-- रॉबर्ट द डॉल ----
लहानपणी बाहुल्या मला विशेष आवडायच्या नाहीत. त्यांचे टपोरे डोळे, लाल चुटुक ओठ त्यावर रेखलेली स्मितरेषा, अंगाच्या मानाने लांब केस, त्यांचे गुटगुटीत हातपाय मला विचित्र वाटत. बाहुल्यांनी खरंतर माणसांसारखे मानवी दिसणे अपेक्षित असते. तरीही त्या मानवी नाहीत; अमानवीच दिसतात.
झपाटलेला चित्रपटातला तात्या विंचू आठवतो? ओम फट् स्वाहः म्हणणारा? कोठारेंचा तो चित्रपट हॉलिवूडच्या 'चाइल्ड्स प्ले' चित्रपटावर बेतला आहे हे ही अनेकांना माहित असेल. कोणीतरी सहज भेट म्हणून दिलेला बाहुला. घरातल्या लहान मुलाकडे येतो. पण हा बाहुला साधासुधा नाही तर अमानवी असतो. बोलणारा, चालणारा आणि त्याचा हेतू चांगला नसतो आणि मग तो माणसांवर हल्ले करतो असं काहीसं चित्रपटांचं कथानक. हे चित्रपट सत्यकथेवर बेतलेले आहेत हे मात्र कितीजणांना माहित आहे? 'रॉबर्ट द डॉल' हा बाहुला अमेरिकेत प्रसिद्ध आहे....
ही सत्यकथा आहे अमेरिकेतल्या फ्लॉरिडा राज्यातली. 'की वेस्ट' हे अमेरिकेच्या आग्नेय दिशेच्या टोकावरचं गाव. फ्लॉरिडाचा महासागरात शिरणारा निमुळता भाग इथे संपतो. अमेरिकन भूमी विस्तीर्ण अटलांटिक महासागरात विलीन होते. १८९० च्या काळात या गावात ऑट्टो कुटुंब राहत होते. त्यांना ४ वर्षांचा मुलगा होता - रॉबर्ट युजीन ऑट्टो नाव त्याचं. घरात त्याला सर्व जीन म्हणत. एकदा जीनच्या आजोबांनी त्याच्यासाठी जर्मनीहून एक साडेतीन फुटी बाहुला आणला. हा बाहुला जवळपास ४ वर्षीय जीनच्याच उंचीचा असावा. त्याला नाविकाचा (सेलर) ड्रेस घातलेला होता. लवकरच जीनचा तो मित्र झाला. जीनने त्याला आपले पहिले नाव दिले आणि या बाहुल्याला सगळे रॉबर्ट म्हणू लागले.
असं म्हटलं जातं की ऑट्टो कुटुंबियांकडे कामाला एक मोलकरीण होती. तिच्यात आणि त्यांच्यात काही वाद झाले किंवा त्या जुन्या काळानुसार मालक म्हणून ते तिच्याशी बरे वागत नसावे. या मोलकरणीला काळी जादू (व्हुडू) येत होती आणि नोकरी सोडून जाताना रागाने ती या बाहुल्यावर मंत्र टाकून गेली. जीन बाहुल्याला आपला मित्र मानत असे. जेवताना, खाताना, झोपताना रॉबर्ट सतत जीन सोबत असे. कधीकधी जीनच्या खोलीतून बोलण्याचे आवाज येत, कधी कुजबुजल्याचे तर कधी खिदळल्याचे. जीन आपल्या मित्राशी रॉबर्टशी बोलत असे. दोघांपैकी एक आवाज जीनचा आहे हे कळत असे पण दुसरा आवाज कोणीतरी प्रौढ माणूस बोलल्यासारखा वाटे... कधी कधी अगदी हलक्या आवाजात बोलणे असे; वृद्ध माणूस बोलल्यासारखे. जीनच्या आईला वाटे की जीनच बाहुल्याशी खेळताना दोन आवाजात बोलतो आहे. स्वतःच्या आवाजात आणि हलक्या आवाजात.... पण तिला काही दिवसांनी शंका येऊ लागली की जीन खरंच का कोणा मोठ्या माणसासारखा बोलतो आहे. लहान मुलाला लीलया वेगळा आवाज काढणे शक्य आहे?
