मुक्ती - मुक्ताची
🔖 भाग -- दुसरा
सकाळी केदारनं निलेशला रात्रीच्या प्रसंगाबाबत काहीच न सांगता मौन पाळणंच पसंत केलं. स्वत: ही 'गावातलं कुणीतरी असावं, असतात काही वेडे ही प्रत्येक गावात' असा विचार करत तो प्रसंग मनातून झटकला.
रंगाचं सामान घ्यायला सकाळीच धुळ्याला दोन माणसं गेली. कामत सरांनी गावातील दोघा- तिघांना भिंती घासायला लावल्या. केदारचं काम अजुन नव्हतंच.
निलेशनं केदारला सकाळी चहापानं नंतर नदीकडं नेलं. इथला निसर्ग केदारला नक्कीच प्रेरणा देईल व तो दु:ख झटकत आपल्या कलेत रममाण व्हावा हेच निलेशला हवं होतं. शाळा अकराला सुरू होईल तो पावेतो ते दोघे निघाले.
शाळा व आरोग्य केंद्र ओलांडताच उताराच्या रस्त्यानं ते पुढे निघाले. गावातली गुरं ढोरं त्याच रस्त्यानं नदी व तेथून डोंगरात जाण्यासाठी निघाली होती. सर्व घंट्या,घाट्या, घुंघरू किणकिणत होते. पायात लोंढणं असणाऱ्या गुरांची त्याला कीव आली. परमेश्वर काही माणसाच्या नशिबातही अशीच काही लोंढणी अडकवतो! मध्येच गुराखी शिवराळ भाषेत हाकारा घुमवत होते. पुढे छोटंस मारोतीचं देऊळ लागलं.खोल वाटेतूनच दोघांनी हात जोडले. शेंदरानं माखलेला मारोती पर्वत उचलत वर्षानुवर्षे गावाचं रक्षण करत आलेला असावा असाच भास होत होता.
अंतर काटलं जात होतं तशी वाट खोल खोल होत शेवटी नदीत उतरली. नदीत कालच्या पावसाचं गढूळ पाणी निवळण्याच्या तयारीत नितळलं होतं. पात्रात मात्र जिकडे तिकडे पाणकणसं उगवली होती. पलीकडे जाणारी पाणथळ वाटच उघडी दिसत होती.
काठावर उभं राहून केदार तिथलं सौंदर्य आशाळभूत नजरेनं कवेत घेऊ लागला. नदीचे दोन्ही काठ खडक छाटल्यागत दिसत होते. नदीपात्र यु आकारात पसरलेलं व काठ शंभर दिडशे फूट कातीव कड्याचे. नदी दक्षिणोत्तर वाहत होती दक्षिणेला उंच डोंगरावरून नदी खाली लोळण घेतांना धबधबा फेसाळत होता. खाली डोहानंतर पाणकणसाचं साम्राज्य.
उत्तरेला नदीकाठावर पश्चिममुखी शिवालय कातीव कड्याला रेलून दिमाखात उभं.
केदारने पात्रात पाय धुत तोंडावर पाणी मारलं व त्याची पाऊले देवालयाकडं वळली. त्याच्या मनातील पूर्वी घोंगावणारं वादळ शमत मनात शांतता घुमू पाहत होती.
शिवालय होतं.मंदीर खूपच पुरातन होतं.मागच्या कातीव कातळाला वटवाघळं उलटी लटकली होती. कबुतरांची खबदाडीत घरटी असावीत. बाजुला भलं मोठं उंबराचं, बेलाचं झाड. कड्याला लागून आखीव रेखीव दगडात बांधलेला चौकोनी व वर गोल डेरा. नंतर सभामंडप, नंदी,नी मग थोडी मोकळी जागा. त्यात फुलझाडं फुलवेली बहरलेल्या. बाकडे टाकलेले. दोन तीन माणसं नातवांना घेऊन बसलेले. पायऱ्या थेट नदी पात्रात उतरलेल्या. केदारची समाधी लागू लागली. निलेशला हेच हवं होतं. तो फक्त त्याच्या सोबत होता. केदार मंदीरात घुसला. शिवलिंगापुढे बसला. किती तरी वेळ शांत....शांत.... वादळ विरतांना... औरंगाबाद... दौलताबाद.... ६डिसेंबर १९९२... तारीख... काॅलेज सुटी....गावाकडे परतणं.... राजदूत...काव्या....सोबत प्रवास..सारं सारं आठवलं.... नंतर विश्वासरावांचा नकार... उध्वस्त... उध्वस्त.. नी मग वादळेच वादळे.... त्याच्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या. का? का? काल रेडिओवरील ते गाण सुरु असतांना त्या विधवेत आपणास काव्याचा भास झाला?
