ती काळरात्र 2 - शोध रहस्याचा…सुरुवात अंताची...
ती काळरात्र 2 - शोध रहस्याचा…सुरुवात अंताची...लेखन : अभिषेक शेलार;
भाग : 4 (अंतिम भाग)
भाग 3 पासून पुढे सुरु….
कदाचित बोनेटमध्ये काहीतरी बिघाड असावा असे त्याला वाटले, परंतु रस्त्यात कुठेही थांबणे त्याला धोक्याचे वाटत होते… त्यामुळे कार तशीच पुढे दामटवत तो मार्गक्रमण करत होता… "सचिन...ए सचिन !!" मागच्या सीटवर बसलेल्या शकुंतलाबाई काहीशा कण्हतच म्हणाल्या… "काय झाले आई??" कारचे स्टेरिंग सांभाळतच सचिनने विचारले. "सचिन मला बरं नाही वाटत आहे रे… खूप अस्वस्थ वाटतेय…संपूर्ण अंगाची आग-आग होतेय." शकुंतलाबाई म्हणाल्या. "अग आई तू गोळ्या घेतल्या आहेस ना, त्यामुळे तुला तसे वाटत असेल...तू निवांत पड पाहू वाटेल तुला बरे." शकुंतलाबाईंची समजूत काढतच सचिन म्हणाला… त्याने कारच्या Front Rear Mirror मधून शकुंतलाबाईंना पाहण्याचा प्रयत्न केला, परंतु मिट्ट काळोख असल्याने त्याला मागच्या सीटवरील काहीच दिसत नव्हते. "नाही रे बाळा… नाही सहन नाही होता आहे आता… काहीतरी कर लवकर… माझ्याकडे वेळ खूप कमी आहे." शकुंतलाबाई विव्हळतच त्याला म्हणाल्या… "अग आई काही नाही होणार तुला… पुढच्या 10-15 मिनिटात आपण हा घाट पार करू...मग मी बाबांना तुझ्यासोबत बसण्यास पाठवतो, म्हणजे तुला तेवढाच आधार वाटेल." सचिन पुन्हा त्यांची समजून काढत म्हणाला… परंतु शकुंतलाबाईंचे त्याच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते...त्या कण्हत होत्या...स्वतःशीच काहीतरी पुटपुटत होत्या...सचिनला त्याच्या आईची काळजी वाटत होती, परंतु त्या घाटात गाडी थांबवून कोणताही धोका त्याला पत्करायचा नव्हता...तो कुबट जळ्ण्याचा वास आता अधिकच तीव्र झाला होता, परंतु आता त्याला त्याची परवा नव्हती… शक्य तितक्या लवकर त्याला तो घाट ओलांडायचा होता… एव्हाना त्याने बराचसा घाटरस्ता पार केला होता… समोरील काही अंतरावरून एक ट्रक येत होता… त्या ट्रकच्या हेडलाइट्सचा प्रकाश थेट सचिनच्या कारच्या दिशेने येत होता… "सचिन !! पाणी दे रे बाळा...घशाला कोरड पडलीय." शकुंतलाबाई त्याला म्हणाल्या. "हो आई, एकच मिनिट हा." असे म्हणत सचिनने डॅशबोर्डवर ठेवलेली पाण्याची बॉटल घेण्यास हात पुढे केला आणि अचानक त्याचे लक्ष पुन्हा एकदा कारमधील Front Rear Mirror कडे गेले आणि वीजेचा तीव्र झटका बसावा तसा धक्का त्याला बसला…छातीत धस्स झाले...भीतीने सर्रर्रर्रकन त्याच्या अंगावर काटा उभा राहिला...काळीज फाटून बाहेर येतेय की काय असे त्याला वाटू लागले...कारण ते दृश्यच तितके भयानक होते...मागच्या सीटवर शकुंतलाबाईंच्या शेजारी एक व्यक्ती बसली होती आणि ती व्यक्ती म्हणजे दुसरी-तिसरी कोणी नसून त्याची पत्नी सरिता होती… अर्धवट जळालेले मोकळे केस...संपूर्ण भाजून निघालेले शरीर...डोळे नव्हते...होत्या त्या फक्त रिकामी खोबण्या...शरीरावर ठिकठिकाणी जखमा झालेल्या...काही ठिकाणी तर त्वचा फाटून लोंबकळत होती...जबडादेखील तुटून खाली लोंबकळत होता… तिचे ते भयावह रूप पाहून सचिनला दरदरून घाम फुटला… हाता-पायांना कंप सुटू लागला...