खुमखुमी - १५
निकवाडे सर निवृत्त झाले त्या आधीच देठे सरांनी आपल्या शालकाच्या मुलीला सतोन्याला बोलवून घेतलं. दिशा साठे नाशिकहून सतोन्याला येत माई आत्याकडं वडिलांसोबत आली. कृष्णराव बापूंनी शब्दाला जागत देठे सरांच्या भाचीचं काम निकवाडे सरांच्या जागेवर हायस्कुलात इंग्रजी विषयासाठी नेमणुक देत केलं.
दिशा साठे अतिशय हुशार, सुंदर तितकीच गोड व साध्या स्वभावाची. देठे सरांना मुलबाळ नसल्यानं व लल्लाबाबत काही मनात आडाखे बांधत देठे सर व माईंनी दिशास सतोन्यात नोकरीस लावलं. दिपा परत येणं शक्य नसल्यानं लल्लाबाबत काही तरी निर्णय घेणं महत्वाचं होतं. पण तो तर आठवणीचं गाठोडं सोडणं, बांधणं व पुन्हा सोडणं यातच मग्न होत सुध हरपला होता. अकादमीत परतलेल्या बालास संध्याची भेट होतच नव्हती. आमदार पुत्र बाळासाहेब गुणवंतरावाची अचानक बदललेली वागणूक बालाला बुचकळ्यात पाडत होती. पंधरा वीस दिवसातच गुणवंतरावांनी त्याचं मानसिक खच्चीकरण करत त्याचा आत्मविश्वास घालवत त्याच्या खेळाचा बोऱ्या वाजवायला सुरुवात केली. बाला बिथरला व साकीत संध्यास भेटावयास गेला. पण भैय्यासाहेब व संध्या दिपास घेत मुंबई ला गेल्याचं त्यास कळालं. तो तडक तसाच सतोन्यास माघारला व लल्लास सारा प्रकार कथन केला. पण लल्ला तरी कुठं शुद्धीवर होता.
" बाला , पावसाळ्यात असं ही कोणतीच निवड प्रक्रिया होणार नाही. अकादमी व संध्याला विसर नी इथंच खेळाचा सराव कर!"
" लल्ला आता मला सरावाची नाही तर दुसरीच गरज असतांना तु हे काय सांगतोय?"
" बाला आपल्यासारख्यांना गरजेचं जे हवं ते मिळत नसतं! त्यापेक्षा तू तुझ्या फिरकी गोलंदाजीचा सराव कर!" यानं तर बालाचं डोकंच गरगरायला लागलं
" लल्ला मी फलंदाज असल्यावर फिरकीची मला गरज काय!"
" बाला ,गरज आता नाही येत्या काळात भासेल. केवळ फलंदाजीवर निवड होईल हे गृहीत धरू नको. नी तु फिरकीच्या जाळ्यात अडकत बाद होतो नेहमी. हे विसरू नको. म्हणून मी सांगतो तेवढं कर! निदान फिरकी खेळता यावी यासाठी तरी आधी फिरकी शिक!"
पण बालाला लल्ला काहीतरीच बडबडतोय म्हणून अजब वाटलं. व तो सतोन्यात थांबत लल्लाला टाळू लागला.
जळगावला आशय समृद्धीचं चार दिवसाच्या प्रशिक्षणासाठी ललित मोरे, नविन आलेल्या दिशा साठे व पुनम शहा यांची निवड झाली व ते निवासी प्रशिक्षणासाठी जळगावला गेले. माईनं दिशाला लल्लासोबत पाठवलं.
पोळा संपला भाद्रपद लागला पण या वर्षाचा पाऊस परतायचं नावच घेईना. सातपुडा परिसरात व पार तापीच्या उगमक्षेत्रात- बैतुलच्या रांगेपर्यंत पाऊस मजबूत धुवाॅधार बत्ती देत होता. तापीचं पाणी दोन्ही काठानं वाढत होतं. तापीत सातपुडा रांगेतून भली मोठी झाडे, ओंडके पुरात वाहून येत होती. मूग उडीद यांनी तर झाडावरच कोंब फोडावयास सुरूवात केली होती. तोडावयास सवडच मिळत नव्हती. शेतं पाण्याखाली येऊ पाहत होती. पाण्यासाठी हपापलेल्या केळबागाही अति पावसानं कंटाळल्या.सतोन्या थडीवर झिंगा बाबा महापुरातही नाव नांगरत प्रवाशाची वाट पाहत होता.
