*भाग :-- पाचवा**
*वा.....पा...............*
जळगावचे पाहुणे जाताच बजा अप्पानं पुन्हा नानास बोलवलं.
" नाना , आता या पाहुण्यांना नंदास पाहू देण्यास हरकत नाही ना?"
नानानं गिमोणकराच्या नातवावर व जावयावर नजर मारली. मनात कडवट हास्याची लकेर उमटली.
" अप्पा, कुसुरकरांचा रुकार नकार आल्याशिवाय मी पुढचं कसं सांगू!" नाना हळूवार बोलले.
" नाना, मग त्यांना थांबवायला नको होतं?" अप्पाचा स्वर वर चढला.
" अप्पा, अदब ठेव! त्यांना थांबायला मी सांगितलं नाही" नानाचा आवाजही वाढला.
प्रकरण वाढतंय पाहताच नामदेवराव मध्ये पडले.
" नाना, आम्हीच थांबलो असं समजा हवंतर. पण थांबलो आहोत तर निदान मुलीस तर पाहू द्या!"
" नाही! बिलकूल नाही.तुम्ही पाहणार पण समोरच्या मंडळीचा रुकार आला तर मग उद्या नाहक वाद तुमच्यात नं आमच्यात!" नाना कटवायचंच या इराद्यानं तडकातोड बोलले.
" आणि नकार आला तर?" बजा अप्पा संतापून मध्येच कळवळले.
" अप्पा, आपल्या इच्छेनं साऱ्या गोष्टी होत नसतात! नकार आला तर त्या वेळेस पाहू.पण मला पूर्ण खात्री आहे कुसूरकर नकार देणार नाहीत"
आता मात्र नानाची अजिबात इच्छा नाही हे नामदेवरावांनी ओळखलं. त्यांनी हारल्या चेहऱ्यांनं निलेशकडं पाहीलं.
निलेश लाव्हा खदखदावा तसाच खदखदत उठणार तोच नामदेवरावांनी त्यास खुणेनंच शांत केलं.
" नाना ठिक आहे.आपणापुढे आम्ही जाणार नाहीत. पण समजा समोरच्या मंडळींकडून नकार आलाच तर एक वेळ आम्हास जरूर कळवा! आम्ही आपणास नकार देणार नाहीत.मुलीला मी पाहिलं नसलं तरी माझा माझ्या मुलाच्या पसंतीवर पुर्ण भरोसा आहे!"
" पुढचं पुढे ठरवू! मी आताच काही सांगत नाही!" सांगत नाना सरळ उठून निघून गेले.
घरात थांबलेल्या नंदाच्या कानावर सारं बोलणं पडत होतं. तिला निलूच्या वडिलांचं कळवळून बोलणं सलू लागलं.नी मग सरता जेष्ठाच्या सरी बाहेर व आतही जोमानं बरसू लागल्या. तसं नंदाला आपल्या आईचं " पोरी सायंकाळच्या दिवेलागणीचा पाऊस बरा नसतो गं! भोराच समजावा असा पाऊस!" बोलणं आठवलं. शहरात पडत्या पावसात दिवेलागणीची वेळ झाली.
नामदेवराव अशा वेळीच निघू लागताच अप्पाना एकदम वाईट वाटलं.
" नामदेवराव ,असल्या सांजच्या वेळी मी आपणास जाऊ देणार नाही.लांबचा प्रवास,पाऊस मुळीच जाऊ नका.उद्या पहाटेच निघा हवंतर!"
" अप्पा, थांबण्यासाठी काही उरलं नाही असं मी मुळीच म्हणणार नाही. पण तरी आता कृपा करुन थांबवू नका! तुम्ही जळगावकरांचा निरोप काय येतो ते कळवा म्हणजे लगेच येऊ आम्ही!"
निलेशनं बालाला फोन करण्यात आता अर्थ नाही. तो निघूच देणार नाही.म्हणून तो परतण्याआधीच त्यानं अंगणातली गाडी दारासमोर आणली.आई- वडील उतरुन गाडीत बसणार तोच दुपारी नेसलेल्या पैठणीतच नंदा तुळशीला दिवा लावण्यासाठी ओसरी बाहेरच्या कोरीलगतच्या वृंदावनापाशी आली.शांताबाईंनी नंदाला पाहिलंच होतं घरात; पण नामदेवरावांनी तिला पाहिलं नव्हतं. त्यांनी गाडीतूनच दिवा लावणाऱ्या नंदास डोळे भरून पाहिले. ते तसेच गाडीतून उतरले व खिशात हात घालून हाताला लागली ती नोट तांब्याच्या तबकात टाकत लक्ष्मीला पाहत ज्योतीचं दर्शन घेतलं.
