माया
भाग - १७
लेखन : अनुराग
शेखरच्या घरात दडून बसलेल्या किर्तीकरांना एव्हाना शुद्ध यायला लागली होती. जे घडले, ते अत्यंत दुर्दैवी होते. आणि जे घडतंय, त्याला थांबवायचा काही उपाय आत्ता तरी नाहीये. दिवस भीतीच्या सावटाखाली, तर रात्र मृत्यूच्या दारात उसनं पडलेल्या श्वासारखी होत होती. त्यांनी एकदा आपली पिशवी पहिली. त्यात भरपूर गोष्टी होत्या, पण त्या आता उपयोगी नव्हता. अर्ध्याहून अधिक आनंद आता त्या दुष्ट शक्तीच्या ताब्यात गेला होता.
" त्याचं काम झालं, की तो आनंदच शरीर छिन्न-विच्छिन्न करून सोडून देईल." ते हतबल होऊन म्हणाले.
"हो, त्यांना त्याच्या कचाट्यातून बाहेर काढावं लागेल...!" नर्मदाही तितकीच हतबल होती. एवढ्यात दारावर कोणीतरी आलं.
" बरं झालं, तुम्हाला बरं वाटलं...! कोणाला घेऊन आलात बुवा तुम्ही गावात, कोण ए हा ?" दिगंबर त्यांना चहा घेऊन आला.
" हे तोच सांगू शकतो...! आणि त्याचा या गावाशी काहीतरी मोठा संबंध आहे." हे बोलताना त्यांना दम लागत होता.
" पण बुवा, असं कुठवर चालणार, त्याला जेरबंद करायलाच हवा. नाहीतर सारा गाव...!"
सूर्योदयापासून अस्ता पर्यंत त्याला पकडणे शक्य होते. पण याच्याने तो फक्त सापडला असता. त्याचं नेमकं उद्धिष्ट कळणे गरजेचे होते. तो एका जिवंत माणसात अगदी निर्धास्त वावरत होता. दिवसा त्याच्या हालचाली दिसत नव्हत्याच. गावातलं कुणी मदतीला येईल असं वाटत नव्हतं. हा त्रागाही शेखरला एकट्यानेच पेलायचा होता. सोबत दामोदर होता. पण ही माणसाची माणसाविरुद्ध लढायची लढाई अजिबात नव्हती. तरीही हे धाडस करणे भाग होते.
" ही जागा माहितेय मला." शेखरने दामोदरला तो वाडा दाखवला. " परिसरात क्रांतिकारी सापडले, की इथे अत्यंत निर्घृणपणे त्याचा छळ करण्यात येई. बऱ्याच जणांना इथे फासावर देण्यात आले आहे. धर्माच्या दृष्टीने अत्यंत कमकुवत जागा आहे. असं म्हणतात, त्या ठिकाणी असे अकाली किंवा अनैसर्गिक मृत्यू झालेले असतात. ती जागा शापित असते. इथे संताप आणि भय वावरते. त्याने जागा बरोबर निवडली आहे.
"अग्निस घाबरतो तो..!" शेखरला स्वतःचा अनुभव आठवला. दोघेही वाड्याच्या मागच्या बाजूला गेले. तो भाग तसा अर्ध्याहून अधिक पडलेला होता. साप, विंचू ,सरडे मुक्त वावरत होते. थोडाही उजेड नव्हता. पण तो एका मोठ्या दगडी बाकावर बसलेला त्यांना दिसला. त्याचा तोरा थोडा माजोरडा वाटला. आभाळाकडे तोंड करून ,दोन्ही हात त्याने बाकाच्या टेकुला लावले होते. त्याचा चेहरा मात्र दिसत नव्हता. दोघेही एकदम शांत होते. पण आज दामोदर एक वेगळा विचार करून आला होता.
"ऐका माझं, मी त्याच्या समोर जातो."
