रावी - भाग ::-- पहिला
फ्लॅटवर आल्या आल्या राव नं बेडवर ताणून देत झोपायची तयारी केली. आज जेवण बाहेरच घेतल्यानं परतायला उशीरच झाला होता. झोपण्या आधी त्याला दुपारच्या माॅमच्या काॅलची आठवण आली. इमेल चेक करायला लावत होती माॅम. पण त्यानं पडल्या पडल्या कंटाळा केला. पाहू सकाळीच.कारण हल्ली माॅम- डॅडचा सारखा एकच तगादा होता. त्यानं हल्ली त्यास तो विषय जरी निघाला तरी कसंनुसं होतं बैचेन होई. त्यानं आयफोन काढत कोट्याचे ते फोटो चाळत त्याला हवा असलेला फोटो पाहू लागला. काय असावं या पोरीत की आतापर्यंत वीस - पंचवीस मुली पाहूनही आपणास पसंत पडू नयेत. आता आता तर नकोच तो प्रोग्राम असं वाटायला लागलं.पाच सहा वर्षांपासून हा चेहरा नजरेसमोरून हटायला तयार नाही. म्हणून तो इमेल चेक करायचा कंटाळा करू लागला. माॅम डॅड नित्याचेच चार पाच बायोडाटा पाठवतात. तेच असेल.पण दुसरा ही काही इमेल असावा म्हणून त्यानं तांबारलेल्या डोळ्यांनी आळस झटकत बेडवर लॅपटाॅप घेतला. दोन तीन आर्थिक देवघेवीचे इमेल होते. नी त्यानंतरचा इमेल ओपण केला. बायोडाटाच होता तो. रावी.... कुठलं तरी खानदेशातील गाव जळगाव जिल्ह्यातलं. त्यानं बाकी मजकूर सरळ स्क्रोल करत खाली आला.फोटो पाहताच तो झटका लागल्यागत सरळ बसत हबकला. तांबारलेले डोळे ताणून ताणून पाहू लागला. त्याचा विश्वासच बसेना. दोन तीन वेळा फोटो पाहून झाल्यावर त्यान आयफोन मधील तो जुना फोटो ही जुळवून पाहीला आता त्याची पक्की खात्री झाली. त्यानं आता बायोडाटा पुन्हा पुन्हा तपशील वार वाचायला सुरुवात केली. 'रावी मारूतराव घाणेकर' मु. कानोली. जि. जळगाव तो पुन्हा पुन्हा नाव घोटू लागला. त्यानं परमेश्वराला मनोमन हात जोडले. अलक्षा! अजब तुझी लिला! जिची पाच सहा वर्षांपासून मला मृगतृष्णा होती तीच तू पारड्यात टाकतोय. त्यानं आनंदानं घड्याळातील वेळ न पाहता माॅमला काॅल केला.
" माॅम, येतोय मी उद्या! पाहीला बायोडाटा! ठिक वाटतोय! कुणी पाठवला हा बायोडाटा?"
" राव! काय सांगतोय! आवडले तुला फोटो? अरे सोनकुसरे अंकल आहेत ना जळगाव जिल्ह्यात; त्यांच्या परिचयातले आहेत मुलीचे वडील.त्यांनीच पाठवलाय बायोडाटा!" माॅमनं राव ला मुलीचे फोटो पसंत म्हटल्यावर आनंदानं सांगितलं.
" माॅम बराय! बाकी आल्यावर बोलतो!"
" अरे ऐक ना, त्यांना निरोप देऊ ना?"
" मी येतोय उद्या, बाकी काय करायचं ते तू ठरव" राव नं काॅल कट केला.
राव दुसऱ्या दिवशी सकाळीच मुंबई वरून खोपोलीला निघाला. गाडी पनवेल रस्त्याला लागताच प्रवासात त्याला त्या मुलीचेच विचार मधमाशांसारखे भुणभुणत पिंगा घालू लागले. त्यानं परत फोटो पाहत तो तिच्या विश्वात रममाण झाला.
