मी पुन्हा येईन....
*भाग :-- चौथा*
*वा.......पा..........*
बालाने मधुचंद्रासाठी दक्षिण भारतात जाण्याच्या मार्गात बदल करत तो व शुभ्रा निलेश सोबत औरंगाबादला आधी निघाले. निलेशकडे रात्रभर मुक्काम करत बालानं काका-काकुना आपल्या चुलत बहिणीबाबत कल्पना देत गजानानाकडून ( मुलीकडून) येण्याचं निमंत्रण दिलं. नामदेवराव आमोणकर मंडल अधिकारी( सर्कल) व शांताबाई या शिक्षीका होत्या. निलेश हा त्यांचा एकुलता एक मुलगा. घरात सारं ऐश्वर्य, संपन्नता,सुखे होती. नामदेवरावांना निमंत्रण देण्यासाठी वडीलधारी मंडळी आली नाहीत ही बाब खटकली. पण मुलाची पसंत व बदलता काळ म्हणून त्यांनी त्या गोष्टीस महत्व न देता बालास होकार दिला. बाला व शुभ्रा निघून गेले. मुलगा बऱ्याच महिन्यांनी आलाय म्हणून पाच सात दिवस ठेवत शांताबाई व नामदेवरावांनी आठ दिवसानंतर सावकाश जायचं ठरवलं.
चार चाकी गाडी काढत नामदेवराव ,शांताबाई व निलेश भुसावळला निघाले. बालाच्या घरीच मुक्काम करण्याच्या हिशोबाने ते दुपारून पाचच्या आसपास पोहोचले. बजा अप्पा, टिला, सरू वहिणी साऱ्यांनी प्रेमाने आदरातिथ्य केलं.
निलूनं नंदास आधीच कळवलं असल्यानं ती आतुरतेनं वाट पाहतच होती. पण गजा नानास अप्पानी कल्पना देताच त्यांची नस तडकली.
कारण जळगावहून दुपारीच दौलतराव कुसुरकरांचा 'उद्या नंदन मुलीस पहायला येतोय' म्हणून निरोप आलेला. त्यात ही ब्याद आलेली ऐकताच संयमी नाना मनातल्या मनात तणाणले. त्यांनी छापखान्यातली पडलेली कामं काढत नंदास अडकवलं. नंदास रात्री उशीरपर्यंत वर जाताच आलं नाही. निलेशची नजर सारखी तिलाच शोधत होती. त्यानं सरू वहिणीकडं अधिरतेनं चौकशीही केली.
रात्री गजा नाना छापखान्यातून वर येईपर्यंत साऱ्यांची जेवणं आटोपून ओसरीत बसली. अप्पानं नानास ओसरीत बसण्यासाठी बोलवलं. अप्पांना गजा नाना बिनसले याची कल्पनाच नसल्याने ते नानांना या संबंधात आनंदच आहे या समजमध्येच होते. नंदा घरात सरु वहिणीकडं येऊन निलेश व त्याच्या आईस भेटून गेली. पाया पडताच शांताबाईनं भावी सुनेकडं कौतुकानं पाहत आशीर्वाद दिले.
गजा नाना मुद्दाम उशीरा ओसरीवर आले. येता येताच अप्पांनी ओळख करून देताच नाईलाजानं नमस्कार करत बसले. नामदेवराव आस्थेवाईकतेनं विचारपूस करु लागले, भरभरुन बोलू लागले. पण नाना जेवढ्यास तेवढेच हा हू करत वेळ मारु लागले. अप्पांना नानाचं चलिंतर कळेना. ते चक्रावले.
" तुमचं मूळगाव कोणतं?" नानांनी सवाल केला.