प्रशिक्षण संपलं. पुनम शहा नातेवाईकाकडं जळगावलाच थांबल्या . लल्ला व दिशा मॅम रेल्वेनं अमळनेर आले. तेथून मुक्कामाची गाडी निघून गेलेली. लल्लानं खाजगी वाहतुकीची गाडी पकडत खाचणा गाठलं. प्रशिक्षणात पुनम मॅडम असल्यानं दिशा व लल्लाचा बोलण्याचा प्रसंगच आला नाही. प्रवासात रेल्वेत दिशानं प्रयत्न केला. पण लल्ला तेवढ्या पुरतं तेवढंच.
तीन दिवसांपासून लागलेली झडी जळगावला प्रशिक्षणात जाणवली नव्हती.पण अमळनेरला येताच पावसाची भीषणता जाणवू लागली.
खाचण्याला अंधारात व पावसात उतरताच दिशाला भिती वाटू लागली. लल्लाला सवय होती म्हणून काहीच वाटत नव्हतं.
" मोरे सर नदी पार करून कसं जायचं?" उतरता उतरताच कुडकुडत दिशानं विचारलं.
पण लल्ला झडीच्या वातावरणात वेगळ्याच धुंदीत होता. तो पावसात कुणाच्या आठवणीचं गाठोडं सोडत याद सोलू पाहत होता.
" ......"
" इथंच ओळखीचं कुणी असेल तर मुक्काम करुयात व सकाळी जाऊ?"
" एकनाथ भटाकडं तुम्हास सोडतो व मी परततो. सकाळी भट तुम्हास सतोन्याला आणतील" धुंदीतच लल्ला बोलला. तो लवकर निसटू पाहत होता. त्याला का कुणास ठाऊक पण नदीपात्राची आज खूप ओढ वाटत होती.
" तुम्ही थांबणार नसाल तर मग नवख्या ठिकाणी मी ही नाही थांबणार! माई आत्यानं तुमच्या सोबतच यायला सांगितलंय !" दिशा घाई करत बोलली व लल्ला पाठोपाठ निघाली. लल्लानं होकार देण्याच्या भानगडीत न पडता कमानीचा रस्ता धरला. वाटेतनं त्यानं ओळखीच्या चमन्या चिंधाकडनं विजेरी घेतली. विजेरीच्या ओल्या प्रकाशात वाट दाखवत तो दिशा मॅडमला घेत वाट उतरू लागला. झिरीच्या अड्ड्याकडून रेडीओचा आवाज घुमत होता...
" ये दिल और उनकी निगाहो के साये,
मुझे घे लेते हैं बाहो के साये!
.
. मोहब्बत के रंगीन पनाहो के साये....."
" मोरे सर अशा शांत अंधाऱ्या वेळी पावसाळी कुंदतेत लताजींचं हे मेलडी किती मस्त वाटतंय!" दिशा मॅडम वाटेवर तोल सावरत बोलू लागल्या.
पण उतरत्या वाटेवर लल्ला वेगळ्याच विश्वात गुंगला होता. त्याचं परवा पासुन प्रशिक्षणात अजिबात लक्ष नव्हतं. त्याला आपलं आकाशच क्षितीजात दूर दूर हरवत चाललं अशी ऊर कुरतडणारी जाणीव होत होती. असं का होतंय म्हणून तो सतोन्याला घाईत परतू पाहत होता.
काठावर येताच त्यानं महापुराच्या खळखळ आवाजात पलिकडच्या झिंगा बाबास मोठ्यानं आवाज दिला. दोन तीन आरोळ्यांनी काठ थरथरला. ढगही जणू एकमेकावर आदळले की काय पावसाचा जोर वाढला. दिशा पुरती ओली झाल्यानं म्हणा की त्या गाण्याचा फिल म्हणा तिनं छत्री बंद करत पाऊस अंगावरच घेतला. झिंगा बाबास महापुरातून ओंडके वाचवत यायला बराच उशीर झाला.
