ती काळरात्र 2 - The Mystery Unfolds
लेखन : अभिषेक शेलार
भाग : 3
भाग 2 पासून पुढे सुरु…
संपूर्ण पॅसेजमध्ये पांढराफट्ट धूर पसरला होता… दिपेश काहीसा बुचकळ्यातच पडला… इतका धूर नक्की कुठून येतोय हे पाहण्यासाठी तो त्या धुरातुन वाट काढत चालू लागला… थोडे पुढे आल्यानंतर त्याच्या लक्षात आले की तो धूर वरच्या मजल्यांवरून येत आहे… तो तसाच जिन्यांवरून वरच्या दिशेने चालू लागला… धुराचा माग काढत काहीवेळाने तो चौथ्या मजल्यावर येऊन पोहोचला… तो धुर सचिनच्या घरातून येत असल्याचे त्याच्या लक्षात आले, तसा धावतच तो त्या खोलीपाशी आला… खोलीचे दार किंचितसे उघडे होते आणि दारामागून एक प्रखर असा उजेड येत होता… दिपेशला काहीच कळत नव्हते...त्याने अलगदच दार पुढे ढकलले व तो आत शिरला… आणि काय आश्चर्य… त्या प्रखर उजेडाच्या पलीकडे एक वेगळेच वातावरण होते… खोलीत ना धूर होता ना कोणताही लख्ख प्रकाश… इतकेच काय तर तेथील काळ-वेळ सर्वकाही बदलले होते… रात्रीचे दिवसात रूपांतर झाले होते...घड्याळातील वेळदेखील केव्हाच बदलली होती… सकाळचे 11:30 वाजले होते… आपल्यासोबत काय घडतेय याबद्दल दिपेशला काहीच समजतं नव्हते… आसपास पाहता पाहता त्याची नजर समोरील टेबलावर असलेल्या वृत्तपत्रावर स्थिरावली… त्या वृत्तपत्रातील तारीख पाहून त्याला धक्काच बसला… कारण ती तारीख होती 15 फेब्रुवारी 2020…म्हणजेच तो दिवस ज्यादिवशी सरिताने स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली होती…
म्हणजे एकप्रकारे Time Travel करून दिपेश 2 महिने मागच्या काळात आला होता… "पण हे कसे शक्य आहे?? आणि माझा ईथे येण्याचा हेतू काय??" असे एक ना अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात घुमू लागले… परंतु आता सर्वकाही त्याच्या समजण्यापलीकडेच होते… त्याचे हे सर्व विचारचक्र सुरु असतानाच अचानक सोफ्यावरील मोबाईल वाजू लागला… दिपेशने काहीसे डोकावूनच पाहिले… स्क्रीनवर नाव होते "पानसरे काका".... होय !! तेच पानसरे काका ज्यांच्यासोबत त्याने काही दिवसांपूर्वीच त्यांच्या flat बद्दल बोलणी केली होती…
दिपेश त्याच्याच विचारांत मग्न असताना किचनमधून एक व्यक्ती कॉल घेण्यासाठी धावतच बाहेर आली… आणि ती व्यक्ती म्हणजे दुसरी-तिसरी कोणीही नसून त्याचाच जिवलग मित्र म्हणजेच "सचिन" होता…
"हा बोला काका !!" लगबगीने फोन उचलतच सचिन म्हणाला. "सचिनने मला पाहिले की नाही?? की त्याने पाहूनही न पाहिल्यासारखे केले?? नाही… असे का करेल पण तो?? की मी त्याला दिसलोच नाही??" अशा एक ना अनेक प्रश्नांनी दिपेशचे डोके भंडावून सोडले…