" आमचं मुळ गाव चाळीसगाव. पण तलाठी म्हणून औरंगाबादला लागलो. लग्नानंतर तिकडेच स्थायीक झालो. जळगावचे सासरे वारले. त्यांनाही निलेशची आई एकटीच मुलगी होती. त्यानंतर त्याचा वाडा, छापखाना सारं विकलं व औरंगाबाद हेच आता वतन झालं. म्हणून चाळीसगावला काही असलं तरच येणं जाणं" नामदेवराव सर्व माहिती पोटतिडकीनं देऊ लागले.
' चाळीसगाव, तलाठी, एकटी मुलगी शांताबाई ' सारं सारं ऐकलं व गजा नानास जी अंधुकशी आशा होती ती ही मावळली. आता पर्यंत हा शुभंकर गिमोणकर दुसरा निघाला तर निलेश यात काही वावगं नाही ही मावळती आशा धरुन नाना होते. पण आता त्यांची खात्री झाली की निलेश हा त्याच शुभंकर गिमोणकरांचा नातू आहे.
" अप्पा, अस्वस्थ वाटतंय ! मी लोळतो" सांगत नाना निघूनही गेले. नामदेवरावांना यजमानांनी असं अचानक उठून जाण्याचा धक्काच बसला.
अंथरुणावर पडल्या पडल्या पंचवीसेक वर्षांपूर्वी सोसलेला जाळ गजा नानास आठवला व त्याच्या डोळ्यात अंधारात लाली थरारली.
.
.
गणपतराव चिंचोले कडं वडिलोपार्जित हवेली शिवाय काहीच शिल्लक नव्हतं. म्हणायला मुलगा गजा काही तरी हातपाय मारत छापखानाचं खुळ डोक्यात घेऊन बसला होता. लग्नाचं वय होताच त्याचीच मावस मावशीच्या चुलत- मुलत बहिणीचा दूरचा जळगावचा भाऊ शुभंकर गिमोणकर याच्या मुलीचं स्थळ सुचवलं. मुलगी पीटीसी होती. गिमोणकराचा जळगावला मोठा वाडा, चांगला चालणारा छापखाना होता. गरीब माणसास दूरची नातीही जवळची वाटतात. गणपतरावास त्याच्या परिस्थीतीबाबत कल्पना नव्हती पण नात्यातलं स्थळ म्हटल्यावर त्यांनी जायचं ठरवलं. पण गजाला त्यावेळी लग्नापेक्षा छापखान्यात जम बसवणं महत्वाचं असल्यानं गजा मुलगी पहायला जायचं म्हटल्यावर येणार नाही म्हणून गणपतरावांनी त्यास "आपल्याला जळगावला गिमोणकरांचा छापखाना पहायला जायचंय" सांगितलं. छापखाना म्हटल्यावर काही तरी नविन पहायला मिळेल, सल्ला, माहिती, तंत्र मिळेल म्हणून गजा वडिलांसोबत सकाळी रेल्वेने निघाला. स्टेशनवर उतरुन तीनेक किमीवरील गिमोणकराचा छापखाना पायी चालत चालत शोधायला त्यांना दहा अकरा वाजले.
भला मोठा वाडा, त्यात निम्म्या वाड्यात रहायचं व निम्म्या वाड्यात छापखाना. गजा विस्फारल्या डोळ्यांनी पाहू लागला. गिमोणकर कुठं बाहेर गेले असावेत बहुधा.
गणपतरावांनी बाईंना भुसावळहून गणपतराव चिंचोले आल्याचं कळवलं.
" शांते, पाणी दे गं त्यांना!" घरातून बाईंचा आवाज घुमला.
गजाच्याच वयाची फुग्गावालं ब्लाऊज व परकरातली शांती पाणी घेऊन आली.
"गजा, येणारी मुलगी पाहून घे! तिलाच पहायला आलोत आपण" वडिल गजाच्या कानात कुजबुजले. तोवर मुलीनं ग्लास हातात दिला. गजाला पाणी पितांना जोराचा ठसका लागला. छापखाना पहायचं नाव करून वडिल मुलगी पहायला घेऊन आले हे ऐकताच गजा थरथरला. पण आता समोर मुलगी म्हणून तो काहीच बोलला नाही. त्यानं त्याही स्थितीत तिरक्या नजरेनं शांतीकडं पाहिलं.प्रेम भाव हा गरीबी श्रीमंती असा भेद थोडाच करणार! गजास मनात कालवाकालव जाणवली.
