' मुक्ती - मुक्ताची'
🔖 भाग ::-- पहिला
गाडीनं गाळण्याच्या डोंगररांगात प्रवेश केला. गावं येऊ लागली तशी गाडीतली गर्दी उतरू लागली. केदार खिडकीतून सुन्नपणे बाहेर पाहत होता. तशी त्याची यायची इच्छाच नव्हती. पण निलेशनं जबरीनं त्याला वरणगावहून आणलंच. निलेश एकदम खुशीत होता. पंधरा वीस दिवसापूर्वीच त्याला नोकरी लागली होती. बारावीपर्यंत सोबत शिकलेले. नंतर केदार कलेकडं वळला व औरंगाबादला निघून गेला. तर निलेशनं विज्ञान शाखेत पदवी घेत नंतर बी.एड केलं. मध्यंतरी दोघाचं भेटणं नव्हतं पण मैत्री तशीच. मागच्या सहा महिन्यांपासून केदारची स्थिती भयाण झाली. तीन चार महिने तर निलेश रात्रंदिवस सोबत असायचा. पंधरा वीस दिवसापूर्वी त्याला ही भावेरच्या हायस्कुलात नोकरी मिळाली नी तो राधास घेत भावेरला आला. नी कालच तो वरणगावला येत आज केदारला भावेरला नेत होता. केदारनं त्याला सोबत येण्यास साफ उडवलंच होतं. पण काका व मावशीला सांगत निलेशनं त्याला मनवलंच.
गाडी आता डोंगर रांगेतून कधी पठारावरून तर कधी शेतातल्या कच्च्या सडकेवरून धावत होती.
डोंगरावर साबरीची(निवडुंग) रांग तर कुठे अंजनाची तुरळक झाडं मागं पळत होती. भाद्रपदचं कडक उन तडका देत असावं. गाडीत घामाच्या धारा सुटल्या होत्या. खळवाडी ओलांडत चढण चढताच गाडी थांबली .निलेशनं बॅग घेत केदारला उतरण्याची खूण केली. केदारकडे आपल्या चित्रकामाच्या साहित्याची शबनम व कपड्याची छोटीशी बॅग होती. ती घेत ते खाली उतरले. तोच बेल वाजली व दार खटकन बंद झाल्याच्या आवाजाबरोबर गाडी धकली.
घामानं निथंबत गाव दरवाज्यातून दोघे आत आले. गाव दर्जाच्या देवळीवर पाच सहा टाळकी बसलेली. धोतरं सावरत खकारत भिंगाच्या चश्म्यातून नजरा पाठलाग करु लागल्या. जवळ जाताच एकानं
" कोणाकडे?" धिटाईनं त्रोटक विचारलं.
"कोणाकडेच नाही,मी शिंदे सर! गावच्या हायस्कुलात नव्यानेच लागलोय व झुगरू अप्पाच्या खोलीत राहतोय!"
" हा हा नवीन सर तुम्हीच का? काही नाही जावा जावा!" म्हणत विड्यांच्या थोटक्यात दम आटवू लागली.
गाव उंच पठारावर सखल भागात वसलं होतं. घरे धाब्याचीच पण पवबंधी मावठीची होती. मध्येच चार- आठ दुमजली रंगीन हवेल्या दिसत होत्या. गल्ल्या ऐसपैस पसरलेल्या. गावात मात्र म्हातारी व पोरं सोडता शांतता वाटत होती. दुपारच्या तीनचा टाईम असल्यानं व हंगामाचे दिवस असल्यानं कर्ती माणसं बहुतेक शेतात गेली असावीत. रस्त्यानं येतांना जिकडे तिकडे शेतात माणसं दिसत होतीच. घरासमोर कल्तानावर मुगाच्या उडदाच्या व चवळीच्या शेंगा भादव्याचं उन खात होत्या. उन्हानं त्या तडकत दाणे उडत होते व तडकताच मुगाच्या शेंगांची टरफलं आळोखे पिळोखे देत वाकडे होत होते. तीच गत चवळी, उडदाच्या शेंगांची होती. काही अंगणात म्हातारी माणसं काठीनं शेंगा बदडत होती. म्हाताऱ्या गुंग झालेल्या वाऱ्यावर दाण्यासहीत भुसा उडवत होत्या. काही अंगणात तयार हिरवे मूग, उडीद चवळी सुकत होती. निलेश एक एक घर मागे टाकत पुढे सरकत होता. तोच चार दोन शेळ्या मुगाच्या पथारीस लागल्या .ओट्यावरच्या बाबानं शिवी हासडत काठी हाणली.