"कशाला ? जीव जड झालाय का ? "
"तो मला नाही मारू शकत..! माझ्याशी त्याचं काहीच वाकडं नाहीये. तो मला ओळखतही नाही."
"याची खात्री देता येईल का तुम्हाला?" यावर दामोदर शांत बसला. दोघेही त्याच्या हालचालीकडे शांतपणे पहात होते.
अर्धी रात्र उलटली. त्याच्या डाव्या बाजूने हालचाल होऊ लागली. तो उठला, आणि एक अंधारल्या कोपऱ्याकडे सरकू लागला.
" मूर्ख आहेस तू...? " तिथे अजून कुणीतरी होते हे कळल्यावर दोघांना घाम फुटला.
" तेव्हाही फुकट मेलास, आत्ताही फुकट मरशील...!" आणि तो हसू लागला.
"कित्येक वर्ष गावात भटकतोयस. कोणीतरी येईल, तुला या त्रासातून सोडवेल. आलं का रे कुणी..?" तो एका माणसाशी बोलत होता हा अंदाज शेखर आणि दामोदरला आला. "नसतं येत कुणी...! मी येऊ देणार नाही." आता तो मांडी घालून जमिनीवर बसला.
" सांग न, कुठंय तुझा मुलगा ? तुलाच ठाऊक असेल न ? तो मेला, पून्हा जन्माला आला, आणि आता पून्हा मरेल, इथेच आणून मारेल...!"
त्याने चिडून त्या कोपऱ्याकडे पाहिले. तिथून काळीज चिरलं जाईल, एवढी जोरात आरोळी ऐकू आली.
" तुला यायचा तो मृत्यू येऊन गेला रे, आत्ता फक्त तुझ्या वाट्याला भोग आहेत." कोणीतरी कोपऱ्यातून बोलले. "माणसाच्या जन्माला शाप ए तू ! मेल्यानंतर नरकातही जागा मिळाली नाही, तरी तुझ्या पापी आत्म्याला अक्कल नाही आली." त्या आवाजात तळतळाट होता, अभिशाप होते. काहीतरी अत्यंत दुर्दैवी घडून गेल्याची जाणीव होती. पण या बोलण्याने तो मात्र दुखावला. त्याने तडफडून जोरात आरोळी ठोकली. त्याने शेखर आणि दामोदरलाही कानठळ्या बसल्या. नकळत शेखरने त्याच्या हाताला असलेली काडी उगाळली आणि बाजूला असलेल्या सरपणाला आग लावली. दोघे पळत सुटले.
" कशाला आग लावली." पळता-पळता दामोदरने त्याला विचारले.
" माहित नाही , कोणाला तरी बळजबरीने त्याने बांधून घातले होते, मला नाही आवडले.त्रास झाला." दोघे गावातल्या एका मोठ्या चौकातील एका भिंतीमागे लपले.
" पहाटेपर्यत याला थोपवावं लागेल. कोणी घराबाहेर यायला नको फक्त." दामोदर बोलला. दोघेही घामे-घुम झाले होते.
एका मशालीच्या तोडक्या उजेडात तो दोघांना दिसत होता. पूर्ण पांढरा पडलेला चेहरा ! पूर्ण त्वचा कोरडी पडली होती. स्वतःला करून घेतलेलं घाव ही वाळले होते. डोळ्यातली बुबुळं लालसर झालेली. अंगावरचे कपडे लोंबत होते. अंगात जोर मात्र एखाद्या हिंस्त्र जनावरसारखा होता. तो त्यांच्या अगदी जवळ आला. आता मात्र याचा सामना करण्यावाचून पर्याय नव्हता. दामोदरने शेखरच्या कानात काहीतरी सांगितले. शेखरला हे अजिबात पटले नाही. पण दोघांना जीव वाचवणे गरजेचे होते.
दामोदर अचानक त्याच्या समोर आला.
