नकोसा........
वा.......पा..........
हवेलीच्या दारातच बनुमाय पुजेचं ताट घेऊन आनंदानं सामोरी आली. गल्लीतले आजुबाजुचे गोळा होऊ लागले. तरणी नाही पण म्हाताऱ्या माणसांची ज्यांनी रेशमला पाहिलं होतं; त्यांना दंगलरावाची पहिली पत्नी रेशमचा मुलगा पहिल्यांदा येतोय हे कळताच वारुळ फुटून मुंग्या गोळा व्हाव्यात तशी हवेलीसमोर गोळा होऊ लागली. धुळ्याच्या मेडीकल काॅलेजला शेवटच्या वर्षाला असलेल्या अनुराधेला आधीच कळवत बोलवलेलं होतं. पण तिला यायला उशीर झाल्याने ऐनवेळी हवेलीतल्या अनुसयेनच बनुआत्यासोबत माधवला ओवाळत कुंकुम तिलक करत, अक्षता फेकत, दहीभात शिंपडला.
माधव " माय..........!" म्हणत बनुमायेच्या पायाशी वाकणार तोच
'माय...' एका शब्दानं संततीसुखाला पारखी बनुबाई झरझर विरघळली. डोळ्यात आनुदाश्रू, ह्रदयात मातृत्वाचा महासागर उचंबळला. त्यांना दवाखान्यात दौलतरावाच्या मांडीवर आचके देणारी रेशम समोर दिसू लागली.
" ताई आता तुम्हास वांझ बोलण्याची कोणीच हिम्मत करणार नाही!" रेशमचं शेवटचं बोलणं आठवलं व त्यांनी माधवला ह्रदयाशी घट्ट, घट्ट आवळत अश्रूंना मुक्त वाट करुन दिली.अनुराधा बऱ्याच उशीरा आली.
दोन दिवसांनी अख्ख्या मालखेड्यास दौलतरावांकडचं आमंत्रण फिरलं. साऱ्या गावास दौलतरावांनी खुशीनं जेवू घातलं. फक्त दंगलराव सुंदरबाईंना अचानक महत्वाचं काम निघाल्यानं तीन दिवसांपासून ते गावातच नव्हते. साऱ्यांनी समजून घेतलं.
माधवला सारं नवखं व अचंबीत करणारं होतं. आई-वडीलांच्या प्रेमास पारख्या त्याला बाबा व बनुमायकडून भरभरून प्रेम मिळू लागलं. नवीन गाव, नवीन परीसर, नवीन लोक पाहत बदल त्याच्या लक्षात येऊ लागला. सुसज्ज भली मोठी पूर्वमुखी हवेली तिच्या डाव्या हाताला मोठा चौक. हवेलीत महागडं फर्नीचर . त्याच हवेलीत राहणारी कलाकाकु, रमण काका, राधेश्याम हा चुलत भाऊ, अनुसया व अनुराधा या मामाच्या मुली, साऱ्यांचा परीचय बाबा हळूहळू करुन देऊ लागले. पाच सहा दिवसात तो दिवस आलाच. दंगलराव परतले. बापाचं नाव तर काढलं गेलंच होतं. नजरानजर झाली. माधवच्या रंध्रारंध्रात, नसानसात रक्तासोबत संमिश्रीत भावना ओसंडल्या. पण समोर.....? समोर ... नजरेत राग संताप तिरस्कार.....
बाबा माधवला गावात शेतात मळ्यात फिरवत लोकांशी परीचय करून देऊ लागले. त्यात एक बाब अनेकांच्या बोलण्यावरुन वारंवार त्याच्या कानावर येऊ लागली. अनुराधा ही मामाची मुलगी असुन तीच बनुमायची भावी सून होणार. पण घरात पाच दिवस राहून धुळ्याला परतलेल्या राधेला पाहतांना माधवला कसं तरीच होई. माधव आतापर्यंत दुसऱ्याकडं राबत आलेला. उन्हातान्हात राबलेला. बाबाची मदत होती तरी गरिबी काय हे जवळून पाहणारा. मागच्या चार वर्षांपासून स्वत:चा 'एम.डी. संगीत' आॅर्केस्टा काढून सुखाचे दिवस त्यानं आणले होते. पण तरी अनुराधेसमोर तो स्वत:ला लपवू पाहत होता.
