नकोसा...............! -7
वा.... पा............
मार्च लागताच खानदेशात सातपुडा रांगेत व लगतच्या सपाटीतील आंब्यांची झाडे मोहोराने बहरली. पानावर तकाकी मोहोराचा सुगंध व झाडाची थंडगार छाया व त्यात कोकिळेचे कुहुकुहु यानं मानवी मनास नवीनच धुमारे फुटू लागले. हल्ली माधवच्या मनातील जुनी मरगळ जात एका नव्याच वसंताची बहार जाणवावयास लागली होती. हे वर्ष पूर्ण धावपळ व दगदगीचं गेलं होतं. पण त्या दगदगीतही अनामिक हुरहुर व ओढ त्याला लागली होती. पण ही ओढ कसली या शोधातच गुरफटत चालला होता तो!
दिवाळी आधी छत्तीसगड मध्ये हार्वेस्टर नेत त्यानं सोयाबीनच्या सिझनला सुरुवात केली. राधेशाम व दिना मामावर सोपवत तो मध्यंतरी मालखेड्यात येत शेतीही पाही. बाबा व सया यांना काय काय करायचं, कसं करायचं सारं सांगत तो पुन्हा छत्तीसगड गाठे. मध्यतंरी दोन एकरातले कांदे काढत त्या ठिकाणी गव्हाची पेरणी केली.
सोयाबीन आटोपत तो भंडारा गोंदीया कडं सरकत मिळेल तो भाताचा सिझन काढू लागला. राधेशामला सारी माहिती होताच माधवनं त्याच्या सोबत भागीदारीनं पुन्हा एक हार्वेस्टर आणलं. ड्रायव्हर आणखी वाढले. आता दिना मामा व राधेशामच सारं पाहू लागले. गव्हाचा सिझन सुरू होताच माधवनं दिनामामा व राधेशामला मध्येप्रदेशात पाठवलं. तो व राधेशाम ही तिकडच जाणार होणार होता पण त्या आधी सयामुळं त्यानं रद्द केलं. निघण्यापूर्वी मशीनची दुरुस्ती चालू होती.
" मधा?"
" काय गं?"
" एकाची दोन मशीनं झालीत ! आता अशीच धावपळ होणार ना?"
" मग, त्याशिवाय कसं चालणार!".
" आता तू असाच सहा सात महिने बाहेर राज्यातच फिरणार?"
मधाला बोलण्याची खोच समजेना.
" गव्हासाठी जावं तर लागणारच"
" गहू तर आपल्याकडेच भरपूर आहेत रे! मग एक मशीन इथंच ठेवलं तर...?"
" हे ही चांगलंच! इथंही होईल धंदा! मी दिना मामास एक मशीन सोबत इथंच ठेवतो!"
" बाबांना हवं तर जाऊ दे बाहेर राज्यात! तू थांब ना इथेच....!"
" मी का? मामा थांबला तरी धंदा होईल ना!"
सयानं तोंड फिरवत जीभ चावली.
" तसं नाही रे, पण तू थांबला तर शेतीकडंही लक्ष ठेवशील!"
माधवला खोच तर लक्षात आलीच नाही पण हे पटलं. म्हणून तो थांबला होता व हार्वेस्टर आजुबाजूच्या खेड्यात चांगलंच चालत होतं. तो सकाळ संध्याकाळी घरी येई. त्यामुळे च एक नवी वसंत बहार त्याला खुणावत होती.
दंगल रावाच्या हवेलीत दिड दोन वर्षात अनुराधा आल्यापासून वेगळंच घडत होतं. अनुराधा आटोकाट प्रयत्न करीत होती पण गोविंद? गोविंदमुळं हवेलीत रया यायला हवी होती पण उलट घडत होतं. मागच्यावर्षी बाबा व माधवचं आयतंच पपई ,ऊस,व केळीचं दहा पंधरा लाखाचं उत्पन्न मिळालं होतं. पण नंतर शेतावर ताबा बसवला नी या वर्षी उत्पादन दणादण घटलं. आज पावेतो बाबा स्वत: राबत साऱ्या माणसांना राबवून घेत. दंगलराव फक्त बाहेरचं सांभाळत. पण बाबांना काढताच ना दंगलरावांना राबणं माहीत ना गोविंदला! म्हणून या वर्षी उत्पन्नापेक्षा भांडवलंच जास्त झालं.