पुढच्या चौकात हवेलीसमोर ओला कापुस टाकला होता.एक पांढरी साडी नेसलेली तरूणी( पदरात चेहरा दिसत नव्हता पण साडीवरुन वैधव्य कळत होतं)डालीत भरून कापुस हवेलीत नेत होती.जवळच कुठे तरी रेडिओ चालू होता.
"तुम्हसे हमारा वादा है हम दम! जियेंगे मरेंगे तुम्हारे लिए हम!!जियेंगे मरेंगे तुम्हारे लिए हम!!"
"निलेश विरोधाभास कसा असतो बघ!" केदार नं तोंड वळवत तोंड उघडलं.
" काय झालं?" निलेशला कळेना म्हणून त्यानं विचारलं.
" काही नाही जाऊ दे! पावसाळ्यात पावसाच्या धारा हव्यात तर भादव्यात घामाच्या धारा लागतात!"
" केदार , पाऊस पुन्हा बहरून यावा म्हणुन तपन देण्यासाठी प्रकृतीत तात्पुरता बदल असतो तो!"
आपण जे सांगतोय ते निलेशला दिसलंच नाही पण तरी त्याचं समर्थन मात्र पटण्यासारखं आहे.
केदार घाम पुसत हाशहूश करत निलेश पाठोपाठ ओटा चढला. दोघांना पाहताच नवख्या भागात एकाकी असणाऱ्या राधास आनंद झाला. तिनं हसतच स्वागत करत दोघांना गडवा भरून दिला व ती स्टोव्ह पेटवत चहा ठेवू लागली.
तिच्याकडंनं काडी पेटवताच स्टोव्ह भडका धरू लागला. तोच निलेश उठला. त्यानं जोरात पंप मारत पुन्हा हवा भरली. राधानं पिन मारली व बर्नर सुर्रर्र करत सुरू झाला. तिघांनी चहा घेतला व गप्पा सुरू केल्याच तोच ओट्यावरून समोरच्या दक्षिणेकडच्या धानोऱ्याच्या टेकडीकडं काळ्या ढगाची दड निलेशला आकाशात वर चढतांना दिसली. वारा तर पूर्ण पडला होता. तशी बाजुच्या गल्लीत म्हाताऱ्या लोकांची व मुलांची एकच लगीन घाई सुरू झाली. जो तो बाहेर टाकलेल्या वस्तू भरूनभरून घरात फेकू लागला. दाणे, शेंगा, कापूस दम फुटेस्तोवर घरात टाकले जाऊ लागले. रानातले लोक परतू लागले. उन पळालं व आकाशाला छायेनं घेरलं. वाऱ्याची भूतभवरी फिरली .काळ्या ढगांची दड चांगलीच वर चढली. तोच गाळण्याच्या डोंगर रांगेतून कडकड आवाज व चमचमाट करत वीज घुमली व घुमतच राहिली. टपोरे थेंब नाचतच पडू लागले.नी गार वारा सुटला. मुग उडदाचे दाणे घरात टाकले तरी काही शेंगा ओल्याच होऊ लागल्या. एरवी केदारनं ती सारी त्रेधा तिरपीट लगेच कुंचल्यानं चितारली असती पण गेल्या सहा महिन्यांपासून त्यानं ब्रशच हातात धरला नव्हता. म्हणून तर निलेशनं त्याला इथं आणलं होतं.
रानातून उशीरा परतणारे थंड पाण्यानं कुडकुडत गावात परतत होते. तरणी खोंडं पाठीवर शेपटी टाकत वाहणाऱ्या पाण्यात डिरकत होती. एका तासात तर गावात पाणीच पाणी करत पाऊस उघडला. पण वादळानं झाडं वाकली मोडली.तारा तुटल्या, नदीला पूर आला.
वातावरणात गारवा निर्माण झाला. पाचच्या सुमारास निलेशनं केदारला घेत गावातील मुख्याध्यापकाकडं नेलं.
" या, शिंदे सर! बसा!"
काकडे सरांनी निलेश शिंदे सरांना बसायला लावलं.
" सर ! आपणास सांगितलं होतं, हाच तो माझा मित्र केदार डांभुर्णीकर! हाडाचा कलागार ! "
" शिंदे सर शाळा दाखवा त्यांना, कामत सर त्यांना मदत करतीलच आपले चित्रकलेचे! पूर्ण नविन बांधकाम आहे, सारं आधी रंगवून मग त्यावर कुठं कुठं काय काय काढायचं ते कामत सर सांगतीलच. लागणारं साहित्य लिहून घ्या उद्याच धुळ्याहून मागवून घेऊ.फक्त काम चांगलं हवं इतकंच!"