"कोण आहेस कोण तू?" दामोदरच्या या प्रश्नावर त्याने काहीच उत्तर दिले नाही.
" तुला विचारतोय, कोण आहेस तू?"
" तू माझ्या गावात आहेस, माझ्या समोर...!" त्याने अत्यंत किसळवण्या आवाजात उत्तर दिले.
" तू या गावचा असतास, तर असा लोकांना मारत फिरला नसता." दामोदरच्याही अंगात आता बळ आले होते. शेखर आपल्या जागेवरून निघाला होता. याला बंदिस्त करायची ही कदाचित शेवटची संधी होती. दमोदर तोंड फिरवून चालत निघाला.
" कुठे जातोयस...?" दामोदरचं असं पाठ दाखवणं त्याला सललं. दामोदर काहीही बोलला नाही. झपझप चालत निघाला. तोही त्याच्या मागोमाग चालत होता.पण ज्या शरीरावर तो अवलंबून होता, त्या शरीरात बळ राहिले नव्हते.
थोडं पुढे गेल्यावर दामोदर थांबला. त्याने वळून पाहिले.
"इथेच, इथेच आणायचे होते तुला...!" आधीच तयार असलेल्या शेखरने मारुती मंदिराचा गाभाराच उघडला. आतून नर्मदेने जोर-जोरात घंटा वाजवायला सुरवात केली. अचानक घंटा वाजू लागल्याने त्याला असवस्थ वाटू लागले. तो पळायच्या प्रयत्नात असतानाच अचानक त्याच्या आजूबाजूला आग लागली. दामोदरने उभं करतानाच त्याला त्या वलयात उभं केलं होतं. एकाच वेळी घंटा, अग्नी, आणि येऊ घातलेला ब्रम्हमुहूर्त यामुळे त्याची शक्ती क्षीण होत गेली. पहिल्यांदाच कदाचित त्याला भय कसे असते, हे समजू लागले.
" तू रहात असलेले शरीर कृश करत चालला आहेस. तुझे काम झाले, की तुला याची गरज नाही. तू अर्धपिशाच योनीत आहेस." कीर्तिकर पहाटे सूर्योदयापूर्वी बाहेर आले.
" काट्यातून, दगडातून, धडपडताना कित्येक जखमा झाल्यात त्या शरीराला. आणि तू, मूर्ख. अरे, हे शरीर जर तुला आज, आत्ता इथे सोडून गेले, तर तुझे अस्तित्वच संपून जाईल."
" माझं काम होऊ दे, मी स्वतः हे सोडून देईल. तो पर्यंत, मला त्रास देणाऱ्याला असंच मरावं लागेल...!" त्याचा आवाज पार खोल गेला होता.
" तुला वाटतं आम्ही ते होऊ देऊ..?"
कीर्तिकरांच्या डोक्यात काय सुरु होतं, हे त्यांचं त्यांनाच माहित. पण सुरु असलेला मृत्यूचा तांडव काही काळापूर्ती थांबला होता. अत्यंत घायाळ, दुर्दशा झालेलं आनंदचा देह तीळ-तीळ संपत चालला होता. त्याला पुनर्जीवित करण्यासाठी याच्याकडून त्याला सोडवणे भाग होते.
....
माया
भाग -१८
लेखन : अनुराग
लेखाची सुधारत चाललेली स्थिती थोडेसे आभाळ अजूनही आपल्यासाठी मोकळे असल्याची जाणीव करून देत होते. डोळे उघडे ठेवून छताकडे तासनतास बघणारी तिची निरागस दृष्टी काहीतरी शोधत असायची. तिच्या आजूबाजूला वावरण्यात कोणताही धोका नव्हता. काशीचीही भीती पळाली होती. गेल्या काही दिवसात घडलेल्या घटना भविष्यासाठी अत्यंत दुर्दैवी होत्या. कोणा तिऱ्हाताला सांगितले असते, तर सहज विश्वास बसला नसता. नातेवाईकांचे, मित्र-मंडळींचे येणे-जाणे जवळ-जवळ बंद झाले होते. पूर्ण घराला एक कळा आली होती. रस्त्यावरून येणारे-जाणारे संशयाने बघत. बाबांचे बाहेर जाणे फारसे होत नव्हते. पण चौकश्या करणाऱ्यांनी काशीचे जगणे मात्र अवघड करून सोडले होते. ती इमानी होती, धाडसीही होती. पण संशयी वृत्तीचे लोक जगातील कोणत्याही धडसाचा लीलया फज्जा उडवीत असतात. इथेही काहीसे असेच होते.
