असे परस्परविरोधी भावना त्याच्या मनात आल्या होत्या. प्रत्यक्ष आई आणि बाबा यांच्याशी येणार अल्पसा संबंध, याचेही कारण हेच आहे, हेदेखील त्याला नुकतेच समजले होते. शिरीष आता त्या उपायांच्या अगदी जवळ होता.
शिरीष आतुरतेने सकाळची वाट पाहू लागला. सुरु झालेल्या ह्या साखळीचा आता शेवट होणार, म्हणून तो आतुर झाला होता. गावाकडे आल्यावर जरी तो यमाची भाषा कमी बोलत असला तरी असे अनुभव त्याला येतच होते. एकदा गावाच्या बाजाराला गेला असता तो दोनचार लोकांना असेच काही बोलला, काळजी घ्यायला सांगितली. नंतर त्याला कळले कि एकाच्या अंगावर मोठे झाड पडले, पण तो वाचला आणि एकाने प्रवास रद्द केला म्हणून त्याचे प्राण वाचले. आजूबाजूला असणाऱ्या लोकांपैकी कोणालातरी शिरीषची माहिती होती आणि त्यामुळे सगळ्या गावात बोंबाबोंब झाली होती. शिरीषला त्या वेळी फार आश्चर्य वाटले होते, कारण या आधी तो माणूस जाणार, काळ येणार,मरण ओढवणार असेच संकेत देत असे. आता मात्र तो माणूस वाचेल,मरण टळेल असे संकेत द्यायला लागला होता. अजूनही तो काय बोलला, त्याने कोणाला नक्की काय सांगितले हे त्याला नीटसे नंतर आठवत नसे आणि शक्तिपात झाल्यासारखे वाटून तो दिवसभर पडून राहत असे, पण त्याला एक नवीन उमेद आली होती. लोकांचे प्राण वाचत आहेत, हे त्याला नवीन होते. महादुकाका म्हणाले कि हा एक चांगला शुभशकुन असावा, तुला योग्य मार्ग सापडला आहे तू तुझ्या शोधात यशस्वी होत आहेस. तसेच असेल म्हणुनच तो गावच्या बाजारात म्हणाला होता 'काळ येईल पण वाचशील तू...'
सकाळ होताच शिरीष ने अतिशय उत्सुकतेने पोथीला भक्तिभावाने वंदन केली आणि आजोबांचे स्मरण करून त्याने पोथीचे पहिले पान उघडले. पिवळी पडलेली जाड कागद असलेली खूप खूप जुनी पोथी असली तरी अक्षरे मात्र अगदी सुस्पष्ट होती, भाषा संस्कृत असून मोठे वळणदार अक्षर होते.
पहिल्या पानावर रेड्यावर बसलेल्या अलंकारभूषित यमाचे अगदी जिवंत वाटावे असे चित्र होते. त्या द्विभुज मूर्तीच्या एका हाती पाश असून त्याचे दुसरे टोक कमरेभोवती गुंडाळलेले होते. दुसऱ्या हातामध्ये सोटा धरलेला होता. त्या खाली यमाचा गायत्री मंत्र लिहिलेला होता.
ऊँ सूर्याय पुत्राय विद्महे महाकालाय धीमहि |
तन्नो: यमः प्रचोदयात ||
शिरीषने तो मंत्र मोठ्या आवाजात वाचला. ह्या यमगायत्री मंत्राचा जो कोणी जप करेल त्याला मृत्यूचे भय राहणार नाही तसेच अकालमृत्यूचे भय नाहीसे होईल.
शिरीषला अतिशय आनंद झाला.
पुढचे पान म्हणजे दुमडून ठेवलेली पाने होती. अतिशय अलवार हाताने शिरीषने त्या घड्या उलगडल्या.
"रवीपुत्रम् वंदना"
सूर्याचे भव्य चित्र असून डाव्या बाजूला काळा शेला पांघरून उभा असलेला यमराज व त्याची जुळी बहीण यमुना नमन करताना उभे होते. उजव्या बाजूला निळा शेला पांघरून उभा असलेला शनिदेव आणि एका गुडघ्यावर बसून हातामध्ये धनुष्य असलेला कर्ण वंदन करत होते. यम आणि यमुनेच्या मागे जुळे भाऊ देववैद्य अश्विनिकुमार, कपिराज सुग्रीव उभे होते. डाव्या बाजूला शनिदेवाच्या मागे मनू वंदन करत आहे, असे मोठे उठावदार चित्र होते.
