नकोसा! 9
वासुदेव पाटील.
खान्देशातील अक्षय तृतीया हा साडे तीन मुहुर्तापैंकी एक महत्वाचा मुहूर्त! मालखेड्यात आज घरोघरी आखाजीच्या घागरी भरल्या गेल्या व झाडावर झोके बांधले गेले. नवीनच लग्न झालेल्या माधवच्या हवेलीत आज एकदम उत्साह. अनुसयेची लग्नानंतर पहिलीच अक्षय तृतीया. वास्तविक तृतियेला मुलीला माहेराचे वेध लागतात पण सया प्रत्येक गोष्ट लग्नानंतर वेगळ्याच संदर्भात जगत होती. जिवनात काही लोकांच्या येण्यानं जुन्या त्याच गोष्टी, जुनेच संदर्भ वेगळेच होत जिवनात आनंद फुलवतात! लयलूट करावीशी वाटते. माधवच्या नवीन नात्यात सयालाही आपल्या सर्वस्वाची लयलूट करावी असंच वाटत होतं. दुपारी हवेलीजवळच्या चौकातील हिरवाईचं लेणं लपेटून डवरलेल्या लिंबाच्या झाडाला झोका बांधला गेला. आजुबाजूच्या घरात माहेरवासाला आलेल्या लेकी जमल्या. त्यात सया सारख्या राहिलेल्या सुना ही जमल्या. झोक्यावर गाणी सुरु झाली.
सयाला झोक्यावर बसवलं होतं त्याचवेळी राधाही त्या ठिकाणी आली. कुणीतरी सयासोबत बसलेल्या मुलीला उतरवत राधाला बसवलं. सयाला उतरावं वाटत असतांनाही जमलेल्या मुलींनी उतरुच दिलं नाही.तेवढ्यात हवेलीतून कुणीतरी नवं जोडपं म्हणून माधवला ओढून आणलं.
झोक्यावर सयासोबत राधीला पाहताच त्याची आग झाली. पण राधा खाली मान घालत मुकाट्यानं झोके खात होती. उभ्या माधवला सयास झोके देण्याचा आग्रह होऊ लागला. राधा तिरका कटाक्ष टाकत हा केव्हा झोका देईल ते पाहू लागली. माधवनं समोरच्या मुलींचा आग्रह म्हणून झोके देऊ लागला. जमलेल्या मुली सुना जोरजोरात हसत खिदळत सयाला गाणे म्हणायला व माधवला झोके द्यायला लावत होत्या.
" अथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खाय वं....
उच्चा आंबा ढग पातळा कैरी झोका खाय वं
कैरी तुटनी खडक फुटना झुळझुळ पाणी व्हाय वं
अथानी कैरी तथानी कैरी कैरी झोका खाय वं....
न्हाई धोई थडीवर उन्ही एवढा सिनगार काय वं
एवढा सिनगार करनी तठे कन्हेर गंमत पहाय वं...."
राधेला मात्र त्यावेळी आत वैशाखवणवा पेटला. आपण क्षुल्लक दिव्याला कवटाळण्यासाठी नभातला राकेचा चांद हरवला. ज्या चांदाची रजत प्रभा कोळून पिणाऱ्या सयेचा चेहरा लाजेनं फुलत चूरचूर होत होता. तो तो राधेचा वणवा भडकत होता.
माधव तेथून निघाला. सयाही माधव पाठोपाठ परतली. त्यांना जातांना पाहताच पहाटेचा झेंडू फुटण्याआधी चंद्रासोबत चांदणी क्षितीजात दडावी व शुक्र चांदणी भरकटत रहावी याची सल उलत भर दुपारी राधा भकासपणे हवेलीत परतली. पण तृतीयेला ही गोविंद हवेलीत नव्हता. मग क्षितीजाआड दडलेल्या चंद्र व चांदणीच्या मिलनकळा आठवत शुक्रचांदणी लाल लाल होत निस्तेज होऊ लागली.
" अहो रागावलात का? मला काय माहीत मी बसलेली असतांनाच ती येऊन जाईन व तुम्हीही येऊन जाल!"