मळ्यात बाबासोबत फिरतांना इकडच्या पपईच्या फुललेल्या बागा, केळीच्या बागा, तोड चाललेले ऊसाचे फड कापूस निघताच गव्हाचा पसरलेला हिरवट पोपटी गालीचा पाहून तो सुखावे.
एका महिन्यात मालखेड्यातली हवा, हवेलीतलं सुखवस्तू खाणंपिणं, बाबा व मायची माया मानवली. मूळचा उंचपुरा, तगड्या माधवचा रंग खुलला. आकर्षक माधव अधिकच फुलला.
दौलतरावांनी दंगलरावाकडं विषय छेडला.
" दंगल, माझा माधव परतला! सुरळीत झालं. आज पावेतो मला शेतीबाबत कधीच सोस नव्हता.पण आता तब्येतीचाही भरवसा नाही. म्हणून माझ्या डोळ्यादखत मला सारा निपटारा करायचाय!"
" बाबा, आपण म्हणाल तर उद्याच सारं मोकळं करतो!"
" तेच म्हणतोय मी! डोळ्यादेखत गोविंद व माधवचं क्षेत्र ठरवलं म्हणजे त्यांच्या नावावर उतारा चढवून आपल्या कर्तव्यातून मोकळं झालेलं बरं!"
दुसऱ्या दिवशी बाबा रमणराव दंगलराव शेतात जात थाळ्यागत तीस एकराचा एकठाव मळ्याच्या मधोमध दगडाच्या खुणा गाडत बांध पडला. बाबाला मनात कृतकृत्य झाल्यागत झालं. पण हवेलीत एका मनात
'आपलं अर्ध काळीज कुणीतरी तोडून नेतय' असा जाळ उठला.
उन्हाळ्यात परीक्षा आटोपताच धुळ्यावरुन गोविंद व अनुराधाही मालखेड्यात परतले.
गोविंदाला पुढे वैद्यकीय शाखेतली मास्टर डिग्री करायची होती तर अनुराधेला मालखेड्यातच प्रॅक्टीस सुरू करायची होती.
अनुराधा व गोविंद चार वर्षांपासून एकाच ठिकाणी होते तरी गोविंदची रग, ताठर स्वभाव, गुर्मी म्हणून ते कधीच बोलत नसत. फक्त कामापुरतं जेवढ्यास तेवढं. एकाच ठिकाणी असुनही जाणं येणं सुद्धा सोबत नसे.माधवच्या येण्यानं तर आधी चर्चेत असणाऱ्या नात्यालाही अकस्मात वळण मिळालं होतं. हवेलीत आले तरच घरच्यांमुळं थोडं फार बोलणं. गोविंद गावातही सहसा कुणाशी संबंध ठेवत नसे. म्हणून गावातील साऱ्यांनाच तो गर्विष्ठ व उद्धट वाटे. आता मात्र तीन चार महिने त्याला गावातच रहावं लागणार होतं.
अनुराधा हवेलीत आली व माधवला अवघडल्यागत वाटू लागलं.
बाबांकडून अनुराधानं हवेलीचा वरच्या मजल्यात दवाखाना सजवला. फर्निचर, पडदे, औषधं व लागणाऱ्या सर्व बाबी आणत साधं उद्घाटन झालं. त्यावेळी सेंधव्याहून तिचे वडील - बनुबाईचे भाऊ विठ्ठल गायकवाड ही आले. येतांना त्यांनी डाॅक्टर मुलीसाठी नवी मोपेड गाडी आणली. गाडी पाहताच बाबांना विचीत्र वाटलं. अनुराधा साठी गाडी असल्यावर आपल्या मधासाठी ही लगेच त्यांनी अंगणात नवी बुलेट उभी केली. माधवनं नकार देऊनही त्यांनी ऐकलं नाही. याचा परिणाम मात्र वेगळाच होत हवेलीत पुढच्या आठवड्यातच गोविंदसाठी चारचाकी गाडी आणण्यात झाला.