गोविंदनं शेतीचं कारण सांगत प्रॅक्टीस तर आधीच बंद केलेली होती. आता शेतीतही धड ठिकाणा नाही म्हणून सुंदरबाई व राधास खटकू लागलं. त्यात शेती दिली नाही म्हणून बाबा व माधव हंगामा करतील किंवा विनवण्या करतील असं सुंदरबाईस वाटत असतांना बाबानं नादच सोडला नी उलट माधवनंही एकाचे दोन हार्वेस्टर घेतले, चार एकर शेत घेत शेतात नवीन प्रयोग करत ड्रॅगनची फळ बागायत बहरतेय पाहून सुंदरबाई व राधा गोविंद वर तणफण करू लागल्या.
"मला आता इथं राहायचंच नाही" सांगत तो कधी एम. डी करण्याचं तर कधी शेत विकण्याच्या बाता करू लागला.
सुंदरबाईनं त्याला मागच्या वर्षाचं उत्पन्न व आधीच्या शिल्लकीचा हिशोब मागितला. कारण एकत्रची वीस बावीस लाख शिल्लक होती. पण गोविंद नं ती कुठल्यातरी फायनान्स मध्ये गुतवल्याचं सांगत होता व अवघ्या दोन वर्षात दामदुप्पट होणार असल्याचं सांगत होता. राधानं डोक्याला हात मारला. मात्र तो वरचेवर मुंबई च्या फेऱ्या मारत होता. हाॅर्स रेस, क्लब, डान्स बार व बाहेरच्या टूर्स वाढल्या होत्या. पैसा कुठे जात होता हे त्यालाही कळत नव्हतं.
" अहो काही होत नसेल तर नका काम करू! पण असल्या नको त्या उचापती करू नका!" राधा संतापत सांगत होती.
गोविंद संतापातच ओसरीवर आला. त्याच वेळी अनुसया हसतच हवेलीतून बाहेर पडत जिन्यावरून वर चढू लागली. मागोमाग हसतच माधव ही वर चढला.
" बघा , काही तरी शिका यांच्यापासून कसे राहतात?" अनुराधानं गोविंदला वर जाणाऱ्या सया व माधवकडं हात दर्शवत सांगितलं. त्यानं गोविंदची तळपायाची आग मस्तकात गेली.
" काय शिकायचं गं त्यांच्या कडून? दिड- दोन वर्षात स्व:ताच्या हिश्श्यात जिना काढता आला नाही त्याला! थांब त्यांचं इकडणं वापरणंच बंद करतो!" गोविंद संतापला.
वरून माधव उतरला व हवेलीत गेला. नंतर सया उतरू लागताच गोविंद जिन्यावर आडवा बसला.वरून येणारी सया पाहून वरच थांबली. तिला खाली उतरताच येईना. कारण दोन दोन येलीचा स्वत:चा हिस्सा वर खाली स्वतंत्र असला तरी वर जाण्याचा जिना सामाईक होता ,जो दंगलरावाच्या ओसरीवरून वर जायचा. याच जिन्यानं रमणराव व दौलतबाबा वरच्या सलग ओसरीत जात.
बराच वेळ झाल्यानं सया खाली उतरण्यासाठी चलबिचल करू लागली. पण गोविंद उठेच ना. राधा हे पाहून हसू लागली. सयानं खाली बाबास काॅल करत सांगितलं. माधव खाली उतरून बाहेर निघून गेला होता.
