नकोसा...............! -4
वा.........पा..........
पावसाळा सुरू झाला.शेतातली नवती केळीबागा, ऊसाचे फड पावसाचं पाणी पिऊन तरारले. कापुस, तुरळक ज्वारी कोंब काढत त्यांची पानं वाऱ्यावर उडू लागली. बाबा व बनुमाय शिवणीस गेले. केवळबाई सपशेल नाकारत असतांना काही एक न ऐकता मालखेड्यास घेऊन आले. एक एकराचं कोरडवाहू शेत कसायला दुसऱ्यास देऊन आले. नंतर माधव जळगावला जात प्रविण मासोळकरास भेटला. गेल्या मोसमात सारा आॅर्केस्ट्रा प्रविणच सांभाळत होता. त्यानं माधवला सारा हिशोब दिला. माधवनं सर्व कलाकारांचा पगार देत प्रविणलाच भागीदार करत आॅर्केस्ट्रा त्याच्यावर सोपवला. सारा पैसा स्वतंत्र खात्यावर जमा होताच. लाखो रुपयाचा संच, इन्स्ट्रूमेंट सारं प्रविण मासोळकरावरच सोपवलं.
जळगावमधील कृषी अधिकारी जोशी साहेबांनं प्रविणकडं निरोप ठेवला होता म्हणून दोघे साहेबाकडं भेटावयास गेले. साहेब नेमके कार्येशाळेच्या सत्रात बिझी होते. मूळचे कोकणातील साहेब अतिशय मायाळू होते. त्यांच्या मुलीच्या लग्नात माधवचा आॅर्केस्ट्रा ते खास घेऊन गेले होते. कला रसिक माणूस. माधव व त्यांचे तीन वर्षांपासून संबंध.
कार्यक्रमात बिझी असुनही त्यांनी वेळात वेळ काढून माधवशी बोलले. चहापान केलं.
"माधव काही काम नसेल तर थोडा वेळ थांब व कार्यशाळेला बस! बघ तुझ्या गावाकडील शेतीसाठी फायदा झाला तर!"
माधव व प्रविणला त्यांचा शब्द मोडताच आला नाही.
जोशी साहेब विभागीय शेतकरी मेळाव्यात कार्यशाळा घेत होते. माधव व प्रविण भरलेल्या हाॅलमध्ये शेतकऱ्यात बसले व जोशीसाहेबाचं व्याख्यान ऐकू लागले.
थायलंड, मेक्सिको, श्रीलंका चीनमध्ये घेतलं जाणारं निवडूंगवर्गीय 'ड्रॅगन फ्रूट' या फळपिकाची लागवड व व्यवस्थापन याबाबत साहेबांनी सखोल मार्गदर्शन करत लागवड, पाणी, हवामान, खत किड नियंत्रण व विक्री याबाबत व्याख्यानासोबत प्रोजेक्टरद्वारे मार्गदर्शन करत होते. माधवच्या डोक्यात काही विचार घुमले. पण मालखेड्यातली बाबाची शेती तर काळी कसदार व पाण्याचा सहसा निचरा न होणारी! तरी त्याच्या डोक्यात भविष्यासाठी काही तरी योजना घोळू लागली.त्यानं जोशीसाहेबाची रजा घेतली. प्रविणकडं सारा आॅर्केस्ट्रा भागीदारीनं सोपवत तो माघारला.
पावसाळा सुरू झाला तशा साथीच्या आजारांनी डोकं वर काढलं व अनुराधाचा दवाखाना जबर गर्दी खेचू लागला. गोविंद बी. ए.एम. एस. नंतर एम. डी साठी बाहेर जाण्याची तयारी करू लागला. पण गावातच अनुराधाचा चालणारा दवाखाना व भविष्यातील मनातल्या योजनेसाठी सुंदरबाईनं त्याला जाऊच दिलं नाही. व हवेलीतच अनुराधाच्या तोडीस तोड दवाखाना सुरू केला. गोविंद ही टाॅपर होता आधीपासून. महिन्यातच त्याच्या ही हाताला गुण आहे हे लोकांना अनुभवानं कळताच गर्दी विभागली गेली. अनुराधा आपल्या मोपेडवरुन गावात फिरत होतीच आता ती सुसरी काठच्या जवळच्या खेड्यातही जाऊ लागली.
