मुक्ती- मुक्ताची
🔖 भाग ::-- तिसरा
रात्री जेवणानंतर केदारनं आज ही चित्र काढायला घेतलंच. कारण विहीरीच्या तळाशी दिसलेला माणूस व तीन दिवसांपासून मुसळ धरलेला, फेटा घातलेला माणूस एकच असावा ही पक्की खात्री करण्यासाठी व नेमका काय गुंता आहे याच्या तळाशी त्याला पोहोचायचं होतं. मुक्ता, काव्या ,विका कोण? आपली काव्या इथं कशी ? इथं तर मग कुठं? सारा सारा गुंता!
नदीकाठ ,कातळ कडा, कपारी, शिवालय, कळशी भरून परतणारी तरुणी चितारता चितारताच त्याला झोप लागली. गाढ झोप....
सकाळी उठला. आज मात्र निलेशही त्या सोबतच उठला. उठताच त्यानं चित्र पाहिलं.
कुणीतरी खाटेवर झोपलेल्या माणसास शाॅक देतंय. तो माणूस आकांत करत असावा असलेच काळजाचा थरकाप उडवणारे भाव. जो शाॅक देतोय तो कोण? अरे हा तर नृसिंह...! नृसिंह अवतार काय संबंध! पौराणिक पात्र....तसलेच पौराणिक कपडे व वर सिंहाचा मुखवटा? नृसिंह शाॅक देतोय म्हणजे गहजब! नी नंतर उचलून विहीरीत टाकतानाचं चित्र. त्याच चित्रात विहीरीच्या तळाशी निद्रीस्त तोच चेहरा जो केदारनं काल विहीरीत पाहिला होता! मुसळ धरलेला माणुस! केदारनं सर्व़ चित्रं आवरली तोच मागून निलेशनं उठत हातातून चित्रे घेतली. केदारला ती द्यावीशी वाटत नव्हती. पण तो पावेतो निलेशनं ती घेत पहावयास सुरुवात केली व तो सकाळी सकाळीच घामाघूम झाला. आजपर्यंत केदारनं काढलेली किती तरी चित्रे त्यानं पाहिली होती व भान हरपल्यागत पाहतच राहत असे.पण ही तर थरकाप उडवणारी! डोकाच्या दोन कापा झालेलं धड.......! बापरे! चेहरा ठेचलेली स्त्री! शाॅक लागून तडफडत असणारा माणूस! नी त्याला उचलून विहीरीत टाकणारा - शाॅक देणारा ..हा कोण! सिंहाचा तोंड असलेला... नृसिंह? काय अजब प्रकार आहे हा?
"केदार हे काय चितारलंय? चांगलं काही तरी चितारायचं सोडून? " निलेशनं भयभीत होत केदारला विचारलं.
" निलेश काही नाही , सहज रेखाटली!" म्हणत त्यानं ती घेतली व सामान ठेवलेल्या कागदात उलटी ठेवून ते निघाले.
"अरे नैसर्गिक चितारायचं सोडून असलं अभद्र नको चितारू!" तो बोलला पण त्याच्या डोळ्यासमोरून ती चित्रे हलतच नव्हती. शाॅक लागलेल्या माणसाचा फोटो आपण कुठं तरी पाहिलाय? कुठं? हे त्याला आठवेना.वरणगावला का? तो ताण देऊ लागला! नाही! हल्ली हल्लीच कुठं तरी पाहिलाय! तो खूप प्रयत्न करू लागला पण कुठं पाहिला हे आठवेच ना.
केदारही दात घासतांना, अंघोळ करतांना तोच विचार करत होता. मुसळ... डोक्याच्या दोन खापा, स्त्रीचा चेहरा त्याच मुसळीनं चेचला असावा का? 'ही तर माझी मुक्ता! नाही ही तर काव्या!' हे वाक्ये. म्हणजे स्त्री एक तर काव्या वा मुक्ता नावाची असावी? आपल्या काव्याचा इकडे काय संबंध? तिचं लग्न तर झालं इतकंच आपल्याला माहीत.तिचं गाव कोणतं? तिचा नवरा कोण? हे आपणास तर ठाऊकच नाही! मग काव्या ही असू शकते? त्याला घाम फुटला. नाही .काव्या नावाच्या भरपूर मुली असतात! असेल कुणी काव्या!पण काव्या मुक्ता...पैंकी एक.. मुसळ वाल्या या माणसानंच यांना ठेचलं असावं का? ठेचलं तर का? मग त्याला कोण शाॅक देतंय? नृसिंह? या युगात नृसिंह कसा येईल? का कुणी नृसिंह चा मुखवटा घालून? पण मग तो कोण?....कोण? नी हे सारं आपल्यालाच का दिसतंय? आपल्या चित्रात कोण चितारतंय हे सारं? गुंता, गुंता, गुंता!
मनाच्या या गुंत्यातच राधा वहिणीनं दिलेला चहा घेतला, नाश्ता घेतला व ते शाळेकडे आले. शाळा तर उठून खुलून दिसत होती. शाळेत येताच शिपायानं 'सरपंच व ग्रामसेवक अप्पा आले होते. तुमची वाट पाहिली व निघून गेले. काकड सर ही सोबत गेलेत व तुम्हां दोघांना सरपंचाच्या घरीच बोलवलंय!' निरोप दिला.
