नकोसा..................! - 8
वा..........पा................
बाबा, रमणराव आबांना पाणी देत हसतच स्वागत करुन दिनानं बसावयास लावलं. राधेशाम व माधव ही एका कोपऱ्यात बसले.
अंकलेश्वरहून आलेल्या मुला सोबत त्याचे तीन काका, मेव्हणे आले होते.
त्यांची अंकलेश्वरला कपडाची मोठी दुकान होती. मुलगा दिसायला अतिशय सुंदर होता. पण मुलगा एकदम शांत बसत टकामका बघत होता.
माधव व बाबास आपण खूपच उशीर केला ही जाणीव झाली व मनात पश्चात्ताप वाटू लागला. सगळ्यांसमोर विषय काढणं ही योग्य नव्हतं. म्हणून थोडा वेळ शांत बसण्याशिवाय पर्याय नव्हता.
अनुराधा आंबेकलरची पैठणी साडी नेसून पदर घेत पाटावर बसली. तिची नजर गर्दीतही माधववर स्थिरावली.डोळ्यातला डोह एकदम जोरात ढवळून निघाला. माधवच्या काळीज कपारीत काही तरी उन्मळून पडल्याची वेदना उठली. कोणतीही गोष्ट आपल्याकडं असतांना तिची किंमत आपणास कळत नाही. पण तीच वस्तू दुरावतांना तिचं महत्व कळतं. तिचं अनमोलत्व कळू यावं पण तो पावेतो ती वस्तूच हातातून सुटत जावी. मनातल्या सांदीतलं आपलं माणूस परकं होणं इतकं वेदनादायी असतं हे त्यानं अनुभवलं होतं पण त्या अनुभवात फसवणुकीची झालर असल्यानं त्यावेळी वेदनेत द्वेष तिटकारा जास्त होता. पण यावेळंच आपलं माणूस मनाच्या सांदीतून निसटण्यास आपणच जबाबदार आहोत याची वेदना उर तोडत होती. झाड उन्मळतांना निझूर दिठीनं ,टाहोभरल्या काळजानं पाखरांची जोडी कलकलत होती.
काही फुटावर बसलेली सया त्याला आपल्यापासून अनंत योजन दूर दूर जातेय की काय अशी भिती दाटू लागली! काय ताकद असते समाजमान्य विवाह संस्थेत! त्या संस्थेच्या एकेका विधीत! आपल्या जवळच्या माणसास, नात्यास एका साध्या नारळानं दूर करते तर दूरच्या माणसास रक्ताच्या नात्यात आणते, जन्माची गाठ बांधून देत जीवात जीव मिळवते. माधवला तिथं बसणं असह्य होऊ लागलं. तो उठणार तोच त्याच्याच कडं नजर असलेल्या सयानं पदराआडूनच हलकीसी मान हलवत डबडबत्या डोळ्यानं नकार दर्शवला. तो तसाच खाली बसला.
" नाव काय तुझं?" मुलाचा मोठा काका विचारत होता. पण सयाचं लक्षच नव्हतं.
" अनुसया नाव सांग! पाहुणे काय विचारत आहेत!" दत्ताजीनं दरडावलं.
थरथरत सया भानावर आली.
" सया....! सया दिना....!".
" ठिक आहे. शिक्षण?"
" बारावी! .."
जाऊ द्या पोरीला आम्हाला मुलगी पसंत आहे. बाकीचं आपण बोलूच" मुलाच्या काकानं सयास जायला लावलं.त्यांनी दत्ताजीस कानात काहीतरी सांगितलं.
" दिना ,मी पाहुण्यांना आपल्या वाड्यावर नेतो. तु सयाला घेऊन ये. बाकी फुकटची गर्दी नको आणू.दत्ताजी रमणराव व बाबाकडं पाहत म्हणाला व पाहुण्यामागं निघाला. राधेशाम उठला व बाहेर उभा राहिला. तो पावेतो दत्ताजी बना सोबत पाहुणे डोलत डोलत घराबाहेर निघत गप्पा मारतहोते. एकदम टाईट कपडे चढवलेला मुलगा गाडीजवळ आला.
" पाहुणे आपलं गाव?" राधेशाम नं सहज चौकशी केली.
" ........"
" अहो मी काय म्हणतोय? आपण कुठले?"
मुलगा काहीच न बोलता गाडी चालकाला खुणावू लागला.
