मी पुन्हा येईन..........
भाग :-- सहावा
वा.......पा.........
निलेश औरंगाबादला परतला. दोन दिवस मुक्काम करत त्यानं सिमेवर परतत राजीनामा दिला. मोठा धोका पत्करत होता तो. पण तरी दिलेल्या शब्दाखातर व नंदाला मिळवण्यासाठी त्याला पर्यायच नव्हता . तो तिकडनंच परस्पर दिल्लीला थांबला. त्यानं पूर्व परीक्षा दिलीच होती. लेखीसाठी त्यानं चांगला क्लास शोधला. क्लास लावला व तो दिल्लीतच राहत अभ्यासाला लागला. अवधी कमी होता. त्यासाठी त्यानं घरच्यांशी व नंदाशी बोलत काही निर्णय घेतला. त्यानं पाच महिने साऱ्यांशी संपर्क तोडत अभ्यासावर फोकस करण्यासाठी अज्ञातवासच पत्करला. मोबाईल पूर्णता बंद केला. या निर्णयानं नंदाचंही मोठं टेंशन कमी झालं. कारण शिस्तीच्या नानानं घरात नंदास आधीच तंबी देत संपर्क तोडायला लावला होता. नाना तिच्या बोलण्यावर कडक लक्ष ठेवत होते. निलेशनं सांगताच कटू असलं तरी तिनं ही बोलणं बंद केलं.
पावसाळ्याचे चार महिने नंदानं सायबर कॅफेत व छापखान्यातल्या कामात बुडवून घेतलं. हे पाहून नानांना आपण निलेशला कटवलं हे चांगलंच झाल्याचं वाटलं. नंदा त्याला पूर्ण विसरली असंच त्यांना वाटू लागलं. पण असा एक दिवस गेला नसेल की नंदास आपला निलू आठवला नसेल. रात्र तर तिचीच असायची.
निलुचं वागणंच बदललं. निलू एकदम शांत संयत होत कामात गुंग झाली. नानास मुलगीनं आपणास विरोध न करता निलेशला विसरली याचा कोण आनंद झाला. पण नानास कुठं माहीत होतं की जाणवणाऱ्या शांततेत केवढं मोठं वादळ गोंगावत होतं.
नंदननं गजानन चिंचोल्याच्या मुलीस नकार दिला हेच सारे समजत होते. पण सोबत गेलेल्या मंथनला हे पटेना. त्यानं नंदनला एके दिवशी बैठकीत घेतलंच. नंदन सहसा पार्टी वैगेरे या गोष्टीत रममाण होत नसेच. पण दिवाळीच्या आसपास जि. प. निवडणूक लागणार म्हणून मनाजी कुसुरकरांकडे सालाबादाप्रमाणे पक्षाच्या बैठकी बसू लागल्या. अशाच एका बैठकीत मंथननं नंदनला बसवलं व टल्ली केलं.
" नंदन, गजा चिंचोलीच्या मुलीस नकार का दिला?"
" मंथन , मला नाही आवडली ती! म्हणून नाकारलं!"
" नंदन ऐक! तू साऱ्या जगाला उल्लू बनव.पण या मंथनला नको! नकार का दिलास ते सांग!"
" मंथन ,सोड ना भावा! हा तुझा भाऊ जिल्ह्यातला नामांकित शल्य विशारद आहे! आपणास मुलींचा काय तोटा!"
" नंदन भावा, हा मंथन असल्यावर मुलीचा तोटा नाहीच! तुझ्यासमोर मी इथून तर त्या गजा चिंचोल्याच्या घरापर्यंत मुलींची लाईन लावेल! ते सोड पण नकार का तेवढं सांग!"
" उंची मद्य फेसाळत फेसाळत त्याची किक ही देऊ लागलं.
" मंथन भावा! फोटो पाहताच एम. डी. झालेल्या ,सिने तारका असलेल्या मुलींना नाकारणारा हा तुझा भाऊ ती बी.ए.एम.एस असुनही एकदम लट्टू झाला . म्हणून आनंदात तिला पहायला गेलोही. पण ती ....ती नंदान आपलं घराणं, आपली इज्जत ,मानमर्यादा, शिक्षण, ऐश्वर्य सारं काही लाथाळत नकार देणार होती. मग मीच शहाणपण दाखवत झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणत नकार दिला"
मंथन उडालाच.तशी त्याला असलीच अपेक्षा होती. कारण इतक्या सुंदर मुलीस नंदन नाकारूच शकत नाही.
" नंदन, मूर्खा! तिनं नाकारलं नी तू शहाणा बनत निघून आला?"
" मग मी काय करायला हवं होतं?"
" आता काय करुन ही उपयोग काय! आता जे करायचं ते मीच करतो बघ!" मंथनला नंदानं नंदनला नाकारलं याचा मनात आनंदच झाला.
" मंथन, काय करणार तू?"
