झपाझप पावलं टाकत पोस्टमार्टम करणारे 'मारूतीराव' पोस्टमार्टम रूमच्या दिशेने चालू लागले. पोस्टमार्टमचा कित्येक वर्षाचा अनुभव हिच त्यांची ओळख होती. सावळा रंग आणी भक्कम बांधा. काळीभोर वाढलेली दाढी त्यात नैसर्गिक रागिट चेहरा जणु त्यांच्या कार्याला साजेसच होतं. एखाद्या प्रेताची अवस्था पोलिसांनाही पहावत नसेल तरी देखील अशी प्रेतं बिनदिक्कतपणे ते हाताळत. पावसाच्या पाण्याने कुजलेली वा अशी कुजलेलं शरिर खाणा-या हजारो पांढ-या रंगाच्या वळवळण-या आळ्यांनी बदबदलेल्या वा डीकंपोझ प्रेतांचही अगदी सहज पोस्टमार्टम करत. त्यांच्या या धाडसाच सरकारी दवाखान्यातील त्यांच्या सहकार्यमध्ये नेहमीच कौतुक व्हायचं. त्यांच्या या धाडसामुळेच दवाखान्यातील वरिष्ठ डॉक्टर 'सावंत' यांची मारुतीरावांवर विशेष मर्जी. चालता-चालता मारुतीरावांच्या डोक्यात काल रात्री डॉ सावंत साहेबांसोबत झालेलं बोलणं एकसारख घुमत होतं...
काल रात्री..
रात्रीचे साडेआकरा वाजून गेलेले आपल्या छोट्याशा बंगल्याच्या बाहेरील हॉल मध्ये मारुतीराव सोफ्यावर डोळे बंद करून निवांत पडलेले.. तोच समोर काचेच्या टीपॉयवर ठेवलेल्या फोनची रिंग झाली. भिंतीवरील घड्याळाकडे पहात त्यांनी फोन उचलला...
" हा, बोला सावंत साहेब..."
तसे पलिकडून सावंत म्हणाले.
"मारूती.. एक मुलगा आहे. त्याला कामावरून काढायचा आहे.. म्हणजे मला उलटसुलट बोलतोय.. म्हणून तुमच्याकड ड्युटी लावलीये..."
" साहेब नाव काय त्याचं.?"
" दिपक.? हा , दिपकच नाव आहे त्याच. गोरा ,सडपातळ पोरगा आहे."
" साहेब, तो 'दिपक' विझलाच म्हणुन समजा. कारण पोस्टमार्टम डिपार्टमेंटला काम करण येड्यागबाळ्याच काम नाही..."
" मारुती तुला एक गोष्ट विचारु..?"
सावंत साहेबांचा संकोचलेला आवाज मारुतीरावांनी अचूक हेरला.. मारुतीराव मात्र अगदी सहज बोलत म्हणाले..
"अहो साहेब संकोच कसला करताय.? विचारांना."
"मारुती , इतकी वर्ष तू पोस्टमार्टमच काम करतोयस.. पण तुझा भूत पिशाच्च असल्या गोष्टींवर विश्वास आहे का रे..?"
" भूत.? हा हा.. साहेब , या सगळ्या भाकडकथा आहेत.. आणि असल्या भाकडकथांवर मी विश्वास ठेवतच नाही.." आत्मविश्वासान उत्तर देत मारूती परत म्हणाले
"बरं ते जाऊदे, साहेब तुम्ही कधी येताय..?"
" अरे मी अजुन मुंबईतच आहे. उद्या संध्याकाळी कार न तिकड पोहोचेन. आठ तासांचा प्रवास त्यामुळ वेळ लागणारच. आणी हो मारूती, त्या मुलाची, म्हणजे दिपक ची एक खासियत आहे.."
" खासियत..? ती आणि कसली..?"
"आता जरा कामात आहे, उद्या तिकडं येतोय. मग भेटल्यावर बोलूच की."
