चॅलेंज - भाग क्र -- 1️⃣
लेखन --शशांक सुर्वे
hii this is अनिता...जास्त बोलत नाही इथे खूप अंधार आहे काही दिसत नाहीय.. सुबोध ने दिलेला टास्क पूर्ण करण्यासाठी मी इथे आली आहे......तसही भूत ह्या गोष्टीवर माझा विश्वास नाहीय.....पण सगळ्यांनी आपलं आपलं चॅलेंज पूर्ण केलं आहे सो मी पण आली आहे ह्या भूतीया जागेत.......ह्या जागेबद्दल सांगायचं झालं तर इथे 100 वर्षांपूर्वी एक नरसंहार झाला होता......एका शेतात काम करणाऱ्या मजुरांची एकमेकांना ठार मारायला सुरुवात केली होती.....कारण काय होते कुणालाच कल्पना नाहीय....पण एक अमानवी शक्ती त्यांच्याकडून हे करवून घेत होती अस म्हणतात..काही अदृश्य शक्तींचा इथे वावर आहे अस काही पॅरानॉर्मल एक्सपर्ट म्हणतात मागे एका युट्युबर्सचा व्हिडिओ बघितला होता मी......आणि एका रिसर्च द्वारे ज्यावर माझा अजिबात विश्वास नाहीय......ती रिसर्च अस सांगते की कॅमेरामध्ये भूत कॅपचर होतात......आमची येडी गॅंग त्यावर विश्वास ठेवून मला हे चॅलेंज दिलं.....फोटो तर लांबच रात्री इथं येण्याच धाडस कोण करत नाही...सो मी मुलगी असून इथे आले........एक दोन फोटो क्लिक करून हे मी सिद्ध करून दाखवेन की मी कशालाच नाही घाबरत....सुबोध तुझं चॅलेंज पूर्ण करत आहे"
अनिताने आपला व्हिडिओ रेकॉर्ड केला.....आणि मोबाईल ठेवून दिला.....आणि तिने आणलेला टॉर्च सुरू केला.....त्याच्या उजेडात तिने पाण्याची बाटली पिऊन रिकामी केली.....तिथे जाऊन फक्त तिथले 10 फोटो क्लिक करायचं चॅलेंज होत.....तिने फटाफट वेगवेगळ्या अँगलचे 10 फोटो क्लिक केले....आणि त्या काळ्या अंधारातून बाहेर पडली....पायात मोठे दगड वैगेरे लागत होते...त्यात तिचा पाय लडबडायचा....पण स्वतःला सावरत ती चालत होती....अचानक काही फुटल्याचा आवाज आला..अनिताने लगेच खाली टॉर्च मारली....एक मडकं फुटलं होतं.....त्यात एक छोटी बाहुली...बारीकसारीक हाडे तिला दिसत होती....एक चुरघाळा केलेला टिशू पेपरही तिच्या नजरेस पडला.....हायवे पासून काही अंतरावर ती भुताटकीची जागा होती.....अनिताने आपली बाईक हायवेच्या कडेला पार्क केली होती.......टॉर्चच्या उजेडात झपझप पाय टाकीत ती चालत होती तसही तिचा भूत ह्या विषयावर विश्वास नव्हता तरी पण त्या अंधारात तिला घाम फुटला होता.....कोणीतरी आपल्या मागे आहे असं तिला वाटत होतं तशी तिची मान गर्रकन फिरून त्या आवाजाकडे लक्ष वेधीत होती......बॅटरीचं तोंडही त्या आवाजाच्या दिशेने फिरायचं......पण तिथे कोणीही दिसत नव्हतं...काहीतरी कुजबुजण्याचा आवाज तिला येत होता...पण हे सगळे भास आहेत किंवा त्या जागेचा प्रभाव अशी स्वतःची समजूत घालून ती पूढे चालू लागली.....पण तिला मिळालेलं चॅलेंज पूर्ण झालं होतं....अनिता मनोमन खुश झाली