" सरजी कामाबाबत बिनधास्त रहा, याच्या हातात जादू आहे!"
" मग तर काय पहायचंच काम नाही!"
केदारला या गोष्टीत रस नव्हता.तो तसाच उठला व निलेशला खूण करत बाहेर निघाला.
काकडे सरांना केदार जरा विचीत्र वाटला.तो बाहेर निघताच त्यांनी नवीनचं असलेल्या शिंदेला विचारलंच.
" शिंदे, काम मोठं व जबाबदारीचं आहे.तुमच्या मित्राकडनं होत असेल तरच घ्या! नाहीतर तिकडं कामत सर ही नाराज व संस्थेवालेही!"
" सरजी ,केदारची कला आपण पहाल तर थक्क व्हाल! बिनधास्त रहा! फक्त एकदाचं काम सुरू होऊ द्या इतकंच.आणि तसं पाहता तो बाहेरची असली कामं अजुन करतच नाही. कारण त्याला तशी गरजच नाही. त्याचे वडील अभियंता आहेत व घरची केळ्यांची बागायत आहे! फक्त शाळेचं काम आहे माझ्या हे सांगून मी आणलंय त्याला".
निलेश अजुनही येत नाही म्हणून केदार गाव व गावासमोर दिसणारा निसर्ग पाहू लागला.
समोर दिसणारी बहुतेक शाळा असावी. मोठं आवार दिसत होतं, नवीन भव्य इमारत दिसत होती. तिच्या समोर रस्ता होता व तो खोल खोल उतरत पुढे गेला होता. बहुतेक नदी किंवा नाला असावा पुढे. रस्त्याच्या दक्षिणेला शाळेसमोरच बहरलेला मळा व व त्याला लागून अवाढव्य पसरलेलं हे काय! केदार पुढं सरकला. बोर्ड दिसला.
" प्राथमिक आरोग्य केंद्र, भावेर"
बहुतेक सरकारी दवाखाना. पण खूप मोठं क्षेत्र व्यापलं होतं. त्यानंतर पश्चिमेला खोल भाग होता. तेथून घंटानाद ऐकू येत होता. मंदीर असावं खोलगट भागात. नी मग पश्चिमेला काटकोनात उंचच उंच डोंगर रांगा पसरलेल्या.
निलेश काकड सरांसोबत बाहेर आला व ते केदारला घेत समोरच्या शाळेकडं निघाले. बोलवायला पाठवलेल्या मुलासोबत कामत सर ही आले नंतर. निलेशनं केदारला सारी इमारत दाखवत प्रायमर, रंग , स्टेनर, ब्रश, व इतर काय काय व किती लागेल ते विचारलं.
केदार सुन्न होत त्याच्या तोंडाकडं पाहू लागला. त्यानं असलं काम केलंच नव्हतं. येत नव्हतं असं नाही पण करण्याची गरजच नव्हती. तो कॅनव्हास वर वादळातली शांतता वा शांततेतलं वादळ चितारणारा मनस्वी कलाकार होता. व्यावसायिक कलाकार नव्हताच. हे निलेशलाही माहीत होतं. तरी त्यानं निलेशकडं पाहत डोळ्यातले भाव झरझर बदलवत इमारतीवर एक नजर भिरकावली व कागदावर झरकन साहित्य रखडलं.
व तो इमारतकडं पाहू लागला. त्याला पाहून कामत सर काकड सरांना म्हणाले.
" सर, शिंदे सरांनी कुणास उचलून आणलं? पहा शिंदे सर नवीन म्हणून सुटतील पण आपण.! या मुलांकडनं नाही होणार काम! आणा कागद मी लिहून देतो सामान !" कामत नावाच्या माणसाचे बोल केदारच्या जिव्हारी लागले. पण आपल्या मित्राखातर बोलणं उचीत होणार नाही हे ओळखून तो काहीच बोलला नाही.
केदारनं समोरच्या न रंगवलेल्या भिंतीवरील फलकाकडं पाहिलं. त्याला खाली पेंटर...'कामत' दिसलं.