बाबा बाहेर ओसरीवर आले व सयास हाक मारत बोलवलं. सया उतरू लागली.
" गोविंद, सरक बाजूला! तिला खाली उतरू दे!" बाबानं दरडावलं.
" राधा ,यांना सांग आज इकडनं उतरू देतो पण उद्यापासून हा रस्ता बंद! उगाच आपल्याला डिस्टर्ब करत केव्हाही चढ उतर नकोय मला!"
बाबा व सया थरथरले.
" गोंविद ,सामाईक दादरा आहे तो!"
" आता माझ्या हिश्श्यात आहे तो! मला कुणाचाच वावर नकोय !"
बाबा व सया घरात परतले. माधव बाहेरुन आल्यावर त्याला कळलं. दुसऱ्या दिवशी रमणरावांचाही वापर बंद झाला. ते ही बुचकळ्यात पडले. आता लगेच ओसरीतून स्वत:चा जिना काढावा लागेल हे त्यांनी ओळखलं. कारण गोविंदचा वाह्यातपणा दिड दोन वर्षात त्यांनीही अनुभवला होता. दंगल तर घरात चोरच झालाय हे ही त्यांनी ओळखलं होतं.
तरी माधव असतांनाच ओसरीवरुन त्यांनी सुंदर व राधेस विचारलंच.
" सुंदर निदान जिना काढेपर्यंत तरी वापरू द्यायला सांग त्या गोविंदास!"
" मी काय सांगणार त्याला! तुम्हीपण दिड वर्षात स्वत:चा काढायला होता जिना! त्यानं बंद केल्यावर तुम्हास शुद्धी आली!" सुंदरबाई वरुन शहाणपणाच्या पट्ट्या पढवू लागली.
रमणरावांनी माघार घेतली.
माधवनं दुसऱ्या दिवशी सारा सामानं मागच्या बाजूला लावत केवळमाय बनुमाय बाबा, सयास मळ्यात काढलं.
जेसीबी आणलं. दुपारी जेसीबी अंगणात येताच माधवनं रमण काकाला जोरात सुनावलं.
" आबा ,तुमचा सारा सामान व्यवस्थित हलवून घ्या.मी हवेली पाडतोय. !”
रमणरावाला धक्काच बसला. आणखी हे काय नवीन! गोविंद तर गोविंद पण माधवही सटकला की काय!
" माधव हे काय आणखी? अचानक चांगली हवेली का पाडतोय? हवेली पाडशील तर राहशील कुठं?"
राधा , गोविंद, सुंदरबाईही तोवर ओसरीवर आले.
" काका, मला मळ्यातच नवीन घर बनवायचंय!"
" अरे पण मग ही पाडण्याचं काय कारण? एवढी मजबूत व चांगली बापजाद्याची वास्तू!"
" इथं दोन्ही हार्वेस्टर उभी करण्यासाठी मोकळी जागा हवी मला!"
दौलतबाबाचा हिस्सा मध्ये होता. हवेली तर एकसंध बांधणीची. मधला हिस्सा पाडणं म्हणजे रमणराव व दंगलराव दोघांचा हिस्सा ही गडगडणं.
गोविंद संतापला.
" आबा ,यांना समजवा .माझा हिस्सा पडला तर मी कंम्प्लेट करेन!तुरुंगाची हवा पक्की समजा"
माधवनं जेसीबीवाल्यास आधीच हवेलीला कशी पाडायची हे सांगून ठेवलंच होतं.
गोविंदच्या बोलण्याकडं काडीची किंमत न देता माधवनं जेसीबीवाल्यास खुण केली.पंजा लागला. बाबांचा गोविंदकडचा भाग खाली येऊ लागला.
दौलतबाबांच्या ओसरीचा भाग खाली येताच आपल्या हवेलीचा भाग ही कोसळेलच हे पाहताच गोविंद आडवा झाला.
" आबा याला सांगा महागात पडेल हे!"