नंदानं त्यांच्या पायास केव्हा स्पर्श केला हे त्यांना कळलंच नाही.
" पोरी हा पाऊस ,वादळवाराच काय पण कितीही संकटं आली तरी सांजदिप तेवत ठेव!"
नंदाच्या डोळ्यातला टपकणारा थेंब हातानं पुसत त्यांनी तोंडभरून आशीर्वाद दिला.
" त्यांचा नकार येईलच ! मी वाट पाहीन! " नंदा निलूकडं पाहत ऐकू जाईल अशा हळू आवाजात पुटपुटली. हे सारं इतक्या क्षणात झालं की घरातल्या नानास काय होतंय काहीच कळलं नाही. नामदेवराव येणारा हुंदका दाबत गाडीत बसले.
" निलू बेटा काही झालं तरी आता माघार घ्यायची नाही!" मोठ्यानं दाटल्या गळयानं नामदेवराव बोलले व भैरवास गाडीतूनच नमस्कार करत ते निघाले.
बाला दहाच्या सुमारास घरी आला. त्याला सरू वहिणीनं सारं नाट्य कथन केलं. त्याला नानाचा किती तरी राग आला पण तरी नानापुढं बोलण्याची त्याची हिम्मतच नव्हती. त्यानं नंदाची भेट घेतली. नंदानं पुन्हा रडून सारं सारं सांगितलं.
" बाप्या ते जळगावचं डाॅक्टर नवीन फिरकणार नाही व नकार देईल हे निश्चीत!"
" मग निलूला नवीन आणण्याची जबाबदारी माझी! बाकी पुढे काय होईल ते बघू! बालानं धीर दिला.
पाच सहा दिवस होऊनही कुसुरकरांचा निरोप येईना म्हणून ते स्थळ सुचवणाऱ्या दौलतराव कुसुरकरांचे भाऊ मनाजी कुसुरकरांना नानांनी फोन लावत खुलासा मागीतला व त्यांना धक्काच बसला. मुलानं नकार दिल्याचा निरोप मनाजी कुसुरकरांनी कळवला.नानांनी मनाजीरावांना खडसावलं.वास्तविक मनाजीराव जिल्ह्यातली राजकीय मोठी हस्ती. त्यांचा राजकारणात मोठा वकुब.
" मनाजीराव! मुलांच्या आई वडीलांनी मुलीस पसंत करत फोटो नेले. फोटो पसंत होते म्हणून तर मुलगा आला असेल पाहायला! मग नकार का? कारण तरी कळेल का?" नाना तापले.
" गजाननराव, तुमचं बरोबर आहे सारं. पण आताची पोरं जेवढी शिकलेली तेवढीच हुकलेली असतात. जाऊ द्या. फोटोत पसंत करुनही प्रत्यक्ष पाहूनही नापसंत करतात!"
कुसुरकरांचा नकार आला हे बजा अप्पास कळलं. नंदाला व बालाला हे होणार हे माहीत होतंच पण नानाकडून घरात कळणं महत्वाचं होतं. ते कळताच बजा अप्पांनी नानास औरंगाबादच्या पाहुण्यांना बोलवू का म्हणून विचारलं. पण नाना हू की चू बोलले नाहीत. अप्पांना त्यांचं मौन हाच होकार वाटला. जळगावकरांच्या नकाराचा नानास धक्का बसला असावा असं समजत अप्पानं औरंगाबादला फोन लावला.
नंदास मात्र आनंदात ही डाॅ.नंदन बाबत विशेष कौतुक वाटलं. डाॅ. शब्दाला जागला म्हणून तिला मनोमन आदर वाटला.
" निल्या माकडा! मी वाट पाहतेय! " तिनं निलेशला फोन करत आनंदानं कळवलं. नामदेवराव शांताबाई व निलेश सारे निघाले .
अप्पाच्या घरात आनंद झाला तसाच नानांनाही झाला पण वेगळ्या कारणानं. गिमोणकराच्या जावयांना मागच्या वेळी ताटकळत ठेवत आपण आपला बदला घेतला पण आता नातवाचाही काही तरी निकाल लावत पुन्हा त्यांना झटका देऊ,असं ते मनात ठरवतच ते अप्पांनी ओसरीवर बोलवताच आले.
" नाना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असंच समजा. नियती दोन जिवाच्या गाठी आधीच बांधून ठेवते म्हणून आम्हास नियती पुन्हा तुमच्या घरी घेऊन आली." नामदेवराव मनातली मळमाती जावी म्हणून आनंदानं बोलले.