" तुमसे हमारा वादा है हम दम...जियेंगे मरेंगे तुम्हारे लिए हम.." निलेशने त्याला उठवलं व परत फिरवलं.
नदीपल्याड उंचच उंच गाळण्याच्या डोंगर रांगा पसरल्या होत्या. पलीकडं गेलेली गुरं वर डोंगरावर लयीत चरत होती. त्याच्या गळ्यातील घंट्या, घाट्या (ढणमणी), घुंगरांच्या गेझा लयीत नाद उठवत होत्या.
"निलेश, खरच नितांत सुंदर परिसर आहे! काही तरी रेखाटावं असं वाटतंय!"
" केदार म्हणून तर आणलंय तुला.शाळेचं काम झालंय की मस्त इकडे फिरत इथला निसर्ग, इथली ग्रामीण संस्कृती, मायाळू लोकं चितार मस्त!"
दोघं परतले. निलेश शाळेत गेला. केदारनं जेवत आटोपून रुमवर मस्त ताणून दिलं. रात्री झोपच झाली नव्हती त्याची म्हणून पाच पर्यंत झोपून राहिला. पाचला उठत फ्रेश होत तो शाळेत गेला.
दुपारी साहित्य येताच कामत सरांनी माणसाकरवी प्रायमर मारायला सुरुवात केली होती. केदार बराच वेळ शाळेच्या आवारात थांबला. शाळेचा मागचा भाग पाहिला. मागे दूर पर्यंत उंचवत जाणारा पडीक माळ पसरला होता. व नंतर डोंगर रांग पूर्व पश्चिम.जी नदी पल्याडच्या रांगांना धबधब्याच्या वर कुठं तरी काटकोनात छेदत होती.एक कच्ची सडक वा गाडवाट डोंगररांगेकडं जात होती.
" निलेश रात्री कुणी फिरतं, थांबतं का इथं? म्हणजे रखवालदार वैगेरे?"
"नाही . रखवालदार नाही. पण मागच्या वाटेनं धबधब्यापल्याड शेती असणारे जातात अधुन मधुन तेवढंच. का काय झालं?"
" काही नाही!" केदारनं विषय थांबवला.
आकाशात ढग गोळा होऊ लागले व पावसाची चिन्हे दिसू लागली. ते घराकडं निघाले.
आज लाईट असल्यानं व बाहेर पावसाची रिपरिप म्हणून घरीच झोपले. निलेश व राधाच्या नवीन संसारात केदारला अवघडल्या सारखं वाटू लागलं. रात्री बराच वेळ तिघे गप्पा मारत बसले. सकाळी मी लवकर मंदीराकडं फिरायला जाईन सांगत ते झोपले.
पहाटे साडेचारलाच जाग येताच त्यानं कापडं घेत निलेशला न उठवताच नदीकडं निघाला.
शाळेसमोरच्या मळ्याकडं नजर जाताच त्याला खोल खोल काही तरी दडल्यागत वाटलं. नदीकाठावर येताच पहाटेची निरव शांतता त्याला भुरळ घालू लागली. काही तरी रेखाटता यावं म्हणून तो पहाटेचा नदीकाठ डोळ्यात साठवू लागला. पण झरझर उतरावं असं काही सुचेच ना. त्यानं कपडे उतरवले व नदीच्या पात्रात उडी घेतली. थंड पाण्यानं त्याला हूडहुडी भरली. नंतर मात्र त्याला खोल पाण्यात उबदार वाटू लागलं. पाणकणसाचा भाग टाळत तो पोहू लागला. आता उजाळायला लागलं. पाण्यात दम रोखत तो सुर मारत खाली डुबकी मारत पोहू लागला. पोहता पोहता तो प्रवाहातून कपड्याकडं सरकला व दम सोडत बाहेर निघाला. तोच...
तोच...
