नकोसा...!
वा.......पा......
गाडी भिखारी जगतापाच्या हवेलीसमोर उभी राहताच रमणरावांनी दौलत बाबास आधार देऊन उतरवत हवेलीच्या पायऱ्या चढू लागले. मागोमाग बनूबाईही दवाखान्यात मुक्कामासाठी नेलेलं सामान घेत येऊ लागल्या. हवेलीतून दंगलराव धावत येत दौलतबाबास पायऱ्या चढण्यासाठी हात पकडत आधार देऊ लागले.
" सोड, नकोय मला आधार कुणाचा! देवानं पहिल्या झटक्यात नेलं असतं तर बरं झालं असतं! मला तुमची तोंडं पुन्हा पहावी लागली तरी नसती!" दौलत बाबा थरथर करत दंगलचा हात झिडकारत संतापानं बोलले.
दंगलराव चोरासारखे एका बाजुला झाले. दौलतबाबाच्या डोळ्यास डोळा लावण्याची त्यांची हिम्मत झाली नाही.
" अहो, त्रागा का करताय? डाॅक्टरांनी नाही सांगितलंय ना!" बनुबाई सुंदरकडं सामान देत पतीच्या पलंगाजवळच बसत काल्यावाल्या करत समजावू लागल्या.
" बने ज्याच्या जिंदगानीच्या साऱ्याच तारा तुटू पाहताहेत तो त्रागा नाही करणार तर काय करणार! त्या डाॅक्टराला सांगायला काय जातंय!"
" बाबा, आपण सांगाल तसं होईल पण आता आराम करा, आधी बरे व्हा मग सवडीनं आपल्या मनाप्रमाणंच करू!" दंगलराव खालमानेनं म्हणाले.
" करतो ना मी आराम! पण आताच्या आता माझ्या मधाला या हवेलीत आणतोस का? बोल"
" बाबा, आणेल तो, पण आता तुम्ही शांत रहा, हात जोडतो!" रमणराव कळवळून विनवू लागले.
" आता कसली शांती! एकदाचा शांत झालो तरच शांती! कदाचित तरी लाभणार नाही.कारण उशी मांडी देणाराच नाही म्हटल्यावर.....!"
बाबाच्या या शब्दांनी मात्र लहान दोन्ही भावाच्या काळजात सुरी फिरली व डोळे पाणावले.
" अहो लक्ष्मी येण्याच्या वेळी काय असलं काहीही बोलताय, सांगताय ना ते मधाला आणायचं, मग?"
" बने, तो रमण्या बोलतोय पण हा चोर दंगल्या म्हणतोय का?" दौलतराव दंगलकडं रागानं पाहू लागले.
" बाबा, यावर आपण सकाळी बोलू. आता आराम करा ,हात जोडतो !" दंगलराव गांभिर्य ओळखून विनवणी करत बोलले.
दंगलराव काठी बाजूला फेकत पलंगावर आडवे होत हवेलीच्या कडीपाटकडं पाहू लागले. रमणराव व दंगलराव थोडा वेळ बसून हवेलीच्या आपापल्या हिश्श्यात निघून गेले.
रात्री राधानं स्वयंपाक करताच जेवण आटोपून औषधी देत बनुबाईनं दौलतरावांना झोपावयास लावलं. पण दौलतरावांना झोप कशी लागणार. पहिल्या झटक्यातून डाॅक्टरांनी तर त्यांना कसंबसं मृत्यूच्या दारातून परत आणलं असलं तरी कुटुबातील बेबनाव त्यांना शांत कसा झोपू देणार होता. शेतात, रानात रात्रंदिवस खपणारे आपण, आपणास झटका यावा! याची सल त्यांना आठवू लागली व कारण ही! त्यांना झटका आला त्या आधीचा प्रसंग व सारं सारं आठवत त्यांचं मन झिंझोळू लागलं.
.
.
.
भिखारी जगताप यांची दौलतराव ,रमणराव व दंगलराव ही तीनही कर्तबगार मुलं.