मधा बोलणारी सया आताशी 'अहो' बोलायला लागली होती व ती 'अहो ' बोलली की माधवला आपणावर चंद्र मधाळ चांदणचुऱ्याचा वर्षाव करतोय असंच वाटे.
आताही त्याचा राग 'अहो' च्या मृण्मयी खोल मधुर नादानं भुर्र पळाला.
त्यानं सयास जवळ बसवत
" सया! खरं सांगू का?"
" सांगा ना"
"माझी एक हौस आहे. मस्तपैकी आभाळात बारीकशी चंद्रकोर उललेली असावी. नदीकाठी आपला मळा असावा! मळ्यात मोहोरानं डवरलेला आंबा असावा. त्या आंब्यावर एक झोका बांधावा . त्या झोक्यावर माझी सया बसलेली असावी व मी झोका देत रहावं. चंद्रकोर बुडावी ,रात्र चढावी पण तरी सया माधवाचा झुला झुलतच रहावा!"
" नदी काठी मळा आहे, मळ्यात आंब्याचं झांड आहे व आज तृतीयेची बारीक उललेली कोर ही राहीनच मग हा माधव कुणाची वाट पाहतोय? सया तर जन्मा जन्माची वाट पाहतेय! पण तुमच्या बनुमायला समजवा!" सया हसतच म्हणाली.
" माय व बाबाची परवानगी घेण्याचं काम माझं."
" मग जाऊ रात्री! पण एक विचारू का?"
माधव हसला " सया कसं असतं गं! मी नाही म्हटलं तरी तू विचारणारच! पण तरी तू 'एक विचारू का' विचारणार! या असल्या नाजूक साजूक गोष्टीतही किती अलवार प्रेम दडलेलं असतं ना! ज्या अलवार पाशास पोलादी घावही वेगळे करू शकत नाही!"
" जाऊ द्या मग! नाही विचारत!"
" अगं विचार ना! तु काहीतरी विचारावं ! ते विचारण्याआधी विचारण्याचं विचारावं! किती किती...!" तो गोड हसू लागला.
" माझंही तुमच्यासारखंच स्वप्न आहे. झोक्यावर बसावं व तुम्ही झोके द्यावेत.पण त्या स्वप्नातले झोके देणारे तुम्ही मुके नसावेत तर काही तरी गात झोके द्यावेत!" ती हसत म्हणाली व माधवनं खुशीतच " सया गाणं ही होईल!"
संध्याकाळी जेवण आटोपल्यावर सयानं आत्याला विचारलं.
"आत्या लग्नाच्या गडबडीत मळ्यात जाणंच झालं नाही. मळ्यात फिरावंस वाटतं हो! यांच्यासोबत गाडीवर जाऊ का?"
" सये तुला वेड लागलं का? सणासुदीचं रात्री बे रात्री फिरणं चांगलं नाही. त्यात मळा नदीपल्याड! नदीवर कोण कोण काय विधी करेल उद्या आखाजी पाड्याचं! नको बिलकुल नाही! हवंतर दोन दिवसानंतर खुशाल दिवसभर फिरुन ये!"
" बने, पोरांना जेवणानंतर फिरावं वाटतं तर फिरू दे ना गं! तु का आडकाठी करतेय!"
" अहो पोरं नादान पण तुम्ही तर शहाणे ना! सणासुदीचे दिवस तुम्हालाही नाही कळत का! पोरीचं हळदीचं ओलं अंग!"
" बने मनात कोणत्या भावना आहेत त्यावर भिती, भय, या भावनाचा अंमल सुरू होतो गं. लवकर येतील ते मळ्यात चक्कर टाकून ,जाऊ दे! " बाबांनी रजा दिली.
" मधा, मळ्यात उद्या दोर लागणार आहेत रे! तेवढे आताच जातांना सोबत ने!" बाबा जोरात बोलले.
मधाला आपले बाबा किती मनकवडे आहेत ! याचा मनात आनंद व अभिमान वाटला. छोट्या मोपेडवर दोघे साडे आठलाच ते मळ्यात पोहोचले.