मराठी शाळा व आरोग्य केंद्र रंगवण्यासाठी पैसा ग्रामपंचायत देणार होती.त्या संदर्भात वा साहित्य खरेदीबाबत बोलावलं असावं म्हणून निलेशनं केदारला घेत सरपंच विक्रांत बापूचं घर गाठलं.
तीच हवेली जिथं पहिल्या दिवशी विधवा बाई कापुस टाकत होती व बाजूच्या घरात रेडीओवर " हमसे तुम्हारा वादा है....!" हे गाणं वाजत होतं. केदारला प्रसन्नता जाणवली. केदार व निलेशनं हवेलीत प्रवेश केला. सहा येली भव्य फडताळाचा ओटा. कोपऱ्यात वरच्या मजल्यावर जाण्यासाठी लाकडी जिना. काकडे सरांजवळ दोन व्यक्ती बसलेल्या.
सरपंच विक्रांत बापू व ग्रामसेवक असल्याचं बोलण्यावरून लगेच केदारनं ओळखलं.
घरात चहा ठेवण्यास सांगत सरपंचानं बोलण्यास सुरुवात केली.
पेंटर बाबत चौकशी करून " पेंटर शाळा, आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, गावातील घराघराच्या भिंतीवर शालेय अभ्यासक्रम रंगवा . रंगविण्याचा जो काही खर्च येईल तो ग्रामपंचायत करेल "ते सांगत होते.
घरातून चहा आला. चहा पिता पिता केदार व निलेशचं लक्ष समोर बसलेल्या सरपंचाच्या पाठीमागील भिंतीवर गेलं. सरपंच बसल्याच्या वरच्या बाजुला टांगलेल्या तसबिरीकडं पाहताच दोघे ही उडाले. चहा खाली उतरेच ना.
निलेशला एकदम खटकी पडली. चित्रातला शाॅक बसलेला माणूस हाच तसबिरीतला. आपण या गावात आलो तेव्हा काकडे सरांनी ओळखसाठी सरपंचाकडं आणलं होतं तेव्हा आपण हा पाहिला होता व सकाळी चित्र पाहतांना आठवतच नव्हतं कुठंतरी पाहिलंय एवढंच.
केदार तर भांबावलाच. हाच हाच माणूस! कप ठेवतांना त्यानं विचारलंच.
" हे कोण?"
सरपंच तसबिरीकडं पाहत " पेंटर आमचे भाऊ मुरार आबा! चार महिन्यांपूर्वीच रात्री भुईमुगाला पाणी देण्यासाठी गेले व शाॅक लागून मळ्यातल्या विहीरीत पडले!"
केदारला काही उलगडा होऊ लागला. पण त्यानं मौन पाळलं. सरपंचानं ओल्या होऊ पाहणाऱ्या डोळ्याच्या कडा पुसल्या. पण पेंटरकडं ते कुणाच्या लक्षात येणार नाही असं पाहू लागले. मनात दात ओठ खात ते पेंटरच्या चेहऱ्यावरील भाव टिपत होते.
" बापूसाहेब....." निलेश काही तरी बोलणार तोच केदारनं त्याचा हात धरत खुणेनं शांत केलं.आता या घडीला काही सांगणं धोक्याचं व आपल्या चित्रावर कोण विश्वास करेल? म्हणून केदारनं कुणाला कळणार नाही या बेतानं निलेशला मना केलं.
तोच वरच्या मजल्यावरून जिन्यावरून डोक्यावर पाटी घेत बाई उतरू लागली. पांढरी साडी.केदारचं लक्ष गेलं. चेहरा दिसला नी जागेवर खाडकन उभा राहत समोर कोण आहेत हे सारं विसरत तो तिच्याकडं जात " काव्या...! तू..! इकडं... कशी..?" विचारता झाला. अचानक झाल्या प्रकारानं ती स्त्री थरथरली व तिचं लक्ष विक्रांतरावाकडं गेलं. विक्रांतरावांची नजर आग ओकू लागली. समोर आपणास काव्या म्हणणारा अनोळखी माणूस व आग ओकणारी नजर डोक्यावरची- पाटी सुटली व ती बाई थरथरतच घरात गेली. काकड सरांनी केदारला मागे आणलं व खुर्चीवर बसवलं. काकडे सर घाबरले.आता विक्रांतराव काय पवित्रा घेतील?
"पेंटर, कोण काव्या? त्या काव्या नाहीत, आमच्या मुरार आबाच्या पत्नी मुक्ताबाई आहेत!"
" सरपंच साहेब, माझ्यासोबत जळगावची ही काव्या औरंगाबादला शिकायला होती! तीच ही.हवं तर तिला एक वेळा विचारा! माझी नजर धोखा नाही खाणार!"
" पेंटर ! सांगितलं ना! या मुक्ताबाई आहेत! काकडे समजवा यांना!" सरपंचाचा स्वर किंचीत चढला.
" केदार राव तुमची गफलत होत असावी काहीतरी! आम्ही ओळखतो या मुक्ताबाई आहेत.चला"
निलेश ,केदारला घेत काकडे सर शाळेकडे निघाले.
सरपंचानं ग्रामसेवकासही जाण्याचा इशारा केला व ते घरात जात आई मुक्ता व पत्नीवर कडाडले. मुक्ता कोपऱ्यात उभी थरथर कापू लागली.
