"यमाची भाषा" : भाग ७ (शेवटचा भाग)
सौ. आरती अत्रे-कुलकर्णी
सकाळ होताच शिरीषने नेहमीची कामे, देवाची पूजा उरकली. देवळात जाऊन शंकराच्या पिंडीला अभिषेक केला. "शंभो हर हर. . . . " मोठ्याने त्याचा आवाज देवळात घुमला आणि शिरीषला आतून मोकळे वाटू लागले, अंगावर रोमांच उभे राहिले. महादुकाकांचे आशीर्वाद घेतले, आशाला दिलासा दिला. मृगाजिन, पाण्याने भरलेला घट, घंटा सगळे त्याने त्याच्या आजूबाजूला ठेवले होते. पोथीला नमस्कार करून शिरीषने पोथी उघडली.
पुढच्या पानावर वंशवेलीचे चित्र होते.
ते पुढचे सात-आठ पान तसेच वाढत जाणारे होते. प्रत्येक पिढीमध्ये पुरुषाच्या पुढे रेड्यावर बसलेल्या यमाचे काळ्या रंगातले चित्र होते. याचा अर्थ हि यमाची भाषा इतक्या पिढ्यामध्ये बोलली गेली होती. कितीतरी क्लिष्ट नावे होती. खंड, काळ, युग... ह्यामध्ये भाषा कशी बदलत गेली हे शिरीष वाचत होता. शिरीष थरथरत्या हाताने एकेक पान उलटत होता, मध्येच केव्हातरी त्यांचे आडनाव बदलून 'आडतेकर' लावले गेले होते.
उलटत उलटत एका पानाजवळ शिरीष थांबला. त्या पानावर अर्ध्यातच वंशवेल थांबलेला होता आणि शेवटचे नाव होते 'शिरीष आडतेकर'. तिथेही यमाचे चित्र होतेच, पण वंशवेल पुढे वाढला नव्हता. पूर्णविरामाने तो वंशवेल संपला होता.
याचा अर्थ काय. . . मला मुलबाळ न होता हा वंश इथेच संपणार आहे का?
का आम्हाला मिळालेली वरदानाची यमाची भाषा इथे संपणार आहे?
आम्हाला वरदान म्हणून मिळालेली हि भाषा मी अशी इथे नष्ट करणार आहे, हे योग्य आहे का? किती खडतर तपश्चर्या केलेली असणार, तेव्हा कुठे साक्षात यमराज प्रसन्न झाले असतील आणि मी. . . मला नकोय, असे सहज म्हणून ती माझ्या वंशातून झिडकारून देणार का? शिरीषचा त्याच्या अंतर्मनाशी संवांद चालू होता. आपण करतोय ते योग्य कि अयोग्य. . . काहीच कळत नव्हते.
शिरीषने डोळे मिटले आणि आशाची प्रतिमा त्याच्या मनात साकारली. किती आशेने, ओढीने ती बाळाची वाट पाहत आहे, किती स्वप्ने पाहत आहे, किती निर्मल, कोमल आहे तिचे मन. . . . आणि मी गेली काही दिवस,महिने,वर्षे जे भोगले, माणसांच्या विखारी नजरेला सामोरे गेलो. . . . या सगळ्यातुनच आता मला सुटका हवी आहे. हि भाषा हि कदाचित त्या काळी भूषण असेल, वरदान असेल पण आता मला ती नकोय, मी हे वरदान कायमचे परत करणार आहे आणि माझ्यापासून माझ्या पुढच्या पिढीला ते नकोय, हेच सांगणार आहे. शिरीषचा विचार पक्का झाला आणि त्याला आजोबांचा हात डोक्यावर आहे, ह्याची पुन्हा अनुभूती आली.
शिरीषने सगळे वाचले. नमस्कार करून पान उलटले.
पुढच्या पानावर यमराजाच्या जन्माची कथा लिहिलेली असून, सूर्यदेव आणि देवी संज्ञा ह्याचे चित्र होते.