एवढं बोलून डॉ. सावंतानी फोन कट केला..
काल रात्रीच डॉ. सावंतांच्या सोबतच हे बोलणं आठवलं तसं त्याच्या चेहऱ्यावर किंचित हास्य पसरल... आज सावंतसाहेबांनी पुन्हा एक कामगिरी त्याच्यावर सोपवली होती... नको असलेल्या कर्मचा-यांची ड्युटी मारूतीकडे पोस्टमार्टम विभागात लावायची, म्हणजे कामावरून कमी करायची गरज लागत नाही, स्वताच नोकरीचा राजीनामा देतात...
चालत चालत ते सरकारी दवाखान्याच्या मागे असणाऱ्या पोस्टमार्टम रूम जवळ पोहोचले. ती इमारत तशी फारच जुनी झालेली. आतून इमारतीची थोडीफार डागडुजी केली असली तरी बाहेरून मात्र रंग उडाल्यान, जीर्ण आणि भकास दिसत होती. म्हणजे पहाताक्षणी निराशेच्या गर्तेत सापडलेल्या एखाद्या वयोवृद्ध माणसासारखी. इमारतीला लागूनच एक उंच आणि ब-याच वर्षांपसून तग धरून उभ्या उंबराच्या झाडाखाली फिक्कट गुलाबी रंगाच्या उंबरांचा खच पडलेला. त्या झाडाखालीच मृतांच्या नातेवाईकांची नेहमीच गर्दी असायची, आजही होती.
पोस्टमार्टम रूमच्या उघड्या दरवाजातून ते आत येताच फिनोईलचा नेहमीचाच उग्र वास त्यांच्या नाकात शिरला. पोस्टमार्टम रूम असली तरी कमालीची स्वच्छता होती... जमिनीवर आणि भिंतीला साधारण पाच फूट उंचीपर्यंत पांढर्याशुभ्र फरश्या लावलेल्या.. पोस्टमार्टमसाठी तयार केलेला टेबल अशाच पांढऱ्या शुभ्र कशाने अच्छादलेला.. टेबलच्या अगदी वर छताला अडकवलेल्या पांढऱ्याशुभ्र बल्बचा प्रकाश टेबलावर सफेद कापडाने झाकलेल्या एका मृतदेहावर पडलेला.. तिथेच उजव्या बाजूला पंचवीशीतला एक तरुण उभा दिसल. अंगात गडद्द निळ्या रंगाचा शर्ट आणी काळी जिन्स चढवलेली.अंगाने काहीसा सडपातळच, गो-या चेहऱ्यावर कमालीचं तेज. एका बाजूला बसवलेले काळेभोर चमकणारे केस उजव्या हाताने नीट करत पोस्टमार्टमची खोली न्याहाळत होता. .
" नाव काय तुझं..?"
मारुतीरावांच्या करड्या आवाजाने एकदम भानावर आला...
" स, सर दिपक.."
मारुतीरावांनी ओळखलं. सावंत साहेबांनी पाठवलेला हाच तो 'दीवा'. तिरका कटाक्ष त्याच्याकडे टाकत मारुतीराव किंचित हसून म्हणाले.
" दिपक...? हम्म, पोस्टमार्टम पाहताना विझू नको म्हणजे झालं ,दीपक.."
मारूतीरावांनी पोस्ट मार्टमचा पोशाख अंगावर चढवून पोपटी रंगाचा प्लास्टिकचा कागद समोर नीट बांधला आणी पोस्टमार्टमच्या टेबलवर ठेवलेल्या प्रेताकड पहात दिपकला म्हणाले...
" भिती वाटत असेल तर आत्ताच सांग.. नाही म्हणजे बरेच जण इथे चक्कर येऊन पडलेत म्हणून म्हटलं."
आणी बोलतच त्या प्रेतावरच पांढरं कापड बाजूला केलं. प्रेताची अवस्था अगदी सहज पहात मारूती राव म्हणाले.