मालखेड्यात डाॅक्टर नसल्यानं आजारी पडल्यावर शहाद्याला जाणारी माणसं गावातच अनुराधाकडं यायला सुरुवात झाली.
सेंधव्याहून दत्ता गायकवाड आले व साऱ्या हवेलीला सेंधव्यास येण्याचं आमंत्रण दिलं. त्याच्या एकुलत्या एक मुलानं एम.बी. ए. केलं व तिकडच प्रेमविवाह उरकला होता.इज्जतीचा फालुदा होण्याचा अडचणीचा नाजुक मामला. कारण आजोबा रायाजी गायकवाड ही सेंधव्यातील एकेकाळी मोठी असामी.पण आताच्या पिढीला त्याचं काहीच सोयरसुतक नाही. दत्ता गायकवाड मुलापुढे शांत राहत लग्नास संमती दिली व त्याचच रिसेप्शन ठेवलं होतं. गावात नाही लग्न तर रिसेप्शन ठेवून प्रकरण झाकू पाहत होते.
सुंदरबाई, दंगलराव यांनी नवी गाडी काढत बाबा, बनुमाय, कलाबाई, अनुसया, अनुराधा राधेश्याम सारे सोबत जाण्याचं नियोजन केलं. सुंदरबाईला मनातून चारचाकीची हवा दाखवायची होती.दंगल व माधव एका गाडीत शक्य नाही म्हणून बाबांनी बनुबाईला न्यायला लावत " तुम्ही चला मी व माधव बुलेटनं येतो!" सुचवलं.
पण दंगलरावांनी बाबाचा हात धरत आग्रहानं गाडीतच बसवलं. आख्खं आयुष्य बाबांनी शेतात राबत काढलं त्यांच्या मेहनतीनं आपणास हे सुखाचे दिवस आले ही जाणीव दंगलरावांना होती. गाडी गाव दरवाज्यात आली. गाडीत दाटीवाटी झाली. साऱ्यांना त्रास होऊ लागला.
" अनुसया , राधा तुम्ही उतरा गं व नंतरच्या बसने या!" गोविंद तणफणत म्हणाला. अनुसया लगेच उतरली. पण राधेला गाडीतून उतरणं जिवावर गेलं. ती उतरलीच नाही.
" अनुसया तू घरीच थांब मग आता! घरीही कुणीच नाही!" उतरलेल्या अनुसयेला गोविंद बोलला व गाडी सुरू करू लागला.
" गोविंद! चूप बस! हवंतर मी थांबते पण तिला न्या!" बनुमाय बोलली.
" ताई बसा तुम्ही,ती पण
एकटी येईल ती बसने!" सुंदर बाई बोलल्या.
गाडी निघाली व परतणाऱ्या अनुसयेच्या डोळ्यात उन्हाळ्यातही सुसरी दुथडी वाहू लागली.
ती हवेलीत परतली व दार धाडकन बंद करत रडू लागली.
गाडीतून गोविंदनं उतरायला लावणं तिला खटकलं होतंच पण दत्ता काकानं इथं येऊन एका शब्दानंही यायला सांगितलं नाही. व घरुन आई वडीलांचाही निरोप आला नाही यानं ती आक्रंदून रडू लागली. तीन चार वर्ष झाली इथं यायला पण तरी घरुन आपली कोणी सुध करत नाही ही सल तिला रडवू लागली.खरं तर आपण न जाण्याचा निर्णय बदलायलाच नको होता गोविंद नं नेमक्या त्याच दुखऱ्या नसवर बोट ठेवलं होतं.
अनुसयानं जायचंच नाही ठरवत रडतच झोपणं पसंद केलं.
बाबांनी माधवला शेतात फेरी मारून दुपारुन यायला लावलं होतं. अनुसया उतरल्यावर त्यांनी राधेशामला माधवला फोन करुन अनुसयाला घेऊन यायला सांगितलं.ते ऐकताच आपण न उतरून मोठी चूक केली यानं स्वत:वरच अनुराधा संतापली.