"अहो काका… तुमचे काम झालेच म्हणून समजा… हो हो, त्याबद्दल त्याला काहीही कळणार नाही याची जबाबदारी माझी...ok?? Byy" इतके म्हणून सचिनने फोन ठेवला. "काय रे सचिन?? मला पाहूनही न पाहिल्यासारखे केलेस?" दिपेशने सचिनच्या थोडे जवळ जाऊनच विचारले… परंतु सचिनने काहीच प्रतिसाद दिला नाही… हा असे मुद्दाम तर करत नाहीय ना असा विचार करून दिपेश सचिनच्या खांद्यावर हात ठेवायला गेला आणि काय आश्चर्य… त्याचा हात सचिनच्या शरीरातुन आरपार जाऊन पुन्हा खाली आला… घडलेला प्रकार पाहून दिपेश जागच्या जागीच स्तब्ध उभा राहिला… त्याचे डोके सुन्न झाले… नेमके काय घडतेय त्याचे त्यालाही कळत नव्हते… परंतु आता एक गोष्ट मात्र पक्की होती ती म्हणजे ना त्याला कोणी पाहू शकत होते… ना ऐकू शकत होते व ना तो कोणाला स्पर्श करू शकत होता… कारण काळाच्या ओघात प्रवास करून 2 महिने मागच्या काळात आलेला दिपेश शरीराने तेथे आलाच नव्हता… आलेली ती फक्त त्याची आत्मा…
"आई !! बाबा !! लवकर बाहेर या, मला तुम्हा दोघांना एक मस्त बातमी सांगायचीय" हॉलमधून आवाज देतच सचिनने त्याच्या आई-वडिलांना बोलवले… "काय रे सचिन, काय झाले?" किचनमधून लगबगीने बाहेर येतच शकुंतलाबाई म्हणाल्या… त्यांच्या पाठोपाठ प्रतापरावही तेथे आले…
"हे बघा !! आता मी काय सांगतोय ते नीट लक्षपूर्वक ऐका… आताच मला पानसरे काकांचा फोन आला होता… ते सांगत होते, की अंधेरीला त्यांचा एक flat आहे आणि ते त्या flat साठी ग्राहक शोधत आहेत." सचिन त्यांना सांगत होता. "हो, मग बघ ना कोणी तुझ्या ओळखीतले असेल तर… हे काम तर तुला चांगलेच जमते" प्रतापराव त्याला म्हणाले. "अहो बाबा !! खरी आनंदाची बातमी तर पुढे आहे… ते मला असेही म्हणाले की तू मला ग्राहक शोधून दिलास तर 5% कमिशन तर देईनच, परंतु रूमच्या विक्री किंमतीतुन 30% सुद्धा तुला मिळतील." चेहऱ्यावर हास्य आणतच सचिन सांगत होता… "30%?? ते कसले अजून??" शकुंतलाबाईंनी चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव आणतच विचारले… भिंतीच्या एका कोपऱ्यात उभे राहून दिपेश त्या तिघांमधील संभाषण अगदी लक्षपूर्वकरीत्या ऐकत होता…
"काकांच्या म्हण्याप्रमाणे त्यांच्या त्या अंधेरीतील flat मध्ये काही वर्षांपूर्वी एका विधवा बाईने गळफास घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली होती… त्यानंतर त्या खोलीत जितके भाडेकरू आले त्यांना ती त्रास द्यायची व त्यामुळेच त्या घरात कोणीही भाडेकरू टिकत नसे… त्यामुळे नाईलाजानेच आता पानसरे काकांनी तो flat विकायला काढला आहे." शकुंतलाबाईंना समजावतच सचिन म्हणाला… "मग शोध लवकर तुझ्या ओळखीत कोणी असेल तर… चांगली संधी चालून आली आहे पैसे कमावण्याची." शकुंतलाबाई त्याला म्हणाल्या. "हो आई !! संधी आली आहे आणि ती मी गमावलीदेखील नाहीय" चेहऱ्यावर एक क्रूर हास्य आणतच सचिन म्हणाला.