सकाळीच ती बाहेर जाण्यासाठी तयारी करत होती. माधव अंघोळ करत हाॅलमध्ये आला. अनुराधा आज आषाढी एकादशी असल्यानं ड्रेस ऐवजी सिफाॅनची निंबोणी रंगाची साडी नेसली होती. ड्रेसींग टेबला- जवळ उभी राहत ती आरशात पाहत बट मोगऱ्याची वेणी केसात माळत टवकारू लागली. पण माधव हाताने ओले केस झटकण्यात आपल्याच धुंदीत होता. केस झटकत झटकत तो पुढे पाहणार तोच आरशातले दोन डोळे आपला सारखा पाठलाग करत आहेत हे त्याला कळणार तोच अनुराधानं दृष्टी तशीच एकटक ठेवत डोक्यावर पदर घेतला. मूळचाच गोरा रंग, त्यावर निंबोणी साडी उठत होती . लाल ओठावर खोडकर हास्य खुललं. कायम ड्रेसवर पाहायची सवय असलेल्या माधवला सेंधव्याची आठवण आली. त्या दिवशी ही ही अशीच इरकली साडी नेसली होती व हिला पाहूनच आपण त्या दिवशी अचानक " यही कही जियरा हमारा...." हे गाणं म्हटलं होतं व आपल्या अपेक्षेपेक्षाही जास्त ते गाणं उठलं. हिच्याच चुलत भावांनी ते रेकाॅर्ड करुन यु ट्युबला अपलोड केलं असावं. ते गाणं धूम मचवतंय.
" आत्याला बोलवू का? काय पाहतोय डोळे फाडून फाडून!" पदराशी चाळे करत समोर तोंड करून अनुराधा हसतच डिवचू लागली. माधव भानावर आला व सरळ केस न विचरताच तसाच ओसरीकडं निघाला.
" मूर्खा थांब थांब.....!" अनुराधा हसतच मागावून धावली पण तोच मंदिरातून बाबा परतले व आत प्रवेशीत झाले. ती स्वत:वरच संतापली. आपण नाहक वेळ दवडला म्हणून ती खजील झाली.
आज पाऊसही एकादशीच्या वारीला यावा तसा झोडपू लागला. सुसरी दोन्ही थडी वाहू लागली. त्यात मालखेड्यातले ओहोळ भर टाकू लागले. पावसानं बाबा व माधवला शेतात जाताच आलं नाही. दुपारी बनुमायनं माधव व अनुराधाला सोबतच विठ्ठल मंदिरात नेलं.
" माय! तुम्ही जा आधी, मी येईन नंतर!"
" अरे बाबा दोन्ही सोबतच चला.गावालाही पाहू देत आमचा मुलगा व भावी सून!" बनुमाय हसतच बोलली.
अनुराधेचे गाल अधिकच लाल झाले व डोळे सकाळचाच खट्याळपणा करत गावातलं पाणी सुसरीत उतरावं तशा माधवच्या रांगडी नजरेत उतरू लागले. पडणारा पाऊस, साडीचा मुद्दाम पुन्हा पुन्हा डोक्यावर चढणारा पदर, ढळलाच खांद्यावर तर चंद्रकोरीप्रमाण कुंतलात झुलणारी बटमोगऱ्याची वेणी माधवला घायाळ करत होती.
मंदिरात बाबा, बनुमायला सोबत घेत माधव अनुराधा निघाले. पन्नासेक लोकांची रांग आधीच मंदीराच्या सभामंडपात उभी. बाबा, बनुमाय, माधव व मागे अनुराधा उभी रहिली.
" देवा बा विठ्ठला! ज्या देवमाणसानं बापाचं नाव, माया दिली त्याची माझ्याकडून सेवा घडू दे! त्यासाठी माझ्या बाबास व आईला दिर्घायुष्य दे! तु आज झोपशील पण तू उठेपर्यंत चार महिने हे सोबतच वादळ पेलायचा संयम व तटस्थपणा दे!" माधवनं डोळे बंद करत विठ्ठलास साकडं घातलं.
संध्याकाळी सुसरी पार खेड्यातील एक म्हातारा सिरीअस असल्याचा फोन आला. अनुराधानं बॅग घेतली रेन कोट घातला.
" राधा, अंधार पडतोय व बाहेर पावसाचा जोर ही वाढतोय! नको जाऊस!"
" बाबा पेशंट गरीब म्हातारा आहे! मी ओळखते. सिरीअस आहे! रात्र त्रासात कशी काढेल? गाडी आहे, जाते व लगेच येते!"
" राधा अशा लोकांच्या सेवेत मी कधीच आडकाठी करणार नाही. पण सुसरी दोन्ही थडी वाहतेय. फरशीवरुन गाडी नेणं धोक्याचं आहे! तरी तू थांब.मी गोविंदाला पाठवतो.तो जाऊन करेल उपचार"
बाबानं पलीकडे जात गोविंदला जवळच्या खेड्यातील माणसाचं नाव सांगत जायला सांगितलं.
