नकोसा............! -6
वा.......पा...........
माधवने बाबास घेत जळगाव गाठलं. तेथून जोशीसाहेबांना घेत रेल्वेने ते पंजाबकडे निघाले. जोशी साहेबांनी आपल्या अधिकारी मित्रामार्फत तिथल्याच एका ओळखीच्या महिला शेतकऱ्यांच्या नावे 'करतार कंबाईन हार्वेस्टर' घेतलं. जवळपास तेवीस लाखांपर्यंत किंमत असलेलं हार्वेस्टर तिथल्याच शेतकरी महिलेच्या नावावर घेत जोशी साहेबांनी आठ लाखाचं सरकारी अनुदान मिळवत पंधरा लाखात मिळवत माधवचे पैसे वाचवले. तिथल्याच ओळखीचा वापर करत सध्या कुठं व कोणतं काम मिळेल, हार्वेस्टर साठी चांगला ड्रायव्हर सारी तजवीज जोशी साहेबांनी केली. गव्हाच्या सिझनला अजुन अवकाश होता. त्या अगोदर तेलंगणा, आंध्रप्रदेशात तांदूळ सिझन घेण्याचं नियोजन करत ड्रायव्हरला घेत ते सारे परतले. पंजाब, मध्यप्रदेश करत मशीन मालखेड्यात न आणता सरळ आंध्रप्रदेशात पाठवलं. बाबास सोबत तात्पुरत पाठवत नंतर माधव दिना मामास सोबत घेत सारी तजवीज करत बुलेट वर निघाला. मग नंतर बाबास घरी परत पाठवलं.
ड्रायव्हरनं तिथला स्थानिक आधीचा ओळखीचा ड्रायव्हर घेऊन कामाची लाईन बसवली. दिना मामा सर्वाचा स्वयंपाक करू लागला. माधव डिझेल आणनं, शेतकऱ्याशी भेटत कापणीसाठी पुढचं शेत मिळवणं, ड्रायव्हरला घेत पुढच्या शेतात नेणं अशी कामे करु लागला. रात्री वेगळा ड्रायव्हर व दिवसा वेगळा ड्रायव्हर. वेळ मिळाला तसा माधव व दिना मामा स्वत: मशीनची माहिती घेत शिकू लागले. माधवनं दिना मामास ताकीदच दिली जिथं ढाब्याची सोय असेल तिथे स्वयंपाकाच्या भानगडीत न पडता चारही लोकांचे डबे आण हवं तर; पण जास्तीत जास्त वेळ ड्रायव्हर सोबत राहत शिकून घे. दिड दोन महिने तांदूळचा सिझन पार पाडत माधवनं स्थानिक ड्रायव्हरची सुटी करत दिना व पंजाबच्या ड्रायव्हर सोबत हार्वेस्टर मध्यप्रदेशातील गहू पट्ट्यात नेलं.
हार्वेस्टर मध्यप्रदेशात पोहोचलं पंधरा दिवसात तुरळक गहू कापणी सुरू झाली. काहीच अनुभव नसतांना माधवनं जोशी साहेबाच्या मार्गदर्शनाने व पंजाब मधील ड्रयव्हरच्या मदतीनं कोणत्या राज्यात कोणत्या पिकाचा हंगाम सापडेल हे सारं समजून घेतलं. मध्यप्रदेशात गव्हाचा फुल सिझन सापडला. भात सिझन व नंतर थोडा फार गहू सिझन होताच दिना मामा पूर्ण शिकला. मग पंजाबचा ड्रायव्हर रात्री व दिवसा दिना मामाच हार्वेस्टर चालवू लागला. माधव दोन्ही वेळचे ढाब्यावरून डबे आणणे, डिझेल आणणे, पुढचं शेत मिळवणं, शेतकऱ्यांकडून पेमेंट गोळा करणे, डिझेल व ड्रायव्हरचे पैसे देत उरलेले बाबाच्या खात्यावर बॅंकेत भरणा करणे या कामात दमू लागला. रोजचं तीस तीस एकर क्षेत्र निघू लागलं. बाराशे ते दिड हजार एकराच्या भावानं माधवला बक्कळ कमाई दिसू लागली. भात व गहू दोनच सिझन सापडले.