तोच मागून वाड्यात आलेल्या गिमोणकरांना बाईंनी पाहुणे आल्याचं सांगितलं.
" हे गणप्या चिंचोलं या वेळेसच कसं टपकलं? आज तर शांतीसाठी चाळीसगावचे पाहुणे येत आहेत!" वाड्यातलं बोलणं स्पष्ट कानावर येत होतं. गजा वडिलांना उठण्याची खूण करू लागला .वडिलांनी त्याला खूणेनच शांत बसायला लावलं.
" काय गणपतराव कसं काय येणं केलंत?"
" शुभंकरराव, तुमच्या बहिणीची चुलत बहीण अंजाबाई आमची मेव्हणीच. त्यांनीच तुमचं नाव सुचवलं. खूप काही ऐकलं तिच्याकडून तुमच्या विषयी.हा आमचा गजा.म्हटलं याच्यासाठी तुमची शांता.....पहायला...." पण तोवर अंगणात टांगा उभा राहिल्याचा आवाज येताच शुभंकरराव उठले.
" गणपा, चाळीसगावचे पाहुणे आलेत वाटतं! त्यांना मी निमंत्रण दिलंय म्हणून तुम्ही आता आलात तर थांबा पण त्यांच्यानंतरच..."
" चालेल काही हरकत नाही. आम्ही बसतो हवंतर!" गणपतराव बोलले पण हे ऐकण्याआधीच शुभंकरराव पाहुण्यासाठी अंगणात निघून गेले होते. गजाला जिवनात पहिल्यांदाच आपली व आपल्या गरिबीची लाज वाटली. आपला बाप त्याला दुनियेतला दीन दुबळा, असहाय, लोचट वाटला व त्याच्या अंगाची लाही लाही झाली. तो उठून बाहेर पडणार तोच टांग्यातून उतरलेले पाहुणे आत आले. त्याला निघताच आलं नाही.
चाळीसगावचा असलेला मुलगा तलाठी होता. शर्ट, नॅरोपॅण्ट घातलेला,बिटल ठेवलेला,पायात बुट असलेल्या मुलास पाहताच गजाची नजर अंगणातल्या आपल्या टायरच्या पट्ट्याच्या चपलावर गेली. त्याला येथेच मरण आलं तर बरं अशी भावना दाटत घाम सुटला. तोच ब्लाऊज परकरातली शांती पैठणी नेसून पाणी घेऊन येतांना दिसली. तोवर गल्लीतले शेजारीही येत दाटी झाली. आलेल्या माणसास जागा करण्यासाठी
"हे पोरा तू उठ नी बाहेर थांब ,अप्पांना बसू दे!" शुभंकर राव गजास म्हणाले.
गजाची तळपायाची आग मस्तकात गेली. तो उठला वडिलांना इशारा करत बाहेर पडला. पण गणपतराव उठलेच नाही. आता गजास वडिलांसाठी बाहेर थांबणं भाग आलं. आपल्या इज्जतीचा पंचनामा आपल्याच डोळ्यांनी पाहत होता. थांबणं सहन होईना व निघता ही येईना.तो बाहेरून छापखाना पाहू लागला. भला मोठा अस्ताव्यस्त पडलेला पसारा. कागद, रजिस्टर,पुस्तकाचा पडलेला खच.
लोकं ,पाहुणे हळूहळू निघू लागले. टांगा स्टेशनकडे रवाना झाला. बऱ्याच वेळेनंतर वडिलांनी गजास मध्ये बोलवलं. गजाला मध्ये जावंसं वाटेचना. पण तमाशा करुन उरली सुरली घालवण्यापेक्षा नम्रपणे वडिलांना घेऊन बाहेर पडू म्हणून तो नाईलाजानं गेला.