एका हातात पाण्याची बॉटल तर दुसऱ्या हाताने स्टेरिंग पकडून तो तसाच विस्फारलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत स्तब्धपणे बसून राहिला होता… आणि अचानक… दूरवर दिसणारा तो ट्रक त्याच्या कारच्या अगदी जवळ येऊन ठेपला होता… परंतु सचिनचे त्याकडे लक्ष कुठे होते??... ट्रकमधील ड्राईव्हरने कानठळ्या बसतील इतका जोरात हॉर्न वाजवला, तेव्हा सचिन भानावर आला...पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता...त्याची कार थेट त्या ट्रकच्या अगदी समोर आली होती… ट्रकची धडक टाळण्यासाठी त्याने स्टेरिंग जोरात डाव्या बाजूला फिरवले...सचिनने कारवर नियंत्रण मिळवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु कारवरील त्याचे नियंत्रण केव्हाच सुटले होते… आणि पुढच्याच क्षणी खूप मोठा अनर्थ घडला… कार रस्त्याकडील रेलिंग तोडून थेट हजारो फुट खोल दरीत कोसळली… क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले होते… परंतु आज सरिताने तिचा बदला पूर्ण केला होता…
दुसऱ्या दिवशी…
त्या भीषण अपघाताची बातमी सोसायटीत अजून कोणालाच समजत नव्हती… दिपेश इमारतीखाली असलेल्या वाण्याच्या दुकानात काहीतरी सामान घेण्यास आला होता आणि योगायोग म्हणजे सचिनचा खास मित्र चंदनही तेथेच उभा होता… "अरे चंदन !! काय म्हणतोयस?? बरा आहेस ना??" दिपेशने त्याच्या खांद्यावर हात ठेवतच विचारले. "हो रे, मी बरा आहे...तू बोल, तुझे कसे चालू आहे सर्व??" चंदनने प्रतिप्रश्न करतच विचारले. " माझेही अगदी छान चालू आहे सर्व" दिपेश म्हणाला. "अरे ऐक ना, तुला सचिनचा कॉल आलेला का पोहोचल्याचा?? मला म्हणालेला की पोहोचल्यावर कॉल करेन असं...एव्हाना तो पोहोचायला हवा होता" काहीसा चिंताग्रस्त होतच चंदन म्हणाला. "नाही रे, मलासुद्धा नाही आला कॉल...अरे ते खेडेगाव आहे ना, त्यामुळे तिथे नेटवर्क नसेल कदाचित... रेंजमध्ये आला की करेल तो कॉल don't worry." चंदनला धीर देतच दिपेश म्हणाला. "हो !! तसेच असेल कदाचित." दिपेशच्या वक्तव्याला सहमती दर्शवतच चंदन म्हणाला. "तू सुद्धा मुलुंडलाच आहेस ना कामाला?" विषयाला थोडे वळण देतच दिपेशने विचारले. "हो !! पण तुला कसे माहित?" चंदनने कपाळावर आठ्या आणतच विचारले. "अरे सचिनने सांगितले मला...तो आपला Mutual Friend आहे म्हटल्यावर थोडेतरी माहिती असणारच ना." दिपेशने हसतच म्हटले. "हो, ते ही खरेच म्हणा… पण का रे?? तू ही तिथेच आहेस का कामाला?? चंदनने विचारले. "हो !! म्हणूनच तर तुला विचारले...आपण एक काम करूयात आज ऑफिस सुटले की मुलुंड पश्चिमेला एक "राधे-श्याम" नावाचे हॉटेल आहे तिथे भेटूयात...त्याच निमित्ताने थोड्या गप्पाही होतील आणि बाकी तिथे खाण्याची चंगळच आहे...खूप गर्दी असते तिथे...बोल चालेल ना तुला??" दिपेशने विचारले. "हो चालेल... काही हरकत नाही...भेटू" असे म्हणत चंदनने लगेचच होकार दिला. "Ok done !! मी कॉल करेन ऑफिसमधून सुटल्यावर ok?? चल आता निघतो, नाहीतर ऑफिसला जाण्यास उशीर होईल मला." असे म्हणून दिपेश तेथून निघून गेला…