सहा येली दुमजली गावात उठून दिसणारी हवेली. वडिलोपार्जित पंधरा एकर शेती. रमणरावांनी पाच एकर शेतीचा आपला वाटा घेत आधीच हवेलीत वेगळी चूल मांडली होती. दौलतरावांना मुलबाळ नसल्यानं ते व दंगलराव एकत्र होते. वाट्याच्या दहा एकर शेतीत राबत दोघांनी वीस एकर शेती घेत तीस एकरा पर्यंत केली. पण तीन चार वर्षांपूर्वी घरातलं वातावरण सुंदरबाईमुळं दुषीत होऊ लागताच दौलतरावांनी दंगलरावास समजूत घालत शेती एकत्र ठेवत रांधणी वेगळी केली. दौलतराव सर्वात मोठे, समजदार व शेतात स्वत: राबणारे सर्वजणच नव्हे तर भाऊही त्यांना 'बाबा'च म्हणत. दौलतरावांना मुलबाळ नसल्याने मुळताच समजदार बाबा दंगलरावाच्या मुलांनाच आपली मुलं मानत. दंगलरावाचा लहान मुलगा गोविंदलाच ते दत्तक घेणार हे साऱ्या गावालाच ठाऊक होतं. वास्तविक दौलतरावांना दंगलरावाच्या मोठ्या मुलालाच दत्तक घ्यावं अशी मनोमन उत्कठ इच्छा. पण दंगलच्या घरातून गोविंदाच्या नावाची चर्चा कायम चालत आल्याने गोविंद का असेना आपणास काहीच हरकत नाही,उलट वीस वर्षापासुनचा माधव चा तिढा गोविंदला दत्तक घेतल्याने सुटेल याचं दौलतरावांना समाधानच होतं. दंगल आपल्या पहिल्या पत्नीच्या मुलाचं- माधवचं तोंडही पाहत नाही. आपण गोविंदला घेतलं तर तो आपसूकच माधवला शिवनीहून आणेल असा विचार दौलतराव करत व यासाठीच तर आपण वीस वर्षांपासून झटतोय पण माधवला आणू शकत नव्हतो. पण गोविंदाच्या दत्तक घेण्याने तो प्रश्न सुटेल म्हणून ते खुश होत होते. पण मागच्या तीन वर्षात हवेलीत सुंदरानं सारंच वातावरण कलुषित केलं. बनुबाईनं आपल्या भावाची मुलगी अनुराधाला हवेलीत आणलं. सुदरबाईनही आपल्या चुलत भावाची मुलगी - अनुसयास आणलं. हवेलीच्या चुली वेगळ्या झाल्या भाच्या हवेलीत आल्या. पण तरी दौलतरावांनी शेतीचा सारा राबता एकत्र ठेवण्यात यश मिळवलं होतं. त्यांना वाटायचं की सुंदरा, बना कितीही कुदल्या तरी दंगलच्या मुलास दत्तक घेतलं की सारं दंगलचच होणार. मग आपण नसत्या गोष्टी साठी हवेलीत फूट का पडू द्यायची. फक्त लहान की मोठा मुलगा दत्तक घ्यायचा हा तिढा सुटत नव्हता. सुंदर व दंगलच्या मनाचा हल्ली ठावच लागत नाही असं त्यांना जाणवत होतं. त्यातच नवनवीन वावड्या उठत होत्या. गावातल्या चर्चेतून दौलतरावाच्या कानावर वेगळंच येऊ लागलं. बनुबाईनं भाचीला हवेलीत आणलं ते घरकामात मदतीसाठी. पण गावात बनुबाई भाचीला दत्तक घेणार अशी आवई उठली. दौलतराव बिथरले. त्यांना यात तथ्य नाही हे पुरतं माहीत होतं पण गोविंदला दत्तक देणार आहेत तर सुंदरानं अनुसयेला आणत वेगळीच पाचर मारली होती. म्हणून दौलतरावांनी त्या दिवशी दंगल व सुंदरला बोलवून बसवत तीन वर्षापासुनच्या साऱ्या वावड्यांना एकदाचं थांबायचं ठरवलं. कारण हल्ली त्यांनाही धाप लागणं, छातीत धसका, पाठ दुखणं हा त्रास वरचेवर जाणवत होता. त्यानंही त्यांना आता एकदाची निरवा निरव करायचीच वाटत होतं.