मळ्याला लागून नदीकडच्या बांधाला जुनं भलंमोठं गोल रायवळ आंब्याचं झाड होतं. त्याच्या मोहोरास कैऱ्या लगडल्या होत्या. अंधारात वाऱ्यानं त्या झुलत असाव्यात! माधवनं दोर फांदीवर फेकत झोका बांधला.
" मधा, या वेळचं नदीवर फिरणं किती मस्त वाटतं ना!चल फिरू थोडं"
दोघे काठानं हळूहळू फिरू लागले.
आकाशात बारीक चंद्रकोर बुडण्याच्या तयारीत होती. सुसरीचं पात्र कोरडंठाक होतं. उन्हाळ उनाड वारा झकार सोडत वाहत होता. पश्चिमेकडून गावातून तृतीयेचे झोक्यावरील गाण्याचे सूर येत होते. मध्येच रानातील केळी, ऊसातील प्राण्याचे चित्रविचीत्र आवाज येत होते.
" मधा! कसं असतं रे! वास्तविक उन्हाळी रात्र सणासुदीचं या सुसरी काठावर फिरतांना किती भिती वाटायला हवी! कारण सुसरी काठानं किती तरी जळणारी प्रेतं, वाहणारी प्रेतं, दसवं, तर्पण, अर्पण पाहिलेली असतील. जळणाऱ्या वाहणाऱ्या प्रेताच्या अतृप्त लिप्सा, वावरत असतील! तरी आज एकदम प्रफुल्लीत का वाटतं रे!"
" सया! येतांना बाबा काय बोलले ऐकलं नाही का तू? आपल्या मनात कोणत्या भावना आहेत यावर भिती भय अवलंबून असतात. अन्यथा तोच नदीचा काठ! तो घनदाट छाया धारण केलेला एकाकी आंबा, दूर रानातून येणारा टिटवी- कोल्ह्याचा आवाज, सायं सायं सूं सूं करत वाहणारा उनाड वारा अंगाचा थरकाप उडवतो. पण आता त्या साऱ्यावर आपल्या मनातील उत्कट प्रेमाची भावना मात करतेय. म्हणून तर कोरड्या नदीच्या पात्रात आपणास चांदणचुरा सांडल्याचा भास होतोय! एकाकी आंबा मोहरत आपणास एकांत देऊ पाहतोय! त्यावर झुलणाऱ्या कैऱ्या आपणास झुलावयास बोलवत आहेत, टिटवीच्या आवाजात उत्कट आवेग दिसतोय! सया शेवटी मनाचे खेळ आहेत गं!"
" मधा, इतक्या रमणीय, एकांतात सन्यस्तागत, विरक्तीच्या गप्पा मारणारे आपल्यासारखे आणखी ही मूर्ख असतील का रे!"
आता मात्र मधानं हसतच तिला आंब्याच्या झाडाकडं आणलं. सया झोक्यावर बसली दुसऱ्या दोरीवर तिच्यासमोर तो बसला.
" मधा म्हण ना गाणं ! मला ऐकायचंय तुझं गाणं! झोक्याचं तर निमीत्त होतं! खरं तर तुझ्याशी मोकळं बोलता यावं व गाणं ऐकावं म्हणून आलेय मी!"
मधानं सयानं सांगितलेली दोन तीन गाणी म्हटली. सयानं आपल्या मोबाईल वर आॅडियो रेकाॅर्ड केली. तिच्या मनाजोगती रेकाॅर्डिंग होताच चंद्रकोर नभात क्षितीजाच्या सांदीत शिरली.
एका वाहिनीवर देशातील नवोदीत गायकांसाठी चार संगीत निर्देशकांनी एकत्र एक संगिताचा कार्यक्रम सुरू केला. त्यात प्रवेश त्यांनी तीन प्रकारे ठेवला. देशातील चार महानगरात आॅडीशन घेतल्या. ज्यांना आॅडीशन शक्य नसेल त्यांनी आपल्या आवाजातील आॅडियो व्हिडीओ क्लिप मागवत त्यातून काहीची निवड करणार होते. तर काही प्रवेश ज्या गायकांच्या गाण्यास यु ट्युबवर कायम जास्तीत जास्त लाईक्स मिळतात त्यांचीही निवड होणार होती. अशा तिन्ही प्रकारातून आलेल्या उमेदवारांचे पुढचे राऊंड होत त्यातूनन निवडलेल्या दोन स्पर्धकांना अनुक्रमे एक कोटी, पन्नास लाख बक्षीस तर होतेच पण मोठ्या बॅनरच्या चित्रपटात गायनाची संधीही मिळणार होती.