ठरल्याप्रमाणे संध्याकाळी ऑफिसमधून सुटल्यावर ते दोघे त्या हॉटेलमध्ये भेटले… नेहमीप्रमाणेच हॉटेलमध्ये गर्दी होती, परंतु कसेबसे त्यांना एक टेबल रिकामी भेटले...दमलेले असल्याने बॅग तिथेच ठेवत ते दोघे फ्रेश होण्यासाठी गेले व पुन्हा टेबलवर येऊन बसले… "अरे दिपेश पूर्ण दिवस उलटला तरी सचिनचा एकही कॉल आला नाही रे??" टेबलवर बसतच चंदनने म्हटले. "हो अरे !! मी रानूआजीला सकाळी विचारले तर त्या म्हणाल्या की तिथे त्या मठात बरीच गर्दी असते, त्यामुळे कदाचित त्याला निघायला उशीर झाला असेल...रेंज मिळाली की करेल तो कॉल, तू नको इतकी काळजी करुस...बोल काय मागवायचे मग खायला??" दिपेशने मेनूकार्ड चंदनकडे देतच विचारले… तसा चंदन मेनूकार्ड चाळू लागला… "मला पाव-भाजी चालेल." बराचवेळ मेनूकार्ड चाळून झाल्यानंतर चंदन म्हणाला. "अरे वा !! सेम माझाच भाऊ आहेस रे तू पण… मी सुद्धा हॉटेलमध्ये गेल्यावर Normally पाव-भाजीच Prefer करतो… So Done ना??" दिपेशने चंदनला विचारले. "हो हो !! Done !!" चंदन उत्तरला… दिपेशने जास्त वेळ न दवडता वेटरला दोन पाव-भाजीची ऑर्डर दिली...गर्दी असल्याने ऑर्डर पूर्ण होण्यास थोडा वेळ लागणार होता… "काय मग चंदन, कसे वाटले हॉटेल?" दिपेशने विचारले. "मस्तच आहे !! खरेतर मी कधी या बाजूला आलो नाही, त्यामुळे मला माहित नव्हते या हॉटेलबद्दल."चंदन म्हणाला. "Ok… मी तर खूपदा ईथेच येतो ऑफिसच्या colleagues सोबत." दिपेशने हसतच म्हटले. "बरं...अरे दिपेश तुझ्या त्या पानसरे काकांच्या खोलीच्या deal चे काय झाले रे??" चंदनने उत्सुकतेपोटीच विचारले. "काही दिवसांपूर्वी मी व दिप्ती सचिनसोबत प्रत्यक्ष खोलीवर जाऊन पाहणी करून आलो...रूम छानच आहे, परंतु माझे काका गावी गेले असल्याने ते मुंबईत परत आले की मग आम्ही पुढील बोलणी करणार आहोत… पण तुला कसे माहित याबद्दल??" दिपेशने लागलीच विचारले. "मला ते…सचिनने सांगितले...आणि कोण सांगणार?? तूच तर म्हणालेलास ना आपला Mutual Friend आहे म्हटल्यावर थोडे तरी माहीतच असणार ना??" सारवासारव करतच चंदन म्हणाला. "बस्स !! एवढेच सांगितले की अजूनही काही सांगितले??" दिपेशने संशयीपणेच विचारले. "नाही रे !! इतकेच सांगितले." चंदन म्हणाला… परंतु दिपेश त्याच्या उत्तराने समाधानी नव्हता… त्याला कळून चुकले होते की चंदन त्याच्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे… दिपेशने लागलीच त्याच्या बॅगेतून वर्तमानपत्र काढले व तो वाचू लागला… चंदनला मात्र त्याचे हे वागणे काही समजले नव्हते…
"अरे तू सकाळी आलेले वर्तमानपत्र आता वाचतोयस?? न राहूनच चंदनने त्याला विचारले. "हो अरे !! आज मला वाचायला वेळ नाही मिळाला त्यामुळे म्हटले जरा वेळ मिळालाच आहे तर जरा वाचून काढूयात." दिपेश म्हणाला. "हो बरोबर !!" चंदनने सहमती दर्शवतच म्हटले. "अरे हे बघ ना, पहिल्याच पानावर कसली भयानक बातमी आलीय… पत्नीची आत्महत्या तपासानंतर ठरली हत्या...पतीने त्याच्या आई वडिलांसह मिळून केले हे राक्षसी कृत्य… राहत्या घरातच तिघांनीही मिळून तिला जिवंत जाळले." चंदनकडे पाहतच दिपेशने वर्तमानपत्रातील ती बातमी त्याला वाचून दाखवली…