" नंदन मूर्खा! जेव्हा सरळ बोटानं घी निघत नाही तेव्हा बोटं वाकडी करावी लागतात. पण पेशंटला व्यक्ती न समजता एक आॅब्जेक्ट समजणाऱ्या तुम्हा डाॅक्टरांना ते जमलं नाही. आता तू बाजूला हो.घराण्याची गेलेली इज्जत त्या चिंचोल्याच्या मुलीस दुसऱ्या कुसुरकरांच्या घरात आणून कशी आणतो बघच तू!" पण मंथनच हे बोलणं नशेत झिंगत पडणाऱ्या नंदनला समजलंच नाही.
मनाजी कुसुरकर एख पापभिरू , सालस व्यक्तीमत्व होतं. त्यांना पाहिल्यावर राजकारणात राहुनही एखादा माणूस इतका सरळमार्गी राहूच कसा शकतो हा प्रश्न पडायचा. पण त्याची भर त्यांच्या नंदन या एकुलत्या एक मुलानं भरुन काढली होती. एकदम इरसाल कांडी. कुणालाही आपल्या बोलण्याच्या जादुनं व धमकीनं यू फिरवणारा. कुणालाही शेंड्या लावत राजकारणात येऊ पाहणारा.नंदन सोबत भुसावळला जातांना नंदाला पाहिलं तेव्हाच मंथनच्या काळजात एक सणसणीत कळ उठत मस्तकात गेली होती. पण सख्खा चुलत भाऊ म्हटल्यावर त्यानं इच्छा नसतांनाही संयम दर्शवला होता. पण आता त्याला आयतीच संधी चालून आली.
तुळशी विवाह झाला नी जिल्हा परिषदेच्या निवडणूकीची धामधूम सुरू झाली. मनाजी रावांनी मंथनला उमेदवारी दिली.
गजानन नानाच्या छापखान्यात प्रत्येक पक्षाची विविध पत्रकं, बिल्ले, अजेंडा छापण्याचं प्रचंड काम आलं. त्यात निवडणुकीसंदर्भातलं प्रशासकीय काम ही जिल्ह्यावरुन आलं. गजा नानाचा छापखाना खपू लागला.नंदाही राबू लागली.
मध्यंतरी बालानं नंदास फोन करत निलूची लेखी परीक्षा झालीय व मेरीटनुसार तो मुलाखतीस हमखास क्वालीफाय होतोय. मुलाखतीच्या व शा.चाचणीच्या तयारीस तो लागल्याचंही कळवलं. नंदानं मनोमन परमेश्वराचे आभार मानले.
लेखी परीक्षा होताच निलू महीन्या पंधरा दिवसात मोबाईल पाहत आलेल्या कामाच्या मॅसेजला उत्तर देई व बालाशी बोलत त्याला सारं कळवी. मनातलीसारी उर्मी दाबत तो नंदाशी बोलणं महामुश्कीलीनं टाळे.
छपाईच्या कामानिमित्त मंथनच्या गजानान नानाच्या छापखान्यावर फेऱ्या वाढल्या. नानास वा नंदास त्यात वावगं काहीच नव्हतं. पक्षाचं छपाईचं काम त्यात दुरुस्ती या साठी प्रचार सोडून इकडं येऊ लागला. सुरुवातीस त्यानं काहीच विषय न काढता गजानन नानावर आपली छाप पाडण्याचा पुरेपुर प्रयत्न केला.
निवडणुकीत वडिलांची पुण्याई व त्याचे छक्केपंजे यानं तो निवडून आला. एकचजल्लोस सुरू झाला. गटात आभिरपर सभा झाल्या. सारी धावपळ आटोपली व तो पेढ्याचा बाॅक्स घेत भुसिवळला गजा नानास भेटावयास आला. नानानं त्यास कॅफेच्या कॅबीनमध्ये बसवलं. त्यानं निवडणुकीत तुमची ही साथ मिळाली म्हणून नानास पेढा भरवला." मंथनराव आमची कसली साथ तुम्हास? आमचा गट वेगळा तुमचा वेगळा मग?"
" नाना पक्षाची पत्रकं अजेंडा बिल्ले बरंच छपाईचं काम करत आपण साथ दिलीच ना! म्हणून विजयाचा आनंद म्हणून हा पेढा" मंथननं पेढा भरवला व तो नंदाला ही आपल्या हातानं पेढा भरवायला पुढे सरकला. नंदा पेढा घेण्यासाठी हात पुढे करणार तोच त्यानं हात पकडत पेढा तोंडात घातला.
नंदानं हातातला हात हळूच हिसकत सोडवला. तोंडातला पेढा नाईलाजानं खाल्ला.
" पोरी प्रेमानं भरला तर खा!" नाना म्हणाले. त्यांनी माणसास हार व पुष्पगुच्छ हाणावयास पिटाळलंच होतं. त्यानं आणताच नानांनी मंथनरिवास पुष्पगुच्छ गुलाब देत हार गळ्यात घातला.
" मंथनराव सत्ता तुमचीच येणारम्हटल्यावर जि. प.ची काम मिळू द्या!"