"म्हणजे?? तुझ्या ओळखीत आहे का कोणी?? कोण आहे रे ती कमनशिबी व्यक्ती??" शकुंतलाबाईंनी अगदी उत्साहीपणेच विचारले. "कोण असेल, तुम्हाला काय वाटते??" सचिनने त्या दोघांनाही विचारले. "अरे, आम्हाला कसे माहित असणार??" शकुंतलाबाई उच्चारल्या. "हम्म… ते ही बरोबरच म्हणा...चला मीच सांगतो… ती व्यक्ती म्हणजे फार कोणी लांबची व्यक्ती नाहीय, तर ती व्यक्ती म्हणजे आपल्याच इमारतीत राहणारा माझा मित्र दिपेश आणि त्याची पत्नी दिप्ती" सचिनचे बोलणे ऐकून दिपेशच्या पायाखालील जमीनच सरकली… तसा त्याला थोडा अंदाज आलाच होता, परंतु आता खात्रीच पटली होती… आपण ज्याला मनापासून आपला मित्र मानत होतो तोच आपल्याला फसवायला निघाला आहे या विचारानेच त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली… दोन सणसणीत कानाखाली वाजवून सचिनला याबद्दलचा जाब विचारावासा वाटत होता… परंतु यातील काहीच करणे शक्य नव्हते, कारण दिपेश एका आभासी जगात होता… फक्त एका आत्म्याच्या स्वरूपात…
"पण, दिपेश तर तुझा चांगला मित्र आहे ना??" न राहूनच प्रतापरावांनी विचारले. "हो असेलही मित्र, परंतु एखादी गोष्ट जेव्हा पैशांवर येऊन अडकते तेव्हा मग मी मैत्री वैगेरे काहीही पाहत नाही… मूर्ख कुठला, दिपेशला वाटते की मी त्याला खूप चांगला मित्र समजत आहे… परंतु त्याला हे कुठे माहितीय की पैशांसाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकतो." चेहऱ्यावर एक प्रकारचे क्रूर हास्य ठेवूनच सचिन सांगत होता… "सचिन !! असे नको रे करुस त्याच्यासोबत… बिचारा खूप मेहनतीने पुढे जातोय तो" प्रतापराव म्हणाले.
"तुम्ही गप्प बसा ओ !! तुम्हाला खूपच पुळका आलाय त्या दिपेशचा… इतक्या वर्षात तुम्ही काय मोठे दिवे लावले?? कधी दाग-दागिने नाही...कधी कोणती हौस-मौज नाही… आता मुलगा काही करतोय तर त्यातही आडकाठी आणायची?? ते काही नाही… सचिन तू बोलतोयस ते मला पटले आहे...कुठे त्या काल-परवा आलेल्या मुलासोबत आपल्या भावना गुंतवायच्या… तू त्याला लवकरात लवकर पानसरे काकांचा रूम दाखवायला घेऊन जा, आणि कसेही करून त्याला तो रूम घेण्यास प्रवृत्त कर…" पैशांच्या लालचेपोटीच शकुंतलाबाई म्हणाल्या…
"एक मिनिट !! काय चाललेय तुमचे?? कोणाला फसविण्यास निघाला आहात तुम्ही?? त्या बिचाऱ्या दिपेश भावोजींना?? आणि ते ही काहीशा पैशांसाठी?? अहो, स्वतःच्या भावासारखे मानतात ते तुम्हाला… आणि तुम्ही हे असं?? वाटले नव्हते पैशांसाठी तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर याल असे." इतकावेळ दाराबाहेरून सर्व ऐकत असलेली सरिता रागातच म्हणाली.
"इतका पुळका आलाय तुला त्या गावंडळ दिपेशचा?? त्याला तर स्वतःचे निर्णयसुद्धा स्वतःला घेता येत नाहीत… काका आणि बायकोच्या विचारांवर चालणारा मुलगा आहे तो… त्याची कसली इतकी बाजू घेतेयस??" सचिन काहीसा आवाज चढवूनच म्हणाला. "अरे सचिन तू काय हिचे ऐकतोयस...पैसा कमवायची काडीची अक्कल नाही हिला… आता आयती संधी चालून आलीय तर आली ज्ञान पाजळायला." शकुंतलाबाई रागातच म्हणाल्या.
"यात कसले ज्ञान पाजळले मी?? याआधीही तुम्ही तिघांनी मिळून दोन जणांना फसविले होते, तेव्हाही मी शांत राहिले होते… पण आता मी शांत बसणार नाही… अहो, आपल्याला कसली कमी आहे सांगा ना… चांगले दोन वेळेचे जेवतोय आपण… दोघेही नोकरीला आहोत...सर्वकाही अगदी सुरळीत चालूय मग काय गरज आहे अशाप्रकारे एखाद्या साध्या माणसाला फसवून त्याचे वाईट करायचे?? आणि हा अशाप्रकारे मिळवलेला पैसा किती दिवस पुरणार आहे आपल्याला?? पैशांसाठी तुम्ही आता नात्यांचीही कदर करणे सोडून दिले आहे… आणि आई तुम्हीसुद्धा प्रत्येकवेळी यांच्या चुकांवर पांघरून घालत आला आहात… उलट तुम्ही यांना समजावले पाहिजे, पण तुम्हीच यांच्या चुकीच्या वागण्याला पाठिंबा देत आहात??" सरिता आपले म्हणणे स्पष्ट करतच म्हणाली.