"पूढे काय वाढून ठेवलंय, देवालाच माहित !" बाबा हळू-हळू हतबल होत होते.
"काही नाही, थोडं थांबावं लागेल. वाईट व्हायचं असतं, तर आत्ताच झालं असतं." काशी त्यांना मधून-मधून धीर द्यायची. " असं हात-पाय गाळून चालायचं नाही !" तिच्या डोक्यात काय चाललं होतं हे बाबांना नेमकं कळत नव्हतं. पण ती जे काही करणार होती ते सगळ्यांच्या भल्याचंच असेल, हे ही बाबांना ठाऊक होतं.
मंदिराच्या आवारात मधोमध आनंदला एका सुरक्षा चक्रात झोपवून आजूबाजूला सगळे बसून होते. गावात या बद्दलच्या चर्चेचे उत उठत होते. बळी गेलल्या लोकांच्या घरातून येणारा सुडाचा सूर वेगळा होता. कीर्तिकर आणि नर्मदाकडे कोणाच्याच प्रश्नाचे काहीच उत्तर नव्हते. तिथे असलेला दामोदरसुद्धा काही सांगू शकत नव्हता. आनंदच्या शरीरात त्याचे स्वतःचे प्राण थोडे शिल्लक होते. पण ते सगळे तो नराधम वापरून गावात उच्छाद मांडत होता. त्याला थांबवणे काहीसे अशक्य होते.
शेखर त्याच्या ठाण्यात बसला होता. आता रात्री सहसा तो घरी जात नव्हता. सगळे कर्मचारी सूर्यास्त झाला की आप-आपले घरी निघून जात होते. तो मात्र तासनतास तसाच बसून असायचा. बऱ्याचदा त्याला झोपही तिथेच लागायची. आज वारा नव्हता. हवेत काहीतरी उदासीनता होती. एकही कोडं सुटत नव्हतं. उलट समोर होणारे प्रकार पाहून त्याला स्वतःच्या नाकर्तेपणावर संताप होऊ लागला होता. एकाएकी एक वाऱ्याची झुळूक त्याच्या पायापाशी घोंगावू लागली. बाहेरचा थोडासा कचरा आत येऊ लागला. हवा वाहू लागली आणि क्षणात वाढून वादळं होऊ लागले. आपल्या खुर्चीवरून उठून तो खिडक्या लावायच्या म्हणून बाहेर आला. त्याने बाहेर नजर टाकली. बाहेर कुणीही नव्हते. पण कोणाच्या तरी चालण्याचा आवाज त्याला आला. तो चार पायऱ्या खाली उतरला आणि फाटकाजवळ त्याला तोच म्हातारा दिसला.
