कथा - झडप (भयकथा)
©शीतल अजय दरंदळे
"हो ना , कंटाळा आला होता तसं लपून छपून जगण्याचा" माया आनंदून म्हणाली.
" माया आता सांग तुला काय काय करायचंय? तुझी सगळी स्वप्नं आता माझी" सुयश मायाला विचारतो.
"किती गोड आहेस रे तू, म्हणूनच मला खूप आवडतोस, माझ्या स्वप्नांची लिस्टच सांगते तुला आता" माया उत्साहात सांगायला सुरुवात करते.
" एक- एक सांग डार्लिंग, आज काय करूयात?" सुयश तिला थांबवत म्हणतो.
"आज मस्त डिनर आणि बाईक राईड...... फक्त तू आणि मी..., लांब घाट रस्ता, भिजत भिजत जाऊ, कॉफी घेऊ " माया तिची पहिली ईच्छा सांगते.
"जशी आपली इच्छा,पण पावसाळ्यात बाईक राईड म्हणजे.... असुदे, तू म्हणशील तसं , तयार रहा मी येतो संध्याकाळी" सुयश मायाला सांगून फोन ठेवतो.
अगदी मॉडेल सारखी राहणारी स्मार्ट माया आणि हँडसम हंक सुयश एकाच कंपनीत ,एकाच डिपार्टमेंट मध्ये.... सहा महिन्यांपूर्वी माया कंपनीत जॉईन होते आणि सुयशचे आयुष्यच बदलून जाते. दोघांची मैत्री होते आणि कधी एकमेकांकडे आकर्षित होतात त्यांचं त्यांनाही कळतही नाही. मैत्रीच्या सर्व मर्यादा पार करून त्यांना आता एकमेकांशिवाय काही दिसत नाही. सगळ्या कंपनीत त्यांचीच चर्चा, पण त्यांना आता फिकीर नसते.
माया संध्याकाळी तयार होऊन सुयशचीच वाट पाहत असते. सुयश बाईक वरून येतो हॉर्न वाजवतो, माया केस सावरत येतच असते. सुयश माया कडे घायाळ होऊन बघतच राहतो. तिचा पांढराशुभ्र स्लीवलेस वन पीस, स्टेप्स केलेले व्यवस्थित केस, गोल मानेपर्यंत आलेले इअरिंग,लिपस्टिकने रंगवलेले लाल ओठ, मॅचिंग हायहिल्स सँडल आणि त्यावर तिची मादक चाल. माया त्याला हलवत म्हणते "सुयश अरे काय पाहतेस माझ्याकडे ?? निघुयात ना?" सुयश भानावर येत गाडी स्टार्ट करतो माया त्याच्यामागे बसते आणि दोघे निघतात.
गाडी बराच वेळ चालवून झाल्यावर ते दोघे शहराबाहेर असलेल्या एका रेस्टॉरंट मध्ये येतात. रिमझिम पाऊस सुरू होतो. प्रसन्न वातावरण असतं. पदार्थांचे दरवळ चोहीकडे पसरले असतात.
"काय सुंदर रेस्टॉरंट आहे ना सुयश? " माया चौफेर नजर टाकत म्हणते.
" तुझ्याइतकं सूंदर इथे काहीच नाही माया" सुयश मायाकडे एकटक बघत
" ओह थँक्स, मला ते माहितेय " दोघेजण एका टेबलवर बसून ऑर्डर करतात.
"माया मला आज पहिल्यांदा इतकं मोकळं वाटतंय, ना कोणाचे फोन? ना मेसेज?ना काही प्रश्न?" सुयश सुस्कारा टाकत मायाला म्हणतो.
" इतकं व्यवस्थित प्लॅनिंग केलंस त्यामुळेच. तू ठीक आहेस ना? " माया सुयशच्या हातावर हात ठेवून म्हणते.