"कसलं हे बावळट चॅलेंज... भूतीया जागा म्हणे....तरी बर सुनीताला दिलेलं तस शॉर्टस घालून कॉलेज मध्ये फिरण्याच चॅलेंज नाही मिळालं.....आता असे हे फोटो सुबोधच्या तोंडावर मारते"
अनिता आपल्या बाईक जवळ आली....कधीही न झोपणार ते महानगर....हायवे गाडीच्या लाईट्सने उजळून निघाला होता 11 वाजलेले तरी वर्दळ होतीच...एखादं घनदाट भयाण आरण्य पार करून गावात यावं तस तिला वाटत होतं....अनिता कानात हेडफोन घालून बाईक चालवत होती.....काही अंतरावर तिने गाडी बंद केली आणि ढकलत दारात पार्क केली दबक्या पावलांनी घरात शिरली....घरात तिचे बाबा आणि ती दोघेच....खूप मोठा बंगला....आणि शहरातील प्रतिष्ठित खानदान होतं अनिताच......नाही म्हणायला तिच्या बाबांनी तिला अगदी पूर्ण स्वतंत्र दिलं होतं....पण अनिता अजिबात स्वैर नव्हती.....त्या दिवशी ती झोपी गेली.....सकाळी उठताच तिने आपला मोबाईल चेक केला....फोटोही चेक केले.....काहीही असो तिला ते फोटो प्रिंट करून सुबोधला आणि तिच्या फ्रेंड्सना दाखवायचे होते.....तिने प्रिंटर वर सगळ्या फोटोजची प्रिंट काढली......परत एकदा नजर फिरवून तिने ते 10 फोटो टेबलावर ठेवले आणि अंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेली...एक वेगळीच खुशी तिच्या चेहऱ्यावर होती कारण 4,5 जणांनी चॅलेंज ऐकूनच हार मानली होती....सगळं आवरून तिने कॉलेजला जाण्यासाठी बॅग भरली.....तिने ते फोटो उचलले आणि वरचा एक फोटो बघून तिला धक्काच बसला....सगळ्यात वरच्या फोटोत तिला काहीसं अमानवी दिसलं.....एक पांढऱ्या रंगांची आकृती तिच्याकडे डोळे रोखून बघत होती..सकाळी जेव्हा तिने मोबाईल मध्ये फोटो चेक केले होते तेव्हा त्या फोटोत अस काहीच नव्हतं....अनिता क्षणभर घाबरली.....तिने तो एक फोटो लपवला आणि कुणी ऑब्जेक्शन काढू नये म्हणून दुसरा एक फोटो रोटेट करून परत प्रिंट काढून ती कॉलेजमध्ये आली.....ठरल्याप्रमाणे तिने आपले चॅलेंज पूर्ण केला होते....ठरल्याप्रमाणे त्या भयानक जागेचे 10 फोटोस तिने दिले होते.....तिचा दिवस आनंदात गेला आता ह्या चॅलेंज स्पर्धेतून तिची सुटका झाली होती.....ती घरी जाण्यासाठी निघाली ....तीची एक मैत्रीण तिच्या बरोबर होती पण मैत्रिणीच्या बोलण्याकडे अनिताच लक्ष नव्हतं कसल्या तरी विचारात ती चालत होती अचानक चालता चालता ती किंचित ओरडून खाली बसली.....अनिताच्या मैत्रिणीने तिला उठवलं.....आपल्या बुटाकडे ती बघू लागली बुटाला कसलातरी लाल रंग लागला होता आणि एक टाचणी तिच्या पायात घुसली होती अनिता ने ती टाचणी ओढून काढली......आणि काहीशी लंगडत ती घरी आली....तिने बुटाला लागलेला तो कुंकू पाण्याने धुण्याचा प्रयत्न केला पण तो रंग जातच नव्हता....शेवटी बूट काढून अनिता घरी आली......आणि तिला त्या फोटोची आठवण झाली तिने परत तो फोटो बघितला....