भुसावळ जळगाव, शिंदखेडा करत हार्वेस्टर मालखेड्यात आणलं. पंजाबचा ड्रायव्हर परतला. माधव जवळपास चार पाच महिने बाहेरच होता. बाहेरचं खाणं, कामाची दगदग, जागरण यानं त्यांच्या तोंडावरची रया गेली. पण आपण स्वत: काही तरी मोठी झेप घेतोय या समाधानाचं तेज चेहऱ्यावर होतं. दिना मामा दोन तीन दिवस मालखेड्यात थांबला. त्याला ही माधवनं त्याचा हिस्सा दिला . दिना मामा खुशीनं सेंधव्यास परतला.
आता पाऊस पडेपर्यंत निवांतपणा होता. माधवला बाबांनी त्यांच्या खात्यावरील रकमेचा आकडा दाखवला तर माधवचा ही विश्वास बसेना. रिकामे दिवस सोडून जवळपास तीन साडेतीन महिने पूर्ण काम चाललं होतं. रोजचा खर्च काढून माधवने भरणा केलेली रक्कम सोळा सतरा लाखाच्या आसपास जात होती. मशीन खरेदी करुनही बाबाच्या खात्यावर बारा तेरा लाख शिल्लक होतेच. माधवला चार महिन्यातच मशीन नील होत नफा राहिला होता.
" बाबा ,आता यांचं काय करायचं?”
" मधा ते मला काय माहीत पोरा! तुला हवं ते कर!"
सुसरी नदीकाठी सदा सुताराचं चार एकर टेकाड असलेलं भुराट शेत विक्रीला होतं. सुतारास तेथून काहीच पिकेना. मुलं नाशीकला असल्यानं व बाप थकल्यानं त्यांनी बापास नाशीकलाच नेलं. शेत विक्रीला काढलं होतं. पण नदीकाठचं शेत टेकड्या टेकड्याचं होतं. व जमीनही लाल भुरकट मातीचं. त्यात चार वर्षांपासून पडलेलं असल्यानं त्यात वेड्या बाभळी , रुई, सौंदळ उगलेल्या. मधास शेत विक्रीला असल्याचं कळताच त्यानं बाबाजवळ विषय काढला. बाबा काळ्या कसदार तीस एकर शेतात राबत आल्यानं नदीकाठचा तो पडीक त्याच्या ध्यानात भरेना. पण आताची दशा पाहून व मधाची इच्छा पाहून ते मोठ्या नाराजीनंच " तुझी इच्छा असेल तर बघ!" एवढंच म्हणाले.
मधाला बाबाची नाराजी समजली. पण त्याचं बजेट व त्याला तशीच जमीन हवी होती. म्हणून त्यानं ते चार एकर शेत घेतलंच. सुताराच्या मुलांना पडक्या शेताची विकायची घाई होती. बाविस लाखात सौदा झाला. मधानं लगेच खरेदी करत शेतात ट्रॅक्टर घालत झाडं काढत सपाटी करण केलं. धरणाचा गाळ उपसला जाऊ लागला. बोअर केला. नदीकाठचं असल्यानं बोअरला भरपूर पाणी लागलं.
पाऊस जवळ आला त्यापूर्वीच तो जोशी साहेबाकडं गेला. तसं शेत घ्यायचं ठरवलं तेव्हापासून तो सतत संपर्कात होताच. जोशीसाहेबांनी क्षेत्र किती, जमिन कशी, पाण्याची सोय सारी माहिती माधवला विचारलीच होती.
