भाग ४
शेवट.....
आजोबांनी मनाशी चंग बांधला होता की स्वतःला काही अनुभव आल्याशिवाय कोणताही निर्णय घेयचा नाही. हा विचारांमध्ये त्यांना आजीचा विचार आला नाही. तिला या अवस्थेत होणाऱ्या त्रासाचा विचार आला नाही. त्या रात्री सगळे शांत झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी आजोबा खोलीबाहेर पडले तर त्यांना आजीची चप्पल दाराबाहेर दिसली. ते जरा अचंबित झाले हे इथं कस आलं हा प्रश्न त्यांना पडला. त्यांनी ती चप्पल उचलून दाराबाहेर नेऊन ठेवली. आजीला त्यांनी उठवलं आणि घडलेला प्रकार सांगितला. आजीला माहिती होत हे विश्वास ठेवणार नाहीत त्यामुळे तिने तो विषय टाळला. त्या दिवशी आजोबांनी सुट्टी घेतली आजीची तब्येत बरी नसल्याने घरची काम करायला त्यांची आई होतीच की!
रात्र झाली सगळे झोपायला गेले. आणि मध्यरात्र झाली असता आजोबांना रडण्याचा आवाज ऐकू आला. ते दचकून उठले तर शेजारी आजी शांत झोपली होती. तिला उठवणे योग्य नाही असे म्हणत आजोबा त्या आवाजाच्या दिशेने चालत गेले. खोलीबाहेर आले आणि समोरच्या बंद खोलीतून त्यांना आवाज येत होता. त्यांनी दरवाजा ठोठावला आणि त्याचवेळी आवाज शांत झाला. आजोबा जरा घाबरले पण भास असेल असं म्हणत दुर्लक्ष करीत आपल्या खोलीकडे वळाले आणि इतक्यात त्यांच्या पायामध्ये काहीतरी आलं ते खाली पडले. काय आलं पायात हे पाहायला त्यांनी मागे मान केली तर ते दृश्य पाहून आजोबा पुरते हादरले. त्यांच्या समोर दात विचकत स्मिता उभी होती. हो हो स्मिता च उभी होती. जीच्याबद्दल एवढं ऐकून देखील त्यांनी दुर्लक्ष केलं होतं स्वतःच्या बायकोवर विश्वास त्यांनी ठेवला नव्हता आता ती स्मिता आजोबांच्या समोर उभी होती. तिथे उभी राहून आजोबांकडे पाहत म्हणाली, मला तुझ्यासोबत लग्न करायचंय तुझी बायको आणि मी यावर बोललोय आम्ही दोघी बहिणीसारख्या राहू तुझा जर नकार असेल ना तर हे सगळं तुझ्या बाळाच्या जीवावर बेतेल लक्ष्यात ठेव.....
आजोबा तिथेच बेशुद्ध होऊन पडले. सकाळी त्यांच्या आईने त्यांना जाग केलं आणि उठताक्षणी ते म्हणाले, आपण हे घर आजच्या आज खाली करतोय खूप झालं इथं या जंगलात राहण. त्यांच्या आईला काही समजेना हे अस का बोलत आहेत त्यांनी आजीला पण सांगितले तू तुला लागेल ते वर काढून ठेव आपण हे घर सोडतोय.... आजी हळूच जवळ जाऊन म्हणाली, दिसली वाटतं तुम्हाला पण ती?
आजोबा निःशब्द झाले त्यांनी दोन गडी बोलावून घेतले सगळं सामान पोचवायला. आणि हे सगळं इतकं गडबडीत झालं होतं की कोणाला काहीच समजत नव्हतं काय होतंय ते. पण आजोबांना एवढं नक्की समजलं होत की या घरात धोका आहेच. संध्याकाळ पर्यंत ते घर खाली करून आजोबा सहकुटूंब क्वार्टर वर परत राहायला आले.
पुन्हा त्या बंगल्याकडे चुकून सुद्धा पाहणार नाही असा त्या दोघांनी निश्चय केला. पुढे त्या स्मिता च आणि त्या बंगल्याच काय झालं कोणास ठाऊक! पण इकडे येऊन आजी जरा खुलली होती. आनंदी वाटत होती. आजीला जरा बर वाटलं तिचा शेवटचा महिना होता दोन दिवस झाले होते त्यांना घर बदली करून की आजीला त्रास होयला लागला पोटात कळा येऊ लागल्या आजीला त्वरित हॉस्पिटलमध्ये नेलं आजोबा सोबत होतेच. OT च्या बाहेर सगळे थांबले होते आणि डॉक्टर बाहेर आणि म्हणाले, मला माफ करा साहेब पण मी आपल्या बाळाला नाही वाचवू शकलो ते फार अशक्त होतं आणि विचित्र गोष्ट अशी की जन्मलेल्या मुलाला एक पाय नव्हता.............
समाप्त.........
- तेजस काकडे