आठ दिवसांपूर्वी मालखेड्यात येत प्रविण मासोळकराने माधवला हे सारं सांगून पाहिलं होतं. पण माधवनं मनावर घेतलं नव्हतं. मग प्रविणने सयास विश्वासात घेतलं होतं. सयानं क्लिप्स प्रविणला पाठवून दिल्या.
सिमरन सारंगी व गोविंदचचंं हल्ली खूपच सख्य वाढलं होतं. सिमरन मध्ये अशी जादू होती की तिनं शारजाच्या सहलीच्या वेळी राधावरही मोहिनी घातली होती. पावसाळा तोंडावर आला असतांना सिमरन गोविंद सोबत चक्क मालखेड्यात आली. गोविंदनं तिला आपली तीस एकर शेती दाखवली. काळी कसदार थाळ्यागत शेती व या भागातील शेतीचे भाव ऐकताच आपण मालखेड्यात येऊन चूक केली नाही हे ओळखलं. तिनं आपल्या मालकास फोनवरुन सारं कळवलं. ते तीनही जण तोरणमाळ थंड हवेच्या ठिकाणी गेले. त्याचं ठिकाणी सिमरन ने गोविंदला आनंदाची बातमी कळवली. त्यानं मागे गुंतवलेली रक्कम अवघ्या पंधरा महिन्यात दामदुप्पट होऊन आली होती. त्यानं पंधरा लाख गुंतवले होते .त्यावेळेस त्यास अडीच वर्षात दाम दुप्पट होईल असं सांगण्यात आलं होतं.
" सिमरन मॅम, पंधरा महिन्यात दामदुप्पट कशी ?"विस्फारल्या डोळ्यांनी तो विचारता झाला.
" डाॅक्टरसाहेब! खोटं वाटत असेल तर पाच मिनीटात अकाऊंट चेक करा! अहो आखाती देशातील लोकांचा धंदाच तसा आहे!"
" पण मॅम, तुमच्या फायनान्स कंपनीस हे कसं परवडतं?" विवेक शाबूत असलेल्या सोबतीच्या राधेनं मध्येच विचारलं.
" मॅम, आमची फायनान्स कंपनी पाच भागीदार मिळून चालवली जाते. भारतातून पैसा उभारला जातो. तो आखाती देशात विविध खेळाची स्टेडियम्स, क्लब, हाॅटेल्स, तेलविहीरी यात अडकवला जातो. तिथल्या नफ्यावर दिड ते अडीच वर्षात गुंतवणूक दारांना दामदुप्पट परतावा मिळतो पण आमचे मालक आखाती देशात करोडो कमावतात."
राधाचा तरी विश्वास बसेना.
ते परतले. मालखेड्यातून निघतांना एकांतात सिमरन ने माशाला गळात अडकवण्यासाठी चारा लडिवाडपणे टाकलाच.
" डाॅक्टरसाहेब, ही एवढी शेती सांभाळून वर्षाकाठी किती कमावतात हो! त्यापेक्षा ही विका! एक दोन वर्षात करोडोत खेळाल!"
" मॅडम, तुमची साथ असली तर ते ही करू आम्ही!"
" आमची साथ आहे म्हणून तर सांगतेय. कंपनीचा पुढचा प्लॅन खूप मोठा आहे. भागीदार पाचही मालक आता भारतात वेळ घालवणार नाहीत.
ते आता इथल्या कारभारासाठी इथलेच लोक शोधत आहेत. इथलेच लोक मुंबई फर्म चालवतील. म्हणून शेत विकून तुम्ही मुंबईची फर्म घ्यावी अशी माझी मनापासून इच्छा आहे"
" अहो पण मला ती फर्म चालवता येणार नाही ना!"