आता ती खूपच घाबरली कारण त्या फोटोत 5 भयानक आकृत्या दिसत होत्या ....आणि आता तर जरा जास्तच जवळ आल्यासारख्या वाटत होत्या....गोंधळलेल्या अनिताने तो फोटो फाडायचा प्रयत्न केला...पण साधा कागद तिला फाटत नव्हता.....शेवटी तिनं आपली सगळी ताकत एकवटली आणि तो कागद फाडला.....तुकडे तुकडे करून जमिनीवर फेकले.....बाजूला ठेवलेल्या बॉटल मधून तिने पाणी पिल...अनिताच लक्ष परत त्या फडलेल्या कागदी तुकड्यावर गेलं....ती घाबरली होती कारण त्या तुकड्यांची हालचाल सुरू झाली.....अनिता घाबरून आत पळाली.....आणि तिने दार लावून घेतलं.....ती बेड वर सगळ्या घटनेचा विचार करत होती... दरवाजा वाजू लागला अनिता अजून घाबरली.....तिने मोबाईल हातात घेऊन तिच्या वडिलांना फोन लावायचा प्रयत्न केला.....पण दरवाज्या खालून काळा धूर तिच्या खोलीत येऊ लागला.....पायात कळ वाढू लागली...तीच लक्ष पायाकडे गेलं.. तिच्या टाचणी घुसलेल्या जागेतून रक्त वाहू लागलं......प्रचंड वेदनेने ती किंचाळली......तिला असह्य वाटू लागलं....कुणीतरी तिचे हात पाय पकडल्यासारखं तिला वाटत होतं........तिच्या पूर्ण खोलीत काळा धूर भरला होता...वावटळाप्रमाणे फिरणाऱ्या त्या धुरात कधी कधी दिसणारे डोळे तिला भीती घालत होते....तिचं तोंड उघडच होतं......आणि हळूहळू तो धूर तिच्या नाकातोंडात जाऊ लागला.....अनिता तडफडत होती....ही तडफड हळूहळू शांत होऊ लागली....शेवट अशक्त होऊन ती बेशुद्ध पडली.....खाडकन दार उघडले......काही वेळानंतर अनिता उठली......जाग येताच मान फिरवून सगळीकडे नजर फिरवू लागली....एक भयाण पुरुषी आवाजातील हसू तिच्या तोंडून बाहेर पडल....चालण्यात बदल झाला होता....टाचा न उचलता पाय घासत ती चालू लागली......अनिताला तिच्या वडिलांचा आवाज आला
"अनिता....कुठे आहेस जेवून घे जेवण थंड होईल"
तशी अनिता डायनिंग टेबलवर बसली तिचे केस विस्कटलेले होते..नेहमी टापटीप राहणाऱ्या अनिताचा आजचा अवतार बघून तिचे वडील कुमार ह्यांना सगळं विचित्र वाटत होतं..त्यानी अनिताला एकदोन वेळा हाक मारली पण तिने त्या हाकेला प्रतिसाद दिला नाही..अनिताने बाजूचा काट्याचा चमचा उचलून टेबलावर आपटायला सुरू केला..काहीतरी वेगळंच वागत होती आज..कुमार यांना तिची काळजी वाटू लागली
"अनिता काही होतंय का तुला??....अशी का वागत आहेस"
अनिता ने मान फिरवून कुमार कडे बघितलं आणि तो काट्याचा चमचा आपल्या स्वतःच्या हातात खुपसला.....अनिताच्या हातातून रक्त वाहत होतं....काट्याचा चमचा तिच्या हातात घुसला होता पण अनिताच्या तोंडून एकही अक्षर बाहेर आलं नाही.....कुमार यांनी तिला पकडलं.....आणि आपल्या नोकराकडे बघत जोरात ओरडले
"रामू जा लवकर डॉक्टरांना फोन लाव....अनिता....अनिता बाळ काय होतंय तुला काय करत आहेस हे".....