"ए !! बस कर हा आता तुझे तत्त्वज्ञान… बाकीच्या लोकांना शिकव तुझं ते तत्त्वज्ञान, ईथे आम्हाला नको सांगुस… आणि आता तू आम्हाला शिकवणार का काय चांगले आणि काय वाईट ते?? बिनडोक कुठली… मला खूप श्रीमंत व्हायचेय आणि माझ्या मार्गात येण्याचा प्रयत्न केलास ना, तर तुझा जीव घेण्यासही मागे-पुढे पाहणार नाही हा मी...त्यामुळे तोंड बंद ठेवून जे सुख मिळतेय त्याचा आनंद घेण्यातच तुझे भले आहे." सरिताला धमकीवजा इशारा देतच सचिन म्हणाला.
"नाही !! अजिबात नाही… इतके दिवस मी हे सर्व मुकाट्याने सहन करत आले, पण आता नाही… आणि हे असले सुख तर मला मुळीच नको… एखाद्याच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन त्यातून मिळालेले सुख काय कामाचे?? आता माझा जीव जरी घेतलात ना तरी चालेल पण नाही तुम्हा तिघांना तुरुंगाची हवा खायला लावली ना तर बघाच… आताच जाऊन सांगते दिप्तीला तिलाही समजू देत जरा की तुम्ही तिघे किती नीच आहात ते" असे म्हणून सरिता घराबाहेर जाऊ लागली, परंतु क्षणाचाही विलंब न करता सचिनने तिला पकडले…
"इतकी हिंमत वाढली तुझी की तू आम्हाला तुरुंगात टाकायला निघालीस?? आणि ते ही कोणासाठी तर त्या गावंडळ दिपेश आणि दिप्तीसाठी??" सचिनचा राग आता अनावर झाला होता… घडत असलेला सर्व प्रकार पाहून दिपेशही स्तब्धच झाला होता… बोलण्यासारखे तर खूप काही होते, परंतु काही फायदा होणार नव्हता हे त्याला माहित होते…
एव्हाना सचिन व सरितामधील वाद विकोपाला पोहोचला होता… इतक्यात खालून सत्यनारायणाच्या पूजेसाठी आणलेल्या लाऊडस्पीकरवर मोठ्या आवाजात गाणी वाजू लागली… हॉलचा दरवाजा लावून सचिनने सरिताला खेचतच किचनमध्ये नेले… त्यापाठोपाठ शकुंतलाबाई व प्रतापरावही किचनमध्ये शिरले… आत काय घडत आहे ते पाहण्यासाठी दिपेशनेही किचनच्या दिशेने धाव घेतली… तो आत गेला तेव्हा शकुंतलाबाई व प्रतापरावांनी सरिताला घट्ट पकडून ठेवले होते… सचिनने किचनचा दरवाजा बंद केला… लाऊडस्पीकरच्या आवाजाची तीव्रता हॉलच्या मानाने आता काहीशी कमी वाटत होती…
"तुला काय वाटले इतक्या सहजपणे मी तुला दिप्तीला सर्व सांगू देईन का? ही माझ्या आयुष्यात पैसा कमावण्यासाठीची आलेली सुवर्णसंधी आहे आणि ती मी तुझ्यासारख्या बिनडोक बाईमुळे जाऊ देईन?? आम्हाला तुरुंगाची हवा खायला लावणार तू?? पण त्याआधी आम्ही तुझाच आवाज बंद केला तर?? तो ही कायमचा??" क्रूरपणे सचिन बोलत होता… "म्हणजे?? काय करणार आहात तुम्ही?? अहो पण मी काही चुकीचे सांगितले का तुम्हाला?? बाबा तुम्ही तर समजवा ना ह्यांना.." प्रतापरावांना विनंती करतच सरिता म्हणाली… "ते काय बोलतील मी ईथे उभी असताना… सचिन !! हिचे जिवंत राहणे आपल्याला परवडणारे नाही, कारण आज ना उद्या ही त्या दिपेश आणि दिप्तीसमोर तोंड उघडणारच… आणि आपल्याला फासावर लटकवणार… तेव्हा जास्त विचार करू नकोस...आताच हिचा काय तो सोक्षमोक्ष लावून टाक." सचिनला चेतावतच शकुंतलाबाई म्हणाल्या.