कोट्याला बारावीचे क्लास संपले. निकाल लागताच आठ दहा महाराष्ट्रातले मित्र फ्लॅट सोडण्यासाठी व एल. सी. घेण्यासाठी कोट्याला जमले. एक दोन दिवस आजुबाजुला फिरले. येतांना फ्लॅट व क्लासच्या आठवणी म्हणून जो तो गृप फोटो काढू लागला. कोण विदर्भातला, कोण कोकणातला, कोण पश्र्चिम महाराष्ट्रातला.नी आता कोण कुठं जाणार माहीत नाही. म्हणून एकमेकांना भेटत सारे आनंद दु:खाच्या संमिश्र भावनेत न्हावू लागले. क्लासच्या खालच्या आवारात फोटोसेशन सुरू असतांना मध्येच नविन अॅडमिशन झालेल्यांची ये जा सुरु होती. त्यांना थांबवत, अडवत यांचा धांगड धिंगा चालू होता. जागा ,बदलवत फोटो शूट होत होते. राव मधोमध खाली बसला नी पोझ देत फोटो शूट होणार तोच एक मुलगी मध्ये टपकली. सारे अटेंशन, सेकंदाचा काही हिस्साच बाकी तोच अनाहूत मध्ये ही कोण आडवी आली म्हणून राव नं तिचा हात पकडत तिला मागे खेचणार तोच व तिनं ही आपला हात कुणी धरला म्हणून मागं पाहणार तोच मोबाईलचे फ्लॅश कचाकच चमकले. राव सारं विसरत तिच्याकडंच भान हरपत पाहू लागला तर तिनं ही काही क्षण गोंधळत त्याच्यावर नजर स्थीर केली नी त्याचवेळी क्लिक झालं असावं. क्षण काही क्षणच. तोच मागून ' हे राव सोड तिला! घरी नेतोस का!' हळू आवाजत कंमेंट आली व हास्याचा फवारा.नंतर तिनंही जोरात हात झिडकारत रागानं पाहत बडबडत निघून गेली. नंतर प्रवासात तेच फोटो पाहत दाखवत मित्र रावला चिडवू लागली. त्यावेळेस त्या गोष्टीचं त्याला काहीच वाटलं नाही.पण नंतर निवांतात ज्यावेळेस त्यानं सारे फोटो पाहिले तर त्याचं मन पुन्हा पुन्हा बावरत त्या दोन तीन फोटोवरच स्थिरावू लागलं. त्याला ते फोटो पाहण्याचं वेडचं लागलं. फोटो अचानक शूट झाला होता व ती ही अपघातानंच आली होती. पण पाहणाऱ्यास तो मोठ्या खुबीनं अदा टिपली असावी असंच वाटे.
पुण्यात सिव्हीलला अॅडमिशन घेतलं. चार वर्षे भराभर जाऊ लागली तरी निवांत क्षणी तो फोटो पाहिला की काळ तिथंच थांबलाय व ती तिथेच थांबली असावी व आपणास बोलवतेय असाच राव ला भास होई व तो मनातून बावरे. इंजिनीअरिंग झालं. सुट्यानंतर तो काॅलेजला कामानिमित्त आला होता. ऑफिसात थांबला असतांनाच बाजुच्या खिडकीतनं त्याचं समोर लक्ष गेलं नी तो एकदम बावचळला. समोरून तीच ... तीच मुलगी येतांना दिसली. चार वर्षात बराच बदल पण चेहरा तोच! ही इथं?त्याची चूळबुळ वाढली. समोर क्लर्क आवरेना. त्यानं 'मी आलोच' सांगत झपाट्यानं आॅफीस सोडलं. पण तो पावेतो ती कदाचित वर्गात घुसली असावी. पण मागच्या वर्षी तर नव्हती काॅलेजला मग? का आताच नविन ....? त्याला समजेना. तो वेड्यागत फिरू लागला. क्लास व्हरांडा आवार ,लॅब, सारं सारं धुंडाळलं. पण व्यर्थ. अचानक गायब झाल्यागतच. त्यानं दोनेक तास चप्पाचप्पा धुंडाळला पण नाहीच. तो हताश होत परतला. दुसरी भेट ही अशीच हुर हुर लावत...