' दंगल, सुंदरा! आजपर्यंत मी सारं सांभाळत होतो. पण हल्ली बैचेनीगत वाटतंय!".
" बाबा, आता मळ्यात बिलकुल जायचं नाही. आराम करत हवेलीतच थांबत चला! किती वेळा सांगायचा तुम्हाला! मी आहे नी काम आहे! आहेत ना माणसं ? करवून घेत जाईल मी!" दंगलराव बाबास ( भावास) समजावू लागले.
" दंगल, तू ते नको सांगू मला!माणसांच्या भरोशावर शेती होत नाही रे! स्वत: बैल होऊन राबावं लागतं त्यासाठी! बांधावरुन शेत पिकत नाही.म्हणून माझ्या गोवऱ्या मसणात गेल्या तरी शेतात जाणं सुटणार नाही. चिंता ती नाही पण गोविंदबाबत एकदाचं मला मोकळं काय ते सांगा? चिंता मला त्याचीच आहे!"
" बाबा, गोविंद तुमचाच आहे! हे साऱ्या गावालाच माहीत आहे मग आम्ही काय वेगळं सांगायचं त्यात!"
" सुंदरे, हे गुळमुळीत ऐकून ऐकून माझे कान पिकलेत! आता मला स्पष्ट निर्णय घ्यायचाय. दत्तक विधान करुन मोकळं व्हा!"
" बाबा, ज्यांचा विश्वास नाही त्यांच्यासाठी दत्तक विधानसारख्या गोष्टी! आपणात तसं परकं काय आहे! घ्या उद्यापासून गोविंद तुमच्यात राहील!"
" आधी माधवला आणा तुम्ही मग मी लगेच गोविंदाचं दत्तकपत्रक करतो!" दौलतराव ठामपणे बोलले.
" त तसं ..तसं.. नाही! हवं तर तूर्तास गोविंदाला तुमच्याकडंच ठेवा! माधवचं पाहू सवडीनं!" सुंदरबाई सावध होत बोलल्या.
" नंतर नाही सुंदरे! आताच माधवला आणा मगच मी गोविंदाला घेतो!"
सुंदरकडे पाहत दौलतराव कपाळावर येऊ पाहणारा घाम पुसत दम लागल्यागत निर्वाणीचं बोलले.पण सुंदरबाई रागानं दंगलरावाकडं पाहू लागली.
" बाबा तुम्हास घ्यायचं असेल तर घ्या अथवा राधाला घेतलं तरी हरकत नाही आमची! पण तो नकोसा... हवेलीत येणार नाही.." दंगलराव नजर चुकवत बोलले.
" दंगल्या, तोंड सांभाळ! एका बुक्कीतच फोडेन! मला दत्तक घ्यायला अख्खी दुनिया पडलीय! तो सल्ला नको देऊ मला! माझा माधव या हवेलीत माझ्या डोळ्यादेखत यायला पाहिजे! तु आणणार नसशील तर मीच आणतो त्याला व घेतो दत्तक" दौलतरावाची जीभ संतापानं आता वळू लागली.
" मग बाबा मी पण पाहतोच! तुम्ही कुणालाही घ्या दत्तक! पण तो.. तो..नकोसा..माझ्या नजरेसमोर येतोच कसा!"
" दंगल्या, बस्स! नालायक लाज कशी वाटत नाही बोलतांना! पोटचा पोर वीस वर्षांपासून वणवण फिरतोय! आणखी किती फिरवणार आहेस त्याला!" दौलतराव दंगलवर हातातली काठी उगारत चालून गेले.
" कोण पोटचा! ज्यानं जन्मताच सख्ख्या आईस खाल्लं तो नकोसा?मुलगा म्हणून नकोय मला नजरेसमोर..."