" नाना आता जि. प. चं छपाईचं सारं काम आपल्या छापखान्यातच येणार" मंथन नंदाकडं पाहत बोलला. त्यानं हातातला पुष्पगुच्छ व गुलाब हसतच नंदाकडं दिला. नंदास हात हातात पकडला ते कदाचित अनपेक्षित वाटलं. पण आताची नजर व गुलाब देणं खटकलं. तिनं हातातला गुच्छ मंथन समोर कोपऱ्यात फेकला व गुलाब खाली सोडत मंथनच्या समोर पायानं कुस्करलं. ती तात्काळ वर निघून गेली.
मंथन मनात हसला
" नंदा ही तर सुरुवात आहे." तो मनात बोलला व निघाला.
त्यानंतर तो कसलं ना कसलं काम घेऊन छापखान्यात फेऱ्या मारू लागला.
" नाना, आमच्या तिर्थरुपाचा 'संघर्ष व यश' यावर एका हितचिंतकानं पुस्तक लिहीलंय. त्याच्या तीन हजार प्रती छापायच्या आहेत!"
" मंथनराव काही हरकत नाही!"
" नाना त्या संदर्भात व काही खाजगी बोलण्यासाठी आमच्या तिर्थरुपांनी तुम्हास घरीच बोलवलंय!"
" ठिक आहे मंथनराव. सवडीनं परवा येतो मी मनाजीरावांना भेटायला!" नाना म्हणाले व त्यांनी नंदास वरुन चहा आणावयास लावला.
नाना कोणीही आलं तरी माणसाकरवी दुकानावरुनच चहा मागवत छापखान्यात असल्यावर.आज प्रथमच नानांनी वरुन चहा सांगितला व तोही नंदास.
नंदा वर गेली. तिला नानाच्या मनात काही तरी चाललंय याची जाणीव झाली पण नेमकं काय याचा पत्ता लागेना.
दोन दिवसांनी नाना जळगावला गेले.
" या गजाननराव! आमचे चिरंजीव खूपच खुश आहेत तुमच्या वर!" मनाजीराव हसत बोलले.
" मनाजीराव आमच्या कामावर सारेच खुश व समाधानी असतात!"
" हो ते ही खरंच! पण मंथन तुमच्या मुलीवर ही खुश आहे व तुमची इच्छा असेल तर लग्न....!"
नाना थरथरले व चपापले. असं काही ऐकायला मिळेल याची त्यांना अपेक्षाच नव्हती.
" मनाजीराव का आमच्या मागे लागलीय कुसुरकर मंडळी! आमचा कसुर काय? एकवेळा नाकारल्यावर हौस नाही फिटली का? तरी आम्ही अपमान सहन करत केवळ तुमचा पापभिरू व सरळ मार्गी स्वभाव म्हणून आपलं सारं काम स्विकारत पुर्वापार संबंध सुरळीत ठेवलेत. मग पुन्हा का त्याच गोष्टी उकरुन काढताय!"
" गजाननराव तुमचा संताप सात्विक व साहजिक आहे. आमच्या नंदननं नकार देऊन जी चूक केलीय तीच चूक सुधारत प्रायचित्त घेतोय मंथन!"
" चूक कोणी केलीय व का केलीय त्याचं मंथन करुन प्रायचित्ताचं नवनीत थोडंच निघणार आता. म्हणून नकोच. नकार देणाऱ्या नंदनला समजावण्याचं काम दौलतराव व तुमचं होतं .पण ती वेळ गेलीय आता!"
गजा चिंचोले नकार देतो म्हटल्यावर आपले तिर्थरुप माघार घेतील म्हणून मंथन पुढे सरसावला.
" नाना ठिक आहे, आमचं चुकलं असं तुम्हास वाटतंय तर! पण नकार जर तुमच्याकडून आला असेल तर?"
" मंथन राव शक्यच नाही! नकार तुमच्या भावाकडूनच होता."
" पण नकार तुमच्याकडून असला हे सिद्ध झालं तर?"
नाना संभ्रमीत झाले. पण त्यांना खात्री होतीच की नकार नंदनच दिलाय.
" तर मग तुमची मागणी मला मान्य राहिल. पण एका अटीवर."
" आम्हासही मंजुर. मी सिद्ध करतो. पण तुमची अट काय?"
" तुमचा नकार येताच मी औरंगाबादच्या मुलास कबुल केलंय की एका वर्षात प्रशासकीय सेवेत लागला तर नंदास स्वखुशीनं देईल. पण मला खात्री आहे की तो होणार नाही. त्यासाठी एक वर्ष मी त्याला बांधील आहे. "
" नाना नकार तुमच्या मुलीनंच दिलाय! पण झालं गेलं ते जाऊ द्या. तमचा शब्द दिला गेला तर आम्ही एका वर्षापर्यंतच तुमच्या सारखीच आम्ही ही वाट पाहू."
" नकार नी माझी मुलगी देणं शक्यच नाही!" नाना कडाडले पण त्यांची थरथरच सांगून गेली की त्यांचाच त्यांच्या बोलण्यावर विश्वास नाही.
