नकोसा.......!
वा.....पा....
दहा वाजताच बनुबाईनं केलेलं जेवण घाईघाईने आटोपत माधव येणार या खुशीत ठणठणीत झालेले बाबा दाळ दाण्याची पोतडी माणसाच्या खांद्यावर देत सुसरी नदी उतरले. नुकतीच संक्रांत झाल्यानं नदी पात्रातलं पाणी अंग आकसत दम टाकत होतं. पलीकडच्या गावाहून गाडी पकडत शहादा, दोंडाईचा करत ते रेल्वेत बसले. अमळनेरहून पारोळा व तेथून शिवणीला निघाले. हायवेवरील शिवणीच्या फाट्यावर ते सूर्य मावळण्याच्या वेळेपर्यंत पोहोचले.
हाय वे वर ट्रकांची बरीच वर्दळ दोन्ही कडून टर्र र्र..भर्र र्र.. आवाज करत वावरत होती. कडेला उतरवलेली पोतडी आता त्यांनाच डोक्यावर घेऊन जायची होती. आजारपणातून सावरल्यानंतर आज ते प्रथमच ओझं उचलत होते. पण नशीबानं हाय वे पलिकडच्या मळ्यातून बैलगाडी आली व बैलगाडी वाल्यानं "शिवणीला का? कुणाकडं?" विचारत पोतडी घेत बसावयास लावलं. दौलतरावांना हायसं वाटलं. हायवे सोडल्यानंतर लगेच खड्या, मुरुमाच्या कच्च्या सडकेवरुन गाडी धुरळा उडवत गावाकडं निघाली. डोंगराळ भाग असुनही दौलतरावांना लोकांची मेहनत दिसत होती. लाल मुरमाड माती काळ्या कसदार मातीतल्या दौलतरावांना ध्यानात भरत नव्हती. पण शेतातली बागायत पाहून लोक किती मेहनती असतील हे दिसत होते. रस्त्याच्या दोन्ही बाजुला खडक फोडून खोदलेल्या विहीरी, काठावर दगडाचे पडलेले ढिग , त्या ढिगावरच चढवलेले व डवरललेले वालाचे, भोपळ्याचे वेल दिसत होते. कुठे वाफ्या वाफ्यात पोकळा, पालक, मेथी, कोथंबीर दिसत होती. मध्येच वांगी, भेंडी डोलत होती.
" भाजीपाला चांगलाच पिकवतात तुमच्याकडं?" दौलतराव बोलावं म्हणून विचारु लागले.
" पाव्हणं, हिवाळ्यातच पाण्याची पातळी कमी होणाऱ्या विहीरी! हाय वे वर आलं की जळगाव, एरंडोल, पारोळा, अमळनेर, धुळे सर्वच मार्केटी गाठता येतात. शिवाय दोन तीन महिन्यात पैसा खुळखुळतो म्हणून पालेभाज्या व गिलकी कारली, वांगी भेंडी भरपूर पिकवतात आमच्याकडं! कमी पाण्यात रात्रंदिवस मोजक्या जागेत बोटं घालत लोक कष्ट व हिकमतीनं यश मिळवतात!"
दौलतरावांना ते दिसत ही होतं. तुलनेनं आपल्याकडील माती जाड, दिडशे - दोनशे फुटावर बोअरवेल्सना मुबलक पाणी.म्हणून पपई, ऊस, केळी, कापूस ही नगदी पीकेच जास्त घेतली जातात. पण तरी आपल्याकडील लोकांपेक्षा इकडची माणसं अधिक राबतात हे दौलतरावांना लगेच नजरेत भरत होतं. तोच एका रस्त्याकडील एका विहीरीवर गाडी थांबवत माणसानं बैलं पाजली. मळ्यातील विहीरीला मुबलक पाणी दिसत होतं. मळ्यात गावठी मिरची मावळतीच्या केशरी उन्हात मनोहारी दिसत होती. हिरव्या शालुत लाल रंगाचं भरपूर जरीकाम व कलाबतू असल्यागत हिरवं झाड लाल लाल टपोऱ्या मिरच्यांनी लगडत लहरत होतं. संक्रांतीचं पुरण शिजताच मिरची पिकत लालेलाल झाली होती.