हे ऐकताच दौलतरावाच्या पाठीत सणका व छातीत जोराची कळ उठली.ते धाडकन उभ्या उभ्याच कोसळले. तोंडातले शब्द तोंडातच राहीले.
एकच गलका, गोंधळ उडाला. तेव्हाच्या तेव्हा गावात तात्पुरते उपचार करत जिल्ह्याला व नंतर तेथून नाशिकला हलवलं.
पहिल्या झटक्यातून सावरत आजच दौलतराव परतले होते. पण ज्या कारणानं झटका आला होता तो पेच तसाच होता. म्हणून त्यांना झोप येणं शक्य नव्हतं.पहाटे पहाटे शेवटी गोळ्यांच्या पाॅवरने मात केली व त्यांचा डोळा लागला.
सकाळी उठताच दौलतरावाच्या डोक्यात तेच विचारचक्र सुरू झाले. त्यांना गोविंद असो की माधव कोणीही हवं होतं पण माधव हवेलीत परत येणं महत्वाचं होतं.
नऊच्या सुमारास दंगलरावाला रमणरावांनी, कलाबाईनं समजावलं. परिस्थिती हाताबाहेर जातेय म्हणून दंगलरावांनी सुंदराशी बोलणी केली. कारण पहिलाच झटका जोराचा होता व डाॅक्टरांनी बाबास टेंशन येणार नाही अशी काळजी घ्यायला लावली होती. म्हणून सारासार विचार करत सुंदर बाईनं दंगलरावाच्या कानात काही समजावलं व ते सर्वजण बाबाकडे आले.
" या! मी तुमचीच वाट पाहत होतो! कारण आता मला पुरता सोक्षमोक्ष लागल्याशिवाय चैन पडणार नाही!" दौलतराव पलंगावर भिंतीला टेका लावत बसत बोलले.
" बाबा! तुमच्या पुढं आम्ही कधीच नव्हतो व जाणारही नाहीत!"
" बरं झालं शहाणपण आलं! पण तरी माधवचं काय? आधी ते कळू द्या मला?"
" बाबा! गोविंदाला दत्तक घेतलं तरी आमचं काही म्हणणं नव्हतंच! पण मग माधवला हवेलीत आणावयास हे तयार नाहीत! मग त्या पेक्षा माधवलाच तुम्ही दत्तक घ्या!" सुंदरबाई झाल्या पश्चात्तापाचा आव आणत म्हणाल्या.
" मग मूर्खांनो हेच आधी सांगायला तुमची अक्कल कुठं गेली होती? का माझ्या मरणावर टपलेले होते!"
" बाबा, तसं नाही. पण तुम्हाला तर माहीतच आहे. यांना माधव तर नकोच. पण तुम्ही सारं दत्तक विधान करुनच माधवला हवेलीत आणलं तर यांचा जो हेका आहे तो ही शाबूत राहील!"
" म्हणजे काय म्हणायचं नेमकं सुंदरे! मी समजलो नाही?"
" बाबा, मला तो नकोसा हवेलीत मुलगा म्हणून नकोच होता. व अजुनही नकोच. पण तुम्ही आम्हाला हवे आहेत. म्हणून तुमच्यासाठी मी माघार घेतो. मुलगा म्हणून नाहीच.पण तुम्ही दत्तक घेतला तर ...."
" दंगल, बस समजलं मला.नी तुझ्या बापपणाची कीव पण वाटतेय! म्हणजे तुला तो मुलगा म्हणून नकोच आहेस! दत्तक देऊन मुलाचा हक्क सोडूनच त्यानं गावात, हवेलीत यावं असंच ना?"
" ........." दंगलराव काहीच बोलले नाही.
" अरे वीस वर्षांपासून आईविना पोरकं पोर बापासाठी तडफडतोय! सुंदरीचं ठिक ; ती सावत्र आई आहे! पण तू? तू तर बाप आहेस ना रे त्याचा! तुला लाज कशी वाटत नाही! पण जाऊ दे! असल्या बापाची माझ्या मधालाही गरज नाही.त्याला नकार देऊन तू माझ्या वर उपकारच केलेस. कारण माधवला मला दत्तक देत त्या जात्या जिवाच्या वचनातून तू मला मुक्त केलेस! तिच्या वचनात अडकलो होतो म्हणून तर झटका येऊनही त्या यमाला यश आलं नाही मला घेऊन जाण्यात." दौलतराव कळवळले.