कुमार यांनी अनिताला पकडून खुर्चीवरून उठवण्याचा प्रयत्न केला पण ती जागची हालत नव्हती......तिच्या तोंडून काहीसा गुरगुरण्याचा आवाज येत होता.....तिच्या वडिलांना तिची काळजी वाटू लागली.....त्यांनी परत तिला उठवण्याचा प्रयत्न केला पण ती जागची हालत नव्हती.....काहीशी विचित्र गावंढळ भाषेत बोलत होती.....तिच्या हातातून रक्त येतच होत....कुमार यांनी त्यावर आपला रुमाल दाबला......तिच्या तोंडून वेगवेगळे आवाज येत होते अगदी 5 वेगवेगळे व्यक्ती एकाच तोंडून बोलत आहेत तसे.....काही वेळाने डॉक्टर आले.....
कुमार यांनी अनिताला पकडून खुर्चीवरून उठवण्याचा प्रयत्न केला पण ती जागची हालत नव्हती......तिच्या तोंडून काहीसा गुरगुरण्याचा आवाज येत होता.....तिच्या वडिलांना तिची काळजी वाटू लागली.....त्यांनी परत तिला उठवण्याचा प्रयत्न केला पण ती जागची हालत नव्हती.....काहीशी विचित्र गावंढळ भाषेत बोलत होती.....तिच्या हातातून रक्त येतच होत....कुमार यांनी त्यावर आपला रुमाल दाबला......तिच्या तोंडून वेगवेगळे आवाज येत होते अगदी 5 वेगवेगळे व्यक्ती एकाच तोंडून बोलत आहेत तसे.....काही वेळाने डॉक्टर आले.....
"अहो डॉक्टर ही बघा कशी करतेय अहो अशी का वागतीय माझी पोर"......
डॉक्टरांनी तिचा हात पकडला तसा अनिताने डॉक्टरांना जोराचा धक्का दिला डॉक्टर खुर्ची सकट खाली कोसळले......अनिताने जोराची किंचाळी फोडली.....त्या किंचाळीने पूर्ण घर शहारल....टेबलावरचे ग्लास त्या आवाजने खाली पडले.....आधीच वयस्कर असलेले डॉक्टर कसबस उठले त्यांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये फोन केला.....त्यांनी इशारा करून कुमार यांना बाजूला व्हायला सांगितले....तसे कुमार बाजूला झाले.....अनिता गुरगुरत होती....तिचे केस मोकळे होते त्यामुळे तिचा चेहरा दिसत नव्हता.....तिच्या हातात तो काटा चमचा तसाच घुसला होता.....तिने समोर ठेवलेल्या भाताच्या भांड्यात हात घातला तिच्या हातावरच रक्त त्या भातात मिसळत होत....तिने मुठीने भात उचलून आपल्या तोंडात घालायला सुरवात केली......रक्त ओघळून तिच्या कपड्यावर सांडत होत....काही क्षणात तिने ते भाताच भांडं रिकाम केलं
"ए रांxच्यानो मटण नाही का केलं आज....मला मटण पाहिजेल....मटण....नाहीतर तुमच्या पोरीला खाऊन टाकीन मी"
एक पुरुषी आवाज अनिताच्या तोंडून बाहेर पडला आणि कुमार आणि बाजूला उभे असलेले डॉक्टर घाबरले.....