राधेशामनं फोन लावला पण तो पर्यंत माधव रमण काकासोबत शेतात निघून गेला होता व मोबाईल घरातच वाजत होता.
दुपारी माधव घरी आला. त्याला बाजुच्या हवेलीत दार बाहेरुन उघडं दिसलं. घरात येताच मोबाईल वर त्याला राधेशामचे काॅल दिसले. त्यानं काॅलबॅक करत विचारल्यावर
" बाबा, अनुसयाला सोबत आणावयास सांगत होते. पण ती कदाचित बसने निघून आली असेल. तू निघ लवकर" सांगत राधेशाम ने फोन ठेवला.शंका आली म्हणून त्यानं दार ढकललं तर दार आतून बंद होतं. आवाज ऐकताच अनुसया उठली.
म्हणजे अनुसया बसनं गेलीच नाही हे लक्षात आलं.
सुजलेले डोळे, विस्कटलेले केस लाल गाल पाहून तो चक्रावला.
" तू जाणार होती बसने? मग गेली नाही?"
" बस निघून गेली!"
" तयारी कर! मी निघतोय!"
" मला नाही यायचं! तू निघ!" म्हणत अनुसयानं दरवाजा बंद केला. पण तो पावेतो माधवचा हात दारात सापडला.
तिच्या लक्षात येताच तिला पश्चात्ताप झाला.
हात झटकतच त्यानं
" सया तयारी कर! " ठामपणे म्हटलं.
' सया....!' या एका शब्दानं परतू पाहणारी अनुसया जागेवरच थांबत वळली व माधवकडं आश्चर्यानं पाहू लागली. लहानपणी वडील तिला याच नावानं हाक मारायचे. वडिलानंतर या नावानं माधवनं हाक मारताच तिच्या डोळ्यात आसवे तरारली.
" मी वाट पाहतो बाहेर! "
जायचं नाही ठरवूनही 'सया' या एका शब्दानंच ती तयारी करायला निघाली.
बुलेट गावाबाहेर निघत खेतियाच्या रस्त्याला लागली. उन्हाच्या काहिलीत गाडीवरची हवा थंड वाटत होती. खेतिया, पानसमेल करत गाडी निघाली. पण माधव शांतपणे आपापली गाडी चालवत होता. अनुसया मनातल्या मनात संकोचून शक्य तितकं अंतर ठेवत बसली होती. आज तिला प्रथमच गोविंदबाबत मनात चीड वाटत होती. चार वर्षात गोविंद बाबत मनात कसलीच भावना तिच्या मनात उठत नव्हती. ना प्रेम, ना आदर ,ना सलगी! पण आज सकाळच्या प्रसंगानं मनात प्रचंड राग दाटला होता. मात्र आता तिला एकदम मोकळं मोकळं वाटत होतं.
गावाकडं जातांना तिला आपलं बालपण व मालखेड्याशी आपल्या घराण्याचा संबंध आठवू लागला.
.
.
.
रायाजी गायकवाड यांना तीन मुलं. भरपूर शेती, कापड दुकान, घोडे, गुरंढोरं, मोठा लष्कारा!
मोठ्या मुलास विठ्ठल व बनाबाई ही दोन मुलं!
दुसऱ्या मुलास दत्ता , वना व सुंदरबाई ही मुलं
लहान मुलास दिना हा एकुलता मुलगा.