त्यांना मनाजीरावाचा बंगला गरगर फिरतोय व याच शहरातला शुभंकर गिमोणकर आपल्यावरगडगडाटी हास्य उडवतोय असा भास झाला.
" नाना, विश्वास नसेल तर आम्ही नंदनला बोलवतो खात्री करा. व घरी जाऊन आपल्या लाडक्या मुलीकडुनही खातरजमा करा!"
" ठिक आहे.पण मग तरी नकार देणाऱ्या माझ्या मुलीलाच पुन्हा का मागणी घालताय!"
" नाना, हाच तर नव्या पिढीचा दिलखेचक जांगडबुत्ता आहे. तुमच्यामुलीनं सुसवरुप उच्चशिक्षीत आमच्या डाॅक्टरास का ठोकरावं! तसंच हे ही! आमच्या मंथनला वाटतंय की ज्या मुलासाठी तुमच्या लेकीनं आमच्या भावास ठोकरलं ,त्याच मुलीस आपल्या घरात आणून घराण्याची इज्जत वाचवावी व त्या मुलासही अद्दल घडवावी!"
नाना सुन्न झाले. त्यांना नंदानं नकार द्यावा हे आपल्या संस्काराचं उघड उघड पानीपत वाटलं. पण झालं गेलं सोडून देत हे स्थळ ही वावगं नाही व दौलतरावासही चपराक देता येईल म्हणून संधीचा लाभ घेण्याचं ठरवलं.
" मनाजीराव एकून विषय गंभीर आहे.पण हा गजाननचिंचोले तरी खंबीर आहे. मी त्या मुलास वचन दिलंय. त्यास येत्या जेष्ठ महिन्यापर्यंत नोकरी मिळाली तर माझा नाईलाज आहे. पण नाही मिळाली तर एकादशीच्या आत माझी लेक मंथनरावास देईन! पहा तुम्हास मान्य असेल तर!"
" आम्हास मान्य आहे!" मंथनच मनाजीरावांच्या आधी कबूल झाला.
नाना भुसावळ ला परतले. त्यांनी येताच हवेली डोक्यावर घेतली.
" नंदा, माझ्या संस्कारात काय उणीव होती की तू असं वागावं!" त्यांनी संतापत नंदावर हात उचलला. नादरबाई मध्ये पडल्या.
" अहो तुमच्या नाही पण पोरीच्या वयाचा तरी विचार करा,! जवान पोरीवर हात उचलतांना तुमची मती कुठं फिरतेय!"
" नादर विचार नंदानं करावयास हवा होता, आपल्या संस्काराचा!"
" नाना तुमचे संस्कार होते म्हणूनच एका ठायी निष्ठा ठेवल्यावर दुसऱ्यास फसवणं जमलं नाही व नकार न देता नकार द्यायला लावला! जर तुमचे संस्कार राहिले नसते तर निलेशला फसवत त्या डाॅक्टरशी ही प्रतारणा करण्याचं पाप केलं असतं!" नंदा रडतच बोलली.
" नंदा तू काय केलं याच्याशी मला आता देणं घेणं नाही. पण माझ्या संस्कारात कमी पडली म्हणून मी स्वत: प्रायचित्त घेणारच."
नंदा थरथरली व अंतरात मोठा खड्डा पडला. निना आता संतापात काय निर्णय घेतात याची तिला भिती वाटू लागली.
" नादर! यापुढं रात्रीचं जेवण मी मरेपर्यंत त्यागतो. जेवतांना हिला प्रत्येक घासासोबत आपण वडिलांना फसवलं याची सल देत राहील. दुसरी गोष्ट मी त्याला शब्द दिलाय तर एक वर्ष नक्कीच थांबेन पण त्यानंतर पुढच्या पंधरा दिवसात मी सांगेल त्या मुलाशीहिला लग्न करावंच लागेल. अन्यथा उरलेल्या वेळंच जेवणही त्यागत मी अन्नत्याग करेल!" नानाच्या या बोलण्यानं नादरबाई ही थरारली.
नंदाला तर जमीन फाटावी व आपणास आताच गिळंकृत केलं तरी बेहतर म्हणून ती भिंतीला रेलत अंधारात रडू लागली.
त्या रात्रीच नानानं रात्रीचं जेवण सोडलं. नंदा व नादरबाईही जेवल्या नाहीत.
सकाळी बजा अप्पाचं सारं कुटुंब समजावण्यासाठी आलं. पण मानी स्वभावाच्या नानानं एकच रिंगी वाजवत आपल्या निर्णयावर ठाम राहिले.
" नाना, आताची पिढी नाही ऐकत कुणाचं. म्हणुन काही ठिकाणी आपण दम द्यावा तर काही ठिकाणी चार पाऊलं आपण माघार घेत शहाणपण दाखवत आपला आब राखावा!"