यमराज हा विश्वकर्माची मुलगी संज्ञा आणि सूर्यदेव यांचा मुलगा असून, यमुना हि त्याची जुळी बहीण आहे. सूर्याचे प्रखर आणि तेजस्वीही रूप पाहून देवी संज्ञा घाबरली आणि भयाने तिने डोळे बंद करून घेतले, ते पाहून सूर्यदेव अतिशय चिडले आणि त्यांनी तिला शाप दिला. "तू जसे मला पाहून घाबरलीस तसेच तुझ्या होणाऱ्या पुत्राला पाहून सर्व लोक घाबरतील. "
यमराजाचे रूप महाभयंकर आहे. डोक्यावर सिंहाच्या तोंडाचा भयंकर उग्र असा मुकुट चढवलेला आहे. विशाल उंची आणि लांब अश्या मिश्या असून , हातात गदा आणि पाश आहे. वाहन काळ्या रंगाचा रेडा असून निवासस्थान यमलोक आहे. कबुतर आणि कावळा हे दोन पक्षी यमराजाचे संदेशवाहक म्हणून ओळखले जातात. यमराज दक्षिण दिशेचा द्वारपाल आहे. पाप आणि पुण्य यांचा हिशोब करून निर्णायक फळ देण्याचे काम यमराजावर सोपवण्यात आलेले आहे.
यमदीपदानाच्या दिवशी यमदीपदान केल्यास यमराज अकारण त्रास देत नाही, असे मानले जाते.
शिरीषने सगळे वाचले. नमस्कार करून पान उलटले.
पुढील पानावर १४ चित्रे असून त्याचे विस्तृतपणे वर्णन केले होते.
यमदेवाचे एकूण १४ अवतार/रूपे मानले गेले आहेत - यम, धर्मराज, मृत्यू, अन्तक, वैवस्वत, काल, सर्वभूतक्षय, औदुंबर, दध्न, नील, परमेष्ठी, वृकोदर, चित्र आणि चित्रगुप्त.
चित्रगुप्ताच्या नोंदवहीस 'अग्रसन्धानी' म्हणले जाते. ज्यामध्ये प्रत्येक जीवाच्या चांगला वाईट कर्मांचा हिशोब असतो.
शिरीषने सगळे वाचले. नमस्कार करून पान उलटले.
त्याच्या पुढील पानावर यमदेवाच्या मंदिराविषयी माहिती होती.
शिरीषने आजपर्यंत हि माहिती कधीही आणि कुठेही पाहिलेली किंवा ऐकलेली नव्हती. एक मोठा नकाशा काढलेला असून जिथे मंदिर आहे तिथे मंदिराचे लहानसे चित्र होते. यमदेवाची ह्या पृथ्वीवर एकूण सात मंदिरे आहेत, असा नकाशा सांगता होता. हा नकाशा अतिशय जुना असून आताच्या जागांप्रमाणे त्याचा अर्थ लागणे शक्यच नव्हते. शिरीषने अजून माहिती घेतली असता त्याला पुढीलप्रमाणे माहिती मिळाली.
१) भरमौर येथील यम मंदिर : यमराजाचे हे मंदिर हिमाचलच्या चंबा जिल्ह्यात भरमौर नावाने स्थित आहे, जे एक भवनाप्रमाणे आहे. असे म्हणतात की येथे विधाता लिहितो, चित्रगुप्त वाचतो, यमदूत पकडून आणतात आणि यमराज दंड देतात. मान्यता अशी आहे की येथेच व्यक्तीच्या कर्मांचा हिशोब होतो. यमराजाचे नाव धर्मराज म्हणून पडले कारण धर्मानुसार त्यांना जीवांना दंड देण्याचे कार्य मिळालेले होते.
हे मंदिर एका घरासारखे दिसते जेथे एक रिकामी खोली आहे ज्यात यमराज आपले मुंशी चित्रगुप्तासोबत विराजमान आहे. या कक्षाला चित्रगुप्त कक्ष म्हटले जाते. चित्रगुप्त यमराजाचे सचिव आहे जे जीवात्माच्या चांगल्या वाईट कर्मांचा हिशोब ठेवतात.
मान्यतेनुसार जेव्हा कुठल्या प्राणीचा मृत्यू होतो तेव्हा यमराजाचे दूत त्या व्यक्तीच्या आत्म्याला पकडून सर्वात आधी या मंदिरात चित्रगुप्तासमोर प्रस्तुत करतात. चित्रगुप्त जीवात्म्याला त्यांच्या कर्माचे पूर्ण वृत्तांत ऐकवतात. त्यानंतर चित्रगुप्तच्या समोरच्या खोलीत आत्म्याला घेऊन जातात. या खोलीला यमराजाची कचेरी म्हणतात. येथे यमराज कर्मानुसार आत्म्याला आपला निर्णय ऐकवते.
असे मानले जाते की या मंदिरात चार अदृश्य द्वार आहे जे स्वर्ण, रजत, तांबे आणि लोखंडाने बनलेले आहे. यमराजाचा निर्णय आल्यानंतर यमदूत आत्म्याला कर्मानुसार त्याच मार्गाने स्वर्ग किंवा नरकात घेऊन जातात. गरूड पुराणात पण यमराजच्या दरबारातील चार दिशांचे चार दारांचा उल्लेख करण्यात आला आहे.