" पंचविशीतला तरूण दिसतोय. डोक्याचा चेंदामेंदा झालाय याचा अर्थ कोणीतरी डोक्यात मोठा दगड घालून त्याचा खून केला असणार."
प्रेताची अवस्था पाहून दिपकन झटकन डोळे बंद केले.
" इतक्यात घाबरलास.? डोकंच तर फुटलंय... पोस्टमार्टम करताना शरीरातील ते वेगवेगळे अवयव बाहेर काढावे लागतील तेव्हा काय करशील..?"
मारुतीरावांच बोलणं दिपकला काहीस लागलं.
थोडे धाडस करून दिपक त्या प्रेताकड पहात अगदी शांतपणे म्हणाला.
" याचा खून नाही झालेला.. ड्युटीवर जाताना गाडी स्लिप झाली असणार तेव्हाच एका अवजड वाहनांच चाक डोक्यावरून गेलय. त्यामुळ चेहराही ओळखु येत नाही."
" अरे वा धाडशी आहेस की.. प्रेत पाहूनच निष्कर्ष काढायला लागलास.?"
काहीच न बोलता दीपक शांतपणे सारं काही पाहत होता... मारुती रावांनी पोस्टमार्टम टेबल शेजारी ठेवलेल्या स्टेनलेस स्टीलच्या ट्रेमधून सर्जिकल ब्लेड उचललं आणि दिपक कडे पहात पुन्हा म्हणाले.
'' इतका का घाबरला आहेस...? पोस्टमार्टम याच करतोय.पण असं वाटतंय की कळ तुला येतेय.?"
तसा त्या प्रेताकड विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहत दिपक गंभीर आवाजात म्हणाला...
" याच्या शरीरातून बाहेर पडलेल्या याच्या आत्म्याला आपल्या शरीराच अस पोस्टमार्टम होताना पाहून काय वाटत असेल...?"
"याचा आत्मा.? कुठे आहे..? जरा मला पण दाखव." मारूतीरावांच्या या उपहासात्मक बोलण्यावर दिपक म्हणाला.
" पहायचाय..? आणी जरी मी तुम्हाला त्याचा आत्मा दाखवला तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल..? कारण या प्रेताचा तर चेहरादेखील ओळखता येत नाही, मग तुम्ही कसं ओळखाल की हा याचा आत्मा आहे..?"
दिपक च बोलण ऐकून मारूती रावांनी आपल्या भुवया उंचावल्या.. आणखी मस्करीच्या स्वरात म्हणाले.
" आत्मा...? हं. निव्वळ फाल्तुपणा, भाकडकथा आहेत या, आणी असल्या भाकडकथांवर आपला विश्वास नाही."
दीपक मात्र शांत आणि गंभीरपणे म्हणाला.
" भाकडकथा ..? माफ करा सर, पण जोवर आपण पहात नाही तोवर कोणीच त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही. आणि हो, आपला विश्वास असो वा नसो , त्यांना काहीच फरक पडत नाही."
दीपकच्या अस्वस्थ चेहऱ्याकडे ते म्हणाले.
" आपलं हे पोस्टमार्टम चं काम बघूनच ही भुतं-खेत घाबरतात आपल्याला..." मारुतीराव मोठ्या आत्मविश्वासान बोलत होते.
" घाबरायला त्यांना कसली आलीये भिती. जखमा, वेदना होण्यासाठी त्यांच्याकडे शरिर असतच कुठे..? ते बिनधास्तपणे कुठेही वावरू शकतात, अगदी तुमच्या समोरही ."