गोविंदानं 'हो' सांगितलं. पण बराच वेळ होऊनही गोविंद निघालाच नाही.
" असल्या मरणाच्या पावसात म्हातारड्या साठी कोण जाईल" म्हणत गोविंद हवेलीबाहेर पडलाच नाही.
माधवनं बुलेट स्टार्ट करत आनुराधाला बसवलं. गाडी पाणी चिरत सुसरी काठावर आली नदीचं रौद्ररुप छातीत धडकी भरवू लागलं. अनुराधानं मागून खांद्यावर हात ठेवला व आकाशात वीज कडकडावी तसाच रोमांच माधवच्या अंगात दौडला.
फरशीवरच्या पाण्यात आताच गाडीचं सायलेंसर बुडत होतं. व पावसाचा जोर तर वाढतच होता.
" खाद्यावरचा हात काढ व मागच्या कॅरीला धर!"
" मुकाट्यानं गाडी चालव! चार महिन्यात लग्न तर होणारच आहे मग एवढा काय घाबरतो! का लाजतो!"
" त्या आधीच गाडीवरून पडली तर नाहक हात पाय मोडेल! म्हणून सांगतोय व्यवस्थीत बस!"
" पडली तरी तू आहेस ना!" म्हणत आता तर ती बिलगूनच बसली.
माधवनं गाडी पळवत लवकर खेडं गाठलं.
म्हातारा डायरियानं बेजार होता. शरीरातलं पाणी कमी होतं डोळे खोल घुसले होते. राधेनं बोटाच्या चिमटीत पोटावरची कातडी धरुन पाहिली.
अनुराधानं बऱ्या बॅगेत सलाईन्स सोबत आणल्या होत्या. सलाईनमधून इंजेक्शन चढवत लावली ओ आर एस देत पाणी गरम करावयास लावलं. सलाईन संपेपर्यंत दिड दोन तास तिथंच थांबावं लागलं. म्हाताऱ्याच्या मुलानं शेजारून दोन खुर्च्या आणत डाॅ. व माधवला बसायला लावलं. छोट्याशा जागेत धाबं गळत होतं, गळक्या ठिकाणी पोराची बाई भांडी ठेवत होती. तिची बारकी पोरं गोधडीत पहुडली होती. म्हाताऱ्याचा पोरगा व बाई कशीबशी धगधगणाऱ्या चुलीजवळ बसली होती. लाईट गेल्यानं काचेची चिमणी धूराची वाकडी तिकडी रेषा धाब्याकंडं ढकलत जळत पिवळा मिणमिणता प्रकाश फेकत होती. ओट्यावर बांधलेल्या शेळ्यांच्या लेंड्या-मुताचा वास पाण्यात उग्र दर्प सोडत होता. एरवी अनुराधास अशा वातावरणात थांबणं जडच होतं. पण मिणमिणत्या प्रकाशात जवळ बसलेल्या माधवचा गोड सहवास या साऱ्या अडचणीवर मात करत स्वर्ग सुखाची अनुभूती ती अनुभवत होती. मुलगा व सून डाॅक्टरताईकडं, डाॅक्टरताई माधवकडं , माधव कधी राधाकडं कधी सलाईनकडं तर कधी म्हाताऱ्याकडं आळीपाळीनं पाहत होता. सलाईनमधून टपकणाऱ्या औषधासारखेच छतावरुन टपकणारे पावसाचे थेंब माधवच्या व राधेच्या डोक्यावर टपकत होते.
टपकणारा प्रत्येक थेंब म्हाताऱ्याच्या मुलास व सुनेस ओशाळवाणा करत होता. पण राधेला तर त्या टपकणाऱ्या थेंबात सावळ्या हरीच्या व राधेच्या अतृप्त प्रेमाचं अमृतच जणू बरसत होतं. हा अवर्णीय सोहळा रात्री दहाच्या आसपास भर झोडपणाऱ्या पावसात संपला. माधवनं गाडी सुरू केली. मुलानं व सुनेनं म्हाताऱ्यास आरामानं झोपलेला पाहून हात जोडले.
अनुराधानं बॅग साईडला अडकवली. गाडी अपुऱ्या पिवळ्या प्रकाशात अंधार, पाऊस व रातकिड्याचा आवाज चिरत फटफटफट आवाज करत निघाली.