मागच्या पावसाळ्यात गुडगाववरून इंटरव्ह्यू देत शर्मा व तो मुबंईला परतत होता. शर्माची आत्या भोपालला राहत होती. तो आलाय म्हणून समजताच आत्यानं त्याला भोपाळलाच उतरायला लावलं. एसीचं 2टीअर रिझर्व्हेशन असल्यानं तो का कू करू लागला. पण आग्रह झाल्यानं त्यानं गाडी सोडली. पुढे टि. सी. आल्यावर खाली शीट पाहून तो चौकशी करत निघून गेला. राव ला प्रवास दगदग यानं झोप लागली. एसी असुनही बाहेर धुवाधार पाऊस होत असावा याची मनात त्याला जाणीव होत होती. त्यातच कोट्याच्या त्या मुलीला आठवत तो झोपी गेला. धुंदीत इटारशी आल्याचं त्याला थोडी झोपेत गडबड वाटली. मध्यंतरी टि सी नं वेटींगवर असणाऱ्या कुण्या प्रवाशाला आणत समोरच्या शर्माच्या जागेवर बसवलं होतं. त्यानं कोण आलं याची उठून पाहण्याची ही तसदी घेतली नाही. तोंडावर पांघरत तो झोप घेऊ लागला. बाहेर पाऊस व जोरात गाडी यानं रात्र चढत होती. मध्यंतरी तो उठला. त्याचं समोर लक्ष गेलं. त्याचा डोळ्यावर विश्वास बसेना. त्यानं डोळे चोळले. आपण झोपतांना त्याच विचारानं झोपलो म्हणून भास होत असावेत असं त्याला वाटलं. पण नाही. समोरच्या शर्माच्या खाली झालेल्या शीटवर मघाशी टि.सी.नं आणलेलं वेटींगवर असलेलं पॅसेंजर तीच कोट्याची मुलगी होती , जी इटारसीहून चढली असावी व आता शांत पहुडलेली होती. तो उठून शीट व्यवस्थीत करत बसला. मंद प्रकाशात लटा तोंडावर भुरभुरत होत्या. जणू स्वप्नात काही तरी चांगलं घडलं असावं व त्यामुळं चेहऱ्यावर हास्य विलसत होतं. तो एकदम बावरल्यासारखा हरखून तिच्या त्या निद्राधीन मुद्रेकडं पाहू लागला. काय योग ! दोन वेळा भेट ही काही क्षणाचीच होती. पण पहिल्या भेटीतल्या फोटो हा कायम सोबत असल्यानं तो चार वर्ष हा चेहरा विसरलाच नव्हता. व मागच्या वेळीही काॅलेजात काही सेकंदच भेट. पण आता निवांत होतं. कुठलीच घाई नाही, गडबड नाही. तो चातकानं तृप्त होईपर्यंत पावसाचं पाणी वा चंद्रबिंब प्रासावं व त्याची तृष्णा न भागता ती वाढतच जावी तसंच. तो बेभान होत पाहत होता. किती स्टेशनं गेलीत, किती वेळ गेला याचा हिशोब ठेवायला कुणाला फुरसद.
तिची झोप चाळवली. ती उठली. समोर बसलेलं बावळट ध्यान आपल्यालाच पाहतंय यानं ती संतापली. बाहेर जाऊन आली व मुद्दाम मॅगजीन काढलं.
" माफ करा आपण ओळखलं नसावं पण आपण या आधीही दोन वेळा भेटलोय" राव अधिरतेनं म्हणाला.