विठ्ठल, दत्ता, वना, दिना बनु ,सुंदर ही नातवंडे एकत्र खेळत मोठी होऊ लागली नी रायाजी बाबा गेले. बाबा गेले पण आपलं बरंच ऐश्वर्य जणू सोबतच घेऊन गेले. कापड दुकान बसलं , घोडागाडी गेली, शेत कोपरा कोपरानं कमी होऊ लागलं. दिनकर रावाचे वडील पक्के दारूडे. ते लवकर खाली झाले. बनुबाई लग्न करुन मालखेड्यास आल्या. दत्ता वना यांचीही लग्ने झाली. दिनाचं लग्न झालं. मालखेड्यात रेशमबाई वारल्या व बनुबाईनं आपली आपली चुलत बहिण सुंदरबाईला दौलतरावाचा दुसरा घरोबा म्हणून आणलं. दिना हा दत्ता वना विठ्ठलकडंच राबू लागला. या भावांची परिस्थिती त्या मानानं बरी. दिनाची बाई कावेरी अतिशय सुंदर पण तितकीच मानी. दत्ता वना यांच्याकडे राबतांना तिला त्रास होऊ लागला. तिला पहिली मुलगी झाली. तीच अनुसया! दत्ता, वना, व सुंदरबाईही माहेरी आल्या की कावेरीस ढोरासारखं राबवून घेत. नवऱ्याची गरिबी पाहून कावेरीबाईही मेहनत व कष्ट करण्यास कचरत नसत. पण दत्ता व वनाची फिरलेली नजर कळताच मानी कावेरी फुत्कारली. तीनं दिनास स्पष्ट शब्दात त्या घरात कामास नकार दिला. दिनास हे कळेना. वाद वाढू लागले. त्यात दत्ता व वना व्यसनी काकास दारू पाजत कान फुकू लागले. दिनास भरवू लागले. घरात दिना व सासरे ही आता छळू लागले. कावेरीबाईनं तरी एक वर्ष त्रास सहन केला पण दत्ता वना पुढं झुकली नाही. नवऱ्यास समजावत राहिली. शेवटी डोक्यापार पाणी गेल्यावर भावासोबत अनुसयाला घेत निघाली.
दिनानं गल्लीतच मारझोड केली. शेवटी भावानं बहिणीस नेलं पण दिनानं आपल्या अनुसयास जाऊ दिलं नाही. कावेरी गेली ती गेलीच. नंतरच्या दोन वर्षात भाऊ बहिणीनं अनुसयासाठी खूप प्रयत्न केले.पण दिनानं पोरीस दिलंच नाही. व दुसरं लग्न केलं. दुसरं लग्न केल्याचं समजताच कावेरीबाईनं जगाचाच निरोप घेतला. तिसऱ्या चौथ्या वर्षापासूनच अनुसयाच्या छळाला सुरवात झाली. कावेरीसमोर वाघासारखा डुरकावणारा आपला बाप दिना सावत्र आईपुढं गरीब शेळी बनला.मग सावत्र आईचा जाच, मार सहन करत वाढणाऱ्या वयासोबत ढोर काम उपसत अनुसया वाढू लागली.
चार वर्षांपूर्वी बनुताईनं विठ्ठल काकाच्या अनुराधेला मालखेड्यात आणलं. तशी सुंदरबाई सेंधव्यात आली. पण दत्ता व वना काकांना मुलगी नसल्यानं व दत्ता वना काकाकडं मोलकरणीसारख्या राबणाऱ्या अनुसयाची सुटका झाली व अनुसया मालखेड्यास आली.
........
" सया ! घरी कोण कोण गं? " माधवनं नेमक्या त्याच वेळी विचारलं नी अनुसया भानावर आली.
तिच्या पानावल्या कडा आरशात पाहताच माधवनं विषय पलटवला
" सया, रस्ता दाखव, मला घर माहीत नाही?" सेंधव्यात प्रवेश करताच माधवनं विचारलं.
अनुसया शांतपणे दत्ता काकाच्या घराचा रस्ता दाखवू लागली.
बुलेटवरुन अनुसयाला उतरलेली पाहताच राधाच्या अंगाची लाही लाही झाली.
जेवणाच्या पंगतीवर पंगती उठत होत्या. माधव बाबाजवळ जाताच राधेशाम सोबत पाठवत बाबांनी जेवायला पाठवलं. विठ्ठलरावाच्या घरातून चोरुन चोरुन बऱ्याच नजरा माधवचा वेध घेत अनुराधेला चिडवत होत्या.