गाव मागे टाकताच राधा परत माधवला बिलगली. पुढे आल्यावर तिनं गाडी थांबावयास लावली. माधवनं साईडला गाडी घेत सुरुच ठेवत थांबवली. राधेनं पुढे लाईटच्या उजेडात येत अंगावरील रेन कोट काढला.
" का गं? का काढतेय रेनकोट? पावसात भिजशील ना!"
" काहीच कामाचा नाही हा? धड कोरडं ही नाही व धड ओलं ही नाही! त्या पेक्षा मला पूर्ण भिजायचंय!" म्हणत तिनं तो मागच्या बॅगेजवळ अडकवला.
" माधव गाडी बंद कर!"
" का?"
लाईटच्या उजेडात अर्धवट भिजलेल्या राधेच्या चेहऱ्यावरील निथळणारं पाणी माधवला दुपारीच विठ्ठलासमोर केलेली याचनेची आठवण करुन देत होतं.
" माधव, अशा अंधारात आषाढसरी मुक्तपणे अंगावर घेण्याची लहानपणापासून मला खूप हौस आहे रे! पण बापाची शिस्त, शिक्षण यात असला मोकाच मिळाला नाही"
" अनु! असल्या अंधारात व वादळवाऱ्यात सातपुड्यातून एखाद चुकार जनावर आलं तर महागात पडेल! मुकाट्यानं बैस!"
" माधव फक्त पाच दहा मिनिटे थांब मला फक्त भिजायचंय .दुसरं काहीच नको! कधी कधी काय होतं माहितीय का तुला? माणूस उगाच शहाणपणाचा वा मोठेपणाचा आव आणत पोक्त होतो व मनातल्या या अल्लड आशा, लिप्सा, मनातच दडपून टाकतो! साध्या साध्या गोष्टी तील आनंद घ्यायचा तसाच राहून जातो! वेळ निघून जाते, काळ थांबायचा राहून जातो.मग माणसाला वेळ निघून गेल्यावर सतत पश्चात्ताप, सल राहून जाते की अरे हे तर राहिलंच! किती सहज शक्य होतं पण मोठेपणाच्या बेगडी बडेजावात आपण भोगलंच नाही! मग तो भिजण्याचा आनंद असो! आकाशाकडं हात फैलावत खळाळत हासणं असो, कुठं फिरणं असो वा कुणाला माफ करणं असो, कुणाजवळ व्यक्त होणं असो! "
" छान विचार करतेस गं तू! यात बुद्धीची तल्लखता दिसते बरं!"
" वैद्यकीय शिक्षण घेतलं म्हटल्यावर तितकी मती असायलाच हवी!"
आता त्यानं ही गाडी बंद करत गाडी स्टॅण्डला लावली.
" अनु मी तुझ्या इतका नक्कीच शिकलो नाही.पण गरिबीनं, अनुभवानं ,जवळच्या माणसांनी जिवनाच्या धगीच्या चार गोष्टी मला ही शिकवल्या!"
" कोणत्या? जवळच्या माणसांच्या अपेक्षा, दु:खं कळतात का तुला?"
" कळतात! पण ज्या वेळेस माणसाचं स्वत:चं पोट भरलेलं असेल, उद्याची चिंता नसेल तरच माणूस हासणं, भिजणं, बागडणं, आस्वाद घेणं असल्या गोष्टीवर लक्ष देतो. अन्यथा आपल्यांनी दिलेले चटके, भविष्यातील अंध:कार त्याला असल्या गोष्टीचा विचार ही करू देत नाही. म्हणून सांगतो चल ! अंधारात थांबणं धोक्याचं आहे!"
" माधव जवळच्या माणसाची अजुन बरीच दु:खे तुला भोगायची आहेत!"
भिजलेल्या अनुराधेच्या डोळ्यातला असुरीपणा माधवला दिसला तर नाहीच पण समजला ही नाही.
" कार्तिकी एकादशी होऊ दे मग जवळच्या माणसांची सारी दु:खे मी भोगायला आनंदाने तयार होईन!"माधव हसत व सावध बोलला .
अनुराधानं आपलाच खालचा ओठ दातात चावला .
सुसरी नदीच्या फरशीवर तर आता येते वेळेपेक्षा फुटभर जास्त पाणी चढलं होतं. माधवला तरी गाडी दामटण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यानं रेस फुल्ल करत गाडी बंद न पडू देता फरशी पार केलीच.
चार महिने अनुराधेच्या प्रेमात कसे गेलेत कळलेच नाही. माधवनं सिमारेषा आखल्या तरी त्याला ही कळून चुकलं की एकादशी होताच लग्न हाच पर्याय आता उरला. कारण आपण अनुशिवाय जगूच शकत नाही. घरचे ,गाववाले सारे तर त्यांच्या लग्नासाठी आतुरच होते.