रात्रीची वेळ म्हणून की काय तिनं ताठा न दाखवता " मला नाही वाटत.पण आपण सांगत आहात तर असेल ही!" तुटक बोलत मॅगजीनमध्ये नजर गढवली.
" बरोबर, आपणास नसेल माहीत पण हा फोटो बघा आपला पाच वर्षांपूर्वी चा! ही पहिली भेट! " राव मोबाईल पुढं सरकवू लागला.
हे मागेच लागलं काय लोचट दिसतोय .पण याला नकार देत थेट कसं उडवायचं! तिनं विचार करत कपाळावर आठ्या आणत मोबाईल कडं नजर फिरवली. तिनं स्वत:ला ओळखलं. पण तिला आठवेना.
" कोट्याला काढलाय तो क्लासला!" आठवतं का!"
बहुतेक आठवलं असावं तिला.
" दुसऱ्यांदा एम आय टी काॅलेजला आपण दिसल्या. बहुतेक आपलं लक्ष नसावं पण माझं होतं" आता तिला आठवलं. आपण सिमासोबत गेलो होतो. मागच्या वर्षी एम आय टी ला. त्यावेळेस असेल बहुतेक.
" असं का!" ती त्रोटकपणे उत्तरली.
नंतर ती हो ला हो करत त्याला टाळू लागली. पण राव ला इतक्या वर्षात आपण उराशी बाळगलेलं स्वप्न जवळ असल्यावर कोण आनंद झाला होता व तो तिच्या मनाचा विचार न करता. बोलतच होता.
" नाव काय आपलं? कुठं असता आपण?"
"नाव! नावात काय ठेवलंय! कळेल की!"
" बरं मोबाईल नंबर.....!"
" घ्या............" तिनं मोबाईल मध्ये पाहत नंबर दिला.
" रात्री करा. लगेच आततायी पणा नका करू!"
" मी रावसाहेब मिसाळकर! खोपोलीला असतो.इंजिनिअरींग झालंय!"
" असं का!
अभिनंदन
!"" आपण? म्हणजे नाव?"
" राव ! काय घाई एवढी! नंबर दिलाय ना! मग आताच सगळं विचारणार तर नंतर फोनवर काय बोलणार! ती खोडकर हासत बोलली.
" हो! हो!"
" बरं मला झोप येतेय ,झोपू का मी!" हे बिलंदर मागेच लागलं.मनातल्या मनात ती चडफडली.
तिनं झोपेचं सोंग घेतलं .राव प्रयत्न करूनही तिला पाहणं टाळू शकत नव्हता. अलगद पापणी उघडली की हा आपल्याकडंच पाहतोय यानं ती जास्तच डोळे गच्च मिटे. यातच तिला झपकी लागली. व तदनंतर तो ही झोपला. सकाळी सकाळी उठला तर समोरचं शीट खाली होतं. त्यानं उठत आजुबाजुला पाहिलं. चौकशी केल्यावर जळगाव मागे गेलं होतं व गाडी पाचोरा चाळीसगाव कडं निघाली होती. ती कुठं उतरली काहीच पत्ता नाही. तो आपला डोळा लागलाच कसा यानं स्वत:वरच चडफडू लागला. पण त्याला एक समाधानाची बाब होती.आता शोध संपला. कारण मोबाईल नंबर आहे. त्यानं तो नंबर काढला व डायल करणार तोच त्याला ' आततायीपणा करायचा नाही' आठवलं . पुढचा प्रवास केव्हा रात्र होते नी केव्हा काॅल करू या चटपुटीतच झाला. तरी त्याच्यकडून धीर निघेचना. दुपारी त्यानं नंबर डायल केलाच. पण नंबर बिझी येऊ लागला. मग त्यानं पुन्हा वेळ जाऊ दिला.दोन तीन वेळा ट्राय केल्यावर नंबर लागला. त्याची धडधड वाढली.