फटफटलेल्या उजेडात अंतरावर कळशी भरून मंदिराकडं जाणारी पांढऱ्या साडीतली बाई दिसली. सकाळच्या प्रसन्न वातावरणात पाठमोरी मंदिरात जाणाऱ्या त्या स्त्रीला पाहताच त्यानं बाहेर येत कापडं चढवली. अंग पुसत केस कोरडे करत तो दर्शनासाठी निघाला. तो पावेतो ती स्त्री गावाकडं चढणाऱ्या वाटेला लागली होती. मंदिरात दोन चार लोकं ही दर्शनासाठी आली होती. त्यानं दर्शन घेतलं व निघाला. डोक्यातलं वादळ शमत त्याला शांत शांत वाटू लागलं. पांढरी साडी....पांढरा रंग...शांतता... त्याला चितारण्यासाठी विषय स्फुरला. आज रात्री काही तरी यावरच चितारायचं त्यानं ठरवलं.
दिवसभर माणसं प्रायमर मारत होती व नंतर कलरकामास ही सुरुवात झाली. कामत सरांनी कुठं कुठं काय चितारायचं त्याची यादी करत केदारला दिली.केदारनं ती खिशात ठेवत निलेशला शाळेतच एखादी खोली मिळेल का चौकशी केली. शाळेच्या कोपऱ्याच्या दोन खोल्या रिकाम्याच होत्या. फक्त किरकोळ सामान होतं. रंगकाम करणारी माणसं ही रात्री ही काम करावं म्हणून मुक्कामाला थांबणार होती. निलेश व कामत सरांनी शिपायाकरवी दोन्ही खोल्या साफ करवून घेतल्या. तसं दुपारीच कलर मारतांना त्याच्यातलं सामान काढलंच होतं. शिपायानी पाण्यानं तळफरशी धुत साफ सफाई केली. बांधकाम झाल्यापासून त्या तशाच बिन वापराच्या होत्या. त्यात गाद्या, चादर, पाणी ठेवलं. घरून केदारची शबनम व बॅग आणत चित्रकलेचं सारं सामान आणलं. गावातून स्टॅण्ड मागवलं. केदारनं कॅनव्हास तयार ठेवत रंग, ब्रश सारं साहित्य तयार ठेवलं.
उद्यापासून त्याचं शाळा चितारण्याचंही काम सुरू होणार होतंच.
संध्याकाळी घरी येऊन जेवण केलं. तोच काल सारखीच रिप रिप सुरू झाली. तीन दिवसाच्या पावसानं भादव्याचा ताप बराच शमत गारठा वाढला. त्यात झडीगतच पाऊस सुरू झाला. छत्री घेत निलेश व केदार शाळेत आले.
एका खोलीत रंगकाम करणारे मुक्कामाला होते. त्यांनी अकरा पर्यंत मधल्या साईडचं कलरकाम करत थकल्यानं झोपणं पसंत केलं. निलेश केदार गप्पा मारत बसले. निलेशला ही झोप दाटू लागली. तो झोपला. केदार ओट्यावर आला. त्याला समोरच्या आरोग्य केंद्रातील झाडे झडीच्या पावसात वेगळीच भासू लागली. चंद्र तर काळ्या ढगाआड सुंबाल्या झाला होता. केंद्रातील व शाळेच्या आवारातील बल्ब इनतवारीनं पिवळा मरतुकडा प्रकाश फेकत होते. तो ही झडीत वाहल्यागत थरथरत होता. पश्चिमेकडच्या डोंगररांगा अस्पष्ट ही दिसत नसल्या तरी मौनास बसल्यागत भासत होत्या. नदीचा आवाज मात्र शांतता भंग करत होता. कातळ कड्यावरुन वटवाघळं उडाली असावीत. घुबडाचा घुत्कार घुमत होता. केदार खात्री करण्यासाठीच बाहेर थांबला होता पण परवा आलेला माणूस येत नाही म्हटल्यावर म्हणा वा भितीनं म्हणा तो खोलीत आला व दार लोटलं.