माधवनं जोशीसाहेबांची कार्यशाळा केली होती तेव्हापासून ड्रॅगन फ्रुटची शेती करायचीच हे मनात पक्कं बसलं होतं. पण काळी कसदार पाणी धरुन ठेवणारी जमीन व नंतर तर ती ही गेली म्हणून सदा सुताराची भुरकट जमीन मिळताच त्यानं ड्रॅगन फ्रुट लावायचं ठरवलंच.
जोशी साहेबानं कृषी विद्यापिठाशी संपर्क साधत दोन एकर साठी बाहेरुन रोप मिळवण्याची सारी व्यवस्था केली. माधव बाबाच्या सहीचे कोरे चेक सोबत घेऊनच गेला होता. साहेबाकडून त्यानं पुर्ण वर्षभर काय काय व कसं करावं हे सारं नियोजन लिहून घेतलं.
पावसाळा लागताच दोन एकरात १४ बाय ७ फुटाचे गाळे घेत सिमेंटचे खांब गाडत एका खांबाभोवती चार रोपं लावली. एकेक रोप पन्नास रू. किमतीचं. सिमेंटचे पोल, तार, नंतर पोलमध्ये मातीचे ढिग टाकणे, शेण खत, रासायनिक खत, फवारणी यात माधवनं पाण्यासारखा पैसा ओतला. वेल वाढू लागले तसे सिमेंट पोलला तार बांधले.
मध्यंतरी विद्यापिठातील माणसं फी घेत पाहणी व मार्गदर्शनासाठी येऊ लागली. माधवचा मुक्काम नदीकाठी शेतातल्या झोपडीतच वारंवार पडू लागला.
श्रावण सरता झाला तसा चिक्कार झडू लागला. आज सकाळपासूनच आभाळात झगार पसरली होती. सूर्य नारायणाचा तपास नव्हता. माधवला त्यामुळ आज आराम होता.
अनुराधा पडत्या पावसात रेन कोट चढवून बाहेर जात होती. बॅग मोपेडवर पुढे ठेवली व ती गाडी स्टार्ट करु लागली. पण पावसानं गाडी सेल देऊनही स्टार्ट होईना. तिनं घरातून गोविंदला हाक मारत बोलावलं. हल्ली गोविंदनं प्रॅक्टीस बंदच केली होती. कारण ताठ स्वभाव अहंकारी तुसडं बोलणं यानं त्याचा गुण येत असुनही पेशंट अनुराधास बोलवत पण त्याला बोलवत नसत. त्याच्यासमोर त्यास नकार देत ताईंनाच पाठवा सांगत .यानं त्याचा स्वाभिमान वारंवार दुखावला जाऊ लागला म्हणून त्यानं शेतीचं निमीत्त करत प्रॅक्टीस बंदच केली होती.
"अहो ही गाडी पहा तर! सुरु होत नाही."
तो बाहेर आला व किक मारू लागला. तोच अनुसया अचानक बाहेर आली. तिला अंगणात पाणी फेकायचं होतं. पण हे दोन्ही अंगणात असल्यानं फेकलं तर यांच्यावर उडेल म्हणून ती यांची निघायची वाट पाहत थांबली क्षणभर! काय करावं थांबावं की परतावं घरात, असा विचार मनात आला तोवर तर राधा संतापली. तिला वाटलं ही गोविंद किक मारतोय व ही मजा पाहतेय.ती संतापली.
" काय गं ,काय फुकटात गाडीकडं पाहतेय! गाडीची एवढी हौस आहे तर स्वत: घ्यायची! दुसऱ्याच्या गाडीला फुकटात कोठवर पाहणार!"
सया थरथरली व अपमानानं तिच्या डोळ्यात आसवं तरारली व ती गर्रकन घरात परतली. हे माधवनं ओझरतं ऐकलं व पाहिलंही.
"काय झालं सया? "
" काही नाही!" म्हणत सया आसवं लपवत मागे निघाली.
तिला आपल्या परिस्थीतीची व नशीबाची किव वाटू लागली.