" गणपत राव काय म्हणत होते तुम्ही ? बोला आता" शुंभकरराव ओठात राग दाबत बोलले.
" शुभंकर राव हा माझा मुलगा गजानन. आपल्या मुलीसाठी ..!"
" काय करतो हा?" गिमोणकरांनी गणपतरावास मध्येच तोडलं.
" छापखाना टाकलाय त्यानं आपल्यासारखा. आपल्या पावलावर पाऊल ठेवत पुढं जाईलच तो.म्हणून आपली मुलगी...."
" गणपतराव! कुणाचं पाहून, हेवा करून मोठं होता येत नाही! त्यासाठी मेहनत, कष्ट करत घाम गाळावा लागतो!"
" त्याच बळावर तर छापखाना उभारण्याची मजल मारलीय!" गजा न राहवून त्वेषानं मध्येच बोलला.
" पोरा, डोलारा उभा करणं व तो चालणं यात खूप अंतर असतं. छापखाना टाकला म्हणजे झालं असं सोपं वाटतं का तुला? तो चालण्यासाठी कामं मिळवणं महत्वाचं. काम मिळवण्यासाठी काय चने फुटाणे भाजावे लागतात; ते आम्हालाच माहीत. ते कुणाकडं जाऊन मुलीचा हात मागणं असली भीक मागण्या इतकं सोपं नाही!"
गजाला घाव वर्मी लागला.
तो उठला.
" माझ्या मुलीसाठी सरकारी नोकरीवाला मुलगा हवाय मला. हा चाळीसगाववाला तलाठी असल्यानं जवळ जवळ सोयरीक झालीच समजा व रस्त्यास लागा!" गिमोणकर रागातच बोलले.
" छापखाना टाकला तर आहेच. राहिला प्रश्न कामं मिळवायचा तर या गजा चिंचोलेस तुमच्या हयातीतच तो भुसावळातच काय पण जिल्ह्यात नावारुपाला आणल्याशिवाय त्याच्या जिवास शांती मिळणार नाही." गजा डोळ्यात अंगार फुलवत उठला.वडिल आपसुकपणे मागोमाग आले.
" ह्या अंजासही काही काम नाही .विचारत नाही की सांगत नाही.कुणालाही पाठवून देते! माझी एकुलती मुलगी काय तिला रस्त्यावर पडलेली वाटते का?" शुभंकरराव ऐकू जाईल अशा उंच आवाजात गडगडले.
गजानं भुसावळ येईपर्यंतच काय पण नंतर ही वडिलांना या अपमानाबद्दल एका शब्दाने ही दोष दिला नाही. आपल्या परिस्थीतीला दोषी ठरवत तो कामास लागला. दोन वर्ष त्यानं लग्नाचा विषयच काढायचा नाही अशी तंबीच दिली. झपाटून कामाला लागला. सरकारी दफ्तरात भेटत कमीत कमी दरात काम करुन देण्याचं पटवत तो कामं आणू लागला. आलेलं काम लवकरात व चांगलं कसं होईल यावर भर देऊ लागला. सुरुवातीस नफ्याकडं पाहीलंच नाही. एका वर्षात कामाची लाईन लागताच मग त्यानं पुन्हा पसारा वाढवला. तीन चार वर्षातच जळगावहून गिमोणकरांकडची कामं ही भुसावळला येऊ लागली. गिमोणकरांचा छापखाना चार वर्षातच बंद पाडला.
.
.