मध्यतंरी अनुसयाबाबत दंगलरावांच्या हवेलीतली वागणूक आता पार बदलली होती. दंगलराव नाही पण सुंदरबाई व गोविंद अनुसयाला सेंधव्यात परत पाठवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होते. सुंदरबाईचं घालून पाडून बोलणं, प्रसंगी हात उचलणं, रात्रंदिवस कामाचा पसारा आवरायला लावणं वाढलं. अनुसयेला असह्य होऊ लागलं. पण तिला कुठंतरी आशा होती की गोविंदशी लग्न झालं की गोविंदचं वागणं बदलेल.सुंदर आत्याचं वागणं बदलेल. त्या आशेवर ती सारं सहन करत होती.
मध्यंतरी दत्ता काका, वना काका आले. रात्री बऱ्याच उशीरा सर्व झोपल्यावर सुंदरबाई व दत्ता, वना काकातलं बोलणं तिनं पडून पडून ऐकलं. तिला सेंधव्याला रिसेप्शनला गेलो तेव्हाची बोलणीही आठवली व त्या बोलण्यातला संदर्भ आज उकलला. ती भयभीत झाली.
सकाळी उठताच तिनं इशाऱ्यानं माधवला मंदिरात यायला सांगितलं. माधवला कळेना! तरी तो मागोमाग मंदिरात गेला. सकाळी मंदिरात एक दोन लोकांची उपस्थिती वगळता शांतता होती.
" मधा!"
माधवला मधा ऐकताच एकदम भरल्यागत झालं. त्याला सयाबद्दल कायम आदर व कणव वाटे. आतापर्यंत सेंधव्याला घेऊन गेलो तेवढाच संबंध तरी सया बद्दल आपल्या मनात एक राऊळात दरवळावं तसं पावित्र्य व प्रसन्नता का दरवळते हे कळेना!
" काय झालं सया!"
'सया ' शब्द ऐकताच तिलाही गलबलुन आलं.
" एक ऐकशील?"
" बोल ना! का नाही? विश्वास नाही का?"
" मी जे सांगतेय ते कुणाजवळच सांगू नको! फक्त बाबांच्या कानावर घाल! माझं नाव न सांगता!"
" काय आहे ते तर सांग!"
" एकादशीला तुळशी विवाह होताच अनुराधाशी होईल तितक्या लवकर लग्न उरकव!"
माधवला हसू आलं.
" सया का इतकी घाई गं!"
" सया जमलं तर अनुराधेच्या नावावरची जमीन तुझ्या नावावर करायला सांग बाबांना!
" सया का? काय झालं?"
" काही नाही पण तरी....!"
तेवढ्यात गावातला दुल्लब दादा
" पांडुरंग हरी, ज्ञानोबा माऊली, तुकाराम महाराज....." म्हणत दर्शनाला आले.
माधव जवळ उभ्या असलेल्या अनुसयानं हात जोडत डोळे मिटले.
दुल्लब दादा पाया पडत आल्या पाऊली निघून गेले.
" सये, लग्नासाठी तर दोन्ही आतुर आहोत . बाबाही एकादशी होताच तयारीत आहेतच !"
" विठ्ठलकृपेनं तसंच घडो! पण तरी जमीन नावावर करुन घे!"
आता मात्र माधवला अनुसयाचा रागच आला. कारण जमीन राधाच्या नावावर असली तरी काय बिघडतंय!
" सया मला जमिनीत अजिबात स्वारस्य नाही. माझ्या नावावरील बापाचं ओझं कमी करत बाबांनी बापाचं नाव दिला यातच मला सारं मिळालं. !"
" मधा, हात जोडते हे फक्त माझं नाव न सांगता एकांतात बाबाच्या कानावर घाल !"
तोच मंदिरात कुणी तरी येत असल्याचा आवाज आल्याने व येऊन बराच वेळ झाल्यानं अनुसया निघून गेली
अनुराधेच्या मोहात आंधळा झाल्यानं माधवनं अनुसयेचं मनावर घेतलंच नाही.
दुपारी दत्ता कानानं अनुसयेस " दिनानं भेटावयास बोलवलंय" सांगत तयारी करावयास लावली. वडिलांनी भेटावयास बोलावलं यावर अनुसयेचा विश्वास बसला नाही. तिनं येण्यास नकार दिला.
" का गं बोलवलंय तर जा ना!" सुंदर बाईनं दरडावलं.