" आई समजव हिला, जर कुणी माणसं असतांना बाहेर ओट्यावर आली तर तंगडं मोडीनं!"
आवाजानं मुक्ता रडतच धनाभाभूच्या(सासू) मागं दडली.
" बाप्या ती वर होती, तुम्ही येऊन ओट्यावर बसले नी वरच अडकली. किती वेळ बसणार म्हणून उतरली. पण कोण होता तो? काव्या म्हणणारा? हे काव्याचं प्रकरण काय मिटत नाही बाबा!" धनाभाभू काकुळतीनं म्हणाली.विक्रांत दात ओठ खात बाहेर पडला.
शाळेत पोहोचताच काकडे सरांनी केदार व निलेशला समजावलं.
" केदारराव कामाशी काम ठेवा व या गावातून लवकर निघा! कारण चार महिन्यापूर्वीच इथं महाभारत घडलंय ते अजुन निस्तरत नाही तो वर तुम्ही आणखी उकरताहेत. कृपा करून काव्याबाबत काहीच बोलू नका!" काकड सर समजावणीच्या सुरात बोलले व कार्यालयात निघून गेले.
" केदार सकाळी फोटो दाखवले त्यातला माणूस व तसबिरीत असलेला सरपंचाचा भाऊ एकच. त्याला तर तू आधी कधीच पाहिलं नव्हतंस; मग चितारलं कसं?" बुचकळ्यात पडलेल्या निलेशनं केदारला सवाल केला.
" निलेश तुझ्या सवालापेक्षा या घडीला काव्या कोण हे महत्वाचं आहे मित्रा! कारण सरपंचाच्या घरी काव्यासारख्याच दिसणाऱ्या मुरार आबाच्या मुक्ताबाई सुरक्षित आहेत तर मग काव्या कोण?" केदार बोलला पण निलेशला काहीच कळेना.
तिकडे दुर्लक्ष करत केदार खोलीत चित्रे धुंडू लागला. सकाळी कागदात ठेवून तो अंघोळीला गेला होता.त्यावेळेस निलेशनं खोलीला कुलूप लावलंच नव्हतं. त्याला चित्रे सापडेनात.
" निलेश ,सकाळी तू पाहिली ती चित्रे गायब झालीत .शोध!"
निलेश झामलू लागला पण मिळालीच नाहीत. निलेशनं शिपायाला व रंगकाम संपवून आरोग्य केंद्राचं रंगकाम करण्यासाठी निघालेल्या माणसांना ही बोलवत सकाळ पासून या खोलीत कोण कोण आले व कोणी चित्रे वा कागद घेतली का विचारलं. पण आता तर मुलांची ही शाळेत गर्दी व्हायला लागली होती. कुणालाच माहीत नाही. चित्रे एकाएकी गायब. केदार समजला. चित्रे पाहून मुलं घेणारच नाहीत. या घटनाक्रमाशी संबंधीत इथंच कुणीतरी आहे व त्यानंच चित्रे लंपास केली. त्याला अंघोळ करून परतल्यावर शिपायानं दिलेला निरोप आठवला. सरपंच व ग्रामसेवक येऊन गेल्याचा. त्यानं शिपायास विश्वासात घेत ते या खोलीत आले होते का हे अप्रत्यक्षपणे विचारले. पण शिपायानं नकार दिला. तरी केदारला समोरचा सरपंचाचा मळा, मुरार भाऊ, मुक्ता भावाची पत्नी....यातच काहीतरी दडलंय याची पुसटशी जाणीव झाली. शाॅक देणाराच या साऱ्या घटनाक्रमाचा सुत्रदार असावा? पण तो तर नृसिंह! मग कोण तो? आणि डोक्याच्या खापा झालेल्या धडाच्या तोंडून ' काव्याचा' उल्लेख ? ही काव्या कोण? आपल्या काव्यासारखीच दिसणारी मुक्ता कोण? काकड सर महाभारत घडल्याचं सांगताय ते काय?
केदार उठला. कार्यालयात जाऊन काकड सरांना हात जोडत
" सर प्लिज काय घडलं एवढंच ऐकायचंय मला!"
" केदारराव का या भानगडीत पडत आहात? तुमचा काहीच संबंध नसतांना?"
" सर तेच! माझा संबंध नसतांना चार दिवसात हे भास, आभास, रेखाटन यात काही तरी जाणवतंय मला, जे आपणास काहीच ठाऊक नाही. म्हणून काय महाभारत घडलं तेवढं सांगा मग मी काम आटोपतं व सरळ गावाकडं निघतो!"
" केदारराव, आधी तसबिरीतल्या मुरारला तुम्ही कसं ओळखता?मुक्ताबाईस काव्या म्हणून हाक मारली ती काव्या कोण? हे सांगा मग मी सविस्तर सांगतो!" काकडसर म्हणाले.