" तुम्ही घ्या, मी सर्व मदत करेन! बघा लवकरात लवकर निर्णय घ्या"
सिमरन शिदोळचा चारा गळाला लावत निघून गेली. हवेलीत गोविंद पाऊस पडताच धुमाकूळ घालू लागला. दंगलरावांनी संतापानं थयथयाट करत शेत विकण्यास नकार दिला. पण दंगलरावाच्या मतास गोविंद भिक घालणार नव्हता. त्यानं आईस आपल्या अकाऊंटवर पंधराचे तीस लाख कसे जमा झाले ते दाखवताच सुंदरबाईचे डोळे फिरले व त्यांनी थोडी जमीन विकण्यास परवानगी दिली. राधानं मात्र त्यास यात काही तरी काळंबेरं आहे. मिळाले तर चांगलंच आहे. आलेले पैसे चांगल्या ठिकाणी गुंतवा. विधी तज्ञाचा सल्ला घ्या. त्या शिवाय शेती विकूच नका.
आई तयार असल्यावर भर पावसात त्यानं आईच्या नावावरची पाच एकर जमीन विकायला काढली. दंगलराव रडतच आबांना घेत बाबांकडे आला. बाबांना वाईट वाटलं. जरी आपणास दिली नाही तरी आज आपण सुखी आहोत व जमीन गोविंदकडं का असेना पण हवेलीत आहे याचं त्यांना बोचरं का असेना पण समाधान होतं. आता शेत विकलं जाणार याचं वाईट वाटलं पण त्यांना गोविंद व सुंदर ऐकणार नाही ही जाणीव असल्यानं दंगलला नाईलाजानं परत पाठवलं.
" बाबा, कमीत कमी विकलं जाणारं शेत माधवला तरी घ्यायला सांगा!"
" दंगल गोविंदनं द्यायला तर हवी!"
गोविंद नं तालुक्यातील एका व्यापाऱ्यास सुंदरबाईच्या नावावरील पाच एकर परस्पर पंच्याहत्तर लाखास विकली. त्यात जवळचे पंचवीस लाख टाकत तो मुंबई कडं निघाला. गळास लागलेल्या माशाला सिमरन ने अलगद ओढलं.
"डाॅक्टर साहेब मोठं व्हायचं असेल तर मोठं स्वप्न पहायला शिका! असं काठाकाठानं पोहण्यापेक्षा थेट प्रवाहात उडी मारायला शिका!"
" मॅडम ! तुमच्या साथीनं ते ही करु!".
" आणि हो एक आणखी! यापुढे मॅडम बोलायचं नाही,सरळ सिमरन म्हणा!"
गोविंद या बोलांनी राधेचा सल्ला विसरला.
मुंबईच्या फर्मची कार्यालयाची जागा चार लोकांच्या नावेवर करण्यात आली. दुसरे तीन मासे गोविंदसारखेच अडकवलेले. आता हेच चार लोक कार्यालयात बसत गुंतवणूक करणाऱ्या लोकांकडून रक्कम घेत सिमरन कडं देत. सिमरन ती रक्कम आखाती देशात पाठवी.
पावसाळा मध्यात आला. माधवनं दोन एकरात मिरची लावली. मागच्या वर्षी लावलेले ड्रॅगन फ्रुटच्या वेली आता खांबावरून ग़ोल चकतीतून तारेवर पसरल्या होत्या. व फळांनी लगडू लागल्या. यलो जातीच्या ड्रॅगन वेलीवर आठशे ग्रॅम ते एक किलो वजनाचं फळ नजरेत भरू लागलं. पावसाळ्याचे चार महिने माधवनं ड्रॅगनच्या शेतीवरच लक्ष दिलं. त्याच्या मळ्यातील ड्रॅगन आता मुंबई, बंगलोर, पुणे येथील माॅल व मार्केटला दोनशे अडिचशे रू. किलोनं विकली जाऊ लागली. पैशाचा स्त्रोत सुरू झाला. त्यातच सयानं पाठवलेल्या क्लिप्स ने कमाल केली. त्याचं सिलेक्शन झालं.
क्रमशः.........