"नाही !! सोडा मला !! तुम्ही माझा आवाज कायमचा जरी बंद केलात, तरी दिपेश भावोजींना सत्याचा उलगडा झाल्याशिवाय राहणार नाही… आणि एक लक्षात ठेवा माझ्या मृत्यूनंतरही तुम्हा तिघांना मी सुखाने जगू देणार नाही… बरबाद करून टाकेन तुम्हाला" सरिता आक्रोश करतच म्हणाली.
सचिनने चारही बाजूंना नजर फिरवली...त्याची नजर सकाळीच सरिताने आणलेल्या रॉकेलच्या गॅलनवर स्थिरावली आणि त्याने कसलाही विचार न करता त्या गॅलनमधील रॉकेल सरिताच्या अंगावर ओतण्यास सुरुवात केली… सरिता रडत होती… आक्रोश करत होती… शकुंतलाबाई व प्रतापरावांच्या तावडीतून निसटण्याची केविलवाणी धडपड करत होती, परंतु तिला काहीच हालचाल करता येत नव्हती… घडत असलेला सर्व प्रकार विस्फारलेल्या डोळ्यांनीच दिपेश पाहत होता… त्याला खूप काही करावेसे वाटत होते, परंतु घडत असलेले सर्व हतबलपणे पाहण्यावाचून त्याच्याकडे कोणताही पर्याय नव्हता…
रॉकेलचा संपूर्ण कॅन सरिताच्या अंगावर ओतल्यानंतर सचिनने सरिताला जोरात खेचुन जमिनीवर एका बाजूस ढकलले व क्षणाचाही विलंब न लावता खिशातील Lighter पेटवून सरिताच्या दिशेने भिरकावले आणि त्याचबरोबर आगीचा एकच भडका उडाला… बघता बघता सरिताचे संपूर्ण शरीर आगीच्या त्या प्रचंड ज्वाळांमध्ये सामावू लागले… ती रडत होती...किंचाळत होती… आक्रोश करत होती, परंतु लाऊडस्पीकरच्या आवाजापुढे तिचे ते किंचाळणे कोणालाही ऐकू जाणार नव्हते...आज तिला वाचविणारे कोणीही नव्हते, कारण इमारतीतील बहुतांशी लोक खाली पूजेची तयारी करण्यासाठी गेले होते…
बघता बघता काहीच क्षणात संपूर्ण किचनमध्ये धुराचे साम्राज्य पसरले… अगदी तीव्र असा कुबट वास येऊ लागला… सचिनने लागलीच किचनमधील खिडकी बंद करून घेतली जेणेकरून बाहेर पडणाऱ्या धुराची व वासाची तीव्रता कमी होईल… किचनचे दार बाहेरून ओढून ते तिघेही लगबगीने बाहेर गेले…
सरिताचा आवाज आता पूर्णतः बंद झाला होता… समोर सरिताचा निपचित पडलेला देह दिपेशला दिसत होता… तिचे संपूर्ण शरीर आगीमुळे पोळून निघाले होते… भाजल्यामुळे तिचा चेहरा अगदी विद्रुप दिसत होता...ते भयंकर दृश्य पाहून दिपेशचे हात-पाय गळून पडले… त्या धक्क्याने तो थेट जमिनीवरच कोसळला… काळाच्या ओघात 2 महिने मागे येऊनही आपण सरिता वहिनींचे प्राण वाचवू शकलो नाही याचा त्याला खूप पश्चाताप होत होता...त्याच्या डोळ्यांसमोर सरिताचे प्राण गेले होते, परंतु हतबलपणे सर्व पाहण्यावाचून त्याच्याकडे कोणता पर्यायदेखील नव्हता… सरिताची ती अवस्था पाहून त्याला अश्रू अनावर झाले… "वहिनी !! मला माफ करा… मी तुम्हाला या नराधमांपासून नाही वाचवू शकलो… सर्वकाही माझ्या डोळ्यांदेखत घडत होते, पण मी फक्त बघतच राहिलो… मला माफ करा Please" असे म्हणून दिपेश धुमसून धुमसून रडू लागला…