त्यांनं कॅनव्हास वर चित्र चितारण्यास सुरूवात केली.पहाटेचा नदीकाठ, शिवालय, धुंद वारा, झाडे व त्या पार्श्वभुमीवर देव दर्शनाला आलेली ललना तो चितारू लागला. त्याची समाधी लागली. झरझर रेघोट्या मारल्या जाऊ लागल्या. नदी, प्रवाह पाणकणसं, कातळ कपारी शिवालय, नि मग पांढऱ्या साडीतली ती ललना कळशी भरुन परततांना... रंग ओतले जाऊ लागले. तोच बाहेर पावलांचा आवाज ..काहीतरी ठोकल्याचा आवाज...त्यानं कान टवकारले.. ब्रश थांबला. चित्र तर जवळपास पूर्णत्वास आलेलं. दार हळूच करकर वाजलं. त्यानं नजर फिरवली. दाराची फट वाढू लागली. केदार थरथरला. त्यानं ब्रश तसाच खाली ठेवला. व जवळच फरशीवर अंथरलेल्या गादीवर पडत चादर अंगावर ओढली. निलेश तर घोरत होता. बाजुच्या खोलीतली माणसं ही झोपली होती. त्यानं श्वास हळू करत किलकिल्या डोळ्यांनी दारकडचा कानोसा घेतला. दाराची फट वाढत गेली व पाय दिसू लागले. केदार घामानं डबडबला.
पाय चित्राजवळ येऊ लागले. मुसळ दणदण वाजु लागली. तोच तोच फेट्यानं चेहरा झाकोळलेला माणूस. आता तो केदारच्या अगदी जवळ पाठ करून बसलेला. चित्र न्याहाळत बसलेला. केदारचा श्वास मंद मंद होऊ लागला. शरीर घामानं लथपथ.
" माझ्या मुक्ताचं चित्र कुणी चितारलं?" खोलीत आवाज घुमला. या आवाजानं तरी निलेश वा शेजारच्या खोलीतली माणसं उठावीत असा केदार मनोमन धावा करू लागला.
आपण तर चित्रात बाई पाठमोरी दाखवलीय. कारण चेहरा आपणच पाहिला नाही तर चितारणार कसा? म्हणून खुबीनं पाठमोरी दाखवलीय. मग हा मुक्ता का म्हणतोय! कालही मुक्ताच म्हणाला होता. तोच तो माणूस उठला व मुसळ आपटत निघाला.
दार वाजलं. बंद झालं. पावलं व मुसळाचा आवाज कमी कमी होत गेला.
केदारनं श्वास घेतला. धडधड कमी झाली की वाढली... तोच ...तोच
आपण झोपलोय त्या तळफरशीत त्याला काही तरी जाणवलं. खालून आवाज आल्यागत...आणि आणि काही कळायच्या आत पलंग उचलून फेकावा अगदी तसंच खालच्या फरशी व अंथरुणासहीत कुणी तरी आपल्याला भिरकावलं असंच केदारला वाटलं व त्याची शुद्ध हरपली.
सकाळी तो बऱ्याच उशिरानं उठला. निलेश उठून घरी चालला गेला होता. त्याचं अंग ठणकल्यागत भासू लागलं. तोच त्याला रात्रीचा प्रसंग आठवला.तो खाडकन उठला. खाली पाहिलं तर अंथरुन व तळ फरशी तशीच. म्हणजे आपणास स्वप्न पडलं असावं. पण तो माणूस? त्याच अचानक कॅनव्हास वर लक्ष गेलं. कागद कोरा! तो बुचकळ्यात पडला!
आपण रात्री चित्र चितारलं ते कुठं गेलं? का ते ही स्वप्नातच? तो उठत कागद हातात घेत पालटवणार तोच जबर धक्का बसत तो खालीच बसला. मागच्या बाजुस चित्र होतं पण त्यानं काढलेलं नव्हतंच. जे होतं ते भयाण!
अख्खं धड शाबुत असलेला माणूस! पण शीर? टरबुजाला दणका मारत दोन खापा कराव्यात तसंच. वरुन कवटी फुटलेली व मानेत खालच्या भागात लटकलेली. जणू डोक्याच्या दोन खापा मानेला लागलेल्या मेंदूचा रस्सा होत आजुबाजुला उडालेला. कुणीतरी वरुन दणका देत डोकं फोडलेलं व त्याही स्थितीत ते धड क्षणासाठी तसच उभं! कोसळण्याच्या स्थितीत. चेहरा??? चेहऱ्याचा तपास नाही.