सततचा जाच, मार यानं ती ही कंटाळली होतीच पण तिथं जाऊन ही आई सुख लागू देणार नाही म्हणून इच्छा नसतानाही आत्या व काकाच्या सांगण्यानुसार ती निघाली.
दत्ता , वना काकांनी घरी सोडलं. वडिल घरी नव्हते. तिला पाहताच सावत्र आईनं घरात आदळ आपट सुरू केली. अनुसया शांतपणे ऐकत राहिली. रात्री कामावरुन वडिल परतले. पोरीला पाहताच बापाचं काळीज सुपाएवढं झालं.
" सया, कशी आहेस बेटा? आत्या काय म्हणतेय?"
" मजेत आहे बाबा! आत्याही मजेत!" आतला सारा ढवंढाय दाबत ती म्हणाली.
आठ दिवसातच आईनं
"मला ही अवदसा घरात नको! हिला उद्याच घालवा" म्हणून वडिलांना दम भरला.
बापाच्या डोळ्यात आसवे दाटली.
" सुमे, पोर आलीय तर राहू दे ना!"
" पोरीला ठेवायला तुझ्या घरात धनधान्याच्या कणग्या भरल्यात ना! ठेव पोरीला!"
दिनानं ओळखलं आता सयाला ठेवणं म्हणजे घरात राडा मातवणं. त्यापेक्षा सुंदरताईला भेटत गोविंदरावाशी पोरीच्या लग्नाबाबत बोलणं ही होईल व पोरीला पोहोचवणं ही म्हणून त्यांनी सयेस तयारी करायला लावली.
अनुसयेच्या काळजात अंधारल्या भविष्याची होळीच सुलगली.
आपल्याला भेटायला वडिलांनी बोलवलंच नव्हतं हे एव्हाना आईच्या बोलण्यावरुन तिला कळलंच होतं. म्हणजे सुंदर आत्यालाही आपण नकोय म्हणून तर आपणास काकास़ोबत पाठवलं. पण इथं तर आपली सावली ही नको! मग? कुठं जायचं? काहीच कळेना.
मुक्या गाईगत तीतरीही वडिलांसोबत निघाली.
संध्याकाळी हवेलीच्या दारात यांना पाहताच सुंदरबाईची तळपायाची आग मस्तकात गेली. दिनानं तिकडे दुर्लक्ष करत मिंधेपणानं खालमानेनं दिना ताईचा पाया पडला. त्याकडं कुणीच पहायला तयार नव्हतं. तो बनुताईकडं आला. ताईनं त्यासाठी चहा ठेवला. दौलतबाबा आले.
" काय रे दिना? मध्येच कशी फेरी काढली?"
" बाबा, तुळशी विवाह येतोय. सयेच्या लग्नाबाबत बोलावं म्हणून आलोय!"
" बरोबर, घाबरू नको !
राधा- माधवच्या लग्नासोबतच
गोविंद- अनुसयेचं उरकायला लावतो!"
बाबाच्या या शब्दांनी दिनाचं काळीच आभाळागत खुललं. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बाबांनी त्याला सोबतच जेवणाला बसवलं. आज अनुराधाकडून दोन तीन वेळा भांडी पडली. पण बनुमायला तो अपघात वाटला.
सकाळी दिना दंगलराव व सुंदरताईला भेटला.
" दादा, आता एकादशी झाली की गोविंदरावाशी सयेचं उरकावुन घेऊ!"
" माझी काही हरकत नाही तरी तु तुझ्या ताईला विचार! मला जिल्ह्याला जायची घाई आहे. मी निघतो!" म्हणत रात्रीच सुंदरचा कानमंत्र मिळाल्यानं जड अंतःकरणाने दंगलराव दिनाचा हात हातात घेत निघाले.
" ताई, मग मी पक्कं समजू ना? निघतो मी!"
" दिना, काय पक्कं समजतोय रे?"
" सया व गोविंदराव यांच....."
" दिना, बिलकुल नाही .याबाबत मी काहीच सांगणार नाही."
" ताई चार वर्षांपूर्वी तर अनुसयेला तू त्याच बोलीवर आणलं होतं ना?" मग आता?"
" दिना, तेव्हा गोविंद शिकत होता! आता तो डाॅक्टर झाला बाबा! नी ही पोरं शिकली की हुकतात! आता तो अनुसयेला नाही म्हणतोय तर मी तरी काय करू!"
दिनाची पायाखालची माती सरकली व आभाळ कोसळतंय अशी घेरीच त्याला आली.