नाव काठावर लागताच लल्लानं उडी घेतली. झिंगा बाबास त्याचं काहीच नवल वाटलं नाही. कारण हल्ली लल्लाची बदललेली वागणूक बाबा अनुभवत होता. झिंगा बाबानं दिशा पोरीचा हात पकडत आधार देत नावेत घेतलं. नावेतील झोपडीत प्रभात कंदील वाऱ्यानं फडफड करत होता. त्याच्या उजेडात दिशा आपल्या चेहऱ्यावरील पाणी निथरवू लागली. लल्ला बाहेरच्या अंधारात महापूराचं चिरलं जाणारं पाणी पाहू लागला. झिंगा बाबा जिवाच्या आकांताने एकटाच नाव वल्हवू लागला. लल्लाला आज झिंगा बाबास मदत ही करू वाटेना. नावेला मध्येच लाकडाचे ओंडके येऊन ठोकले जात होते. आवाज आला की मात्र हातातली विजेरी चमकवत लल्ला अडकु पाहणाऱ्या ओंडक्यास ढकले. नाव पात्र चिरत प्रवाहात वाहत तिरकस काठाकडं सरकू लागली. दिशा मधल्या कंदिलाच्या उजेडात लल्लाचा चेहरा नदरेनं टिपत होती. पण तिला तो चेहरा कधी कोरी पाटीसारखा वाटे तर क्षणात आपण लिहायला पाटी हातात घ्यावी तर कुणी तरी आधीच पूर्ण पाटी भरलेली असावी असा भासे.
नाव दूर खाली वळणावर लागणार हे बाबानं हेरलं व ते त्या दिशेला नेऊ लागले. त्या ठिकाणी बरंच पुरसंग गोळा झालेलं होतं. तोच नावेवर काहीतरी आदळलं. पण ओंडक्यासारखा टणक आवाज नव्हता. मात्र काही तरी ठोकलं हे लल्लास जाणवलं. त्यानं आवाजाच्या दिशेनं विजेरीचा झोत फेकला. त्या अपुऱ्या थरथरत्या उजेडात त्याला जे दिसलं त्यानं तो थरथरला.
" बाबा....बाबा...!"
त्याची बोबडी वळली.
रातदिन नदी खेटणाऱ्या झिंगा बाबा चपापला. प्रेत वाहून आलेलं होतं व ते नावेला धडकलं होतं. एव्हाना थडकून ते प्रवाहात वाहून गेलं असतं. पण धडकतांना नावेच्या लाकडात प्रेताचा कपडा वा काहीतरी अडकलं होतं व ते नावेसोबतच ओढलं जात होतं. झिंगा बाबानं लल्लास विजेरी व कंदील सोबत चमकावयाला लावला. जवळ गेलेल्या लल्लाच्या विजेरीचा झोत प्रेताच्या पायावर पडला. प्रेताच्या पायातील साखळी नावेच्या खिळ्यात अडकली होती. साखळी फुगलेल्या पायात रूतलेली असतांनाही. पण जवळ जात दोन्हीच्या उजेडात साखळ्या व त्या पाय फुगतांना वर सरकून त्या खालचं गोंदण दिसत होतं.
लल्ला थरथरला व तो डोळे फाडून फाडून अपुऱ्या उजेडात ओळखू लागला. गोंदण दिसलं नी ओळख पटली. ओळख पटताच त्यानं कंदील विजेरी नावेतच फेकत पाण्यात उडी घेत जिवाच्या आकांताने टाहो फोडला.
"दिपा.............!"