" सर , जिला आपण मुक्ताबाई सांगताय ती कोण मला माहीत नाही पण तिच्यासारखीच दिसणारी काव्या किंबहूना तीच माझी जळगावची मैत्रिण होती. पण तसबिरीतल्या मुरारला मी ओळखत नाही . मात्र चार दिवसांपासून .......ते ही सांगितलं असतं पण ती चित्रेच गायब झाली... म्हणून महाभारत काय घडलंय ते सांगा आधी"
" केदारराव चार महिन्यापूर्वी समोरच्या मळ्यातल्या विहीरीत शाॅक लागून मुरार गेला. त्या गोष्टीला पंधरा दिवस होत नाही तोच आरोग्य केद्रात डाॅक्टर म्हणून नविनच आलेले व रजेवर गेलेले डाॅक्टर व त्यांची पत्नी काव्या गायब झाली. काव्याला कुणीच पाहिलं नव्हतं ज्या ठराविक लोकांनी पाहिलंय ते आताशी बोलायला लागलेत की ती मुक्ताबाई सारखीच दिसायची. ते दोघे गायब झाले ते आजपर्यंत सापडले नाहीत.या उपर मला काही माहीत नाही. पण वडिलकीच्या नात्यानं सांगतो. परक्या ठिकाणी नाक खुपसू नका!" काकड सर एका दमात बोलले.
डाॅक्टर व त्याची पत्नी काव्या हे गायब म्हणजे चित्रातली चेहरा ठेचलेले ते तर नसावेत? पण मुरारशी त्यांचा संबंध काय? वैर काय? काव्या कोण? आपण मुक्ता पाहिली चेहरा सारखाच म्हणजे आपली काव्याच का? पण चित्रात तर चेहरा नाही. केदारनं लवकरच जळगावला जात काव्याच्या वडिलांची भेट घ्यायचं ठरवलं. त्यानं दुपारून आरोग्य केंद्राचं काम सुरू केलं.
पण जाण्या आधीच दुपारनंतर आरोग्य केद्रात पोलीस गाडी आली. गाडीतून पोलीस सोबत एक म्हातारी व जो माणूस उतरला त्याला पाहताच केदारचा ब्रश थांबला. 'विश्वासराव' काव्याचे वडील! तो त्यांना भेटण्यासाठी पुढे सरकणार तोच तेच त्याच्या समोर येत तो रंगवत असलेल्या डाॅक्टराच्या कॅबीनमध्ये आले. पोलीसांनी आलेल्या कोतवालास विक्रांत ढेरे, मुक्ता ढेरे यांना बोलवायला पाठवलं व ते बसले. केदारनं तूर्तास चेहरा फिरवत आपलं रंगवणं सुरू ठेवलं. विश्वासरावांना भेटण्याचं त्यानं मुद्दाम थोळा वेळ टाळलंच. विश्वासराव त्याच्याकडं पाठ करून खुर्चीवर खाली मान घालून दु:खानं बसलेले.
केदारनं चेहऱ्यास रूमाल गुंडाळला व मग्न झाल्यागत चित्र काढत रंगवू लागला.कान मात्र तिकडेच.
विक्रांत सरपंच आला.सोबत त्याच्या पत्नीसोबत मुक्ता ही खाली मान घालून आली.
" विक्रांतराव हे विश्वासराव ! डाॅक्टर केतनचे सासरे! ओळखताच आपण!" इन्स्पेक्टर ओळख करण्यापेक्षा सुरवात करण्यासाठी बोलले.
" साहेब माझा पहाडासारखा भाऊ गेलाय! नी आपण ओळख करून देण्यासाठी मला बोलवलं असतं ते ठिक पण माझ्या दु:खात बुडालेल्या भावजईसही बोलवता हे योग्य नाही!"
" विक्रांतराव तुमच्याच घरी येणार होतो पण बऱ्याच गोष्टी इथंच होत्या म्हणून बोलवलंय! राहिला प्रश्न मुक्ताबाईस बोलावण्याचा तर चौकशी साठी त्यांचं येणं गरजेचं होतं!"
" ठिक आहे ,विचारा!"
" विक्रातराव आपण थोडा वेळ राणे सोबत समोरच्या खोलीत जा.ते विचारतील तेवढं सांगा!"
विक्रम गेला पण मुक्ता काय बरळेल म्हणून धाकधूक होतीच.
" मुक्ताबाई ,बसा! निसंकोच बसा! काही नाही दोन तीन गोष्टी आहेत तेवढंच मग लगेच निघा! कारण मुराररावाचं तुम्हास जेवढं दु:ख झालंय तेवढंच दु:ख या एका बापास चार महिन्यांपासून मुलगी बेपत्ता म्हणून झालंय तर एका आईला मुलगा बेपत्ता म्हणून! निदान त्याच्यासाठी थोडा वेळ थांबा!" इन्सपेक्टर मुक्ताबाईस धीर देत विश्वासात घेऊ लागला.
विश्वासराव घुंगट ओढलेल्या तरूणीस पाहत होते.पण चेहरा दिसत नव्हता.
" मुक्ताबाई समोर बसलेल्या माणसाकडं पहा! यांना आपण ओळखता का?" विश्वासरावाकडं बोट करत विचारलं
मुक्ता बसल्या जागी थरथरली.तिनं हळूच नजर वर केली व समोर बसलेल्या माणसाकडं क्षणभर पाहीलं व नकारार्थी मान हलवली. पण विश्वासरावांनी तिच्या चेहऱ्याकडं पाहताच हंबरडा फोडत
"काव्या! काव्या!" म्हणत तिला बिलगण्यास उठले. मुक्ता आजच दुसऱ्यांदा झाल्या प्रकारानं बिथरली व रडू लागली.
इन्स्पेक्टर सुर्वे उठले व विश्वासरावांना धीर देत बसवू लागले.
" साहेब हीच माझी काव्या आहे हो!"