काही दिवसांनी जीनच्या स्वभावात आईला बदल दिसू लागला. बरेचदा तो वैतागलेला किंवा त्रासलेला दिसे. कारण विचारलं तर रॉबर्ट माझ्याशी भांडतो म्हणे. आईला तो लहान मुलांचा खेळ वाटे. तिने ते गांभीर्याने घेतलं नाही. एके दिवशी अचानक जीनची आई त्याच्या खोलीत गेली आणि आतल्या दृश्याने तिचा थरकाप उडाला. जीन एका कोपऱ्यात थरथरत बसला होता आणि रॉबर्ट बाहुला खुर्चीत बसून एकटक जीनकडे पाहत होता. काही दिवसांनी घरात काही विचित्र प्रकार घडू लागले. त्यापैकी बरेचसे जीनच्या खोलीत घडत. उदा. फर्निचरची उलथपालथ. काही गोष्टी इथून तिथे हलवलेल्या किंवा इतस्ततः पडलेल्या असत. जीनला विचारले असता तो सांगे "मी नाही केलं. हे रॉबर्टने केलं." अशाप्रकारे घरात घडणाऱ्या अनेक विचित्र गोष्टींचा ठपका जीन रॉबर्टवर लावू लागला. शेवटी आईने वैतागून रॉबर्टला छतावरच्या खोलीत एका पेटीत बंद केलं आणि घरातले सर्व हळूहळू रॉबर्ट बाहुल्याला विसरले.
त्यानंतर हळूहळू जीन मूळ पदावर आला. सर्वसामान्य मुलांसारखं वागू लागला. मोठा होऊन जीन एक प्रसिद्ध चित्रकार बनला. वेगळा राहू लागला, न्यूयॉर्क आणि पॅरिसला गेला. त्याचं लग्नही झालं. अशी बरीच वर्षे सर्व सुरळीत गेल्यावर जीनच्या वडिलांचा मृत्यू झाला. मृत्युनंतर वारशाने त्याला घर मिळालं आणि तो परत की वेस्टला आला. राहायला आल्यावर त्याला छतावरची ती खोली आपला ड्रॉइंग स्टुडिओ बनवायची कल्पना सुचली आणि त्या खोलीत प्रवेश केल्यावर एका पेटीत त्याला रॉबर्ट बाहुला सापडला. जुन्या आठवणी पुन्हा वर आल्या आणि जीन पुन्हा बाहुल्याशी बांधला गेला.
बाहुला आता सतत जीनसोबत दिसू लागला. जेवताना, झोपताना, बाहेर जाताना. जसं काही जीनचा ताबा रॉबर्टने घेतला होता. त्याच्या बायकोला अर्थातच हे आवडेनासं झालं. पण हळूहळू बायकोची मानसिक स्थिती ढळू लागली आणि प्रकृतीही. त्यातच तिचा मृत्यू झाला. त्यानंतरही बाहुला सतत जीनबरोबर असे आणि ते बोलण्याचे, बाहुला आपोआप जागेवरचा हलण्याचे प्रकार सुरुच होते. नंतर कधीतरी जीनही मरण पावला आणि त्यांचे रिकामे घर विकायला काढले गेले.
सुमारे १३ वर्षांनी घर विकले गेले पण रॉबर्टसकट. नव्या मालकांसोबतही त्या घरात रॉबर्टचा खेळ सुरुच असे. कोणीतरी जोरजोरात हसल्याचे, दरवाजे आपटल्याचे आवाज येत. कधीतरी कडी लागून माणसे खोलीत आपोआप अडकली जात. घर हस्ते परहस्ते अनेकदा विकले गेले पण अमेरिकेत सहसा घरे त्यातल्या फर्निचर सकट विकत असल्याने घरात रॉबर्टचा वास तसाच राहिला. १९७४ मध्ये ज्यांनी घर घेतले त्यांना लहान मुलगी होती आणि तीही रॉबर्टशी खेळू लागली. ही मुलगी आज पन्नाशीत आहे आणि तिला लहानपणीच्या सर्व आठवणी नसल्या तरी तो बाहुला आपल्याला जिवानीशी मारायला टपला होता हे आजही स्पष्ट आठवतं. एके दिवशी या मुलीचे आईवडील रात्री झोपले असताना त्यांना कुणाच्यातरी खदखदून हसल्याच्या आवाजाने जाग आली. पाहतात तर अंधारात रॉबर्ट बाहुला हातात सुरा घेऊन त्यांच्याकडे रोखून पाहत होता. त्यानंतर यांनी घाबरून तो बाहुला की वेस्टमधल्या म्युझियमला देऊन टाकला.
आजही हा ११० वर्षे जुना बाहुला की वेस्टमधल्या इस्ट मार्टेलो म्युझियममध्ये एका काचेच्या बंद पेटीत ठेवलेला आहे. त्याला भेटायला जी अनेक माणसे जातात त्यापैकी खूपजणांना तो त्या काचेच्या पेटीत हलल्याचा भास झाला आहे. काहींना त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलताना दिसतात. बरेचदा त्याचा फोटो घेताना लोक परवानगी घेतात कारण तसे न करणारे लोक अपघातात सापडले किंवा त्यांच्यावर काही संकट आल्याचे दाखले मिळतात. म्युझियममध्ये येऊन उद्धटपणे वागणाऱ्या लोकांवर रॉबर्टची वक्रदृष्टी पडते म्हणतात. म्युझियमला रॉबर्टची माफी मागणारी पत्रे अनेकदा येतात. खालच्या फोटोत ती दिसतील.