चित्र मोनालिसाचं होतं. केदार चालत गेला त्यानं आजुबाजुला पाहिलं. विटेचं खांड उचलत त्यानं त्या चित्रावर ठराविक ठिकाणी विटेचं खांड फिरवलं. हातातला साहित्य खरडलेला कागद निलेशकडे देत
" निलेश ,मी खोलीवर थांबतो! या तुम्ही सावकाश!" म्हणाला व चालता झाला.
काकड ,कामत अवाकपणे विटेच्या रंगानं बदललेलं मोनालिसाचं चित्र पाहतच उभे राहिले. चित्रात खटकणारा दोष क्षणात गायब झाला होता. ते ही साध्या विटकरी रंगानं!
" शिंदे सर उद्या पासून काम सुरू करा!" काकड सरांआधी कामतच बोलले.त्यांना चित्रापेक्षा आपल्याच बोलण्यातील चूक लक्षात आली.
दुपारच्या वादळानं तारा तुटल्यामुळं लाईट नव्हतीच. रात्री जेवण अंधारातच उरकवलं. जेवण होताच निलेशच्या सांगण्यानुसार राधानंच हळूच विषय छेडला.
" केदार भावजी, यांनी तुम्हास इथं बोलावलं या मागं यांचाच स्वार्थ होता. संस्था नवीन, त्यात इथं कामास वाव. यांचं काम लोकांच्या नजरेत भराव व ओळख व्हावी म्हणून यांनी तुम्हास बोलवलं. नाहीतर असली कामं करण्याची तुम्हास गरजच नाही"
"....."
" केदार, पाच सहा महिन्यांपासून तु काव्याच्याच विचारात हरवलाय! त्यातून बाहेर निघावा म्हणून तुला इथं आणलं मित्रा.इथला निसर्ग, शांतता तुला नक्कीच मानवेल व तुझ्या कलेस चेतना मिळेल म्हणून हा आटा पिटा! बाकी तू बंद केलेलं काम सुरू करावं म्हणून शाळेचं रंगकाम! बाकी तुला दु:खवावं असा मी कदापि विचार करणार नाही.तरी तुला वाटत नसेल तर काम न करता उद्याच परत फिर!" निलेश म्हणाला.
" अहो! उद्या कशाला? नाही काम तरी चार-आठ दिवस त्यांना इकडं फिरवा मग पाठवा माघारी!" राधा बोलली नी केदारला दोघांचं आपल्यासाठी आतुन तुटणं पाहून डोळ्यात आसवे तरारली.
केदारनं रात्री झोपण्यासाठी शाळेकडंच सांगितलं. लाईट नसल्यानं व वातावरणात दमटपणा म्हणुन निलेशनं शिपायाला बोलवत शाळेच्या आवारातच होस्टेलसाठी आणलेले लोखंडी पलंग काढावयास लावले. शिपायानं आल्या आल्या का कू केलं. तो चाचरत आवारात झोपण्यास नकार देत होता.शेवटी नाईलाजानं दोन पलंग, गाद्या, चादरा टाकत तो निघून गेला.
" निलेश! मलाही वाटतं रे या वादळातून बाहेर पडावं! पण मनातल्या वादळातून बाहेर काढणारी शांतताच लाभत नाही!" पलंगावर पडल्या पडल्या आभाळातील पांढऱ्या मेघांच्या गुब्बाऱ्यातून वाट काढणाऱ्या चंद्राकडं पाहत केदार आपल्या मित्राकडं आपलं मन उघडं करू लागला.
" केदार तुला हवी असलेली शांतता, इथल्या निसर्गात नक्कीच आहे. म्हणुन तर तुला इथं आणलंय!"
पण त्या शांततेत घोंगावत नुकतंच शांत झालेलं व केव्हा ही उफाळू पाहणारं वादळ निलेशला माहीतच नव्हतं.
प्रवासानं दोघे ही थकले होते. गप्पा मारता मारताच दोघे झोपले व घोरू लागले. मध्यरात्री आकाश निरभ्र झालं व चंद्र भकभकू लागला. पडल्या पावसानं गारठा वाढला. पायाशी पडलेल्या चादरा झोपेत आपसूक तोंडावर आल्या. नदीकाठच्या महादेवाच्या मंदीरातली घंटा घणघणली. एवढ्या रात्री मंदीरात कोण घंटा बडवतंय! गावातील जागती दमेकरी म्हातारी माणसं पडल्या पडल्या खोकत विचार करू लागली. कधी कधी वाऱ्यानं वा हिंडणारी वटवाघळं घंटेवर बसतात व निरव शांततेत हळूवार आवाजही जोरात भासतो. मात्र केदारची झोप चाळवली.समोरच्या मळ्यातील पिकावरील डास ही भुणभुण करत अंगाच्या थोड्याफार उघड्या अंगास चावत होते. तो उठला. आडोशाला जाऊन पलंगावर येऊन बसला. झोप उडाली. रात्रीचा एक दोनचा सुमार!तो चादर अंगावर घेत आडवा झाला. सारीकडं शांतता समृद्धीनं नांदत असल्यागत त्याला जाणवलं.त्याला दुपारी गावातून येतांना अंगणा-अंगणात टाकलेले मूग, चवळी, उडीद नजरेसमोर दिसू लागले.