" अंकलेश्वर. मुलास बोलता येत नाही व ऐकूही येत नाही फक्त इशारा समजतो!" चालकानं स्पष्टीकरण दिलं नी राधेशाम चपापला. त्याला धक्काच बसला. घाईत त्यानं पुन्हा खात्री केली तो पावेतो पाहुणे आले व गाडी दत्ताजीकडं निघाली.
पाहुणे जाताच दिना बाबाकडं वळला. त्याला लगेच दत्ताजीकडं निघायचंच होतं.
" बाबा, आबा अचानक? कळवलं ही नाही?"
" दिना, तू तरी कुठं कळवलं रे सयाला मुलगा पहायला आलाय म्हणून?" बाबा बोललेच.
" बाबा ,पाहुण्यांचा निरोप होताच पण आज येणार हे फिक्स नव्हतं. पण तुम्ही काय काम काढलंत अचानक आज साऱ्याच जणांनी?"
बाबांनी ओळखलं याला आपल्या माधवला सया द्यायची नसावी. मग आता विषय काढून उपयोग नाही.
" अरे! महेश्वर, इंदौरला चाललो होतो फिरायला. तर तुला व सयालाही सोबत न्यायला आलो होतो.पण आता..?"
" बाबा ,नक्कीच आलो असतो पण तुम्हीच पाहत आहेत ,यांना सोडून कसं येता येईल?"
" बरं बाबा करं तू तुझं काम. आम्ही निघतो थोड्या वेळानं!"
" बाबा, शब्द तर टाका जे सांगायचं ते...." आबा बोलले.पण बाबांनी हात दाबत त्याला शांत बसवलं. सयाचं जुळतंय तर नको मध्ये खोडा .
" बाबा आज थांबा! सयाचं जुळतं की नाही ते पक्कं होताच उद्या निघा. हवं तर सयालाही घेऊन जा!"
दिना बोलला व दत्ताजीकडं निघू लागला. तो बाबा व आबाची रजा घेत घरात सयास घेण्यास निघाला.
राधेश्याम नं माधवच्या कानावर घातलं.राधेशाम व माधवनं सयाला घराच्या मागच्या बाजुला बोलवलं.
" सया ,आता कुठं चालली. दिना सोबत आधी दत्ताकाकाकडं जा मग जा नंतर कुठं जायचं ते!" सुंदरबाई तिला अडवत म्हणाली. उठणारी सया जागेवरच बसली. माधव व राधेशाम ताटकळत मागेच उभे राहिले.
" जबना, त्यांना मुलगी पटली तर तर ते तुझं घर बांधून देत लग्नासाठी खर्च देणार आहेत व सया लघडेल एवढं सोनं चढवणार आहेत!" सुंदरबाई माधव व बनुताईला ऐकू जाईल अशा आवाजात पोपटागत पढत होती.
सया उठलीच.सुंदरबाई हात धरणार तोच सयानं हात जोरात झटकला व ती निघाली. राधेशाम त्यांच्या सोबत निघाला.
" सया.........!"
".........." नुसता आवाज ऐकताच डोळ्यात साठवलेला लोट वेगानं धावला.
" सया....चाललीस?"
" बहुतेक ......" आर्त स्वर डबडबला.
" मुलगा सुंदर आहे गं? "
सया रडत असतांनाच आतून संतापली.
" मधा, मनात बांधलेले मनोरे ढासळले की पदरात काय नी कसं पडतंय हा चोखंदळपणा सोडत शहाण्यानं पदरात पडलं ते पवित्र मानत वाट धरावी! ढासळलेल्या मनोऱ्याच्या इमल्यावर बसुन काहीच हासील होत नाही "
" आणि त्याच इमल्यावर बसुन कोणी वाट पाहत असेल तर गं.....?"
सयानं डबडबलेले डोळे माधवच्या नजरेवर रोखले.
" काय म्हणायचंय तुला?"
" लग्न करायचं होतं तर एका शब्दानं बोलली नाहीस?"
" एवढं स्वातंत्र्य मुलींच्या जातींना नसतं रे! सयाला तरी नाही! आणि बोलली असती तरी काय फरक पडला असता?"
" अगं या माधव ने तुला मालखेड्यातून बाहेर निघूच दिलं नसतं!" आता माधवच्या डोळ्यात मोती टपकत होते.
" मग मालखेड्यातून वडिलांसोबत रडत बाहेर निघतांना का अडवलं नाही माकडतोंड्या!" ती आवेगातच रडत त्याला विचारू लागली.
" सया........,सया.......... आज आलो नसतो तर तु ही राधासारखीच....."