रात्री वधूकडच्या इंदौरच्या मंडळीनंही सोबतच आॅर्केस्ट्रा आणला होता. सायंकाळी पंगती रोडावल्या तसा वाद्यवृंदाचा संच लावण्याची तयारी सुरू झाली. दत्ताजीच्या घरासमोरच्या मोठ्या चौकातच मंडप होता. रात्रीच्या रोशनाईनं प्रकाशाच्या झगमगाटानं वातावरण एकदम प्रफुल्लीत वाटत होतं.
पाहुणे मंडळी समोर टाकलेल्या खुर्चीवर बसलेली. समोर वराकडील आॅर्केस्ट्रा अतिशय सुश्राव्य जुनी हिंदी सिनेगिते वाजवत होता. त्यातल्या फिमेल सिंगर मानसी आहुजाला त्यानं ओळखलं. दोन वर्षांपूर्वी ती त्याच्याच आॅर्केस्ट्रा मध्ये गायची. पण पुढे तिनं काम सोडलं. ती मध्यप्रदेशातील होती हे त्याला आठवलं. त्यानं तिला ओळखलं पण गर्दीत जाऊन तिला भेटणं उचीत वाटेना.
बाजुला इंदौरचा आॅर्केस्ट्रा ही जुनी नवी गाणी छेडत उत्तर देत होता. मध्ये मध्ये वधूकडील मंडळी एखादं गाणं म्हणत. मग वराकडील मंडळीतूनही एखादा इर्षेखातर उठे.
बाबाजवळ शांतपणे बसत ऐकणाऱ्या माधवला हे विचीत्र वाटलं. त्याचा एम.डी. आॅर्केस्ट्रा जळगाव, धुळे, नाशीक बऱ्याच शहरात लग्नात जाई. पण वधु वराकडील मंडळी शांतपणे गाणी ऐकत पण इथं तर वेगळंच. दोन आॅर्केस्ट्रा समोरासमोर आळीपाळीनं गाणी सादर करत आहेत तर घरातील माणसंही आपली हौस फेडत चढाओढ करत आहेत. नवरदेवाची मित्रमंडळी , वधुकडील मंडळी एकाहून एक बहारदार गाणी निवडत सादर करीत होती. गाणी ऐकून माधवची उर्मी शांत बसू देईना. पण आपण इथं कोण आहोत व कशासाठी आलोत हे आठवत त्याची उर्मी तो दाबत होता.
त्याचा स्वत:चा आॅर्केस्ट्रा आहे हे बाबा व बनुमाय शिवाय कुणाला सुतराम कल्पना नव्हती. वराकडील पार्टीला वधुकडील पार्टी जड पडत होती.
तोच समोर गोविंदला कुणी तरी उठवलं. उठवणारं कोण? अनुराधा? गोविंद काॅलेजच्या गॅदरिंग मध्ये गायचा हे अनुराधाला ठाऊक असावं व इदौरकडच्या वधुकडील मंडळीची स्पर्धा म्हणून लग्नाच्या आनंद सोहळ्यात मनातली अढी विसरत ती त्याला आग्रह करत उठवत होती. त्यानंही स्टेजवर आणत परतणाऱ्या अनुराधास सोबतच थांबवत एक ड्युअल सादर केलं. पण तिकडच्या मंडळीनं असं काही गाणं सादर केलं की नंतर इकडच्या मंडळींना व आॅर्केस्ट्रा वाल्यांची शिटीच बंद झाली. मानसी आहुजाला मेल सिंगरची साथ मिळत नव्हती. हे पाहून इंदौरकडचा आॅर्केस्ट्रा एकदम चेकावला. फुल गोंगाट करत ते चिडवू लागले. अनुराधा, गोविंद खाली मान घालत माघारली. मग इकडच्या आॅर्केस्ट्रानंही आपला गाशा गुंडाळण्याची तयारी केली. तरी माधव शांत बसत गाण्याचा आस्वाद घेत होता.
वधुकडील मंडळीतली हुल्लड पोरं उघड आव्हान देऊ लागली. त्यातच कुणीतरी अनुराधाला सोबत आणत माधवला उठवू लागले. माधव उठला.