डोंगराआड सूर्य दडताच पुर्वेकडच्या धरणावरुन पक्ष्यांचा थवा गावाकडील झाडावर परतला; तसं गावाच्या मागील बाजुनं बैलगाडीनं गावात प्रवेश केला. केवळबाईच्या घरासमोरच गाडी थांबवत माणसानं माधवला हाक मारत पोतडी उतरवत घरात ठेवली व दौलतरावांची अगत्यानं रजा घेत गाडी पुढे नेली.
माधव घरात नव्हताच. केवळबाईला जावयास पाहताच गलबलून आलं. त्यांनी हातपाय धुवायला गरम पाणी ठेवत वैलचुलीवर चहाही ठेवला.
रात्री उशिरापर्यंत माधव जळगावहून परतला. बाबांना पाहताच तेवीस वर्षाच्या माधवला आनंदानं गलबलून आलं. पाया पडणाऱ्या माधवला दौलतरावांनी छातीला गच्च गच्च आवळलं. त्यांच्या डोळ्यात कढत आसवं दाटली. जर आपलं त्या झटक्यात काही बरं वाईट झालं असतं तर आपल्या या काळजाच्या तुकड्याचं काय झालं असतं या वेदनेनं त्यांच्या छातीत एकच कालवा उठत होता. चुलीजवळ रांधणाऱ्या केवळबाईही मधाला गच्च आवळलेल्या जावयास पाहताच पोरगी रेशमच्या आठवणीनं कालवल्या. सख्खा जावयानं वीस वर्षात ढुंकूनही पाहीलं नाही पण या देव माणसानं प्रत्येक वर्षी येण्याचा रतीब कधीच खंडू दिला नाही. त्या स्थितीत त्यांना दौलतराव देवमाणूसच जाणवला.
" मधा, पोरा! आता सगळं व्यवस्थीत होईल. तुझा हक्क दिल्याशिवाय मला यमही नेऊ शकत नाही पोरा!"
पण माधवला व केवळबाईला बाबाच्या तब्येतीबाबत काहीच माहीत नव्हतं.
जेवण आटोपल्यावर बाबानं माधव व केवळबाईस सारं बयाजवार सांगितलं.
" मधा आता तुझा वनवास संपला पोरा!"
" बाबा! तुम्ही होते म्हणून माझ्या नातवास कधीच काही कमी पडू दिलं नाही! तुमच्या आशीर्वादाने आता तो स्वत: कमवायला लागला!"
" मामी माझ्या मधाला आता कुठंच जायची गरज नाही.आता सरळ त्याला मालखेड्यात यायचंय! मधाला मीच दत्तक घेतोय!"
' दत्तक!' शब्द ऐकला नी मधा व केवळबाईला धक्काच बसला. प्रथम त्यांचा त्यांच्या कानावर विश्वासच बसेना.
" मामी ,असं काय पाहताय! "
" बाबा, माझ्या नातवाचं तोंड पाहणं जिथं चालत नाही तिथं त्याच हवेलीत दत्तक ? कसं शक्य आहे? नाही! मुळीच नाही!"
" मामी, दंगल एक मूर्ख आहे. त्यांची चूक तर सुधारायचीय मला! गेल्या तेवीस वर्षांपासून याच आशेवर तर मी जगत आलोय! माझ्या मधावर झालेला अन्याय दूर करायचाय मला! आता फक्त मधा व तुम्ही होकार द्या फक्त! उद्याच वकीलामार्फत कोर्टात अर्ज सादर करायचाय व त्यासाठीच मी मधाला उद्या सोबत नेणार!"