'हा कोण आहे...! पाहिल्या दिवशी दिसला, नंतर त्या बंगल्यावर यानेच आपल्याला...आणि आता इथे !' क्षणाचाही विलंब न करता शेखर त्याच्या दिशेने झपझप चालायला लागला. तो म्हातारा अत्यंत शांत चित्ताने पुढे चालू लागला. चालत तो मुख्य रस्त्यावर आला. भीतीमुळे आधीच सगळे मोकळे होते. पण रस्त्यावरच्या मशालीत तो म्हातारा आणि त्याची दिशा शेखरला स्पष्ट दिसत होती. एका वळणावर तो म्हातारा दिसेनासा झाला. शेखरने आजूबाजूला पहिले आणि त्याला धक्का बसला. तो बंगल्याच्या दारापाशी येऊन थांबला होता. त्या म्हाताऱ्याने त्याला तिथे आणून सोडले होते. कदाचित हा एखादा संकेत असावा. न भिता शेखर आत गेला. त्याने खिशात असलेल्या किल्लीने मोठे दार उघडले. एका खिडकीतून चंद्राचा उजेड आत येत होता. त्या उजेडात शेखरला जमिनीवर पडलेली असंख्य कागदं दिसली. ती त्याच वहीची कागदं असावीत हा अंदाज शेखरला आला. त्याने सगळा पसारा आवरला, एकसारखा केला आणि तो बाहेर पडला.
"ही तिची आत्मकथा असावी !" शेखरने दामोदरला बोलावून घेतले. " कदाचित, या सगळ्याचा त्याच्याशी काही संबंध...?"
" असू शकतो. तुम्ही हे सगळं वाचा...!" ठाण्यात एका मेजावर बसून दामोदर ती वही वाचू लागला. कोणत्याच कागदावर तारीख किंवा क्रमांक नव्हता. एक-एक कागद मोकळा होता. वाचता-वाचता दामोदरसमोर नवीन पात्र उभी राहू लागली. भीमा, रावसाहेब, सुभान आणि ज्याचा सारखा उल्लेख होत होता, तो सर्जा...! साधारण तीन-चार तासांत थोडीशी कडी उलगडू लागली.
" हे सगळं आपल्या समजुतीपलीकडे आहे." अर्धवट झोपेत असलेल्या शेखरला त्याने उठवले.
"म्हणजे ?" अंग झटकत शेखरने विचारले.
" तिने एवढ्याश्या आयुष्यात खूप काही सोसलं. आणि तिला आलेलं मरण...! त्याचा कुठेच ठाव-ठिकाणा लागत नाहीये. ती अजूनही बंगल्यात का आहे, याचे उत्तर सुद्धा यात कुठेही नाहीये. ते मंदिरातले लोक , तो नरपिशाच, काही-काही संबंध लागत नाहीये ! "
"पण मग ही पानं आपल्यासमोर मांडण्याला काय अर्थ आहे."
" अगदीच निरर्थक आहेत असेही नाही. तो बंगला आणि गावात घडणाऱ्या घटनांचा काहीतरी संबंध असावाच !"
आनंदला असं पडलेलं पाहून सुमनने टाहो फोडला. एकुलता-एक पोरगा असा मृत्यच्या दारात पाहून पंतांचेही काळीज फाटले.
" त्याचा जीव वाचावा, म्हणून त्याला इथवर आणलंत बुवा तुम्ही...! आणि आता ?" पंतांचा रोष किर्तीकरांवर निघत होता.
" पंत, वेळ आली, म्हणून तुम्हाला आणि बाईंना बोलावून घेतलं." त्यांना घेऊन आलेला दिगंबर बाजूलाच उभा होता.
" तुम्हाला आधीच सावध केलं होतं. अगदी जन्म झाल्यापासून याच्या मागे लागलेलं शुक्लकाष्ट आपल्याला माहिती आहे." किर्तीकरांनी आपली बाजू स्पष्ट केली.
मारुतीमंदिराच्या गाभाऱ्यातला दिवा अखंड सुरु होता. तो एकंच आधार आता उरला होता. रामरक्षेचे पठणही अखंड होते.
त्यारात्री दामोदर ती वही घेऊन मंदिरापाशी आला. झोपलेल्या आनंदच्या शेजारी जाऊन त्याने ती एका लाल कापडात ठेवली. आणि हळू आवाजात वाचायला सुरुवात केली. तास भर त्याने वाचन सुरु ठेवले. कुठेही काहीही हालचाल दिसली नाही. भीमाचा मृत्यू, सर्जाला बंगल्यावर आणून त्याची जवाबदारी, रावसाहेब आणि त्यांचे क्रांतिकारी, खंडेराव असे एक-एक नाव समोर यायला लागले. सर्जाचाही मृत्यू झाला.