" अहो ,ऐका उगाच हसं का करता? शांत बसा व झाकली मूठ सव्वा लाखाची राहू द्या! फिरा माघारी!"
अनुराधा च्या 'अहोनं' माधवला मनात हसू आलं. तो तिच्याकडं दुर्लक्ष करत स्टेजवर आला.
" साहब, गाने दो उनको! हमारी बोलती बंद कर दी उन्होने तो तम और क्या गावोगे!" वराकडील आॅर्केस्ट्रा वाला माधवला डिवचू लागला.
" मानसी ,बोल उसको! एक मोका देने को!" जवळ पाठमोरी उभी मानसीला माधव बोलला.
ओळखीचा आवाज ऐकताच मानसी फिरली.
" सर आप? और यहा कैसे?"
" वो सब बाद मे. पहले उनको बोल"
मानसीनं माईक हातात घेत वाजवण्याची सुचना केली.
माधवनं मुद्दाम जुनंच गाणं निवडलं. आवाज घुमला.
"यहीं कही जियरा हमर
हे गोरिया तुम होई गवा रे
यहीं कही जियरा हमर
हे गोरिया तुम होई गवा रे हो
जिया बिना जीना बेकार हैं
का जुलम होई गवा रे
.......
देखा तुजे नैन हुए
बावरे बावरे बावरे
मैं भी तो खो गयी हूँ
सावरे सावरे सावरे
चाल तेरी चंचल यूँ
नदिया की धारा.,."
एकदम पूर्ण गायनात शांतता पसरली .गाणं संपलं नी एकच आवाज घुमला.
"वन्स मोअर, वन्स मोअर!"
अनुराधा एकदम सुन्न.तिचा विश्र्वासच बसेना.
इंदौरच्या आॅर्केस्ट्रा वाल्या मेन सिंगरनं ओळखलं समोरचं पाणी वेगळं आहे. त्यानं साऱ्यांना बाजूला सारत स्वत:च स्टेजवर येत थेट आपली आवडती कव्वाली " तेरी रश्के कमर ,मेरी पहली नजर' सादर केली. त्याच्या आवाजात जबरदस्त नजाकत, गोडवा होता. पण सारे माधवच्या आवाजाच्या मोहीनीतून बाहेर पडलीच नव्हती. ते कव्वाली संपून माधवची वाट पाहू लागले.
माधव मानसी सोबत पडद्यामागं बोलत होता. तोवर अनुराधा त्याच्याजवळ जात त्याचा हात हातात घेत वेड्यागत हासत नाचत त्याला बिलगू की काय अशी कावरीबावरी होऊ लागली. माधव शांत हसत तिच्या हातातून हात सोडवू लागला.
" मेल्या मूर्ख माणसा इतका गोड गळा व गाणं येत असुन आमच्या माहेराच्या मंडळीचा इतका वेळ इज्जतीचा फालुदा का पाहत होता?" अनुराधा आपला पाय माधवच्या पायावर आपटत लटकी रागावू लागली.
" एका गाण्याणं अहो पासून मेल्या, मूर्ख इतकी अधोगती माझी मी प्रथमच अनुभवतोय!" माधव खोचक हसत म्हणाला. तोच लोकांनी इंदौरच्या गायकाची कव्वाली हुल्लडबाजी करत बंद पाडली.
माधवनं मग नुसरत फतेह अली खान साहेबाचीच कव्वाली घेतली.
" सानु एक पल चैन न आये,
सजना तेरे बिना......
.
.
" पूर्ण कव्वाली संपली नी सारा लग्न मंडपच उभा राहिला. इंदौरच्या आॅर्केस्ट्रा वाल्यांनी तर माधवला बाजुला नेत " साहब आप कौन हो?" पुरे एम .पी. के सिंगरो को पहचानते हम लेकीन अपनी जादू कुछ और ही है!"
माधवनं सारं सांगत रजा घेतली. मानशीशी गप्पा मारल्या.
दुसऱ्या दिवशी गोविंद व साऱ्यांनी गाडीत बोलवूनही अनुराधा अनुसयाला गाडीत बसवत हटकून बुलेटवर निघाली. निवाली घाट, सातपुडा, पानसमेल सारं सारं राधेस आज सावळबाधा झाल्यागतच वाटत होतं.