मुक्ता दूर सरकू लागली.
" विश्वासराव याच तुमच्या काव्या असत्या तर आम्हालाही आनंद झाला असता.पण या जर तुमच्या काव्या असत्या तर त्यांनी ओळखलं असतं ना! या मुक्ताबाई आहेत."
" पोरी बापास नाही ओळखत तू?" विश्वासराव आशेनं पाहत रडतच विचारू लागले.
' बाप' हा शब्द ऐकला नी मुक्ता पाझरली. बापाच्या रूपात तिला बनाबापू आठवले. ती रडू लागली.
" मुक्ताबाई तुमचं माहेर कुठलं नी बापाचं नाव?
" चांदवड. बाप बना जावळे." मुक्ता रडत बोलली.
" मुक्ताबाई आठवून सांगा यांना कधी तरी पाहिलंय का? "
पुन्हा नकारार्थी मान येताच इन्स्पेक्टर नं त्यांना जायला लावलं.
" विश्वासराव तुमची काव्या व या मुक्ताबाई जुडवा असाव्यात इतपत साम्य.तुम्हास मुली किती?"
" साहेब, काव्या ही एकच!"
" नक्की का? दुसरं घरं...?"
विश्वासराव थरथरले, हादरले, चाचरले..पण क्षणभरच...लगेच त्यांनी नकार दिला. काव्यासारख्या दिसणाऱ्या पोरीनं 'बना जावळे' हे नाव बोलताच विश्वासराव वीस पंचवीस वर्षे मागे जाऊ पहात होते पण ही वेळ ती नव्हती.
सुर्वे उठले व राणे, विक्रांतकडे गेले.
ते उठताच केदार विश्वासरावासमोर चेहऱ्यावरील रुमाल सोडत आला.
" केदार! तू इथं कसा?"
" मित्र या गावात हायस्कुलात लागलाय! त्यासोबत रंगकामासाठी आलोय.पण काव्या?"
काव्याचं विचारताच विश्वासराव गदगदले व लहान पोरासारखे केदारला बिलगत रडू लागले!
" केदार निदान पोरीचं ऐकलं असतं नी तुमचं....! पण मती फिरली होती माझी! याच हातानं बदळत तिला केतन डाॅक्टर सोबत लग्नास तयार केलं. लग्न होताच तिला वेडच लागलं. तरी काहीच म्हणनं नव्हतं रे ! पण चार महिन्यांपासून दोन्ही जण कुठं लापता झाले कळतच नाही. शोध शोध शोधतोय! पोलीस शोधताय पण!" नी ते रडायला लागले.पण केदारभोवती अख्खं आरोग्य केंद्र, नदीकाठ, शिवालय, कातळकडा, भावेर फिरू लागलं. तो वावटळीत गरगर फिरत वरवर जाऊ लागला. " हमसे तुम्हारा वादा है हमदम..!" गावात प्रवेश करतांनाचं रेडिओवरील गाणं आठवलं व तो वावटळीत फिरत खाली कोसळला. विश्वासराव त्याला आधार देत उठवू लागले. चित्रातली ठेचलेले दोघे हेच तर नसावेत? तो 'माझी काव्या' बोलत होता. पण त्या सर्वस्व लुटल्या गेल्या क्षणीही त्यानं मौन पाळलं. गुंता पूर्ण सुटलेला नाही अजुन! गाण्यावेळीच विधवा मुक्ताचं दिसणं? काही तरी आहे? या घडीला काव्याच्या बापास सांगणं त्यानं टाळलं.व मनोमन प्रार्थना केली देव करो नी चित्रातली काव्या दुसरी निघो! माझी काव्या गायब का असेना पण जिवंत असो! भले तिच्या संसारात सुखी असो!
सुर्वेनं खुणेनं राणेला विचारलं पण विक्रांत काहीच उगाळला नसल्याचं राणेनं इशारत केली.
" विक्रांतराव! तुमचा बंधू मुरार शाॅक लागून गेला असं समजू...."
" समजू म्हणजे? याचा अर्थ काय?" सुर्वेला मध्येच थांबवत विक्रांत कडाडला.
" विक्रांतराव मागचे भोसले इन्स्पेक्टर समजत होते ते शाॅक लागून गेले म्हणून आम्ही पण तसंच समजावं हे सोडा!" सुर्वे पोलीशी खाक्या दाखवत म्हणाले.
" मग तुमचं म्हणनं काय?"
" कदाचित त्यांना शाॅक देऊन विहीरीतही टाकलं नसावं कुणी सांगावं!"
" मग चार महिन्यांपासून तुम्ही काय ........मारत आहात? शोधा ना! "विक्रांत संतापला.
" विक्रांतराव आम्ही काय मारत होतो हे समजेलच! त्या भोसलेनं डाॅक्टर केतनची मिसींग केस व मुरारची केस अलग अलग अॅंगलने का हाताळली हेच मला कळत नाही! का कुणी तरी त्यांचे हात ओले केले असावेत? "
" त्यांनाच विचारा!"
" ते या घडीला महत्वाचं नाही. नाही की मुराररावांना शाॅक लावून कुणी मारलं हे! कारण तुमचीच काही तक्रार नाही तर मग आम्ही ही खोलात शिरणार नाही विक्रांतराव! पण ज्या दिवशी मुरार गेला त्याच दिवसापासून केतन पंधरा दिवस रजा टाकून गेला. भले मिसींग केस पंधरा दिवसानंतर दाखल असेल.शिवाय काव्या व मुक्ताबाई सारख्या असणं यात काही तरी नक्कीच आहे!"