"अहो उठा !! काय झाले रडायला??" दिप्तीचे बोलणे कानी पडताच दिपेशचे डोळे खाडकन उघडले… समोर पाहिले असता दिप्ती त्याच्या बाजूला बसून त्याला झोपेतून जागे करत होती… स्वप्न… हो एक भयाण स्वप्न… परंतु त्या स्वप्नाने आज बऱ्याच रहस्यांवर प्रकाश टाकला होता…
"काय झाले?? का रडताय तुम्ही??" दिपेशच्या खांद्यावर हात ठेवतच दिप्तीने विचारले… परंतु दिपेश खूपच घाबरलेल्या अवस्थेत दिसत होता… भीतीने त्याच्या श्वासाचा वेग खूप वाढला होता… घामाने त्याचे संपूर्ण शरीर ओलचिंब झाले होते… त्याची ती अवस्था पाहून दिप्तीने लगेचच बाजूला ठेवलेल्या तांब्यातील पाणी त्याला पिण्यास दिले… काही क्षणातच त्याने तांब्यातील संपूर्ण पाणी पटापट घशाखाली रिचवले… काहीवेळाने दिपेश थोडा relax झाला…
"दिप्ती !! तिने आत्महत्या केली नव्हती...तिची हत्या झाली होती… त्या तिघा नराधमांनी मिळून तिला मारले…"काहीशा घाबरलेल्या स्वरातच दिपेश म्हणाला. "अहो काय बोलताय तुम्ही?? कोणाबद्दल बोलताय?? मला काहीच कळत नाहीय??" कपाळावर आठ्या आणतच दिप्तीने विचारले. "अग मी सरितावहिनींबद्दल बोलतोय" दिपेशचे हे उत्तर ऐकून दिप्तीला धक्काच बसला…
"काय?? पण हे कसे शक्य आहे??" दिप्तीने विचारले. "होय !! मी त्या स्वप्नात सर्वकाही पाहिले आहे" दिपेश म्हणाला. "मला नीट सांगा, तुम्ही काय असे पाहिले त्या स्वप्नात??" दिप्तीने विचारले… आणि दिपेशने त्या स्वप्नातील घटनाक्रम एकेक करून तिला सांगण्यास सुरुवात केली… ते सर्व ऐकून तिलाही धक्काच बसला… विस्फारलेल्या डोळ्यांनी ती सर्व ऐकत होती… सरिताची ती दुःखद गोष्ट ऐकून तिलाही अश्रू अनावर झाले…
"मी तिथे जाऊनसुद्धा काहीच करू शकलो नाही ग दिप्ती… त्या तिघांनी माझ्या डोळ्यांसमोर अतिशय निर्दयीपणे तिला जाळून टाकले" दिप्तीला सांगतच दिपेश पुन्हा रडू लागला… "जर खरंच असे घडले असेल ना, तर त्या तिघांनाही त्याची योग्य ती शिक्षा मिळालीच पाहिजे" दिप्ती म्हणाली… "परंतु… माझ्या या स्वप्नाला सत्याचा आधार नाहीय...कारण नुसत्या स्वप्नावर कोणीच विश्वास ठेवणार नाही" काहीशा धीरगंभीर स्वरातच दिपेश म्हणाला. "हो, ते ही खरेच म्हणा, पण मग आपण आता याबदलचा पुरावा कसा मिळवायचा?? कारण हे तर फक्त एक स्वप्न होते" दिप्तीने विचारले. "आता एकच व्यक्ती आहे जी या प्रकरणाबद्दल आपल्याला सर्वकाही सांगू शकते" काहीसा खोलवर विचार केल्यानंतर दिपेश म्हणाला. "कोण आहे ती व्यक्ती?" दिप्तीने प्रश्नार्थक नजरेनेच विचारले. "ती व्यक्ती म्हणजे सचिनचा सर्वात जवळचा मित्र म्हणजेच शेजारच्या इमारतीत राहणारा "चंदन" !! त्याला सचिनची सगळी गुपित माहिती असतात… आता तोच एक मार्ग आहे, ज्याने आपण या प्रकरणाच्या तळाशी जाऊ शकतो… मी उद्याच त्याला भेटून त्याला बोलते करण्याचा प्रयत्न करतो." मनाशी एक दृढ निश्चय करतच दिपेश म्हणाला.