" नाम्या लवकरात लवकर मला हवेली जमीनदोस्त हवी! येतो मी!" माधव निघू लागला.
गोविंद रमणकाकाला काकुळतीनं
" आबा,आबा थांबवा नाहीतर मला नुकसान भरपाई हवी!"
आबा तुमचा हिस्सा पडला तर तुम्ही केस कराल तरी बाबानं माघार घ्यायला नकार दिलाय! भले केस दिल्ली पर्यंत नेऊ पण हवेली पाडच असा दम दिलाय!" माधव गोविंद ला सुनवू लागला.
गोविंद सुंदरबाई भणाणले. माधव मळ्यात नवीन घर बांधणार ही बातमी त्यांनी ऐकलीच होती पण हवेली तशीच राहिली असती. पण जिन्यामुळं त्यांनी लगेच निर्णय घेतलेला पाहून गोविंद हडबडला. त्याला वाटलं आपला हिश्श्याच्या नुकसानीसाठी आपण केस करू पण केस? निकाल यात किती वेळ जाईल! तो पावेतो?
तो आबाकडं खाल मानेनं आला.
"माकडांनो तुम्ही बोट वाकडं केलं पण त्यानं पायच घातला. पळा आता.त्याचा पाय धरा."
" रमणरावांनी जेसेबी थांबवलं. तो पावेतो पुढची ओसरी बरीच ढासळली होती.
गोविंद, सुंदरबाई आबास घेत मळ्यात गेले. बाबापुढं हात जोडले.
" मूर्ख आहात तुम्ही!" बाबा कळवळले.
" चुकलो. जिना सामाईक राहिल पण .,.जेसीबी हलवा!" खालमानेनं गोविंद बोलला.
" सया, काय करू गं?" बाबा मुद्दाम सयास विचारू लागले.
" बाबा, मी काय सांगू!"
" आबा, ढासळलेल्या जागी यांनी लगेच जिना काढून देत तो भाग पुर्ववत दुरूस्त करावा. सोबत तसाच जिना तुमच्या हिश्श्यातही काढून द्यावा! अन्यथा एकच रिंग केली तरी हे परते पर्यंत आणखी हवेली ढासळेल"
" आबा मंजूर! पण चांगल्या हवेलीची नासधूस थांबवा!" सुंदरबाई कळवळली.
रमणरावांना सुंदरची आज पहिल्यांदाच जिरली हे पाहून मनात हसू फुटलं.
जेसीबी परतण्या आधीच गवंडी, सुतार आले. दोन जिने काढले गेले व ढासळलेला भाग पूर्ववत केला. यात दहा दिवस गेलेत. गोविंदचं साऱ्या मालखेड्यात हसं झालं.राधा संतापानं गोविंदवर कातावू लागली.
मळ्यातून सारे परतले. सया नवीन जिन्यानं वर चढू लागताच माधव हसतच म्हणाला.
" सया, बिनधास्त वर चढ! आता कुणीच जिन्यात आडवं पडणार नाही! आडवं पडणाऱ्याला बाबा असेच पालथं पाडतील!"
बाजुच्या हवेलीत लगेच काही तरी फुटल्याचा व भांड्यांचा आवाज आला. व नंतर बोलण्याचा आवाज.
" तुला, काहीच धड करता येत नाही. काहीही करतो नी उलट खड्ड्यात तोंडघशी पडतो!"
माधव व सया हसतच वर चढले.
याचा वचपा काढण्यासाठी सुंदरबाई नंतर लगेच सेंधव्यास गेली. दत्तू व वनापुढं रडू लागली.
" ताई, फालतू गोष्टी साठी का रडतेय गं! मोठा बार लावत धमाका करू कशाला घाबरते!"
दोन तीन दिवस सुंदरबाई राहिली. त्या दिनाची दुसरी बाई - जबनीस भेटल्या.