आता मात्र विक्रांत नरम पडला. सुर्वे त्याच्या नरम पडलेल्या चेहऱ्याकडं पाहू लागले.
" विक्रांतराव ,तुमचा हा भाऊ मनोरुग्ण होता ना? नी घटनेच्या दोन दिवस आधीच ठाण्याहून चार महिने उपचार घेऊन परतला होता?"
" होय.पण त्याचा याच्याशी काय संबंध?".
" हो ते ही खरच! काय संबंध त्याचा! केतन व काव्याची बाॅडी मिळत नाही तो पावेतो याचा संबंधच नाही. पण काहो चार महिने वेड्याच्या इस्पितळात उपचार घेऊन भाऊ परततो नी दुसऱ्या दिवशी मुक्ताबाई माहेरातून परत येतात.चार महिन्यानंतर दोन्ही भेटणार होते.तरी त्याच रात्री तुम्ही शेतात पाणी भरायला त्यालाच का पाठवता? तुम्ही का नाही गेले?"
" साहेब मी नाही पाठवलं .तोच न सांगता गेला मळ्यात!"
" मग तुम्ही त्या रात्री कुठं होता!"
" गावात लळीत
(दशावतारी नाटक) होतं व त्यात रामाचं सोंग (पात्र) घेतलं होतं मी ! त्या कार्यक्रमात होतो"
" तुम्ही स्वत: सरपंच गावचे! नी लळितात भाग!"
" विश्वास नसेल तर गावातील कुणासही विचारू शकता! नी सरपंच काय आज आहे उद्या नाही. पण गावच्या परंपरा वर्षानुवर्षे चालत आलेल्या. त्यात सारेच भाग घेतात!"
" आता कसं बरोबर बोललात तुम्ही! गावात लळित.मग मुरार का थांबला नाही त्या रात्री. गावची परंपरा सोडून थेट मळ्यात काय जातो नी .."
विक्रांत शांत झाला.
" बोला विक्रांतराव. कारण तुम्ही जरी बोलले नाही पण मुराररावांची पत्नी मुक्ताबाई बोलायचं कशा थांबतील? त्यांनीच जर नवरा अपघातात नव्हे तर घातपातात गेला असं..."
" साहेब मुक्ता बोलली का?"
" घाबरू नका.आज बोलल्या किंवा नाही ते आम्ही नाही सांगणार.पण भविष्य अवघड आहे!"
नंतर बराच वेळ सुर्वे विक्रांत ची चौकशी करत राहिले. सुर्वेनं राणेस आरोग्य केंद्रातील लोकांची नवीन चौकशी करायला पिटाळलं व ते विक्रांतच्या हवेलीवर गेले. मग मात्र सुर्वे विक्रांतरावाच्या खांद्यावर हात टाकत धीर देऊ लागले.
गाडी परत गेली.
विक्रांत वरच्या मजल्यावर गेला. त्यानं पत्नीस बोलवत मुक्तास आणावयास लावलं.
" बोल ,काय बरळली पोलीसांना!" पहिलाच तडाका.
मुक्ता थरथरत सुमनबाईच्या मागे लपत विनवू लागली.
" विक्रांत संतापात उठला व झिंज्या धरत एक लाथ घातली. असहाय हरणी वाघाच्या तावडीत सापडावी तीच गत मुक्ताची.
" बोल?"
मुक्ता नं रडत रडत पोलीसांनी जे विचारलं ते सारं खरंखरं एका दमात ओकलं.
त्याची खात्री पटली.
" याद राख आधी जे सांगितलंय तेच सांगायचं !"
सुमनबाईनं तिला खाली नेलं.
सुर्वे केवळ पैशासाठी दम भरत होता हे विक्रांतनं ओळखलं. आज तर आपण त्याला कटवलं. पण भोसलेनं ऐकलं, सुर्वेनं ऐकलं पुढे कोणी न ऐकणारा आला तर? मुक्ताला माहित नाहीच काही पण तरी ती उलटसुलट काही बोलली तर? त्यात विशेष बाब त्या पेंटरची. सकाळी आपण शाळेत गेलो. त्याची कलाकारी पाहून तर बेहद खुश झालो. व सहज खोलीत डोकावलो. कुत्रं पिशवीत काही असेल म्हणून शबनम उचलत होतं व खालचे कागदं हवेनं उडत होते. आपण कुत्र्याला उसकावत शबनम घेत कागदावर ठेवायला गेलो नी भयाण झालो. चित्र पाहून! ती चित्रे आपण सोबतच आणली कुणाला दिसू न देता. पण ती त्यानं रेखाटली कशी? कदाचित मुरारला त्यानं कुठं तरी पाहिलं असावं का? तेच काल्पनिक घेतलं असावं? पण ती दोन चित्रे? शिवाय काव्या त्याची मैत्रिण सांगतो मग तिचा चेहरा का दाखवला नाही? असो पण त्यापासुन सावध असलं पाहिजे. व हे वातावरण निवळलं की लगेच मुक्ताला ही मुक्त केलंच पाहिजे! मुक्ता...मुक्त...मुक्ती मुक्ताची.....तिच्यागतच दिसणाऱ्या काव्याला तर केलंच मुक्त...! शिवालयामागील कातळकपारीतल्या अजगरानं कबुतर अधमेल करून वगळलं!