" Ofcourse!!!! फक्त तुझ्या प्रेमासाठी डार्लिंग..आता कधीच तो विषय नको...!???" सुयश
" तू खूप काही केलं आहेस माझ्यासाठी,I owe you by all mean" माया सुयशच्या नजरेत नजर मिळवून म्हणते.
" So that means after dinner मला आज .......!?..." सुयश सूचक हसत मायाला विचारतो.
मायाला सुयश ची नजर कळते, ती हसून नजरेनेच होकार देते. सुयश खूप अधीर होतो, तिचा हात घट्ट धरतो. तितक्यात वेटर खाण्याच्या डिश घेऊन येतो, सर्व्ह झाल्यावर दोघे गप्पा मारत जेवतात. बिल आल्यावर सुयश पैसे भरतो आणि लगेच गाडी स्टार्ट करतो. माया पाठीमागून त्याला घट्ट मिठी मारून बसते. एव्हाना अंधार झालेला असतो. सुयश एका हाताने मायाचा हात हातात घेतो. माया हळूच मागून सुयश च्या कानावर किस करते. सुयश तिच्या हातावर ओठ टेकावतो. दोघे हातात हात गुंतवतात..आणि गाडी सुसाट सोडतो.
थोडे पुढे गेल्यावरच घाट रस्ता असतो माया सुयशला हट्ट करते की तिला तिकडे जायचं आहे. सुयश अंधार होत असल्याने आधी तयार नसतो पण मायाच्या हट्टामुळे तो गाडी घाटरस्त्याकडे वळवतो.
शहराबाहेरचा वळणावळणाचा लांब रस्त्या, चढ उतार ,, बाजूला अंधारात काळीकुट्ट दिसणारी जंगलातली दाट झाडी, रातकिड्याचा किर्रर आवाज...एखादं दुसऱ्या गाडीची दूरवर दिसणारी मिणमिणती हेडलाईट...फार काही रहदारी नसतेच. माया सुयशच्या अजून जवळ येते. सुयश गाडीचा वेग हळू करतो. " आता वळूयात का? उशीर होतोय. घरी जाऊयात" सुयश मायाला विचारतो.
"नको ना, अजून पुढे घाटाच्या मध्यापर्यंत जाऊ, तिथून दरी दिसते ना, मला पहायचीय" माया म्हणते. "इतक्या काळोखात काय दिसणार आहे माया?" "मी तिथे तुला काहीतरी देणार आहे !! " माया सुयशच्या कानात कुजबूजते. " ढकलून देणार नाहीस ना मला?" सुयश हसत विचारतो.. "वेडा आहेस का तू??? काहीतरी काय, कळेल थोड्यावेळात, I Love you, मला पूर्ण फ्रीडम हवंय आता या रात्री , काही प्रश्न नकोत".
सुयशला अचानक स्वाती आठवते. नुकतंच दोघांचं लग्न झालेले, आणि अश्याच एका रात्री सुयश आणि स्वाती लॉंग ड्राईव्ह वर निघतात. पण स्वाती लगेच घरी जायचा हट्ट करते. स्वातीला अंधाराची भीती होती. ती घाबरटच होती, कसलीच स्वप्न नाहीत, साधी गृहिणी, पण माया आली जीवनात आणि सगळं बदलून गेलं , सुयशला अशीच बायको हवी होती. त्याच्या स्टेटस ला शोभणारी, त्याला शोभून दिसणारी. म्हणून स्वातीला दोन दिवसांपूर्वीच सुयश आणि मायाने मिळून संपवले होते. खून 'अपघात' म्हणून खपवला होता. स्वाती नसल्याने सुयशला प्रश्न विचारणारे कोणीच राहिलं नव्हतं. माया आणि त्याला आता पूर्ण स्वातंत्र्य मिळाले होते. स्वतीचा अडसर त्यांनी कायमचा दूर केला होता. बेबंध प्रेमाला आता उधाण आले होते.