दिपकच्या या आव्हानात्मक बोलण्याचा मारुतीरावांना जरा रागच आला. झटकन त्यांनी हातातलं सर्जीकल ब्लेड टेबलवर ठेवलेल्या मृतदेहाच्या गळ्यावर ठेवलं आणि खस्सकन आत खुपसत पोटापर्यंत सर्रकन ओढलं तसा दिपकच्या चेहर्यावरील रंग उडाला. पण समोरच ते विदारक दृश्य तो विस्फारलेल्या डोळ्यांनी पहात होता.. दिपकच्या रंग उडालेल्या चेहऱ्याकड पहात मारूतीरावांनी पांढरे हातमोजे चढवलेले आपले हात त्या मृतदेहाच्या फाडलेल्या कातडीतून आत सारले आणी लालभडक रक्ताळलेल्या अवयवांचा लगदा बाहेर काढला.
" याच्या फुप्फुसांची अवस्था पाहीलस का ? दारू, सिगारेटचा परिणाम."
तिरकस नजरेनं दिपकच्या वरच्या खिशातून किंचित दिसणार सिगारेटच पाकीट पहात किंचित हसून म्हणाले..
" तुझ्या फुप्फुसाचीही अवस्था अशीच झाली असणार. लागलीच चेक करूया का.?."
ते काहीसे मस्करीच्या स्वरात म्हणाले. दिपक मात्र काहीच न बोलता अगदी शांतपणे सारं काही पहात होता. चराचरा त्या शरीराची चिरफाड करत मारुतीराव एक एक करत आवश्यक त्या सर्व अवयवांचे सॅम्पल घेत होते.. हातोड्याने त्यांनी डोक्याची कवटी एखादं झाकण उघडाव तशी वेगळी केली आणि दीपक कडे पाहिलं पण तो तसाच भावनाशून्य चेहऱ्याने त्या प्रेताकडे पहात होता. त्याचा अशा चेहऱ्याकडे पाहत मारुतराव मनातच म्हणाले
'मुलगा जरा धाडशीच दिसतोय'.
आणि चिरफाड केलेल्या शरिराला नीट करत पुन्हा व्यवस्थित टाके घातले..
" पुढच्या डेडबॉडीच पोस्ट मार्टम मीच करेन... आज तू फक्त पहायचं काम कर."
दिपक कडे पहात म्हणाले आणि पोस्टमार्टम केलेली डेडबॉडी कव्हर करून जमिनीवर ठेवली... तसं बाजुला ठेवलेल्या दुसऱ्या डेडबॉडीवर लक्ष गेलं.... पांढऱ्या कापडान झाकलेल ते प्रेत काही वेळा पुर्वीच आलेल...
प्रेताशेजारी असलेल्या पॅडवर मृताच नाव लिहिलेल. ते पाहून मारूती रावांनी आपल्या भुवया किंचित आकसून दिपक कड पाहील. पण तो तसाच काहीसा निर्भिडपणे उभा होता.. आता तो खरच निर्भिड होता की निर्भिडपणाचा आव आणत होता हे मात्र त्यांना समजत नव्हतं. म्हणजे काही लोकांचं असतं, आतुन कितीही घाबरलेले असले तरी ती भीती चेहऱ्यावर आणत नाहीत. मारूती रावांनी पॅडवर लिहिलेली माहिती वाचून प्रेताच्या तोंडावरच पांढर कापड अलगदपणे बाजुला केल त्यासरशी त्यांच्या हातातल ते पॅड निसटून टेबलवर पडलं. मघापासून एका विलक्षण आत्मविश्वासखाली वावरणाऱ्या मारुतीरावांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. झटकन ते टेबलपासून बाजूला झाले. एक विलक्षण भीती जणु त्यांच्या डोक्यात घुसली होती.. त्यांची अशी अवस्था पाहून दिपक हळुवारपणे चालत त्यांच्या शेजारी आला.. पोस्टमार्टम टेबलवर ठेवलेल्या त्या मृतदेहावर नजर टाकत म्हणाला.
" घाबरलात..? "
मारुतीरावांचा स्वताच्या डोळ्यांवर विश्वास बसेनासा झालेला. भयभीत नजरेन ते समोरचा तो मृतदेह पहात होते. त्यांच्या खांद्यावर हात ठेवत दिपक शांतपणे म्हणाला..