" हॅलो?"
माणसाचा आवाज येताच त्यानं क्षणात कट केला. बापरे घरचे कुणी असावेत. त्यानं काही वेळ नाद सोडला. घरी पोहोचला. फ्रेश होत मग पुन्हा तोच नंबर डायल केला.
" हॅलो, बोला नं चार वेळा काॅल झालाय! कोण बोलतंय? नी काय हवंय" समोर संताप वाढला होता.
" का...क्का ही नाही. आपण... क्को...ण कोण बोलताय?,"आता काही तरी बोलल्या शिवाय पर्यायच नव्हता म्हणून राव घाबऱ्या घुबऱ्या होत विचारू लागला.
" मी तहसीलदार सोनकुसरे बोलतोय! आपण कोण? नी काय हवंय आपणास?"
अरे आवाज ओळखीचा नी नाव पण..तात्काळ तो सावरला
" अंकल आपण ना! तेच मी दुपारपासून ट्राय करतोय .पण नंबर खात्री नव्हती म्हणून. काही नाही मी राव बोलतोय,मिसाळकर साहेबांचा! दुपारी जळगाव ला होतो. नी आपली आठवण आली म्हणून !" अचानक रावनं बाजू सावरली व जुळवाजुळव करत बेमालूम पणे ढापलं.
" अरे राव तू! मग ये ना घरी! दुपारी काॅल पाहिले तुझे पण नंबर सेव्ह नव्हता तुझा. नी नंतर तुझा आवाजच येत नव्हता! ये घरी!"
" नाही अंकल आता पोहोचलो घरी.येऊ नंतर कधीतरी."
" अरे काय म्हणता मिसाळकर साहेब? नी तुझं काय चाललंय?"
" व्यवस्थीत मजेत.नी माझं ही इंजिनिअरिंग झालंय आता तसा आहे जाॅब मुंबई ला.पण गुडगावला जायचंय व एकदोन वर्षांनी अनुभव घेत स्वत:च कन्स्ट्रक्शन फर्म उभारायचीय!"
" अरे व्वा चालू दे! छान .नी ये घरी परत आला इकडे तर!"
" हो नक्कीच" म्हणत त्यानं धडधडत्या छातीनं फोन ठेवला. 'बाप रे सुटलो!' म्हणत तो विचारात पडला. ती नंबर देत असतांना मोबाईल मध्ये पाहून देत होती.म्हणजे आपला पोपट बनवला. पण आपलं नशीब चांगलं की जो नंबर दिला ते ओळखीचे निघाले. याचा अर्थ ती जळगावच्या आसपासचीच असावी. पण आपणास जे वाटतं तसलं तिला वाटत नाही व वाटेल ही कसं. पण काही ही असो तीच पुन्हा पुन्हा आपणास का भेटतेय!
त्यानंतर तो तिला विसरण्याचा प्रयत्न करत कामात बुडाला. मध्यंतरी बरेच स्थळं आली. पण पाच वर्षांपासून मनात तीच कोरली असल्यानं त्याला कुणी पटलंच नाही. नी पुन्हा आज तिचंच स्थळ स्वत:हून चालून आलंय.
परमेश्वरा तुझे आभार.
दुसऱ्या दिवशी सकाळी माॅम डॅड व रावनं गाडीनं जळगाव गाठलं. सोनकुसरे काकाकडं मुक्काम केला व
सकाळी कनोलीला निघाले.