गजा नानास सारं आठवलं. त्यांच्या तोंडास कोरड पडली. उठत त्यांनी पावसाळी वातावरणातही घटाघटा पाणी घोटलं. त्यांच्या अंगास दरदरुन घाम आला. पुन्हा विचार चक्रे सुरू झाली. निलेश त्याच गिमोणकरांचा नातू! त्यांनी ओसरीवर बसल्या बसल्या तलाठी व शांताबाईसही पंचवीस वर्षानंतरही ओळखलं. बराच बदल झालातरी मूळची चेहरेपट्टी ओळखली जातेच. आपण जो अपमान सोसला त्याचा बदला घ्यायचाच! त्यांनी काही ठरवलं व पहाटे पहाटे त्यांचा डोळा लागला.
सकाळी दहा वाजले तरी गजा नाना ओसरीवर आलेच नाही. नामदेव राव व शांताबाईची तगमग वाढली. नंदा निलेशला मॅसेजद्वारे विनवत होती.
" अप्पा, उशीर होतोय.निघायचंय आम्हाला. उरकायला सांगा. मुलगी पाहून निघायचंय.निरोप द्या" नामदेवराव बजा अप्पास म्हणाले.
अप्पाची तगमग होत होती. ते घरात गेले तर गजा नाना खाली छापखान्यात.
" नाना पाहुणे मुलगी पहायचं म्हणता हेत या वर लवकर!"
" काय घाई लागलीय त्यांना! असल्या कामात घाई करायची नसते!" नाना भिंगाच्या चष्म्यातून वर न पाहताच बोलले.
" घाई नाही पण त्यांना परतायचंय!"
" ठिक आहे येतो मी !"
नानानं नंदास ' मी आल्याशिवाय वर येऊ नकोस ' ठणकावलं.
ओसरीत नामदेवराव, निलेश अप्पा व टिला बसलेले. नाना येऊन बसले. कुणीच काही बोलेना.
" बोला, काय म्हणणं आहे आपलं? मला छापखान्यातलं काम निपटायचंय!" कोरड्या स्वरात नाना उद्गारले.
सारं माहीत असुन नाना असं का बोलत आहे याचा अप्पास राग आला.
" नाना, नामदेव राव निलेश साठी आपल्या नंदास मागणी घालायला आलेत.म्हणून नंदास पाहण्याचं म्हणताहेत ते!" अप्पांनी ही मग पुन्हा औपचारिकता दर्शवली.
" नंदास पहायला आज जळगावची मंडळीही येत आहेत. काल दुपारीच त्यांचा निरोप आलाय!" नाना.
'जळगावची मंडळी' हा शब्द ऐकताच निलेशच्या काळजात तप्त सुरी फिरली.
" नाना काही हरकत नाही. मुलीच्या बापास नाही म्हणता येणार नाही. आलेल्या मंडळीस आपली लेक दाखवणं हे बापाचं कर्तव्यच. सरतेशेवटी आवड निवड नुसार संबंध होत असतात. त्यांनाही पाहू द्या मुलीस. ते येण्याआधीच मुलीस पाहून आम्ही निघून जाऊ. जो निर्णय होईल तो सर्वानुमतेच होईल!" नामदेवराव शालिनतेनं म्हणाले.
" तसं नाही पण त्यांना आमंत्रित केलय मी व ते सांगून येत आहेत आणि ते अचानक आले म्हणजे" नाना खाल मानेनं ताठरपणे बोलले.
" आम्हास पण तुम्हीच आमंत्रण दिलंय ना? शिवाय आम्ही आधी आलोय म्हणून....." नामदेवरावही आता शक्य तितका संयम दाखवत पण तिरमिललेच.
" आमंत्रण? आणि मी?"
" बाला मार्फत...."
" अच्छा , बालानं दिलंय तुम्हास आमंत्रण! नामदेव राव पोराचं काय खरं असतं का? त्याच्या मनात काहीही येतं.ते जाणत्यानी मनावर घ्यायचं नसतं!"
" गजानन राव याचा अर्थ आम्ही काय घ्यावा? नामदेवराव कळवळले.
" नामदेवराव ठिक आहे.बालानं आमंत्रण दिलंय तर ! पण आधी जळगावची मंडळी पाहतील मग हवंतर आपण नंदास पाहू शकता. पण त्या आधी त्यांनी पसंत केलं तर आपलं थांबणं निरर्थक राहील.