"दिनेश अरे कुठंपर्यंत पोहोचला तुम्ही??...या लवकर"
"दिनेश अरे कुठंपर्यंत पोहोचला तुम्ही??...या लवकर"
शांतता भेदत एक ऍम्ब्युलन्स कुमार ह्यांच्या बंगल्याजवळ आली त्यातून 4-5 कर्मचारी बाहेर पडले.....अनिता दात दातावर आपटत काहीतरी बडबडत बसली होती.....येणाऱ्या हॉस्पिटल कर्मचाऱ्याकडे बघून अनिता परत जोरात किंचाळली....त्याच बरोबर ते कर्मचारी मागे सरकले..भरड्या आवाजातली किंचाळी थरकाप उडवणारी होती....ते चार लोक भिंतीला टेकत टेकत डॉक्टरांच्या जवळ आले...डॉक्टर त्यांना जवळ घेऊन काहीतरी बोलले आणि ते कर्मचारी अनिता जवळ आले.....त्यांनी अनिताला पकडले....त्याच बरोबर तिने गर्रकन मान फिरवली.....आणि काहीसं कन्नड भाषेत ती बोलून हात झटकू लागली.....त्याच बरोबर ते कर्मचारी खूप घाबरले....एखाद्या बैलाने शिंगानी उचलून फेकावे असे काहीसे दृश्य होते....कुमार आणि 4 कर्मचाऱ्यांनी अनिताला घट्ट पकडलं होतं.....पण त्याना ती आवरत नव्हती.....कर्मचारी आणि कुमार यांनी तिचे हात घट्ट पकडले..एखादा हॉस्पिटल कर्मचारी खाली कोसळायचा परत अनिताला पकडायचा......आता तिने डायनिंग टेबलवर डोकं आपटायला सुरवात केली...डायनिंग टेबलच्या काचेला हलकाच तडा गेला....डॉक्टरांनी इंजेक्शन तयार केलं....आणि अनिताच्या दंडात खुपसलं.....तरीही ती डायनिंग टेबलवर डोकं आपटत होतीच.....काही वेळाने ती शांत होऊ लागली....तसे ते कर्मचारी मागे सरकले.....अनीताने मान टाकली....कुमार थरथरत होते आपल्या मुलीची अवस्था त्यांना सुन्न करणारी होती......ते थरथरत डॉक्टरांच्या जवळ आले....ते काही बोलणार इतक्यात डॉक्टर त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले
"डोन्ट वरी मिस्टर कुमार.....काहीसा धक्का बसला आहे तिला...ते फिट्स वैगेरे येतात ना तसला काहीसा प्रकार....बहुतेक कसला तरी मानसिक आजार दिसतोय.....मी तिला झोपेचे इंजेक्शन दिलं आहे....उद्या मी मानसोपचारतज्ञ मिस्टर विजयन यांना पाठवतो चेकपसाठी"
कुमार ह्यांनी अनिताच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला.....तिच्या तोंडाला सगळीकडे भात चिटकलेला होता तो त्यांनी पुसून काढला....काही कर्मचाऱ्यांच्या साथीने तिला तिच्या खोलीत झोपवल....डॉक्टरांनी अनिताच्या जखमी हातावर मलमपट्टी केली......काहीसा गुगुरण्याचा आवाज अजूनही तिच्या तोंडातून येत होता
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी कुमार लवकर उठले.....आपल्या पोरीची काळजी त्यांना होती....डॉक्टरांनी सांगितल होत की इंजेक्शनचा प्रभाव 16 तास तरी राहील.....कुमार दार उघडून आत आले.....अनिता भिंतीकडे तोंड करून उभी होती.....तिच्या तोंडून तो भयानक आवाज परत घुमला....कुमार ह्यांनी जरासं धाडस करत तिच्या जवळ जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला......अनिताचे अंग प्रचंड गरम झालं होतं.....अनिताने त्यांच्याकडे बघितलं.....आणि जोरात किंचाळली.....कुमार ह्यांना ढकलून ती बाहेर पळाली......तिच्या मागे तिला सावरण्यासाठी कुमार पण धावू लागले.....त्यांनी मोबाईल मधून डॉक्टरांना फोन लावला......तोपर्यंत अनिता बंगल्यातुन बाहेर पळाली होती.......तिच्या मागे कुमार येत होते....