"बापरे !! खूपच भयंकर… आपल्या माणसांवरसुद्धा विश्वास ठेवणे कठीण झालेय सध्या…" चंदन म्हणाला… "हो !! ते तर आहेच, परंतु तुला असे नाही वाटत का की या वर्तमानपत्रातील ही बातमी कोणत्यातरी घटनेशी मिळती-जुळती आहे??" चंदनचे बोलणे अर्ध्यावरच तोडत दिपेशने विचारले. "कोणत्या घटनेशी?" तू काय बोलतोयस मला काहीच कळत नाहीय." काहीशा दचकलेल्या स्वरातच चंदन म्हणाला… त्याच्या चेहऱ्यावरील ती भीती दिपेशने अगदी अचूकपणे हेरली होती… "वर्तमानपत्रातील ही घटना आणि सरिता वहिनींसोबत घडलेला प्रकार मिळता-जुळता वाटत नाहीय का तुला??" दिपेशने अगदी स्पष्टपणेच विचारले… क्षणाक्षणाला चंदनच्या गळ्याभोवतीचा संशयाचा फास दिपेश अधिकच घट्ट करू लागला होता…
"ए !! काय बोलतोयस तू?? वेडा आहेस का?? सचिन का करेल असे?? ते सर्वजण सरितावहिनींवर किती प्रेम करायचे ते तुलाही माहित आहे… ते का तिला मारतील??" चंदन काहीसा थरथरतच म्हणाला… त्याच्या बोलण्यात आता ठामपणा दिसत नव्हता… दिपेश काय विचारू पाहतोय हे त्याच्या केव्हाच लक्षात आले होते, परंतु सर्व समजूनही न समजण्याचे तो नाटक करत होता… भीतीने त्याच्या कपाळावर आता घामाचे थेंब जमू लागले होते… "अरे इतक्या Ac मध्येही तुला घाम येतोय??" कसली भीती वाटतेय तुला इतकी??" दिपेशने पुन्हा त्याला टोचतच विचारले. "न...नाही...तो मला थोडा त्रास आहे" चंदनने घाम पुसतच म्हटले. "कसला त्रास?? Ac चा?? तुझ्या चेहऱ्यावर एक प्रकारची अनामिक भीती दिसून येतेय मला आणि माणूस इतका केव्हा घाबरतो माहित आहे?? जेव्हा तो खूप मोठे सत्य लपवत असतो… एक असे काळे सत्य जे त्याला कायमचे बरबाद करेल… आणि तू ही असेच काहीतरी लपवतोयस...हो ना??" दिपेशने आता चंदनला पूर्णतः त्याच्या जाळ्यात फसविले होते… "अरे, पण तसे काही घडलेच नाहीय दिपेश" चंदन म्हणाला. "आता बऱ्याबोलाने सर्व सांगतोयस की मीच जाऊन सांगू पोलिसांना?? सांग काय घडले होते सरितावहिनींसोबत?? सचिनची सगळी काळी कृत्ये तुला माहित असतात हे मला चांगलेच ठाऊक आहे… चल बोल पटकन !!" दिपेशने आवाज चढवतच म्हटले. "हो हो सांगतो… सर्व सांगतो...पण तू पोलिसांना काही सांगू नकोस please...नाहीतर मीसुद्धा त्या सचिनसोबत बरबाद होईन." दोन्ही हात जोडतच चंदन म्हणाला. "नाही सांगत चल बोल लवकर." दिपेशने पुन्हा थोडे रागातच म्हटले… तसा चंदन सांगू लागला…
"मी आणि सचिन तसे फार पूर्वीपासून एकमेकांचे चांगले मित्र आहोत… एक - दीड वर्षांपूर्वीच त्याने नोकरीसोबतच 'Broker' चे कामही सुरु केले, आणि त्यातुन त्याला बरेचसे पैसे मिळू लागले… खिशात पैसे खुळखुळू लागल्याने त्याला पैशांची हाव सुटत गेली… कमी वेळात खूप श्रीमंत होण्याचे स्वप्न तो पाहू लागला… काही काळाने त्याने मलाही Broker चे काम करण्याबद्दलचा सल्ला दिला… त्याने मला असे काही आमिष दाखवले की मी सुद्धा लगेचच त्याबद्दलची माझी संमती दर्शविली… आणि त्या क्षणापासून मीसुद्धा