" नाना, मोजून आठ दिवस राहिलेत फक्त आता देव बसायला. त्याआधी सारं होईल का? का आता संबंध जुळवुन देव उठवल्यावर करायचं!" अप्पा खुशीनं विचारू लागले.
घरात सरू वहिणी नंदास सजवत होती. आईला ही आनंद झाला होता. त्या भरात साऱ्यांनी नानास गृहीत धरण्याची चूक केली. पण नानांनी हळूच आपले पत्ते टाकावयास सुरुवात केली.
" अप्पा तू म्हणतोय तेच बरोबर! आता घाई करण्यात अर्थ नाही. कार्तिकी एकादशीला तुळशी विवाहानंतरच पाहू!"
" नाना काही घाई नाही. फक्त आता मुलीला पाहण्याची औपचारीकता करत नारळाचा कार्यक्रम करुन घेऊ!" नामदेवराव आनंदानं सुचवू लागले.
" मला कळलं नाही? तुम्ही काय म्हणता?" नाना बोलले नी नामदेवरावासोबत अप्पाही बुचकळ्यात पडले.
" नाना, निलेशसाठी सांगताय ते !"
" मुळीच नाही! मी मागेच नकार दिला होता. मग पुन्हा पुन्हा तो विषय का घेत आहात तुम्ही?"
" नाना ,आता अति होतंय ! जळगावकरांनी नकार दिल्यावर मी आपणास विचारून तर यांना आमंत्रण दिलंय. मग?"
" अप्पा, तू विचारशील, विचारलंही असेल पण मी होकार दिला का? मग ?"
" नाना, कसला सियासती खेळ खेळताय आपण! ही काही राजकीय पक्षाशी बैठक वाटतेय का आपणास? शब्दजंजाळ उभं करत पेच टाकायला?" नात्याशी नातं जुळवतांना असले सियासयी खेळ का खेळताय आपण? " नामदेवराव आता काळजात उठणारी कळ दाबत रागानं फुत्कारले. कारण आता अती होतंय याची त्यांना पूर्ण जाणीव झाली.
" नामदेवराव जिला तुम्ही बैठक म्हणताय ती मुळात मी बोलवलीच नाही. तुम्हीच वारंवार स्वत: येत असाल तर त्याला मी काय करु?"
" नाना शेवटंच विचारतोय आता! तुम्हास तुमची मुलगी द्यायची की नाही?"
" मुळीच नाही?" नाना खुनशी शांततेनं म्हणाले. नी नामदेवराव, शांताबाई, निलेशवर आभाळच कोसळलं. नामदेवरावांना तर आपल्या शरीरातलं रक्त कुणीतरी वेगानं उपसतंय व जीव गोळा होत कंठाशी आलाय पण निघतही नाही असाच भास होत भोवळ यायला लागली.
" नाना, तुमची मुलगी आहे नका देऊ पण नकाराचं कारण तरी कळेल का?" शांताबाईनं तीळ तीळ तुटणाऱ्या मुलासाठी साऱ्या मानमर्यादा तोडत विचारलंच.
"........" नाना शांताबाईकडं पाहत मौन बाळगते झाले.
" सांगा नाना सांगा! तुम्ही जसं कुसुरकरांना नकाराचा जाब विचारत होते तसाच जाब ताई विचारत आहेत! उत्तर द्या!" अप्पाही गरजले. कारण या वेळेस बालानं नव्हे तर त्यांनी स्वत: आमंत्रण दिले होते.
" मला माझी एकुलती एक मुलगी मिलीट्रीतल्या मुलाच्या पदराशी बांधून आयुष्याचा धोका नाही पत्करायचा!" नाना प्रथमच मोकळे बोलले.
" नाना हाच विचार जर शुभ्राच्या वडिलांनी केला असता तर आपल्या बालाचं ही लग्न झालं नसतं" अप्पा संतापत विचारू लागले.
" अप्पा कुणाच्या अपेक्षा, निवडी याबददल मी काय सांगणार. मी माझ्या अपेक्षा सांगू शकतो. व हल्ली मला तर यांचा मुलगा सैन्यदलात असल्यानं सुरक्षिततेच्या कारणास्तव नकार देण्यास कारण पुरेसं वाटतं!"
" नाना, सुरक्षितता! कुणीतरी सिमेवर डोळ्यात तेल घालत पहारा देतात ,प्रसंगी छातीवर गोळ्या झेलत जिवाची होळी दिवाळी करतात; त्यांचाच संसार आपण उभा राहू देत नसू तर यापेक्षा मोठं दुर्दैव काय म्हणावं सैनिकाचं!" नामदेवराव हुंदका दाबत कळवळले.
".........." नाना शांत.