अनिता बाहेर रस्त्यावर उभी राहून सूर्याकडे बघत होती.....कुमार ह्यांचे अनिता जवळ जायचं धाडस होत नव्हतं.....कुमार ह्यांच्या फोन कनेक्ट होत नव्हता.....अनिता बरोबर रस्त्यामध्ये उभी होती.....आजूबाजूला लोक सकाळी सकाळी जॉगिंगला जात होते....सगळ्यांची नजर विस्कटलेले केस असलेल्या अनितावर होती....एकदोन बाईक वाले स्पीड मध्ये येऊन तिला घासून गेले होते...रस्त्याच्या मध्ये ती उभी होती....अनिता अक्राळविक्राळ हसू लागली......लोक तिच्याकडे बघत होते..अनिता आपले विस्कटलेले केस हाताने ओढू लागली....ती भरड्या पुरुषी आवाजात काहीतरी बडबडत होती....तिने जोरात आपले केस ओढायला सुरवात केली...मुळापासून केस उपटून निघत होते...काही केस तिच्या हातात अडकले होते काही खाली पडले होते...जोरात ओढल्यामुळे काहीसं रक्त तिच्या डोक्यातून वाहत होत...तिकडे कुमार ह्यांचा फोन अजून कनेक्ट होत नव्हता......काहींचे मोबाईल ते सगळं शूट करत होते....."कुमार ह्यांची मुलगी असा वेडेपणा करते" ही एक मोठी गोष्ट त्यांच्यासाठी होती......"अरे येडी झाली का ही?" काहीसा दबका आवाज त्या गर्दीतून आला......अनिता त्या गर्दीकडे बघून हसत होती.... तिने आपल्या अंगावरचे कपडे फाडायला सुरवात केली आपला टी शर्ट तिने फाडून टाकला.....आणि जीन्स काढून फेकली.....आता ती फक्त आपल्या अंतर्वस्त्रात उभी होती.....बायकांचे हात तोंडावर गेले होते......तिने आकाशाकडे बघत एक मोठी किंचाळी फोडली......आणि तिकडे तोंड करून डॉक्टरांशी कॉल वर बोलत असणाऱ्या कुमार ह्यांची नजर अनिता वर पडली....तिला त्या अवस्थेत पाहून त्यांनी बाजूचा पडदा ओढला आणि धावत जाऊन अनिताच्या अंगावर गुंडाळला......ते तिच्या अंगाभोवती पडदा गुंडाळून रडू लागले......अनेकांच्या कॅमेऱ्यामध्ये हा व्हिडिओ टिपला जात होता....इतक्यात ऍम्ब्युलन्स आली डॉक्टर खाली उतरले आणि त्यांनी परत अनिताला बेशुद्धीच इंजेक्शन दिलं......तशी ती बेशुद्ध झाली.....नर्सेसची एक टीम आली होती त्यांनी अनिताला उचलून गाडीत घातलं......कुमार रडत होते अचानक झालेली आपल्या मुलींची अवस्था त्यांना असह्य करीत होती......गर्दीत उभे असलेले ओळखीचे लोक त्यांना धीर देत होते......ऍम्ब्युलन्स बरोबर कुमार दवाखान्यात गेले........नर्सेसनी अनिताचे कपडे चेंज केले होते.....डॉक्टर तिचं चेकअप करीत होते....अनिताच्या तोंडून परत तो गुरगुरण्याचा आवाज येत होता......कुमार कासावीस होऊन आपल्या मुलीबद्दलची विचारपूस करत होते
"काळजी करू नका मिस्टर कुमार.....आम्ही योग्य ती ट्रीटमेंट करत आहोत.....आज दिवसभर आम्ही तिच्या सर्व टेस्ट घेतल्या सगळ्या टेस्ट नॉर्मल आहेत.....काहीतरी तीव्र धक्का बसला आहे तिला त्यामुळे ती जरा वेगळं वागत आहे....तुम्ही घरी जा मिस्टर कुमार सकाळ पासून तुम्ही इथेच आहात आता रात्र होत आली.....आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू तुम्ही काळजी करू नका....एक पूर्ण टीम इथे ठेवली आहे आम्ही"
डोळे पुसत कुमार घरी आले.....त्यांचं कशात लक्ष नव्हतं.....हॉल मध्ये येताच एक लाल साडी घातलेली स्त्री त्यांच्या समोर सोफ्यावर आरामात बसली होती....तिच्याकडे बघून काहीश्या आठ्या कुमार ह्यांच्या कपाळावर उमटल्या.........(क्रमशः)
✍️लेखन-- शशांक सुर्वे