हिरवे मूग समृद्धी.... पांढरी चवळी शांतता..... काळे उडीद...? वादळ..... धोका.....? नाही या ठिकाणी शांतता वाटतेय! मग त्याला रेडीओवर ऐकलेलं गाणं आठवलं...
" तुमसे हमारा वादा है हम दम....जियेंगे मरेंगे तुम्हारे लिए हम!" गाणं ऐकून त्याला शांतता वाटली होती पण तोच ती विधवा बाई दिसली नी वादळ उठलं होतं! क्षणभर तर काव्याचाच भास झाला! नी मग वादळ, वादळ,वादळ! जे सहा महिन्यापासुन अनुभवतोय तेच वादळ!निलेश मात्र जे बोलला ते पटलं
'पाऊस बहरावा म्हणुन तपन देण्यासाठी.....' पण
निल्या तुला काय माहित दोस्ता, ज्याचं रानच उसवलं; त्याचं कसलं बहरणं नी उलगणं आता!
केदारनं कुस बदलली. काव्या! कुठं आहेस गं? ..... तोच त्याचं लक्ष समोर गेलं. शाळेच्या गेटकडुन कुणीतरी आत येत होतं. डोक्यावर फेटा बांधलेला हातानं खांद्यावर काहीतरी पेलत तो जवळ येत होता. केदारला वाटलं असेल शाळेचं कुणीतरी वा गावातलं! पण एवढ्या रात्री? तो तोंडावर चादर ओढत पडून फटीतून पाहत राहिला.येणारा जवळ येत थांबला असावा. त्याच्या पलंगापासुन पंधरा वीस फुटावरच.त्यानं डोळ्याआड येणारी चांदर धडधड रोखत हळुच बोटानं सरकवली. गुडघ्यात मान खुपसुन येणारा तो माणूस आता खाली बसला होता! त्यांच्या छातीत धडधड वाढली. अंगात थरथर उठली. मनातलं वादळ वेगळं! पण हे काही तरी विपरीत होतं! गावातला असेल तर इथं असा का बसला? केदार श्वास रोखत फटीतून एकटक पाहू लागला.गुडघ्यात मान घालत हातात बहुतेक मुसळ असावी; ती तो तालात जमिनीवर ठोकू लागला. केदारला धडधड व थरथर रोखणं जड जाऊ लागलं. तोच तो माणूस उठला. केदारच्या पलंगाजवळ आला व केदारच्या पायातीजवळ उभा राहिला. आताशी थंडी वाजणाऱ्या केदारला दरदरुन घाम फुटला. श्वास तर बंद असल्यासारखाच!केदार त्याचा चेहरा न्याहाळू लागला! पण फेट्याचा खाली लोंबणारा शेव त्यानं चेहऱ्याभोवती गुंडाळला होता. केदारला काहीच दिसेना! आता हा आपल्यावर मुसळ टाकतो की काय? निलेशला आरोळी ठोकत उठवावं का? पण त्याचा आवाजच निघेना. तोच
" मुक्ता तू असं वागायला नको होतं!"
केदारच्या पायातीला आवाज घुमला व त्यानं जोरानं मुसळ जमिनीवर आपटली व शाळेकडं निघाला. तो जस जसा पुढं सरकू लागला तशी केदारची मान व नजर त्याच्याकडं वळू लागली. तो दूर सरकला व केदारनं रोखलेला दम सोडला. त्याच्या अंगावरील कपडे घामाने ओलेचिंब झाले. तो सरळ चालत शाळेमागे निघून गेला. काही न करता.
.
.
.
पण सकाळ पर्यंत केदार झोपलाच नाही.
' मुक्ता तू असं वागायला नको होतं!' हे एकच वाक्य त्याच्या कानाभोवती घुमू लागलं.
.
.
क्रमशः
✒ वा......पा....