कनोलीमधील एक बडं प्रस्थ होतं मारूतराव घाणेकर. पन्नास साठ एकर बागाईत, टोलेजंग नुकतीच उठवलेली हवेली. फळबागाईत. कशालाच उणीव नाही. एकटी मुलगी. आई वारलेली. व मारूतरावांनाही आधीपासूनच एक साईड पॅरालाईज झालेली. मुलीचे मामा मामीच राहत सारा कारभार सांभाळत होते. सोनकुसरे काका गाडीत माहिती पुरवत होते. त्यांचा यांच्याशी घनिष्ठ संबंध. व काकांना आपण मागे जो फोन केला होता तेव्हापासून काकाच्या मनात हे स्थळ होतं.कारण डॅड ही मुळचे खानदेशातीलच. पण तिसेक वर्षांपासून संबंध तुटला. त्यातच मुलीच्या वडिलांनी लग्नाबाबत काकाकडे विषय काढताच काकांनी स्थळ दाखवलं व बायोडाटा रावकडं आला होता.
बोरी काठावर लवकरच पावसाला सुरुवात होणार होती. शेते सर्वत्र खालीच होती. वातावरणात उष्णता जाणवत होती. दहाच्या आसपास हवेलीवर पोहोचताच रावीच्या मामा मामाची मुलं साऱ्यांनी प्रेमानं स्वागत केलं. प्रवासाची विचारपूस झाली. मग कुठले नातेसंबंध, कोण कुठे या संदर्भात जुजबी ओळख झाली. सोनकुसरे काकांनी मिसाळकर हे प्रांत असुन खोपोली नाशीकला फ्लॅट व महाबळेश्वर कडं फार्म हाऊस आहे व राव हा ही इंजिनिअर आहे अशी सारी माहिती दिली. यांना भरपूर स्थळं आली .पण जुनं वतन इकडंच असल्यानं त्यांना इकडीच सोयरीक हवीय.. सांगत गप्पा झाल्या. नी तो क्षण आला.
रावी चापून चोपून साडी सांभाळत , डोक्यावर पदर घेऊन आली. तिच्याकडं पाहताच राव बेधुंद झाला. हेच हेच सौंदर्य, हीच हीच खुमारी आपणास खुणावत होती. म्हणून किती तरी घरंदाज, वेल एज्युकेटेड मुली पाहिल्या पण आता जी हुक बसतेय असली हुक बसतच नव्हती. पाण्याचा ग्लास घेतांना नजरेतलं वादळ पेलताना त्याचेच हात थरथरू लागले. मिसाळकरांनी एक दोन गोष्टी विचारल्या. नी मग सोनकुसरे काकांनी दोघांना एकमेकाची मते विचारण्यासाठी दोघांना सोबत जाण्यास अनुमती दिली. रावी पुढं , राव मागं वरती गच्चीवर निघाले.
" राव! रावच ना आपण! मागं रेल्वेत भेट झाली होती आपली!" रावीनं थेट सुरूवात केली.
" होय. नी आपण जो नंबर दिला होता त्याच सोनकुसरे काकांनी आपली चौथी भेट घडवली कायमची गाठ बांधण्यासाठी!" राव खोडकर हास्य ओठावर आणत रावीचं सौंदर्य न्याहाळत बोलला.
" राव ऐका ना! मला माहितीय माझ्यावर आपण भाळता व आज होकारच देणार!"
" शंकाच नाही!"
" राव! हात जोडते. प्लीज ज्या जिवाच्या ओढीनं आपण माझी वाट पाहताय त्याच्या कित्येक पट ओढ मला ही कुणाची तरी आहे! त्या ओढीची शपथ घेऊन सांगते.या जन्मी माफ करा. पण मला नाकारा!कारण त्याच्याशिवाय राहत मी आपणाशी तडजोडीचं आयुष्य नाही जगू शकत" रावी रडतच हात जोडत त्याच्या डोळ्याला डोळा लावत सांगू लागली.
रावाचे सारे भाव क्षणात झरझर बदलले. ओल्याचिंब आम्रतरूवर विजेचा प्रपात कोसळताच तो उभा जळावा तसाच.
" का? का माझ्यात काय उणीव आहे का?" त्याच्यातला उमडू पाहणारा ज्वालामुखी खदखदला.