मायाच्या आवाजाने त्याची विचारांची तंद्री थांबते. घाटाच्या मध्यावर आल्यावर माया गाडी थांबवायला सांगते.दोघे गाडीवरून उतरून दरीकडे बघत राहतात. माया आपल्या पर्समधून हळूच लाल गुलाब बाहेर काढते आणि सुयशच्या दिशेने बघून म्हणते, " सुयश माझ्याशी लग्न करशील?" सुयश आश्चर्यने तिच्याकडे पाहतच राहतो. तो फुल हातात घेतो आणि काही म्हणणार इतक्यात त्याची गाडी पडल्याचा आवाज येतो. तो वळून पाहतो तर बिबट्या!!! दोघांची भीतीने गाळण उडते. सुयश तसाच उभा राहतो. बिबट्या हळूहळू त्यांच्या दिशेने यायला लागतो.
मागे खोल दरी, समोर बिबट्या!!!!
सुयश हळूहळू मागे सरकू लागतो, पण अचानक बिबट्या दिशा बदलतो. सुयश धावतच बाईक गाठतो. पटकन सुरू करायचा प्रयत्न करतो पण गाडी सुरूच होत नसते. तो जोरजोरात किक मारतो. बिबट्या आवाजाने परत वळून त्यांच्या दिशेने यायला लागतो. बिबट्याकडे लक्ष ठेवत सुयश किक मारत मायाला हाका मारत असतो. माया मागे येऊन बसते. बिबट्या झेपावत येणार इतक्यात गाडी चालू होते. दोघे वाऱ्याच्या वेगात सुसाट निघतात. सुयश अतिशय घाबरलेला असतो. अंगातून घामाच्या धारा वाहत असतात. हृदय जोरजोरात धडधडत असते.
थोडावेळ चालवल्यावर तो मायाला विचारतो, " तू बरी आहेस ना ग?" ती त्याच्या पाठीवर मान ठेवत " हम्म" म्हणते. "तू घाबरू नकोस, थोडावेळातच आपण शहरात पोहचू" ... सुयश तिला धीर देत म्हणतो.
"मी आता कशालाच घाबरत नाही सुयश?" सुयशला आवाज ओळखीचा वाटतो.स्वाती!!!???!!??
सुयश गाडी थांबवतो, भीतीने थरथरत खाली उतरतो गाडी बाजूला पडते आणि जोरात किंचाळतो मागे वळून पाहतो तर कोणीच दिसत नाही. फक्त जोरदार हसणारा स्वातीचा भेसूर आवाज ... सुयशची भीतीने गाळण उडते, तो सैरावैरा धावू लागतो.. पण हसण्याचा आवाज अजूनच गडद होतो. सुयश शेवटी थांबतो आणि ओरडतो ," स्वाती, तू आहेस? कसं शक्य आहे? तू दोन दिवसांपूर्वीच हे जग सोडून गेलीस? आम्हीच तुला संपवले, माया कुठे? कोणी तरी ऐका माझं??" मायाला जोरात हाक मारतो. पण कुठलाच आवाज येत नाही. मुसळधार पाऊस सूरू होतो. सुयश जोरजोरात रडायला लागतो.कान बंद करतो पण हसणारा आवाज संपतच नाही .
तो आर्जव करतो " स्वाती, मला मारू नकोस, मी चुकलो. मला तुला मारायचं नव्हतं. मायाने सांगितलं आणि मी ऐकलं, प्लिज सोड मला" कुठेच कोणी दिसत नाही, आवाज अजून वाढतच जातो... सुयश हतबल होतो.. आणि काही वेळाने सुयश शांत होतो......
दुसऱ्या दिवशी पेपर मध्ये बातमी " काल रात्री शहराबाहेरच्या घाटामध्ये दोन मृतदेह सापडले. बिबट्याच्या हल्ल्यात एक तरुणी ठार, व तरुणाचा हार्ट अटॅक ने मृत्यू, पोलीसांचा तपास सुरू "
...समाप्त....
©शीतल अजय दरंदळे