सयानं हे ऐकलं नी माधवला गच्च आवळत मिठी मारत हमसू लागली.
" माधव, किती यातना भोगल्या मालखेडा सोडतांना ते तुला नाही कळणार! भल्या माणसा फक्त ' थांब' हा एक शब्द बोलला असता तरी ही सया थांबण्यास आतूर होती. पण तू बोलला नाही व वडिलांना वाटलं बाबा व तुझी इच्छा नसावी म्हणून निघालो रे! आक्रंदणारं मन सुसरी उतरू देत नव्हतं. आपलं सगळं संपलं या वेदनेनं देहा मनाचीच होळी जळत होती!"
" बस्स सया! आता एक शब्द बोलू नको! आता काही ही झालं तरी तू कुठेच जाणार नाहीस! आयुष्यभरासाठी!"
" आणि ते आलेत त्यांचं काय रे?" सया आता खुलत विचारू लागली.
" राधेशाम,सांग हिला, त्या मुलाबाबत!" माधवनं खुणावलं. राधेश्याम नं जे सांगितलं ते ऐकताच सया पुन्हा माधवला बिलगली
.
.
दिनानं सया थांबलीय म्हणून तिला घेऊन येण्यास सांगत तो निघाला.
" दिनाजी राव आम्हास तुमची मुलगी पसंत आहे. दत्ताजीरावांनी तुमच्या मागण्या कळवल्या. आम्ही तुमचं घर उभारू. लग्न तर अंकलेश्वरलाच होईल पण तरी तुम्हाला कसलीच तोशीश पडू देणार नाहीत. राहिलं सोनं ,तर आमच्या प्रत्येक सुनेवर जेवढं सोनं आहे त्याही पेक्षा जास्त सोनं चढवू आम्ही!"
"........" दिना फक्त हात जोडत होकार देऊ लागला.
" तुमचा होकार असेल तर पुढच्या पंधरा दिवसात आम्ही मुहूर्त शोधतो. बोला काय म्हणताय?"
" आम्हास आपला प्रस्ताव मान्य आहे." दत्ताजीरावच परस्पर म्हणाले.
" पण मी काय म्हणतो ...एकवेळ मुलीस व घरच्यांना मी विचारतो व सांगतो ना मी!" दिना विनम्रपणे हात जोडत म्हणाला.
" दिना, आता काय राहिलं आणखी विचारायचं! जबनानं होकार दिलाय ! आजच साखरपुडा उरकवू!" दत्ताजीरावांना घाई झाली होती म्हणून ते दात ओठ एक करत गुरगुरले.
" दत्ताजीराव, थांबा! विचारू द्या त्यांना एकवेळ हवंतर पुन्हा!" मुलाचा काका बोलला.
दत्ता, वना व सुंदरबाई संतापले. कारण मध्येच माशी शिंकली तर? ते धोका घ्यायला तयार नव्हते.
दिना घरी परतला. त्याला एकवेळ बाबास व बनुताईला विचारावंसं वाटलं.सयास विचारावंसं वाटलं.
पण त्या सोबतच सुंदरबाई ही तणफणत जबनीकडं आली.
घरी परतलेल्या वडिलांना सयानं बाबा ,आबा का आलेत ते सांगितलं. ते ऐकताच दिनाला आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
दिना बाबाकडं भरल्या डोळ्यांनी पाहू लागला.
" बाबा, मनात लाख इच्छा होती. पण तुम्हास कसं विचारावं! आपण दरिद्री फाटक्या नशिबाचे ! म्हणून मालखेड्यात हिंम्मतच झाली नाही"
" दिना तू कसला गरीब बाबा! सयारुपी अनमोल रत्न तुझ्या पोटी जन्माला आलंय! मला पण तू नकार दिला तर हीच भिती उचल खात होती म्हणून मी ही कच खात होतो विचारायला! आज आलो तर इथं कार्यक्रम सुरू. म्हणून शांत बसलो. दिना, आमच्या माधवला सया हवीय रे!"
" बाबा, आमचं थोर भाग्य !"
सुंदर संतापली. ती नागिणीगत फुत्कारत दत्ताजीकडं निघाली.
मुलांकडील मंडळींना कानघूण लागली.
" दत्ताजीराव! काय हे! तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही आलो मग नकार का?"
" रावसाहेब, त्या दिनानं कितीही नकार दिला तरी मी बसलोय! आज साखरपुडा होईल म्हणजे होईलच! चला मी पाहतो!"