" बज्या लेका! शहाणा झालास भावा! सिंह म्हातारा झाला म्हणून काय त्यानं उंदरांकडनं शिकारीचं प्रशिक्षण घ्यावं का?"
" नाना, मला चपलेनं हाणा हवं तर ! तोंडातून अवाक्षर काढणार नाही. पण त्याच पट्टीत पोरांना मापू नका! हात जोडतो. हट्ट सोडा. अन्नत्याग न करता निर्णय बदला."
नानांना त्या ही स्थितीत आपला भाऊ आपला किती अंकीत आहे याच्या सुखद लहरी उठल्या. त्यांच्या डोळ्याच्या कडा पहिल्यांदाच कुटुंबासमोर पाणावल्या.
" बजा, मी शब्द दिलाय तो फिरवणार नाही. नाही तरी या म्हाताऱ्या कुडीस दोन वेळचं जेवण पचतच नाही. मात्र तुला ग्वाही देतो. वचनाप्रमाणं एका वर्षात तो माकड नोकरी घेऊन परतला तर आनंदानं जावई म्हणून स्विकार करेल. पण नंतर मात्र मी कुणाचंच न ऐकता मंथनबाबत विचार करेल.तसा शब्दच मी देऊन आलोय!"
नंदानं डोळे पुसले. एवढ्या खडाजंगीत ही नानानं निलूस माकड म्हटल्याचं नंदास मनातल्या मनात हसू आलं.
त्या दिवसापासून नंदानंही रात्रीचं जेवण बंद केलं. नादर बाई एकदम विदीर्ण झाल्या. नवऱ्याचं ठिक वय झालं त्यांना दोन वेळचं जेवण नसलं तरी चिलेल.पण तरुण पोर आतापासूनच एक वेळचं जेवण म्हणजे तिची तब्येतीची हेळसांड च. तिनं परोपरीनं समजावलं.पण व्यर्थ.
" आई नाना जेवणार नसतील तर माझ्या घशात घास कसा उतरेल! शेवटी संस्काराचा प्रश्न आहे!"
नानाच्या हवेलीत सायंकाळचं रांधणं बंद झालं. नानांना लवकरच हे समजलं. नंदा जेवत नाही म्हटल्यावर ती ऐकणार नाही हे त्यांनी ओळखलं.
पेच तसाच कायम राहिला.
निलेशची तोंडी परीशा व शा. चाचणी ही झाली. त्याला आता दिल्लीत थांबण्याची गरजच नव्हती. पण आपण घरी परतलो तर आपणास नंदाला भेटल्या शिवाय चैन पडणार नाही. म्हणून तो दिल्लीतच थांबला. त्याला निकालाची भिती नव्हती पण मुदतीत लिस्ट लागावी हीच भिती होती. कारण आपलं काम तर होईलच पण नानानं दिलेल्या मुदतीत लिस्ट लागायला हवी. आता त्याला काहीच काम नसल्यानं मोबाईल नियमित सुरू करणं भाग आलं. पण तरी तो नंदाशी बोलणं टाळू लागला. कारण तिला नानाची तंबी असल्यानं आपण बोललो तर त्याचा नाहक तिला त्रास नको.
नंदा उन्हाळ्याची वर गच्चीवर झोपायला गेली. शहरात लग्नाचा सिझन सुरु झाल्यानं दररोज बॅण्डच्या व डिजेच्या आवाजाची धूम असायची. आवाज ऐकताच जवळ येणारी मुदत पाहून काळजात धस्स व्हायचं व लाळ गाळत समोर मंथन कुत्र उभं असल्याचाच तिला भास व्हायचा. मंथन तर आता नानांकडे राजरोसपणे यायचा. नानांनाही निलेश एका वर्षात पोष्ट काढूच शकत नाही .मग नंदास आपलं म्हणणं ऐकावंच लागेल.मग मंथनला आतापासुनच हाताशी ठेवावं म्हणून ते मंथन व मनाजीला दुखवत नसत.
हवेत उष्मा होता. ती गच्चीवरुन समोरच्या भैरव चौकाकडं पाहू लागली. चौकात छोटी छोटी मुलं मंदीरामागच्या पिंपळाच्या अंधाऱ्या भागात धावत होती. मागच्या अंधारात चमकणारे काजवे उडत होते व त्यांना ती मुलं पकडत होती. मुलांना काजवा हातात आलाच म्हणून हाताची मुठ पोकळ बंद करत ते एका ठिकाणी बसत मूठ उघडत. पण त्या मुठीत काजवा नसायचा. तो हूल देत उडून गेलेला असायचा. मग मुलं निराश होत पुन्हा पकडायला लागत.
ते पाहून तिच्या काळजात एकदम धस्स झालं. तिला गलबलून आलं. ती पळतच अंथरुणात आली व रडतच लोळली. तोच सरु वहिणी ही वर झोपायला आली.
काय झालं कळेना. सरु वहिणी नंदाला विचारणार तोच नंदा सरु वहिणीस बिलगत हमसून हमसून रडू लागली.