अचानक आनंदच्या शरीरात हालचाल होऊ लागली. दामोदरचे त्याच्याकडे पूर्ण लक्ष होते. शेखर आणि दिगंबरही सावध होऊन ऐकत होते.
" बस...! संपत आलं न...!" अचानक आनंदच्या शरीरातून तो बोलू लागला.
" मी बोललो न...ती अजून आहे. तिच्याच जागेवर...! इतक्या लवकर ती जाणार नाहीच." आणि तो पून्हा राक्षसी हसू लागला.
" इतक्या सहजा-सहजी ती सुटणार नाहीये." सगळे अवाक होऊन ऐकू लागले.
" तिच्यामुळे...तिच्याचमुळे आमची अशी गत झाली." हळू-हळू तो आता बोलू लागला.
" पण आता, आता नाही सुटू शकणार ती ! आणि आता तर तिला वाचवायला नाहीये कुणी...!" तो पून्हा हसू लागला. त्याच्या हाताच्याही हालचाली सुरू झाल्या. दामोदरने वही बंद केली. ती लाल कापडात झाकली.
" बंद का केलं ? तो अजून बोलला असता." शेखरने त्याला दटावले.
" नाही, ही जागा नाहीये." दामोदरने त्याला बजावले. " हे नेमका कोण आहे, हा तो इथे नाही सांगणार. इतक्या सहजा-सहजी तर नाहीच नाही."
" का ?"
" सांगतो...!" दामोदरने पिशवीतून एक पान बाहेर काढले. त्या पानावरचे अक्षर वेगळे होते.
" मृत्यू म्हणजे सुटका नाही. कोणाचीच नाही ! उलट, इथे झालेल्या मृत्यूने काही नवीन कहाण्या लिहून ठेवल्या आहेत. या भूमीवर घडलेलं पाप अत्यंत जहाल आणि अक्षम्य आहे. झालेला प्रत्येक मृत्यू हा अपूर्ण आहे आणि प्रत्येक मावळत्या श्वासामागे अतोनात तळतळाट आहेत. ते सुटले तर क्षणात सुटतील आणि नाही सुटलेत, तर युगांपर्यंत सुरु रहातील.
तिचा आत्मा इथे कैद असेल. कारण तिच्या मृत्यूला जवाबदार असणारे अजून श्वास घेतायत. हा जन्म-मरणाचा खेळ असाच सुरु राहील. आणि याला थंबवायचं असेल, तर मला शोधा...!"
" हे कोणाचं अक्षर आहे ?" शेखरने विचारले.
" माहित नाही, पण हे थंबवायचं असेल, तर याला शोधावं लागेल.
" प्रतिशोधाची असंख्य कारणे या मातीत जशीच्या तशी रहातील. एका शरीरातून दुसऱ्या शरीरात हे राक्षस प्रवास सुरु ठेवतील. ग्रहांचे तुटलेले संकेत, जन्म आणि मृत्यूच्या चुकलेल्या वेळा...! सगळं-सगळं पून्हा-पुन्हा डोळ्यासमोर दिसू लागेल."
" म्हणजे...?" शेखरने पुन्हा विचारले.
" सरळ अर्थ आहे. याचा प्रतिशोध पूर्ण होत नाही, तो पर्यंत हा असाच या भूमीवर असेल."
" असुरांनी लिहिलेल्या कुंडल्यांमध्ये जन्म घेतलेल्या मानवाच्या नाशीबात ...!" कीर्तिकर बोलले, तसे सगळ्यांनी त्यांच्याकडे नजर वळवली...!
क्रमश :
अनुराग