" नाना काय हे.पाहुण्यांचा असा उपमर्द करणं...बरं ना...."
" बजा! आता व्यवहार तू मला शिकवशील का?" बजा अप्पास नाना मध्येच अडवत कडाडले.
" नाना, पण बालास तुम्हीच होकार दिल्यावर तर त्यानं यांना आमंत्रण दिलंय, मग?"
"बजा 'ध' चा 'मा' करु नकोस! बालानं यांचं स्थळ सुचवलं .त्यास मी फक्त रुकार भरला. आमंत्रण देण्याचं नाही सांगितलं"
" नाना नातेसंबंध जुळवतांना सरकारी खात्यासारखं शब्दाचा किस पाडण्यात अर्थ नाही.पुढे काय ते सांगा."
" आपण आला आहात तर ती मंडळी पाहे पर्यंत थांबू शकता. त्यांच्याशी नाही जुळलं तर आपणाशी बोलता येईल.बाकी आपणास वाटा मोकळ्या आहेत!" म्हणत नाना चालते झाले.
नामदेवरावाच्या काळजात कळ उठली. उभ्या आयुष्यात असा उपमर्द त्यांचा कोणी केला नव्हता. किंबहुना कुणाची मजाल ही नव्हती. आतला कोलाहल दाबत ते निलेशकडं पाहू लागले. निलेशला तर आपल्या अंगातलं रक्त गोठल्याचा भास झाला.
वडिलांचा असा अपमान त्याला सहन होईना. त्यानं बालास फोन करत सारा प्रकार कानावर घातला. बालानं त्यास वडिलांकडं फोन द्यायला लावला.
" काका, आमच्या काकांचं मनावर घेऊ नका येणाऱ्यांना येऊ देत. सरते शेवटी मुलानं मुलगी पसंत केली तरी नंदा त्या मुलास नाकारेल. तुम्ही फक्त संयम बाळगत थांबा. मी सायंकाळपर्यंत परततच आहे."
नामदेवरावानं निलूकडं पाहिलं. पोराच्या डोळ्यात त्यांना काळजात खिळा ठोकतांना व्हाव्यात तशा वेदना जाणवल्या. त्यांनी त्या ही स्थितीत पोरासाठी थांबण्याचा निर्णय घेतला.
नानांना नंदन कुसुरकरांचा फोन येताच त्यांनी छापखाना बंद करत नंदास तयारी करायला लावली. नंदा आनंदान वर येत तयारी करू लागली.
निलूस मॅसेज करत ती आनंदानं खोळसाळपणे काय नेसू म्हणून विचारू लागली. काळजात उठणारी आग दाबत त्यानं 'काहीही नेस पण मोगऱ्याचा गजरा माळू नकोस' मॅसेज पाठवत मोबाईल खिशात ठेवला. तिला अर्थ कळलाच नाही. सर्वासमोर सरू वहिणीही तिला काही सांगू शकली नाही.
अंगणात आलीशान दोन चारचाकी आल्या. दौलतरावाचे जावई- मुलगी, पुतण्या मंथन , नंदन व त्याचे मित्र सारा लवाजमा भैरव चौकात उतरला. गजा नानानं साऱ्यांचं हात जोडत स्वागत केलं.
निलेश व नामदेवराव ओसरीतून उतरत बाहेर निघाले. समोर मंदीर दिसताच नामदेवरावांनी निलेशचा हात पकडत थांबवत मंदिराजवळील पिंपळाच्या पारावर नेलं. घरात पैठणी नेसून सवरुन तयार होताच नंदास निलेश नव्हे तर जळगावचा डाॅक्टर मुलगा पहायला आलाय व तोच कार्यक्रम आधी होतोय हे कळताच हातातला तांब्या जोरात फेकत ती किंचाळणार तोच आईनं तिच्या तोंडावर हात ठेवला.