.
डाॅक्टर राधा माधवची सावळबाधीच झाली.
दिवसामागून दिवस जाऊ लागले पण शेती नावावर करत नाही म्हणून दंगलमागे बाबा लकडा लावू लागले. पण सुंदरबाई दंगलरावास व दंगलराव बाबास टोलवत फिरवू लागले. गावातून वेगळ्याच वावड्या बाबाच्या कानावर येऊ लागल्या. बाबा संतापले. त्यांनी हवेलीच डोक्यावर घेतली.
" सुंदरे, दहा एकरची तीस एकर केली पण एका शब्दानं हिशोब घेतला नाही वा सातबारा कधी पाहिला नाही. पण आता डोक्याउपर पाणी जातंय. मुकाट्यानं माधवच्या नावावर पंधरा एकर करा नाहीतर एकेकाची खटीयाच खडी करेन! कारण ज्याच्या नावावर करायला लावतोय तो ही तुमचाच आहे!"
दंगल , सुंदरा घाबरले. आता थांबवणं शक्य नाही हे ओळखलं पण तरी सुंदरानं वेगळाच खोडा घातला.
आठ दिवसातच दंगलरावाच्या नावेवरील दहा एकर व सुंदरबाईच्या नावावरील पाच एकर अशी एकूण पंधरा एकर नावावर झाली. पण ती माधवच्या नव्हे तर अनुराधाच्या!
सारे घरी आल्यावर घरीच थांबलेल्या बाबास कळताच ते अचंब्यात पडले. त्यांनी परत हवेलीत राडा उभा केला. हे होणार हे सुंदरबाईला अपेक्षीत होतंच.
सुंदरबाई रडतच बनुबाईच्या पायाला लागली.
" सुंदर पाय सोड व मला सांग माधव ऐवजी अनुराधाच्या नावावर का उतरवली जमीन? म्हणून सकाळी मला येऊ दिलं नाही का?" बाबा खवळले.
" बाबा, हे माधवच्या नावावर जमीन करायला तयार नव्हते. मुलगा म्हणून नकोसा होता म्हणून दत्तक देत हक्क सोडला. त्याच्या नावावर कशी जमीन करू? अशी लाज त्यांना वाटत होती. व दुसरी गोष्ट सर्व जग उद्या काय म्हणेल सर्व जमीन स्वत:च्या मुलांच्याच नावावर केली! बाबा व बनुमाय उघडीच!सेंधव्याच्या माहेराकडील माणसं, बनुमाय यांच्या इच्छेचा ही आम्हास विचार करावा लागला. म्हणून अनुराधेच्या नावावर केली!"
" सुंदरे, मी तुमच्या बाबाच्या इच्छेपुढे कसा विरोध करेन गं! आणि दोघांच्या संमतीनेच तर माधवला दत्तक घेतलंय ना आम्ही? नी लग्नानंतर अनुराधा ला मिळालीच असती,मग?"
" पण ताई अनुराधा माधवशीच लग्न करणार म्हटल्यावर तिची जमीन माधवचीच होणार ना? फक्त त्यांच्या वचनाची पूर्ती व सेंधव्याचा विठ्ठल दादाही खूश व्हावा म्हणून तर हा खटाटोप!"
सुंदरबाईचा खोडा तर बाबांना अजिबात पटला नसला तरी बनुमायसाठी अनुराधाच्या नावावर व लग्नानंतर माधवचीच होणार म्हणून बाबा नाईलाजानं शांत बसले.
बाबा, बनुमाय शांत बसले. पण खऱ्या राजकारणाला सुरुवात सुंदराबाईनं तर खरी आताच केली होती. अनुराधारूपी चालवलेली सुंदराबाईची सोंगटी पटावर खटाखट चाली चालत शेवटच्या घरात पोहोचत राणी होत राजास चेकमेट करणारच; ही मेख सुंदराबाईनं मारलीच .
क्रमशः...