केदार सुन्न. आपण हे चित्र चितारलंच नाही.मग कोणी?
त्यानं ते चित्र तसच उलटं लटकवलं व दारास कुलूप लावत तो खोलीवर आला. उशीर झाल्यानं तो नदीवर आज गेलाच नाही. अंघोळ करत चहा घेत तो व निलेश शाळेत आले.
रंगवलेल्या ओट्याच्या दर्शनी भागावर तो एकाग्र होत कामत सरांनी सांगितल्या प्रमाणं भराभर चित्र चितारू लागला. असलं रेखाटन म्हणजे त्याचा हातचा मळ होता. दुपार जेवणा पर्यंत ओट्याचा बराचसा भाग चितारला गेला. अकरा नंतर मुलं व शिक्षक येऊ लागली व चित्रे पाहून एकच गर्दी उडाली. केदारचं कला कौशल्य पाहणाऱ्यास भुरळ घालू लागलं. जो तो तोंडभरून स्तुती करू लागला. कामत सर तर चाटच. आपण कला शिक्षक असलो तरी या नवख्या पोराच्या पासंगालाही पुरणार नाही.दुपारून मुलांनी घरी बातमी दिली. पालक शाळेत बघायला गर्दी करू लागले. समोरच्या दवाखान्यातील कर्मचारी ही आले. त्यांनीही आपलं आरोग्य केंद्र रंगवून आरोग्याचे व स्वच्छतेचे संदेशपर चित्रे काढण्याचं ठरवलं. ही गर्दी चालू असतांना केदार शांतपणे विचार करत रंगवणं, चितारणं चालू होतं.
परवा माणूस, मुसळ, मुक्ता.. असं..
तर काल त्या सोबत तळ फरशी व अंथरुण फेकत खालून कुणीतरी... व चित्रच बदल? जे चितारलं ते तर त्याहून भयानक... काही तरी नक्की घडलंय.आपण जी शांतता शोधण्यासाठी इथं आलोय, निलेशनं आणलं.पण त्या शांततेत काही तरी भयानक वादळ घोंगावतंय इथं! आपण सहा महिन्यांपासून वादळ अनुभवलंय व अनुभवतोय! आता शांतता हवी होती! पण इथं शांततेत वादळ आहे. आपल्या चित्रकलेचा मूळ पिंड तोच राहिलाय.वादळातली शांतता वा शांततेतलं वादळ. भिकार विषयावर रेखाटत जीवनाचा फालुदा करण्यापेक्षा असंच काहीतरी वेगळं चितारायचंय आपल्याला. जे काल चितारलं गेलंय चित्र ते! पण कोण ? चितारणारा कोण? आणखी काय काय,? पाहू या? काय काय घडतंय! पण जिवास धोका? काही बरं वाईट झालं तर? इथं काही तरी संकेत दडलेत! ते आपणालाच मिळताहेत! मग काय होईल धोका? आणि झाला तरी आता काव्या शिवाय काय उरलंय जिवनात? उसवलेल्या रानाचं बहरणं उलगणं...! जे होईल ते..पण पाहूच!
रात्री जेवण करून पुन्हा तो परत त्याच खोलीत आला.
" केदार काल काय चितारलं तू? दाखवलंच नाही?" निलेशनं विचारलं.
" काल रात्री काय चितारावं या विचारातच झोप लागली. " केदारनं ठोकलं.
आजही निलेश झोपताच केदारनं उशिरा चित्र चितारायला सुरुवात केली. नदीकाठ, शिवालय, पाठमोरी विधवा स्त्री कालसारखीच. पण आज त्यात उत्कटता नव्हती. तोच त्याला काही तरी थरथर जाणवली. तो थरथरला. ब्रशचा वेग धिमा करत त्यानं नजर फिरवत मागे आवाजाचा कानोसा घेतला. नी तोच तो गडगडला त्याच्या डाव्या हाताला मागच्या भितींस तोच माणूस मुसळ धरत बसलेला व उजव्या हाताच्या भिंतीला तेच धड उभं डोक्याच्या खापा दोन्ही खांद्याकडं झुकत मानेला लागलेल्या मेंदूचा रस व रक्त गळतंय .काल चित्र तर आज साक्षात उभं!