माधव तर सुन्न होत ऐकू लागला. ज्या जन्मदात्यानं जन्म व नावाशिवाय काहीच दिलं नाही. ती अपेक्षा ही नव्हती या जिवास पण ...पण तोंड पाहायला तयार नाही ! नी आता हा ..हा बाबा! ज्याला कळायला लागल्यापासून आपण बाप समजत आलो.कारण त्यानच तर आपल्याला आई व वडीलांची माया दिलीय. दरवर्षी येत राहिला. लागणारा पैसा देत राहिला व त्या ही पेक्षा बापाचा आधार दिला . आणि आता तर आपल्या मनावर, जाणिवावर बाप या नात्याचं जे नकोसं ओझं होतं! 'माधव दंगल जगताप' यातील दंगल हा शब्द ऐकताच मनात दंगल पेटायची! हेच नाव हा बाप माणूस खोडतोय! या नावापासून मुक्ती देतोय हा बाबा! मग तर मी अवश्य जाईन! त्या नावासहीत त्या गावात वा त्या माणसासमोर उभं राहण्याची जन्मात इच्छा नव्हती पण त्या नावापासून मुक्ती देणाऱ्या बाबासाठी हा माधव काही काहीही करेल.
" पण बाबा, आता पर्यंत एवढं केलं तुम्ही तरी पुन्हा दत्तक घेऊन भावाभावात वैर का वाढवून घेता! त्यापेक्षा दुसराच कुणी दत्तक घ्या!" केवळबाई हात जोडत विनवू लागल्या.
" मामी ,वाद नाही होणार. त्याची संमती घेऊनच सारं होतंय! राहिला प्रश्न दत्तक घेण्याचा तर मी गोविंद वा माधव शिवाय दुसऱ्याचा विचारच करु शकत नाही!"
" बाबा! पण का? भाची अनुराधा का नाही!"
" मामी , तुमची लेक, आमची रेशमानं माझ्यासाठी व बनुसाठी जे केलंय ते तुम्हास नाही कळायचं! म्हणून उद्या मी माधवला सोबत नेतोच!" सांगत दौलतराव गतकालीन धुंदीतच झोपण्यासाठी निघाले. त्यांच्या काजळकाठात तुडुंब सागर होता व ह्रदयात आकांतणारा महासागर.......
झोपता झोपता केवळमामी व मधास जे ते सांगू शकले नाही त्यात ते वाहत गेले......
.
.
ऐन उमेदीत लग्नास आठ - नऊ वर्ष उलटून ही बनूचं पोट पिकेना. मुलाशिवाय दोन्ही उदास भकास झाले. दौलतराव सकाळी उठून मळ्यात रबायला निघून जात व कामात त्यांना ही उदासी जाणवेना.पण बनुला तर रात्रंदिवस तोच विचार. कारण तिच्यापेक्षा लहान जाऊ कलास पहिला मुलगा व आता मुलगी झालेली. पण सारे उपचार होऊन ही आशेचा किरण दिसेना. त्यातच लहान दंगलरावाच्या रेशमाला ही लग्न होऊन तीन वर्ष झाले तरी मुल नाही. रेशमा तर दिवसेंदिवस पांढरी होत चाललेली. अॅनेमिया रुग्ण. दौलतरावांना आपल्या दुखासोबत दंगलचीही चिंता. त्याच वेळी घरात कलानं अलग होण्यासाठी कलह लावलेला. रमणरावांना भावापासून अलग होणं पटेना. पण हवेलीत दररोज दाती होऊ लागली. दौलतरावांनी कलाची समजूत काढली. पण उपयोग शून्य. शेवटी दौलतरावांनी भावाला समजावत मधला मार्ग काढत रमणची रांधणी वेगळी केली. पण शेती एकत्रच ठेवली. शेतीचा हिस्सा न झाल्याने कला बिनसली. ती माहेराला प्रसुतीसाठी संतापातच निघून गेली.
रेशमावर उपचार सुरू झाले. डाॅक्टरांनी रेशमाला रक्ताची उणीव लक्षात घेत मुल म्हणजे आईच्या जिवाला धोकाच सांगत रेशमालाच जपायला लावलं. दंगलरावानं याबाबत ना रेशमाला काही सांगितलं ना घरात दुसऱ्यांना!
बनुची मुलासाठी बैचेनी वाढू लागली.
कलास दुसरी मुलगी झाली. तिनं रमणरावांना सासरी यायला कळवलं. रमणराव सासरी गेले कलानं दोन मुलं पुरेत ! आता संतती नियमन करायचं ठरवलं. पण रमणरावांना आपल्या बाबाची व मोठ्या वहिणीची बैचेनी माहित असल्यानं त्यांनी कुटुंब नियोजन करण्यास कलास नकार दिला व कलास घेत ते परतले.