" ताई पाया पडतो. माझी अनुसया गुणाची आहे व रूपातही कोणी नाव ठेवणार नाही म्हणून गोविंदरावांना समजव ना!"
" दिना, सांगितलेलं कळत नाही का?"
दिना रडू लागला.
" दिना रडून उपयोग नाही. सरळ घरी ने तिला. तुच म्हणतोय ती गुणाची व रुपवान आहे असं तर कुणीही स्विकारेल तिला. हवंतर मी लग्नासाठी पैशाची मदत करेल! आणि हो इथं बाबा, काका, दादा कुणालाही तू बोलला तरी कोणत्याच बाबाचं इथं काहीच चालणार नाही लक्षात ठेव"
शेजारी बाबांच्या कानावर सारं बोलणं जात होतं. त्यांची आग होत होती. यांच्या मनात नेमकं काय गणितं चालली याचा त्यांना ठावच लागत नव्हता. राधा जर माधवशी लग्न करणार तर गोविंदशी अनुसयेशी हे का करत नाही हा मोठा सवाल त्यांना पडला होता.
दिनानं ओळखलं पोरीचं नशीबच फुटकं. इथं लग्न शक्यच नाही हे जाणलं
" ताई जशी इच्छा! पण मग तुझ्या मदतीला तरी ठेव पोरीला व तुला योग्य वाटेल ते स्थळ पाहत रहा!"
" आम्ही काय विवाह मंडळ सुरू केलंय का रे! तेवढीच काम आहेत का? ते काही नाही सरळ तिला ने सोबत!"
" ताई, ऐक ना! हात जोडतो.पोर सारी कामं करील. तुला तर सुमीचा स्वभाव माहीतच आहे. त्यापेक्षा इथं राबेल व राहिल सुखानं"
" दिना, समजत नाही का? माझ्या जिवावर पोरीस जन्मास घातलं का? चल तिला घे व निघ!"
तरी दिनास सुमीनं येतांना दिलेली तंबी आठवली. तो आपल्या चुलतबहिणीचा पायाला लागला व रडू लागला.
अनुसयानं कालची पिशवी जशीच्या तशी उचलली व बापाच्या खाद्याला पकडत उठवलं.
" बाबा ,चला!"
" सये ,नको! आत्यानं मारुन टाकलं तरी ही पायरी उतरू नको!"
" बाबा चला.." सया रडतच म्हणाली.
दिना व सया रडतच खाली उतरले. तो दौलतबाबाकडं चढणार तोच सयेनं हात पकडत नजरेनंच हात जोडत मान हालवत नकारलं व ती पुढं निघाली. तोच मागून
" अनुसया, परत फिर! "
" दिनाचे पाय थबकले.पण अनुसया तरी पुढेच ओढू लागली."
" अनु! हा तुझा बाबा सांगतोय ना! परत फिर!"
सया ओक्साबोक्शी रडत बाबास व बनु आत्याला बिलगली.
बनुमाय व बाबानं दिनूस जेवण खाऊ घालत धीर दिला.
" अनुसयेचं आम्ही पाहू. दुनियेत कुठं ना कुठं तिच्यासाठी जोडी असेलच!"
दिनाचं मोठं ओझं हलकं झालं .तो खुशीनं परतला. सुंदरताईचा नकार त्याला दत्ता व वनानं कळवला होताच पण तरी त्याला निदान पोरीला कामासाठी तरी सुंदरताई ठेवेल या आशेनंच तो आला होता.
घरात अनुसया येताच राधा भणाणली. कारण एकादशी येऊ लागली तशा तिच्या व सुंदर आत्याच्या एकांतातल्या भेटी वाढल्या होत्या. आता शेवटचा स्फोट करायची वेळ जवळ होती.
अनुराधा सकाळीच औषधं घेण्यासाठी मोपेडनं तालुक्याला निघाली. माधव शेतात गेला. पण दुपारी बोअरवेलचं स्टार्टर जळाल्यानं व पपईवरील फवारणीचं औषध घेण्यासाठी माधवही बुलेटनं तालुक्याला निघाला.
त्यानं स्टार्टर टाकलं व फवारणीचं औषध घेऊन दुकानातून निघणार तोच समोर राधा मोपेड साईडला लावत उभी असलेली त्याला दिसली. तो तिच्याकडं जाणार तोच फोर व्हिलर आडवी उभी राहिली. गोविंदची गाडी त्यानं ओळखली. गाडीत बसत राधा निघाली. माधव जागेवरच उडाला. राधा व गोविंद कधी बोलत ही नसत नी सोबत तर शक्यच नाही. त्याला वेगळीच शंका आली.त्यानं घरी काॅल केला.