" राव! कमी, उणीव माणुस केव्हा पाहतो; जेव्हा जवळ येतो तेव्हा. पण या मनात कुणाचं शिल्प आधीच कोरलं गेलंय तर आपल्यात लाख गुण असतील पण ...."
" .......मग आता?"
" हात जोडते. खाली गेल्यावर पसंत नसल्याचं सांगत मला नाकारा!" रावीच्या नयनात आसवांचा सागर उमळू पाहत होता.
" चार भेटी... तीन भेटीत किती विश्वास होता.... तुझ्या व त्या विधात्याच्या मनात काय आहे माहीत नाही, पण मी पाचव्या भेटीसाठी आयुष्य भर थांबेल... तू ये अथवा नाही..."
राव बोलला व डोळ्यात तरळले टपोरे थेंब बोटानं पुसत झरझर खाली आला. रावीला रेल्वेत भेटलेला व लोचट वाटलेला राव आता वेगळाच भासला. पण पण तो कसा आहे याचं तिला या घडीला सोयरसुतक नव्हतं. फक्त यानं खाली नकार दिला तर आपलं काम सोपं.
थोडा वेळ कसाबसा काढला. व कळवतो एवढंच राव नं सांगत निरोप घेतला. पण रावचं काही तरी बिनसलं हे त्याच्या आईनं मात्र ओळखलं. घरी जाताच सोनकुसरे काकांना त्यानं एवढं दूर ग्रामीण भागात खेड्यातली मुलगी पसंत नसल्याचं कारण दाखवत नकार दिला. पण माॅम नं त्यास विश्वासात घेतलंच.
' राव तू आधी दिलेला नकार आम्हाला पटला होता. पण आता? अरे आई आहे मी तुझी! सांग सगळं खरं.कारण ज्या हौशेनं तू मुबंईहून आलास ती पाहता सोनकुसरे काकांना सांगितलेलं कारण निखालस खोटं आहे".
राव आईच्या कुशीत शिरला व ढसाढसा रडला.
" आई , ज्या देवाचा झेंडा उचलावा तो देवच दुसऱ्याचा मांडलीक असल्यावर काय होणार!" त्यानं रावीचं दुसऱ्यावर प्रेम असल्याचं सांगत लगेच मुंबई ला प्रयाण केलं. त्या दिवसापासून त्याच्या जिवनातला अल्लडपणा, आततायीपणा, आनंद सारं गायब झालं व एका नविन रावाचा पुनर्जन्म झाला. पण आत आत खोल खोलवर तीच रावी गर्तेच्या खोल तळाशी तशीच राहिली.
रावीच्या मामानं रावीस नकार देण्याचं खरं कारण सांगण्यासाठी खडखड केली. कारण ग्रामीण भाग, खेडं हे बायोडाटातच नमुद असल्यावर पायरी वर येऊन नकार का?
मग मिसाळकर बाईंनी ही मुलांनं नाही सांगूनही त्याला स्पष्टच सुनावलं.
" मानकर आम्हाला विचारण्यापेक्षा इतका दम जर भाचीलाच दिला तर सारं कळेल आपणास. नाहीच कळालं तर मग विचारा सारी कारणं उघड केली जातील."
मामा वरमला. मग त्यांना सोनकुसरे साहेबांकडनं सारं समजताच त्यांनी व मुलांनी रावीस कोपऱ्यात घेत कधी नव्हे ती बेसुमार मारहाण केली. मारूतराव घाणेकर थरथरत रडत भिंतीवर डोकं आपटत आक्रोश करू लागले.
पण ...
पण...
रावीनं जिवनात पहिल्यांदाच जबर मार खाऊन ही भानूचं नाव घेतलंच नाही. व नंतर मग रावी व भानू नी ठरवत लवकरच...कनोली सोडलं...
कोण हा भानू? पहेलवान! वायरमन! गॅरेजवाला!
क्रमशः
वासुदेव पाटील.