" नाना, हे धांदात खोटं कारण देत आहात तुम्ही!" निलेश प्रथमच भाग घेत तडकला.
" आपण कोणताही अर्थ काढू शकता. पण माझ्या दृष्टीनं नकाराचं कारण तेच!"
" नाना माझ्या सैन्यातील नोकरीवरुन तुम्ही नकार देत असाल तर सैन्याच्या नोकरीस मी लगेच राजीनामा देतो मग तर झालं! पण नकार नका देऊ! दोन वर्षांपासून आम्ही दोघं होरपळतोय! विचार करा!"
" राजीनामा दिल्यावर काय होईल. हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागं तुम्ही पळणार! पण मग मी का पळावं तुमच्या मागं!"
" नाना, मुळीच नाही. हातची नोकरी सोडतोय ती पळत्याच्या पाठीमागं पळण्यासाठी नाही तर मी लगेच प्रशासकीय सेवेत नोकरी मिळवतो." निलेश पटवू लागला.
नाना फुटरं मिश्कील हसू आणत टोचत बोलले.
" निलेशराव! बोलणं सोपं असतं! प्रशासकीय सेवा मिळवणं काय इतकं सोपं वाटलं तुम्हास."
" नाना ,तो माझा प्रश्न आहे"
" अहो प्रशासकीय सेवेत परीक्षा देता देता डोक्याची केसं उडत टकला पडलेल्या कितीतरी केसेस पाहत माझी सफेदी झाली. कलेक्टरची स्वप्ने पाहणारी वय वाढू लागतं तसं शिपायाच्या नोकरीसाठी धडपडतात पण ती ही मिळत नाही.न तुम्ही डिंगा हाकत आहात!"
" नाना, हा निलेश आमोणकर तुम्हास स्टॅम्पवर लिहून देतो की एका वर्षात आय पी एस ची पोष्ट काढून दाखवतो!"
" ठिक आहे तर मग एवीतेवी आता शयनी एकादशीमुळं चार महिने थांबावं लागेल त्यात आणखी आठ महिने थांबतो! पुढच्या जेष्ठ महिन्यापर्यंत मी बांधील तुमचा! मग तर झालं!" नानांनी शब्दात बांधत त्यांना कटवल्याच्या आनंदात उठणं पसंत केलं व छापखान्यात निघाले.
नंदाला जिवनात पहिल्यांच आपल्या जन्मदात्याचं असलं वागणं जिव्हारी लागलं. पण तरी तिला एक समाधान वाटलं की अट ठेवून का असेना पण नानांनी होकार दिला. पण आय पी एस ची पोष्ट काढणं ती ही पहिल्याच प्रयत्नात निलेशला होईल शक्य? या विचारानं समाधानातही भिती तिला कुरतडू लागली. पण माकडाच्या तावडीतून सोडवणाऱ्या या माकडावर तिचा भरवसा होता.
बालानं भरपूर आग्रह केला पण निलेश थांबलाच नाही.
" बाला काहीच्या नशिबात सहजासहजी सुखं मिळणं नसावं! नियतीनं आमच्या गाठी बांधतांना गाठीत गाठीचा गुंथनकाला करुन ठेवला असावा आमच्यासाठी! तो सोडूनच आमची गाठ बसेल! त्यासाठी आणखी काय काय करावं लागतं हे त्या अलक्षालाच माहीत"
बालाचं काळीजच करपलं निलेशचं बोलणं ऐकून! एक वर्षापासून निलेशचं विरहात होरपळणं तो पाहत आला होता. म्हणून तर निलेश होरपळतोय ती आपलीच बहीण हे कळल्यावरही बाला स्वखुशीनं तयार झाला होता. पण त्यात त्याला व त्याच्या घरच्यांनाही नानांच्या विचीत्र वागण्यानं म्हणावं तसं यश आलं नाही म्हणून बालाचंही ह्रदय पिळवटून निघालं.
निलेशनं बालास भेटत निघायची तयारी केली तोवर नंदा निलेश जवळ आली.
" निलू!........"
" नंदा! असं समजू आणखी एक वर्ष आपली भेट झालीच नाही.दोन वर्ष काढली तसंच हे वर्ष ही काढू!"
" निलेश मला खात्री आहे तू माझ्यासाठी पोष्ट काढशीलच! पण ..पण येशील ना परत! मी वाट पाहीन! एक वर्ष ताटातूट सहन करेन! वाट पाहणं सोडणार नाही.... पण येशील ना?"
तिचा संयमाचा बांध फुटलाच.
" नंदा तुझ्यासाठी तर परततोय!मी पुन्हा येईन...! मी पुन्हा येईन.....! मी पुन्हा येईनच........!"
क्रमशः....