.
.
काय रात होती ती! मुक्ता नसली तरी तशीच काव्या!
त्या रात्रीही केदारनं चित्र रेखाटलं आज चित्र रेखाटता रेखाटता त्याच्या डोळ्यात आसवांचा पूर ओघळला.
काव्यासाठी..!
.
.काव्या..!
त्याला औरंगाबाद चे काॅलेजचे दिवस आठवले.
काॅलेजची सहल दौलताबाद किल्ल्यावर गेलेली. पहिल्या व दुसऱ्या वर्षाची सर्व मुले. हत्तीहौद, मिनार, मंदीर पाहत तोफेजवळ तेथून खंदक नी मग भुयार. सारी मस्त करत झुमत पाहत पाहत वर वर चढत होती. भुयारातून वर पाण्याचं टाकं, समाधी महल नी मग वर तोफेजवळ. तेथून मग परतीचा प्रवास! भुयारात एकेक- दोन दोन करत मुली उतरू लागल्या सर्वात शेवटी पहिल्या वर्षाची काव्या होती बहुतेक.तिच्या माग केदार नी मग मुलं. अंधारात मध्यंतरी मागचा मदन केदारला ओलांडत पुढे झाला. काही तरी किंचाळी आली. तसा मदन झरकन मागे झाला. भुयाराच्या तोंडाशी उजेडात येताच काव्यानं आधी आलेल्या केदारला पायातली चप्पल काढत गालावर उमटवली व रागात भिनभिनत निघाली. केदारला काही कळायच्या आत क्षणात हे घडलं. थांबलेल्या आठ दहा मुली "काय झाल !काय झालं?" म्हणून विचारू लागल्या.
" काही नाही यानं अंधारात चपलेवर पाय ठेवला मी पडणारच होते म्हणून दिली एक सडकन!" ती म्हणाली.
पण केदार समजून चुकला. अंधारात पुढं निघून झरकन मागे गेलेला मदन .. किंचाळी. त्यानं मदनला पाहिलं.मदन उजेडात येताच पुढे सटकला होता व खाली गाडीत जाऊन बसला होता. केदार गाडीत गेला व मदनची गचांडी धरत बुटासहीत लाथेनं बुकलू लागला.
" केद्या सोड केद्या सोड! "
मदन केदारला विनवत होता. हे काव्यानं पाहिलं व तिला जाणीव झाली आपण केदारला नाहक मारलं. त्यानं चूक नसतांना मार खाल्ला.
त्या दिवसापासून ती त्याची माफी मागण्यासाठी तो एकटा भेटण्याची संधी शोधू लागली. पण त्याच दिवसापासून त्यानं होस्टेल सोडलं व तो रूम करून राहू लागला. रूम काॅलेजपासुन लांब. म्हणून तो वरणगावला घरी परतला व बाबाची राजदूत घेऊन आला. आता तो राजदूतवरूनच ये जा करू लागला. काॅलेजला कायम गर्दी. तरी एक दिवस ती कमी गर्दी पाहून त्याला थांबवत त्या दिवसाच्या प्रकाराबाबत माफी मागू लागली. पण केदारनं तिच्याकडं लक्षच नाही असं भासवत निघून गेला. आता मात्र काव्याला अधिकच वाईट वाटू लागलं. एका हुशार मुलाचा आपण चूक नसतांना अपमान केला हे तिला खाऊ लागलं. त्यातच ती सतत त्याचा पाठलाग करू लागली. पण केदार तिला पाहताच रागानं मान वळवी.
६ डिसेंबर १९९२ उजाडली... अयोध्या, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, औरंगाबाद हवा वाहू लागली. बस थांबल्या. शटर बंद. काॅलेज बंद. मेस बंद, पोरं घरी परतू लागले. काही मुली निघून गेल्या. काहींना वाटलं लगेच निवडेल. होस्टेल खाली झालं. काव्याच्या सोबतच्या मुलीही गेल्या. त्या बोलवत होत्या. पण काव्याला वाटलं मिळेल वाहन.परतू घरीच.
ती बॅग घेऊन निघाली. त्याच वेळी केदार ही परतत होता व त्याचा बुलढाण्याचा एक मित्र होस्टेलला होता त्याला घेण्यासाठी तो आला. पण तो आधीच निघून गेलेला.
गेटवर काव्या उभी. केदारनं वातावरणाचं गांभिर्य ओळखलं.
" चल बस! " केदार.
" नाही मी घरी चाललेय!"
" मी पण घरीच चाललोय म्हणून म्हणतोय!"
" जाईन मी कोणत्याही वाहनानं!"
" काव्या! बसेस बंद आहेत बाहेर जाळपोळ होतेय! ऐक!"
" नको!"
तेवढ्यात जेमतेम रिक्षा आली त्यावर ती हाय वे वर आली.
त्याला माहीत होतं.हाय वे वरुन लगेच वाहन मिळणार नाही व रस्त्यात काही ...
त्यानं रिक्षा पाठोपाठ राजदूत लावली.