" दिना ,काय चालवलं हे! आणि या मालखेडयाच्या मंडळीची अजून बाकी आहेच का? याचा अनुराधेनं केला एवढा सन्मान कमी पडला का यांना!"
आबा व माधवच्या मुठी वळल्या पण बाबांनी शांत रहावयास खुणावलं.
" दादा, मी कळवतो ना आमचा होकार नकार त्यांना सावकाश!" दिना हेकट व रांगड्या दत्ताजीस नरमाईनं विनवू लागले.
" तुला काहीच कळत नाही तू काय कळवणार सावकाश! ते काही नाही जबना तयार आहे, अनुसयाचं काहीच म्हणनं नाही मग? काही नाही तू नकार दिला तरी आजच साखरपुडा उरकतो मी!"
दिना घाबरला तो ततफफ करू लागला. कायम गावात राहायचं म्हणजे दत्ताजीला विरोध कसा करणार!"
" दादा ,अनुसयाच नकार देतेय!"
" दिनाजीराव आम्हास मुलगी आवडली दत्ताजीनं म्हणजे तुम्हीच होकार दिलाय मग मुलीच्या नकारास होकारास ती काय किंमत देताय! आमच्या तुलनेत आपण कुठं लागता ती तुलना पहा मग ठरवा!" रावसाहेब आत दाबलेला खुनशीपणा काढत होते.
" जबना, पोरीची तयारी कर पटकन, साखरपुडा उरकवू!" दत्ताजीनं फर्मावलं.
बाबा व आबाला मध्ये बोलणं उचीत वाटेना!"
दिना कावराबावरा पाहत माघार घेऊ लागला.
तोच अनुसया पुढे आली व दत्ताजीस म्हणाली.
" काका, बाबाची इच्छा काहीही असो, पण आईच्या इच्छेनुसार मी तयार आहे! मला ही मुलगा पसंत आहे!"
" मग ,मी ही हेच सांगतोय!" दत्ता साशंकतेने खूश झाला.
" काका, पण मला ज्याच्यासोबत आयुष्य काढायचं त्याची इच्छा एकवेळ जाणून घ्यायची! त्यांना मी पसंत आहे की नाही!"
" पोरी ,मी तर आधीच सांगितलय की आम्हास तू पसंत आहे!" रावसाहेब खुशीनं म्हणाले.
" मला आपल्या पसंती आधी मुलाची पसंती महत्वाची आहे!"
" आमची पसंत हीच आमच्या मुलाची पसंत आहे पोरी! तू निश्चींत रहा!"
" तरी एक वेळ मुलानं स्वत: सर्वासमोर पसंत असल्याचं सांगावं, म्हणजे लगेच साखपुडा होईल!"
रावसाहेब तणफणले. मुठी आवळल्या, त्यांच्याकडील सर्वाच्या कानाच्या पाळ्या लाल होऊ लागल्या.
" दत्ताजीराव काय हा पोरखेळ लावला!" रावसाहेब कडाडले.
"सया, ते सांगत आहेत ना मुलास तू पसंत आहे मग का पुन्हा?"
" काका, हेच मुलानं एकवेळ सर्वासमोर बोलावं!"
" दत्ताजीराव, अपमान होतोय आमचा! तुम्हास कल्पना देऊन तर आलोय आम्ही! अन्यथा असल्या भिकार...... आम्ही मुळीच तयार झालो नसतो. म्हणून तर एवढी खैरात देतोय आम्ही! तुमची बिदागी तर वेगळीच!"
' बिदागी' ऐकताच दत्ताजी घाबरला व तो जोरजोरात संतापत " जबनी, पोरीस मध्ये घे व तयारी कर! पुरे तमाशा! समोरची माणसं उदार होत एवढं देत आहात तर हा शहाणपणा का?"
" काका कुणाचं ऐश्वर्य पाहून वा कुणाच्या खैरातीवर काही विकले जातात व विकले गेलेत! पण सारेच तसे नसतात! एकवेळ वेळच्या वेळी आणणारा कफल्लक आणला असता तरी मी स्विकारला असता! एवढंच काय तर मुलाबाबत सत्य स्थितीची कल्पना आधीच देत सांगितलं असतं तरी मी नकार दिला नसता पण फसवून तर आता मुळीच नाही! तुमच्या स्वत:च्या मुलीला पैशासाठी बांधलं असतं का गळ्यात?" सया संतापली.
दत्ता व वना सयावर धावले. दत्ता सयावर हात उचलणार तोच माधवनं वरचेवर हात पकडला.