२)यमदेवाचे दुसरे मंदिर :यमुना-धर्मराज मंदिर विश्राम घाट, मथुरा. हे मंदिर उत्तर प्रदेशातील मथुरेत यमुनेच्या काठावर विश्राम घाटाजवळ स्थित आहे. याला भाऊ-बहिणीचे मंदिर देखील म्हणतात कारण यमुना आणि यमराज सूर्याचे पुत्री आणि पुत्र होते. या मंदिरात यमुना आणि धर्मराजच्या मुर्त्या एकत्र लागलेल्या आहेत.
अशी पौराणिक मान्यता आहे की जो भाऊ, भाऊबीजेच्या दिवशी यमुनेत स्नान करून या मंदिराचे दर्शन करतो त्याला यमलोक जाण्यापासून मुक्ती मिळते. याची पुराणात एक कथापण आहे, जी बहीण भाऊबीज अर्थात यम द्वितीयेच्या दिवशी ऐकते.
३) यमदेवाचे तिसरे मंदिर : धर्मराज मंदिर, लक्ष्मण झुला हृषीकेश. उत्तर प्रदेशातील हृषीकेशामध्ये स्थित यमराजाचे हे मंदिर फारच जुने आहे. येथे गर्भगृहात यमराजाची स्थापित मूर्ती लिहिण्याच्या मुद्रेत विराजित आहे आणि याच्या जवळपास इतर मुर्त्या यमदूताच्या मानल्या जातात. पण यमराजच्या डावीकडे एक मूर्ती स्थापित आहे, जी चित्रगुप्ताची मूर्ती आहे.
४) यमदेवाचे चवथे मंदिर : श्रीऐमा धर्मराज मंदिर. हे मंदिर तमिळनाडुच्या तंजावूर जिल्ह्यात स्थित आहे. या मंदिराबद्दल मान्यता अशी आहे की हे हजारो वर्ष जुने मंदिर आहे.
५) यमदेवाचे पाचवे मंदिर : वाराणसीचे धर्मराज मंदिर. काशीत यमराजाशी निगडित पूर्वी कधीही न ऐकलेली मूर्ती आहे. मीर घाटावर उपस्थित आहे अनादिकालचे धर्मेश्वर महादेव मंदिर जेथे धर्मराज यमराजाने महादेवाची आराधना केली होती. मान्यता अशी आहे की यमाला यमराजाची उपाधी येथेच मिळाली होती. धर्मराज युधिष्ठिराने अज्ञातवासादरम्यान येथे धर्मेश्वर महादेवाची पूजा केली होती. मंदिराचा इतिहास पृथ्वीवर गंगा अवतरणाच्या आधीचा आहे, जो काशी खंडात वर्णित आहे.
६) यमदेवाचे सहावे मंदिर : थिरुप्पाईन्जीली यम धर्मराज स्वामी मंदिर. हे मंदिर तमिळनाडुच्या थिरुप्पाईन्जीली मनछानाल्लूर, त्रिचीत स्थित आहे.
७) यमदेवाचे सातवे मंदिर : श्रीचित्रगुप्त आणि यमराज मंदिर कोयम्बटूर : यमराजाचे हे मंदिर तमिळनाडुच्या कोयम्बटूरच्या वेल्लालूर मेन रोडवर सिंगानल्लुरमध्ये स्थित आहे. येथे एक फारच सुंदर सरोवर/झील आहे.
शिरीषने सगळे वाचले. नमस्कार करून पान उलटले.
पुढील पानावर तिथी, नक्षत्र आणि ग्रहदशा दिलेली होती. खाली त्याचा अर्थ लिहिलेला होता. त्या तिथीला पुढील ग्रहदशा आणि नक्षत्र असता हा विधी केला पाहिजे, असे सांगितले होते.
शिरीषने पंचांग उघडले आणि तो दिवस शोधायला सुरुवात केली. अजून तीन आठवड्याने तसा दिवस येत होता. सगळे योग जुळून येत होते. त्या दिवशी सकाळी ओलेत्या अंगाने म्हणायचे मंत्र, विधी आणि पूजेची माहिती सांगितली होती. बेलाची १००१ पाने हवी होती पूजेला आणि घट भरून गायीचे दूध. त्याआधी शिरीषने सात दिवस काहीही न खाता पिता करावयाचा जप सांगितला होता.