कला मात्र परत आल्यावर तोच लकडा लावू लागली.
दौलतरावांच्या कानावर गेल्यावर त्यांनी बनुमार्फत लहान भावजई कलेला विनंती केली.
" कला, ऐक आणखी एक मुल होऊ दे! मग हवं तर आॅपरेशन कर..!" बनु डोळ्यात आसवं आणत म्हणाली.
" ताई, एक मुलगा व एक मुलगी पुरे आता!" कला मुद्दाम न समजल्यागत करत बोलली.
बाहेर ओसरीवर रमणसोबत कानात प्राण आणत दौलतराव ऐकत होते. त्यांना कलेच्या होकाराची अजुन ही अंधुक आशा होती.
" कला, तरी होऊ दे! येणाऱ्या मुलास आम्ही दत्तक घेऊ!" बनुबाई काळजात उठणाऱ्या वांझपणाच्या वादळास दडपत म्हणाल्या.
" आणि तिसरी मुलगी झाली तर?"... कलाबाई खोचक बोलली.
" मुलगा होवो वा मुलगी तरी चालेल आम्हास!" असहायपणे बनुबाई रडवेल्या स्वरात कशाबशा उद्गारल्या.
" तुम्हास चालेल पण मला होणाऱ्या यातनाचं काय?"
" त्यात काय यातना गं!" सयंम सुटल्यानं बनुबाई त्रागल्या.
" ते तुम्हास कसं कळणार ताई!"
बनूनं हे ऐकलं व आभाळच कोसळंतय की काय! ती रडतच मागच्या दारी निघून गेली. रेशमाच्या काळजालाही पिळ पडला. ती न राहवून बोललीच.
" माई, ताईला तुम्ही असं दुखवायला नको होतं!"
" रेशम, मग तू काय पाहतेय गं! माझं मुल काय नी तुझं काय! त्यांना चालेलंच!"
घरात चाललेला विवाद ऐकताच रमणराव खवळले. दौलतराव तर खाली मान घालत कापलं तर खून नाही असे थिजले.
रमणराव संतापात मध्ये गेले.
" कले, काय लावलं हे?"
" काय लावलं मी! उलट माहेरास मला आॅपरेशनला का नकार दिला ते आता कळतंय मला!"
" कले, वहिणी तुझ्याकडून काय मागत होती की तू एवढी टाकून बोलतेय?"
" मी माझ्या हिश्श्यातली जमीन मागितली ती ज्यांनी मला दिली नाही,त्यांच्यासाठी मी का पुन्हा ........."
" कले, तोंड आवर! लगाम दे तोंडाला! तुला कळत कसं नाही! बाबांनी शेतीतला वाटा दिला नाही तो एकत्रमध्ये प्रगती व्हावी या भल्यासाठी ना!"
" ते काय आपलं भलं करणार! स्वत:च भिकारी......"
रमणरावाची छपाकदिशी गालावर थापड बसल्यानं कलाचं बोलणंच थांबलं.
" कला तू इतका खालच्या पातळीचा विचार करशील हे पाहून मलाच लाज वाटतेय!"
" कितीही मारा, तोडा पण मी बोलणारच! बाप भिखारी तर मुलं ही...... आलेत कटोरा घेऊन मुलासाठी!"
रमणरावांनी संतापात लाल होत आता हातात काठीच घेतली.तोच दौलतराव पळत आत आले त्यांनी रमणच्या हातातून काठी हिसकावली.
" रमण्या पोरीवर हात उचलला तर हातच तोडीन"
" बाबा, ही.. ही भिकारी बोलतेय ....हिला सोडणारच नाही मी..."
" एवढा तोरा वाटतो तर का आले माझ्याकडे मुलाची भीक मांगायला? का येणार नाही? हेच नाही काही दिवसांनी ती लहानी पांढरी रेशमा ही असाच पदर पसरत येईल माझ्याकडं. मग मी काय कराव! या भिकाऱ्यासाठी मशीन बनावं का ! मुळीच नाही. मी चालली माहेराला. शेतीचा हिसका पूर्ण मोडल्याशिवाय माझ्या माहेरात पाय ठेवायचा नाही घ्यायला यायला!"