हात जोडत "नंदा बाळा, निलेश थांबलाय.घाबरू नकोस. पण पाहुण्यासमोर इभ्रत घालवणं बरं नाही"
घरात नानांनी जळगावचे पाहुणे येत आहेत हे सांगितलंच नव्हतं. ओसरीवर बोलले पण तो निरोप तिच्यापर्यंत कोणाला सांगायला सवडच मिळाली नाही. तिला नानांनी तयारी करायला लावली ती निलूसाठीच समजली. आता सारं रामायण लक्षात येताच तिनं घाईत केसात माळलेला गजरा खसकन ओढत तोडला.
हातात पाणी घेत ती महामुश्कीलीनं पाहुण्यांसमोर आली. नंदननं तिला पाहिलं. आई- वडिलांनी आणलेल्या फोटोपेक्षा व समोरचं लावण्य अधिक खुलून दिसतंय याची खात्री होताच तो मनात खुश झाला.आपला येण्याचा निर्णय योग्यच यानं तो सुखावला. पण त्यास गालापेक्षा नजरेतली लाली छळू लागली. नंदनच्या मेव्हण्यांनी जुजबी प्रश्न विचारत नंदनकडं पाहिलं.
नंदन कानात कुजबुजताच मेव्हण्यानं नानास खुणावलं व मुलगा व मुलीस वरच्या मजल्यावर पाठवलं.
बाहेर पावसास जोरदार सुरुवात झाली. निलेश व नामदेवराव पारावरुन मंदिरात आले. निलूला ही प्रतिक्षा जीवघेणी वाटू लागली. ओसरीवरून गजा नाना कृतकृत्य झाल्यागत तिरक्या नजरेनं दोघाकडे पाहू लागले. शुभंकर गिमोणकरच्या जावयास व नातवास पाहताच पंचवीस वर्षांपूर्वीची उरातली सल आज भरुन निघत होती.
.
वरच्या मजल्यावर नंदननं समोरच्या खुर्चीवर नंदास बसावयास लावलं.नंदा न बोलता गॅलरीतल्या खिडकीतून समोरच्या निलूकडं पाहत होती व पावसाच्या धारा तिच्या उरात बरसत होत्या.
" बघा, जे काही सांगायचं ते आताच मोकळ्यापणानं सांगता यावं म्हणून मुद्दाम मी आपणास वर बोलवलंय. माझी काही ही हरकत नाही. पण आपली काही हरकत असेल तर मोकळेपणानं सांगा!"
नंदानं नजर महामुश्कीलीनं ओढत नंदनवर रोखली.
" आजपर्यंत किती मुली पाहिल्यात आपण?" नंदानं थेट प्रश्न फेकला.
" खरं सांगायचं म्हणजे आजवर मी दहा मुली पाहिल्या .आपण अकराव्या. काही मुली एम.डी,
एम बी.बी.एस. होत्या तर काही अभियंता, टि.व्ही. कलाकार ही होत्या. पण मनास भावतील अशा वाटल्याच नाही. आपण बी.ए. एम. एस. आमच्या शैक्ष. अपेक्षात न बसणाऱ्या. पण फोटो पाहताच एक अनामिक ओढ लावणाऱ्या.म्हणून साऱ्या मित्राचा, नातेवाईकांचा विरोध पत्करुन आलोय!"
" दहा मुलींना तुम्हीच रिजेक्ट केलं का?"
" अर्थातच. एम. एस. आहे मी. जिल्ह्याच्या ठिकाणी मल्टी स्पेशालिटी भव्य हॉस्पिटल उभारतोय.हे सारं असल्यावर कोण रिजेक्ट करेल?"
" तेच म्हणतेय मी. मी रिजेक्ट करणं उचीत होणार नाही. माझ्यावर कृपा करा व आपल्या लिस्टमध्ये एकाची भर घालत मला रिजेक्ट करा" नंदा विनवत थरथरतच रडू लागली.