शिरीषने ते सगळे समजावून घेतले. ज्या मूळ पुरुषाने तपश्चर्या केली होती तसाच काही विधी शिरीषला परत करावा लागणार होता, पण कमी प्रमाणात. तो विधी करताना जमिनीवर झोपावे, निर्जल उपास करावा, संसारसुखापासून दूर राहावे असेही सांगितले होते.
योग्य दिवस येताच महादुकाकांचा आशीर्वाद घेऊन शिरीषने त्याची साधना सुरु केली. अवघड असले तरी मनाचा निग्रह जास्त होता, म्हणून जमत गेले.
शेवटच्या दिवशी सूर्योदयाला दक्षिण दिशेला तोंड करून ओलेत्याने शंकराच्या पिंडीसमोर बसून अखंड जप, मंत्रोच्चर होते. मृगाजिनवर बसून, भव्य-दिव्य पितळी घंटा वाजवत शिरीष उच्चरवात ते मंत्र म्हणत होता. मधून मधून आवर्तन पूर्ण होताच बेलाचे पान अर्पण करत होता. घटामधील दुधाचा अभिषेक करून थंडगार शंकराची पिंड परत परत हाताने धरत होता, डोके टेकवत होता.
शिरीष आता संमोहनाखाली होता, तो काय करत आहे, काय म्हणत आहे त्यालाही कळत नव्हते.
त्याच्याकडून दुसरेच कोणीतरी ते सारे करून घेत होते. ज्या शिवाची आराधना करून, मृत्यूचे भविष्य समजून घेण्याचे वरदान प्राप्त केले होते त्याच शिवाची आराधना करून ते वरदान परत दिले जात होते.
सर्वात शेवटी यमराजाला आहुती द्यायला सुरुवात झाली. यमराजाची एकेक नाव घेऊन त्याच्या नावाने शंकराच्या पिंडीवर बेलाचे पान आणि दूध यांचा अभिषेक सुरु झाला.
ॐ धर्मराज देवाय नमः
ॐ मृत्युदेव देवाय नमः
ॐ अन्तक देवाय नमः
ॐ वैवस्वत देवाय नमः
ॐ काल देवाय नमः
ॐ सर्वभूतक्षय देवाय नमः
ॐ औदुभ्बर देवाय नमः
ॐ दघ्न देवाय नमः
ॐ नील देवाय नमः
ॐ परमेष्ठी देवाय नमः
ॐ वृकोदर देवाय नमः
ॐ चित्र देवाय नमः
ॐ चित्रगुप्त देवाय नमः
हि सर्व यमराजाची नावे असून, ती नावे यमराजाने कर्माने मिळवलेली आहेत.
भगवान शंकराचे जो ध्यान करेल फक्त तोच यमराजाच्या कार्यात विघ्न आणू शकेल, असे म्हणून शिरीषने मोठया आवाजात यमगायत्रीमंत्राचे पुरुच्चरण केले.
"ॐ सूर्यपुत्राय विद्महे महाकालाय धीमहि तन्नो यमः प्रचोदयात्।"
शिरीषचा आवाज कितीतरी वेळ देवळात घुमत राहिला आणि अखेरीस मूर्च्छा तो येऊन खाली पडला.
शिरीष जेव्हा जागा झाला तेव्हा संध्याकाळ होत आली होती. शरीराने खंगलेला शिरीष कसाबसा उठून बसला. तो अजूनही मंदिरातच होता. कसेबसे स्वतःला सावरत तो आजूबाजूला पाहू लागला.
समोर पूजा मांडलेली होती. मृगाजिन, घट, पोथी आणि घंटा नाहीसे झाले होते. शंकराच्या पिंडीवर थेम्ब थेम्ब दुधाचा अभिषेक चालू होता. देवळातल्या जाळीच्या खिडकीतून मावळत्या सूर्याचा संधिप्रकाश पिंडीवर पडला होता.
थोडावेळ तशीच विश्रांती घेऊन भिंतीचा आधार घेऊन शिरीष बाहेर आला. परत एकदा मनोभावे नमस्कार करत लडखडत्या पावलांनी शिरीष वाड्याकडे चालू लागला.
आपल्यामधून काहीतरी कमी झालंय, रिक्त झालंय . . . हि भावना त्याच्या मनाला आनंद देत होती.
तळटीप - शिरीष आणि आशाने पुढे सुखाचा संसार केला. महादुकाका शेवटपर्यंत त्या दोघांबरोबरच राहिले. शिरीष आणि आशाला दोन सुंदर मुले झाली. वंशवेल वृद्धिंगत होत राहिला.
समाप्त