" बाबा, तुम्ही उगाच त्रास नका करुन घेऊ ,ऐका ना! आताच दुखण्यातून सावरत आहात नी पुन्हा?" रमणराव बाबास शांत करत म्हणाले.
" रम्या, मी कशाला त्रास करुन घेऊन! उलट जीवनात सर्वात जास्त आनंद मला आजच झाला. माझ्या मधास दत्तक देण्याचं यांनी कबुल केलं हा माझ्यासाठी व बनुसाठी केवढा मोठा आनंद आहे हे तुम्हा चौघांना नाही कळायचं रे! त्या जात्या माऊलीनं...! माऊलीच ती! या भिकाऱ्याची झोळी वीस वर्षांपूर्वीच भरली होती. पण तरी यांच्यामुळं आम्हास किती प्रतिक्षा करावी लागली."
दौलतराव बोलले पण तिकडं कलाबाईला घाव वर्मी बसला व तिच्या जिवाची आग झाली.
" बाबा, दत्तक विधानाचं सारं पेपर वर्क मी करुन आणतो!" दंगलराव अपराधीपणानं म्हणाले.
" जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर कर!"
" पण बाबा हवेली, जमीन नावावर करायला उशीर होईलच ..." सुंदरा खोल विहीरीचा ठाव घेण्यासाठी खडा टाकावा तशी बोलली.
" त्यासाठी विलंब होत असेल तर आधी दत्तक विधानाचं करा. बाकी शेतीचं हवेलीचं होईल नंतर माधव आल्यावर !" दौलतराव समाधानाने म्हणाले. त्यांच्यासाठी मधास आपलं गाव, घर, हक्क मिळतोय हेच त्यांच्यासाठी खूप होतं. कारण वीस वर्षात ते होते म्हणून दंगलरावास पहिल्या बाईचा एक मुलगा आहे हे गाव निदान ओळखून तरी होता.
सुंदराला हवा असलेला ठाव सहज लागतोय म्हटल्यावर ती खुशीत उठली.
पंधरा दिवसात रमणराव व दंगलरावांनी वकिलाला भेटत सारं पेपर वर्क केलं.
" दंगल, शेतीचं ही यातच खातेफोड करत लगेच नावावर चढवली असती तर पुन्हा आणखी फिरायची झंझटच राहणार नाही!" सायंकाळी बसले असतांना एकवेळ रमणरावांनी मध्यंतरी सुचवलं ही होतं. पण सुंदरबाई धडधडत्या छातीनं एकदम बोललीच.
" आबा, त्यासाठी किती दिवस जातील! मध्येच बाबांना काही झालं कमी अधिक तर? त्यापेक्षा आधी दत्तक विधान तर होऊ द्या. मग सवडीनं लगेच शेत, हवेली चढवू नावावर!"
रमणरावांनी ही मग बाबांना येऊन गेलेला ह्रदय विकाराचा झटका पाहता तो विषय मोडता घेतला. सारं पेपर वर्क होताच माधवला सहीसाठी व कायमचंच मालखेड्यात आणण्यासाठी बाबा समाधानानं शिवणीला निघाले.
तेच समाधान व सुटल्याची भावना दंगलरावास ही वाटत होती.
रेशमा गेली नी त्यांनी त्याच घडीला
" ज्यामुळे माझी रेशमा गेली त्या नकोशाला मी मुलगा म्हणून कधीच स्विकारणार नाही व तोंडही पाहणार नाही" .वीस वर्ष त्यांनी शपथ पाळली ही होती. पण तोच तिढा आज शपथ तशीच राहत सुटत होता.
क्रमशः.......
( कथेची स्थळे, पात्रे काल्पनिक)