नंदनच्या काळजात चर्रकन कढत तेल ओतल्याचा भास झाला. त्याची लाल होऊ पाहणारी नजर नंदावर स्थिरावली. त्याला तिच्या केसात तुटलेल्या गजऱ्याच्या फुलाच्या काही पाकळ्या दिसल्या.
" मी जर नकार देण्यास मना करत होकार कळवला तर?" त्यानं भावनावर ताबा मिळवत जडावलेल्या स्वरात विचारलं.
" नाईलाजानं मला नकार दयावा लागेल! पण आपल्या इभ्रतीचा धज्जा उडू नये म्हणून मी हात जोडतेय.
" नंदनला आपल्या साऱ्या ऐश्वर्य, अहंकारावर कुणी तरी सुने तिरका पाय करत........ चा भास त्याला झाला. तो भानावर आला.
"शेवटचा एक सवाल विचारतो; मला नाकारण्याचं कारण कळेल?"
" डाॅक्टर तुम्हास नकार मिळाल्यावर तुम्ही काय केलं असतं?"
" नकार तर दिलाच ना तुम्ही?"
" मी तुम्हास नकार देण्याचा आर्जव करतेय! अजुन मी नकार नाही दिलाय!"
" बरं ठीक. मला नकार मिळताच मी रागानं लाल होत सरळ निघून गेलो असतो!"
" हेच माझ्या नकाराचं कारण समजा. कारण समोर पहा. नकार पचवून ही माझ्यासाठी कुणीतरी थांबलंय. जिवाच्या आकांताने पुन्हा येण्यासाठी.व मुलासाठी आपली पत, सन्मान इभ्रत खुटीला टांगून बाप ही थांबलाय. असल्या माणसासाठी मी मरणालाही पत्करत वाट पाहीन. कारण नकार मिळाल्यावर तुम्ही फक्त रागानं लाल होत पाय आपटत निघून जाणार व दुसरं स्थळ पाहणार. पण तो.... तो... या जगातूनच ...! "
नंदननं समोर पाहिलं व काय ते समजला . जागेवरुन उठला पण जाता जाता थांबला.
" तुम्ही जर कुणाची वाट पाहण्यासाठी मला नाकारत वाट पाहू शकता तर मी तुम्हास नाकारुनही वाट पाहत राहण्याचा प्रयत्न नक्कीच करेन!"
जाणारा नंदन नंदास वेगळा पण आपलासा नक्कीच भासला.
खाली येत नंदननं गजा नानास 'मी घरी जाऊन कळवतो' असं त्रोटक सांगत साऱ्यांना निघण्यास इशारत केली. सारे उठले पण त्याचा चुलत भाऊ मंथनला मात्र निघावंसं वाटेना. त्या ही स्थितीत निमीत्त करत तो गजा नानांना घेत घरात जात " घाबरू नका मी बसलोय ना!" धीर देत नंदाकडं पाहू लागला. पण नंदाचं सारं लक्ष निलूकडंच होतं.
सारी परतताच नामदेवराव व निलू बजा अप्पाच्या घरात आले. ते येताच हवेलेची केव्हाची सुतकी कळा जात तात्पुरतं चैतन्य संचारलं.
नंदा मागच्या दारानं अप्पाच्या घरात जात सरू वहिणी व शांताबाई समोर निलूस बिलगत हमसून हमसून रडू लागली.
" माकडा! 'मी वाट पाहीन!' सांगितलंय ना तुला! "
पण गजा नाना जळगावकडच्या निरोपाचीच वाट पाहण्यात गुंतले होते. म्हणून आता शुभंकर गिमोणकराच्या जावयास व नातवास कसं कटवायचं याची ते मनोमन बांधणी करुन तयार झाले.
पेच अवघड.
कोण कुणाची वाट पाहतंय! कोण पुन्हा येतंय? साराच जांगडबुत्ता!
क्रमशः.............