दुपारी जेवतांना बाबाकडं माधवनं विषय काढला.
" बाबा एक दोन महिन्यात हार्वेस्टरचा सोयाबीन काढण्याचा सीझन सुरू होईल. मला व दिना मामास छत्तीसगड राज्यात हार्वेस्टरसोबत जावं लागेल. मग शेतातल्या कामाकडं तुम्हालाच पहावं लागेल!"
शेत घेते वेळी नाराज असलेले बाबा माधवनं शेतात केलेला कायापालट पाहत हबकलेच होते. आता ते ही दिवसभर त्याच्या सोबत थांबत असतच.
" माधव तू बिनधास्त जा! तीस एकर सांभाळणारा मी चार एकर आरामशीर सांभाळेल. पण त्या ड्रॅगन फ्रुटची नवखी शेती जमायला अवघड आहे पोरा एवढंच!"
" बाबा ,माणसं येतात ,ते सांगून जातात तसं करायचं! ते तुम्ही करणारच. पण शेतात तुम्ही जाणार कसे!"
" कसे म्हणजे? पायी जाणार!"
" मुळीच नाही . तुमच्यासाठी मोपेड आणायचं ठरवतोय मी!"
" हे बाबा! तुझं काय तू माझ्यासाठी विमान ही आणशील, पण मला जमायला हवं ना!" बाबा हसत म्हणाले.
" बाबा, तुम्हाला गाडी चालवायची या वयात तकलीफ मी देणार नाही!"
" मग?"
" या अनुसयालाही काही काम हवं ना! ती पोहोचवत, आणत जाईल तुम्हाला!"
अनुसयाला भरुन आलं. ती भरल्या डोळ्यानं माधवकडं पाहू लागली.
" मधा, असं असेल तर बिनधास्त आण पोरा मग!"
शेजारची दिवटी गाडीवर जातांना बाबाला मनात अनुसयाबाबतही हा विचार बऱ्याच वेळा यायचा. म्हणून निपंखी पोरीची कुठलीच हौस पुरी होत नाही याचं बाबास वाईट ही वाटे. त्यांनी जेवनानंतर मधास लगेच शहाद्यास आणलं.
रात्री आठ वाजेपर्यंत अंगणात अॅक्टीवा उभी राहिली. पुजा करतांना सयाला आनंदानं रडू आलं.
"काहो, तुम्ही बापलेकांनी गाडी आणली पण सयालाही कुठे जमते गाडी!" बनुमाय दौलतरावांना विचारू लागली.
" आपला मधा उद्यापासूनच तिला शिकवेल! तशी ताकीद घेतांनाच मी त्याला दिलीय!" बाबा हसतच म्हणाले. सयाला आज मधाबाबत मनात कमालीचा अभिमान वाटला. लहानपणापासून खास आपल्यासाठी न मागता अशी एकही वस्तू कोणी आणून दिली नव्हती. बापानंही नाही. साध्या रिबनसाठी लहानपणी तिनं कितीतरी मार खाल्ला होता. कळायला लागलं नी तिनं मागणंच सोडलं. कुणी दिलं तेच आनंदानं घ्यायचं मग जुनं, वापरलेलं का असेना! ती रात्रभर मधाच्या विचारात झोपलीच नाही.