"रवीपुत्रम् वंदना"
शिरीषने मोठ्या आवाजात ते वाचले. हि सारी सूर्याची मुले असून ते त्याला वंदन करत आहेत, असे ते चित्र होते. शिरीषनेही भक्तिभावाने त्या चित्राला नमस्कार केला.
आता शिरीष बसला होता तिथे सूर्याचा प्रखर प्रकाश येत होता, किंवा शिरीषला तसा भास होत होता.
शिरीषने तिसरे पान उलटले.
"महा मृत्युन्जय मंत्र"
ॐ त्र्यं॑बकं यजामहे सु॒गन्धिं॑ पुष्टि॒वर्ध॑नम् ।
उ॒र्वा॒रु॒कमि॑व॒ बन्ध॑नान् मृ॒त्योर् मु॑क्षीय॒ माऽमृता॑त् ।
महा मृत्युन्जय मंत्राचा जप भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी केला जात असून तो सर्वात दयाळू देव आहे. 'महा' शब्दांचा अर्थ महान आहे, 'मृती' म्हणजे मृत्यू आणि 'जया' म्हणजे विजय, म्हणजे याचा अर्थ या मंत्राचा जप करून व्यक्तीवर मृत्यूचा विजय मिळविला आहे.
त्रयंबकम (हे तीन नेत्र असणारा तो शिव) यजामहे(आम्ही तुझे पूजन करतो) सु॒गन्धिं॑(सुगंधित) पुष्टि॒(जीवनामध्ये परिपूर्णता) वर्ध॑नम्(वर्धन/पोषण करतो) उर्वारुक(टरबूज/काकडी इत्यादी) इवत्र(याप्रमाणे) बन्धनान्(बन्धनामध्ये) मृ॒त्योर्(मृत्यू) मु॑क्षीय॒(मोक्ष देणे/स्वतंत्र्य करणे) मात्र न अमृतात(अमरता/मोक्ष)
अर्थात
आपण भगवान शिवाची पूजा करतो जो तीन नेत्र असलेला आहे तो आपल्या प्रत्येक श्वासांमध्ये जीवनशक्तीचा संचार करवतो आणि संपूर्ण जातीचे पालन-पोषण करतो.
आता शिरीषला त्याचा अर्थ नीट समजला. जेव्हा मानवाला मृत्यू दिसायला लागतो तेव्हा मृत्यूला जिंकण्यासाठी ह्या मंत्राचा जप केला जातो. अर्थातच यमराजही ह्या मंत्राचा जप करीत असलेल्या व्यक्तीजवळ येत नाही कारण त्याचे पालनपोषण भगवान शिव करीत आहेत. यमाला जिंकायचे असेल तर आधी भगवान शिवाला जिंकायला हवे.
शिरीषने पुन्हा मोठ्याने तो श्लोक वाचला.
ॐ त्र्यं॑बकं यजामहे सु॒गन्धिं॑ पुष्टि॒वर्ध॑नम् ।
उ॒र्वा॒रु॒कमि॑व॒ बन्ध॑नान् मृ॒त्योर् मु॑क्षीय॒ माऽमृता॑त् ।
शिरीषनेही भक्तिभावाने भगवान शिवाला स्मरून नमस्कार केला. शिरीषच्या लक्षात आले कि वाड्याच्या आत शंकराचे मंदिर का आहे ते. म्हणजे आपले पूर्वज फार पूर्वीपासून भगवान शिवाला स्मरत आहेत, त्याचीच तपश्चर्या करीत आहेत.
चौथे पान उलटले.
तिथे एक वेगळेच चित्र होते.
एक भयानक अशी दिसणारी मानवसदृश्य मूर्ती श्वानसदृश्य प्राण्यावर बसली आहे. तिच्या एका हातात रुंद पात्याचे खड्ग आहे. त्याच्या गळ्यात दोरी/वेसण आहे आणि ते वेसण त्या बटबटीत डोळे, बसके नाक, लोंबणारी जीभ अशा भयानक प्राण्याच्या नाकामध्ये घातलेले आहे.
"यमदूत स्मरणम्"
यमो नो गातुं प्रथमो विवेद नैषा गव्यूतिरपभर्तवा उ।
यत्रान: पूर्व पितर: परेयुरेना जज्ञाना: पथ्या अनु स्वा:।।
अर्थ - सर्वात प्रमुख जो यम त्यालाच आमचा गगनमार्ग माहीत आहे. ज्या ठिकाणी आमचे पूर्वज परलोकी गेले, ज्या मार्गानुसार उत्पन्न झाले आणि जे मार्ग अनुसरले, ती आमची जागा कोणी हिरावून घेऊ शकणार नाही.