त्याच्या या दुष्कृत्यांमध्ये सामील झालो… ते म्हणतात ना की एकदा का माणसाला पैशांची चट लागली की त्याला मग अजून हाव सुटते आणि मग त्यासाठी तो कोणालाही फसविण्यासदेखील मागे-पुढे पाहत नाही… तसेच काहीसे झाले होते आमच्या बाबतीत… Brokerage च्या नावाखाली आम्ही सर्रास लोकांना फसवू लागलो होतो… कमी वेळात जास्तीत जास्त श्रीमंत होण्याचे भूतच जणू आमच्या मानेवर स्वार झाले होते… एकत्र मिळून आम्ही लोकांची फसवणूक करू लागलो… सचिनच्या या दुष्कृत्यांना त्याच्या आई-वडिलांनी प्रत्येकवेळी पाठीशी घातले… त्याची आई म्हणजेच शकुंतलाबाई यांनाही पैशांचा खूप हव्यास होता, त्यामुळेच सचिनच्या प्रत्येक गुन्ह्यावर त्या पांघरून घालत गेल्या… परंतु त्याच्या वडिलांना म्हणजेच प्रतापरावांना त्या दोघांचे हे वागणे पटत नव्हते, पण शकुंतलाबाईंसमोर त्यांचे काहीच चालत नसे… त्या प्रतापरावांना एखाद्या कठपुतळीप्रमाणे नाचवत असत, परंतु या सर्वांत सरिताची मात्र कुचंबना होत असे… सचिनचे आणि त्याच्या आईचे ते हव्यासी वागणे तिलाही आवडत नसे, परंतु त्यांच्या दबावापुढे ती मूग गिळून गप्पच राहणे पसंत करत असे… तिने त्या दोघांना समजावण्याचा खूपदा प्रयत्न केला, परंतु पैशांच्या लोभाच्या चिखलात त्यांचे पाय इतके खोलवर रुतले होते, की कोणी कितीही जरी समजावले तरीही ते समजावण्यापलीकडे गेले होते… आणि त्यादिवशी… त्यादिवशी जेव्हा सरिताला समजले की सचिनचा पुढचा बळी तू आहेस, तेव्हा मात्र तिच्या सहनशक्तीचा अंत झाला…" चंदन सरसकट घडलेला प्रकार दिपेशला सांगत होता… "म्हणजे, नेमके काय घडले होते त्यादिवशी??" दिपेशने विचारले.
"त्यादिवशी तुमच्या इमारतीत सत्यनारायणाची पूजा होती… माझ्या माहितीप्रमाणे तुला एका urgent कामानिमित्त ऑफिसला जावे लागले होते, नाहीतर तू सुद्धा पूजेला उपस्थित राहणार होतास...बरोबर ना?" चंदनने विचारले. "हो बरोबर !! आणि दिप्तीची तब्येतसुद्धा बरी नसल्याने ती सुद्धा खाली उतरली नव्हती…" दिपेश उत्तरला. "Ok !!.... त्यादिवशी इमारतीतील बहुतांशी लोक इमारतीखाली सत्यनारायणाच्या पूजेच्या तयारीत मग्न होते… सचिन व त्याचे आई-वडील तिघेही घरातच होते… सरितावहिनी आल्यानंतर ते तयार होऊन खाली येणार होते...सचिनला त्याच्या वडिलांचे मित्र व पेशाने वकील असलेल्या पानसरे काकांचा फोन आला… त्यांनी सचिनला त्यांच्या अंधेरी येथील रूमसाठी ग्राहक शोधण्यास सांगितले, परंतु त्यांच्या त्या खोलीचा एक खूप मोठा problem होता… काही वर्षांपूर्वी त्यांच्या त्या Flat मध्ये एका विधवा बाईने काही कारणास्तव गळफास घेऊन आत्महत्या केली होती, त्यामुळे त्या घरात पुढे जे कोणी भाडेकरू राहण्यास येत असत त्यांना ती सतवत असे… पुढे त्यांच्या त्या Flat ला भाडेकरू मिळणेही कठीण होऊन बसले… म्हणून मग वैतागूनच त्यांनी तो रूम विकण्याचा निर्णय घेतला… त्यासाठी तो Flat कमी किंमतीतही विकण्यास ते तयार झाले… तसेच संपूर्ण विक्री किमतीतील 30% रक्कम आणि 5% कमिशनसुद्धा ते सचिनला देण्यास तयार झाले." चंदन सरसकट सांगत होता… दिपेश चकित होऊनच ते सर्व ऐकत होता, कारण चंदन जे काही सांगत होता ते सर्व त्याला पडलेल्या स्वप्नाशी अगदी तंतोतंत जुळत होते…