" भुतं, आत्मा यांच एक वेगळं जग आहे.. आता तुमच्या सारखे लोक भाकडकथा समजून अशा अदृश्य शक्तींच अस्तित्वच नाकारतात. पण कोणाच्या नाकारल्याने त्यांच अस्तित्व संपत नाही.."
मारुतीराव एका जबर मानसिक धक्यामुळ अगदी स्तब्धच झालेले.
' म्हणजे आपण स्वप्न तर पहात नाही ना..? नाही , हे तर सत्य आहे.'
त्यांची मती गुंग झालेली... झटकन त्यांनी आपली मान पाठीमागे काही वेळापूर्वी पोस्टमार्टम करून ठेवलेल्या मृतदेहाकडे कडे वळवली... आणि पाहतच राहिले.. सार काही त्यांच्या कल्पनाशक्ती पलीकडचं होतं... मारुती रावांची ही अवस्था पाहून दिपकच्या चेहर्यावर मात्र एक विलक्षण हास्य पसरलेलं... त्यांच्या रंग उडालेल्या चेहऱ्याकडे पाहत दिपक म्हणाला...
" तुमचा चेहरा सांगतोय, आपल्या संपूर्ण आयुष्यात तुम्ही पहिल्यांदाच अशा गोष्टीचा सामना करताय."
तोच दरवाजा उघडून सिनियर डॉक्टर सावंत आणी त्यांचे सहकारी शिंदे झपाझप पावलं टाकत आत आले. आणी टेबलवरचा तो मृतदेह पहात म्हणाले.
" हे अचानक कस झालं.?"
तसे शिंदे म्हणाले.
"रात्री झोपेतच हृदयविकाराचा झटका आला. रात्री झोपले ते उठलेच नाहीत."
" आणि असा अचानक मृत्यू झालेल्या माणसाचा आत्मा हे मान्य करायला तयार होत नाही की त्याच शरीर आता संपलय.तो आत्मा मात्र आपलं दैनंदिन काम करतच रहातो."
दिपकच्या आवजान दोघांचेही लक्ष वेधून घेतलं.
"अरे हो शिंदे.. हा दिपक. आजपासून रूजु झालाय. आणि या मुलाची एक खासियत आहे म्हणे. म्हणजे हा मृत आत्म्यांशी संवाद साधु शकतो." डॉ.सावंतांच तोंडून बाहेर पडलेले वाक्य ऐकून शिंदे उपहासान म्हणाले.
" म्हणजे आपल्या मारूतीच्या डेडबॉडीसोबत त्याचा आत्माही इकडं आला असेल की काम करायला..."
मस्करीच्या स्वरात डॉ.सावंत म्हणाले,
" विचारा यालाच, माझा तर भुतं आत्मा असल्या भाकडकथांवर विश्वास नाही. आणि शिंदे, टेबलवर ठेवलेल्या दोन्ही डेड बॉडींच पोस्टमार्टम करून घ्या."
तसं दिपकन स्ट्रेचरवर ठेवलेल्या मारूतीरावांच्या मृतदेहाच्या चेहऱ्यावर कापड सरकवून चेहरा नीट झाकला आणि डॉ. सावंतांच्या बाजूला असलेल्या किंचित उघड्या खिडकीवर आपली नजर स्थिरावत थोडं हसून म्हणाला...
" मारूतीरावांचा तर कुठे असल्या भाकडकथांवर विश्वास होता.?''
त्याच्या तोंडून बाहेर पडलेले हे शब्द ऐकून डॉ सावंत मात्र सुन्न झाले... दिपकची नजर स्थिरावलेल्या आपल्या बाजूला असलेल्या खिडकीवर त्यांनी आपली नजर टाकली तसा थंड हवेचा एक झोका त्या खिडकीतून बाहेर झेपावला...
समाप्त.....