" वहिणी मी पण अंगणातल्या त्या मुलासारखाच काजवा पकडतेय. हातात सापडतोय असं मला वाटतंय पण मूठ पोकळ निघत काजवा उडून गेला तर? मग तर अंधारच अंधार, नरक व रैरवच!" ती रडू लागली.
सरु वहिणी समजली. नंदामाई त्या काजव्यालाच विचारू आपण! का रे बाबा, मी मूठ उघडतेय पण तू गवसलाय ना! गवसला नसशील तर मग मी मूठ उघडणारच नाही!"
सरु वहिणीनं शुभ्रास फोन लावत बालाशी बोलली. बालानं फोन लावला. योगायोगानं निलेशचा फोन आज सुरू केला होताच.
" निल्या माकडा, आताच्या आता फोन कर! खड्ड्यात गेली तुझी परीक्षा नी तो माझा काकाही! "
" बाला, मला नाही का वाटत नंदाशी बोलावं असं! पण नाना..."
" ते काही नाही, आताच्या आता सरू वहिणीच्या मोबाईल वर फोन कर!"
" हॅलोsssss... वहिणी! मी निलेश!"
" थांबा देतेय! आधी त्यांच्याशीच बोला .मग मी बोलेन नंतर"
" हॅलोsssss नंदा...."
"................." फक्त हुंदक्यावर हुंदके ऐकू येत होते.
निलेशला ही हुंदका अनावर झाला कंठ दाटला.
" नंदा..बोल ना ! किती महिन्यांपासून आवाज नाही ऐकला गं तुझा! ऐकू देना आवाज! का हुंदकाच....." निलेशला पुढे बोलवेना.
" माकडा.......माकडा....... तु ही रडतोय ना!"
"............"
" माकडा त्या नानानं काय केलं असतं मारलं असतं ना तुझा फोन आला म्हणून तर खाल्ला असता मार! तो एरवीही खाल्लाच! पण म्हणून तू बोलणंच सोडलं!"
" नंदा......तुझ्याशी न बोलता काय मी खुशीत आहे का? पण तुझा त्रास वाचावा व आपल्या भल्यासाठीच तर...."
" खड्ड्यात गेला तो त्रास नी ते भलं! नाही सहन होत आता!"
" नंदा, का मारलं नानांनी?"
" ........"
" नंदा बोल ना?"
" ते जाऊ दे. पण तू येशील ना...?"
नंदानं हे विचारलं नी निलेशच्या हातातून मोबाईल गळाला. त्याला एवढा जोराचा हुंदका आला की तो मोबाईल तसाच ठेवत बेसीनकडं पळत सारा कढ निघू देत तोंडावर पाणी मारलं.
तो पावेतो नंदा आपल्या खालच्या ओठाचा काही ही दोष नसतांना दातानं लाल करत रडू लागली. सरू वहिणीनं हातातून मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला. पण "नाही वहिणी मला माझ्या माकडाशी बोलू दे! पुन्हा मिळतं की नाही ही देखील शाश्वती नाही आता" सरु वहिणीलाही हे ऐकून तिथं थांबणं शक्य झालं नाही.
" निलू ऐक ना!..."
" बोल नंदा, ऐकतोय ना गं मी! बघ आता आठ दिवसात लिस्ट लागणार म्हणजे लागणार. बघ तुझा हा माकड नक्कीच डि.एस. पी. ची पोष्ट काढतो की नाही बघ! त्या तुझ्या अकडू नानास तुच सांग मग की माझ्या माकडांनं डोक्याला टक्कल पडण्या आधी पोष्ट काढलीय!"
" माकडा तेवढा विश्वास आहे रे! पण मुदतीच्या आधी येशील ना तू?..... बघ मी वाट पाहतेय हे विसरू नको!"
पुन्हा निलेशला हुंदका दाटला.पण त्यानं तो आता आवरला व तिला समजावू लागला.
" नंदा तुझ्या त्या अगाध, गाढ मिठीत विसावण्यासाठी जीव गेला तरी मी येईनच....!"
" माकडा जीव जावो आपल्या दुश्मनाचे! फक्त तु ये!"
.
.
निलेश सरू वहिणी, टिला दादा व बजा अप्पाशीही बोलला. साऱ्यांना आठ दिवसांच्या आत लिस्ट लागेलच ही शाश्वती देत त्यानं फोन ठेवला.
जेष्ठ संपायला आठ दिवस बाकी तोच प्रसारमाध्यमात यु. पी एस. सी, आय पी. एस परीक्षेचे निकाल जाहीर झाले. निलेशचं नाव आलं नी नंदा, टिला, बजा अप्पा साऱ्यांनी सारं कॅफे डोक्यावर घेतलं. बजा अप्पांनी उड्या मारतच नानासमोर नाचत
"गजानन चिंचोले माझा जावई, क्लास वन झाला.!" नानाला ही आनंद झाला. काही झालं तरी आपणास दिलेला शब्द या माकडानं आपल्या पोरीखातर खरा केला. म्हणून त्यांनी खुशीनं कबूल करत पोरीस मिठी मारली.