"त्यावेळी तू सुद्धा रूमच्या शोधात होतास हे त्याच्या लक्षात होते, त्यामुळे त्याने तो flat तुझ्या माथी मारण्याचा घाट रचला… याबद्दल त्याने लगेचच त्याच्या आई-वडिलांनाही सांगितले… त्याच्या वडिलांनी सुरुवातीला काहीसा विरोध दर्शविलाच, परंतु शकुंतलाबाईंसमोर त्यांचे काहीच चालले नाही… त्या तिघांचेही ते संभाषण सरिताने दाराबाहेरून ऐकले होते व तिला ते अजिबात पटले नव्हते… तिने त्यावरून त्यांना कडाडून विरोध केला, परंतु सचिन व शकुंतलाबाईंसाठी पैसे कमावण्याची ही सुवर्णसंधी होती आणि इतक्या सहजासहजी ते तिला हातातून निसटू देणार नव्हते…
पाहता-पाहता त्यांच्यातील वाद-विवाद अगदी विकोपाला गेला… आणि त्याचे रूपांतर कडाक्याच्या भांडणात झाले… सत्यनारायणाच्या पूजेसाठी लावलेल्या लाऊडस्पीकरच्या आवाजाने त्यांच्या भांडणाचा आवाज कोणालाच आला नाही…त्या तिघांनाही तिला खेचतच किचनमध्ये नेले… खूप समजावूनही ती ऐकली नाही आणि मग शेवटी त्या तिघांनी मिळून तिला जिवंत जाळून टाकले… ती किंचाळत होती...विव्हळत होती, परंतु लाऊडस्पीकरच्या त्या आवाजाने तिचा आवाज कोणापर्यंत पोहोचलाच नाही… संपूर्णपणे भाजल्याने काहीच क्षणात तिचा होरपळून मृत्यू झाला… संपूर्ण किचनमध्ये धूर पसरला होता… तो धूर आणि शरीर जळाल्यामुळे येणारा वास इतरत्र कुठेही पसरू नये म्हणून त्याने किचन तसेच हॉलमधील सर्व दारे-खिडक्या बंद करून घेतल्या… यानंतर खूप शिताफीने ते तिघेही इमारतीखाली सुरु असलेल्या सत्यनारायणाच्या पूजेच्या तयारीत सहभागी झाले… बराचवेळ उलटला तरीही सरितावहिनी कुठेही दिसत नव्हत्या, म्हणून त्याबाबत सर्वजण सचिनला विचारू लागले… तसे ती तयारी करत आहे असे सांगून सचिनने वेळ मारून नेली…
पूजेसाठी लागणारे काही साहित्य सचिनच्या घरी ठेवले होते… त्यामुळे ते आणण्यासाठी म्हणून त्याने तुमच्या बिल्डिंगचे सेक्रेटरी म्हणजेच दामूकाकांना सोबत नेले...घराजवळ पोहोचताच सचिनने सरितावहिनींना हाक मारण्यास सुरुवात केली, परंतु बराचवेळ झाला तरीही आतून काहीच प्रतिसाद येत नव्हता...घरातून आता कुबटसा वासदेखील येऊ लागला होता, त्यामुळे त्यांनी वेळ न दवडता खाली असलेल्या लोकांना बोलावून घेतले… सचिन व त्यातील दोन तीन जणांनी मिळून केलेल्या अथक प्रयत्नानंतर बाहेरील दरवाजाचे लॅच लॉक तोडण्यात त्यांना यश मिळाले...परंतु सरितावहिनी त्यांना हॉलमध्ये कुठेही नजरेस पडल्या नाहीत… संपूर्ण हॉलमध्ये फिकट पांढऱ्या धुराचे साम्राज्य पसरले होते… आणि तो धूर किचनमधून येत होता...