सकाळी मधानं सयाला सोबत घेत रस्त्यानं तो मागे बसत सयास गाडी शिकवू लागला. सायकल शिकलेल्या सयाला मोपेड शिकणं जड गेलं नाही. आठ दहा दिवसात ती एकटी हळूहळू हळूहळू चक्कर मारू लागली. पण तरी तिला माधवनं मागं बसावं व आपण चालवावी असं आत खोल खोल पुन्हा पुन्हा वाटे. गाडीच्या आनंदापेक्षा तो मधाळ धुंदाळ गंधेल तिला स्वर्ग सुखाची अनुभूती देत होता. मळ्याच्या रस्त्यावर माधवनं सकाळी जातांना तिच्या कडे दिली व तो खाली थांबला. ती जाणार तोच दुरुन अनुराधा गाडीनं येतांना त्याला दिसली. त्यानं हाक मारत सयेस थांबवलं. तो मागे बसला व सयेकडं गाडी दिली. तोवर राधा जवळ आली. माधवनं सयेस सुचना देत गाडी चालवायला लावली. माधव व सयेस पाहताच राधाची तळपायाची आग मस्तकात गेली. तिला ओव्हरटेक करून गाडी पुढं काढणं जिवावर येऊ लागलं. पण रस्ता साकडा असल्यानं व सयाची गाडी वाकडी तिकडी होत असल्यानं तिला काढता येईना. मागं मागं चालतांना आग होऊ लागली. माधव आरशात मागं पाहत मुद्दाम सयाला बिलगून बसत सुचना करत होता. राधानं संतापानं एकसारखा हाॅर्न देत गाडी जोरात काढली. सयाला माधवचं बिलगून बसणं मनात कोलाहल माजवत होतं. सयानं गाडी थांबवली .
" मधा! मुद्दाम केलं ना?"
" काय?"
" तिला पाहूनच गाडीवर बसला व तिला साईड देतेवेळी तिकडेच गाडी नेणं!"
" आणखी?" मधानं हसत विचारलं
" आणखी! " सया लाजली व खाली मान घालत विचारात गढली.
भाद्रपदात गणपती उठले व जात्या पावसानं कहरच केला. दुसऱ्या दिवशीही तसाच! तिसऱ्या दिवशी सकाळी पाऊस थांबला .माधव दुपारुन शेतात जात दोन एकरातील कांद्याच्या वाफेतील पाणी वाफे फोडत काढू लागला. सहा वाजले तरी तो आला नाही म्हणून बाबांनी सयेस गाडी घेत मळ्यात पाठवलं. कारण माधव आज बुलेट न आणता पायीच गेला होता.
सया चिखलाच्या रस्त्यातून हळूहळू गाडी नेत मळ्यात आली. त्याचवेळी उत्तरेकडून एक काळा ढग वर चढून येत होता. माधवचं थोडंच काम बाकी होतं. तो ढग वाढत वाढत जोरदार पावसाला सुरुवात झाली. दोन्ही जण कांद्यातून झोपडीत येईपर्यंत ओलेचिंब झाले. भादव्याचा परतीचा थंडगार पाणी हुडहुडी भरवू लागला. अंधारासोबत पावसाचा जोर ही वाढला. पावसात निघणं जमेना. बाबाचा फोन आला. सयानं पावसानं झोपडीतच थांबल्याचं कळवलं. झोपडीतल्या साठ वॅटच्या बल्बच्या प्रकाशात सयाच्या चेहऱ्यावरील निथळणारं पाणी पाहून माधवला मागच्या पावसातली राधेसोबतची रात आठवली. तो झोपडीत ओल्या अंगानं बसत विचाराच्या काहूरात बुडाला.
" मधा, कसल्या तंद्रीत बुडाला रे!"
" सया हा झडणारा पाऊस वाहून गेलेल्या आठवांचा बाजार पुन्हा पुन्हा का भरवू पाहतोय गं!"
सया थरथरली. थंड वातावरणात हुडहुडी पेक्षा ही जास्त धडधड तिच्या ह्रदयात वाढली.
" मधा, वाहून गेलेल्या आठवांच्या बाजारात कितीही हिंडलं तरी वास्तवात हातात काहीच लागत नाही रे. त्यापेक्षा वास्तवातली छोटीशी गुजरी असली तरी माणसांनं खरेदीची बेगमी पहावी!"
सयाला गाडी शिकवतांना माधवनं बिलगून बसणं हे राधेला जाळण्यासाठी होतं हे तिनं ओळखलं. पण तरी आता तिला त्यावेळचा गंधेल आताही जाणवतोय व त्यात आपण बेधुंद होऊ पाहतोय पण कस्तुरीमृग तर दुसऱ्याच गंधात धावतंय.