" बाबा, राधा घरी आली का?"
" नाही. का ?"
" काही नाही. मी येतोच आता" म्हणत त्यानं फोन कट केला. घरी काही घडलं असतं तर बाबा बोललेच असते. त्यानं बुलेट दुकानावर उभी करत दुकानदाराची बाईक घेतली व तो गोविंदच्या गाडीच्या दिशेनं निघाला. काही अंतरावर पुढे चालत असलेली गाडी दिसली. याचं हेल्मेट होतं. गाडी दुसऱ्याची होती तरी तो अंतर राखून पाठलाग करत होता.
सुनसान जागेवर झाडाखाली गाडी थांबली. यानंही आडोशाला गाडी थांबवली. पाच दहा मिनीटानं विरुद्ध बाजुंकडून गाडी आली व थांबली. गाडीतून कागदं बाहेर आली.दोघांनी काही तरी लिहीलं. गाडी गेली. त्यानंतर दोघे पाच दहा मिनीटे हासत खिदळत उभे राहिले.मग गाडी परतली. त्या आधीच माधवही परतला. दुकानावर येत घाईत बुलेट काढत तेथून बाजुला सरकला. राधा उतरली व मोपेड घेत निघाली.
माधवचं डोकं भणाणलं. काही दिवसांपूर्वी हिचा वडिल येऊन लग्नाची घाई करायला लावतो , सया मंदिरात भेटत लग्नाची घाई करायला लावते, जमीन नावावर करायला सांगते...यात काही तरी नक्कीच तथ्य आहे. सुंदर आई आपल्या नावावर जमीन न करता राधेच्या नावावर करते! याच्याशी याचा काही तरी संबंध आहे नक्की! पण मग चार महिन्यांपासून आपल्याशी जो खेळ चालूय तो नेमका काय? तो चक्रावला. त्याला जमिनीची लालसा बिलकूल नव्हती .पण राधा...! तिच्याशिवाय आपण राहूच शकत नाही.पण ती तर......
घरी आला. त्यानं काहीच झालं नाही असं दर्शवलं. आठ दिवस झाले. त्याला तगमग सहन होईना. विचारावं का? पण त्यानं संयम बाळगायचं ठरवलं.
ती खेड्यावर गेलीय हे पाहून माधवनं सयाला बुलेटवर बसवलं व मळ्यात नेलं. अनुसया घाबरत होती.
" सया लवकर लग्न कर असं का म्हणाली होतीस तू!"
" मधा , ते महत्वाचं नाही आता! फक्त आता लवकरच लग्न उरकवा म्हणजे निस्तरेल सगळं"
" सया , आता निस्तरणार नाही तर चिघळेल असंच वाटतंय!"
माधवनं पुन्हा पुन्हा विचारुन ही अनुसयानं काहीच न सांगता फक्त राधेशी लवकर लग्न कर एवढंच सांगत मळ्यातून लवकर घरी आणलं.
घरी येताच राधा अचानक सेंधव्याला गेल्याचं कळालं. पण राधा सेंधव्याला पोहोचलीच नाही. दोन दिवस हवेलीत गोविंद व सुंदरबाई ही नव्हती. बाबा माधव सेंधव्याला गेले. राधा नाही हे ऐकताच विठ्ठलरावांनी डोक्याला हात मारून घेतला व दत्ता, वनाला शिव्या द्यायला सुरुवात केली.
दोन दिवसात गोविंद व अनुराधा कोर्ट मॅरेज करून परतले.
सर्व गुंथन काला. तो ही इतक्या अचानक झाला की माधवला सोडवणं तर दूरच पण कोणता धागा कोणत्या धाग्यात केव्हा गुतत गुंथनकाला झाला तेच कळालं नाही. त्याला विठ्ठल राव, अनुसया कडून संकेत मिळाले होते .पण राधेनं चार महिन्यात त्याला त्याच्याच सावळबाधेत एवढं अडकवलं होतं की हे संकेत समजण्याइतपत त्याची मती शाबुत नव्हतीच. सुंदरबाईची एक प्यादी सरासर चाली चालत राणी झाली पण स्वत:च्या राज्यालाच चेकमेट करत.
सर्व चाली कोण कोण खेळलं?
दंगलराव?
सुंदरबाई?
दत्ता?
वना?
गोविंद राव?
अनुराधा?
कोण?
ते तर माधवला कळालंच नाही तर बाबास कसं कळणार? त्यात हवेलीतल्या सारीपाटावरील पुढच्या खेळाच्या चाली कोणत्या??????
क्रमशः