त्या सर्वांना कळून चुकले होते की आत काहीतरी विपरीत घडले आहे… किचनच्या दरवाजालाही लॅच लॉक असल्याने ते तोडण्यासाठीसुद्धा त्यांना बरीच मेहनत करावी लागली… बऱ्याच वेळानंतर ते लॉक तोडण्यात त्यांना यश आले आणि समोरील दृश्य पाहून सर्वांच्या काळजाचा ठोकाच चुकला… संपूर्ण किचनमध्ये धूर पसरला होता व अगदी कुबटसा वासदेखील पसरला होता… सरितावहिनींचा मृतदेह जमिनीवर निपचित पडला होता… ते भयानक दृश्य पाहून सचिन जागेवरच बसला… खरेतर त्याने ते नाटकच केले होते म्हणा… सर्वांनी मिळून तात्काळ सरितावहिनींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले… पोलीस केस झाली, पण या सर्वांत सचिनला मोलाची साथ दिली ती त्याच्या वडिलांचे मित्र तसेच पेशाने वकील असलेल्या पानसरे काकांनी… त्यांनी खूप शिताफीने त्यांना या प्रकरणातुन बाहेर काढले, पण त्यासाठी सचिनला थोडे पैसे दाबावे लागले…
सचिनला व त्याच्या आईला त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांचा जराही पश्चाताप झाला नव्हता… त्याचे बाबा मात्र माझ्याजवळ येऊन धुमसून धुमसून रडत असत… मी त्याच्याशी मैत्री केली व त्याच्या नादाला लागून अनेक गरजू लोकांना फसवत गेलो… सरितावहिनींच्या प्रकरणात पोलिसांनी माझीही थोडीफार चौकशी केली, परंतु मी त्यावेळी सचिनने जे जे मला सांगितले होते तसेच त्यांना सांगितले… खूप वाटत होते की पोलिसांना सर्व खरंखुरं सांगून टाकावे, पण माझे हात दगडाखाली होते...माझ्यामुळे सरितावहिनींना न्याय मिळू शकला नाही याचे मला खूप वाईट वाटतेय." इतके बोलून चंदन रडू लागला… दिपेशच्याही डोळ्यात पाणी आले होते… इतक्यात दिपेशला कॉल आला… दिप्तीचा फोन होता… "हा बोल दिप्ती" डोळे पुसतच दिपेश म्हणाला. "अहो कुठे आहात तुम्ही??" दिप्तीने विचारले, परंतु तिच्या आवाजात एक प्रकारची भीती जाणवत होती… "का ग काय झाले?? आणि तू इतकी घाबरलेली का वाटत आहेस??" काळजीच्या स्वरातच दिपेशने विचारले. "अहो बातमीच तशी आहे" दिप्ती म्हणाली. "का काय झाले??" दिपेशने विचारले… "काल रात्री कणकपूरला जाताना सचिनच्या कारचे Accident झाले आणि त्या अपघातात त्या तिघांचाही जागीच मृत्यु झाला आहे… तुम्ही लवकर घरी या please" दिप्तीचे ते बोलणे ऐकून दिपेश अगदी सुन्न झाला… परंतु आता त्याला त्या घटनेचे इतके काही वाटणार नव्हते…
पैशांच्या लोभापायी सचिन व त्याच्या आईने आज संपूर्ण कुटुंब उध्वस्त केले होते… आज किती दिवसांनी सरिताच्या आत्म्याला शांती मिळणार होती… कारण तिने तिचा बदला तर पूर्ण केलाच होता, परंतु त्याचसोबत दिपेश व दिप्तीला एका मोठ्या संकटातून वाचवले होते...त्या काळरात्रीच्या माध्यमातून तिने दिपेशला सचिनचे खरे रूप दाखवले होते… मैत्रीच्या त्या नात्यामागे लपलेला सचिनचा तो क्रूर चेहरा… मैत्रीच्या त्या गोंडस नात्याला आज सचिनने कलंक लावला होता… पैशांच्या हव्यासापोटी त्याने कोणत्याच नात्याची कदर केली नव्हती आणि एका निष्पाप हसत्या - खेळत्या सरिताचा खुन केला होता…
आज पैशांच्या हव्यासापोटी माणसा-माणसात दुरावा निर्माण झाला आहे… माणसातील माणुसकी कमी होत चालली आहे… अशी कित्येक नाती आज पैशांमुळे संपुष्टात आली आहेत, त्यामुळेच पैसा जितका चांगला तितकाच तो वाईटही…
दिपेशने पुढे त्याच्या काकांच्या ओळखीने मुंबईत स्वतःचा नवीन flat घेतला व त्याच्या सुखी संसाराला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली.
~~~~~~~~~~समाप्त~