" ती नाही म्हणतेय ना! मग जबरी का?"
दत्ताजीच्या डोळ्यात आग उतरली. पण माधव एक इंच ही न सरकता अंगार फुलल्या डोळ्यांनी पाहू लागला. दत्ताजीस आपला हात पकडणारा हात पोलादी आहे. अजुन ही हिम्मतच कोणी केली नव्हती. याची जाणीव झाली व त्यानं मान खाली घातली.
माधवचं रुप पाहून व दत्ताजी माघार घेतोय पाहताच अंकलेश्वरच्या गाड्या सणाण निघाल्या.
दुसऱ्या दिवशी सारे दिना, जबनी,सया व विठ्ठलरावास घेत महेश्वरकडं रवाना झाले. आठ दिवस मध्यप्रदेश गुजरात फिरत राहिले. प्रवासात माधव व सया तर वेगळ्याच वसंत बहरात वावरत होते.
बाबा, आबांनी मालखेड्यात धुमधडाक्यात सया व माधवचं लग्न ठेवलं. लग्नाच्या वेळी गोविंद व अनुराधा मुंबईस निघून गेले. मुंबईत ज्या फायनान्स कंपनीत गोविंदनं पैसे अडकवले होते. त्या कंपनीनं त्यांना सहलीसाठी शारजाला पाठवलं. शारजात आलीशान पंच तारांकित हाॅटेल्सला अनुराधा थांबली. पण गोविंद व सहलीत फायनान्स कंपनीकडून सोबतीस आलेली सिमरन सारंगी हे भरपूर ठिकाणी फिरले. सिमरन गोविंदला कंपनीच्या वेगवेगळ्या फर्म्स दाखवू लागली. क्रिकेट क्लब, रेस कोर्स, हाॅटेल्स व तेलाच्या विहिरी. काही ठिकाणी अनुराधा ही सोबत जायची. ते वैभव पाहून गोविंदचे डोळे फाकू लागले. आपणही मालखेड्यातला सारा पसारा, शेती विकावी इथंच गुंतवणूक करावी. कंपनीला ही तेच वाटत होतं . त्यासाठीच तर सिमरन सारंगी आली होती सोबत. पण गोविंदच्या या योजना अनुराधेस हास्यास्पद वाटल्या. तिला तर एकच प्रश्न सतावत होता की असली कुठली कंपनी आपला माणूस पाठवत फाॅरेन ट्रीप फुकटात करेन? करवेन तर का? या प्रश्नाच्या गुंत्यात हळद लावलेली मुंडावळ्या बांधलेली सया तिला दिसली की साऱ्या देहाची आग आग होऊ लागे.
लग्ना आधी दोन दिवस प्रविण मासोळकर आपला आॅर्केस्ट्रा घेऊन आला. सया व माधवला रमणरावांची मुलगी सायलीच्या हातानं हळद निघाली होती म्हणून सायली व तिचा पती नागपूर हून तीन दिवस आधीच आले होते. हळद लावताच पिवळ्या साडीतली सया खुलली. सयाचं हे वेगळं रूप माधवच्या मनात बहराचा बेनझीर बहर दाटवत होता.
रात्री उशिरापर्यंत डिजे वाजत राहिला, सारा गाव नाचत राहिला. मग प्रविण मासोळकराचा ही आॅर्केस्ट्रा गाऊ लागला. प्रविणनं नवरदेव बनलेल्या आपल्या मालकालाच नवरीसोबत गाणं म्हणावयास लावलं.
माधवनं अस्सल लोकगीत ते ही अहिराणी गाणं सयासोबत नाचतच म्हटलं.
" माडी वहु तुले येईजाई वं करमन लगीन....!
धम्माल नुसती धम्माल. व्हिडीओ क्लीप प्रविणनं यु ट्युब, इन्स्ट्राग्रामवर टाकली. लाखो व्युवर्स मिळाले. कशी कोण जाणे पण डाॅक्टर अनुराधा पर्यंत क्लीप पोहोचली व पंचतारांकित हाॅटेल्समधल्या किती तरी वस्तू फुटल्या. त्या रात्री सिमरन सारंगीसोबत राधेनं व्होडकाच्या बाटल्या रिचवल्या. दोन अडीच वाजता नशेत " माधव जगताप....! साल्या नकोसा..... तू हवासा होता..... हवासा आहेस!.....हवासा राहणार........! नकोसे तर ही राधा...... अनुराधा.....आहे....गोंद्या....आहे!
क्रमशः.