रमणरावांनी बाबास जोराचा हिसका दिला व कलावर मार सुरू केला. दौलतरावांनी त्याला बाहेर काढलं.
" पोरी ,ऐक माझं! यापुढे तुझ्या इच्छेप्रमाणे होईल पण आता शांत रहा!" हात जोडत त्यांनी समजावलं.
बनू रेशम यांना तर आपलं जन्मास येणच व्यर्थ वाटू लागलं.
कलानं माहेरी जात आॅपरेशन केलं. त्या आधीच रमणराव विरोध करत असतांनाही बाबानं वाटणी करत त्याला चांगलं पाच एकर शेत, बैल जोडी, दुभत्या म्हशी सारा सारा राबता दिला. काही दिवसांनी ते स्वत: जाऊन कलास घेऊन आले व रमणरावाचा संसार सुरळीत सुरू केला. पण त्या दिवसापासून त्यांनी व बनुबाईनं कलास गणतीतूनच काढलं.
रेशमला हा घाव जिव्हारी लागला. आपल्या बनुताई व बाबांच्या जिवणातील ही जखम काही झालं तरी आपण भरायची हे ठरवलं. पण दंगलरावांना पुढचा धोका माहीत असल्यानं ते "मला मूल नकोच" या एकाच गोष्टीवर ठाम राहिले. एक वर्ष हवेलीत एक अजब तिढा होता! बनुबाई व बाबांनी वांझपणात झुरणं पसंत केलं. दंगलरावांनी रेशमासाठी मूल नको ही भुमिका घेतली . पण रेशमा!
रेशमानं अन्न सोडत नवऱ्याकडं हट्ट धरला. सारे समजावून थकले. पण व्यर्थ. दंगलराव हारले. पण हे मूल नकोच ही मनात सल होतीच. दिवस भरू लागले. त्या आधीपासूनच डाॅक्टर आईच्या जीवास धोका आहे म्हणून वेळोवेळी समजावत आलेले. व आता त्यांनी दंगलरावाची, बाबाची रेशमा, बनुमायची असहायता लक्षात घेता रेशमाबाईची काळजी घेण्यासाठी उपचार सुरू केलेले. डाॅ. मिनल राठी या वेळोवेळी मार्गदर्शन करतच होत्या. पण रेशमचं कमी होणारं हिमोग्लोबिन त्यांनाही संकटात टाकत होतं.
जिल्ह्याला अॅडमीट केलं. वेळ आली. आई किंवा मुलगा एकच वाचणार . दौलतरावांनी दंगलरावांनी स्पष्ट शब्दात रेशमाला वाचवा बाकी काही नाही. मुल नकोय आम्हास! पण आमची गुणाची रेशमा लाख गेले तरी वाचवा!
पण बेशुद्ध होणारी रेशमाची तीव्र उत्कट इच्छा एकच' माझ्या बनुताईला मी वांझोटी राहू देणार नाही! माझ्या बापासमान ,भावासमान 'बाबास' दत्तक का असेना पण वारस !
नियतीनं ही तिच्या उत्कट इच्छेपुढं, माघार घेतली.तिथं बिचारी मिनल राठी काय करणार! मृतप्राय बाळाचं टॅव ऐकताच मिनल राठी चक्रावली! आपल्या मर्यादा नियतीनं उघड्या पाडल्याचं तिच्या लक्षात आलं पण तो पावेतो उशीर झाला होता. जिला वाचवण्यासाठी आपण बाळाचा विचार केलाच नव्हता.पण तेच टॅव करतंय तर रेशमा... रेशमा..... राठीबाईनं घाबरून मुलास नर्सकडं देत बनुबाई,दौलतराव,दंगलरावांना घाबरतच कल्पना दिली व मध्ये बोलवलं.
रेशमानं शेवटचा आचका बाबाच्या मांडीवर देण्याआधी बनुताईचा हात हातात घेत " ताई आता तुम्हास वांझ बोलण्याची कोणीच हिम्मत करणार नाही! आमच्या बाबांना कुणापुढं हात पसरण्याची गरज नाही!"