नेमक्या याच वेळी या बातमीनं मनाजीरावांच्या घरच्या अॅनराॅईड टि.व्ही चा चक्काचूर झाला. मंथननं हातातला काचेचा ग्लास जोरात फेकला.
दुसऱ्या दिवशी मनाजीरावांना, दौलतरावांना घेऊन मंथन भैरव चौकात आला.
गजानन रावांनी येताच त्यांचं स्वागत करत आनंदाची बातमी देत पेढे देऊ लागले. मनाजी, दौलतरावांनी कडवटपणे घशात उतरवले पण मंथननं पायानं ते चुरत घरातल्या नंदाकडं पाहिलं.
" गजाननराव मंथनसाठी नंदास पुन्हा मागणी घालण्यासाठी आलोय आम्ही!"
" मनाजीराव ते शक्य नाही आता!"
" शक्य नाही म्हणजे?"
" मी आपणास काय शब्द दिला होता की जेष्ठ संपेपर्यंत निलेशचं काम झालं नाही म्हणजे मी नंदास मंथनरावास देईन. पण त्या आधीच जर निलेशनं करुन दाखवलं तर आधीच्या वचनास मला जागावंच लागेल.म्हणून मला माफ करा"
" गजानन चिंचोले, जेष्ठ संपण्याआधी त्याला कुठं आदेश मिळणार? म्हणून तुम्ही वचन मोडू नका!"
" मंथन तोंड सांभाळून नाव घे. पुऱ्या जिल्ह्यात या गजानन चिंचोलेस त्याच्या पेक्षा लहान सारे नाना म्हणतात" बजा अप्पानंच सुनावलं.
" अप्पा पोरगा चुकला. पण तो जे म्हणतोय त्याचं काय?"
" मनाजीराव, शब्दाचा चुकीचा अर्थ लावायला हे काही तुमच्या पक्षाचं कार्यालय नाही. त्याला आदेश केव्हा मिळेल हे महत्वाचं नाही तर प्रसारमाध्यमात देश पातळीवर त्याचं नाव झळकलं हे पुरेसं आहे व मी त्याच वचनाला बांधील आहे." नाना सडेतोड बोलले.
सारे परतले. घरी येताच मंथननं राडा केला. " ती गज्या चिंचोलेची नंदा मला मिळाली नाही तर मी कुणालाच मिळू देणार नाही!"
घरात नंदन ही आला होता तोवर.
नंदननं त्याला समजावलं.
" मंथन, तुमचं तिथं जाणंच चुकीचं होतं. गजानन चिंचोलेनी होकार दिला ही असता तरी नंदाची इच्छा नसल्यावर जबरी करणं आपल्या घराण्याच्या इभ्रतीस शोभत नाही! ती मुलगी मानी आहे. उगाच तिला त्रास देणं योग्य नाही."
" नंदन तू बैल आहेस! तुला कळत नाही. तू चूप बैस नी गंमत पहा मी काय करतो ते!" मंथन कडाडला.
निलेश तीन दिवसांनी परतणार होता.
आज नंदा पहाटेच सोनगडला निघाली. ड्रायव्हरला काम निघाल्यानं ऐनवेळी तो येणार नसल्याचं
कळताच ती स्वत:च गाडी घेत निघू लागली.
" नंदा ,एकटी नको जाऊ मी सोबत येतो" म्हणत नानाही सोबत निघाले.
दुपारपर्यंत सारं काम आटोपत ते घराकडं रवाना झाले. मंथनला छापखान्यावर गेल्यावर नाना व नंदा
सोनगडला गेल्याचं कळलं. मंथनच्या डोक्यात राख घुसली व डोळ्यात सैतानी उतरली. तो जळगावला परतला. त्यानं विश्वासू पंटर ताब्यात घेतले. तो नंदाचं लोकेशन ट्रॅक करू लागला. सायंकाळी धुळ्यापर्यंत ते मिळालं. जळगाव पर्यंत जेवढा अंधार पडेल तेवढं चांगलं म्हणून तो तयारीत एरंडोलला आला.
अंधारात गाडी क्राॅस झाली. पाठलाग सुरू झाला. योग्य वळणावर येताच गाडी पुढे निघत आडवी झाली. काय प्रकार होतोय हे कळायच्या आत माणसांनी मोबाईल घेत गाडीचा ताबा घेत गाडी रस्त्यावरुन उतरवली. कोघाट करू पाहणाऱ्या नानाच्या कमरेत लाथा बसू लागल्या. पोटात बसल्या लाथेनं नानाची सुध हरपली. अंधारात गाडी उभी राहीली. मंथन आला.
" मंथन पाया पडते, काहीच हासील होणार नाही अशानं. ना मी सुखी होणार ना तो! तू तर कधीच नाही. नंदन सारखा वाग!"
मंथन नं कानात एक वाजवली.