हे चित्र आणि तो श्लोक पुन्हा वाचल्यावर शिरीषच्या लक्षात आले कि ते चित्र म्हणजे यमदूत होय.
अग्नी हा यमाचा प्रतिनिधी/दूत आहे. घुबड व कपोत/कबुतर हे त्याचे दूत/वाहक आहेत. चार डोळ्यांचे दोन कुत्रे हे यमाच्या लोकांचे रक्षक आहेत. यमदूत हे वर्णाने काळे असून महाभयंकर दिसतात, त्यांचे डोळे लाल असतात, त्यांच्या हातात त्रिशूळ, सोटा व पाश आहेत.
यमाइतकेच यमदूताचेही स्मरण महत्वाचे आहे, हे शिरीषच्या ध्यानात आले. त्याने भक्तिभावाने यमदूताला नमस्कार केला. शिरीषदेखील एक प्रकारे यमाचा दुतच होता कि!
प्रत्येक पान उलटताना शिरीषच्या मनामध्ये अपार उत्सुकता होती.
शिरीषने पाचवे पान उलटले.
"सर्व व्याधी निवारणाम्"
यमराज गुडघ्यावर बसून वंदन करीत असलेल्या माणसाच्या हातात मृगाजिन, घट आणि घंटा देत आहेत, असे ते चित्र होते.
शिरीष बराच वेळ ते चित्र पाहत होता. त्याला मृगाजिन आणि घट सापडला होता. म्हणजे अजून घंटा सापडली नव्हती. शिरीष परत परत ते चित्र पाहत होता. खूप विचार केल्यावर त्याला आता त्या चित्राचा अर्थ समजू लागला होता. यमराजाला तो मनुष्य वंदन करत आहे, तो आडतेकर घराण्याचा मूळ पुरुष असून त्याने यमाला जिंकून घेतले होते. त्यानेच तपश्चर्या करून हे यमभाषेचे वरदान घेतले होते. त्यासाठी हि तीन साधने यमाने त्याला दिलेली होती.
शिरीषने पुन्हा ती पोथी मिटली. पुन्हा उघडली.
पहिल्या पानावरील यमराजाचे जिवंत वाटणारे चित्र त्याने परत पाहिले. अतिशय बारकाईने पाहताना त्याच्या लक्षात आले कि हेच चित्र त्याला मृगाजिनवर, विहिरीमध्ये आणि कोठीघरात दिसले होते. ती चित्रे जुनी झाल्यामुळे नीटशी दिसत नव्हती, पण आता शिरीषला ते समजत होते. म्हणजे ह्या सर्व गोष्टी त्याला एकत्र हव्या आहेत आणि अजून घंटा सापडली नाहीये.
आपण पुढचे पान उलटावे का नाही, शिरीष विचार करत होता. डोळे मिटून शिरीष तसाच बसून होता, त्याचे अंतर्मन विचाराच्या गर्तेत वहात होते.
मी तसाच पुढे गेलो तर...? काय हरकत आहे पुढे काय लिहिले आहे ते पाहायला..?
जर मी वाचायला सुरुवात केली आणि अर्धवट उपाय केले गेले तर....?
पूर्ण विचार करून शिरीषने पोथी बंद करून ठेवली. नमस्कार करून ती पोथी परत देवघरात ठेवली. जो वर घंटा सापडत नाही तोवर पोथीला हात लावायला नाही, हे त्याने पक्के ठरवले.
आठवडा गेला.
महादू आणि आशाही आता खूष दिसत होते. "घंटा नक्की सापडेल, उपाय पूर्ण होईल..." असेच ते नेहमी त्याला सांगत असे.
शिरीषने सगळीकडे घंटा शोधण्याचा खूप म्हणजे खूपच प्रयत्न केला. त्यामध्ये एकदोनदा त्याला लागलेही, हातावर भिंतीमधील दगड पडले, पायलाही ठेच लागली. खूपदा त्याची एकट्याची शक्ती कमी पडतीये असू वाटले.... पण तो प्रयत्न करत राहिला.