धड जितकं शांत उभं तितकाच शांत तो माणुसही मुसळ धरुन बसलेला. जणू दोन्ही चित्राकडं पाहताहेत. धडाला तर पाहण्यासाठी डोळेच नाहीत. एकदम शांतता! पण वादळ केदारच्या मनात, उरात, मेंदूत, संवेदनात, जाणिवात उठू लागलं. त्याला हवं असलेलं शांततेतलं वादळ! पण ते त्याला पेलवलंच गेलं नाही. त्याला ग्लानी आली व तो जागीच कोसळला. मग त्याच्या जाणीव- नेणीव गोठलेल्या मनात स्वप्न दिसू लागलं व बोल ऐकू येऊ लागले.
" ही तर माझी काव्या आहे!"
" चूप! खामोस! मुक्तास काव्या म्हणणारा कोण?"
नी मग मुसळ डोक्यात टरबुज फुटत लाल पांढरा चिखल राबडी फालुदा...
सकाळी पुन्हा तोच क्रम..निलेश उठून गेलेला.. सफेद कागद...मागे चित्र...
जे केदारनं चितारलंच नाही...
फक्त चितारलेली बाई त्या बरहुकूम.
बाकी बदल.
काळी इरकली साडी. पाठमोरी पण मान फिरलेली. चेहऱ्याची एक बाजु दिसत होती पण भयाणतेचे परिमाण परिसिमा ओलांडणारी.
चेहऱ्याची एक बाजू ठेचलेली. त्याच कागदावर खालच्या चित्रात ती स्त्री जमिनीवर पडलेली. ठेचलेल्या बाजुकडचा डोळा गोटी होऊन बाहेर लोंबकळत होता. केदारला रात्रीच्या संवेदना आठवल्या मुक्ता त्यात काव्या!!!!!!
' काव्या? काव्याचा काय संबंध?
नसावाच.आपण काव्याचा विचार करतोय म्हणून ते स्वप्न!
पाहूच प्रकरणाचा पूर्ण छडा लागेपर्यंत.
आज दिवसभर जे काम केलं त्यानं आरोग्य केंद्राच्या एम.ओ. नं शिंदे सरांची विनंती करत आरोग्य केंद्र ही चितारण्यास विनवलं. नंतर प्राथ. शाळेनंही मुलांसाठी गावातील भिंती शाळा रंगवायला विनवलं. परवा तेरवा इच्छा नसलेल्या केदारनं स्वत:च आज होकार देत आरोग्य केंद्र व शाळेसही होकार दिला. कारण गावात थांबण्यासाठी त्याला निमीत्त हवं होतं व गावकऱ्यांशी ओळख!
चार च्या सुमारास हवेत एकाएकी दमटपणा वाढला. पाऊस होऊन परत दमटपणा! घामाच्या धारा.
केदारनं काम थांबवत अंघोळीसाठी नदीकडं जायचं ठरवलं. पण निलेशनं त्याला नदीऐवजी समोरच्या मळ्यात नेलं. मळा पूर्ण बहरानं फुललेला! विहीरीचं बासण अवाढव्य. चौकोनी व खोल. भाद्रपदाचं पाणी काठोकाठ.केदारनं कपडे काढले व विहीरीत झेपावला. ठाक लागेना. दोन तीन प्रयत्नात ठाक लागला. मग तो मनसोक्त पोहत दिवसभरचा शिणवठा घालवू लागला.
" केदार चल पुरे आता!" निलेश वरुनच म्हणाला.
तसं केदारनं पुन्हा एकदा तळाशी डुबकी मारली.
तळ दिसला, हात लागले. पायाचा जोर लावून तो वर यायची तयारी करणार तोच तळाशी माणूस...
केदारचा कोंडलेला श्वास सुटू पाहू लागला.
" विका...विका दादा..का असं? मुक्ता नव्हतीच तर मग का उगाच मुक्तास बदनाम करत नाहक दोन जणाचा बळी...?
आता मात्र फेटा नव्हता पण मुक्ता ऐकताच त्यानं ओळखलं. चेहरा दिसला. चेहरा झाकलेला व मुसळ धरलेला हाच माणूस. तो झपाट्यानं वर आला. वर चढला व झराझर कपडे बदलवत मळ्यातून काढता पाय घेतला.
.
.
केदारला संगती लागेच ना पण!
.