दौलतराव व बनुताईनं अख्खा दवाखानाच आपल्या टाहोनं उचलला. पण तो आकांत ऐकायला रेशमा थांबली नाही!
" रेशमे! सांगत होतो ना! मला मूल नको! मला मूल नको! पण नाही ऐकलं ना तू!" ऊरातल्या वेदनाच्या रुदनाने दंगलराव हंबरले.
दौलतरावांनी आपल्या भावास छातीस लावत बाहेर काढलं.
नर्सने त्यांना मुलाच्या वार्डकडे येण्याची विनंती केली.
" मला मूल नकोच होतं. तरी तो आला. नकोसा! ज्यानं येताच माझ्या रेशमाला .......! नकोच तो मला! एक बाप या नात्यानं मी जन्मात त्याचं तोंड पाहणार नाही! " दंगलरावानी साऱ्या भावनांनाच पाचोळा करत चूड दिली.
दौलतरावांनी बनुबाईला मुलाजवळ थांबायला लावलं. रेशमाला व दंगलला घेत ते गावाकडं निघणार तोच बनुबाई आक्रंदली.
" इतके कसे निर्दयी झालात तुम्ही? माझ्या रेशमाच्या अंत्य दर्शनालाही मला येऊ देत नाही!"
" बना, ऐक! पोरीचं दु:ख किती होतंय तुला , हे माहितीय मला. पण ती ज्याला टाकून गेली त्या बाळासाठी तुला थांबवतोय!"
रेशमा गेली. बनुमायजवळ केवळबाई लेकीचं दु:खं अंतरातच दाबत नातवासाठी आक्रोश करतच गेल्या .बनुमाय व केवळबाईस दवाखान्यातून दौलतरावांनी परस्पर शिवणीला पाठवलं. त्यांना वाटलं ओल्या दु:खाचा आघात आहे! विसरेल दंगल! काळ हे भल्याभल्या दु:खांना सावरतं! काही काळ गेल्यावर तोच पोराला स्विकारेल! पण महिना, वर्ष गेलं तरी दंगलरावांची नफरत तोळामाशानंही कमी झाली नाही. एका वर्षानंतर दौलतरावांनी आपलीच चुलत साली सुंदराशी दौलतरावाचा दुसरा घरोबा करून दिला व त्या नंतर एका वर्षानं त्यांनी दरसाल शिवणीची वारी सुरू केली.
.
.
सारं आठवताच दौलतरावाची उशी ओली झाली.
सकाळी मधास घेत त्यांनी जिल्ह्यावरील वकिलाची भेट घौतली. आधीच जमा अर्जावर सह्या केल्या.कोर्टात सादर केला. मालखेड्याहून दंगलराव, सुंदरा, बनुमाय सर्व संमतीसाठी आले होते. दौलतरावाच्या मिळकतीत दोन येली हवेली, खात्यावर चार लाख दाखवले होते. त्यांच्या हिश्श्यातली पंधरा एकर शेती मिळकतीत नव्हतीच. ज्याची दौलतराव व बनुबाईला खबरबात नव्हती. दंगलराव येण्या आधीच साऱ्या सह्या उरकत दौलतरावांनी मधास शिवणीला सोडलं. पंधरा दिवसात वकिलाकडंनं निरोप येताच दौलतराव खुशीनं माधवला आणण्यासाठी परत शिवणीला गेले.
एकदाचा मोठ्या प्रतिक्षेनंतर माधव मालखेड्यात येत होता. पण सुंदरबाई काय वाढून ठेवणार होत्या त्यापुढे?
अनुराधेचं प्रेम....?
अनुराधेचा विरह...?
शेती...? शेतीचं काय...?
गोविंद व अनुसया की अनुराधा? यांचा प्रवेश तर तसाच थांबलेला..!
माधवनं सुसरी पार करत मालखेड्याच्या गाव दरवाज्यातून आपल्या बाप माणसासोबत, बाबासोबत प्रवेश तर केला!
.
.
क्रमशः......