असाच एक दिवस सकाळपासून वरच्या काही खोल्या त्याने भिंती फोडून, जुनी कपाटे विस्कटून पाहिल्या. थकला तेव्हा भुकेची जाणीव झाली. जेवण करून घंटा शोधावी, असा ठरवून शिरीष स्वयंपाकघरामध्ये आला. त्याने नव्याने मांडलेल्या चुलीवर भात केला होता, भाजी केली होती. ती वाढून घेऊन तो बसून जेवू लागला. पूर्वी असलेल्या चुलीकडे त्याचे तोंड होते आणि तो विचार करत होता, तोच त्याला चुलीच्या मागच्या बाजूला अर्धवट असलेले 'ते' चित्र दिसले. शिरीषच्या हातातला घास हातातच राहिला. त्याचा विश्वासच बसेना. भराभर जेवण संपवत तो जुन्या चुलीचे निरीक्षण करू लागला.भिंत तर अतिशय साधी आणि लहान आहे, म्हणजे भिंत फोडून काही सापडेल असे वाटत नव्हते. आजूबाजूला तसे काही वाटतही नव्हते. नक्की कुठे कुदळ घालावी आणि काय पहावे ते कळत नव्हते.
अखेरीस शेवटचा विचार करून त्याने इतक्या वर्षाची जुनी चूल फोडायला सुरुवात केली. चूल पूर्वीच्या काळातील असून तेव्हा ती चांगलीच वापरात होती. खूप नंतर गॅस आले आणि चूल बंद पडली. आता जेव्हा शिरीष येथे आला तेव्हा गॅस वैगेरेच्या भानगडीमध्ये न पडता त्याने नंतरच्या काळात असलेली चूल पेटवून लाकडे वापरून स्वयंपाक सुरु केला होता. मुळात एकटाच असल्यामुळे थोडासा पदार्थामध्ये त्याचा दिवस-रात्र सहज जात असे.
चुलीच्या बाजूच्या तीन भिंती फोडल्यावर बरेच खोलवर गेल्यावर त्याला धातूवर कुदळ आपटल्याचा आवाज आला. हात,शरीर थकलेले असूनही त्याने पुन्हा खोलवर खणून हाताने सावकाश खड्डा मोठा केला. तेव्हा एक धातूची पेटी सापडली. वर लागलेली माती बराच वेळ कष्ट करून काढल्यावर, कुदळीचे घाव घालत ती पेटी त्याने उघडली. आत खूप मोठ्या आकाराची वजनाला जड पितळेची घंटा होती आणि त्यावर बरीच काही चित्रे होती, जशी घटावर होती. घंटा अजूनही चमकदार आणि स्वच्छ होती. घंटेच्या आतमध्ये असणारे लोलक नाजूक असले तरी जड होते. सध्या ते कापडाने असे बांधले होते कि त्याचा आवाज होणार नाही.
शिरीषने अतिशय उत्साहाने घंटा, घट आणि मृगाजिन एकत्र आणले. घट आणि घंटेवर बरीचशी चित्रे सारखीच होती. घंटेच्या लोलकावरील कापड काढून शिरीषने एकदोनदा ती घंटा वाजवली. त्याचा नाद अतिशय मंजुळ होता, डोळे बंद करून तो ऐकत रहावा असा होता. तो आवाज ऐकताना गुंगी आल्यासारखी वाटत होती. शिरीषला हा अनुभव नवीन होता. त्याने मुकाट्याने ती घंटा परत पेटित ठेऊन दिली.
आता शिरीष मृगाजिनवर बसला. डोळे मिटून घेतले. परत तोच अनुभव.... शिरीषला भान हरवल्यासारखे वाटले. स्वतःवरील ताबा सुटत आहे, असे वाटू लागले. शिरीष मृगाजिनवरून उठला.
आता त्याने घट हातात घेतला. एकदा त्याला वाटले कि पाणी भरून ह्या घटामधून पाणी प्यायले तर.....?? पण मग त्याने तो विचार झटकून दिला आणि घट खाली ठेवला. उगाच परीक्षा नको. आधी नीट सगळे वाचूयात आणि मगच त्यात जसे लिहिले आहे, तसे करूयात.
आता आज शेवटची रात्र. जे मी गेले दीड वर्ष शोधत आहे, ज्याने माझ्या सुखी आयुष्यात प्रचंड उलथापालथ केली आहे, मला आयुष्यभर माझ्या जन्मदात्यांपासून लांब ठेवले, माझ्या वंशाला, पिढ्यांना ज्याचा त्रास भोगावा लागला... त्याचे निराकरण मी करणार, त्याचा उपाय मला सापडला आहे.
शिरीषला सारखे असे वाटत होते कि कधी एकदाची हि काळरात्र संपेल आणि मी परत पुढचे वाचायला सुरुवात करेन.