" काय गं जबनी! ती अनुसयाला कितीक दिवस ठेवणार तिथं! लोक आता मालखेड्यात काही ही बोलतात!"
" ताईसाहेब ,ती इथं राहिली काय नी तिथं राहिली काय ! राबुन तर खातेय!" हल्ली दिनास माधवकडं चांगले पैसे मिळतायत म्हणून जबनीनं ही स्वभावात बदल केला ह़ोता. कारण अनुसयाची ब्याद ही तिकडंच होती.
" अगं तरणी पोर तिथं राहतेय, हे चांगलं नाही. लोकाच्या तोंडाला झाकण आहे का! त्या माधवनं तिला ठेवलीय असं लोक बोलायला लागली मालखेड्यात!" सुंदरबाईनं सुरुंगाला बत्ती लावली.
"........." जबनीला धक्का बसला. सावत्र असली तरी आपल्या नवऱ्याची इज्जत जायला नको असं तिला वाटणं साहजिकच.
" असं मुकशी सारखं बसु नको! ती बनुताई कायसून करणार नाही. तिच्या लग्नाचं पहा! तिला इथंच बोलवून घे! दत्ता दादाच्या ओळखीचा मुलगा आहे .त्याला जर मुलगी आवडली तर तोच लग्नाचा सारा खर्च करणार आहे. वरुन हवंतर तयाला सांगून तुमचं घर ही बांधणं होईल.
'खर्च व घर बांधून होईल' हे ऐकताच जबनी भुरळली.
" ताई, तरी मी त्यांना आधी विचारते ! ते ही आता मध्यप्रदेशातून परततच आहेत! आणि बनुताईंनाही विचारते."
" बघ लवकर विचार दिनास.नी सयाला इथंच बोलवून घे! तोवर दत्ता दादा ही मुलास कल्पना देत बोलवून घेईन"
सुंदरबाई सेंधव्याहून परतली. जबनीनं फोन करुन दिनास सांगितलं व परस्पर तिकडूनच मालखेड्याहून अनुसयास आणावयास लावलं.
दिनास जबनी मुलीस आणावयास सांगते याचा खूप आनंद वाटला. पण लग्नाचं आधी एकवेळ बाबास विचारावं अशी त्याला भित भित का असेना पण आशा होतीच. कारण सुंदरताईनं गोविंदसाठी अनुसयास नाकारल्यावर आसरा देऊन उपकार करणाऱ्या बाबास माधवसाठी मागणी घालणं त्याला लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखं वाटू लागलं. तरी तो हार्वेस्टर घेऊन परतल्यावर एक दोन दिवस मालखेड्यात मुक्काम राहिला त्यावेळी हिम्मत केलीच.
जेवण आटोपल्यावर रात्री सारे बसले होते.
" बाबा, या वर्षी माधव दादाचं उरकायचं ना?"
" दिना, या वर्षी उरकायचंच आहे. दोन तीन मुलींचे स्थळे सांगून आलेत पण पाहू आता."
दिना धास्तावला. सयाचा विषय काढावा की नाही! तसं असतं तर बाबांनीच सांगितलं असतं.तो चिंतेत पडला व विषय काढण्यास घाबरू लागला.
बाबांकडं अजुन स्थळे आलीच नव्हती पण दिना सयाबाबत काहीतरी सांगेल म्हणून बाबांनी मुद्दाम सांगितलं होतं.
" बाबा, जबनीनं सयास सोबत आणावयास लावलं आहे सेंधव्याला!" दिना नाराज मनान म्हणाला.
" अरे मग उलट छान आहे .पोरीला तेवढाच थारेपालट होईल. बिनधास्त घेऊन जा की!"
बाबा तरी विचारत नाही म्हणजे सयाला करणार नाहीत याची दिनास खात्री झाली व तो मनात दु:खी झाला. तर बाबानांही ' एकंदरीत दिनाची इच्छा नसावी म्हणून बाबासही वाईट वाटलं. म्हणून त्यांनीही शब्द टाकला नाही.