" सया, आज खरच पश्चात्ताप होतोय मला! मी भिजायला हवं होतं, थांबायला हवं होतं! मी भिजलो नाही ,थांबलो नाही त्याचा आज पश्चात्ताप होतोय मला! पण मी आता लिप्सा, भावनांचं, दमण करण्याचा पोक्त शहाणपणा मुळीच दाखवणार नाही" म्हणत त्यानं पावसातच सयाकडंनं चाबी घेत गाडी काढली. सया मागं बसली पण रस्त्यावर येताच गाडी गावाकडं न वळवता त्यानं विरुद्ध दिशेने गाडी वळवली.
" मधा रस्ता चुकतोय रे अंधारात! गावाचा रस्ता मागं राहिलाय नी चुकलेल्या रस्त्यानं गाडी नेतोय तू!"
" सया, शांत बस!"
सया येणाऱ्या गंधेलात धुंद होत शांत बसली.
माधवनं राधेसोबत थांबला होता तिथंच गाडी आणली व उभी केली. तो खाली उतरला.
" सया, इथंच....इथंच ती भिजत उभी होती! किती किती जिवनाचं तत्वज्ञान सांगत होती, पण मी उगाच पोक्तपणाच्या आवरणात वावरलो"
तो जीव तोडून वेड्यागत सांगत होता.
" मधा, काय हे! वेळ पहा, अंधार ,पाऊस पहा! इथं थांबणं धोक्याचं आहे.चल पटकन घरी" सया घाबरून विनवू लागली.
" सये अगदी असंच मी पण त्या दिवशी म्हणत होतो. व ती 'माधव माणसानं मनात आलं ते त्याच वेळी करावं, उगाच दमन करु नये' सुचवत होती. पण आज माझ्या हातात पश्चात्ताप शिवाय काहीच नाही गं. ती याच जागेवर असल्याच अंधारी पावसात सुचवत होती की जवळच्या माणसाची दु:खे तुला अजुन भोगायचीत! पण मला त्यावेळी कळलंच नाही"
सयानं मधाची भयावह स्थिती ओळखली. तिच्या काळजात पावसातही वेदनेचा वणवा पेटला होता पण तरी तिला या घडीला मधास शीतलता हवीय हे ओळखलं व ती मधास गच्च गच्च बिलगली. तिला बाबा, बनु आत्या, आपला दिना बाप सारे आठवले पण तरी साऱ्या साऱ्यांना दूर भिरकावत पाण्यात तिनं सावळबाधी मिठी मारलीच.
पण माधव त्याच दिवसासारखा पुन्हा भानावर आला. त्यादिवशी आपण चुकलो असतो तर बाबास तोंड दाखवूच शकलो नसतो. म्हणून आज ही तो तसाच ताठ मानेने परतला. बाबांसमोर निष्कलंक अभिमानानं ताठ उभं राहण्यासाठी. एक धूसर रेघ माणसास स्वत:च्याच नजरेत स्वत:चं अध:पतन करते. भल्या माणसानं सांभाळावी ती रेघ! तीच धूसर रेषा माधवनं ही नेहमी सारखीच सांभाळली. रात्री दहाच्या आसपास ते घरी परतले.
अंगणात गाडी उभी करताच समोर बसलली राधा त्यास दिसली.
तो ताठ मानेनं वर नजरेनं पायऱ्या चढू लागताच राधेनं मान खाली करत उठणं पसंत केलं. मनातला वाहून गेलेला पाऊस आठवत!
दिवाळीच्या आधीच माधवनं दिना मामा व राधेशामला नेत सोयाबीन काढण्यासाठी हार्वेस्टर छत्तीसगडला नेलं....... कारण लवकरात लवकर दौलत बाबास चार एकरावरुन तीस एकरचा सातबारा द्यावयाचा होता.
क्रमशः......