त्याच्या टाहोत पाऊस, महापूर, वारा सारं सारं स्तब्ध होत वाहून गेलं व थडीवर एक मोठा आक्रोश विस्तारू लागला. त्यानं फुगलेला दिपाचा देह नावेत घेतला झिंगा बाबानं त्या ही स्थितीत हंबरडा दाबत धिरानं नाव काठावर लावली. लल्ला ऊर बडवत गगनभेदी आक्रोश मांडू लागला. त्यानं साखळ्या व मयुर गोंदणाची खूण बाबास सांगताच बाबा त्याला शांत बसवत सतोन्यात धावले. दिशाला कळेला हा काय फ्रकार आहे. पण आपण ज्या नावेत बसलोय त्याच नावेत एक फुगलेलं प्रेत आहे व त्याला बिलगत मोरे सर आकांत करताहेत यानं ती एकाच वेळी घाबरली, भांबावली, थरथरली. बाबा गावात गेले पाहिल्यावर दिशानं मोरे सरांना प्रेताजवळून उठवायचा प्रयत्न करत नावेखाली आणण्याचा प्रयत्न करताच लल्लानं दिशालाच मिठी मारत 'दिपा, दिपा' करत हंबरडा फोडला. त्याचा ऊराला छेदणारा टाहो शांत करण्यासाठी दिशा मॅडम नही तशीच मिठी राहू देत " मोरे सर सावरा स्वत:ला!" म्हणत धीर दिला. पण परवा पासुन आपलं आकाश क्षितीजात हरवतंय असं जे वाटत होतं त्याचा लल्लास उलगडा झाला नी तो पुन्हा थडी दणकावू लागला. झोपण्याच्या तयारीत असलेले नानजी नाना, गढी, नी नंतर सतोनातील लोक थडीवर एकच गर्दी करू लागले. लोकांनी लल्लास समजावत बाजूला केलं. कुणीतरी लिंबाचा पाला झाकला. रात्रीच पोलीस स्टेशनला कळवलं. सकाळी शव विच्छेदन करण्यात आलं. तत्पुर्वीच भैय्यासाहेब, संध्या, राधाताई आक्रोश करत आले. त्यांच्या सोबत काल साकीत गेलेला प्रभाकर ही आला.
कालच भैय्यासाहेबाने जळगावला मिसींग केस नोंदवली होती.
वेडाच्या भरात मुलास घेत दिपा हरवल्याची केस दाखल होती व पोलीस तपास करत होते. प्रभाकरलाही म्हणून काल सकाळीच बोलवलेलं होतं. पण दिपाचा असा अंत कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता. गोता आत्या, इंदुबाई, प्रभाकर व राधाताई ऊर तोड आक्रोश करत होत्या. शशांकचा तर अजुन काहीच तपास नव्हता.
वर्तमान पत्रात "वेडाच्या भरात आईची महापुरात उडी घेत आत्महत्या"
अशीच हेडलाईन होती. पोलीस पट्टीचे पोहणारे घेत साकी ते सतोन्याच्या आसपास शशांकचा शोध घेऊ लागले.
लल्ला, माई व गोताआत्या यांनी ओळखलं की मरतांनाही दिपानं साखळ्या उतरू दिल्या नाही व मयुर गोंदणासहीत ती लल्लाला भेटायला आली. मेल्यानंतर ही लल्लाला भेटण्याची जी आंतरीक ओढ होती ती ओढच तिचा देह लल्लाकडं घेऊन आली. मात्र लल्लास मग ती जाण्याआधीची रात्र आठवली. ती पुन्हा पुन्हा विनवत होती की निदान शशांकसाठी तरी लल्ला मला इंगळेच्या वाड्यातून सोडव.मला माझ्या मरणाची भिती नाही रे; तर शशांकची चिंता आहे!" पण आपण तिच्या सुखी संसारात विष कालवणं योग्य नाही अशा भ्रमात राहत तिच्या सांगण्याकडं दुलर्क्ष केलं व तिला जीव गमवावा लागला. पण तिचा मृत्यू हा आत्महत्या नाहीच. नक्कीच घातपात आहे.
लल्लानं प्रभाकर व नानजी नानास सारं सांगत तिच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी म्हणून केस ठोकावयास लावली. तो स्वत: पुरावा देणार असल्याचं त्यानं सांगितलं.
प्रभाकर नानजी नाना व लल्लानं भैय्यासाहेबावरच संशय घेत फिर्याद केली.
भैय्यासाहेब बिथरले. त्यांनी राधाताईस व संध्यास सारं सांगत स्टेशन गाठलं. पण राधाताई सतोन्यास गेल्या व त्यांना प्रेत सापडलं तो बालाचा भाऊ लल्ला असून त्याचच नाव दिपा घेत होती. तो गोटण बाबाचा नातू आहे! तीच ही लौकीच्या मल्ला पहेलवानाची मुलं! हे कळालं नी ती सतोन्याला ज्या भिती पोटी येत नव्हती तीच भिती तंतोतंत खरी होतेय हे कळताच तिच्या पायाखालची मातीच सरकली.
.
.
क्रमशः
वा....पा...