माणसांनं मोठा अनपेक्षित धक्का खाल्ला की विश्वास डळमळीत होत माणूस सहज होणाऱ्या गोष्टी करण्यासही घाबरतो. हेच बाबा व दिनाचं झालं. हवेलीतल्या साऱ्या गप्पा काम करता करता अनुसया लक्षपूर्वक ऐकत होती. तिला आतून खोल खोल बाबा ,ताईंनी विषय काढावा असं जीव तुटेपर्यंत वाटत होतं. नाही त्यांनी तर वडिलांनी तर विनंती करावी असं वाटत आतडं तुटत होतं. निघालेला विषय संपला व दुसरा विषय निघताच आशा मावळतांना तिला वेदना होऊ लागल्या. कुणी तरी पुन्हा तोच विषय काढावा म्हणून ती वाती करण्यासाठी कापुस घेऊन येत केवळ आजी जवळ बसली. वाती वळतांना खोल नजरेनं ती माधवकडं पाहू लागली.
" दिना, जबनीनं पोरीस कशासाठी बोलवलंय रे? जर बोलवलं नसेल तर नको नेऊ पोरीला.आम्हास ती जड नाही. तिच्याशिवाय आम्हाला करमणारच नाही."
आता मात्र सयाच्या आशा पुन्हा जागृत झाल्या. ती माधव कडं तिरपा कटाक्ष टाकत पाहू लागली.
" ताई, जबनीनं बोलावलं म्हणूनच घेऊन जातोय! "
" घेऊन जा पण आठ दिवसात लगेच घेऊन ये!"
ताई आठ दिवसात बोलवतेय पण माधवसाठी लग्नाचा विषय काढत नाही म्हणजे सया सून म्हणून नकोय तर काम करण्यासाठीच हवी यांना; यानं दिनासही वाईट वाटलं. एक शब्द जरी बोलले तरी पोरीस नेणारच नाही मी.
सकाळी इच्छा नसतांना सयाला तयारी करावी लागली.
" आत्या, वाती या डब्यात आहेत, तूप तिथं, भिजवलेल्या वाती बाजुलाच!" सया पुन्हा पुन्हा सांगत होती.
" सया आठ दिवस तर जातेय गं! मग इतक्या सुचना का?" बनुताई म्हणाल्या.
'ताई आठ दिवसासाठीच गेली असती तर आनंदानं गेली असती, पण मला आता थांबवलं नाही तर पुन्हा मालखेड्यात येणे नाही, कसं सांगू मी! ' सया मनातल्या मनात तळमळत होती.
दुपारी निघतांना सयाला अजुनही आशा होती पण ती पूर्ण मावळतांना दिसतात. तिच्या डोळ्यात टपोरे थेंब तरारले. आता पुन्हा ही सोनमुसी, मायेची माणसं ,त्यांचा सहवास मिळेल का? या विचारानं ह्रदयात प्रचंड कालवाकालव झाली. कारण वडिलांनी तिला आधीच मुलगा पहायला येणार हे सांगितलं असल्यानं तिला हवेलीतून पाय काढावाच वाटत नव्हता. माधव एक शब्द जरी बोलला तरी आपण थांबूच.ती वाट पाहू लागली.
दिनानं सयाला घेतलं व सुसरी उतरू लागला. डोळ्यात उन्हाळ्यातही महापूर दाटला. दोन्ही चुलतबहिणींनी आपल्या पोरीस स्विकारली नाही. सख्खी बहिण असती तर? तो आक्रंदला.
सया जायला दोन दिवस होत नाही तोच माधवला हवेली खायला उठू लागली. वसंत बहरातच पानगळ होत निकुंज निष्पर्ण झाल्यागतच त्याला वाटू लागलं. आपणास असं का होतंय हे त्याला कळेना. आपलं काही तरी हरवलंय पण काय हे त्याला समजेना. राधेबाबतचा हळवा कोपरा तर आता जाळ उठवतो मग ही गेलेली वसंत बहार कोणती की आपल्याला हवेली खायला उठतेय.