आणि अशाप्रकारे सरिताच्या मृत्यूमागील गुढ उकलण्याच्या दिशेने दिपेशने अजून एक पाऊल टाकले… एकेठिकाणी त्या काळरात्रीने स्वप्नाच्या माध्यमातून दिपेशला जागृत केले होते, परंतु दुसरीकडे सचिनच्या मार्गात बऱ्याच अडथळ्यांची मालिका सुरु झाली होती…
मध्यरात्रीचे साधारण 3 वाजले असतील… सचिन त्याच्या आई-वडिलांना घेऊन कणकपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत होता, परंतु वाटेत त्याची कार तब्बल 4 वेळा बंद पडली होती...कशीबशी थोडी डागडुजी करून त्याने ती चालू केली होती… कारण संपूर्ण महामार्गावर त्याला कुठेही गॅरेज दिसले नव्हते… सचिनच्या बाजूच्या सीटवर प्रतापराव तर मागच्या सीटवर शकुंतलाबाई बसल्या होत्या… कारमधील AC च्या थंड हवेमुळे ते दोघेही केव्हाच निद्रेच्या आहारी गेले होते… रस्त्याच्या दुतर्फा घनदाट जंगल पसरले होते… रस्त्यावर वाहनांची वर्दळही अगदी तुरळक दिसत होती...मध्येच समोरून एखादा ट्रक किंवा लॉरी येत व सुसाट वेगाने त्याच्या कारच्या बाजूने निघून जात असे… त्यानंतर पुन्हा मिट्ट काळोख… त्या गडद अंधाराला चिरणाऱ्या त्याच्या कारच्या हेडलाइट्सचा एकमेव प्रकाशच त्याची त्या अंधाऱ्या रात्रीत सोबत करत होता...एव्हाना कारमधील पेट्रोलदेखील संपत आले होते, त्यामुळे त्याच्या चिंतेत अजूनच भर पडली होती...काही अंतर पार केल्यानंतर त्याला रस्त्यालगत एक धाबा दिसला… त्याने कार थोडी बाजूला लावली व तो कारबाहेर आला. "भाऊ !! पुढे जवळपास कुठे पेट्रोलपंप आहे का??" सचिनने धाब्यावरील त्या व्यक्तीस विचारले. "हो !! इथून पुढे काही अंतर गेल्यावर तुम्हाला एक घाट लागेल, तो पार केलात की पुढे थोड्याच अंतरावर एक पेट्रोलपंप आहे." सचिनच्या प्रश्नाचे उत्तर देतच तो म्हणाला. "बर !! तरी साधारण किती वेळ लागेल तिथे पोहोचण्यास मला?" सचिनने पुन्हा विचारले. "तरी साधारण अर्धा तास तरी लागेल.. पण साहेब, काहीही झाले तरी गाडी रस्त्यात कुठेही थांबवू नका." सचिनला सावध करतच ती व्यक्ती म्हणाली… "का?? असे का म्हणताय तुम्ही??" सचिनने प्रतिप्रश्न केला. "अहो साहेब !! त्या घाटात चोरांचा खूप सुळसुळाट आहे...खूप लुटमारीचे प्रकार घडतात तिथे." ती व्यक्ती उदगारली...मार्गदर्शन करणाऱ्या त्या व्यक्तीचे आभार मानतच सचिन पुन्हा कारमध्ये येऊन बसला व कार सुरु करून पुन्हा मार्गक्रमण करू लागला…
साधारणत: 5 ते 10 मिनिटांनंतर घाटरस्ता सुरु झाला…एका बाजूस उंच डोंगर तर दुसऱ्या बाजूस खोल दरी असा तो घाट होता… वळणावळणाचे नागमोडी रस्ते सुरु झाले होते… कार चालवता चालवता सचिनची नजर चौकसपणे इतरत्रही फिरत होती, कारण धाब्यावरील त्या व्यक्तीने सांगितलेले सर्व त्याच्या ध्यानात होते… काहीच अंतर पार झाले असेल, त्याला काहीतरी जळल्यासारखा वास येऊ लागला… गाडी चालवता चालवताच त्याने आजूबाजूला नजर फिरवली, परंतु त्याला संशयास्पद असे काहीच दिसत नव्हते…
क्रमशः