" माझं ऐक, लग्न करतो, सुखी होशील. त्या निलेशला तिकडेच राहू दे"
नंदानं नम्र नकार देत त्याला पुन्हा समजावलं. पण ना मंथन तयार ना ती लग्नास तयार. मंथन भडकला. त्यानं माणसांना इशारा केला. माणसांनी आणलेलं तेल गाडीवर छिडकलं. नानांना गाडीतच बांधलं. नंदावरही छिडकलं.
नंदानं ओळखलं खल्लास! सारा खेळ खल्लास! तिला गाडीत लाथेनं ढकललं गेलं. नी मग आगडोंब व आरोळ्या, आकांत एकच गहजब. पण त्या सुन्या जागेत मंथन व त्याच्या माणसा खेरीज कुणीच आलं नाही.
पहाटे शेतात पाणी भरण्यासाठी जाणाऱ्या माणसांनी वर्दी दिली.
नंदननं दवाखान्यात जात सवं गाळत चौकी गाठत मंथनला आत घ्यायला लावलं. त्यानं प्रेत शवागारात ठेवायला लावत आधी बालास कळवलं.
भुसावळला कळायला दुपार झाली. एकच कल्लोळ, आकांत उठला. बाला शुभ्रा निलेश, औरंगाबाद ला फोन गेला. पण बालानं आधीच निलेशला काॅल केला.
"निलेश, भुसावळ ला काही तरी घडलंय तू फ्लाईटनं निघ पटकन!"
निलेश थरथरला कंपकंपला.
" बाला , काही तरी घडलं म्हणजे नेमकं काय?" पण नेमकं काय घडलं ते सांगायला कुणीच धजावलं नाही. नंतर नंतर तर तो निघाल्यावर संपर्कच तोडला साऱ्यांनी.
जळगावला उतरला. तेथुन टिलानं त्यास दवाखान्यात नेलं.
शवागारात नेतांना तर त्यानं हंबरडाच फोडला. वडिल आई, सरू वहिणी टिला साऱ्यांना दूर झिडकारत तो बाहेर पडू लागला. तो शवागारात जायलाच तयार होईना. नंदननं त्याची समजूत घातली.
नंतर बाला ही आला. साऱ्यांनी त्यास समजावत शवागारात नेलं. तो भाजलेला........काळाठिक्कर.....
.
आकांत आकांत आकांत...जगातल्या साऱ्या आकांताचं एकत्र मिश्रण. काळीज फाडणारा आक्रोश....
" बाल्या लबाड निघाली ना ही तुझी बहिण...तीन वर्षांपासून मला फसवत आली...'मी वाट पाहीन' म्हणून सारखी सांगत आली. मग का थांबली नाही...ही?" निलेश बालाची गचांडी पकडत खूनशी डोळ्यानं थंडपणानं विचारू लागला.
" निलू ..निलू.. माकडा ऐक ना.."
बालाच्या या एका वाक्यानं निलेश पुन्हा भडकला व आक्रोश करत
" नंदा...नंदा "म्हणत झेपावला. साऱ्यांनी त्याला बाहेर काढलं.
तयारी झाली व अॅंब्युलन्स निघाली.
निलूला गाडीत घेत बाला व टिला निघाला.
गाडीत निलेशला शेवटच्या फोनवरील नंदाचं बोलणं आठवलं.
" माकडा येशील ना तू! मी वाट पाहीन!"
" बाल्या नंदा वाट पाहणार होती. पण हरामखोरांनी तिला वाट पाहूच दिली नाही. मला सांग त्यांना सोडणार नाही ना तू! ती इथं जरी थांबली नाही तरी माझी वाट पाहत कुठं तरी थांबलीच आहे. इहलोकात नाही तरी ......थांबली असणारच!"
" निलू, त्या हरामखोराचं काय करायचं ते पाहूच पण आता आधी नंदास..."
" थांब गाडी बाजूला घे!"
" नको आता नको गाडी थांबवू!"
" अरे मूर्खा मी फ्लाईटनं उतरून सरळ आलो ना.लघवी तर करू दे"
टिलास ते लक्षात येताच त्यानं थांबवली. टिला हात धरुन त्यास बाजूला नेऊ लागले.
" साल्यांनो आता माझी काय काळजी घेता. माझ्या नंदास सांभाळलं नाही नी आता मला धरत आहात!"
टिला व बाला रडतच बाजूला झाले. निलू रस्त्याच्या बाजूस उतरू लागला. बाला व टिला खाल मानेनं रडू लागले. क्षणात निलेशला ट्रक येतांना दिसला. त्यानं संधी साधली व वाघरू यमावरच झडप घालण्यासाठी झेपावलं. क्षणात........सडा....चुरा......निरव शांतता...... बाला टिला खाली कोसळले.
त्यांच्या कानावर फुटलेल्या टरबुजातून आवाज येऊ लागला...
" नंदा मी येतोय गं! मला माहीत आहे तू वाट पाहतेय.... मी पुन्हा..येतो....य.
.
.
.
समाप्त
( कथा, प्रसंग, पात्रे, स्थळे काल्पनीक)