" " सया, पाणी आण गं!" बाबानं मंदिरातून येताच आरोळी मारली.
बनुमाय नं पाणी देत "अहो सयाला जायला दोन दिवस झालेत तरी तोंडात सयाच येते का तुमच्या!!"
" बघ, पोरीनं इतकी सवय लावली की माहीत असुनही तोंडात तिचच नाव येतं!"
माधवला आतून गाभाऱ्यात घंटानाद उमटावा तसाच सयाच्या ना्वाचा घंटानाद जाणवू लागला. हीच हीच तर नसावी वसंत बहार! जवळ असतांना जाणवलंच नाही व दोन दिवस हवेलीतून जाताच आत हा कोलाहल मातावा?
तो हार्वेस्टर सोबत सतत बाहेर रहायचा तरी सया बाबा माय जवळ हवेलीत आहे म्हणजे जवळ असल्यागतच आपल्याला वाटायचं.
" बाबा, लवकरच बोलवून घेऊ तिला!" माधवच्या तोंडातून न कळत निघालंच.
बाबा माधवकडं विस्फारल्या डोळ्यांनी पाहू लागला.
" का रे मधा?" बाबांनी माधवच्या नजरेत नजर देत विचारलं.
" बाबा ती असली की हवेली कशी भरलेली वाटते ना!"
" आणायचं का कायमचं तिला?" बाबा विचारू लागले. माधवनं जीभ चावली व विषय बदलला.
" बाबा, आता थोडा निवांतपणा आहे तर मस्त महेश्वर, इंदौर, उज्जैन फिरून येऊ सर्वजण!"
" अरे मग लवकर गाडी कर जाऊ सर्व जण! सेंधव्याकडून जात सरूला ही घेऊ!"
सरुचं नाव ऐकताच बाबा मनातलं बोलले म्हणून माधव भरभरून बोलू लागला. कसं जायचं, कुठं जायचं ,कोणती गाडी करायची सारं सारं!
" मधा, एक विचारू का?" बाबानं बनुबाईकडं पाहत विचारलं.
" काय बाबा?"
" सया कशी वाटते रे?"
" एकदम चांगली आहे बाबा ती!"
" मग दिनाला विचारू का?"
" बाबा, मी काय सांगू म्हणत तो उठून गेला.
पानगळीतही वसंत परततोय यानं तो वर झोपायला निघाला.
बाबा समजले.
" बनू ,त्या दिवशी च दिनाला मी विचारणार होतो. पण तीन स्थळं आलीत असं सांगूनही तो काहीच बोलला नाही म्हणून हिम्मतच झाली नाही. पण आता माधवचा होकार आहे तर विचारतोच!" बाबा खुशीनं म्हणाले.
तीन दिवसांनीच माधव गाडी करत बाबा, माय, आजी रमण काका, कला काकू राधेशाम सर्वासोबत महेश्वरला निघाला. रस्त्यात गाडी सया व दिनामामास घेण्यास सेंधव्याला थांबली.
सेंधव्यात दिना मामाच्या घरी बरीच गर्दी दिसत होती. सया नवी पैठणी नेसली होती. दत्ताजीनं अंकलेश्वराच्या मुलास बोलवलेलं होतं व सयास पाहण्याचा कार्यक्रम सुरू होता.
पैठणी नेसलेली सया मुलासमोर बसलेली पाहताच माधवच्या मनात होळी पेटली........
त्याला लग्न करुन परतलेली अनुराधा व गोविंद आठवले...... पुन्हा तीच पुनरावृत्ती का? ..........
की........
आपणच घाई का केली नाही.
दत्ता,वना, व सुंदरला तिथं पाहताच माधव, बाबा, रमणराव संतापले.
क्रमशः.........