हाय वे वर तो दूर थांबला.तिला दिसणार नाही असा. काव्या तुरळक येणाऱ्या वाहनांना हात देऊ लागली. पण वाहन थांबत ना. वेळ जाऊ लागला. सायंकाळ पाच वाजले. शहरात तर संचारबंदी. परतणं ही आता शक्य नाही. आता तिला पश्चात्ताप वाटू लागला. तोच मागून ट्रक आला व त्याला हात दिला कॅबीनमध्ये दोन तीन बाया बसलेल्या दिसताच तिनं हिम्मत केली व बसली.
खुलताबाद आलं व सोबतच्या बाया उतरल्या. ट्रकवाल्यानं एका अर्धवट उघड्या ढाब्यावर ट्रक थांबवला. व तो खाना खाने के बाद ही निकलेंगे म्हणत अंधार पडल्याची वाट पाहत टाईमपास करू लागला. काव्यानं ओळखलं.आता घाट येईपर्यंत अंधार पडेल. काय करावं फसलो आपण. ती बॅग कॅबीन मध्येच ठेवत रस्त्यावर आली. ड्रायव्हर व क्लीनर ढाब्यामागं दारू घोटू लागले. रस्ता सामसूम. मागं अंतरावर थांबून ट्रक निघण्याची वाट पाहणाऱ्या केदारनं रस्त्यावर काव्याला पाहिलं नी त्यानं गाडी काढत ट्रकजवळ आणली. तोच ड्रायव्हर आला.
आता मात्र केदारनं बोलावलं नाही तरी ती बॅग न घेताच त्याच्या गाडीवर बसली.
केदारनं गाडी पळवली.
" काय गं तुला तर दुसऱ्या वाहनावर जायची हौस होती ना!"
" केद्या एक शब्द बोलू नको" म्हणत तिनं मागून गच्च मिठी मारली!
केदार ही वितळला. घाट पूर्ण सुना चाळीसगाव सुनं पण ते धुंदीतच धुळे जवळ करू लागले. धुळ्यात एका मित्राच्या घरी एक वाजता पोहोचले. तिथं थांबत सकाळी अंघोळ करुन निघाले. धुळे ते जळगाव मात्र पूर्ण दिवस लागला.यात मागचा सारा राग कापरागत उडाला सुगंध दरवळला. जळगावला रात्रभर मुक्काम केला. काव्याचे वडील विश्वासराव आरोग्यकेद्रात सुपरव्हायझर होते. काव्या केदारबाबत भरभरून बोलतेय व कालचे निघालेले हे आज पोहोचत आहेत म्हटल्यावर त्यांच्या मनात पाल चुकचुकली.
केदार वरणगावला गेला. विश्वासरावांनी काव्याला विश्वासात घेतलं. काव्यानं सांगितलं. त्या घडीला त्यांनी होकार दिला पण मनात वेगळाच डाव आखला.
वातावरण निवळलं. काॅलेज उघडलं दोघे परतले. नंतरच्या एक महिन्यात तर काव्या व केदार समीकरणच बनलं.
विश्वासराव सावध झाले त्यांनी आपल्या परिचयाच्या असलेल्या नर्सचा मुलगा नुकताच डाक्टर झाला होता. त्याच्याशी बोलणी केली. काव्या आली ती केदारला घेऊनच.
विश्वासरावांनी काव्यानं विषय काढताच केदारच्या घरच्यांनी यायला हवं ही अट घालत केदारला काढलं. पण केदार परत येण्या आधीच केतनशी तिचा वाङनिश्चय झाला. केदार अभियंता वडील व आई यांना घेऊन आला तर काव्या आजारी व दवाखान्यात अॅडमीट असल्याचं सांगण्यात आलं. मात्र विश्वासरावांनी केदारच्या वडीलांना साफ धुडकावून लावत " चित्रकारापेक्षा माझ्या मुलीला डाॅक्टरच सुखात ठेवू शकतो" सांगितलं.
केदारच्या घरच्यांना तो अपमान वाटला. अमाप ऐश्वर्य असुन आपण पोराच्या इच्छेखातर तयार झालो होतो. त्यांनीही केदारला धमकावलं व काॅलेजला पाठवलं. केदारला वाटलं काव्याची इच्छा नसावी. त्यानं राहिलेलं सत्र पूर्ण केलं. काव्या आलीच नाही. नंतर नाशिकला लग्न झाल्याचं कळताच केदारला आपला अंदाज चुकल्याची जाणीव झाली व तो वादळात बुडाला. पाच सहा महिने वादळ वादळ वादळ! यात लग्न झालं म्हटल्यावर काव्या कुठे वाहून गेली त्यानं तपासच केला नाही.
.
.
सकाळी केदारला जाग आली.
त्यानं रात्री रेखाटलेलं चित्र पाहिलं तर एका बाजुनं चेहरा ठेचलेलं आधीचं चित्र होतं तेच चित्र. पण चेहऱ्याची दिशा बदलली होती. दुसऱ्या बाजुचा काव्याचा स्पष्ट चेहरा दिसताच तो खाली ढासळला मान गुडघ्यात घालून आक्रोश करू लागला.
निलेशनं चित्र पाहिलं. त्यानं काव्याला पाहिलं नव्हतं पण मुक्ताबाईचं चित्र पाहुन तो ही थक्क झाला.
" निलेश काव्याचा शोध संपला रे! काव्या गेली!" तो ढसाढसा रडू लागला.
.
आता फक्त या साऱ्या प्रकरणात नृसिंह कोण हाच गुंता बाकी????
.
.